
तुझा आवडता फलंदाज असा कोणी मला अगदी मध्यरात्री गाढ झोपेत असताना प्रश्न विचारला तर मी एकच उत्तर सांगेन राहुल द्रविड..भारतीय संघाला मोठ्य़ा फलंदाजांची कमतरता कधीही नव्हती,विजय हजारंपासून अगदी वीरेंद्र सेहवाग पर्यंत अनेक मोठे फलंदाज भारताला मिळाले आहेत. यापुढही मिळतील.पण या सा-या फलंदाजांच्या मांदियाळीत मि.डिपेंडेबल म्हणता येईल असा एकचं फलंदाज आतापर्यंत भारताला मिळालाय तो म्हणजे राहुल राहुल द्रविड
मला आठवतय,1996 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल भारताच्या संघात आला.वनडे क्रिकेटचा थरार काय असतो हे त्या विश्वचषकात जयसुर्या-कालूविथरणा जोडीनं दाखवून दिलं होत.भारताकडेही त्यावेळी सचिन,जडेजा सिद्धु यासारखे फटकेबाज खेळाडू होते.त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीनचा वारसा सांगणा-या त्याच्याच परंपरेरीतली शैलीदार फलंदाजी करणा-या राहुलनं भारतीय संघात प्रवेश मिळवला.1996 साली ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित त्यानं सौरव गांगुलीच्या साह्यानं कसोटी पदार्पन केलं.चार बाद...अशा एका अगदी नाजूक परिस्थीतीमध्ये त्यानं सौरवच्या साह्यानं हा डाव सांभाळला.या डावात सौरवनं शतक मारलं.मात्र द्रविडला शतकानं पाच धावांनी हुलकावणी दिली.या कसोटीत सौरवच्या शतकाप्रमाणे राहुलच्या 95 धावाही अतिशय महत्वाच्या होत्या.मात्र त्याच्या या महत्वपूर्ण खेळाकडे सा-याच दुर्लक्ष झालं.पहिल्या कसोटीपासून ते सध्याच्या महोली कसोटीपर्यंत सातत्यानं द्रविडच्या फलंदाजीचं मनमोकळं कौतूक जगात झालंच नाही.
राहुलकडं दुर्लक्ष झालं याच कारण तो ज्या काळात खेळायला आला त्याकडे आहे.त्याची फलंदाजी सुनील गावस्कर,हेन्स,बॉयकॉट,हनीफ या खेळाडूंच्या परंपरेतली होती.तर 1996 या वर्षात सचिनचा सूर्य अगदी मध्यावर होता.सचिनच्या फलंदाजींन भारतीय क्रिकेटची परिभाषाचं बदलून टाकली. आक्रमकतेचा नवा मुलमंत्र सचिननं भारतीय क्रिकेटला दिला.त्यानंतरचे सौरव सहेवाग किंवा सध्याचा युवराज सिंग या सा-यांच्या फटका-यांच्या झगमगाटाट द्रविडची फलंदाजीही संपूर्णपणे वेगळी आहे.आज 20-20 च्या या जमान्यात केवळ विध्वंस करणं हीच बॅटींगची व्यख्या झालीय.मात्र ही व्यख्या करणारे हे सोयिस्कर रित्या विसरतात की लढाई केवळ तलवार,बंदूका यांच्यासाह्यानं लढता येत नाही तर ही लढाई जिंकण्यासाठी ढालही तितकीच मजबूत असावी लागते.शत्रूवर हल्ला करण्याकरता एक भक्कम बालेकिल्ला तुमच्याकडं असायला हवा.राहुल द्रविड ही भारतीय संघाची अशी ढाल होती की जी पुढं करुन भारतानं वेगवेगळ्य़ा देशांमधल्या लढाया जिंकल्या.राहुल द्रविड हा असा एक मजबूत खांदा होता की ज्याच्या खांद्यावर भरवसा ठेवून भारतीय तोफा गेली अनेक वर्षे धडाडल्या.
भारतीय संघाचं परदेशात कसोटी जिंकणं म्हणजे जनसंघानं लोकसभेच्या जागा जिंकण्यासारखी परिस्थीती 1996 पूर्वी होती.या जनसंघाचं भाजपमध्ये रुपांतर करण्याचं काम द्रविड या निस्पृह फलंदाजानं केलं.राहुल द्रविडनं केलेल्या नांगरणीनूनच भारतीय संघाला परदेशात विजयाचं पीक काढंता आलंय.सिडनी असो की लाहोर हेडिंग्ले असो की जमेका क्रिकेट विश्वातल्या कोणत्याही कोप-यात भारतानं जे विजय गेल्या दशकात मिळवलेत.त्या विजयात राहुलचा वाटा सर्वात मोठा आहे.2001 साली कोलकता कसोटीमध्ये त्यानं जी अविस्मरणीय भागीदारी व्ही.व्ही.एस लक्ष्मण बरोबर केली.त्याला कोणाताच भारतीय क्रिकेट रसीक कधीच विसरणार नाही.भारताचा सर्वात अविश्वसनीय विजय म्हणूनचं या कसोटीकडं पाहवं लागेल.
द्रविड फक्त कसोटीचा फलंदाज आहे असा आरोप नेहमीच होत आलंय.(याच कारणामुळे काहीही काऱण नसताना त्याला या वर्षाच्या सुरवातीला वनडेतून वगळण्यात आलं.) पण सचिन आणि सौरवनंतर वनडेमध्ये 10 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज आहे फक्त राहुल द्रविड.जे अगदी नवडे स्पेशालिस्ट फलंजा ओळखले जातात त्या विरेंद्र सेहवागचे वनडेत शतकं आहेत 9 आणि सरासरी आहे 33.28,युवराज सिंगची आहेत 10 शतकं आणि 37.16 इतकी सरासरी उलट राहुल द्रविडची अगदी 333 एकदिवसीय सामने खेळूनही सरासरी आहे 39.49.कसोटीमध्येतर त्याच्या दर्जाशी आणि गुणवत्तेशी फक्त सचिनच स्पर्धो करु शकेलं.हे संपूर्ण 2008 खराब जाऊनही त्याची सरासरी आहे 52.52 कसोटी क्रिकेटच्या 100 वर्षांच्या इतिहासात ही सरासरी पार करणारे अगदी मोजकेच फलंदाज असतील.कसोटी खेळणा-या प्रत्येक देशात शतक झळकावाणरे अगदी बोटावर मोजता येतील इतके फलंदाज आहेत.त्या यादिय द्रविडनं स्थान सचिनच्याही आधी मिळवलं होतं.(सचिनचाही या यादीत द्रविडच्या नंतर समावेश झालाय.)
ह्या महान फलंदाजासाठी हे संपूर्ण वर्ष मात्र अगदी खराब गेलं. त्याच्या बॅटला या संपूर्ण वर्षात ग्रहण लागलं होतं.फलंदाजाची स्टार व्हल्यू जेवढी जास्त तेवढी त्याच्या अपयशाचा आवाजही मोठा असतो.टिव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रांच्या स्पोर्टस पेजवर हा आवाज सर्वात जास्त घुमतो.द्रविडनं निवृत्त व्हावं का हा सध्या भारतानं पाकिस्तानवर हल्ला करावा का या प्रश्नानंतरचा सर्वात महत्वाचा प्रश्न बनलाय.(हा प्रश्न अजुन भारत-पाकिस्तान युद्दापेक्षा महत्वाचं बनला नाही हे आपल्या सर्वांचे सुदैवंच मानावं लागेल) मात्र आता मोहाली कसोटीमधल्या शतकानं आपण संपलो नसल्याचं त्यानं जगाला दाखवून दिलंय.20-20 क्रिकेटच्या या फास्टफूडच्या जमान्यात द्रविडही सर्व पक्वान्नांनी भरलेली डिश आहे.ब-याचदा आक्रमकता ही बेदरकार ठरु शकते. त्यामुळे प्रत्येक संघात असा एका दिपस्तंभ असावाचं लागतो.हा दिपस्तंभ म्हणजे राहुल द्रविड आहे.
मला अनेक गोष्टींची हुरहुर वाटते,आपल्याला लोकमान्य टिळक आणि सावरकरांचे भाषणं ऐकता आली नाहीत.जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वानं भारलेल्या विद्यार्थी शक्तीचा काळ मी अनुभला नाही.गॅरी सोबर्स,डॉन ब्रॅडमन ह्यांची फलंदाजी पाहण्याचं भाग्यही मला मिळालं नाही मात्र मी माझ्या आयुष्यातली 12 वर्ष राहुल द्रविडची फलंदाजी पाहीलीय. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात ही राहुलची ही फलंदाजी मला एक सतत नवी उभारी देत राहील. काळ कसाही असो परिस्थिती कशीही असो न डगमगता न खचता आपलं काम करत राहयचं...माझ्या कुटूंबासाठी माझ्या मित्रपरीवारासाठी त्याहीपुढं जाऊन माझ्या देशासाठी एक मिस्टर डिपेंडेबल बनण्याचा सतत प्रयत्न करायचा ...त्यामुळेच मी या ब्लॉगच्या अगदी सुरवातीला म्हंटलंय की तूझा आवडता फलंदाज कोणता असा प्रश्न मला कोणी अगदी गाढ झोपेत अगदी मध्यरात्री कोणी मला प्रश्न विचारला तर मी सांगेनं राहुल द्रविड !