Thursday, December 31, 2009

कथा काँग्रेसची


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच स्वातंत्र्यानंतरच्या इंदिरा काँग्रेस या भारतामधल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्या 125 व्या वर्षात पदार्पन केलंय. 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबईत या पक्षाचे पहिले अधिवेशन झाले. गेल्या 125 वर्षात या पक्षाने देशाच्या इतिहासात एक न पुसता येणारे स्थान निर्माण केले आहे.

सुरवातीचा काळ भारताचा 125 वर्षांचा इतिहास लिहीत असताना काँग्रेसला टाळून हा इतिहास लिहणे शक्य नाही.1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापन झाली. हा काळ मोठा गुंतागुंतीचा होता. इंग्रजी शिक्षण घेऊन तयार होणारी एक सुशिक्षत भारतीयांची पिढी या देशात तयार होत होती. या वर्गाच्या अंसोतषाला योग्य प्रकारे रस्ता देणं आवश्यक आहे. हे चाणाक्ष ब्रिटीश राज्यकर्त्यांनी ओळखलं होतं.त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एलेन ह्युम या निवृत्त सनदी अधिका-यांच्या पुढाकाराने झाली. सुरवातीच्या काही अधिवेशनात ब्रिटीश राज्यकर्त्यांशी सलोख्याचे संबध ठेवावे असेच मत त्यावेळी काँग्रेस पक्षातल्या बहुतेक नेत्यांचे होते. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन यांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनालाही हजेरी लावली होती.न्या. रानडे, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी या सारख्या विलक्षण व्यक्तींचे सुरवातीच्या काळात पक्षावर वर्चस्व होते. ब्रिटीश राज्यकर्त्यांशी संघर्ष न करता चर्चेच्या माध्यमातून भारतीयंचे प्रश्न सोडवले पाहिजेत असे मत यापैकी बहुतेक नेत्यांचे होते. काँग्रेसच्या राजकारणात प्रसिद्ध झालेला हाच तो मवाळ गट. ब्रिटीशांची राजवट ही हिंदूस्थानला मिळालेले वरदान आहे. असेही यापैकी अनेकांचे मत होते. या नेत्यांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षाचे स्थान समाजातल्या काही वर्गांपुरतेच मर्यादीत होते. हा पक्ष ख-या अर्थाने लोकचळवळ बनला तो टिळकयुगात.




टिळकयूग---लोकमान्य टिळकांवर त्यांच्या विरोधकांनी तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी अशी टिका केली होती. पुढे हेच विशेष टिळकांची ओळख बनली. कोणताही अन्य व्यवसाय न करत केवळ राजकारण करणारे व्.यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक. काँग्रेसच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला त्यांनी आपल्या काराकिर्दीत वेगळी दिशा दिली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध सामान्य जनतेमध्ये असलेल्या असंतोषाला टिळकांनी आपल्या लेखणीतून आणि कार्यातून ख-या अर्थाने वाचा फोडली. भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या टिळकांनी काँग्रेसला लढाऊ आणि समर्थ बनवले. 1907 च्या सुरत अधिवेशनात ज्येष्ठ मवाळ नेत्यांच्या दडपणाला त्यांनी जुमानले नाही. जहाल आणि मवाळ अशी काँग्रेसची विभागणी या अधिवेशनात झाली.

1905 मध्ये करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीला टिळकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. धर्माच्या नावावर बंगालची फाळणी करण्याचा ब्रिटीश सरकारच्या राजकारणावर त्यांनी सा-या देशात रान उठवले. लाल-बाल-पाल या त्रिमुर्तींच्या नेतृत्वाखाली सारा भारत देश एकत्र आला. भारतीय जनमानसाच्या या अभूतपूर्व रेट्यांमुळे ब्रिटीश सरकारला अखेर गुडघे टेकावे लागले. 1911 साली बंगालची फाळणी ब्रिटीशांनी रद्द केली. काँग्रेसच्या चळवळीला मिळालेलं हे पहिले मोठं यश होतं. 1907 मध्ये काँग्रेसची विभागणी झाली असली तरी त्यानंतर 1916 मध्ये काँग्रेसच्या सर्व गटाचे एकत्रिकरण करण्यामध्ये टिळकांचा पुढाकार होता. टिळकांच्याच पुढाकाराने जहाल-मवाळ आणि अगदी मुस्लिम लिग देखील राष्ट्रीय सभेच्या झेंड्याखाली एकत्र आली. मुस्लिम लिगचे नंतरच्या काळातील सर्वेसर्वा आणि भारतीय फाळणीचे खलनायक महंमद अलि जिना हेही कट्टर टिळकभक्त होते. टिळकांनी आपल्या शेवटच्या काळात होमरुल चळवळीची स्थापना केली. स्वराज हा जन्मसिद्ध हक्क आहे असे ब्रिटीश साम्राज्याला निक्षणुण सांगणा-या लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 या दिवशी निधन झाले. भारतीय राजकारणातले टिळकयूग त्या दिवशी संपले. गांधीयुगाला त्याच दिवशी सुरवात झाली.

गांधीयूग ---विसाव्या शतकात केवळ भारताच्या नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीने मोठा ठसा उमटवलाय. अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन नवीन मंत्रांची ओखख त्यांनी जगाला करुन दिली. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी बनवलं.हा लढा ख-या अर्थाने घरोघरी पोहचवला तो गांधीजींनी. महिला, विद्यार्थी, सवर्ण, दलित उच्च-शिक्षीत, मागास असा समाजातला प्रत्येक वर्गाला त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जोडले. स्वराज्य, स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार अस्त्रांनी त्यांनी ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडले.

मुस्लिमांचे तृष्टीकरण करण्याची काँग्रेसला सवय लावली तीही गांधीजींनी...तुर्कस्थानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खिलाफत चळवळ सुरु केली. काँग्रेसच्या राजकारणात मुस्लिमांचे जाणीवपूर्वक प्रतिनिधीत्वन त्यांनीच वाढवले. 'हम करे सो कायदा ' ह्या गांधी घराण्याच्या खास कल्चरचा पायाही त्यांनीच रचला. आपल्या नेतृत्वाला धोका निर्माण करु शकणारे सुभाषचंद्र बोस आणि महंमद अली जिना हे दोन नेते त्यांनी काँग्रेसच्या राजकारणातून दूर केले.

गांधीच्या आणि काँग्रेसच्या आयुष्यातला आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे पुणे करार. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन भारताचे आणखी एक विभाजन करण्याचा डाव ब्रिटीशांनी रचला होता. ब्रिटीशांच्या या धूर्त डावपेचाविरुद्ध गांधीजींनी प्राणांतिक उपोषण सुरु केले. अखेर गांधीजीच्या नैतिक दबावाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मान राखला. 24 सप्टेंबर 1932 या दिवशी गांधीजी आणि आंबेडकर या दोन नेत्यांमध्ये पुणे करार करण्यात आला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ न देता त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ द्यावे. या बाबीवर या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. गांधीजींनी या बाबत आग्रही भूमिका घेतली नसती तर दलित समाज मूळ प्रवाहातून बाहेर काढण्याचा ब्रिटीशांचा हेतू साध्य झाला असता. अर्थात गांधीजींची ही आग्रही भूमिका मुस्लिम लिगच्या बाबतीत कायम राहू शकली नाही.

फाळणी आणि गांधीहत्या --लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडणा-या पंडित नेहरुंच्या काँग्रेसनेच फाळणीला संमती दिली. महंमद अली जिनांच्या महत्वकांक्षी मनोवृत्तीला ब्रिटीश राज्यकर्त्यांनी खतपानी घातले. एकेकाळचे धर्मनिरपेक्ष आणि कट्टर टिळकभक्त जिना 1940 नंतर मुस्लिम लिग या कट्टर संघटनेचे सर्वेसर्वा बनले. मुस्लिम लिगच्या गुंडांनी देशभर घातलेला हैदोस, सत्ता संपादन करण्यासाठी आतुर झालेले काँग्रेस नेते यामुळे या देशाची फाळणी होऊन हा देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस हीच एकमेव सर्वमान्य आणि सर्वशक्तीमान संघटना होती. या पक्षांच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे आणि सर्वशक्तीने प्रयत्न केले असते तर कदाचित फाळणीचा इतिहास बदलला असता. फाळणी टाळता न येणं हे गांधीजंच्या नेतृत्वाखाली लढणा-या महान देशभक्तांच्या संघटनांचे मोठे अपयश होते. गांधींच्या या अपयशामुळे त्यांच्यावर नाराज असलेला एक वर्ग या देशात होता. त्यातच पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णयावरही मोठा गहजब उडाला होता. अखेर 30 जानेवारी 1948 या एक दुर्दैवी दिवशी नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरु तरुणाने गांधींची हत्या केली. स्वातंत्र्यानंतर देशावर आणि काँग्रेस पक्षावर झालेला हा मोठा आघात होता. देशाच्या विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेचे मोठे पडसाद उमटले. अनेक ब्राम्हण व्यक्तींची घरे यानंतरच्या काही दिवसात जाळण्यात आली. राजकारणात आणि समाजकारणात ब्राम्हण वर्गाचे महत्व कमी करण्यासाठी गोडसेच्या जातीचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आला. जातीभेद मिटावा याकरता आयुष्यभर संघर्ष करणा-या गांधींच्या शिष्यांनी या संपूर्ण गोष्टीक़डे दुर्लक्ष केलं.

नेहरुयूग --1947 ते 1964 या काळात काँग्रेसवर संपुर्णपणे नेहरुंचे वर्चस्व होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले जवळपास सर्वच नेते काँग्रेसमध्ये होते. या पुण्याईवर काँग्रेसने सुरवातीच्या काही निवडणुका जिंकल्या. परंतु सत्तेची उब चाखताच काँग्रेस नेत्यांचा भाबडा आशावाद गळून पडला. माणूस स्खलनशील असतो. ह्या तत्वाला काँग्रेसचे नेते अपवाद नाहीत हे देशाने पाहिले. या देशात रामराज्य आले पाहिजे या गांधींच्या स्वप्नाला 'शांतीघाटा'मध्ये कायमची समाधी मिळाली.आंतराराष्ट्रीय नेतृत्व करण्याचा प्रयत्न नेहरुंनी केला. पंचशील करार, अलिप्त राष्ट्र चळवळीला दिलेली चालना, पंचशील करार यासारख्या गोष्टींमुळे नेहरुंनी स्वत:ला तरराष्ट्रीय राजकारणात ब-यापैकी प्रस्थापित केले. परंतु नेहरुंच्या स्वप्नाळू वृत्तीचा मोठा फटका देशाला 1962 मध्ये सहन करावा लागला. चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताला मोठा पराभव स्विकारावा लागला. चीनच्या या हल्ल्याची सुतराम कल्पना भारतीय लष्कराला नव्हती. कारगील घुसखोरीवरुन भाजपला टिका करणा-या काँग्रेस नेत्यांना 1962 च्या या ऐतिहासिक चुकीची आता आठवणही होत नाही.

शास्त्री कालखंड 1964 ते 1966 या लहान परंतु अत्यंत कसोटीच्या काळात लालबहाद्दूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते होते. या काळात दुष्काळ आणि 65 चे युद्ध या दोन मोठ्या परीक्षांना देश समोर गेला. जय जवान जय किसान हा नारा त्यांनी देशाला दिला. हरित क्रांतीची बिजं त्यांनी आपल्या कारकिर्दींमध्ये रोवली. देशाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या दुर्देवाने शास्त्रीजींचे 1966 साली अपघाती निधन झाले. शास्त्रीजींना मोठा कालखंड मिळाला असता तर काँग्रेसचे आणि देशाच्या सध्याच्या चित्रात मोठा फरक पडला असता.

इंदिरापर्व ---- काँग्रेस पक्षातील एकमेव पुरुष असं वर्णन त्या काळातल्या अनेक विश्लेषकांनी इंदिरा गांधींचे केले आहे. 1969 मध्ये बंगोलर अधिवेशनात तमाम बड्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात बंड केले. या बंडाने ह्या बाई डगमगल्या नाहीत. इंदिरा काँग्रेस ही नवीन काँग्रेस त्यांनी स्थापन केली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बॅंकांचे राष्ट्रीयकरण, 1974 मध्ये पोखरणमध्ये झालेला अणुस्फोट , सिक्किमचे भारतामध्ये केलेले विलिनीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बांगलादेशची निर्मिती ह्या सर्व भक्कम उपलब्धी इंदिराजींच्या आहेत.

कॉँग्रेस संघटनेला दुबळं कारण्याच काम त्यांच्याच काळात सुरु झालं.पंडितजींच्या काळात एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सर्वात शक्तीशाली नेता असे.विधीमंडळ आणि पक्षसंघटना या दोन्ही आघाडींवर त्याचीच कणखर पकड असे.मात्र अशा प्रकारचे नेतृत्व राज्यात कधीचं तयार होणार नाही ह्याची काळजी इंदिरांजींनी नेमली.मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशअध्यक्ष या सध्याच्या खास कॉँग्रेसी परंपरेची सुरवात त्यांच्याच काळात झाली.स्वत:च्या मर्जीप्रमाणे मुख्यमंत्री बदलले गेले.विरोधी पक्षांची सरकार बरखास्त करण्यात आली.राजकीय स्वार्थासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्याचा सध्याचा सर्वत्र प्रचलित असलेला ट्रेंड त्यांनीच सुरु केला.इंदिरांजीना सतत असुरक्षिततेनं ग्रासलेलं असायचं असं अनेक इतिहासकार सांगतात.याच असुरक्षिततेमुळं संजय गांधींचा काही काळ वगळता ( तो ही शेवटी आणि सुरवातीला त्यांचाच मुलगा होता) दोन क्रमांकाचा नेता त्यांनी कॉँग्रेसमध्ये निर्माण होऊ दिला नाही.

भाजप आणि कम्युनिस्ट वगळता जवळपास सर्वचं पक्षांची सुत्र एका विशीष्ट घराण्याकडं आहेत.या राजकीय घराणेशाहीला खतपाणी घालणार वातावरणं याच इंदिरा'आम्मांनी ' केलं.गांधी घरण्याची सवयच त्यांनी कॉँग्रेस पक्षाला लावली.यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.राजीवजींच्या नंतर सोनिया गांधीनी नेतृत्व स्विकारावं म्हणून 1991 साली (अगदी शरद पवारांसह) सर्व दिग्गज कॉँग्रेस पदाधिकारी 10 जनपथवर धावले होते.अगदी आजही सोनिया गांधीनंतर कॉँग्रेसचा नेता कोण अशी यादी तयार करायती ठरवली तर ही यादी राहुल गांधीपासून सुरु होऊन राहुल गांधींपशीच संपते.इंदिराजींच स्मरण करत असताना जून 1975 ते मार्च 1977 हा त्यांच्या आयुष्यातला काळ कधीच विसरता येणार नाही. रायबरेली निवडणुकीत त्यांनी पदाचा गैरवापर केला.त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी असा निर्णय अलहाबाद न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या.सिन्हा यांनी दिला होता.वास्ताविक इंदिराजी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकल्या असत्या.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्या पंतप्रधान पदाला काहीच धोका नव्हता.तरीही इंदिराजींनी अतिशय अन्यायकार (आणि अमानुषपणे ही ) देशावर आणिबाणी लादली. त्यांच्या डाव्या आणि उजव्या विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं. गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरेला विशाल भारत देश इंदिरा आणि संजय या मातापुत्रांच्या वळचळणीला त्यांनी या काळात बांधला.काहीही करुन सत्तेवर टिकून राहण्याची जी वृत्ती सध्याच्या सर्वच पक्षातल्या सत्ताधीशांमध्ये सध्या दिसते.याच पूर्वीच्या काळातलं अगदी क्लासीक उदाहरण म्हणेज इंदिरा गांधी...भारतीय लोकशाहीच्या गळा घोटणा-या या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांना कधीही माफ करता येणार नाही.


राजकीय स्वार्थासाठी समाजतल्या एखाद्या संघटनेला अथवा व्यक्तीला गोंजारण्याची विघातक पद्धत त्यांनीच सुरु केली. पंजाबमधल्या अकाली दलाच्या वर्चस्वाला शह देण्याकरता भिंद्रणवाले हा भस्मासूर त्यांनीच निर्माण केला.ह्या भस्मासुरानं पुंढं देशाच्या एकात्मतेलाचं आव्हान दिलं.तेंव्हा याचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम त्यांनी राबली.इंदिराजींच्या या धाडसी निर्णयाला सलाम केलाच पाहीजे.याच निर्णयाच्या बदल्यात त्यांना त्यांच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली.

राजीव राजवट --- नेहरु, इंदिरा गांधी यांच्या नंतर राजीव गांधी हे पंतप्रधान होणं हे काँग्रेसी परंपरेला अगदी साजेसं होतं. एकेकाळी पायलट असणारा हा तरुण कोणताही मंत्रिपदाचा अनुभव नसताना या देशाचा पंतप्रधान झाला. या देशातल्या स्वप्नाळू तरुणांचा प्रतिनिधी म्हणून सुरवातीला राजीव गांधी यांच्याकडे सुरवातीला बघितले गेले. बोफोर्स घोटाळा आणि शाहबानो प्रकरण या दोन प्रकरणामुळे राजीव गांधींच्या या प्रतिमेला तडा गेला. बोफोर्समधले वास्तव आजतागायत बाहेर आलेले नाही. तर शाहबानो प्रकरणामुळे राजीव गांधींची पुरोगामी प्रतिमा किती बेगडी आहे हे सा-या देशाने पाहिले. कट्टरवादी मुस्लिमांच्या दबाबावाला बळी पडून काँग्रेसने घटनादुरुस्ती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तमा त्यांनी केली नाही. या समाजातल्या मागास वर्गाला त्यातही मुस्लिम समाजाला प्रगतिच्या प्रवाहात येऊ द्यायचे नाही. हे काँग्रेसचे धोरण आहे. असा आरोप नेहमी करण्यात आलाय. शाहबानो प्रकरणामुळे या आरोपाला बळ मिळाले. शाहबानो प्रकरणाच्या दोन दशकांनतर देशातल्या मुस्लिमांची परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. काँग्रेस सरकारनेच नेमलेल्या सच्चर आयोगाने ह्या वास्तवावर बोट ठेवलंय.

1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात शीखांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या. या शीख दंगलीबाबत राजीव गांधींनी अगदी बोटचेपी भूमिका घेतली. '' वटवृक्ष उन्मळून पडल्यानंतर फांद्या कोसळणारच '' हे राजीव गांधी यांचे वाक्य शीख बांधवांच्यया जखमांवर मीठ चोळणारे ठरले. त्यांतर सुमारे दहा वर्ष पंजाब या ज्वालामुखीत जळत होता. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला काँग्रसी राज्यकर्त्यांच्या विघातक धोरणांमुळे बळ मिळाले

.नरसिंह राव ---गांधी घराण्याच्या व्यतीरिक्त काँग्रेसने एक पंतप्रधान देशाला दिला. ते म्हणजे पी. व्ही. नरसिंहराव. देशाची आर्थिक परिस्थिती डबाघाईला आलेली असताना राव पंतप्रधान झाले. या देशात आर्थिक उदारीकरणाचे युग त्यांनी आणले. आज भारतीय अर्थव्यवस्थेला जे ब-यापैकी दिवस आले आहेत त्याचा पाया नरसिंहराव यांच्याच सरकारनेच रचला. परंतु नरसिंह राव यांचे नेतृत्व हे करिश्माई नव्हते. त्यांच्या काळात आयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली गेली. या घटनेमुळे मुस्लिम समाज काहीप्रमाणात काँग्रेसपासून दूर गेला. वेगवेगळ्या भ्रष्टाचारी प्रकरणामध्ये राव अडकले. काँग्रेसची पक्षसंघटना कमजोर झाली. या सर्व कारणांमुळे 1996 ते 2004 ही आठ वर्षे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले.

सोनिया काँग्रेस---काँग्रेस पक्ष अत्यंत कठिण कालखंडामध्ये असताना सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारलं. योग्य पक्षांची घेतलेली साथ आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची काही फसलेली धोरणे यामुळे 2004 साली काँग्रेस आघाडीला सत्ता मिळवता आली. 2009 मध्ये विरोधकांच्या दूहीचा आणि शक्तीपाताचा फायदा काँग्रेस आघाडीला झाला. मनमोहन सिंग सलग दुस-यांदा देशाचे पंतप्रधान झाले.

आज देशापुढे वाढती महागाई, घुसखोरी, नक्षलवाद, तेलंगाना सारख्या मुद्यावर निर्माण झालेला कट्टर प्रांतवाद ह्या जुन्याच अंतर्गत समस्या मोठ्या होऊन उभ्या आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबानी शक्तींचा वाढत चाललेला प्रभाव, बांगलादेशमधील कडवा धर्मवाद, नेपाळमध्ये माओवादी संघटनांचे वाढते जाळे या गोष्टींचा भारताच्या पुढच्या वाटचालीवर मोठा प्रभाव पडणार आहे. या सर्व समस्यांमधून देशाला बाहेर पाडण्यासाठी एखादे लॉंग टर्म व्हिजन काँग्रेसी राज्यकर्त्यांपुढे नाही. ह्य. सर्व समस्यांवर रामबाण औषध शोधण्यापेक्षा केवळ तात्कालिन फायद्याकरता वरवरची मलमपट्टी करण्याची विघातक परंपरा आजही सुरु आहे. सध्या चिघळलेला तेलंगना प्रश्न हे याचे अगदी क्लासिक उदाहरण


देशातल्या नागरिकांनी काँग्रेसवर भरभरुन प्रेम कलं. काँग्रेसी नेत्यांना अगदी देव्हा-यात बसवलं. सत्ता, संपत्ती, किर्ती या सर्व गोष्टींचा भरभरुन उपभोग काँग्रेसी राज्यकर्त्यांनी गेली अनेक वर्षे केलाय. या सर्व प्रेमाची उतराई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसी नेत्यांनी केला नाही. स्वातंमत्र्याच्या सहा दशकानंतरही भारताची गणना विकसीत राष्ट्र म्हणून होत नाही. काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या या उदासिन धोरणांचीच फळे भारतीय भोगतायत असं म्हंटल तर यात वावगे काय ?

Friday, December 25, 2009

अटल कहाणी


राजकारण हे सभ्य लोकांचे क्षेत्र नाही. सर्वसामान्य व्यक्ती राजकारणात तगू शकत नाही. ध्येय, विचारधारा या गोष्टींना राजकारणात स्थान नाही.या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर जात, पैसा, घराणे आणि पक्ष असे राजकीय मेरीट तुमच्याकडे असावे लागते. या सारख्या गोष्टी आपण सारेजण वारंवार ऐकतो. स्वातंत्र्यानंतर अगदी आत्तापर्यंतचे वेगवेगळे राजकारणी पाहिले की या गोष्टी ख-या आहेत याची खात्री वाटू लागते. परंतु गेल्या सहा दशकांत अशी काही मोजक्या राजकारणी व्यक्ती आठवल्या की वाटतं..अजुनही आशेला जागा आहे. पैसा, पक्ष, जात, विचारधारा या सारख्या कोणत्याही गोष्टींची तडजोड न करता या क्षेत्रात यशस्वी होता येतं. अगदी या देशाचे तीन वेळा पंतप्रधानही होता येतं. होय अटलबिहारी वाजपेयी हे या देशातल्या अशा मोजक्या राजकरण्यांपैकी एक आहेत. ज्यांचा अभिमान सर्वांना वाटायला हवा. .

आतापर्यंत या देशाने 7 काँग्रेसेतर पंतप्रधान पाहिले. परंतु ख-या अर्थाने एकमेव गैरकाँग्रेसी पंतप्रधान म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. सुमारे सहा दशकं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक, जनसंघ आणि नंतर भाजप या माध्यमातून त्यांनी समाजकाराण आणि राजकारण केलं. 1957 मध्ये बलरामपूर या लोकसभा मतदारसंघातून ते सर्वात प्रथम निवडून आले. सुमारे सहा दशकं त्यांच्यामधील कुशल संसदपटूचा अनुभव सा-या देशाने घेतला आहे.

वाजपेयींचं एकूणच व्यक्तिमत्त्व एखाद्या खानदानी उत्तर भारतीय कुटुंबप्रमुखासारखं. शिवाय ओजस्वी आणि सभा जिंकणारं वक्तृत्व साथीला. त्यामुळे अल्पावधीतच संसदेतील त्यांचं स्थान अपरिहार्य बनलं आणि ते परराष्ट्र धोरणावर बोलू लागले की पंडित नेहरूही सभागृहात आवर्जून येऊन बसत. ज्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि काँग्रेस ह्याच पक्षाचे राज्य होते. पंडित नेहरु इंदिरा गांधी यासारख्या प्रचंड मासबेस असलेल्या व्यक्ती देशाच्या पंतप्रधान होत्या.त्या काळात विरोधी पक्षात तेही जनसंघासारख्या एका विशिष्ट विचाराधारेनं भारलेल्या पक्षात राहून स्वत:चे स्थान निर्माण करणे ही अत्यंत अवघड बाब होती. परंतु अटलजीने ती अगदी लिलया केली.


सर्वसमावेशकता हा अटलजींच्या व्यक्तीमतवामधला अत्यंत महत्वाचा गुण. त्यांच्या याच कौशल्यामुळे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने त्यांना प्रोजेक्ट केलं. अण्णा द्रमुक ते असम गण परिषद आणि शिवसेना ते नॅशनल काँन्फरन्स यासारख्या अगदी अठरापगड पक्षांची मोट त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ शकली. अठरापगड पक्षांना एकत्र येऊन या देशात सरकार बनू शकतं. तसेच ते संपूर्ण कालावधी चालू शकतं हे अटलजींनीच सर्वप्रथम या देशाला दाखवून दिलं.


अटलजींच्या पंतप्रधान पदाची सहा वर्षे अत्यंत वादळी अशी होती. 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या दिवशी भारताने पोखरणमध्ये अणूस्फोट केला. इंदिरा गांधींनतर अणूचाचणी घेण्याचे धाडस दाखवणारे दुसरे पंतप्रधान म्हणजे अटलजी. जय जवान जय किसान यांच्याबरोबरच जय विज्ञान असा नवा नारा त्यांनी देशाला दिला. या देशाला अण्वस्त्रसज्ज त्यांनी केलं. जागतिक समुदायाच्या दबावाची तसेच निर्बंधाची त्यांनी पर्वा केली नाही. पाकिस्तान, चीन बांग्लादेश या सारखे विश्वासघातकी शत्रूराष्ट्र सभोवती असताना संरक्षण सज्जता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अणूचाचणी करुन सा-या जगाला त्यांनी आपले लष्करी सामर्थ्य दाखवून दिले.


अटलजींच्या कारकिर्दीतला दुसरा कसोटीचा काळ म्हणजे कारगील युद्ध. पाकिस्तान सोबत मैत्रीचे संबंध राहावे हीच त्यांची प्रमाणिक इच्छा होती. याच एकमेव उद्देशाने लाहोर बस यात्रा सारखे अत्यंत धाडसी पाऊल त्यांनी उचलले. लाहोर घोषणापत्रामध्येही त्यांनी पाकिस्तानकडे अत्यंत दिलदारपणे मैत्रीचा हात पुढे केला होता. परंतु पाकिस्तानच्या ना 'पाक' राज्यकर्त्यांना त्यांचे हे प्रामाणिक प्रयत्न मान्य नव्हते.त्यामुळेच त्यांनी कारगिलचे युद्ध भारतावर लादले.


कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेली घुसखोरी हे भारतीय गुप्तचर संस्थांचे अपयश होते. हा मुद्दा बरोबर आहे. परंतु ही घुसखोरी लक्षात आल्यानंतर अगदी तातडीने अटलजी सरकारने पाऊले उचलली हे मान्य करावे लागेल. नियंत्रण रेषा पार न करता प्रतिकूल भौगोलिक आणि सामरिक परिस्थितीवर मात करत भारतीय लष्कराने या युद्धात विजय मिळवला. भारतीय लष्कराच्या प्रत्येक कृतीला अटलजींच्या सरकारने खंबीर पाठिंबा दिला. जागतिक दडपणाचा दबाव न जुमानता पाकिस्तानी लष्कराला भारतीय सैन्याने नियंत्रणरेषेच्या बाहेर पिटाळले.' हम जंग न होने देंगे ' अशी एकेकाळी कविता करणारा हा कवी -हदयाचा पंतप्रधान प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगात किती खंबीर बनू शकतो हे सा-या देशाने या काळात अनुभवलं. ऑपरेशन विजय यशस्वी होण्यामागे भारतीय लष्कराला अटलजींच्या सरकारने दिलेली तोलामोलाची साथ तितकीच महत्वाची होती.


संपूर्ण देशाला पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर जोडणारी पंतप्रधान ग्रामसडक योजना, देशातल्या प्रत्येक व्यक्तीला साक्षर करण्यासाठी सुरु केलेले सर्वशिक्षा अभियान, देशातला दुष्काळ आणि पाणीटंचाई सारख्या समस्या कायम स्वरुपात संपण्याकरता नदी जोड सारखी 'भगीरथ' योजना, दुरसंचार क्षेत्राचे व्यापक जाळे, मोबाईल क्रांती या सारख्या अनेक कल्याणकारी योजना वाजपेयी सरकारने आपल्या सहा वर्षांच्या काळात सुरु केल्या. नरसिंह राव सरकारने सुरु केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रीयेला त्यांनी चालना दिली. सार्वजनिक प्रकल्पात खाजगी गुंतवणूक वाढवली. शंभर कोटी लोकसंख्येच्या भारतीय बाजारपेठेचे आत्मभान जागवण्याचे काम याच सरकारच्या कारकिर्दीत झाले. सा-या जगाला भारतीय बाजारपेठेच्या शक्तीची जाणीव करुन देण्याचे काम अटलजी सरकारने सर्वप्रथम केले.


अटलजी सरकारच्या सर्वच गोष्टी आलबेल होत्या असे नाही. या सहा वर्षात अशा काही गोष्टीही घडल्या की त्या काळात अटलजी पंतप्रधान होते हे आठवलं तरी मन अस्वस्थ होतं. किंबहूना अटलजींसारखे व्यक्ती देशाचे पंतप्रधान असताना या गोष्टी घडू शकतात याचा कधी कधी विश्वास बसत नाही. IC-814 या विमानाचे झालेले अपहरण हा असाच एक दुर्दैवी अध्याय.काठमांडूहून दिल्लीला निघालेले विमान दहशतवाद्यांनी कंदहारला नेले. ह्या विमानातले प्रवासी सोडवण्याकरता मौलना अझर मसूद सहीत काही कडव्या दहशतवाद्यांना अटलजी सरकारने सोडून दिले. प्रबळ राष्ट्रवादी विचाराशी नाळ घट्ट जोडलेले सरकार दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकू शकते हे करुन चित्र या जगाने पाहिले.


संसदेवर झालेला हल्ला आणि त्यांनंतर काहीही न करता पार पडलेलं ऑपरेशन पराक्रम या दोन गोष्टींबाबतही या सरकारला माफ करणे अवघडं आहे. भारतीय लोकशाही सर्वोच्च मंदींरावर भारतीय संसदेवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामागील पाकिस्तानी कनेक्शन सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. अशा काळातही अटलजी सरकार केवळ ' अब आर पार की लडाई होगी ' इतकेच म्हणत राहिले. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान सीमेवर भारतीय लष्कराची सर्वात मोठी जमावाजमव याचकाळात करण्यात आली. सुमारे वर्षभर भारतीय सैन्य केंद्र सरकारच्या आदेशाची वाट बघत सीमेवर उभे होते. कारगील युद्धाच्या वेळी ताठ कणा दाखवणारे अटलजी सरकार त्यानंतर तीन वर्षांनी जागतिक समुदायपुढे किंवा अन्य कोणत्याही शक्तीपुढे का झुकले हे न उलगडलेलं कोडं आहे.


राममंदीर, समान नागरिक कायदा,370 वे कलम रद्द करणे हे भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेवरचे अस्सल विषय. भाजपला पार्टी विथ डिफरन्स बनवणारे. आघाडीधर्माचे पालन करण्यासाठी भाजपने हे विषय गुंडाळले हे मान्य आहे. आघाडी धर्माचे पालन करताना अटलजींना येणारी मर्यादाही समजता येते. परंतु हे विषय पुढ सरकावे किमान ते पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जीवंत राहावेत याकरताही फारसे प्रयत्न केले नाहीत. भाजपचे काँग्रेसीकरण होण्याचे जी उदाहरणे गेल्या काही वर्षांत ठळकपणे समोर आलीत. हे काँग्रेसीकरण होण्याच्या परंपरेलाही अटलजी पंतप्रधान असताना अधिक चालना मिळाली हे वास्तव नाकरता येत नाही. भाजप नेत्यांनीही भ्रष्टाचार केला.संरक्षण सारख्या सर्वात संवेदनशील क्षेत्रातल्या प्रकरणात लाच घेताना भाजप अध्यक्ष पकडले गेले. माणूस स्खलशील आहे.कितीही संस्कार केले तरी लोभ संपत नाहीत...हे कटू वास्तव भाजपच्या बाबतीत ही खरं आहे. भाजपची ही वैचारिक घसरण सुरु होण्याच्या काळात अटलजी पंतप्रधान होते हे पचण्यास जड असलं तरी दुर्दैवाने खरं आहे.


ह्या सर्व खर्चाचे मुद्दे धरले तरी एक नेता म्हणून अटलजींची उंची हिमालयाइतकी मोठी आहे हे मान्य करावेच लागते. अटलजीं सारख्या योगी व्यक्तींनी सुमारे चार दशकं केलेल्या साधनेच्या जोरावर भाजपला सत्तेची उब अनुभवता आली. एक संघस्वयंसेवक देशाचा पंतप्रधान बनू शकतो हे एकेकाळी अशक्य वाटणारे वास्तव अटलजींनी खरे करुन दाखवले. अटलजी वेगळे आहेत. अटलजी सर्वसमावेशक आहेत. कावळ्यांच्या कळपातले राजहंस आहेत अशा प्रकारची मिठ्ठास वाणी अनेकांनी वेगवेगळ्या प्रसंगात अनेकदा वापरली. दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा असो किंवा विश्वासदर्शक प्रस्तावाची लढाई कोणत्याही 'आणिबाणी'च्या प्रसंगी त्यांनी आपल्या मुलभूत विचारधारेशी आपल्या परिवाराशी परिवारातल्या संस्कारांशी तडजोड केली नाही. फळाची कोणतीही अपेक्षा न करता काँग्रेसला भाजपच्या रुपाने राष्ट्रव्यापी पर्याय निर्माण करण्याचे काम या कुशल राजकरण्याने केलं आहे.


भ्रष्टाचार, वशिलेबाजी, घराणेशाही, गुंडगिरी, जात यापैकी कशाचाही आधार घ्यावा लागत नाही. एका प्रमाणिक विचाराधारेनं प्रेरित होऊन यशस्वी होता येतं. नुसतं यशस्वी नाही तर अगदी या देशाचे पंतप्रधान होता येतं हे अटलजींनी दाखवून दिले आहे. 25 डिसेंबरला त्यांच्या 85 व्या वाढदिवशी त्यांना आठवताना ह्या एकाच गोष्टीचे स्मरण सर्वांनी केले तर अटलजींच्या स्वप्नातला समर्थ भारत साकारता येऊ शकेल.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...