Friday, December 16, 2011

सोशल मीडियावरील नियंत्रण : शेरे, ताशेरे अन् मते, मतांतरे




सध्या फक्त एकच गोष्ट सेन्सॉर होण्याची गरज आहे आणि ती म्हणजे कपिल सिब्बल यांचे तोंड!'
'फेसबुकवर स्टेटस अपडेट करताना प्रत्येक वेळी सिब्बल यांची परवानगी घ्यायची काय?'अशा उपरोधिक प्रतिक्रियांपासून ट्विटरवर 'इडियट कपिल सिब्बलअसा हॅश टॅग देण्यापर्यंत विविध प्रकारे नेटकरांनी सिब्बल यांच्यावर हल्ला चढविला आहे. त्याला कारण आहे ती सिब्बल यांची सूचना. सोशल मीडिया संकेतस्थळावर नियंत्रण घालण्याची. फेसबुकट्विटरऑर्कूट आदी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर देशातील राजकीय नेते आणि धार्मिक समूहांच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह छायाचित्रेमजकूर प्रसिद्ध होण्यापूर्वी संपादित करण्यात यावा किंवा हटविण्यात यावाअशी सूचना माहिती-तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी याहूगुगल या कंपन्यांना केली आहे. 


या संकेतस्थळांवरत्यातही प्रामुख्याने फेसबुकवर सोनिया गांधी तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे संतप्त होऊन सिब्बल यांनी हा इशारा दिल्याचे म्हटले जाते. पण फेसबुकसारख्या संकेतस्थळांवरील विविध राजकीय नेतेसंघटनापत्रकारितेसारख्या अन्य क्षेत्रातील व्यक्ती यांच्याविरोधातील टीकेचा स्तरत्यातील विखारीपणा पाहता सिब्बल यांना याबाबत संशयाचा फायदा देणे गरजेचे आहे. म्हणजे केवळ कॉंग्रेस नेत्यांवरील टीकेमुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहेअसेच काही म्हणता येणार नाही. गुगलकडे ते जेव्हा आपली सूचना घेऊन गेलेतेव्हा त्यांनी जो मजकूर व छायाचित्रे सादर केली होतीती काही सगळीच सोनिया गांधी वा मनमोहन सिंग यांच्याबद्दलची नव्हती. गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे मुंबईतल्या एका उपनगरात दंगल भडकण्याची वेळ आली होतीहेही येथे लक्षात घेण्यासारखे आहे. यां सारख्या काही घटनांतून सिब्बल यांनी तशी सूचना केली असावी. आपल्या कार्यकाळात ट्विटर मंत्री म्हणून ओळखले जाणारे माजी परराष्ट्र मंत्री शशी थरूरकॉंग्रेसचे खासदार मिलिंद देवराजम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांसारख्या व्यक्तींनी सिब्बल यांच्या सूचनेला याच मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे. काही आक्षेपार्ह मजकूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची सेन्सॉरशिप आवश्यक आहेअसे ट्विट थरुर यांनी केले आहे. भाजपनेही या सूचनेला सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. पण या सर्वांहून विरोधाचा आवाज मोठा आहे.



सायबर विश्वातून तर सिब्बल यांच्यावर जणू ऑनलाइन आक्रमणच सुरु आहे. देशातील सर्वसामान्य नेटिझन्सचे ( विशेषत: युवकांचे ) विचारांचे प्रकटीकरण करण्याचे माध्यम म्हणून आता फेसबुक ओळखले जाते. फेसबुकचा वापर करणा-या अनेक युझर्सनी सिब्बल यांच्या या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियाचा गळा दाबून भारताला चीन किंवा पाकिस्तानाच्या रांगेत बसवण्याचे प्रयत्न थांबवा असे आवाहन काही नेटिझन्सनी केले आहे. काहींनी तरसिब्बल यांच्या सेन्सॉरशिपवरील संभाव्य विधेयकाचे Social Networking Inspection Act ( SONIA ) असे बारसेच करून टाकले आहे! सामान्य नेटिझन्स प्रमाणे सेलिब्रिटींनींही टिविटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सोशल मीडियावर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. सरकारला हीच क्षमता सलत असावीअसे मत चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी व्यक्त केले आहे. तर केवळ आपल्या मॅडमचे खासगी आयुष्य जपण्यासाठी दहा कोटी इंटनेट युझर्सवर सरकार अन्याय करणार का असा सवाल स्तंभलेखिका शोभा डे यांनी विचारला आहे. चित्रपट निर्माते प्रीतीश नंदी यांनीहा माझा देश आहे आणि मला माझ्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यावर आक्रमण करणा-यांनी नरकात जावेअशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. 



सेन्सॉरच्या योग्यायोग्यतेचा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवलातरी एक सवाल उरतोच. तो म्हणजे अशा प्रकारची सेन्सॉरशिप मुळात शक्य तरी आहे काफेसबुक ट्विटरवरील चर्चेत नेटिझन्सनी आपला संताप व्यक्त करत असतानाचा ही सेन्सॉरशिप कितपत व्यवहार्य आहे. पुण्यातील गौरव मित्तल या अभियंत्याने याबातची सविस्तर आकडेवारीच मांडली आहे.  यू ट्यूबवर दर मिनीटाला सुमारे ४८ तासांचे व्हिडीओ अपलोड होत असतात. फेसबुकचे जगभरात ८० कोटी तर भारतामध्ये सुमारे २५ कोटी वापरकर्ते आहेत. ज्या प्रमाणे टेलिफोन कंपन्यांनाकडून त्यांच्या ग्राहकांकडून पाठविण्यात येणा-या प्रत्येक संदेशाचे नियंत्रण करणे अशक्य आहे. त्याच प्रमाणे सोशल नेटवर्किंग संकेत स्थळाकडूनही प्रत्येक वापरकर्त्याने अपलोड केलेल्या माहितीवर नियंत्रण ठेवणे हीसुद्धा अशक्य कोटीतील बाब आहे, असा बिनतोड युक्तिवाद गौरव यांनी केला आहे.

कपिल सिब्बल यांच्या विरोधातील एक कम्युनिटीही फेसबुकवर आहे. या कम्युनिटीची लोकप्रियताही मागील काही दिवसात वाढली आहे. या कम्युनिटींवर काही जणांनी आक्षेपार्ह भाषेत सिब्बल यांच्यावर ताशेरे ओढले असले तरी काही अभ्यासू युक्तिवादही केलेले आढळतात. नवी दिल्लीच्या आशिष माहेश्वरी या उद्योजक युवकाने मांडलेल्या मताचा याबाबत आवर्जून उल्लेख करावा लागेल. केंद्र सरकारला ग्रृप च्या ५० लाख कर्मचा-यांना लोकपाल विधेयकाच्या अंतर्गत आणणे शक्य नाही. मात्र फेसबुक किंवा गुगलने सुमारे २५ कोटी युझर्सवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा कशी करता येईल असा सवाल माहेश्वरी यांनी विचारला आहे. काही आक्षेपार्ह शब्द किंवा काही चित्रांची यादी तयार करुन फार तर त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. पण त्यालाही मर्यादा आहेत. फेसबुक किंवा गुगल प्लसवरील काही बंदिस्त गटांमध्ये किंवा काही विशिष्ट मित्रांपुरत्या मर्यादीत असलेल्या मजकुरावर नियंत्रण कसे ठेवणार? त्या गटातील माहितीवर नियंत्रण ठेवणे हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरच हल्ला आहे. ज्या देशाने आपल्या राज्यघटनेत हे एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक नागरिकाला आचार-विचार-उच्चार स्वातंत्र्य दिले आहे. तेथे अशा प्रकारची सेन्सॉरशिप कोणत्या कलमात बसवणारहे घटनातज्ज्ञ असलेल्या सिब्बल साहेबांनी देशाला समजवून सांगण्याची गरज आहे! अशा आशयाचा सूर या कम्युनिटीच्या सदस्यांनी आपल्या चर्चेतून व्यक्त केला आहे.


भारतामध्ये नाही तर सातासमुद्रापार अमेरिकेमधील भारतीयांमध्येही या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले आहेत.
अमेरिकेतील भारतीय नेटिझन्सनी यामध्ये अमेरिका आणि भारताची तुलना केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नावाने जर इंटरनेचवर सर्च केले तर अनेक आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ आपल्याला सहजपणे आढळतील. मात्र त्यामुळे अमेरिकेच्या प्रतिमेला धक्का बसला आहेअमेरिकेतील लोकशाहीचा गैरवापर होत आहेअशा प्रकारची ओरड कोणीही करत नाही. अमेरिकेनेने सोशल माध्यमांचात्याच्या चांगल्या आणि त्रासदायक बाजूंसह स्वीकार केला आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तर मग भारतामध्ये सिब्बल साहेब या अमेरिकेच्या पॅटर्नचे अनुकरण का करत नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मीडियावर अंशत: सेन्सॉरशिप लादण्याचा विचार सिब्बल यांनी बोलून दाखवला आहे. गर्भधारणा आणि सेन्सॉर अंशतः असू शकत नाहीया आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. ती सिब्बल यांनी लक्षात घेतली नसावी. कारण सेन्सॉरशिप ही एकतर असते किंवा नसते.असा सूरही काही अमेरिकी नेटिझन्सनी व्यक्त केलेला आढळतो.


सोशल मीडिया लोकप्रिय झाला याचे महत्वाचे कारण म्हणजे या माध्यमामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्त होण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा वृत्तपत्रे यां माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींना अभिव्यक्त होण्यास काही  मर्यादा आहेत. सोशल मीडियाने मात्र प्रत्येकाला आपले विचार दुस-यापर्यंत पोहचवण्याचे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या माध्यमाच्या वापरकर्त्यांच्या संख्येत दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ हे याचेच द्योतक आहे. या व्यासपिठावर लोक चर्चा करतातगप्पा मारतातएकमेकांना विनोद सांगतात तसेच गंभीर विषयांच्या चर्चेत सहभागीही होतात. आपल्या परिसरातीलराज्यातीलदेशातील समस्या या छायाचित्रे तसेच व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडतात. त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. अलिकडच्या काळात जगात झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांचा जन्म याच व्यासपीठावर झाला आहे. निपचित पडलेल्या सरकारला जागे करण्याचे काम पूर्वी हे काम राजकीय पक्ष किंवा संघटना करत असतआता सामान्य नेटिझन्स करत आहेत. सोशल मीडियाच्या याच स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न सिब्बल करत आहेत अशी तक्रार या सोशल मीडियाशी एकरुप झालेल्या  वर्गाने केला आहे. कपिल सिब्बल यांचे तोंड सेन्सॉर करा अशा आशयाचा टाहो या वर्गातून फोडला जात आहे तो यामुळेच. 

टीप - दै. लोकसत्तामध्ये १२ डिसेंबर २०११ या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख  लोकसत्तामधील लेख इथे पाहता येईल 

Friday, December 9, 2011

सेहवाग नव्हे सिंघम !



तो खेळताना त्याचे पाय हलत नाहीत....
त्याचा फॉर्म हरपलाय ......
कर्णधार पदाचे गांभीर्य त्याच्या बॅटिंगमध्ये दिसत नाही
त्याचे रनिंग-बिटविन द विकेट गचाळ आहे सहकारी खेळाडूंना तो हमखास बाद करतो किंवा स्वत: बाद होतो
त्याच्या शारिरीक हलचाली मंदावल्या आहेत... त्याच्या कानात दोष निर्माण झाला आहे ...

इंदूरमध्ये आज झालेल्या वन-डे पूर्वी वीरेंद्र सेहवागर अशा अनेक प्रकरे टीका होत होती. एखादा सामान्य खेळाडू अशा प्रकारच्या टीकेमुळे कोषात जाऊ शकतो. पण हा वीरेंद्र सेहवाग आहे. त्याचे खेळताना पाय हलत नाहीत पण तो जेंव्हा खेळतो त्यावेळी धावफलक इतक्या जोराने पळू लागतो की समोरच्या टीमच्या खेळाडूंना अक्षरश: धाप लागते. त्याचा फॉर्म हरपलाय अशी जेंव्हा टीका होते त्यावेळी तो अशी काही खेळी खेळतो की त्याची हेटाळणी करणा-यांचे दात घशात जाऊन वेगळ्याच वाटेने शरिराच्या बाहेर पडतील की काय अशी शक्यता निर्माण होते.

एक कॅप्टन म्हणून आज तो जी खेळी खेळला आहे. तो विक्रम मोडण्याचे स्वप्न बघत आता भविष्यातले कित्येक महान कॅप्टन निवृत्त होणार आहेत. त्याच्या रनिंग बिटिवन-द विकेटमध्ये नेहमीच घोळ असतो. त्यामुळे सहकारी खेळाडू रन-आऊटही होतात. मात्र तो रंगात असला की या चुकीची सव्याज परतफेड करु शकतो. आजही गंभीर आणि रैना चांगले सेट झाल्यानंतर रन-आऊट झाले. मात्र ते कुणीही खिचगणतीत पकडले नाही. त्याच्या शारिरीक हलचाली मंदावल्या असतील पण जागेवर उभे राहून काही कळायच्या आत बॉलला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देण्याची शक्ती त्याच्या मनगटात आहे. मध्यंतरी त्याच्या कानात दोष निर्माण झाला होता. पण  त्याच्या फटकेबाजीमुळे उत्साहित झालेले प्रेक्षक जेंव्हा मैदान डोक्यावर घेतात. तेंव्हा त्यांच्या आवाजाने मैदानावर उपिस्थत असलेल्या खेळाडूंचे कान बधिर होऊ शकतात. ७० च्या दशकात अमिताभ पडद्यावर आला की त्याच्या सोबत कोण आहे याकडे कुणाचेही लक्ष नसायचे. सर्वांची नजर अमिताभ काय करणार यामध्ये सर्वांचे लक्ष असायचे.तसे सेहवाग भरात असला की त्याच्या सोबत कोणताही ग्रेट बॅट्समन खेळत असला तरी त्याची पर्वा कुणीच करत नाही. त्यामुळेच वन-डे क्रिकेटमध्ये २०० रन्सचा टप्पा सर्वात प्रथम सेहवाग पार करेल असा माझा अंदाज होता. यापूर्वीच्या माझ्या ब्लॉग
मध्ये मी तो व्यक्तही केला होता. पण तो टप्पा सर्वप्रथम सचिनने पार केला. आता सेहवागने सचिनचा हा रेकॉर्ड नुसताच मोडला नाही तर आणखी उंचीवर नेऊन ठेवला आहे.

मराठी साहित्य निर्मितीमध्ये जेंव्हा  व्याकरणाच्या नियमांचा बोलबाला होता. त्याकाळात मराठीमध्ये मुक्तछंद हा कविता प्रकार सुरु झाला. वीरेंद्र सेहवागची बॅटिंग म्हणजेही मुक्तछंदामधली कविता असते.  क्रिकेटमध्ये कोणत्याही नियमांमध्ये चौकटीमध्ये त्याला बसविता येत नाही.

देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाप्रमाणे त्याची बॅट नेहमी प्रतिस्पर्धी खेळाडूंना आव्हान देत असते. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या ! असा इशारा तो समोरच्या प्रत्येक बॉलर्सना देत असतो. चांगला बॉल, खराब बॉल, उसळता बॉल किंवा आखूड बॉल अशा प्रत्येक प्रकारच्या बॉलवर त्याने षटकार खेचला आहे. अगदी शतकाच्या नव्हे तर त्रिशतकाच्या उंबरठ्यावरही त्याने हे अचाट साहस वारंवार केले आहे. कधी तो फसतो या प्रयत्नात तो २९३ किंवा १९५ वर आऊटही झाला आहे. म्हणून तो कधीही दडपणामध्ये येत नाही. अगदी या इंदूर वन-डेमध्येही त्याने १५० ते २०० हे अंतर अवघ्या २८ बॉल्समध्ये पार केले.
            क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूंचे मोठेपण हे नेहमी आकड्यांच्या तराजूमध्ये मोजले जाते. सचिन, ब्रॅडमन, लारा, द्रविड किंवा पॉन्टिंग यांनी शतके किंवा त्यांच्या नावावर असलेली भरमसाठ रन्स याचे दाखले नेहमी दिली जातात. या सर्व महान खेळाडूंच्या यादीत सेहवागच्या नावाचा फारसा उल्लेख केला जात नाही.

टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी आणि वन-डेमध्ये डबल सेंच्युरी मारणारा तो जगातला एकमेव बॅट्समन आहे. टेस्टमध्ये दोन वेळा ३०० चा जादूई आकडा पार करणे हे केवळ ब्रायन लारा ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवागला जमले आहे. या यादीमध्ये त्याच्या पुढे फक्त सर डॉन ब्रॅडमन हे एकच नाव आहे. टेस्टमधली सर्वात जलद ट्रिपल सेंच्युरी आणि वन-डेमधली सर्वात जलद डबल सेंच्युरी त्यानेच झळकावली आहे. १० वर्षांच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये २२ सेंच्युरी त्यापैकी १४ वेळा दिडशेपेक्षा जास्त रन्स , ४ डबल सेंच्युरी आणि २ ट्रिपल सेंच्युरी करण्याचा पराक्रम हा दुस-या कोणत्याही भारतीय बॅट्समनने केलेला नाही. इंग्लंड विरुद्ध २००८ साली चेन्नई टेस्टमध्ये चौथ्या इनिंगमध्ये साधारण १०० ओव्हर्समध्ये ३८७ रन्स करण्याचे टार्गेट वीरेंद्र सेहवाच्या झंझावती सुरुवातीमुळेच ( ६८ बॉल्स ८३ रन्स ) शक्य झाले होते.

तसेच जेंव्हा टेस्ट मॅच वाचवण्याची वेळ येते तेंव्हाही सेहवागने भारतीय टीमच्या मदतीला धावून आला आहे. २००८ साली अॅडलेड टेस्टमध्ये टीममध्ये जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन केल्यानंतर त्याने काढलेल्या १५१ रन्समुळे भारताला पराभव टाळता आला होता. तसेच त्याच वर्षी श्रीलंकेमध्ये त्याने सलमीला येऊन शेवटपर्यंत नाबाद राहत २०१ रन्सची खेळी केली होती. ( त्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा स्कोअर होता सर्वबाद ३२९ ).

वेस्ट इंडिजच्या पिचवर हॅल्मेट नसताना उसळत्या बॉल्सचा सामना करत गावस्करने झळकावलेली शतके जबडा फाटल्यावर बॉलिंग करणारा कुंबळे किंवा चेन्नई टेस्टमध्ये जीवघेण्या पाठदुखीवर पर्वा न करता सचिनने विजयासाठी केलेली एकाकी धडपड या इनिंग सर्वांच्या लक्षात आहेत. या सर्व इनिंग ग्रेट आहेत याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सेहवागला त्याच्या करियरमध्ये अशा प्रकारची कोणती मोठी दुखापत आजवर झाली नाही.  मात्र २००७ मध्ये त्याला टीमच्या बाहेर बसवण्यात आले. त्याच्या खेळण्याच्या तंत्रामध्ये दोष आहे. त्याची वृत्ती क्रिकेट खेळण्यास साजेशी नाही अशा प्रकारची वारंवार टीका त्यावर केली गेली. या सर्व मानसिक दडपणानंतरही सेहवागने आपले तंत्र बदलले नाही. आपली वृत्ती सोडली नाही. उलट २००८ ते २००११ या मागील चार वर्षातील त्याच्या अनेक खेळी थक्क करुन सोडणा-या आहेत. आपल्याला नावं ठेवणा-या जगाला अंगावर घेऊन खेळातील तंत्रामध्ये फारसा बदल न करता, आक्रमक वृत्तीला मुरड न घालता यशस्वी होता येते हे सेहवागने सिद्ध करुन दाखवले. अशा प्रकारचा कणखरपणा जगातील किती क्रिकेटपटूंमध्ये आहे  ?

    जंगलात अनेक प्राणी असतात. कुणी बुद्धीमान असतो, कुणी चतूर असतो, कुणी चपळ असतो तर कुणी प्रचंड शक्तीशाली असतो. पण या सर्वांच्या गर्दीमध्ये सिंहाचे श्रेष्ठत्व कुठेही झाकले जात नाही. तसेच शतके अनेक जण झळकावतात... सिक्स फोर्सची बरसातही अनेक करतात... मोठ्या खेळी करणारेही अनेक आहेत. पण जेंव्हा सेहवाग हे सर्व करतो त्याची सर अन्य कुणालाच येत नाही. वीरेंद्र सेहवाग हा क्रिकेट विश्वातला सिंघम आहे.
          वीरेंद्र सेहवागवरील माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...