Friday, March 25, 2011

पॉन्टिंग पर्वाची अखेर





रिकी पॉन्टिंग. ऑस्ट्रेलियाचाच नाही तर क्रिकेट विश्वातला सर्वात यशस्वी कॅप्टन. तब्बल 48 टेस्ट आणि 164 वन-डे ऑस्ट्रेलियानं त्याच्या कॅप्टनसीमध्ये जिंकल्या आहेत. सलग  दोन वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणारा दुसरा कॅप्टन. तीन वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेला एकमेव खेळाडू. ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन नंतरचा सर्वात महान खेळाडू.

       ऑस्ट्रेलियाच्या या 36  वर्षाच्या बॅट्समनचे मार्च महिन्याशी अनोखं नात आहे. 23 मार्च 2003 या दिवशी त्यानं आपल्या आयुष्यातलं अविस्मरणीय असं शतक झळकावलं. त्या दिवशी भारतीय बॉलर्सची पिसं काढंत त्यानं 140 रन्सची जबरदस्त इनिंग खेळली आणि आपल्या टीमला वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर 8 वर्षांनी 24 मार्च 2011 मध्ये त्यानं भारताविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये आणखी एक झुंजार सेंच्युरी झळकावली. प्रचंड दबावाचा सामना करत शतक  झळकावण्याची किमया त्यानं केली. मात्र यंदा तो आपल्या टीमचा पराभव वाचवू शकला नाही. 1992 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप सेमी फायनल गाठण्यात अपयश आलंय. ऍशेस सीरिजमध्ये झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर पॉन्टिंगच्या क्रिकेट करियरमधलं आणखी एक काळंकुट्ट पान या वर्षी लिहलं गेलंय. या पराभानंतर क्रिकेटमधलं पॉन्टिंग पर्व संपुष्टात आलंय.

                      ऑस्ट्रेलियनं टीममध्ये  तिशी गाठली तरी देशांतर्गत स्पर्धेमुळे राष्ट्रीय टीममध्ये स्थान मिळवता येत नाही. त्या बाबतीत रिकी पॉन्टिंग सुदैवीचं म्हणावा लागेल. 1995 साली म्हणजे वयाच्या 21 व्या वर्षीच त्याला ऑस्ट्रेलियन टीममध्ये संधी मिळाली. डेव्हिड बून, मार्क वॉ, स्टीव्ह वॉ, इयान हिली आणि मार्क टेलर या सारखे दाद खेळाडू त्यावेळी ऑस्ट्रेलियन टीममध्ये होते. मात्र या सर्वांच्या मांदियाळीमध्ये त्यानं आपली छाप सोडली. त्याच्या भात्यात क्रिकेटमधले सर्व शॉट्स आहेत. मात्र पूल आणि कव्हर ड्राईव्ह मारताना पॉन्टिंगला पाहणं हा विलक्षण अनुभव असायचा. मेलबॉर्न असो की मुंबई, लॉर्डस असो वा लाहोर क्रिकेट खेळणा-या सर्व देशात त्यानं रन्स जमवलेत. क्रिकेट विश्वात फक्त सचिन तेंडुलकरला पॉन्टिंगपेक्षा जास्त रन्स आणि सेंच्युरी झळकवता आल्या आहेत.

         एक कॅप्टन म्हणून पॉन्टिंग महान होताचं पण एक कॅप्टन म्हणूनही तो तितकाच जिद्दी, धूर्त आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यशस्वी होता. त्याची टेस्टमध्ये सरासरी आहे 53.51 पण कॅप्टनसीच्या सात वर्षातली सरासरी आहे 59.12. वन-डेमध्ये त्याची कॅप्टन म्हणून असलेली सरासरी ( 51.30 ) ही त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (42.58 )  घसघशीत जास्त आहे. त्यानं टेस्टमध्ये 39 पैकी 14 आणि वन-डेमध्ये 30 पैकी 20 शतकं कॅप्टन म्हणून झळकावली आहेत.  स्टीव्ह वॉच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियानं मिळवलेल्या विजयात ग्लेन मॅग्रा आणि शेन वॉर्नचा वाटा सर्वात महत्वाचा आहे. पण त्यांच्याच बरोबरीनं पॉन्टिंगचंही तेवढंच योगदान आहे. गेली 10 वर्षे ऑस्ट्रेलियन मीडल ऑर्डरची धुरा त्यानं यशस्वीपणे पेलली आहे.
    
          एक खेळाडू आणि कॅप्टन म्हणून तो जितका यशस्वी ठरला तितकाचं वादग्रस्तही ठरलाय. . ऍशेस सीरिजमध्ये पीटरसनला नॉट आऊट दिल्यावर अंपायरशी घातलेला वाद, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात सौरव गांगुली आऊट आहे असं ढळढळीत खोटं सांगणं, ड्रेसिंगरुमचा टीव्ही फोडणे, स्मिथशी टक्कर झाल्यावर बॉल आदळणे अशा मैदानावर आणि मैदानाबाहेर घडणा-या प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये त्याचा सहभाग आहे.



    सतत फिल्डर्सच्या जागा बदलणे आणि सहका-यांना हातवारे करत सूचना देणं ही त्याची कॅप्टनसी करण्याची शैली आहे. वॉर्न, मॅग्रा होते तेंव्हा ठिक होतं. मात्र  या सतत बदलणा-या फिल्डिंगमुळे त्याच्या टीममधले अगोदरचं सामन्य असलेले बॉलर्स गोंधळून जायचे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या मॅचमध्ये वॉटसन बॉलिंग करत असताना त्यानं स्लिप लावली नाही. त्यामुळे दोन-तीन वेळा बॅट्समनला आऊट करण्याची संधी कांगारुंनी गमावली. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये शाहिद आफ्रिदी आऊट झाल्यानंतर ब्रेट लीला बॉलिंग देणं आवश्यक होतं. मात्र तो क्रेझावरचं अवलंबून राहिला. बॅट्समन म्हणून मागच्या दिड वर्षात आलेल्या सुरु असलेल्या बॅड फॉर्माचा परिणाम त्याच्या कॅप्टनसीवरही झाला.  भारताविरुद्ध त्यानं शतक झळकावलं हे खरं आहे. पण  संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये  फॉर्म हरपलेला होता. कॅनडा विरुद्धच्या मॅचमध्ये हेन्री कोशिन्देसारख्या बॉलर्स विरुद्ध हुक त्याला मारता आला नाही. पाकिस्तान विरुद्ध मोहम्मद हाफिजनं त्याला जखडून ठेवलं. भारताविरुद्ध युवराज सिंगला एक सिक्सर वगळता तो काहीच कमाल करु शकला नाही.
फॉर्म हरपलाय, मॅच हरण्याचे नवे रेकॉर्ड होतायत तरीही तो कॅप्टनसीवरुन हटयाला तयार नाहीयं. एखाद्या राजकारण्याप्रमाणे मीच नेतृत्वासाठी कसा लायक आहे याचे दावे करण्याची सवय त्याला
जडली आहे.
 
  हेडन आणि गिलख्रिस्टच्या निवृत्तीनंतर पॉन्टिंगवरचं ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगचा संपूर्ण भार पडलाय. त्याच्या खेळावरचं ऑस्ट्रेलियाची पूर्ण टीम अवलंबून राहिलीय. वर्ल्ड कपमध्येही पॉन्टिंग उभा न राहिल्याचा फटका टीमला बसला. संपूर्ण स्पर्धेत त्यांची बॅटिंग विस्कळीत होती. पाकिस्तान विरुद्ध तर 176 रन्समध्ये 50 ओव्हर्स न खेळताच ऑल आऊट होण्याची नामुष्की ऑस्ट्रेलियाला सहन करावी लागली.
   वॉर्न आणि मॅग्रानंतर ऑस्ट्रेलियाची बॉलिंग बोथट बनली. तर हेडन- गिलख्रिस्ट रिटायर झाल्यामुळे बॅटिंगमधली आक्रमकता निघून गेली. या बुडत्या जहाजाला काडी देण्याचा प्रयत्न पॉन्टिंगनं केला. मात्र ह्या काडीची शक्ती अपूरी पडल्यानं कांगारुंचे जहाज या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपूर्वी बुडाले. आता या पराभवानंतर पॉन्टिंग टीममधून जाणार हे उघड आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ही आणखी बिकट होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ हा काही ठराविक खेळाडूंवर अवलंबून होता. ते खेळाडू निवृत्त झाल्यानं अथवा त्यांचा फॉर्म हरपल्याने त्यांची ही अवस्था झालीय. सचिन, लक्ष्मण, द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची हीच अवस्था होऊ शकते. आज ऑस्ट्रेलियाची  जात्यात असेल तर भारतीय टीम सूपात आहे असं म्हणावे लागेल.

टीप - ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील कांगारुंचा कडेलोट हा माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
              

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...