Friday, July 17, 2020

मंदिर मुक्तीची गरज !


केरळमधील ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिर प्रशासनावर त्रावणकोर संस्थानाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणी 2011 साली त्रावणकोर संस्थानाचा अधिकार रद्द करत  राज्य सरकारला मंदिर प्रशासन समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मंदिरांवरील सरकारी नियंत्रण रद्द व्हावे यासाठी सुरु असलेल्या चळवळीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.

काय होता वाद?

श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे व्यवस्थापन हे ' त्रावणकोर कोचीन हिंदू धार्मिक संस्था कायदा 1950 अन्वये करण्यात येत होते. या कायद्यान्वये या मंदिराचे व्यवस्थापन हे थेट वंशज चितीर तिरुलाम बलराम वर्मा यांच्याकडे होते. वर्मा यांच्या निधनानंतर उरलेले घराणे हे थेट वंशज नाही. त्यामुळे त्यांच्या अधिकाराचा कायद्यात कोणताही उल्लेख नसल्याचे कारण देत केरळ उच्च न्यायालयाने या मंदिराचे व्यवस्थापन राज्य सरकारकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता.

केरळ उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तब्बल 9 वर्षे हा खटला सर्वोच्च न्यायालयात चालला. न्या. उदय लळित यांच्या पीठाने याबाबत अंतिम निर्णय दिला. 'त्रावणकोर राजघराण्यातील सत्ताधीशाच्या मृत्यूमुळे मंदिर व्यवस्थापनाच्या राजघराण्याच्या अधिकारावर कोणताही परिणाम होत नाही. शेवटच्या सत्ताधीशांचे बंधू आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना मंदिर व्यवस्थापनाचा अधिकार आहे.' त्याचबरोबर '1950 च्या त्रावणकोर- कोचीन' कायद्याने लोकभावना आणि रुढी मान्य केली आहे. त्यामुळे ती आताही लागू करावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकालपत्रात स्पष्ट केले. 

राज्यघटनेला धक्का

भारत हा सेक्यूलर देश असल्याचे राज्यघटनेत स्पष्ट केले आहे. देशाचे सरकार सेक्युलर असावे. त्याने कोणत्याही धर्माच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करु नये. सर्वधर्मांना समान वागणूक द्यावी असे घटनाकारांना अभिप्रेत आहे. सेक्यूलर शब्दाची व्याख्याच ती आहे. 'सर्वधर्मसमभाव' चा जयघोष करणारे सरकार आणि सर्व मंडळींना फक्त देशातील मंदिरांचेच व्यवस्थापन सरकारच्या ताब्यात का आहे? मशिद किंवा चर्चचे का नाही? यासारखे अनेक प्रश्न सरकारच्या आजवरच्या भेदभावपूर्ण वागणुकीमुळे निर्माण होतात. सरकारच्या दुहेरी नितीमुळे राज्यघटनेच्या तत्वांनाच हरताळ फासला गेला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या 26 व्या कलमानुसार सर्व धर्मांना त्यांच्या धार्मिक संस्था चालवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अनेक राज्य सरकारने वेळोवेळी विशेष कायदे करत मंदिरांचा ताबा स्वत:कडे घेतला आहे. देशातील शेकडो मंदिराचे आर्थिक उत्पन्न आणि जमीनवर सरकारने कायदा करत आक्रमण केले आहे.

इमेज सौजन्य - https://swarajyamag.com/



स्वराज्य या संकेतस्थळाच्या रिसर्च टीमने याबाबत एक तक्ताच प्रसिद्ध केला होता. हा तक्ता पाहिला की देशात 80 टक्के असणाऱ्या हिंदूंच्याच प्रार्थना स्थळांबाबत सरकारने कशा पद्धतीने भेदभाव केला जातो हे स्पष्ट होते. राज्यघटनेतील कलम 25 (2) (a) अन्वये सरकारला धार्मिक संस्थानांवर आर्थिक तसेच प्रशासकीय नियंत्रण आणण्याचा अधिकार आहे. हा अधिकार फक्त हिंदूंच्या धार्मिक संस्थानांबाबत वापरला गेलाय. 

सरकारी भेदभावाचा अर्थ

देशातील मशिदींना परदेशातून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो ही आता गुप्त गोष्ट राहिलेली नाही. पश्चिम आशियातून येणाऱ्या पैशातून देशात वहाबीझमचा प्रसार होतोय याबाबतच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. जगातल्या वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये वहाबी कट्टरपंथींचा हात आहे. त्यामुळे परदेशातून मशिदींना मिळणाऱ्या आर्थिक निधीचीही चौकशी होण्याची गरज आहे. त्याचबरोबर देशातील चर्चमध्येही जगभरातील ख्रिस्ती मिशिनरी पैसा ओतत असतात. मशिदी अथवा चर्चची संपत्ती, त्यांच्या ताब्यातील जमिनी याची चौकशी सरकारने आजवर किती गांभीर्याने केली आहे? या धार्मिक संस्थांकडून ज्या शिक्षण संस्था चालवल्या जातात त्यांचा दर्जा काय आहे?  यावर ताबा मिळवण्यासाठी सरकारने आजवर न्यायालयात कितीदा लढाई केलीय? या सर्व व्यवहारांची गांभीर्याने चौकशी होणार नसेल तर सर्वधर्मसमभाव म्हणजे हिंदू सोडून अन्य धर्मियांच्या देवस्थानांना पूर्ण मोकळीक असा होतो का ?

सरकारच्या या भेदभावाचा अर्थ म्हणजे : हिंदू हे भारतामधील सर्वात गरीब आणि विस्कळीत लोकं आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:च्या देवस्थानाचे व्यवस्थापन करता येत नाही. हिंदू मंदिरांवर सरकारी नियंत्रणाची गरज असून त्यांना मिळणारा पैसा योग्य रितीने जातोय हे पाहण्यासाठी हस्तक्षेप आवश्यक आहे. हिंदू मंदिरांनाच दिला जाणारा निधीच सरकारी कामांसाठी हक्काने वापरला जाऊ शकतो. याचाच पुढचा अर्थ म्हणजे हा निधी मंदिर परिसरातील सेवाकार्य तसेच  हिंदू तत्वज्ञान, हिंदू संस्कृती, हिंदू साहित्य याचा प्रसार आणि संवर्धनासाठी आपल्या पैशांचा पूर्ण वापर करण्याचा अधिकार देवस्थान समितीला नाही. देवस्थान समितीला कोणत्याही कामासाठी निधी वापरायचा असल्यास सरकारी परवानगीची गरज आहे.

अनेक पुरातन मंदिरांचे  बांधकाम जीर्ण अवस्थेत आहे. हा पुरातन वारसा जपण्यासाठी मंदिराची वेळोवेळी डागडुजी करणे आवश्यक असते. ही डागडुजी करताना मंदिराच्या निर्मितीच्या वेळी असलेला भाव जपणे हे सर्वात नाजूक काम. या मंदिरांना देण्यात येणारा रंग पाहा.... सरकारी काम कसे असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मंदिरातील पुरातन मुर्तींची अनेकदा हेळसांड होते. त्यापैकी काही दुर्दैवाने चोरीला गेल्या आहेत. या प्रकरातील गुन्हेगारांना तातडीने शोधून त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. मंदिराच्या सरकारीकरणामुळे ही सर्व प्रक्रिया अनेकदा वेळखाऊ बनते. याचा फायदा गुन्हेगारांना मिळतो. अनेक देवस्थान समिती या राजकारणाचा आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्यात.  


देशातल्या कोणत्या प्रमुख मंदिरांच्या संपत्तीवर राज्य सरकारने वेळोवेळी आक्रमण केलंय  ते पाहूया

1) केरळमधील श्री गुरुवायूर मंदिर वेगवेगळ्या सेवाकार्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या आर्थिक उत्पन्नावर राज्य सरकारने नेहमीच आक्रमण केले आहे. अगदी यावर्षी मे महिन्यात मंदिराचा 5 कोटींचा निधी राज्य सरकारने चायनीज व्हायरस फंडात जमा केलाय. या मंदिराचा निधी हा मंदिर व्यवस्थापनासाठीच वापरला जावा अशी  गुरुवायूर देवस्थानम् कायद्यात तरतूद आहे. केरळच्या मार्क्सवादी सरकारचा हा निर्णय हा कायदा मोडणारा असल्याचा दावा करण्यात येतोय. या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. (1) 

2) आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराच्या संपत्तीवर राज्य सरकारने वेळोवेळी आक्रमण केले आहे. हे मंदिर देखील राज्य सरकारच्या नियंत्रणात आहे.

3)  ओडिशा सरकारने 2010 साली जगन्नाथ पुरी देवस्थानाची जमीन वेदांता उद्योग समुहाला कमी किंमतीमध्ये दिली होती. ओडिशा सरकारचा हा निर्णय पुढे उच्च न्यायालयाने रद्द केला. (2) वेदांता समुहात चर्चची गुंतवणूक होती. चर्च आणि वेदांता यांचे संबंध उघड झाले. त्यावर सर्वत्र गदारोळ झाला. त्यानंतर चर्चने आपले शेअर्स विकले, असे 'द गार्डियन' या ब्रिटीश वृत्तपत्राने म्हंटले आहे. (3) 

4)  मुंबईतले श्री सिद्धीविनायक मंदिर हे राज्य सरकारच्या ताब्यात आहे. या मंदिराकडून वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थाना आर्थिक निधी देण्याच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याची याचिका 2003 साली मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणीत ट्रस्टच्या निधीचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले होते. (4) महाराष्ट्रातल्या शिर्डी या आणखी एका श्रीमंत देवस्थनाचा ताबाही राज्य सरकारकडे आहे.

5) तामिळनाडूतील द्रविड चळवळीने नेहमीच हिंदू धर्माला लक्ष्य केलंय. द्रविड पक्षांच्या सरकारने सत्तेवर येताच राज्यातील मंदिरं ताब्यात घेणारा कायदा केला. तामिळनाडूतील 4.7 लाख एकर शेती जमीन तसेच शहरी भागातील मोठी जमीन सरकारच्या ताब्यात आहे. यामधून सरकारला बाजारभावापेक्षा अगदी कमी उत्पन्न मिळते, अशी माहिती 'द हिंदू' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली आहे. ( 5) 

6) मंदिर प्रशासनाचे सरकारीकरण करण्यात भाजप सरकारही मागे नाही. उत्तराखंडमधील भाजप सरकारने उत्तराखंडातील चार धाम आणि 51 महत्वाच्या मंदिराचा कारभार चालवण्यासाठी देवस्थान समितीची स्थापना केली आहे. ही सर्व प्राचीन मंदिरं आहेत. या मंदिरांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. यामधून मोठं उत्पन्न देवस्थान समितीला होतं. या आर्थिक कमाईवरच राज्य सरकारनं हक्क सांगितला आहे.

हिंदू धर्माच्या म्हणजेच पर्यायानं देशाच्या जडणघडणीत मंदिरांचे मोठे योगदान आहे. ब्रिटीशांचे आगमन होण्यापूर्वी मंदिराचे व्यवस्थापन हे स्थानिक समितीकडून केले जात असे. परिसरातील संस्कृती, कला, पशूधन याचे संवर्धन करण्याचे काम ही मंदिरं करत. संपूर्ण गावाला जोडणाऱ्या मंदिरातील प्रवचनातून वेगवेगळ्या पिढ्यांवर संस्कार झाले आहेत. या संस्कारातून तयार झालेल्या पिढीने वेळोवेळी शस्त्रं हातात घेऊन आपल्या राज्याचं परकीय आक्रमणापासून संरक्षण केलंय. भारतामधलं मंदिरांचं हे महत्त्व ब्रिटीशांनी जाणलं. त्यांनी मंदिर नियंत्रणाचे कायदे आणले. 'फोडा आणि राज्य करा' या नितीनुसार मंदिरं आणि इतर धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये फरक केला. ब्रिटीश 1947 साली गेले. भारतीय राज्यकर्त्यांनी ब्रिटीश कायदे आणि 'फोडा आणि राज्य करा' मानसिकता कायम ठेवली..

स्वातंत्र्यानंतरची बहुसंख्य वर्ष मतांसाठी अल्पसंख्याकांचे तृष्टीकरण करणारे सरकार सत्तेवर होते. नरेंद्र मोदी सरकार तसे नाही. मोदी सरकारचे हे दुसरे पर्व सुरु आहे. पहिल्या पर्वापेक्षाही अधिक जागांसह हे सरकार सत्तेत आहे. या सरकारनं दुसऱ्या पर्वाच्या पहिल्याच वर्षी काही कठोर निर्णय घेतले. या प्रकारचे निर्णय  देशात  घेतले जातील याची कल्पनाही अनेकांनी केली नव्हती. सरकारने यामधून प्रबळ इच्छाशक्तीचा परिचय जगाला दिलाय.  आता याच मालिकेत मंदिरांवरील सरकारी नियंत्रण कमी करण्याची आणि कोणतीही ( आय रिपीट कोणतीही ) धार्मिक संस्था धर्माच्या बुरख्याआड कायदाबाह्य कामं करत असेल तर त्यावर कठोर कारवाई करणारा कायदा सरकारने लवकरात लवकर संमत करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. 

पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय देशासाठी दिशादर्शक आहे. सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या दिशेवर घौडदौड करण्याची कामगिरी आता केंद्र सरकारला करावी लागेल. 

संदर्भ







Friday, July 3, 2020

चिनी ॲप्सवर बंदी : गोष्ट छोटी डोंगराएवढी !


भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणाऱ्या लोकमान्य टिळकांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. लोकमान्य टिळक सामान्य भारतीयांचे (तेल्या- तांबोळ्याचे) पुढारी होते.  बलाढ्य इंग्रज सरकारविरुद्ध लढण्यासाठी टिळकांनी भारतीयांना स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार गोष्टींसाठी आग्रही राहण्याचे आवाहन केले होते. जगातील प्रबळ सत्तेला हादरवण्याची शक्ती साध्या भासणाऱ्या या चार गोष्टींमध्ये  असल्याची जाणीव टिळकांना होती. टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षात भारत सरकारने 59 चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय हा टिळकांचा चतु:सूत्री कार्यक्रम पुढे नेणारा आहे. 

काय आहे आदेश?

राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेले घटक चिनी ॲप्सच्या माध्यमातून बाहेर पोहचत असल्याचे कारण देत सरकारने या ॲप्सवर  बंदी घातली आहे. या ॲप्सवर माहिती चोरीचा ठपका आहे. 'माहितीच्या गैरवापरामुळे देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला धोका पोहचत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते' असे सरकारच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (1)

 माहिती तंत्रज्ञान कायद्यातील 69 अ मधील तरतुदींचा वापर करत सरकारने ही बंदी घातलीय. भारतीय गुप्तचर संस्थांनी काही दिवसांपूर्वी चिनी ॲप हे सुरक्षेला धोकादायक असल्याचा इशारा दिला होता. नागरिकांकडूनही याबाबतच्या तक्रारी आल्याचे सरकारने स्पष्ट केले. सरकारच्या या आदेशानंतर 24 तासांच्या आत 59 चिनी ॲप्सचे भारतामधील अवतारकार्य बंद झाले.

चीनचा धोका

भारत आणि चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. भारताला चर्चेत गुंतवून ठेवत चीनने गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले. भारत - चीन यांच्यात वेळोवेळी झालेल्या परस्पर सामंजस्य कराराला चीनने मूठमाती दिली. चीनच्या या हल्ल्याला भारताने चोख उत्तर दिले. जगभरात याचे पडसाद उमटले. चीन तरीही माघार घ्यायला तयार नाही. चीनकडून सीमेवर मोठ्या प्रमाणात जमावाजमव होत असल्याच्या बातम्या येत आहेत. चीनची तयारी पाहता आणखी काही महिने सीमेवर तणाव कायम राहण्याची शक्यता आहे.


 डोळे जितके जास्त उघडू तितकी वास्तवाची जाणीव अधिक होते. बारीक डोळ्यांच्या चिनी राज्यकर्त्यांशी लढताना तर फक्त डोळे उघडे ठेवून भागत नाही. सर्वत्र सावध नजरही हवी. चीन फक्त सीमेवर सैनिकांच्या माध्यमातून भारतावर हल्ला करत नाहीय. देशातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये चीनची गुंतवणूक आहे. यापैकी मोबाईल डेटा ही बाब खासगी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गोष्ट. देशातील संवेदनशील डेटावर चीनची असलेली नजर आणि या माध्यमातून चीनला मिळणारी माहिती ही भारतासाठी गंभीर बाब आहे.

मोबाईल ॲप्सवर बंदी का?

भारतीय बाजारपेठांमध्ये सुईपासून ते औषधांपर्यंत जवळपास प्रत्येक क्षेत्रात चीनी वस्तू आहेत. हे सर्व असताना फक्त मोबाईल ॲप्सवरच  बंदी का ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जातोय. वास्ताविक मोबाईल सारख्या काही उत्पादनात  भारतीय बाजारपेठेचा जवळपास ८० टक्के ताबा हा चिनी कंपन्यांकडे आहे, तिथे अशा प्रकारची बंदी लगेच शक्य नाही. या प्रकारचा निर्णय घेतल्यास आपल्या नागरिकांमध्ये गोंधळ उडेल तसेच त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल.

भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य आहे. त्यामुळे या संघटनेचे नियम भारताला लागू आहेत. चीन तसेच अन्य देशांशी वेगवेगळ्या व्यापारी करारांमधूनही भारत जोडला गेलाय. हे सर्व करार तातडीने रद्द करणे शक्य नाही. हे करार रद्द केले तर जागतिक व्यापारात भारत एकटा पडेल. भारताच्या जागतिक प्रतिमेलाही यामधून मोठा धक्का बसू शकतो.

 मोबाईल डेटा हा खासगी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी थेट जोडलेला असल्याने संवेदनशील विषय आहे. मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करत असताना कॅमेरा, मायक्रोफोन, कॉन्टॅक्ट लिस्ट, आयपी ॲड्रेस, ब्राऊझिंग आणि सर्च हिस्ट्री, जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग आणि अन्य तुमच्या मोबाईलमधील वापराची माहिती या ॲप्सकडे आणि पर्यायाने याचा मालकी देश असलेल्या चीनकडे जमा होत असते.  

युद्धजन्य परिस्थितीत एकही गोळी न झाडता देशातील इतकी मोठी माहिती शत्रू राष्ट्राच्या हाती जाणे हे कोणत्याही देशाला परवडणारे नाही. राष्ट्रीय सुरक्षा ही नेहमीच प्रत्येक देशासाठी सर्वोच्च बाब असते. त्यामुळे या ॲप्सवर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

बंदी आवश्यक का ?

चीनशी सुरु असलेली लढाई फक्त लष्करी पातळीवर नाही तर व्यापारी पातळीवरही करण्याचे भारताने आता ठरवले आहे. व्यापारी पातळीवरील लढाईचे पहिले पाऊल म्हणून या निर्णयाकडे बघितले पाहिजे.

'स्पर्धात्मक जगात भारतीय ॲप्सने चीनी ॲप्सशी निकोप स्पर्धा करावी' 'सरसकट बंदी हा काही उपाय नाही' असा युक्तीवादही केला जातो. त्यावर माझे इतकेच उत्तर आहे की, ' निकोप स्पर्धा करायला हे काही खेळाचे मैदान नाही' खेळाच्या मैदानात दोन्ही संघासाठी नियम समान असतात. युद्धाच्या मैदानात खेळातील निकोप स्पर्धेचे नियम लागू होत नाहीत. विश्वासघाताची मोठी परंपरा असलेल्या चीनशी लढताना तर हे नियम मुळीच लागू होत नाहीत. 

'भारताने चीनशी निकोप स्पर्धा करावी' असं सांगणारी मंडळी चीन जगाशी कशी स्पर्धा करतो याकडे साफ दुर्लक्ष करतात. चीनने जग आणि आपल्या नागरिकांमध्ये 'ग्रेट चायना फायर वॉल' बांधलीय. यामुळे गूगलचे सर्व प्रोडक्टस, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, विकीपीडीया ही जगभरातील अव्वल माहिती देणारी माध्यमं वापरण्यास चीनमध्ये बंदी आहे. आपल्या देशातील माहिती या प्रोडक्टच्या माध्यमातून बाहेर जाऊ नये यासाठी चीनने 'ग्रेट चायना फायर वॉल' बांधलीय.

वादग्रस्त टिकटॉक

भारत सरकारने बंदी घातलेल्या ५९ ॲप्सपैकी टिकटॉक हे सर्वात लोकप्रिय ॲप होते. महानगरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात याची लोकप्रियता जास्त होती. २५ वर्षांखालील तरुणांमध्ये याची क्रेझ मोठी होती.स्पेशल इफेक्टसह लहान व्हिडिओ तयार करण्याची संधी टिकटॉकने युझर्सना दिली. टिव्ही किंवा सिनेमात कधीही न दिसलेला किंवा दिसण्याची शक्यता नसणारा मोठा वर्ग टिकटॉकमुळे 'व्हायरल' झाला. त्यामुळे टिकटॉक भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले. एकूण १४ भारतीय भाषांमध्ये टिकटॉक उपलब्ध होते.

टिकटॉकमुळे चाईल्ड पोर्नोग्राफीला उत्तेजन मिळत असल्याचे कारण देत मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी टिकॉटकवर बंदी घातली होती ( 2) ही बंदी काही दिवसांमध्येच उठवली गेली. यावेळी भारत सरकारने अधिक तयारीसह खासगी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा गैरवापर होत असल्याचे कारण देत टिकटॉकवर बंदी घातलीय.भारताने या बंदीमधून बलाढ्य चायनीज कंपन्यांना  इशारा दिलाय.

आधार कार्ड, भीम किंवा आरोग्य सेतू या भारत सरकारच्या धोरणात्मक निर्णयांना खासगी सुरक्षेचे कारण देत विरोध करणारे अनेक 'प्रायव्हसी वॉरियर्स' आता चायनीज ॲप्सच्या बाजूने ड्रॅगन चावल्यासारखे ओरडत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही टिकटॉकच्या बळावरच चालत होती असे वातावरण त्यांनी निर्माण केले होते.  बहुतेक टिकटॉकवाले  हे 25 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. त्यांना सध्या आणि पुढच्या आयुष्यातही करण्यासारखं खूप आहे. आपलं जीवीतकार्य निश्चित करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यासाठीही यापुढे अनेक संधी मिळतील.  त्यांच्यात खरोखरच कला, कल्पकता आणि नवनिर्मितीची शक्ती असेल तर ती प्रकट करण्यासाठी अनेक माध्यमं आहेत. पण ' टिकटॉकवर बंदी म्हणजे देशातील आयआयटी कॉलेजेवरच बंदी'  या ड्रॅगन प्रचाराचा पडद्यातून त्यांनी बाहेर यायला हवे . या पडद्याच्या पलिकडे खूप मोठं जग आहे, हे जग त्यांच्या पडद्याआडच्या विश्वापेक्षा आणखी विशाल आणि सुंदर आहे हे त्यांना समजेल. 

 टिकटॉकवाले अनेक पोरं-पोरी आपलं एकमेव माध्यम गेलं म्हणून काही काळासाठी नाराज असतील पण देशातले प्रयाव्हसी वॉरियर्स इतकं का ओरडतायत याचा अंदाज उत्तर चीन सरकारचं मुखपत्र असलेले ग्लोबल टाईम्स काय सांगते हे पाहिलं की येऊ शकतो

बंदीचे परिणाम काय होतील? 

   'ज्या प्रदेशात गवताचे एकही पाते उगवत नाही, त्यावर चर्चा करुन संसदेचा वेळ वाया का घालवायचा?' हा प्रश्न विचारण्यापासून ते याच प्रदेशाच्या संरक्षणासाठी चोख सैनिकी उत्तरासह धोकादायक ॲप्सवर बंदी घालणे असा प्रवास भारत सरकारने या साठ वर्षांमध्ये पूर्ण केला आहे. 

भारत सरकारच्या या निर्णयामुळे चायनीज ॲप्स सुरक्षित नाहीत. डेटासारख्या संवेदनशील बाबींमध्ये चायनीज गुंतवणूक धोकादायक आहे, अशी चर्चा जगभर सुरु झालीय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोंपियो यांनी काही दिवसांपूर्वीच 5G तंत्रज्ञानातील गुंतवणुकीतून चायनीज कंपन्यांना दूर करावे यासाठी जागतिक दबाव निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. ( 3) भारताच्या ताज्या निर्णयामुळे या प्रकारच्या निर्णयांना गती मिळण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका चीनला बसेल.

पुढे काय होणार?

चायनीज कंपन्या या निर्णयाची पळवाट शोधत भारतात दाखल होतील का? गुटखा बंदी किंवा काही राज्यांमधील दारु बंदी सारखी या निर्णयाची अवस्था होईल का? हे गंभीर प्रश्न आहेत. या विषयावरचा आपला अनुभव लक्षात घेता या भीतीकडे सरकारला दुर्लक्ष करुन चालणार नाही

जागतिक राजकारणात चीनविरोधात भूमिका मांडणाऱ्या ऑस्ट्रेलियावर नुकताच मोठा सायबर हल्ला झाला होता. हा 'Sophisticated state-based' सायबर हल्ला असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता दिली होती. (4) ऑस्ट्रेलियन सरकार, खासगी संस्था, आवश्यक सुविधा पुरवठादार, राजकीय पक्ष, आरोग्य संस्था अशा वेगवेगळ्या संस्थांना एकाचवेळी या सायबर हल्ल्यातून लक्ष्य करण्यात आले होते. (4) भारतालाही या प्रकारच्या हल्ल्याचा धोका आहे.

माहितीची दडपशाही हे कम्युनिस्ट शासकांसाठी 'दास कॅपिटल्स' पेक्षाही प्रिय गोष्ट असते. भांडवलशाहीचा मुखवटा धारण केलेल्या चीनची राजकीय आणि प्रशासकीय रचना कम्युनिस्टच आहे. सोव्हिएट साम्राज्याच्या पतनानंतर सत्तेवरील राजकीय पकड कम्युनिस्ट पक्षाने आणखी घट्ट केलीय. तियानमेन चौकतील हुतात्मांना श्रद्धांजली देण्याचे कार्यक्रम चीनमध्ये घेता येत नाहीत. याबद्दल देशात सार्वजनिक चर्चा करण्यासही बंदी आहे. संपूर्ण जगाला फाट्यावर मारत चीनने हाँगकाँगचा गळा घोटणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आपलं तिजोरीत बंद ठेवायचं त्या तिजोरीच्या रक्षणासाठी सैन्यापासून ते सांस्कृतीक गार्ड्सपर्यंत सर्वांचा कडेकोट पहारा लावायचा आणि दुसऱ्या देशात फक्त वाकून नाही तर तिथे घुसून संपूर्ण घराचा ताबा घ्यायचा ही चिनी निती आहे. चीनच्या या दादागिरीच्या विरोधात भारताने आवाज दिलाय. आता अमेरिकेसह संपूर्ण जग त्याला साथ देत आहे.

भारतीय कंपन्यांनाही आता सरकारच्या निर्णयामुळे नवे करण्याची संधी आहे. चिनी कंपन्या हद्दपार झाल्याने भारतीय बाजारपेठेत मोठी जागा निर्माण झालीय. ही जागा भरण्यासाठी जगभरातील कंपनी आता भारताकडे वळतील. भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. या स्पर्धेत टिकण्यासाठी भारतीय कंपन्यांनाही दर्जा सुधारावा लागेल. त्याचबरोबर केवळ 'इंडिया फर्स्ट' ही घोषणा देत सर्व काही नोकरशाहीच्या हाती सोपवण्याची नेहमीची सवय सरकारने यंदा मोडायला हवी. भारतीय तंत्रज्ञ आणि उद्योजक यांना सरकारची भक्कम साथ मिळाली, सरकारी यंत्रणांकडून होणारा त्यांचा मनस्ताप कमी झाला तरच या निर्णयाचा भारताला खऱ्या अर्थाने फायदा होईल. लोकमान्य टिळकांच्या चतु:सूत्रीमधील 'स्वदेशी' या संकल्पनेचा हा खऱ्या अर्थाने स्वीकार असेल.

भारत सरकारने योग्य खबरदारी घेतली तर,  'मेक इन इंडिया' आणि 'डिजीटल इंडिया' या दोन आवश्यक गोष्टींसाठी 59 चिनी ॲप्सवर घातलेली बंदीची ही छोटी गोष्ट येत्या काळात डोंगराएवढी ठरु शकते.   

टिप - भारत - चीन प्रश्नावरील माझा अन्य ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

संदर्भ

1) https://indianexpress.com/article/india/virtual-strike-india-bans-tiktok-and-58-other-apps-with-chinese-links-6482568/

2) https://www.thehindubusinessline.com/info-tech/madras-hc-asks-centre-to-ban-video-app-tiktok/article26730326.ece

3) https://timesofindia.indiatimes.com/gadgets-news/us-secretary-of-state-mike-pompeo-ramps-up-global-pressure-on-huawei-calls-reliance-jio-clean-for-spurning-it/articleshow/76618448.cms

4) https://www.9news.com.au/national/cyber-attack-australia-scott-morrison-government-private-sector-breach-of-security/e621ae47-f810-4fa7-9c11-3caa3b09f4dc


Quora मराठीवर या विषयावरील एका प्रश्नाचे उत्तर मी दिलेले उत्तर या लेखात वापरले आहे. उत्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा


LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...