Monday, July 18, 2011

काँग्रेसचा चेहरा


कुणी त्यांना मनोरुग्ण म्हणतं... तर कुणी देशद्रोही, कोणी गांधी घराण्याचा भाट तर कोणी पाकिस्तानचा समर्थक फेसबुक  किंवा कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस  दिग्विजय सिंह यांच्या बेताल बडबडीची येथेच्छ धुलाई सुरु आहे. बटला हाऊस एन्रकाऊन्टर बद्दल शंका, करकरेंच्या हत्येच्या कारणाबद्दल वादग्रस्त विधान, अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांना निर्दोष असल्याचं दिलेलं प्रमाणपत्र, कलमांडींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला पाहिजे अशी केलेली मागणी, अण्णा हजारेंना 15 ऑगस्टपासून उपोषण कराल तर याद राखा अशा आशायची दिलेली धमकी ते आता मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात नाकारता येत नाही अशा अर्थाचे केलेले विधान.दिग्विजय सिंग यांच्या बेताल बड़बडीची एक्सप्रेस  सुरुचं आहे. अशा प्रकारच्या बेताल बडबडीमुळेच दिग्विजय सिंह सध्या सर्वत्र हेटाळणीचा विषय बनले आहेत.

          आज काँग्रेस पक्षातल्या शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या दिग्विजय सिंह यांचा जन्म    1947 चा.  मध्यप्रदेशातल्या गुना जिल्ह्यातल्या रोघगटमधल्या राजघराण्यात जन्मलेले असल्यामुळे त्यांना दिग्गीराजा या नावानेही ओळखले जाते. वयाच्या 22 व्या वर्षीच त्यांना आपल्या सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. आपल्या जातीयवादी राजकारणामुळे मध्यप्रदेशातच नाही तर संपूर्ण देशभर वादग्रस्त बनलेले दिवंगत काँग्रेस नेते अर्जुन सिंह हे त्यांचे गुरु. 1980 मध्ये अर्जुन सिंह यांच्या मंत्रीमंडळात त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली. 1993 मध्ये अर्जुन सिंहाच्या लॉबिंगचा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवतानाही मोठा फायदा झाला.  फुटीरतावादी राजकारणाचा आपल्या गुरुंचाच वापसा दिग्विजय सिंह यांनी पुढे चालवला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर आला नाही तर 10 वर्षे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं ते 2003 मधील मध्य प्रदेश विधानसभेच्या प्रचारात सांगत असतं. हा शब्द त्यांनी आजवर तरी पाळला आहे. मागच्या सात वर्षात काँग्रेस केंद्रात सत्तेवर असूनही दिग्विजय सत्तेच्या बाहेर आहेत.

                आपल्या प्रत्येक कृतीमधून संदेश जात असतो हे राजकारण्यांना विशेषत: सत्तेवर असलेल्यांना पुरेपुर माहित असंत. काँग्रेसी संस्कृती कोळून प्यालेल्या दिग्विजय सिंह यांना तर हे पुरेपुर माहित असणार. दिग्विजय सिंहांच्या बेताल बडबडीच्या तसेच त्यांच्या एकंदरित राजकारणाचा विचार करत असताना हा संदर्भ लक्षात ठेवला पाहिजे. दिल्लीत काही वर्षांपूर्वी  बटाला हाऊसमध्ये झालेल्या चकमकीवर त्यांनी शंका उपस्थित केली होती. वास्ताविक दिल्ली आणि केंद्र दोन्हीकडेही काँग्रेसचेच सरकार तेंव्हा होते आणि नंतरही आहे. तरीही त्यांनी बटाला हाऊस एन्काऊन्टवर शंका निर्माण केली. अगदी उत्तर प्रदेशातल्या आझमगडला जाऊन दहशतवाद्यांच्या कुटुंबियांची विचारपूसही केली. दिग्विजय यांच्या या मुस्लिम कार्डाचा मोठा फायदा कॉँग्रेसला 2009 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे 21  खासदार निवडून आले.

              ब्रिटीशांनी राज्य करण्यासाठी जे 'फोडा आणि झोडा'  तत्व राबवले. तेच तत्व दिग्विजय यांच्यासारखे नेते वापरताना दिसतायत. 26/11 चा हल्ला झाल्यानंतर लगेच काही मुस्लिम संघटनांच्या वेबसाईटवर हा हल्ला हिंदू संघटनांनी इस्त्रायली गुप्तचर संघटना मोसादच्या मदतीनं केला अशा अर्थाच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. अशा प्रकारच्या विखारी प्रचारालाच दिग्विजय सिंह यांनी करकरेंबाबतच्या वादग्रस्त  विधानांनी बळ दिलं होतं. अजमल कसाबवरचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरु असताना त्यांनी ते विधान करुन तपास यंत्रणेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तपासकामाबाबत शंका निर्माण करण्याची त्यांची सवय नुकतीच पुन्हा एकदा उफाळून आली होती. अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांना त्यांनी निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिलेलं आहे.

            दिग्विजय सिंग यांच्या अशा प्रकारच्या बडबडीमुळे दोन प्रश्न निर्माण होतात एक म्हणजे  सत्तारुढ पक्षाच्या नेत्याला अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करण्याची गरज का आहे ? वास्ताविक त्यांच्याकडे सत्ता असल्याने ते अशा प्रकारची विधानं टाळून आपल्याला वाटत असलेल्या माहितीचा तपास यंत्रणेच्या माध्यमातून सहज करुन घेऊ शकतात. दुसरा महत्वाचा  वादग्रस्त विधानाबद्दल त्यांची तपास यंत्रणेकडून चौकशी होणार का ? मात्र सत्तेची कवचकूंडलं लाभलेल्या नेत्यांना कितीही विपरित परिस्थितीमधून आपण निश्चित बाहेर पडू असा विश्वास असतो. हाच विश्वास दिग्विजय सिंह यांच्यासारख्या राजकारण्यांना बेफाम बनवतो.

     भारतामधील बहुतेक पक्षाचे राजकारण हे सत्ताकेंद्रीतचं असते. सत्ता मिळवण्यासाटी आणि ती टिकवण्यासाठी काँग्रेसनं नेहमीच व्होट बॅँक पॉलिटिक्सचा वापर केलेला आहे. शहाबानो प्रकरण असो वा सच्चर कमिशन प्रत्येक वेळी आपल्या फायद्यापुरता मुस्लिम मतांचा कैवार काँग्रेसनं घेतलाय.  दिग्विजय सिंहांच्या आझमगड यात्रेचा उत्तर प्रदेशात फायदा झाला हे लक्षात येताच त्यांना फ्रि हॅंड दिला असावा. आता उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे उत्तर प्रदेशचे प्रभारी आणखी बेताल बडबड करण्याची शक्यता जास्त आहे.

       भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद, घटक पक्षातील वाद, अंतर्गत सुरक्षा या सारख्या अनेक मुद्द्यांवर सध्या केंद्र सरकार अडचणीत सापडलंय.मनमोहन सरकारकडे लोकसभेत तर बहुमत आहे मात्र त्यांची लोकांमधील लोकप्रियता झटपाट्यानं कमी होऊ लागलीय. अशा परिस्थितीमध्ये ज्वलंत मुद्यावरुन लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी दिग्विजय सिंह यांच्यासारखा मुखवटा काँग्रेसनं पुढं केलाय. मुस्लीम समाजालाच्या प्रश्नावर मुलभूत उपाय शोधण्यापेक्षा कधी ओसामा बिन लादेनला 'ओसामाजी' असे म्हणत, किंवा कधी रा.स्व.संघाबद्दलची भिती दाखवून मुस्लिमांना कुरवळण्याचे काम दिग्विजय सिंह करतायत.

   आज 21 व्या शतकातल्या या टेक्नोसेव्ही युगात देशाला पुन्हा एकादा व्होट बॅंक पॉलिटिक्सकडे घेऊन   जाणा-या दिग्विजय यांची कोणतीही खरडपट्टी काँग्रेस हायकमांडने केलेली नाही. उलट पक्षाचे भावी महाराज राहुल गांधी यांच्या राजकीय प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाने सोपवली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि अधुनिकता यांचा मुखवटा धारण करणा-या काँग्रेस पक्षाचा चेहरा मात्र दिग्विजय सिंह यांच्या विचारासारखाच मध्ययुगीन आहे हेच पक्षाच्या अलिकडच्या धोरणावरुन स्पष्ट होतंय.

Monday, July 4, 2011

राम गोपाल वर्मा - द सर्किट ?





Just watched Bbhuddah nd am. angry with bacchan that hes such a xxxx not to do films like this nd am such a xxxx not to realize this. 
   रामगोपाल वर्माने ट्विटरवर ही प्रतिक्रीया दिली आणि सर्वत्र खळबळ उडाली. अमिताभ बच्चन सारख्या बॉलिवूडमधल्या 'बाप' कलाकाराबद्दल अशी एखाद्या दिग्दर्शकाने अशा प्रकारच्या आक्षेपार्ह भाषेत दिलेल्या प्रतिक्रीयेबद्दल नाराजी उठणं हे स्वाभाविक होतं. त्यानंतर प्रथेप्रमाणे रामूनं या प्रकरणावर खुलासा केला. अमिताभ बच्चन यांनी अशाप्रकारचे चित्रपट यापूर्वी  केले नाहीत हा प्रकार अगदी  xxxx आणि एक दिग्दर्शक म्हणून त्यांची  ही क्षमता ओळखण्यात मला अपयश आलं म्हणून मी xxxx असं स्पष्टीकरण रामूनं दिलंय. अमिताभ बच्चन यांच्या कट्टर फॅन्सचे यामुळे समाधान झाले नसेल. मात्र रामगोपाल वर्मा नावाच्या वल्लीचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांचा रामुच्या या खुलाशावर  विश्वास बसेल. आपल्या मनातले EXPRESSION अशा प्रकारे व्यक्त करण्याची  रामूची सवय जुनीच आहे.


 'आई -वडिलांच्या दृष्टीने मी एक वाया गेलेला मुलगा होतो.' असं  एका मुलाखतीमध्ये सांगणा-या रामूनं सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलंय. मात्र या पठ्ठ्याचं शिक्षणामध्ये कधी मन रमल नाही. कॉलेजमध्ये असताना चित्रपट पाहण्याचं व्यसन त्याला लागलं. 'चित्रपटातला एखादा विशिष्ट सीन पाहण्यासाठी आपण तो चित्रपट  पुन्हा पुन्हा  पाहिला माझ्यातल्या दिग्दर्शकाची त्यामुळेच जडणघडण झाली' असंही त्यानं सांगितलंय.


     तेलगु चित्रपटसृष्टीत काही काळ घालवल्यानंतर शिवा या चित्रपटाने त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. शिवा  हा रामूच्याच गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक.कॉलेज विश्वातल्या गुन्हेगारी  विश्वाचे थेट चित्रण यामध्ये करण्यात आलंय. सायकलची चेन काढून मारामरी करण्याची शिवामधली नागार्जुनाची स्टाईल चांगलीच लोकप्रिय झाली होती. एक दिग्दर्शक म्हणून चित्रपट या माध्यमावरची पकड रामूने यामध्ये दाखवून दिली.


   रामू ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला तो रंगीलामुळे. अमिर खान, जॅकी श्रॉफ आणि  उर्मिला मातोंडकर यांच्या या चित्रपटाने त्या वर्षी अनेक रेक़ॉर्ड मोडले. लव्हरबॉय या आमिरच्या पारंपारिक प्रतिमेला छेद देण्याचं काम रामूच्याच रंगीलानं केलं. असं असलं तरी रंगीलाचं खरं आणि निर्विवाद आकर्षण होती ती म्हणजे उर्मिला मातोंडकर. रंगीलापूर्वीही उर्मिलानं काही चित्रपट केले होते.अगदी रामूच्याच द्रोहीमध्ये तिची मुख्य भूमीका होती. मात्र त्यात तिचं कोणतही वेगवेळेपण नव्हतं. वर्षा उसगावकर, अश्विनी भावे यासारख्या त्या काळात बॉलिवूडमध्ये काम    करणा-या मराठी अभिनेत्रींपैकीच एक अशी तिची ओळख होती. रामूनं उर्मिलाची ही ओळख संपूर्णपणे बदलून टाकली. उर्मिलाचा संपुर्ण कायापालट या चित्रपटामुळे झाला. आपल्या शेजारी राहणारी 'गर्ल नेक्सट डोअर' वाटणा-या उर्मिलाला त्यानं  स्वप्नसुंदरी बनवलं. ( रंगीला पाहिल्यानंतर मीही उर्मिलाचा जबरदस्त फॅन झालो. अगदी आजही सध्याच्या कोणत्याही नायिकेपेक्षा उर्मिला माझ्या आवडीची आहे. असो हा विषय संपूर्ण वेगळा आहे. त्याबद्दल पुन्हा कधी तरी...)
        रंगीलानंतर दौड आला आणि गेला.दौडनंतर 1998 साली प्रदर्शित झालेला सत्या हा  हिंदी चित्रपट सृष्टीतला माईलस्टोन आहे. सत्यापूर्वीही अंडरवर्ल्डवरचे अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र दोन गॅँगमधल्या हिंसेच इतकं परिणामकारक चित्रण सत्यामध्येच होतं. या चित्रपटामधली मुंबईही यापुर्वी कोणत्याच चित्रपटामध्ये न पाहिलेली होती. मुंबईतला पावसाचा इतका परिणामकारक वापर क्वचितच कोणी केला असेल. उर्मिला मातोंडकर, चक्रवर्ती, मनोज बाजपेयी, सौरभ शुक्ला, शेफाली शहा, गोविंद नामदेव, मकरंद देशपांडे ह्या सत्यामधल्या गॅंगनं त्या वर्षी धुमाकूळ घातला. सत्यानंतर कंपनी आणि D हे अंडरवर्ल्डवरचे  चित्रपट  रामूनं केले.


     बॉलिवूडमधला एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणूनही रामूचं नाव घ्यावं लागेल.संगीताचे वर्चस्व असलेल्या बॉलिवूडमध्ये एकही गाणे नसलेला चित्रपट कढणे आणि तो यशस्वी करणे ( कौन, भूत )ह्या दोन्ही गोष्टी रामूनं केल्या. बॉलीवूडमध्ये भयपटाची लाट त्यानंच पुन्हा एकदा आणली ( भूत, डरना मना है, डरना जरुरी है ) पाच संपूर्ण वेगळ्या कथा घेऊन एक  चित्रपट काढता येतो हे त्यानंच दाखवलं. ( डरना मना है ) आपल्या साह्यक दिग्दर्शकाला दिग्दर्शकाच्या खूर्चीवर बसवलं. प्रत्येक शुक्रवारी आपला एक चित्रपट रिलीज झाला पाहिजे हे त्याचं स्वप्न आहे. त्यामुळे त्यानं मध्यंतरी अक्षरश: डझनावारी चित्रपटांची निर्मिती केली. नवीन कलाकार, नवे दिग्दर्शक, नवी तांत्रिक टीम, मोजकी लोकेशन ( कौन हा संपूर्ण चित्रपट त्यानं एकाच घरात चित्रीत केला आहे. तसेच या संपूर्ण चित्रपटात केवळ 3 कलाकार आहेत. हाही एक अनोखा प्रयोग मानला पाहिजे ) आणि अगदी झटपट चित्रपटाचे मेकिंग हे त्याचं वैशिष्ट्य आहे. अन्य निर्माते दिग्दर्शक  एका चित्रपटासाठी पाच-पाच वर्षे खर्च करतात. पण हा बाबू एकाचवेळी पाच चित्रपट बनवत असतो.चित्रपट प्रदर्शित झाला की त्याची कोणतीही चर्चा करायची नाही. कसलीही उसंत न घेता पुढच्या तयारीला लागयचे ही त्याच्या कामाची पद्धत आहे.


           चित्रपटातल्या नायिकांवर रामूसारखं प्रेम बॉलिवूडमधल्या  कोणत्याच दिग्दर्शकाने केले नसेल. उर्मिला मातोंडकर, अंतरा माळी, मेघना कोठारी या आपल्या लाडक्या नायिकांसाठी त्यानं चित्रपटांची 'फॅक्टरी' सुरु केली. अंडरवर्ल्ड, ( सत्या, कंपनी, अब तक छप्पन , D )  नक्षलवाद, ( जंगल, रक्तचरित्र ), लव्ह स्टोरी ( रंगीला, मस्त) भयपट, (रात, डरना मना है, डरना जरुरी है ), एकतर्फी प्रेम,  ( एक हसीना थी, डार्लिंग  ठाकरे घराणे आणि महाराष्ट्रातील राजकारण ( सरकार, सरकार राज ) या सारख्या वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट बनवणा-या रामूनेच  'रामगोपाल वर्मा की आग' हा अत्यंत टुकार, थर्ड ग्रेड, सूपर डूपर फालतू चित्रपटही बनवला.यापेक्षा भंकस चित्रपट आता रामू बनवू शकत नाही ही खात्री ही रामूची  'आग '( आणि आपल्या सर्वांची होरपळ ) पाहिल्यानंतर माझी झाली.


           रामगोपाल वर्मा आणि वाद यांचेही अगदी घट्ट नातं आहे. तेलगु चित्रपट बनवत असताना त्याचा श्रीदेवीच्या आईशी  खटका उडाला ( रंगीलामधला नायिकेची आई दिग्दर्शकाला हैराण करते हा जो सीन आहे .... ( ज्यूस नवंबर मे मिलता है तो नवंबर मे जाके लाव ... वाला सीन  ) त्याची प्रेरणा रामूला याच वादातून झाली.  शाहरुख खान आणि करन जोहरशीही त्याचं वाजलं. ( लव्ह के लिए कूछ भी करेगा या चित्रपटातला आदित्य जोहर सूरज भन्साळी.... हम दिलवालोंको कुछ कुछ होता है हा  सीन आठवा ) यामध्ये रामूनं  या मंडळींची जाम उडवली आहे.


    मुंबई हल्ल्यानंतर  विलासराव देशमुखांसोबत त्यानं 'ताज वारी' केली. आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. विलासरावांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. आता तर ट्विटरच्या माध्यमातून रामूनं दररोज वेगवेगळी मतं मांडण्याचा सपाटाच चालवलाय. राजकारण, मीडिया, चित्रपट, नाते संबध, भ्रष्टाचार, पाऊस असा कोणताही विषय रामुला वर्ज्य नाही. या प्रत्येक विषयावर आपली खास मतं त्यानं ट्विट केले आहेत. 


     8 जूनला रामदेवबाबांचे आंदोलन अगदी जोरात असताना त्यानं If Baba also has to fast to get his way why is he a Baba? असा सवाल विचारला आहे. तर त्याच बरोबर Marriage is like a romantic novel in which the hero dies in the first chapter. असं जगातल्या तमाम पुरुष वर्गाला झटकन अपिल होईल असं ट्विटही रामूनं नोंदवलंय. हल्ली ट्विटरची क्रेझ प्रत्येक वर्गात वाढलीय. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असतात. तरीही रामूचं समाधान झालेलं नाही. I just so wish that some gangsters and some terrorists also will come on to twitter. अशी एक खास रामूलाच वाटू शकेल अशी इच्छाही त्यानं व्यक्त केलीय.


                   एम.एफ. हुसेन गेल्यानंतर Met sme who felt vry sad tht M F hussein passed away nd also met sme who ar supr happy tht the value of the paintings thy own of his doubled  हे त्याचं ट्विट मानवी स्वभावाबद्दल बरचं काही सांगून जातं. तर  Unparliamentary language is maximum used by parliamentarians ह्या त्याच्या ट्विटशी आम आदमी झटक सहमत होईल. मारीया सुसराजला चित्रपटात घेण्याची इच्छाही त्यानं आपल्या ट्विटरवर व्यक्त केलीय.  आपण सतत ट्विट करतो कारण आपल्याकडे सांगण्यासारखे आणि विचार करण्यासारखे खूप असते असं त्यानं सांगितलंय.  आपण चुका करतोच. काम करणा-या प्रत्येकाच्या हातातून चुका होत असातात असं रामूचं  लॉजिक  आहे. The only way of not to make any mistakes is to do nothing. हाच चुका टाळण्याचा एकमेव मार्ग आहे असा दावा रामूनं  केलाय. 


   आपण ब्लॉग, ट्विटर या माध्यमातून अनेकांची मनं दुखावतो हे रामूला माहिती असेलच. तरी त्याला त्याची पर्वा नाही. twitter is nt a public platform.its a medium of expression between tweeter nd followers.if u don't like wht I say u r welcome 2 unfollow me. या  स्वच्छ शब्दात  त्यानं आपल्यावरील नाराज मंडळीना  उत्तर दिलंय.


    वेगवेगळ्या विषयावर अगदी इलॉजिकल वाटतील अशी मत लॉजिकल पद्धतीनं मांडणा-या रामगोपाल वर्माला सर्किट म्हणायचे की मनस्वी हा प्रश्न मला पडलाय. 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...