Saturday, November 9, 2013

न्यूयॉर्क ते नेवांग



न्यूयॉर्कच्या 135 मजली टोलेजंग पॉश इमारतीच्या अवाढव्य पार्किंगमध्ये नेमक्या जागेवर  कैवल्यनं  नेहमीच्या सफाईनं गाडी पार्क केली. बाहेर दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या आफ्रिकन-अमेरिकन गार्डनं ठोकलेल्या सॅल्युटचा शिष्टशीर पद्धतीनं स्विकार केला. डोक्यात दिवसभराच्या सा-या कामांच, बोर्ड मीटिंगचं चक्र त्याच्या डोक्यात घूमू लागलं. त्याचा प्रत्येक मिनिट नं मिनिटं हा ‘लाख’ मोलाचा होता. आज सोमवार. आठवड्याचा पहिला दिवस. आज सारी कामं नेहमीच्याच सफाईनं आणि 100 टक्के बिनचूक पद्धतीनं झाली पाहिजेत.  पहिला दिवस चांगला गेला तरच आठवडा चांगला जातो, अशी त्याची ठाम समजूत. याच मनोनिग्रहानं तो ऑफिसात शिरला. कामाच्याच विचारात असलेल्या कैवल्यनं सहका-यांच्या हाय सर, हॅलो सर, गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू सर चा नेहमीच्याच परिटघडानं स्विकार केला आणि आपल्या केबिनमधल्या खूर्चीवर स्थानापन्न झाला. 
ऑफिसात आल्यानंतर आधी सर्व मेल चेक करायची हा त्याचा शिरस्ता. मेल चेक करत असतानाच भारतामधल्या पेपरच्या साईट त्यानं नेहमीच्या सवयीनं ओपनं केल्या. आज सलग तिस-या दिवशी मणिपूरच्या अशांततेची बातमी प्रमुख पेपरनं फ्रंट पेजवर घेतली होती हे कैवल्यला त्याची ई एडिशन पाहताना समजले. एरवी मणिपूरसारख्या दुर्गम राज्याला फारसं महत्त्व न देणारी ही सारी वृत्तपत्र सलग तिस-यांदा मणिपूरची बातमी देतायत. म्हणजे मामला गंभीर आहे. 
मणिपूरच्या बातम्यांमध्ये रस असण्याचं त्याचं कारण म्हणजे त्याची रियल लाईफमधली सर्वात जवळची दोन माणसं  त्य़ाचे आई-बाबा मणिपूरच्या विवेकानंद केंद्रात सेवाव्रतीचं काम करत होते.  धुमसत्या मनस्थितीला शांत करत कैवल्यनं ऑफिसातली काम नेटानं सुरु ठेवली.


दिवसभराची कामं संपवून घरी परतल्यावर नेहमीच्या रितेपणासह कैवल्य घरात शिरला. आज पैसा, प्रतिष्ठा, स्टेटस, बॅँक बॅलेंस सारं काही त्याच्याजवळ आहे. पण हे सारं शेअर करायला कुणीच नाही. आपण आनंदी आहोत, यशस्वी आहोत हे समाजाला दाखवण्याचा आणि स्वत:ला समजवण्याचा प्रयत्न तो सतत करतो.पाच दिवस भरगच्च काम आणि नंतर दोन दिवस भरपूर एन्जॉय अगदी अमेरिकन लाईफस्टाईल अंगात भिनलंय. तरी हे सर्व करत असताना आपले आई-बाबा तिकडं सात समुद्रापार घरापासून हजार किलोमीटर दूर असलेल्या मणिपूरमध्ये एका खेड्यात सेवाव्रतीचं आयुष्य जगतायत. किती बुलशीट आहे हे सारं ? हा सारा डोलारा आपण कुणासाठी उभा करतोय ? त्यांचे समाजसेवीची डोहाळं कधी पूर्ण होणार ? ही सारी प्रश्न  कैवल्याच्या डोक्याचा रोज रात्री केमिकल लोचा करतात.  या केमिकल लोच्याची रिएक्शन त्याला जाणवू लागली होती अखेर 15 दिवसांच्या रजेचा मेल ऑफिसला टाकला आणि भारताला जाण्याचे निश्चित केल्यानंतरच कैवल्यला किती तरी दिवसांनी शांत झोप लागली.  

दुस-या दिवशी सकाळी कैवल्यनं  ट्रॅव्हल एजंटला तातडीनं फोन केला. “ एक नवी दिल्ली अगदी तातडीनं लगेच हो, हो अगदी फास्ट, महाग असेल तरी चालेल. भारतात सध्या पावसळा आहे ?, असू दे महापूर येऊन सारं काही वाहून जाण्याची वेळ आलीय आता आयुष्यात त्यामुळे आहे ते वाचवण्यासाठी पावसाळा असो की उन्हाळा मला तिकीट तातडीनं हवंय. काहीही चौकशी न करता थेट तिकीट काढणारा तो ट्रॅव्हल एजंटचं पहिलंच गि-हाईक असावा. ऑफ सिजनमध्ये वाटेल ती किंमत मोजणारं गि-हाईक मिळाल्यानं एजंटही खूश झाला. त्यानं तातडीनं ते तिकीट त्याच्या हाती ठेवलं. 

विमानात उडल्यानंतर अगदी वेगळाच फिल येतो. सारं जग आपल्या खाली आणि आपण आकाशात...अगदी वर टॉपला. टॉपला जाण्याचं वेड आपल्याला कधी शिरलं हे कैवल्य आठवू लागला. शाळेत असेपर्यंत वर्गातल्या हुशार मुलांमध्ये कधीच नव्हतो आपण. अगदी ढ ही नाही आणि हुशारही नाही. त्यामुळे कोणत्याच कारणामुळे शाळेत कुणाच्या लक्षात आलो नाही. 

घरी आई आणि वडील. वडील प्रपंच चालवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून नोकरी करत बाकी सारा वेळ सामाजिक कार्य. परिसरातल्या दुष्काळगस्त भागातल्या केंद्राच्या कामात प्रत्येक शनिवार-रविवार वेळ दे. त्यांना धान्य वाटप कर. ऊस कामगारांच्या मुलांसाठी सुरु असलेल्या साखर शाळांच्या कामाचा आढावा घे. भूकंपाने उद्धवस्त झालेलं एक गावं नव्यानं वसवण्याची जबाबादारी  स्वामी विवेवेकानंद केंद्रानं त्यांच्यावर सोपवलेली. सामाजिक काम असलं की वडिलांना नवा उत्साह येत असे. त्या गावाचं पूनर्वसन हॆच आपले जीवतकार्य आहे, त्यामुळे ते अधिकाधिक निर्दोष पद्धतीनं पूर्ण झालं पाहिजे या ध्येयानं ते झपाटलेले. हा सारा परमार्थ करत असताना घराकडे त्यांचं फारसं लक्ष नसायचंच.  

कैवल्यला वडिलांच्या या सा-या कामाबद्दल आदर होता. पण आपणही तसंच काम करांव हा वडिलांचा आग्रह त्याला मान्य नव्हता.त्यामुळे तो वडिलांपासून लांब लांब राहू लागला. वडिलांबद्दल आदर, प्रेम सारं काही आहे पण तरी जवळीकता साधणं त्याला जमायचे नाही. त्याचा घरातला सारा व्यवहार आईच्या मार्फत चालयचा. 
10 वी ला बरे मार्क पडले. मग सामाजिक प्रथेप्रमाणे आणि मुख्य म्हणजे घरापासून दूर राहता येईल म्हणून त्यानं शहरातल्या कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला.  बारावीत आणखी छान मार्क्स. मग इंजिनियरिंग. अभ्यासाची चटक लागलेल्या कैवल्यालं तिथं थेट गोल्ड मेडल मिळाल्यानं अमेरिकतल्या विद्यापीठात स्कॉलरशीपसह नोकरीची संधी चालून आली. अगदी 9/11 ऩंतर अमेरिकनं आपलं व्हिसा धोरण कडक केलं असूनही त्याला सहजगत्या व्हिसा मिळाला. सतत पुढं जाण्याच्या ओढीनं धावणा-या कैवल्यनं घरच्यांशी काहीही चर्चा न करता अमेरिका गाठली.

   अमेरिकेत गेल्यानंतर नव्या वातावरणात तो रमला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी आपसूक चालून आली. आता आई-वडिलांनी आपल्याकडे यावं असा त्याचा आग्रह. तर त्यांना देशाची काळजी पडलेली. ‘देशाची काळजी घ्यायला सरकार आहे, ना  लष्कराच्या भाक-या भाजण्याचे तुमच्यासारखे उद्योग मला जमणार नाहीत.  ‘  अमेरिकेची भव्यता, वर्क कल्चरला महत्त्व देणारी इथली मंडळी, ज्या देशात माझ्या गुणवत्तेचं चीज होतोय. आरक्षण, दप्तर दिरंगाई, भ्रष्टाचार, जातीयता, नक्षलवाद याच्या चक्रव्युवाहात माझं प्रोजेक्ट अडकत नाही. त्याच देशात मला राहण्याची इच्छा आहे, कृपया आता भारतात परत यावं असा आग्रह करु नये. तुमचा हाच आग्रह कायम असेल तर आता आपण एकमेकांशी संपर्क  न करणे उत्तम. असं निर्वाणीचं पत्र त्यानं घरी पाठवलं होतं त्यालाही आता सहा वर्ष उलटून गेली होती.  आई-बाबा निवृत्तीनंतर महाराष्ट्र सोडून मणिपूरात स्थायिक झालेत. तिथल्या विवेकानंद केंद्रातल्या शाळेत ते शिकवतात. अशी वार्ता त्याला नातेवाईक-मित्रमंडळीकडून समजली होती. पण तरीही त्यानं त्याबाबत कधी आई-वडिलांकडे विचारणा केली नाही. तर त्याच्या शेवटच्या पत्रानं दुखावलेल्या आई-बाबांनीही त्याला ते कधी कळवले नव्हते. त्यामुळेच आता असे अचानक आई-बाबांना भेटल्यानंतर आपण एकमेकांशी कसे रिएक्ट होऊ हा विचार त्याला प्रवासभर छळत होता.


नवी दिल्लीत उतरल्यानंतर मागच्या दहा वर्षात देशातल्या सप्तसिंधुमधून बरेच पाणी वाहून गेलंय याची जाणीव कैवल्यला झाली. आता अमेरिकीची छोटी आवृत्ती नवी दिल्ली विमानतळ परिसरात आढळत होती. दिल्लीच्या कायदा-सुव्यवस्थेचा वाजलेला बो-या, वीजेची टंचाई, वाढती झोपडपट्टी हे सारे प्रश्न आपण पेपरात वाचतो. पण त्याचबरोबर दिल्लीला शहरीकरणामुळे आलेली सूज त्याला जाणवत होती. मॉल्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, रस्त्याच्या बाजूला सिनेस्टार आणि क्रिकेटपटूंच्या वेगवेगळ्या वेशातली वेगवेगळ्या प्रॉडक्टची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, मेट्रो रेल्वे, पाण्यापेक्षाही अगदी सहजगत्या मिळणारे कोक-पेप्सी, स्मार्ट फोनमध्ये रमलेली तरुण पिढी, यामुऴे दिल्लीचं होतं असलेलं जागतिकीकरणाचा अनुभव घेत कैवल्य गुवाहाटीच्या रेल्वेत बसला.

  गुवाहटीत गेल्यानंतर मागच्या दहा वर्षात आपण किती बदललोय आणि या बदलामुळे सभोवतलाच्या परिस्थितीशी जुळवून घेणं किती अडचणीचं आहे हे कैवल्यला जाणवू लागलं. त्यातचं इफांळला जाणारी गाडी उद्या रात्री असल्यामुळे आजची रात्र हॉटेलात राहणं भाग होतं. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. त्याला पाऊस फक्त सिनेमात बघायला आवडयचा. गुवाहटीचा नखशिखान्त हलवलणारा पाऊस आणि या पावसात हॉटेल निवडण्याची कटकट त्यानं खिशात असलेल्या भक्कम पैशांच्या जोरावर पार पाडली. चला, तर खिशात भक्कम पैसे असले की जगात कुठेही अडचणीच्या वेळी मार्ग निघतोच हे त्याचं गृहितक पुन्हा एकदा पक्क झाल्याचं जाणवताच तशाही परिस्थितीत  आत्मिक हासू फुटलं.

   दुस-या दिवशी पावसानं उघडीप दिल्यानं गुवाहटी ते इंफाळ प्रवास कसा होईल हे पाहण्यासाठी कैवल्यनं हालचाल सुरु केली. ज्या नेवांग गावाला त्याला जायचे होते ते गोयपांग इंफाळच्या 1 तास अलिकडे आहे, याची नोंद त्यानं जवळच्या जीपीआरएसनं केली होती. मात्र भारतामधून मणिपूरला जाण्याचा मार्ग बंद होता. 
भारतामधून मणिपूरला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक आसाममधल्या सिल्चरमधून येणारा हायवे क्रमांक 53. पण दहशतवादी कारवाया आणि हायवेची दुरावस्था यामुळे तो मार्ग 20 वर्षांपासून बंद आहे. दुसरा मार्ग आसाम, नागालॅँड, मणिपूरमधल्या नागा हिल्स, कुकी हिल्स मार्गे मैदानी प्रदेशात येतो. बंडखोर नागा संघटनांनी हा मार्ग रोखून धरल्यानं मणिपूरचा श्वास आवळला गेलाय.

  या भागात, ना अन्नधान्य पोहचंत, ना औषधं. जगण्याची कोणतीच साधनं जिथं जाऊ शकत नाहीत अशा राज्यातली जनता मागच्या दोन महिन्यांपासून आयुष्य ढकलतीय. हे जाणवल्यानं इतके दिवस सुबत्तेच्या राशीवर लोळणारा कैवल्य वास्तवाच्या जमिनीवर आला. मागची सहा वर्ष केवळ मी भोवती फिरणा-या त्याच्या विश्वात आठवडाभरापासून आई-बाबा आले होते. आता ते विश्व अधिक विस्तारत मणिपुरची जनताही त्यात सामवली जात होती. 

    अर्थात कोणत्याही आपत्तीचं आपल्या फायद्यासाठी रुपांतर करणारी जात जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळते. याची जाणीव कैवल्यला होतीच. मणिपुरची ही समस्या तर मानवनिर्मित होती. त्यामुळे या भागात काळाबाजार करणा-यांकडे येणा-या पैशांचा वेग हा गुवाहाटीत दिवसभर कोसळणा-या पावसापेक्षा जास्त होता. 
मणिपूरला सुटणा-या गाड्यांच्या स्थानकावर सर्वत्र माणसांचा नुसता समुद्र पसरलेला असताना बसमध्येही माणसांनी खच्चून बसावं याचं कैवल्यला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याचा गणिती विचार करणाच्या त्याची वृत्ती आता मागे पडली होती. नेवांगला नेणारी हीच एकमेव बस आता आहे. त्यामुळे या बसमध्ये चढताना, बसमधली हवा, सीट, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे भाडं या पैकी कशाचीही घासाघीस करायची नाही हे त्याला उमजले होते.
बसमध्ये बसल्यानंतर आजूबाजूला सर्व एकाच चेह-याची माणसं आणि सर्वांच्या चेह-यावर एकच प्रकारची काळजी. गोरी, बुटकी, बारीक डोळ्याची बसक्या नाकांच्या मंडळींसोबत प्रवास करताना कैवल्यला वर्गातला मणिपूरचाच झोराम आठवला. स्वत:बद्दल कधीही काही न बोलणारा,मागेमागेच राहणारा, अबोल, बुजरा माणूसघाणा म्हणता येईल इतपत एकलकोंडा. तो आपल्या वर्गात चार वर्ष होता. पण त्याला कुणी समजून, सामावून घेतलाच नव्हता. अगदी टिपकील चीनी, नेपाळी असं म्हणून त्याची कुणी हेटाळणी केली नसेल. पण कॉलेज संपल्यानंतर झोराम कुठे गेला, त्याचं काय सुरु आहे याचं कुणालाच पडलेलं नव्हतं. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस एप सारख्या वेगवेगळ्या संपर्क माध्यमांनी वर्गातलं सगळं पब्लिक एकमेकांशी कनेक्ट असताना एकट्या झोरामची कनेक्टेव्हीटी कुठे आणि कधी तुटली ?

विचारांची ही तंद्री सुरु असतानाच त्यानं मणिपूरच्या प्रश्नाबाबत बोलण्यासाठी बाजूच्या काकांशी कधी सुरुवात केली हे कैवल्यलाही समजले नाही. आम्ही भारतीय आहोत, अगदी महाभारत कालापासून याचे दाखले आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेल्या आझाद हिंद सैन्यातही मणिपुरी जनतेनं आपलं ‘खून’ दिलं ते देशाच्या ‘आझादी’साठीच ना ? स्वातंत्र्यानंतरच्या तीन्ही युद्धात मणिपूरच्या युवक अन्य जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढलेत. आशियाई स्पर्धेत मणिपूरच्या खेळाडूनंनी पदकं जिंकलीत. राष्ट्रीय स्पर्धेत मणिपूर नेहमी अग्रेसर असंत. या स्पर्धांचं नेटकं आयोजनही आम्ही केलंय. इतकचं काय तर च महिला बॉक्सिंगचं विश्वविजेतेपद मेरी कोमनं पटकावलं ते  मणिपूरसाठी नाही तर भारतासाठीच.
दिल्ली, मुंबईत होणा-या छोट्याश्या आंदोलनाचीही लगेच दखल घेतली जाते. त्यावर संसदेत चर्चा होते. पण मणिपूरमध्ये ब्लॉकेडमुळे लोकं उपाशी मरतायत, त्यांचा देशाशी संपर्क तुटतोय. पेट्रोल 150 च्या पुढे, कांदा 75 रुपये किलो. डाळीनं 80 चा टप्पा ओलंडलाय.अगदी एटीएममधून पैसा काढण्यासाठी चार-चार तास रांगा लावाव्या लागत असल्यानं पैसा ही इथं महाग झालाय. मागच्या आठड्यात वृत्तवाहिन्यांनी याची ‘ब्रेकींग न्यूज’ खाली दखल घेतली. इंग्रजी
वृत्तपत्रांनी शब्दमर्यादेचं आणि संपादनाचं काटेकोर कौशल्य वापरत 250 शब्दात या बाबतच्या बातम्या दाखवल्या. पण यामुळे मणिपूरचे प्रश्न सुटले का ? याचा फॉलो-अप किती जणांनी केला ?

मणिपुरी काकांच्या एक-एक प्रश्नानं कैवल्यनं स्वत:भोवती गुंफून घेतलेले कोष गळून जात होते. ज्या सामाजिक संस्कारात तो लहाणाचा मोठा झाला. ज्या सामाजिकतेचं भान वडिलांनी आयुष्यभर जपलं आणि निवृत्तीनंतरच आयुष्य घालवण्यासाठी विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून त्यांनी मणिपूरची निवड का केली हे त्याला समजू लागलं होतं. आपण काही करु शकतो ही भावनाच मरुन जावी इतकी विषण्णता या मणिपूरच्या हवेत साठून राहिल्याचं त्याला जाणवू लागलं.
 हताशा, हतबलता, परकीय घुसखोरी, बेरोजगारी, व्यसनाधिनता, विघटनवाद, आणि नाकरलेपणाची भावना या सारख्या समस्यांनी ग्रासलेल्या या राज्यातल्या जनतेमध्ये सकारात्मकतेचा, एकात्मतेचा, समरसेतेचा आणि राष्ट्रीयत्वचा धागा जोडण्यासाठी आपले आई-बाबा काम करतायत हे समजताच त्याला त्यांचा प्रचंड अभिमान वाटला. आता या कामात त्यांना संपूर्णपणे मदत करायची हे त्यानं नेवांगमध्ये बस दाखल होण्यापूर्वीच पक्क केलं होतं. ज्या देशात आपण जन्मलो, ज्या समाजात आपण मोठे झालो त्याचं देणं आपल्याला चुकवावंच लागतं. आपले बाबा मागची चाळीस वर्ष हेच करतायत. आता आपणही तेच करायचं हे न्यूयॉर्क ते नेवांग हा प्रवास पूर्ण करेपर्यंत कैवल्यनं निश्चित केलं होतं. त्याच्या आयुष्याचं ‘लक्ष्य’ त्याला सापडलं होतं. 


टीप - झी २४ तास डॉट कॉमच्या दिवाळी अंकात सर्वप्रथम प्रसिद्ध

Friday, November 1, 2013

राहिले दूर घर माझे... ( आनंद वासू )

क्रिकेट भारतामधल्या सर्वाधिक ग्लॅमरस क्षेत्रापैकी एक. एखाद्या बॉलिवूड कलाकाराच्या तोडीची किंवा अनेकदा त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धीही क्रिकेटपटूंना मिळते. अगदी लहान वयात मिळणारा पैसा, प्रसिद्धी, हायप्रोफाईल स्टेटस हे सर्वांनाच भूरळ पाडणारं. आज आयपीएलमुळे तर एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यापूर्वा सुपरस्टार झालेले आणि घरोघरी पोहचलेले खेळाडू आपल्या देशात आढळतात. पण वर्षभर फिरणा-या या क्रिकेटपटुंच्या आयुष्याची दुसरी बाजू काय आहे. तरुण वयात आपल्या घराच्यांपासून दूर त्यांना राहवं लागतं. वर्गमित्रांसोबतची धमाल, नातेवाईंकांची लग्न, घरातली आजरपण या सा-या प्रसंगात ते कुठेच नसतात. क्रिकेटमुळे त्यांची लाईफ स्टाईल बदलते. मात्र या बदलत्या लाईफ स्टाईलची किंमतही तितकीच मोटी आहे. या बदलत्या लाईफ स्टाईलशी जूळवून घेऊन स्पर्धात्मक क्रिकेट खेळणा-या खेळाडूच्या अवस्थेवर विस्डेन इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक आनंद वासू यांनी एक सविस्तर लेख लिहलाय. त्या लेखाचा हा अनुवाद. आनंद वासू यांनी या अनुवादाला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार....

..........................................................................................................................................

एक किशोरवयीन युवक क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार करतो त्यावेळी त्याच्या डोक्यात आयुष्यात काही तरी भव्य करण्याची कल्पना असते. आपल्या हातात बॅट घेऊन असा काही पराक्रम गाजवू की ज्यामुळे सा-यांचीच डोळे दिपून जातील. 22 यार्डाच्या खेळपट्टीवर अफाट करण्याच्या कल्पनेनं अनेक  किशोरवयीन युवक झपाटलेले असतात. मात्र चरितार्थ चालवण्यासाठी क्रिकेट खेळण्याचे भाग्य काही मोजक्याच भाग्यवंतांना मिळते. यापैकी अगदीच निवडक क्रिकेटपटूंना हे भाग्य सातत्याने लाभलंय. आजच्या युगात व्यवसायिक खेळाडू असणे म्हणजे सारी स्वप्न पूर्ण होण्यासारखी बाब आहे. मात्र हीच स्वप्नपूर्ती झोप उडवणारी आहे.

.क्रिकेट विश्वाचे केंद्र असलेल्या भारतामध्ये क्रिकेटचे कॅलेंडर सप्टेंबरमध्ये सुरु होते. सप्टेंबर ते जानेवारी या काळात चार दिवसांचे आठ रणजी सामने आणि पुढे कदाचित नॉक आऊट लढती. त्यानंतर कॉर्पोरेट चषक स्पर्धा. वर्षभरातल्या या एकमेव स्पर्धेत खेळण्यासाठी उद्योगपती खेळाडूंना दरमहा पगार देत असतात. त्यानंतर देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा, आणि टी-20 सामने. पुढे दोन महिने इंडियन प्रिमयर लीग. या सर्व स्पर्धा एका पाठोपाठ खेळून झाल्यानंतर पुन्हा रणजी सामन्यांचे वेळापत्रक तुमची वाट पाहत असते. थोडक्यात कोणत्याही यशस्वी क्रिकेटपटूच्या जीवनात  वैयक्तिक आयुष्याला जागाच राहत नाही. क्रिकेट खेळणे हेच त्यांचे आयुष्य बनलेले असते.


अर्थात देशासाठी खेळत असताना वैयक्तिक गोष्टींचा विचार करणे अशक्य असतं. खेळाडूचे कारियर हे मर्यादित असते.ज्या वयात बहुतेक व्यक्तींच्या करियरमधला सर्वोत्तम काळ सुरु होण्याच्या मार्गावर असतो त्यावेळी खेळाडू निवृत्त होतो.साधारणपणे क्रिकेटपटू पस्तीशीच्या आसपास निवृत्त होतात. तर सामान्य व्यक्ती वयाच्या चाळीशीत आपल्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या प्रतिक्षेत असतो. अनेकांना पन्नाशीतही अधिक पैसा कमावण्याची संधी उपलब्ध असते. मात्र क्रिकेटपटू आयुष्यातला सर्वोत्तम काळ हा सुरुवातीलाच पूर्ण करतात. त्यामुळे हे सारे सुखी आयुष्य मिळवण्याची मोठी किंमत त्यांना मोजावीच लागते.

क्रिकटेपटूंच्या आयुष्याच्या होणा-या या घुसळणीतचं क्लासीक उदाहरण म्हणजे मुरली कार्तिक.या डावखु-या फिरकीपटूनं आठ कसोटी ( 2000-2004) आणि 37 एकदिवसीय ( 2002-2007) मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. म्हणजेच टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळून त्याला सहा वर्ष लोटली आहेत. तरी कार्तिकला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. कार्तिक सांगतो,  “ व्यवहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी मागच्या 19 हंगामापासून क्रिकेट खेळतोय. भारतामधील रणजी  आणि इंग्लंमधील कौंटी क्रिकेट दरम्यान ब्रेक नसतो. एक खेळाडू या नात्याने रणजी टीमसाठी माझी जी जबाबदारी असते त्या पेक्षा मोठी जबाबदारी एक विदेशी खेळाडू म्हणून कौंटी क्रिकेट खेळताना मला पूर्ण करावी लागते. मी तिथे केवळ माझ्या कॅप्टनला नाही तर त्या कल्बमधल्या प्रत्येक व्यक्तीचा मी उत्तरदायी आहे.” लॅँकरशायर, मिडलेक्स, सोमरसॅट आणि अगदी अलीकडच्या काळात सरे या इंग्लीश कौंटी टीमचं कार्तिकनं प्रतिनिधित्व केलंय. पण टीम इंडियामध्ये त्याच्यासाठी जागा नाही.

 “ वर्षातला बहुतेक काळ दिल्लीतलं माझं घर बंद असतं. कोणत्याही व्यक्तीप्रमाणे मी देखील या घरासाठी कठोर परिश्रम केलेत. त्यासाठीच, पैसे मिळवलेत पण या घराचं सुख उपभोगण्याची संधी मला मिळत नाही ’’  अशी भावना कार्तिकनं बोलून दाखवलीय. इंग्लंडमध्ये असताना प्रत्येक हंगामात अलिशान घरात त्याची बडदास्त ठेवली जाते. कुठेही फेरफटका मारण्यासाठी टीमच्या प्रायोजकाची गाडी दिमतीला असते. तरीही त्याला आपल्या घराची सर नाही असे कार्तिकला वाटते. “गेल्या पाच वर्षांपासून मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेसाठी आणि नंतर इंग्लींश कौंटी क्लबसाठी पूर्ण हंगाम क्रिकेट खेळत आलोय. या काळात मी माझ्या दिल्लीतल्या घरी किती राहिलो याची नोंद माझ्याकडे आहे. मागच्या पाच वर्षात अनुक्रमे 22,27,23,24 आणि 25 रात्र मी माझ्या घरात मुक्काम केलाय.घरातील एकमेव व्यक्तीला स्वत:च्याच घरात वर्षातून एक महिन्यापेक्षा कमी काळ राहयाला मिळाल्यावर त्याची काय अवस्था होत असेल याचा विचार केलाय का ? ’’  असा प्रश्न कार्तिक विचारतो.

मुरली कार्तिकनं मागच्या सहा वर्षात टीम इंडियासाठी एकही मॅच खेळलेली नाही या गोष्टीचा फेरविचार केल्यानंतर सध्याच्या खेळाडूंची काय अवस्था होत असेल याचं गांभीर्य लक्षात येईल. जगभरात वेगवेगळ्या लीग सुरु असतात. वाजवी पैसा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या देशात होणा-या स्पर्धांचं दमवणारं वेळापत्रक क्रिकेटपटू पाळावचं लागतं. अर्थात यामध्येही कुटुंबाला महत्व देणारा गौतम गंभीर सारखा खेळाडू विराळाच. 2008-09 च्या हंगामात गंभीर त्याच्या कारकिर्दीमधल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. त्या सहा टेस्टच्या ड्रीम रनमध्ये केविन पिटरसनच्या इंग्लंडविरुद्ध 179 आणि 97  हॅमिल्टन कसोटीत 72 आणि 30, नेपियरमध्ये पहिल्या डावात 16 आणि दुस-या डावात 11 तास खेळपट्टीवर ठाण मांडून केलेली 137 धावांची अजरामर खेळी. वेलिंग्टन कसोटीत 23 आणि 167. श्रीलंकेविरुद्ध अहमदाबादमध्ये 1 आणि 114 आणि पुन्हा कानपूर कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 167. कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या गंभीरनं कौंटुबिक जबाबदारीला महत्व देत त्यानंतरच्या मुंबई टेस्टमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

गंभीर बहिण्याच्या लग्नासाठी मुंबई टेस्टमध्ये खेळला नाही. ’माझ्या कौटुंबिक आयुष्याततल्या अनेक आनंदाच्या प्रसंगात परिवारासोबत राहण्याची संधी मला मिळालेली नाही. ज्यावेळी तुम्ही क्रिकेट हे करियर निवडता त्यावेळी तुमची प्राथमिकता बदललेली असते हे सर्वांनीच गृहीत धरलेलं असतं. तरीही काही गोष्टी टाळता येणं शक्यच नसतं बहिणीचं लग्न ही अशीच एक न टाळता येणारी बाब आहे, असं गंभीर सांगतो.
अर्थात गंभीरचा टेस्ट न खेळण्याचा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नव्हता. मी एखाद्या खेळाडूला अशा प्रकारची सूट दिलीच नसती, असे बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले म्हणाले होते. ( टीप- हा लेख लिहीत असताना लेले हयात होते) तर आमच्या काळात अशा प्रकारची कल्पना करणंही अशक्य होतं असं टीम इंडियाचे माजी कोच आणि निवड समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी सांगितलं. क्रिकेट दौ-यावर असल्यामुळे सुनील गावसकरला आपल्या नवजात मुलाचा चेहरा दोन महिने पाहता आला नव्हता याची आठवणही गायकवाड यांनी करुन दिली.


आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत किंवा क्लब लेव्हलची प्रत्येक मॅच खेळण्याची इच्छा क्रिकेटरची असते असं गंभीर सांगतो. मात्र काही वेळा कुंटुंब हे या सर्वापेक्षा महत्त्वाचे आहे याची जाणीव तुम्हाला होते. ज्या कुटुंबानं तुमच्या क्रिकेट करियरसाठी अनेक गोष्टींचं बलिदान दिलंय. त्यांच्यासाठी क्रिकेट आणि कुंटुंबामधील सीमारेषा काही प्रसंगात ओलंडण्याची आवश्यकता असते. गंभीरनं स्वत:च्या लग्नासाठीही टेस्ट खेळणे टाळले होते. ( अर्थात त्या लग्नात त्याची उपस्थिती आवश्यकच होती) तसेच इंग्लंड विरुद्धच्या अहमदाबाद टेस्टपूर्वी त्याची आजी ( आईची आई) आशा गुलाटी यांचं निधन झालं त्यावेळीही गंभीरनं कौटुंबिक  जबाबदारीला प्राथमिकता देत घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आजीने माझा लहानपणी सांभाळ केलाय. मी क्रिकेट खेळतो त्यामुळे मला सर्वांपासून दूर राहवं लागतं हे घरच्यांनी स्वीकारलंय. मात्र या अशा काही गोष्टी आहेत की ज्या मी टाळूच शकत नाही असं गंभीरनं सांगितलं.
गंभीरचा फॉर्म सध्या हरपलाय. त्याच्या बॅटमधून पूर्वीसारख्या धावाही होत नाहीत. त्यामुळे सध्याच्या टीममध्ये त्याचा समावेश नसणं हे स्वाभाविक आहे. पण तरीही गंभीरचं लॉजिक तुम्ही नाकारु शकत नाही. काही वर्षांनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. त्यानंतरच सारं आयुष्य त्याला कुटुंबासमवेतच घालवायच. त्यावेळी आपल्या सर्वाधिक गरजेच्यावेळी गौतमनं आपल्याला वेळ दिला याची जाणीव घरातल्या प्रत्येकाला असेल. त्यामुळे घरातल्या सर्वांसाठी त्याच्या परतण्याचं मोठ मोल असेल. क्रिकेटपटू या नात्यानं किती धावा केल्या याच्यापेक्षा हे ‘मोल’ नक्कीच जास्त आहे.

एक व्यवसायीक क्रिकेटपटू या नात्याने आपण आयुष्य चांगले घालवले याचे समाधान गंभीरला नक्कीच असेल. पण जगातले अन्य काही क्रिकेटपटू या सर्वांकडे वेगळ्याच दृष्कीकोणातून पाहतात. कुमार संगकारा हा त्यापैकी एक. श्रीलंकेच्या सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये त्याचा समावेश नक्कीच होईल. वयाच्या 22वर्षी लॉचे शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचा वारसा चालवण्याच्या प्रयत्नात असलेल्या संगकाराचा दक्षिण आफ्रिका दौ-यावर जाणा-या श्रीलंकन टीममध्ये समावेश करण्यात आला. पहिल्या तीन टेस्टमध्ये त्याला एकदाही 25 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. मात्र चौथ्या टेस्टमध्ये डरबनच्या खेळपट्टीवर श़ॉन पोलॉकच्या नेतृत्वाखाली गोलंदाजी करणा-या आफ्रिकन तोफखाण्यासमोर त्यानं 74 धावांची झुंजार खेळी केली. श्रीलंकेच्या नव्या स्टारचा त्या दिवशी जन्म झाला. “ पहिला दौरा हा माझ्यासाठी करा किंवा मरा अशाच पद्धतीनं असल्यानं आजही चांगलाच लक्षात आहे. जगातल्या सर्वोत्तम टीमसमोर उभ राहून त्यांच आव्हान स्विकारण्याची धमक माझ्यात आहे हे मला दाखवून द्यायचे होते. माझा पहिला दौरा आणि सर्वात अलिकडचा दौरा यामधला फरकही मला चांगलाच जाणवतो.’’

संगकाराला हा फरक नक्कीच जाणवत असेल. पण धकाधकीचं कंटाळवाणे आयुष्य जगणा-या अन्य व्यक्तींसाठी सर्व गोष्टी काही काळानंतर अस्पष्ट होऊ लागतात. क्रिकेटर म्हणून केलेला प्रत्येक प्रवास हा संस्मरणीय नव्हता हे संगकाराने मान्य केले. त्यानं दक्षिण आफ्रिका ज्या देशातली अंतर्गत खळबळ ही श्रीलंकेप्रमाणेच आहे तिथंही क्रिकेट खेळलंय. तसेच निसर्गाचे वरदान लागभलेल्या न्यूझीलंडच्या क्वीन्सटॉऊनचाही दौरा केलाय.

एक बुद्धिमान खेळाडू अशी ओळख असलेल्या संगकाराला युवा क्रिकेटपटू असताना केलेल्या दौ-याच्या वेळेस थ्रील चांगलेच आठवते. कारकिर्दीच्या सुरुवील प्रत्येक दौरा हा तुमच्यासाठी चांगली संधी असते. परदेशी खेळपट्यांवर आपला ठसा उमटवण्याची भूक तुम्हाला असते. वैयक्तिक कामगिरी सुधारण्याचे आणि नवे लक्ष्य गाठण्याचे आव्हान प्रत्येक दौ-यात खुणावत असते. पण संघाचा नियमित सदस्य झाल्यानंतर शांत चित्त किती महत्त्वाचे आहे याची जाणीव होते. ज्या देशात तुम्ही खेळत आहात तिथल्या वातावरणाचा आनंद घेणे, सकारात्मक पद्धतीनं खेळाचा आनंद लुटणे किती महत्वाचे असते हेही तुम्हाला जाणवू लागते.
प्रतिकुल परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न संगकारानं केला. त्याला नव्या  भागात फिरायला आवडतं. स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्या परिस्थितीशी एकरुप होण्याचाही त्याचा प्रयत्न असतो. पण त्याच त्याच ठिकाणाचा दौरा करण्याची वेळ त्याच्यावर अनेकदा आलीय. टेस्ट क्रिकेट हे केवळ 10 देशांमध्ये खेळलं जातं. प्रत्येक देशात आंतरराष्ट्रीय सामने होणारी पारंपारिक केंद्र आहेत. त्यामुळे  ठराविक शहरांचा दौरा वारंवार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय दौरे आवडणारे असले तरी सतत विमानतळ आणि हॉटेलमधले चेक-इन आणि चेक-आऊट, सामानांची सततची पॅकींग आणि पुढचं शहर गाठण्यासाठीची धावपळ या सा-या गोष्टी या तितक्याच तापदायक आणि चिडचिड वाढवणा-या असतात, हे संगकाराने मान्य केलंय.
आक्रमक युवा खेळाडू म्हणून टीममध्ये पदार्पण करणा-या संगकाराच्या आयुष्यात क्रिकेटच्या सोबतीनं बरेच बदल झालेत. आज तो एक पती तसेच जमीनदारही आहे. त्याच्या देहबोलीतून हा बदल जाणवतो.   “ पण क्रिकेटच्या दौ-यावर असताना माझे आयुष्य हे सर्वसाधारणच असते. मला माझी सारी बिलं भरावीच लागतात. तसेच माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. दौ-यावर असताना तुमचं आयुष्यही सुरुच असतं. तुमचा अन्य गोष्टींशी असलेला संपर्क तुटत नाही ही खूप आश्वासक बाब आहे. घरातले सदस्य आणि सांसरिक जबाबदा-या तुमच्यावर कायम असतात. तुम्ही का खेळता आणि तुमच्या खेळावर कोण कोण अवलंबुन आहे, याचे स्मरण या सा-यामधून होत असते. ’’


व्यवहारिकतेची जाणीव असलेला संगकारा तितकाच संवेदनशील आहे. “ मी माझे घर कायमच मिस करतो. लग्नानंतर येहालीला ( संगकाराची पत्नी) शक्य तेंव्हा दौ-यावर सोबत नेण्याचा माझा प्रयत्न असतो. तरीही घरच्यांसोबत अनेक गोष्टी मला करता येत नाहीत. विशेषत: बाप झाल्यानंतर एक पिता या नात्यानं तर ही बाब फारच अस्वस्थ करणारी असते. मुलाच्या वाढीचे महत्त्वाचे टप्पे जवळून पाहता येत नाहीत असे जुळ्या मुलांचा बाप असलेल्या संगकाराने सांगितले.  कौटुंबिक आयुष्यातल्या अनेक गोष्टींचे साक्षिदार होण्याची इच्छा असते, त्यामुळेच दौ-यावर कुटुंबाला नेण्याची परवानगी मिळावी यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका मांडली आहे. ’’

माझ्या क्रिकेट करियरमधल्या प्रत्येक गोष्टीचे योग्य पद्धतीनं ‘रेकॉर्ड’ होत असताना त्याच्या बायकोचे काम मात्र दुर्लक्षित राहतय हे सांगयला संगकरा अजिबात कचरत नाही, . “ .अर्थात क्रिकेटमुळेच आम्हाला सध्याची जीवनशैली जगता येतीय हे खरयं. पण बायकोनं माझ्यासाठी मोठं बलिदान दिलंय दोन्ही मुलांच्या संगोपनाची तिनं एकटीनं पेलली आहे. अनेकदा आमचा एकमेकांशी संपर्क होत नाही. माझी ‘ग्राऊंड रिएलिटी’ काय आहे हे तिला समजायला काहीच मार्ग नसतो. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी आमच्या टीमवर केलेला हल्ला हे या अनिश्चित परिस्थितीचे सर्वात मोठं उदाहरण. सतत अनिश्चित असलेल्या माझ्या वेळापत्रकामुळे तिला फार पुढचे नियोजन करता येत नाही.या सा-या अवघड गोष्टी तिनं शातंपणे समजून घेतल्यात. तिच्या सारखी सहचारिणी मिळाल्यामुळेच माझा क्रिकेट दौरा सुसह्य होतो. ’’

श्रीलंकेतल्या आपल्या अनेक देशवासियांना स्वप्नवत वाटणारं आयुष्य मी जगतोय हे खरंय. पण या सुखी आयुष्याच्या मार्गावर द्याला लागणा-या ‘टोल’ची किंमत कमी लोकांना माहितीय. बिझनेस क्लासने विमान प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम आणि प्रत्येक ठिकाणी मिळाणारी व्हिआयपी वागणूक या सर्व गोष्टी अल्हादायी वाटतात. पण हा सारा झगमगाट म्हणजे आयुष्य नाही हे वास्तव कधीही न विसरण्याची दक्षता घ्यावी लागते. या सर्व तारांकीत आयुष्याचा झगमगाट कधी ना कधी संपणार आहे. अशावेळी तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर काय करता यालाच सर्वाधिक महत्व आहे. वाढती जबाबदारी आणि कुटुंबाचा विरह हा माझ्या या सध्याच्या आयुष्याचा ‘टोल’ आहे, पण क्रिकेट हेच माझे आयष्य आहे निवृत्तीनंतर एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे रस्त्यावरुन फिरायला लागल्याची खंत मला कधीच जाणवणार नाही. मात्र क्रिकेट आणि मित्रांनी गजबजलेलं ड्रेसिंगरुमचं वातावरण मी नेहमी मिस करेन, असं संगकारानं स्पष्ट केलं.

कार्तिक, गंभीर किंवा संगकारासारखे व्यवहारिक आणि क्रिकेट आणि बाकी आयुष्य याची सांगड घालणारे खेळाडू मोजकेच आहेत. अनेक हाय प्रोफाईल क्रिकेटपटूंचे आयुष्य या अनेक अव्यवहारिक आणि परस्परभिन्न गोष्टींनी भरलेलं आहे. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणारे पॅडी उप्टन हे यापैकी एक. पॅडी सध्या दक्षिण आफ्रिकेचे व्यवस्थापक आणि राजस्थान रॉयल्स या टीमचे मुख्य कोच आहेत. आयुष्यात काय करायचे याच उत्तर शोधण्यासाठीच पॅडी यांनी बराच कालवधी खर्च केलाय. वेस्टर्न प्रोव्हिन्स या दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टीमचे डावखुरे फलंदाज म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरु केली. त्यानंतर हॅन्सी क्रोनिए कॅप्टन असताना ते राष्ट्रीय टीमचे पूर्णवेळ ट्रेनर होते. याच क्षेत्रात आपल्याला करियर करता येईल हे समजल्यानंतर त्यांनी स्पोर्टस सायन्स आणि एक्सिक्युटीव्ह कोचिंग या विषयातलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. मानसिक स्थिती या विषयातले पितामह म्हणून ओळखले जाणा-या टीम नोअकेस यांच्या हाताखाली पॅडी यांनी कोचिंगचे धडे गिरवले आहेत.

पॅडी टीम इंडियासोबत असताना टीम टेस्टमध्ये नंबर वन बनली. तसेच विश्वविजेतेपदालाही टीमनं गवसनी घातली. खेळात आनंद मिळाल्याशिवाय त्यातील श्रेष्ठत्व मिळू शकत नाही असा पॅडी यांचा ठाम विश्वास आहे. एखाद्या सात वर्षाच्या मुलापेक्षाही जास्त प्रश्न उपस्थित करणा-या पॅडी यांनी देशातल्या आघाडीच्या क्रिकेटपटूंचे आयुष्य काय आहे हे अगदी जवळून पाहिलय. भारतामध्ये क्रिकेट हा मनोरंजनाचा व्यवसाय बनलाय. क्रिकेटपटू हे मनोरंजनाचे माध्यम बनलेत. त्यांचे सेलिब्रेटी स्टेटस हे सतत वाढत असून त्यासाठी वेगवेगळ्या जाहीरातींमध्ये ते व्यस्त असतात. झगमगत्या (ग्लॉसी) मासिकात त्यांची छायाचित्रं छापून येतात फिरण्यासाठी स्पोर्टस कार उपलब्ध असतात. एखाद्या क्रिकेटपटूचा चेहरा त्यानं आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यापूर्वी शॉपिंग मॉल, विमानतळ, रस्त्याच्या बाजूचे जाहीरातीचे फलक अशा यत्र तत्र सर्वत्र झळकत असतो. या सर्व झगमगटानं येणा-या तोट्याची पॅडी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये अत्यंत गांभिर्यानं नोंद केलीय. “ प्रत्येक युवा क्रिकेटपटूंना वाचन ही अनिवार्य बाब केली पाहिजे. मॉडेल, चित्रपट कलाकार, संगीतकार तसेच उद्योगपतींसाठी हा सारा झगमगाट हे पार्टी कल्चर ही आता नेहमीची बाब बनलीय. क्रिकेटपटूंचा यामध्ये अलिक़डेच शिरकाव झालाय. हे सारं आनंदी आणि हवहवंस वाटणारं विश्व आहे. आपल्या आवडत्या कलाकाराबाबत जाणून घ्याला त्याच्या आयुष्याबद्दल वाचायलला लोकांना आवडत असतं. स्टारसाठी हे आयुष्य रंगीत, आकर्षक, आव्हानात्मक आणि प्रसंगी प्राणघातकी बनू शकतं. जिंकणारे जिंकतात आणि हरणारे हरतात. संसाराच्या नियमाप्रमाणे सा-या गोष्टी घडत असतात. कोणत्याही चांगल्या पार्टीनंतरचा हॅँगओव्हरही तितकाच परिणामकारक असतो.अनेक जण हे मान्य करणार नाहीत पण अनेक क्रिकेटरचे आयुष्य हे घोटाळे, एकाकीपण, निराशा, घटस्फोट आणि अगदी आत्महत्या यांनी भरलेलं आहे. या लाईफस्टाईलमध्ये बदल केला नाही तर हा सा-या हॅँगओव्हरचा पसारा वाढत जाणार आहे.
क्रिकेटरच्या या सा-या भयावह आयुष्याचा विचार करणारे पॅडी हे अत्यंत विद्वान गृहस्थ आहेत. कोणत्याही मुद्यावर त्यांना प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून समजून घेत असताना त्या प्रश्नावर त्यांनी कित्येक पाय-या पुढचा विचार केला आहे, याची जाणीव प्रश्नकर्त्याला होते. त्यांच्याशी चर्चा करणे हा नेहमीच एक शिकण्याचा अनुभव असतो. कारण तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं कदाचित मिळणार नाहीत पण  जिथून सुरुवात केली असते त्याच्या बरचं पुढं गेल्याची जाणीव ही सारी चर्चा संपल्यावर निश्चितच होते. क्रिकेटर्सना आता पुर्वीपेक्षा अधिक पैसा मिळतो. त्यांच्या आयुष्यातला झगमगाट, ग्लॅमर याच्यात वाढ झालीय. पण ते पुर्वीपेक्षा जास्त एक्सपोजही होत आहेत. पण या सा-या प्रकाशमान आयुष्याच्या बरोबर येणा-या काळ्या सावलीची जाणीव क्रिकेटरना आहे का ? ही काळी सावली गडदपणे समोर आणण्याचे काम प्रसारमाध्यमांनी अनेकदा केलंय. नाईट क्लबमध्ये होणारी भांडणं, अतिरेकी मद्यपान करुन गाडी चालवणे, उतावळे लैंगिक संबंध, फसवे व्यवसायिक परवाने, अंमली पदार्थाचे सेवन, ‘हनी पॉट’ आणि मॅच फिक्सिंगमधला सहभाग हे सर्व क्रिकेटपटूंच्या आयुष्यातल्या काळ्याबाजू अलिकडच्या काळात पुढे आल्या असल्याचं पॅडी सांगतात. कायद्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची भावना काही सेलिब्रेटिंची झालेली असते. ही भावनाच अशा प्रकारच्या कृत्यांचा पाया रचते.

पॅडी यांचे शब्द हे अतिरेकी नकारात्मक वाटत असले तरी आकडेवारी त्यांच्या शब्दांना बळ देणारी आहे. 2013 मध्ये क्रिकेटरचे आत्मत्येचे प्रमाण हे अन्य कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहे. घटस्फोटाच्या आकडेवारीनंतर हॉलिवूडमधल्या जोडप्यांनंतर क्रिकेटरचा नंबर लागतो. आज पैसा, प्रसिद्धी प्रतिष्ठा वारेमाप मिळतीय. पण सततचा प्रवास हा क्रिकेटर्सना अस्थिर करणारा आहे. क्रिकेट खेळाडू हा मनोरंज विश्वाचा भाग होण्याचे प्रमाण वाढले आहे. पार्ट्या ग्लॅमरच्या या झगमगटामध्ये क्रिकेटपटचे जवळचे मित्र त्यांच्यापासून दूर होत आहेत. त्यांच्याभोवतालचं खुशमस्क-यांचे जाळे दिवसोंदिवस घट्ट होतय.

क्रिकेटपटूंची आजच्या इतकी बिकट मानसिक अवस्था पुर्वी कधीच नव्हती. गॅरी सोबर्स यांचा केवळ वेस्ट इंडिजच्या नाही तर जगातल्या सर्वकालीन महान क्रिकेटपटूमध्ये समावेश होतो. त्यांनी आत्मचरित्रात लिहलेले काही प्रसंग तर आज एखाद्या कादंबरीत फिट्ट बसतील असे आहेत. अफाट नैसर्गिक गुणवत्ता लाभलेल्या या बार्बाडोसच्या खेळाडूचं करियर हे एखाद्या मुक्तछंदातल्या कवितेसारखं होतं. पारंपारिक नियम चौकटी त्यानं फारश्या पाळल्याच नाहीत. आपल्या आत्मचरित्रातच सोबर्सनं हा किस्सा लिहून ठेवलाय. ‘’ मला जुगार आवडत असे मी दारुही चिकार प्यायचो. तसेच सुंदर युवतींसोबत लेट नाईट पार्टींना जाण्यापासूनही मला कोणी रोखले नाही. करियरच्या शेवटावर 1973 साली इंग्लंड दौ-यावर घडलेला एक किस्सा मोठा मजेशीर आहे.

लंडनमध्ये स्थायिक झालेल्या वेस्ट इंडिजचा माजी फिरकीपटू रेग स्कॅरलेटनं सोबर्स यांना मद्यपानासाठी आमंत्रण दिलं होतं. सोबर्स यांनी हे आमंत्रण आनंदानं स्विकारलं. वेस्ट इंडिज टीम राहत असलेल्या हॉटेलमध्ये न बसता ते दोघे एका बारमध्ये गेले. त्या बारमध्ये स्कॅरलेटनं केलेल्या पाहुणचाराचा सोबर्स यांनी पूर्ण सन्मान केला. रात्रभर रंगलेल्या कार्यक्रमानंतर सकाळी थंड पाण्याने कशीबशी आंघोळ करत सोबर्स यांनी आपल्या टीमला ज़ॉईन केले. त्या कसोटीच्या अदल्यादिवशी सोबर्स 26 धावांवर रोहन कन्हईयासह नाबाद होते. त्यामुळे त्यांना आराम करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या सर्व कसरतीनंतर मैदानावर उतरलेल्या सोबर्स यांच्यसमोर पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजीला होता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बॉब विलीस. पहिले पाचही बॉल मी बिट झालो. वेगवान गोलंदाजीला मदत करणा-या खेळपट्टीवर माझा सहज फाडशा पाडेल अशा आर्विभावात विलीस गोलंदाजी करत होता. पाच चेंडूनंतर ड्रेसिंगरुममध्ये माझ्या हलचालींवर होणारी शेरेबाजी मला जाणवली. विश्रांती न झाल्यानं मैदानावर माझी भंबेरी उडाल्याची जाणीव सहका-यांना झाली होती. विलीसनं टाकलेला सहावा चेंडू बॅटच्या मध्यावर बसला. मी मैदानावर स्थिरावलो. सत्तरी पार केल्यानंतर पोटात साचलेल्या अल्कोहलनं आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली. मला शौचालयास जाणे आवश्यक होते. मात्र त्याचवेळी मैदानावर सेट झाल्यानं तयार झालेला रिदमही मला तोडायचा नव्हता. त्यामुळे मी तसंच खेळायचा निर्णय घेतला.
पोटातली खळबळ थोपवून धरलेल्या सोबर्सनं जिद्दीनं आपलं शतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर त्यांनी पोट रिकामं करण्यासाठी मी पंचाकडे परवानगी मागितली. ड्रेसिंगरुममध्ये गेल्यानंतर रोहन कन्हाईनं माझ स्वागत केलं कॅप्टन तुला काय त्रास होतो ? ( मी तेंव्हा कॅप्टन नव्हतो तरी रोहन मला कॅप्टन अशीच हाक मारत असे). असा प्रश्न त्याने विचारला. मी त्याला सांगितले, पोरा माझ्या पोटात नरकयातना होतायत. एक कडक ब्रँडीचा पेग हाच त्यावर उपाय आहे. रोहननं तात्काळ ड्रिंकची ऑर्डर दिली. त्यानं एकदा माझ्याकडे निरखून पाहिलं आणि तो ओरडला कॅप्टनसाठी आणखी एक ब्रँडीचा पेग आणा, आणि हो हा पेग पहिल्यापेक्षा मोठा भरा. मला त्याची ही आयडिया आवडली. त्यानं मागवलेला दुसरा पेगही मी आनंदानं रिचवला. माझ्या पोटातली खळबळ अचानक शांत झाली. शौचालयास जाण्याची गरज मला भासलीच नाही. त्या डावात सोबर्सच्या नाबाद 150 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं आपला डाव 6 बाद 652 या विशाल धावसंख्येवर घोषित केला. वेस्ट इंडिजनं ती टेस्ट एक डाव आणि 226 धावांनी जिंकली.

या घटनेला यावर्षी ४० वर्ष पूर्ण झालीत. आजही स्वत:ला तृप्त करण्याचे अनेक ऑफफिल्ड मार्ग खेळाडूंना उपलब्ध आहेत. पण सोबर्स ज्या पद्धतीनं स्वच्छंदीपणे आयुष्य उपभोगू शकले ते स्वातंत्र्य त्यांना मिळणार नाही. आजही खेळाडूंसाठी ड्रींक्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पण ते बंद दरवाज्याआड किंवा एखाद्या सेलिब्रिटी पार्टीमध्ये त्याची सोय केली जाते. ज्याची माहिती ही उघडपणे कोठेही येत नाही. सोबर्ससारखं व्यक्तीमत्व खेळाडूंमध्ये असेलही पण अशा व्यक्तीला आश्चर्याऐवजी तिरस्कार जास्त सहन करावा लागेल.
2013 मध्ये जागतिक क्रिकेटचा हिस्सा बनलेल्या व्यक्तीनं त्याच आयुष्य हे अस्थिर असल्याचा स्वीकार हा केलाच पाहिजे. तसेच काही वर्षांपूर्वीपर्यंत निरस, एकाकी आणि काहीस हेकेखोरपणे आयुष्य जगत असलेल्या क्रिकेट पत्रकारांचे आयुष्यही आता एक इंग्रजी कवितेप्रमाणे बदलत चाललंय.
Corridor of uncertainty
It used to be only a few inches wide,
Just outside a batsman’s off stump.
It used to be a bowler’s principal aim,
Just nag away and wait for a mistake
It used to be every left-hander’s weakness,
Just leave the ball or play it ?
It used to be the slip cordon’s ally,
Just the right line for a nibble
It used to be cricket’s basic principle,
The corridor of uncertainty
Today, it’s wider than a pitch,
And sits in the middle of the desert
Today, it’s that place you can’t avoid,
On any cricketing voyage
Today, it’s bright and cheery in the night,
Keeping people constantly on the move
Today,  It’s where you meet stranger,
Former players officials friends in cricket.
Today it’s the Dubai International Airport
Cricket’s new corridor of uncertainty

विमानतळावर ताटकळत अनेक तास घालवण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर तुम्हाला या शब्दाचा अर्थ समजेल. जर सुदैवाने ही वेळ आली नसेल तर बाहेरच्या जगात जरा पहा त्या जगात क्रिकेट आणि प्रवास हे दोघे इच्छा नसताना एकमेकांचे घट्ट सोबती झालेत. आजच्या युगातले क्रिकेटर हे विश्वप्रवासी असतात. सामान्य क्रिकेटपटूलाही हा प्रवास चुकलेला नाही. यशाच्या झगमगटात चमकणा-या क्रिकेटपटूंच्या आयुष्याची नाळ या कंटाळवाण्या वास्तवाशीही घट्ट विणलेली आहे.


टीप - हा मुळे लेख इथे  वाचू शकता.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...