Wednesday, September 30, 2020

टी. नटराजन : मजुराचा मुलगा ते आयपीएल हिरो!


इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) स्पर्धेत सन रायझर्स हैदराबाद कडून खेळणाऱ्या टी. नटराजन या बॉलरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये नटराजनने एक नाही दोन नाही तर तब्बल सात यॉर्कर्स टाकले.
'टी-20 क्रिकेटमध्ये यॉर्कर टाकण्याचे महत्व आता उरले नाही' असं आशिष नेहरा कॉमेंट्री करताना सांगत होता. त्याचवेळी नटराजननं सात यॉर्कर टाकत नेहराचे लांब दात त्याच्या घशात घातले. तामिळनाडूतल्या एका छोट्याश्या गावातल्या मजुराचा मुलगा ते आयपीएलचा हिरो हा नटराजनचा आजवरचा प्रवास मोठ्या संघर्षचा आणि सर्वांना प्रेरणा देणारा आहे.

पाचवीला पुजलेला संघर्ष!

तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यातले चिन्नापम्पट्टी हे गाव आज क्रिकेटविश्वात थंगारासू (टी) नटारजनचे गाव म्हणून ओळखले जाते. नटराजनचे वडील साडीचे दुकानात रोजंदारीवर काम करणारे मजूर तर आई एक छोटसं चहाचं दुकान चालवते. घरची प्रचंड गरीबी. दोन भाऊ आणि तीन बहिणी अशी ही पाच भावंडं. दहा वर्षापूर्वीपर्यंत नटराजन त्याच्या आईला चहाच्या दुकानात मदत करत होता. दोन वेळेस खाण्याचा संघर्ष करणाऱ्या नटराजननं वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत क्रिकेटचे स्टेडीयम पाहिलेही नव्हते. भारतामधल्या कोणत्याही गल्लीत चालणारे टेनिस बॉल क्रिकेट हेच त्याचे विश्व. 

नटराजनच्या बॉलिंगची गावच्या क्रिकेटमध्ये जोरदार चर्चा होती. टेनीस बॉल क्रिकेटमध्ये तो सातत्याने दमदार कामगिरी करत होता. त्याचवेळी नटराजनने जयप्रकाश या स्थानिक क्लब टीमच्या कॅप्टनचे लक्ष वेधून घेतलं.  मुळचे चिन्नापम्पट्टीचे जयप्रकाश चेन्नईत स्थायिक झाले होते. नटराजनच्या बॉलिंगचं पाणी जयप्रकाश यांनी सर्वप्रथम जोखलं. त्यांनीच त्याला चेन्नईत पुढील प्रशिक्षणासाठी नेले. नटराजन तामिळनाडू क्रिकेट बोर्डाच्या चतुर्थ श्रेणी लीगमध्ये बीएसएनएलच्या टीमकडून खेळू लागला. या लीगमध्ये त्याने सर्वांना प्रभावित केले. त्यामधून त्याची 'विजय क्लब' या बड्या टीममध्ये निवड झाली. नटराजनच्या क्रिकेट करियरचा हा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर 2015 साली तो तामिळनाडूच्या टीममध्ये निवडला गेला.

रणजी टीममध्ये निवड आणि सर्वात मोठा धक्का!

कोलकाताच्या जगप्रसिद्ध इडन गार्डन मैदानात बंगालविरुद्ध त्याने रणजी पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्ये त्याची बॉलिंग ॲक्शन वादात सापडली. त्याच्या करियरला हा फार मोठा ब्रेक होता. त्यामुळे तो पुढची दीड वर्ष राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरचे क्रिकेट खेळू शकला नाही. तामिळनाडू क्रिकेट ॲकडमीचे प्रमुख आणि रवीचंद्रन अश्विनचे सुरवातीचे कोच सुनील सुब्रमण्यम यांनी नटराजनला या खडतर काळातून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत केली. सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली नटराजननं फक्त बॉलिंग ॲक्शन बदलली नाही तर यॉर्कर आणखी घोटीव केले. नटराजन दीड वर्षांनी पुन्हा तामिळनाडूच्या रणजी टीममध्ये परतला. त्या हंगामात 24 विकेट्स घेत त्याने राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं. 

सहा बॉलवर सहा यॉर्कर !!!

तामिळनाडू प्रीमियर लीग ( टीएनपीएल) या स्पर्धेला त्याच काळात सुरुवात झाली. नटराजनला डिंडीगूल ड्रॅगन्स या टीमनं करारबद्ध केलं. या स्पर्धेतल्या एका सुपर ओव्हरमध्ये अभिनव मुकुंद आणि वॉशिंग्टन सुंदर ही दिग्गज जोडी नटराजनसमोर होती. नटराजननं त्या ओव्हरमध्ये सलग सहा यॉर्कर टाकले! यॉर्करवर हुकमी प्रभुत्व असलेल्या नटराजननं आयपीएल फ्रँचायझींचं लक्ष स्वत:कडं वेधलं. 2017 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याची मुळ किंमत ही 10 लाख रुपये होती. त्यापेक्षा तब्बल तीस पट अधिक म्हणजेच तीन कोटी रुपये मोजून त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं खरेदी केलं !!! पंजाब, कोलकाता, चेन्नई, दिल्ली या आयपीएल टीममध्ये त्याला खरेदी करण्यासाठी जोरदार चुरस रंगली होती.

 ....म्हणून जर्सीवर जेपी नाव

किंग्ज इलेव्हन पंजाबनं त्यांच्या धरसोड वृत्तीनुसार नटराजनला पुढे  मुक्त केलं. त्याचा सनरायझर्सच्या टीममध्ये समावेश झाला. विसाव्या वर्षापर्यंत क्रिकेटचं अधिकृत मैदानही न पाहिलेला हा मुलगा आज भुवनेश्वर कुमार आणि रशीद खान या दोन दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून बॉलिंग करतोय. दिल्लीविरुद्ध मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हुकमी यॉर्कर टाकून स्टॉयनीसला आऊट करत टीमला स्पर्धेतल्या पहिल्या विजयाचं दार उघडून दिलं. या आयपीएलमध्ये त्याच्या जर्सीवर जेपीनट्टू हे नाव आपल्याला दिसतं. नटराजनला क्रिकेटमध्ये पहिला ब्रेक देणारे गुरु जयप्रकाश यांच्या नावातील जेपी हे आद्याक्षर आहे. या कृतीमधून नटराजन जयप्रकाश यांनी आजवर केलेल्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करतोय. एकेकाळी क्रिकेमध्ये करियरचं स्वप्न पाहणाऱ्या जयप्रकाश यांचं नाव त्यांच्या शिष्यानं आज क्रिकेटच्या जागतिक प्लॅटफॉर्मवर नेलं आहे.



गोष्ट इथेच संपत नाही....

नटराजनची गोष्ट इथेच संपत नाही. नटराजननं परिस्थितीशी झगडत यश मिळवलं. स्वत:ला क्रिकेटच्या मोठ्या लेव्हलवर सिद्ध केलं. तो स्वत: मोठा झाला पण तो तिथेच थांबला नाही. चिन्नापम्पट्टीच्या मुलांनी क्रिकेटमध्ये मोठं व्हावं यासाठी तो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करतोय. 

नटराजनच्याच गावचा जी. पेरियास्वामी हा तरुण मुलगा घरच्या गरीबीमुळे क्रिकेट सोडणार होता. नटराजन त्याच्या घरी गेला. क्रिकेटमध्ये करियर करता येतं, क्रिकेटमुळे खाण्याची भ्रांत मिटते हे त्याने पेरियास्वामीला आणि त्याच्या पालकांना समजावून सांगितले. त्याला उत्तम क्रिकेट प्रशिक्षण मिळावे यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली. पेरियास्वामीची टीएनपीएलच्या 'चेपॉक सुपर गिल्स' या टीममध्ये निवड झाली. टीएनपीएलच्या मागच्या वर्षीच्या फायनलमध्ये चेपॉकच्या टीमला 127 रन्सचे संरक्षण करायचे होते. पेरियास्वामीने 15 रन्समध्ये पाच विकेट्स घेत टीमला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. टीएनपीएलच्या एका हंगामात सर्वात जास्त 21 विकेट्स घेण्याचा विक्रमही पेरियास्वामीने मागच्या वर्षी केला आहे. आयुष्यातील खडतर परिस्थीतीमध्ये पेरियास्वामीवर विश्वास दाखवणाऱ्या त्याच्या पाठी ठाम उभा असलेला नटराजन हा या यशाचा शिल्पकार आहे.

नटराजननं आज गावात क्रिकेट कोचिंग ॲकडमी उभारलीय. त्यामध्ये शिकणाऱ्या मुलांना क्रिकेटचे साहित्य देण्यापासूनचा खर्च तो करतो. टीएनपीएल, आयपीएल किंवा अन्य क्रिकेट स्पर्धेत मिळवलेल्या पैशांची त्याने यात गुंतवणूक केलीय. विजय शंकरसह तामिळनाडूचे काही क्रिकेटपटू त्याला या कामात मदत करतायत. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस' शी काही वर्षांपूर्वी बोलताना नटराजन म्हणाला होता, 'मला या पैशांमधून बहिणींचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्या शिकल्या, त्यांची प्रगती झाली तर होणारा आनंद हा घरात एखादी फॅन्सी कार घेतल्याच्या आनंदापेक्षा मोठा असेल.'   

 सभोवतालच्या सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यशस्वी होणारी प्रत्येक व्यक्ती ही मोठी असते. स्वत:चा संघर्ष सुरु असतानाच स्वत:सोबत आपल्या सभोवतालची माणसं मोठी व्हावी यासाठी झटणारी व्यक्ती या मोठ्या लोकांमध्येही वेगळी असतात. तामिळनाडूतल्या चिन्नापम्पट्टी गावच्या 29 वर्षांच्या टी. नटराजन गोष्ट यामुळेच वेगळी आहे. आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे.  

Tuesday, September 1, 2020

सर्वज्ञ राजकारणी


राजकारणी दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार लोकांमधून पुढे आलेल्या राजकारण्यांचा असतो. वेगवेगळे जन आंदोलन, प्रत्यक्ष निवडणुका या मार्फत त्यांची राजकीय कारकीर्द घडते. त्यांचा लोकमतावर मोठा प्रभाव असतो. दुसऱ्या गटातले राजकारण्यांना दिवाणखाण्यातील राजकारणी असं म्हणता येईल. या राजकारण्यांकडे जन आंदोलानाचं प्रमुखपद नसतं. त्यांना मोठा जनाधार नसतो. तरीही ते राजकारणात यशस्वी होतात. कारण, पक्ष किंवा सरकार चालवण्यासाठी असलेले कौशल्य, वेगवेगळ्या नियमांची माहिती, विरोधी पक्षाला सोबत नेण्याची कला त्यांच्याकडे असते. त्यामुळे ते अनेकदा त्यांच्या पक्षाचे किंवा सरकारचे संकटमोचक असतात. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे दुसऱ्या गटातले राजकारणी होते.

ज्येष्ठ काँग्रेस नेते व्ही. के. कृष्ण मेनन यांच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख ते माजी राष्ट्रपती असा त्यांचा पाच दशकांचा राजकीय प्रवास होता. इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी अशा वेगवेगळ्या पंतप्रधानांसोबत त्यांनी जवळून काम केले होते.

मुखर्जी यांना आपल्या जबाबदारीची जाणीव नेहमी होती. यामुळे २०११ साली हे सरदारजी देश चालवू शकणार नाहीतअसे एका पार्टीत बोलणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराला त्यांनी तिथेच खडसावले होते. (1) माजी राष्ट्रपतींची मुलाखत घेताना त्यांना आवाज चढवून प्रश्न विचारणाऱ्या एका बड्या टेलिव्हिजन अँकरला तिथल्या तिथे झापणाऱ्या प्रणवदांचा एक व्हिडिओ चांगलाच प्रसिद्ध आहे.

 

प्रणव मुखर्जी यांच्यातले गूण हेरुन त्यांना दिल्लीमध्ये आणण्याचे श्रेय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आहे. इंदिरा गांधी यांनी १९६९ साली वयाच्या ३३ व्या वर्षी मुखर्जींना राज्यसभा खासदार केले. त्यानंतर लवकरच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. आणिबाणीच्या काळात ते इंदिराजींच्या पाठी भक्कम उभे होते. ते केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांच्याच स्वाक्षरीने डॉ. मनमोहन सिंग यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

इंदिरा गांधीच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी पंतप्रधान होतील असा अनेकांचा अंदाज होता. काँग्रेस पक्षाने त्यावेळी राजकारणात नवखे असलेले इंदिरा गांधी यांचे पूत्र राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड केली. १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांना दणदणीत बहुमत मिळाले. त्यांनी प्रणवदांकडे दुर्लक्ष केले. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. याच मतभेदातून १९८६ साली प्रणवदांनी काँग्रेस सोडली. त्यांनी 'राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस' या नावाची स्वत:ची वेगळी चूल मांडली. त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. ते तीन वर्षात १९८९ साली काँग्रेसमध्ये परतले.

राजीव गांधी प्रमाणे सोनिया गांधी यांचाही कदाचित प्रणवदांवर संपूर्ण विश्वास नसावा. त्यामुळेच २००४ साली सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कुशल राजकारणी प्रणवदांची पंतप्रधानपदी निवड केली नाही. वास्ताविक सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्यात प्रणव मुखर्जी यांचा मोठा वाटा होता.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात प्रणवदा मंत्री झाले. अर्थ, संरक्षण, परराष्ट्र अशी वेगवेगळी महत्वाची पदं त्यांनी सांभाळली, पण PM त्यांच्या नावाचे अद्याक्षर असलेल्या पंतप्रधानपदाने त्यांना नेहमी हुलकावणी दिली. प्रणवदांनी याबाबत कधीही जाहीर नाराजी व्यक्त न करता काम केले. केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून अमेरिकेसोबतच्या अणुकरारात त्यांची महत्वाची भूमिका होती. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून ब्रिटीश टेलिकॉम कंपनी व्होडाफोनला करचुकवेगिरी प्रकरणात पूर्वलक्षी प्रभावाने २३ हजार कोटींचा कर आकारणीचा त्यांचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. यासाठी आयकर कायद्यातही सुधारणा करण्यात त्यांनी हा पुढाकार घेतला. भारतात येऊ पाहणाऱ्या परदेशी गुंतवणुकदारांनाही या निर्णयामधून अत्यंत चुकीचा संदेश गेला. भारताच्या कोणत्याही अर्थमंत्र्यांनी घेतलेला तो सर्वात चुकीचा निर्णय होता.

प्रणवदांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते. त्यामुळेच डावे पक्ष, तृणमुल काँग्रेस आणि शिवसेना अशा वेगवेगळ्या ध्रुवावर असलेल्या पक्षांनी राष्ट्रपती पदासाठी त्यांना पाठिंबा मिळाला. सर्वपक्षीय पाठिंब्यातून तयार झालेले वातावरण आणि राजकीय दबाव यामुळेच सोनिया गांधी यांनी त्यांना २०१२ साली राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. प्रणवदा राष्ट्रपती झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या मंत्रिगटाचे प्रणवदा प्रमुख होते. प्रशासकीय निर्णय किंवा राजकीय प्रसंग अशा सर्व प्रकारात त्यांची भक्कम ढाल युपीए सरकाराच्या बचावासाठी पुढे होते. प्रणवदा राष्ट्रपती झाल्यावर युपीए सरकारचं हे संरक्षण संपले. सरकारवरील धोरण लकवाचा आरोप अधिक तीव्र झाला. पुढे २०१४ साली देशात सत्तांतर घडले.

संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये घालवलेले प्रणव मुखर्जी राष्ट्रपती आणि 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा देत सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान अशी काहीशी अवघडलेली परिस्थिती २०१४ मध्ये होती. प्रणवदांनी घटनात्मक जबाबदारीचं भान राखत ही परिस्थिती हातळली. पंतप्रधानांच्या, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अधिकारावर कधीही अतिक्रमण केले नाही. 'गुजरातमधून दिल्लीत आल्यानंतर येथील कारभाराचे वडिलकीच्या नात्याने अनेक धडे प्रणवदांनी आपल्याला दिले' अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात.

राज्यसभेत बहुमत नसल्याने मोदी सरकारने वारंवार काढलेले वटहूकूम, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा वादग्रस्त निर्णय अशा प्रत्येक प्रसंगी प्रणवदांनी सरकारच्या आदेशावर सही केली. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संघर्षाचे उदाहरणं अनेक आहेत, असाच राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात संघर्ष प्रणवदांनी कधीही होऊ दिला नाही. केंद्र सरकारचे अंतिम उत्तरदायीत्व जनतेशी असते, याची त्यांना जाणीव होती. प्रगल्भ राजकीय समज आणि व्यावहारिक ज्ञान यांच्याशी त्यांनी कधीही फारकत घेतली नाही.

प्रणवदांनी राष्ट्रपती भवनाला अधिक लोकाभिमुख केले. स्वीय सहायकाच्या मध्यस्थीशिवाय मोबाईलवर उपलब्ध असलेले ते कदाचित देशाचे एकमेव राष्ट्रपती असावे. (1) राष्ट्रपतीपदावरुन निवृत्त झाल्यानंतर लगेच CitiznMukherjee या ट्विटर हँडलच्या माध्यमातून एक सामान्य नागरिक म्हणून ते शेवटपर्यंत सर्वांच्या संपर्कात होते.

वैचारिक विरोधकांवर कायमस्वरुपी फुली न मारण्याचा सुसंस्कृतपणा प्रणवदांकडे होता. राष्ट्रपतीपदावरुन निवृत्त झाल्यानंतर नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिले. त्यांच्या या निर्णायवर काँग्रेस पक्षातून मोठी टीका झाली. अगदी प्रणवदांच्या मुलीनेही या निर्णायवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ( 3 ) प्रणवदा या सर्व दबावाला बळी न पडता रा.स्व. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. 

प्रणवदांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल २०१९ साली त्यांचा भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मागील दोन दशकात जिवंतपणी भारतरत्न पुरस्कार मिळालेले ते अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतरचे दुसरेच राजकारणी होते. प्रणवदांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षाची सेवा केली. 'भारतरत्न पुरस्कार प्रदान कार्यक्रम' या प्रणवदांच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या प्रसंगाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वात वरिष्ठ नेते अनुपस्थित होते. (4)

प्रणवदा आता काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या एकूण कारकीर्दीचे यापुढे अनेकांकडून वेगवेगळ्या पातळीवर मुल्यमापन होईल. हे मुल्यमापन करत असताना प्रीतीश नंदी यांनी १९८६ साली प्रणवदा यांचे केलेल्या वर्णनाशिवाय कुणालाही पुढे जाता येणार नाही. प्रीतीश नंदी यांनी प्रणवदांचे 'The Man Who Knew Too Much' असे वर्णन केले होते. प्रचंड माहिती असणारे 'सर्वज्ञ राजकारणी' म्हणून प्रणवदा यापुढे ओळखले जातील.

संदर्भ

  1. Pranab Mukherjee — ‘man who knew too much’ but was a Rahul Dravid-like 'wall' for Congress
  2. Pranab Mukherjee's daughter unhappy with his decision to attend RSS event
  3. Rahul, Sonia Gandhi Skip Pranab Mukherjee's Bharat Ratna Event

 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...