Monday, September 12, 2011

दहशतवाद विरोधी लढाई आणि अमेरिका


अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदा या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याला आता दहा वर्षे झालीत. 2001 पूर्वीही या जगात दहशतवादी हल्ले झाले. मात्र त्याचे बहुतेक उद्देश हे स्थानिक होते. एखादी राजवट उलथवून टाकणे,  तत्कालीन घटनेचा बदला घेणे किंवा एखादा प्रदेश बळकावणे हाच या दहशतवादी हल्लायांचा उद्देश होता. मात्र 9/11 च्या हल्ला हा ख-या अर्थाने जागतिक स्वरुपाचा होता.

                  सौदी अरेबिया तसेच वेगवेगळ्या मुस्लीम देशांत अमेरिका करत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात ओसामा बिन लादेन या कडव्या दहशतवाद्यांने आपल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या माध्यामातून ( ज्या संघटनेत पाकव्याप्त काश्मिर पासून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान. सौदी अरेबिया, येमेन यासह काही आशियाई आणि आफ्रिकन दहशतवाद्यांचा समावेश होता. ) थेट अमेरिकेवर हल्ला चढवला. 20 व्या शतकात अमेरिकेनं अनेक युद्ध खेळली. मात्र पर्ल हर्बरवर वर जपानने केलेल्या हल्ल्याचा अपवाद सोडल्यास अमेरिकन भूमीला प्रत्यक्ष युद्धाची झळ बसली नव्हती. त्यामुळे 21 व्या शतकाच्या सुरुवातीला थेट अमेरिकेच्या गंडस्थळावर झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते. त्या काळातील अमेरिक अध्यक्ष जॉर्ज बूश आणि इतर नेत्यांची वक्तव्य वाचली तर अमेरिकेचा या हल्ल्यानं सपशेल गोँधळ उडाला होता हे सहज लक्षात येते.

               अमेरिकेच्या साम्राज्याला आव्हान देणा-या या हल्ल्याचा बदला अमेरिकेनं अगदी त्यांच्या स्टाईलने घेतला.  प्रथम अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. तालिबाननांना अफगाणिस्तानच्या बाहेर हुसकावून लावण्यात अमेरिका तेंव्हा तरी यशस्वी झाली. हाच युद्धज्वर कायम ठेवत बूश प्रशासनाने इराकवर हल्ला चढवला. इराकमधली सद्दाम राजवट संपुष्टात आली. सद्दाम हुसेनला प्रथम पकडण्यात आणि नंतर फासावर लटकवण्यात अमेरिकेला यश आलं. याच वर्षी मे महिन्यात ओसामा बिन लादेनला ठार मारुन अमेरिकेनं दहशतवाद विरोधी लढ्यातला एक मोठा टप्पा पार केलाय. अफगाणिस्तान आणि इराक जिंकले, सद्दाम आणि ओसामाला ठार मारले तरीही अमेरिकेला या  लढाईत निर्णायक यश आलेले नाही.

             दहशतवादाला मदत करणा-या प्रत्येक शक्तीविरुद्ध, देशांविरुद्ध अमेरिका युद्ध पुकारत आहे. असं दहा वर्षांपूर्वी जॉर्ज बूश यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यांच हे युद्ध अफगाणिस्तान, इराक आणि काही अंशी पाकिस्तान इतपतचं मर्यादीत राहिलं.  इराण, सीरिया, लेबनॉन, पॅलिस्टाईन या देशातूनही  दहशतवाद्यांना पाठिंबा मागच्या दशकात मिळतचं राहिला. मात्र त्या देशांविरुद्ध अमेरिकेनं कोणतीही लष्करी कारवाई केली नाही.

             अमेरिकेविरुद्धच्या युद्धात  आपण जिंकणार नाही याची खात्री ओसामाला नक्कीच होती. मात्र अमेरिकन नागरिकांना अस्वस्थ करण्यात, अफगाणिस्तान, इराक यासारख्या मुस्लीमबहुल देशात अमेरिकेला युद्ध लढायला लावण्यात तो यशस्वी झालाय.या युद्धामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला, दोन हजार पेक्षा जास्त अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांचे सैनिक मारले गेले तरीही अमेरिकेला इराक आणि अफगाणिस्तानवर निर्णायक यश मिळवता आलेलं नाही. या वर्षाखेरिस अमेरिेकेचे सैन्य इराकमधून बाहेर पडेल त्यानंतर इराकमध्ये  यादवी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच 2014 मध्ये  नाटोच्या सैन्यानी  अफगाणिस्तानमधून आपले समान पॅक केल्यानंतर तिथली लोकशाही राजवट कितपत तग धरु शकेल ?

        शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेसमोर सोव्हियत रशिया हा एक ठोस शत्रू होता. सोव्हित रशिया आणि सोव्हियत संघराज्यातील राष्ट्रे अशा आघाडीविरुद्ध लढयाचे आहे याची माहिती होती. मात्र या दहशतवाद विरोधी लढाईत तसे नाही. या लढाईत नेमका शत्रू कोण हे अमेरिकेला अजूनही ठरवता आलेलं नाही. ही दहशतवाद विरोधातली लढाई आहे असे जॉर्ज बूश यांनी जाहीर केलं होतं. इस्लामी दहशतावाद्यांनी अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेणे आणि संभाव्य हल्ल्यापासून अमेरिकेचे रक्षण करणे हा अमेरिकेचा उद्देश होता. परवा सद्दाम हुसेन आणि इराक  काल ओसाम बिन लादेन आणि अलकायदा अमेरिकेचे या लढाईतले  शत्रू होते. हे शत्रू तर मारले गेलेत. मात्र तरीही अमेरिकेचे भय संपलेले नाही. हमास, हिजबूल्लाह आणि इराण हे अमेरिकेचे जूने शत्रू हे 9/11 पेक्षा आज अधिक सशक्त झालेत. हमासचे गाझा पट्टीवरचे वर्चस्व कायम आहे. येत्या निवडणुकीतही पुन्हा एकदा हमास जिंकण्याची शक्यता आहे.  हिजबूल्लाहचे लेबॉनॉनवरची पकड आणखी घट्ट झालीय. तर अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणनं आपली लष्करी शक्ती वाढवलीय इराण बहुधा अण्वस्त्र सज्जही झालाय.

         या जुन्या शत्रूंबरोबरच आणखी एका  शत्रूची चिंता आता अमेरिकेला करावी लागणार आहे ती म्हणजे पाकिस्तान. गेल्या 60 वर्षात अमेरिकेच्या मदतीवर आपले अर्थकारण चालवणा-या देशातली बहुस्ंख्य जनता आज अमेरिकेच्या विरोधात आहे. 20 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला पाकिस्तान आज जागतिक दहशतवादाचे नंदनवन आहे. संपूर्ण जगभरात चाललेल्या दहशतवादी कारवायांचे कोणते ना कोणते कनेक्शन पाकिस्तानशी जोडलेले असते. अस्थिर सरकार, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था, राजकीय महत्वकांक्षा असलेले लष्कर, आणि जिहादी कारवाई करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेली धर्मांध जनता ही जागतिक विद्धवंसाला कारणीभूत ठरु शकेल अशी सूपीक परिस्थिती पाकिस्तानात आहे.

           त्यामुळे आज 9/11 ऩंतर दहा वर्षांनी कदाचित अमेरिकेचा भूभाग अधिक सुरक्षित झाला असेल. मात्र ज्या पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाई भागात अमेरिका ही लढाई लढत आहे त्या ठिकाणी अमेरिकेची परिस्थिती अधिकच अवघड होऊन बसलीय. जगातली एकमेव महासत्ता होण्याच्या महत्वकांक्षेनं झपाटलेल्या अमेरिकेसाठी ही परिस्थिती नक्कीच अभिमानास्पपद नाही. आपल्या स्वार्थासाठी राजकीय रंगमंचावर वाटेल तशी टोपी फिरवणे आणि अगदी कोणत्याही स्तराला जाण्याची नेहमीच तयारी असणा-या अमेरिकेच्या आजवरच्या धोरणामुळेच या देशावर ही परिस्थिती ओढवली आहे.

                संकट आली की त्यामधून उसळी मारयची आणि आपल्या शक्तीशाली सामर्थ्यानं जगाचे डोळे दिपून टाकयचे हा अमेरिकेचा आजवरचा इतिहास आहे. 19 व्या शतकातील अमेरिकन यादवी, 1929 ची महामंदी, दुसरे महायुद्ध, कोल्ड वॉर यासारख्या प्रत्येक घटनांमध्ये ह्या 'ग्रेट अमेरिकन पॉवर' चे दर्शन जगाला झाले आहे. आता आपल्या पल्लेदार भाषणांमधून Yes We Can चा नारा देत अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले बराक ओबामा पुन्हा एकदा या 'ग्रेट अमेरिकन पॉवर' चे दर्शन जगाला घडवून देतात का हा खरा प्रश्न आहे.
          

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...