Wednesday, June 24, 2009

कब तक धोनी ?


विरुद्ध दक्षिण अफ्रिका 12 बॉल 5.

विरुद्ध वेस्टइंडिज 23 बॉल 11

आणि इंग्लंडविरुद्ध जवळपास 10 च्या सरासरीने विजय आवश्यक असताना 20 चेंडूत 30 धावा

ह्या कोणत्याही सामान्य भारतीय खेळाडूच्या धावा नाहीत.किंबहूना तो एखादा सामान्य खेळाडू असता तर पराभवाचे खापर त्याच्यावर फोडून तो केंव्हाच संघाच्या बाहेर गेला असता...ही भारतीय संघाचा

सूपरकूल ( !) कर्णधार महेंद्रसिंग धोनीची T-20 विश्वचषकातल्या शेवटच्या तीन सामन्यातील धावसंख्या.

वेस्ट इंडिज,दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या तीन देशांविरुद्ध भारताने या स्पर्धेत सूपर एटचे तीन सामने खेळले.उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला यापैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक होते.मात्र सर्व सामन्यात भारत पराभूत झाला.गत विजेता भारतीय संघ या स्पर्धेत उपांत्य फेरीतही पोचू शकला नाही.भारताच्या या अधोगतीची अनेक कारणे आहेत..परंतु एक कर्णधार आणि त्याचबरोबर एक फलंदाज म्हणून कर्णधार धोनीचा हरवलेला फॉर्म हे भारताच्या अपयशाचे सर्वात मुख्य कारण मानवे लागेल.

काही व्यक्ती ह्या खरेच नशीबवान असतात. मुख्यमंत्री म्हणून नाकार्तेपणे काम करुनही विलासराव देशमुख केंद्रीय मंत्री बनतात.नौशादचे संगीत,महंमद रफीचा आवाज, आणि चांगल्या बॅनरचे चित्रपटाच्या जोरावर राजेंद्रकुमार सारख्या सामान्य कलाकाराचे अनेक चित्रपट हे गोल्डन ज्यूबली ठरतात.त्याच प्रमाणे महेंद्र सिंग धोनीसारखा एक सामान्य खेळाडू भारतीय संघाचा नुसता कर्णधार बनत नाही तर एक प्रचंड यशस्वी कर्णधार असल्याचा अभास निर्माण करण्यास यशस्वी ठरतो.

2007 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी स्पर्धेत बाद झाला.या स्पर्धेत भारत बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्घ पराभूत झाल होता. या दोन्ही मॅचमध्ये धोनी भोपळाही फोडू शकलेला नाही. ही माहिती आता कुणालाच आठवत नसली तरी ती खरी आहे. श्रीलंकेविरुद्ध भोपळा न फोडणारा धोनी भारतीय संघाचा कर्णधार आहे.तर या मॅचमध्ये सर्वात जास्त 60 धावा काढणा-या राहुल द्रविडला मात्र पद्धतशीरपणे भारतीय वनडे संघातून वगळण्यात आलंय.धोनीचं महात्म पटवून देण्यासाठी T-20 चा नेहमी गवगवा केला जातो. धोनीचा T-20 चा स्ट्रायक रेट आहे 101.68 . याच संघातला गोलंदाज हरभजन सिंगचा स्ट्रायक रेट आहे 105.55 तर झहीर खानचा आहे 133.33.एवढंच काय तर ज्यांच्यावर कसोटी खेळाडू असा शिक्का सा-या जगाने टाकलाय अशा राहुल द्रविड (121.21) आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण ( 102.67 ) यांचाही देशांतर्गत T-20 मध्ये स्ट्रायक रेट धोनीपेक्षा जास्त आहे.

या T-20 विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या मर्यादेचे पितळ उघडे पडले.या स्पर्धेत सेहवाग नव्हता.त्यामुळे रोहीत शर्माला सलामीला यावे लागले.अशा परिस्थितीमध्ये एक फिनीशर म्हणून धोनीनं युवराजसह भूमिका बजावायला हवी होती.मात्र संपूर्ण स्पर्धेत त्याला बॅंटींग ऑर्डर लावताच आली नाही.रैनाचा 3 क्रमांक काही कारण नसताना सुरवातीला काढून घेण्यात आला.वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या रटाळ खेळामुळे भारत 170 च्या एवजी 150 च धावा करु शकला.युवराज सिंग ,युसूफ पठाण या फॉर्मातल्या फटकेबाज खेळाडूंना बढती त्याने दिली नाही.फॉर्मातल्या खेळाडूंना खेळण्यास कमी बॉल मिळाले.धोनी,जडेजा सारख्या खेळाडूंनी अधिक बॉल वाया घालवत बॉल आणि धावा यांचे गणित पार बिघडवून टाकले.धोनीच्या खराब निर्णयामुळेच आपण वेस्ट इंडिज आणि इंग्लंडकडून पराभूत झालो.

कर्णधाराचा खेळ हा संघातल्या सहका-यांचा उत्साह वाढवणारा हवा.1999 च्या विश्वचषकात स्टीव्ह वॉचे दक्षिण अफ्रिके विरुद्धचे जिगरबाज शतक, रिकी पॉंटीगची 2007 मधल्या फायनल मधील घणाणती खेळी एवढं काय तर 1983 मधील कपिल देवच्या अजरामर 175 धावा कोण विसरु शकेल.T-20 विश्वचषक दुस-यांदा जिंकण्यासाठी धोनीकडूनही अशाच एखाद्या अविस्मरणीय खेळीची आवश्यकता होती.मात्र जो फलंदाज बांगलादेश सारख्या दुबळ्या टिम विरुद्धही 21 बॉल मध्ये अवघ्या 26 धावा काढतो तो संघाला एकहाती विजय कसा मिळवूण देणार ? इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या दहा ओव्हर्स धोनी मैदानात होता.तरही भारत मॅच जिंकू शकला नाही अथवा मॅचवर काही काळतरी वर्चस्व मिळवू शकला नाही.एका कर्णधारासाठी यापेक्षा नामुष्कीची बाब दुसरी काय असू शकते ?

मैदानाबाहेरचे हे त्याचे वागणे हल्ली पार बदललंय.मागील T-20 विश्वचषकानंतर 'मर्यादा पुरुषोत्तम ' असं त्याचं वर्णन काही जणांनी केलं होतं. सेहवागचं दुखापत प्रकरण त्यानं ज्या प्रकारे हाताळलं ते संशय वाढवणारेच आहे.द्रविड आणि गांगुलीला काही कारण नसताना एकदिवसीय संघातून त्याच्याच दबावामुळे वगळण्य़ात आले.हे आता ओपन सिक्रेट आहे.आपली दुखापत लपवून विश्वचषक खेळणा-या खेळाडूतही तो आहे.एवढचं काय तर पद्मश्री सारखा राष्ट्रीय पुरस्कार न स्विकारता शुटींग करणाराही हाच मर्यादा पुरुषोत्तम आहे.

2011 साली भारतीय उपखंडात 50 ओव्हर्सचा विश्वचषक होतोय.आडव्या बॅटने खेळून T-20 कपही जिंकता येत नाही.हे यंदा सिद्ध झालंय.आगामी विश्वचषकात भारताला मधल्या फळीत एक भरवशाचा फिनीशर हवा आहे.युवराज,रोहीत,रैनाच्या बरोबरीने खेळणारा सर्व फटक्यांची रेंज असणारा खेळाडू मधल्या फळीत फिट्ट बसू शकतो.दिनेश कार्तिक ने मागील काही स्पर्धेत याची झलक दाखवली आहे.एक यष्टीरक्षक म्हणूनही तो धोनी पेक्षा सरस आहे.2011 चा विश्वचषक जिंकायचा असेल तर काही धाडसी बदल हे करावेच लागतील. या बदलाची सुरवात धोनीला पर्याय कोण ? ह्या प्रश्नाच्या उत्तराने करण्यास हवी.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...