Tuesday, June 21, 2011

सोमालियन चाचे - समुद्रातील लुटारू



अमक्या देशाचे जहाज पळवले, तमक्या देशाच्या नागरिकांना ओलिस ठेवले. यासारख्या बातम्या मागच्या काही वर्षांत आपण सर्वांनी वाचलेच आहेत. या बातम्यांचा बहुतेक केंद्रबिंदू असतो तो अरबी समुद्रातले एडनचे आखात, आणि या बातमीमागील गुन्हेगार असतात ते सोमालियन चाचे.जगात आजही सर्वात मोठा व्यापार हा समुद्रमार्गे चालतो. त्यातच सोमालियाच्या उत्तरेला आणि येमेनच्या दक्षिणेला पसरलेले एडनचे आखात हे सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्वाचे आहे.अरबी समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणा-या या  या आखातात जगातल्या सर्वच प्रमुख देशांची जहाजं सतत ये-जा करत असतात. एडनचे हेच आखात सोमालियन चाच्यांचे नंदनवन आहे.

कोण आहेत सोमालियन चाचे ?

  सोमालिया आफ्रिका खंडातला एक अत्यंत गरीब देश. जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार या देशातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांची रोजची मिळकत ही 2 डॉलरपेक्षा कमी आहे. गेल्या 20 वर्षात सतत सुरु असलेल्या यादवी युद्धामुळे या देशाची राजकीय आणि आर्थिक व्यवस्था ही मोडकळीस आलीय. जगातले एक Failed Nation म्हणून सोमालियाची ओळख आहे. शिक्षण आणि रोजगाराची बोंब असलेल्या या देशात नागरिक हे चाचेगिरीकडे वळाले. जहाजाचे अपहरण करणे, त्यातील कर्मचा-यांना ओलिस ठेवणे, माल रोखून धरणे आणि त्याच्या सुटकेसाठी जहाज कंपन्या किंवा संबधित देशांकडून मोठी खंडणी वसूल करणे हाच अनेक सोमालियन नागरिकांचा मुख्य व्यवसाय बनला आहे.

  अर्थात ह्या चाचेगिरीच्या व्यवसायाला एक स्थानिक आणि भावनिक कारणही आहे. सोमालियाच्या मासेमारी उद्योगाला पूर्वी पाश्चात्य देशांकडून मदत मिळत असे. मात्र राजकीय अस्थिरतेमुळे ही मदत देणं या देशांनी बंद केले. सोमालियात मध्यवर्ती सरकार नसल्यामुळे या देशाला लागून असलेल्या समुद्रावरही कुणाचेचं नियंत्रण नाही. याचच फायदा सागरी व्यपार करणा-या काही स्वार्थी घटकांनी घेतला त्यांनी सोमालियातील सागरी संपत्तीची लूट सुरु केली. परकीय मदत बंद पडल्यामुळे आलेली बेकारी आणि परकीय शक्तींकडून देशाच्या सागरी संपत्तीची होत असलेल्या लुटीमुळे संतप्त झालेले अनेक सोमालियन मासेमार चाचेगिरीकडे वळाले.  आपल्या सागरी संपत्तीचे रक्षण करणारे शूर शिपाई अशीच या चाच्यांची सोमालियातील नागरिकांमध्ये ओळख आहे. त्यामुळे या चाच्यांना स्थानिक सोमालियन जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे.

        चाच्यांचे नेटवर्क ---

      अनेक सोमालियन मासेमार आपले छोटे छोटे ग्रुप तयार करुन चाचेगिरी करत असतात. सुरुवातीला वैयक्तिक पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर असलेली ही गुन्हेगारी संघटित बनली आहे. चाचेगिरीमध्ये मिळणारा झटपट पैसा पाहुन या व्यवसायात संघटितपणे काम करणा-या अनेक टोळ्या आता सोमालिया आणि परिसरात सक्रीय झाल्या आहेत.
     या गुन्हेगारी टोळ्यांमध्येही सोमालियाचा स्थानिक मासेमार हाच सर्वात महत्वाचा घटक असतो. एडनच्या आखाताचे त्याला तळहाताप्रमाणे असलेली माहिती तसेच त्याचे सागरी कौशल्य याचा मोठा उपयोग या गुन्हेगारी टोळ्यांना होता. त्याचप्रमाणे माजी लष्करी अधिकारीही या टोळ्यांमध्ये सक्रीय असल्याचं आढळलं आहे. सोमालियन सरकारमधील भ्रष्ट अधिकारी तसेच सौदी अरेबिया, केनिया या सारख्या देशांमध्ये असलेले सोमालियन नागरिकांची मोठी मदत या चाच्यांना मिळते. एडनच्या आखातामध्ये आलेले जहाज, त्याचा जहाजाची समुद्रातील स्थिती त्यामधील माल तसेच त्यामधील कर्मचा-यांची संख्या याची माहिती हे सर्वजण सोमालियन चाच्यांना देत असतात.

जहाज लुटण्याची पद्धत

अशा छोट्या बोटींचा वापर जहाजाचे अपहरण करण्यासाठी केला जातो.
   एडनच्या आखातामध्ये खोल समुद्रामध्ये सोमालियन चाचे बहुधा जहाज लुटतात. जहाज लुटण्याच्या या कारवाईचे नियंत्रण  मदरशिपमधून केलं जातं. ही मदरशिप जी मुख्य ठिकाणापासून बरीच दुर असते. दोन तीन लहान बोटींच्या साह्याने सोमालियन चाचे ज्या जहाजाचे अपहरण करण्याचे आहे त्या जहाजाला घेरतात. छोटी रॉकेट लॉंचर, हॅंड ग्रेनेड या सारख्या शस्त्रांचा वापर या चाच्यांकडून केला जातो. साहसी दर्यावदी असलेले हे चाचे ज्या बोटीचे अपहरण करावयाचे आहे त्या जहाजामध्ये चढतात. जहाजात चढल्यानंतर बोटीच्या मुख्य भागावर ताबा मिळवणे हे त्यांचे मुख्य लक्ष्य असतं. हा ताबा एकदा मिळाला की   त्या जहाजाचे अपहरण झाले हे निश्चित होतं.

  या सर्व अपहरण नाट्याचे नियंत्रण मदरशिपमधून केले जाते. मदरशिपमध्ये असलेले  मुख्य दहशतवाद्यांच्या हातामध्ये या सर्व दहशतवादी कारवाईचा रिमोट कंट्रोल असतो. जहाजाचे अपहरण झाल्यानंतर संबधित जहाज कंपनी अथवा देशाशी बोलणी करण्याचे तसेच जहाज सोडण्यासाठी खंडणी उकाळण्याचे काम  हे मदरशिपमधील  मुख्य दहशतवाद्यांकडून केले जाते.

चाचेगिरीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम -

         खंडणी उकळणे हाच सोमालियन चाच्यांचा मुख्य उद्देश आहे. 2010 या वर्षात सोमालियन चाच्यांना खंडणीमधून 238 दशलक्ष डॉलरची कमाई झाली असावी असा अंदाज आहे. या पैशामुळे अनेक सोमालियन चाचे गबर झाली आहेत. दारिद्र्य आणि उपासमारी पाचवीला पुजलेल्या या देशात या चाच्यांचे जीवनमान हे विकसीत देशातील नागरिकांच्या तोडीचे आहे. सोमालियन किनापपट्टीच्या परिसरात या चाच्यांनी आपली छोटी शहरं वसवली आहेत. या शहरात पाश्चात्य जगातल्या सर्व ऐहिक सुख-सोयी उपलब्ध आहेत. सोमालियन  मासेमारांनी चाचेगिरी सुरु केल्यानंतर त्यांच्या जीवनमानात झालेला फरक सामन्य सोमालियन नागरिकांना आश्चर्यचकीत करणारा आहे. त्यामुळे झटपट श्रीमंतीच्या मोहापायी अनेक सोमालियन तरुण आता चाचेगिरीकडे वळू लागले आहेत. त्याचप्रमाणे सोमालियन चाच्यांच्या दहशतीमुळे पाश्चात्य देशांकडून सोमालियन सागरी संपत्तीची होत असलेली लुट आता जवळपास थांबली आहे. त्याचा फायदा सोमालिया, येमेन आणि केनिया या देशातल्या मासेमारांना होतोय. त्यांचे मासेमारीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

         समुद्री चाच्यांचे वाढते गट त्यांच्यातील स्पर्धा यामुळे या परिसरात शस्त्र-अस्त्रांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इथियोपिया तसेच काही आफ्रिकनं राष्ट्रांकडून शस्त्रांची मोठी तस्करी या परिसरात केली जाते. एडनच्या आखातपासून जवळचं असलेल्या इजिप्तलाही याचा फटका बसलाय. सोमालियन चाच्यांच्या दहशतीमुळे इजिप्तमधल्या जगप्रसिद्ध सुएझ कालव्यातून होणारी जलवाहतूकही रोडावली आहे.

सोमालियन चाच्यांवरील कारवाई ---

                सोमालियन चाच्यांकडून होत असलेले आर्थिक नुकसान तसेच या चाच्यांमध्ये अल-कायदा सारखे दहशतवादी गट सक्रीय झाल्यामुळे जागतिक शांततेला निर्माण झालेला धोका याची दखल संयुक्त राष्ट्राने गंभीरपणे घेतली आहे. अमेरिकाच्या नेतत्वाखाली नाटोच्या सदस्य राष्ट्रांनी तसेच भारतासारख्या नाटोशी संबधित नसलेल्या राष्ट्रानेही सोमालियन चाच्यांच्या विरोधात अभियान सुरु केले आहे. असे असले तरी एडनच्या आखाताची व्याप्ती आणि  या परिसरातून होत असलेली जहाजांची मोठ्या प्रमाणावर वाहतुक यामुळे हा परिसर सोमालियन चाच्यांचा उपद्रवापासून संपूर्णपणे मुक्त करणे या देशांना जमलेले नाही. युद्धनौका तसेच हेलिकॉप्टरची मदत असल्याशिवाय सोमालियन चाच्यांवर ताबडतोब कारवाई करणे अवघड आहे.

भारतीय नौदलाचा पराक्रम --
आयएएनएस तबर या भारतीय युद्धनौकेनं केलेल्या
कारवाईमध्ये नष्ट झालेली
चाच्यांची मदरशिप

 एडनच्या आखातामध्ये भारतीय नौदालानं आपल्या पराक्रमानं सोनेरी पानं लिहले आहे. भारतीय नौदलाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर एडनच्या आखातामध्ये अनेक भारतीय तसेच परदेशी जहाजांचे यशस्वी संरक्षण केले आहे. 18 नोव्हेंबर 2008 या दिवशी भारताच्या 'आयएएनएस तबर ' या लढाऊ जहाजाने सोमालियन चाचेचे 'मदर शिप 'च बुडवले. भारतीय नौदालानं केलेल्या या कारवाईमध्ये 20 पेक्षा जास्त सोमालियन चाचे मारले गेले. एवढेच नाही तर अगदी अलिकडे म्हणजे मार्च 2011 मध्ये भारतीय नौदालानं केलेल्या कारवाईमध्ये 61 सोमालियन चाच्यांना पकडण्यात भारतीय नौदलाला यश आलं. अमेरिका. ब्रिटन या सारख्या शक्तीशाली देशांना हेवा वाटावा अशी कामगिरी भारतीय नौदलाने केली आहे.

समुद्रावर कोणत्याही देशांचा कायदा चालत नाही. त्यामुळे या चाच्यांना शिक्षा देण्यात अडचणी येतात. या अडचणीवरही भारतीय नौदलाने मात केली आहे. भारतीय सत्र न्यायालयाने सोमालियन चाच्यांना सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायालयाची ही शिक्षा उच्च न्यायालयानेही कायम ठेवली आहे. भारतामधील या केस स्टडीचा आधार घेत जगभरातल्या नौदलाने आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल केला आहे. सोमालियन चाच्यांसाठी कर्दनकाळ असलेल्या भारतीय नौदलानं अनेकदा अमेरिकन व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याचे काम केले आहे.  भारतीय नौदलाची ही कामगिरी प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने ताठ करणारी आहे !

    समारोप --

        सोमालियातील राजकीय अस्थिरता हेच या परिस्थितीचे मुख्य कारण आहे. गेल्या 20 वर्षात या देशानं सरकार नामक यंत्रणा पाहिलेली नाही. त्यामुळे या चाच्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सोमालियात लोकशाहीवादी सरकार सत्तेवर येईल आणि हे सरकार स्थिर असेल याची खबरदारी जागतिक समुदायानं घ्यायला हवी.
        सोमालियन सागरी संपत्तीची पाश्चात्य देशांकडून होत असलेली अनिर्बंध लुट पाहूनचं अनेक सोमालियन मासेमार चाचेगिरीकडे वळाले. त्यामुळे सोमालियन आखाताला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहणे पाश्चात्य देशांनी थांबवले पाहिजे.
    सोमालियन चाच्यांमध्ये अल-कायदाने नेटवर्क तयार केले आहे अशी माहिती यापूर्वी अनेकदा उघड झालीय. ओसामा-बिन -लादेनच्या खातम्यानंतर निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीचा फायदा उचलण्याची संधी आता आहे. अल-कायदाला समर्थन करणा-या गटाचे आव्हान मोडून काढण्याची संधी आता आहे. जागतिक शांततेला आव्हान निर्माण कराणारा हा धोका लवकारात लवकर नाहीसा होणे आवश्यक आहे.
       सर्वात महत्वाचे म्हणजे सोमालियन नागरिक चाचेगिरीकडे वळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी सोमालियात विकासकामं होणं आवश्यक आहे. जागतिक शांततेची जबाबदारी वाहणा-या अमेरिका आणि इतर देशांनी सोमालियामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील. तेथील नागरिकांना रोजगार मिळेल. भूकबळी, दारिद्र्य, उपासमार पाचवीला पुजलेल्या या देशाचा कायपालट होईल यासाठी जागतिक समुदायानं तातडीनं पाऊले उचलणं आवश्यक आहे. सोमालियातील रिकामे हात चाचेगिरीकडे वळू नये यासाठी त्यांना समर्थ पर्याय निर्माण करण्याची जबादारी संयुक्त राष्ट्रावर आहे.

      शांततेला आव्हान देणा-या आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणा-या सोमालियन चाच्यां समस्यावर 'रामबाण' उपाय करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.



टीप -- हा ब्लॉग लिहण्यासाठी Piracy in Somalia  ह्या विषयावरचे विकीपिडीयावरचे लेख तसेच माझे मित्र श्रीयुत अमित जोशी यांच्याशी केलेल्या चर्चेची मोठी मदत झाली आहे. 





Tuesday, June 14, 2011

गरज प्रबळ विरोधी पक्षाची




अण्णा हजारे आणि बाबा रामदेव या दोन व्यक्तींनी सध्या संपूर्ण देशाचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. काही जण त्यांचे विरोधक आहेत तर काही समर्थक... काहींना या आंदोलनातून दुसरी क्रांती होईल असा विश्वास वाटतोय. तर काही जण ही निव्वळ स्टंटबाजी आहे असा दावा करतायत. तुम्ही त्यांचे समर्थक असाल अथवा विरोधक एक गोष्ट खरी आहे की आज या देशातला व्यक्ती या दोघांच्या हलचालींकडे दुर्लक्ष करु शकत नाहीय. मागच्या दोन महिन्यात या दोन नेत्यांनी केंद्र सरकार बद्दल देशात वाढत चाललेल्या 'असंतोषाचे जनक' होण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अण्णा आणि बाबांच्या या आंदोलनाला किती यश मिळणार  हे येणा-या काळात स्पष्ट होईल. मात्र  देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या सुमार कामगिरीमुळेच त्यांना भारतीय जनतेच्या असंतोषाचे अवकाश व्यापता आलं आहे.

            गेल्या दोन वर्षात या देशात अनेक अस्वस्थ करणा-या घटना घडतायत. वाढती महागाई, घोटाळ्यांची देशावर आदळलेली त्सुनामी, आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानला एकटे पाडण्यात सरकारला आलेले अपयश अशा न संपणा-या प्रश्नांवर केंद्र सरकारची निष्प्रभता सिद्ध झालीय. असं असूनही हे मुद्दे कॅच करण्यात या मुद्द्यांवर सरकारला कोंडित पकडण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरतायत. 2G स्पेकट्रम घोटाळ्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेली JPC  वगळता अलिकडच्या काळात कोणतही मोठं यश विरोधी पक्षांना मिळालेलं नाही.

                    प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सरकारला पर्याय देणे ही भाजपाची नैसर्गिक जबाबदारी आहे. मात्र 2009 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजुनही हा पक्ष पूर्णपणे बाहेर आलेला नाही. या पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण  अडवाणींनी आता बहुधा मानसिक  निवृत्ती घेतली आहे. मात्र दुस-या फळीतील नेते अजुनही पक्ष चालवण्यात समर्थ नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने वयाच्या 84 व्या वर्षी भाजपचा गाडा चालवावा लागत आहे.

   प्रमुख विरोधी पक्ष नेत्या असलेल्या सुषमा  स्वराज यांचे संसदेतील कार्य जबरदस्त आहे. पण संसदेबाहेर कधी वादग्रस्त मुलाखत, कधी ट्विटरबाजी तर कधी राजघाटावरील नाच यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. दुसरे विरोधीपक्ष नेते अरुण जेटली आपल्या सडेतोड युक्तिवादांसाठी आणि कुशल वादविवादासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची टेलिव्हजनवरची सडेतोड चर्चा न चुकता पाहणारा फारच थोडा वर्ग हा मतदान करण्याचे कष्ट घेतो. मासबेस नसलेले जेटली प्रबळ विरोधी पक्षनेता होणे जवळपास अशक्य आहे.

                भाजपच्या सध्याच्या नेत्यांमध्ये केवळ नरेंद्र मोदी ह्या एकाच नेत्याकडून पक्षाला भविष्यात मोठ्या आशा बाळगता येतील. गुजराथमधील व्होट बॅंक एकहाती सांभळणारे मोदी हे अत्यंत कार्यक्षम प्रशासक आहेत. हे त्यांचा कट्टर विरोधक ही मान्य करेल. मात्र 2002 च्या जखमा अजुनही त्यांना पुसता आलेल्या नाहीत. त्यामुळे आघाडी सरकारच्या या युगात मोदींचे नेतृत्व मान्य होणे शक्य नाही. त्यामुळेच 90 च्या दशकामध्ये वाजपेंयी विरुद्ध कोण ? अशी कॉंग्रेसकडो वारंवार विचारणा करणा-या भाजपला अजुनही 2014 च्या निवडणुकीत आपला नेता कोण असेल हे ठरवता आलेलं नाही.
    युपीए सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये डाव्या पक्षांनी विरोधी पक्षाचे कार्य केले होते. आता त्यांचाही शक्तीपात झालाय. लोकसभा निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडाला . इतकचं नाही तर 34 वर्षांपासून  त्यांचा अभेद्य असलेला बंगालचा गड ही यंदा कोसळलाय. 2006 मध्ये  बंगाल विधानसभेच्या 235 जागा जिंकणा-या डाव्या पक्षांना 2011 मध्ये अवघ्या 61 जागा जिंकता आल्या आहेत. प्रकाश करात यांच्याकडे नेतृत्व आल्यापासून डाव्या आघाडीची प्रत्येक निवडणुकीतील कामगिरीही दिवसोंदिवस 'डावी' होत चाललीय.

    प्रमुख विरोधी पक्षांच्या याच दुर्बलतेचा फायदा अण्णा हजारे आणि बाबा रामदेव या सारख्या दबाव गटांना मिळतोय. झारखंडमध्ये शिबू सोरेनला पाठिंबा देणा-या आणि कर्नाटकमध्ये येदीयुराप्पांना कायम ठेवणा-या भाजपने भ्रष्टाचारावर कितीही आंदोलनं केली तरी ही आंदोलन सामन्य जनतेला अपील होऊ शकणार नाहीत.भाजपच्या याच अपयशामुळे अण्णा हजारेंसारख्या एका खेडूत व्यक्तीने देशाच्या राजधानीत सुरु केलेल्या आंदोलनाला मोठा जनाधार मिळू शकला. 

         काळा पैसाच्या मुद्यावरही तेच. परदेशी बॅंकामध्ये दडलेला काळा पैसा परत आणू, अशी घोषणा 2009 च्या निवडणुक प्रचारात लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती. भाजपच्या जाहीरनाम्यातही या मुद्याचा समावेश होता. असं असलं तरी हा मुद्दा नंतरच्या काळात भाजपने फारसा लावून धरला नाही किंवा केंद्र सरकारनेही फारसा गांभिर्याने घेतला नाही. आपल्याकडे असलेल्या व्यापक संघटनेच्या आधारावर या मुद्यावर दे्शातल्या वेगवेगळ्या विचारवंताना एकत्र आणण्यामध्ये भाजपला अपयश आले. भ्रष्टाचार आणि काळा पैसा याच्याशी देशातल्या सर्वच सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचा संबध आहे. त्यामुळे काळ्या पैशाचे हे नॆटवर्क तोडण्याची इच्छा असूनही ते भाजप सहीत संपूर्ण  तोडणे टाळले का हा प्रश्न मला विचारावासा वाटतो. विरोधी पक्षाच्या याच मर्यादेचा फायदा उचलत बाब रामदेव यांनी आंदोलन केले. आता त्यांचे आंदोलन यशस्वी झाले की फसले हा वादाचा मुद्दा आहे पण काळा पैसा हा विषय सामन्यांपर्यत पोचवण्याची किमया बाबांनी केली आहे ह्याचे श्रेय बाबा रामदेव यांना द्यायलाच हवे. 

      ज्या स्थानिक आणि वर्गीय मुद्यांवर भूमिका घेणे हे राजकीय पक्षांना शक्य नसेल त्या मुद्यांवर आंदोलन करण्याची जबाबदारी ही दबाव गटांची असते. शेतकरी, शिक्षक, डॉक्टर इतकेच काय आता पत्रकारांच्याही वेगवेगळ्या संघटना आहेत. गरज असेल तेंव्हा एखाद्या प्रश्नावर आंदोलन करणे आणि तो प्रश्न संपला की माघार घेणे ही दबावगटांची भूमिका असते. लोकशाही राजवटीमध्ये अशा प्रकारचे दबावगट असणे आवश्यक आहे. मात्र अण्णा आणि बाबा यांच्या आंदोलनाचे स्वरुप पाहता त्यांना दबावगट म्हणता येणार नाही. राजकीय पक्षांनी यापूर्वी हातळलेले मुद्देच ते सध्या धसास लावण्याचे प्रयत्न करतायत. त्यांच्या या आंदोलनाला मिळत असलेले समर्थन पाहता विरोधी पक्षांची गरज काय असा प्रश्न सामन्य मतदाराला पडू शकतो.मतदारांची हिच भूमिका कायम राहिली तर आगोदरच बॅकफूटवर असलेले विरोधी पक्ष आणखी क्षीण होऊ शकतात, आणि प्रबळ विरोधी पक्षांचा अभाव हा जगातले सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून अभिमानाने मिरवणा-या भारत देशाला शोभणारे नाही.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...