Tuesday, June 21, 2011

सोमालियन चाचे - समुद्रातील लुटारू



अमक्या देशाचे जहाज पळवले, तमक्या देशाच्या नागरिकांना ओलिस ठेवले. यासारख्या बातम्या मागच्या काही वर्षांत आपण सर्वांनी वाचलेच आहेत. या बातम्यांचा बहुतेक केंद्रबिंदू असतो तो अरबी समुद्रातले एडनचे आखात, आणि या बातमीमागील गुन्हेगार असतात ते सोमालियन चाचे.जगात आजही सर्वात मोठा व्यापार हा समुद्रमार्गे चालतो. त्यातच सोमालियाच्या उत्तरेला आणि येमेनच्या दक्षिणेला पसरलेले एडनचे आखात हे सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्वाचे आहे.अरबी समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणा-या या  या आखातात जगातल्या सर्वच प्रमुख देशांची जहाजं सतत ये-जा करत असतात. एडनचे हेच आखात सोमालियन चाच्यांचे नंदनवन आहे.

कोण आहेत सोमालियन चाचे ?

  सोमालिया आफ्रिका खंडातला एक अत्यंत गरीब देश. जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार या देशातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांची रोजची मिळकत ही 2 डॉलरपेक्षा कमी आहे. गेल्या 20 वर्षात सतत सुरु असलेल्या यादवी युद्धामुळे या देशाची राजकीय आणि आर्थिक व्यवस्था ही मोडकळीस आलीय. जगातले एक Failed Nation म्हणून सोमालियाची ओळख आहे. शिक्षण आणि रोजगाराची बोंब असलेल्या या देशात नागरिक हे चाचेगिरीकडे वळाले. जहाजाचे अपहरण करणे, त्यातील कर्मचा-यांना ओलिस ठेवणे, माल रोखून धरणे आणि त्याच्या सुटकेसाठी जहाज कंपन्या किंवा संबधित देशांकडून मोठी खंडणी वसूल करणे हाच अनेक सोमालियन नागरिकांचा मुख्य व्यवसाय बनला आहे.

  अर्थात ह्या चाचेगिरीच्या व्यवसायाला एक स्थानिक आणि भावनिक कारणही आहे. सोमालियाच्या मासेमारी उद्योगाला पूर्वी पाश्चात्य देशांकडून मदत मिळत असे. मात्र राजकीय अस्थिरतेमुळे ही मदत देणं या देशांनी बंद केले. सोमालियात मध्यवर्ती सरकार नसल्यामुळे या देशाला लागून असलेल्या समुद्रावरही कुणाचेचं नियंत्रण नाही. याचच फायदा सागरी व्यपार करणा-या काही स्वार्थी घटकांनी घेतला त्यांनी सोमालियातील सागरी संपत्तीची लूट सुरु केली. परकीय मदत बंद पडल्यामुळे आलेली बेकारी आणि परकीय शक्तींकडून देशाच्या सागरी संपत्तीची होत असलेल्या लुटीमुळे संतप्त झालेले अनेक सोमालियन मासेमार चाचेगिरीकडे वळाले.  आपल्या सागरी संपत्तीचे रक्षण करणारे शूर शिपाई अशीच या चाच्यांची सोमालियातील नागरिकांमध्ये ओळख आहे. त्यामुळे या चाच्यांना स्थानिक सोमालियन जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे.

        चाच्यांचे नेटवर्क ---

      अनेक सोमालियन मासेमार आपले छोटे छोटे ग्रुप तयार करुन चाचेगिरी करत असतात. सुरुवातीला वैयक्तिक पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर असलेली ही गुन्हेगारी संघटित बनली आहे. चाचेगिरीमध्ये मिळणारा झटपट पैसा पाहुन या व्यवसायात संघटितपणे काम करणा-या अनेक टोळ्या आता सोमालिया आणि परिसरात सक्रीय झाल्या आहेत.
     या गुन्हेगारी टोळ्यांमध्येही सोमालियाचा स्थानिक मासेमार हाच सर्वात महत्वाचा घटक असतो. एडनच्या आखाताचे त्याला तळहाताप्रमाणे असलेली माहिती तसेच त्याचे सागरी कौशल्य याचा मोठा उपयोग या गुन्हेगारी टोळ्यांना होता. त्याचप्रमाणे माजी लष्करी अधिकारीही या टोळ्यांमध्ये सक्रीय असल्याचं आढळलं आहे. सोमालियन सरकारमधील भ्रष्ट अधिकारी तसेच सौदी अरेबिया, केनिया या सारख्या देशांमध्ये असलेले सोमालियन नागरिकांची मोठी मदत या चाच्यांना मिळते. एडनच्या आखातामध्ये आलेले जहाज, त्याचा जहाजाची समुद्रातील स्थिती त्यामधील माल तसेच त्यामधील कर्मचा-यांची संख्या याची माहिती हे सर्वजण सोमालियन चाच्यांना देत असतात.

जहाज लुटण्याची पद्धत

अशा छोट्या बोटींचा वापर जहाजाचे अपहरण करण्यासाठी केला जातो.
   एडनच्या आखातामध्ये खोल समुद्रामध्ये सोमालियन चाचे बहुधा जहाज लुटतात. जहाज लुटण्याच्या या कारवाईचे नियंत्रण  मदरशिपमधून केलं जातं. ही मदरशिप जी मुख्य ठिकाणापासून बरीच दुर असते. दोन तीन लहान बोटींच्या साह्याने सोमालियन चाचे ज्या जहाजाचे अपहरण करण्याचे आहे त्या जहाजाला घेरतात. छोटी रॉकेट लॉंचर, हॅंड ग्रेनेड या सारख्या शस्त्रांचा वापर या चाच्यांकडून केला जातो. साहसी दर्यावदी असलेले हे चाचे ज्या बोटीचे अपहरण करावयाचे आहे त्या जहाजामध्ये चढतात. जहाजात चढल्यानंतर बोटीच्या मुख्य भागावर ताबा मिळवणे हे त्यांचे मुख्य लक्ष्य असतं. हा ताबा एकदा मिळाला की   त्या जहाजाचे अपहरण झाले हे निश्चित होतं.

  या सर्व अपहरण नाट्याचे नियंत्रण मदरशिपमधून केले जाते. मदरशिपमध्ये असलेले  मुख्य दहशतवाद्यांच्या हातामध्ये या सर्व दहशतवादी कारवाईचा रिमोट कंट्रोल असतो. जहाजाचे अपहरण झाल्यानंतर संबधित जहाज कंपनी अथवा देशाशी बोलणी करण्याचे तसेच जहाज सोडण्यासाठी खंडणी उकाळण्याचे काम  हे मदरशिपमधील  मुख्य दहशतवाद्यांकडून केले जाते.

चाचेगिरीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम -

         खंडणी उकळणे हाच सोमालियन चाच्यांचा मुख्य उद्देश आहे. 2010 या वर्षात सोमालियन चाच्यांना खंडणीमधून 238 दशलक्ष डॉलरची कमाई झाली असावी असा अंदाज आहे. या पैशामुळे अनेक सोमालियन चाचे गबर झाली आहेत. दारिद्र्य आणि उपासमारी पाचवीला पुजलेल्या या देशात या चाच्यांचे जीवनमान हे विकसीत देशातील नागरिकांच्या तोडीचे आहे. सोमालियन किनापपट्टीच्या परिसरात या चाच्यांनी आपली छोटी शहरं वसवली आहेत. या शहरात पाश्चात्य जगातल्या सर्व ऐहिक सुख-सोयी उपलब्ध आहेत. सोमालियन  मासेमारांनी चाचेगिरी सुरु केल्यानंतर त्यांच्या जीवनमानात झालेला फरक सामन्य सोमालियन नागरिकांना आश्चर्यचकीत करणारा आहे. त्यामुळे झटपट श्रीमंतीच्या मोहापायी अनेक सोमालियन तरुण आता चाचेगिरीकडे वळू लागले आहेत. त्याचप्रमाणे सोमालियन चाच्यांच्या दहशतीमुळे पाश्चात्य देशांकडून सोमालियन सागरी संपत्तीची होत असलेली लुट आता जवळपास थांबली आहे. त्याचा फायदा सोमालिया, येमेन आणि केनिया या देशातल्या मासेमारांना होतोय. त्यांचे मासेमारीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

         समुद्री चाच्यांचे वाढते गट त्यांच्यातील स्पर्धा यामुळे या परिसरात शस्त्र-अस्त्रांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इथियोपिया तसेच काही आफ्रिकनं राष्ट्रांकडून शस्त्रांची मोठी तस्करी या परिसरात केली जाते. एडनच्या आखातपासून जवळचं असलेल्या इजिप्तलाही याचा फटका बसलाय. सोमालियन चाच्यांच्या दहशतीमुळे इजिप्तमधल्या जगप्रसिद्ध सुएझ कालव्यातून होणारी जलवाहतूकही रोडावली आहे.

सोमालियन चाच्यांवरील कारवाई ---

                सोमालियन चाच्यांकडून होत असलेले आर्थिक नुकसान तसेच या चाच्यांमध्ये अल-कायदा सारखे दहशतवादी गट सक्रीय झाल्यामुळे जागतिक शांततेला निर्माण झालेला धोका याची दखल संयुक्त राष्ट्राने गंभीरपणे घेतली आहे. अमेरिकाच्या नेतत्वाखाली नाटोच्या सदस्य राष्ट्रांनी तसेच भारतासारख्या नाटोशी संबधित नसलेल्या राष्ट्रानेही सोमालियन चाच्यांच्या विरोधात अभियान सुरु केले आहे. असे असले तरी एडनच्या आखाताची व्याप्ती आणि  या परिसरातून होत असलेली जहाजांची मोठ्या प्रमाणावर वाहतुक यामुळे हा परिसर सोमालियन चाच्यांचा उपद्रवापासून संपूर्णपणे मुक्त करणे या देशांना जमलेले नाही. युद्धनौका तसेच हेलिकॉप्टरची मदत असल्याशिवाय सोमालियन चाच्यांवर ताबडतोब कारवाई करणे अवघड आहे.

भारतीय नौदलाचा पराक्रम --
आयएएनएस तबर या भारतीय युद्धनौकेनं केलेल्या
कारवाईमध्ये नष्ट झालेली
चाच्यांची मदरशिप

 एडनच्या आखातामध्ये भारतीय नौदालानं आपल्या पराक्रमानं सोनेरी पानं लिहले आहे. भारतीय नौदलाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर एडनच्या आखातामध्ये अनेक भारतीय तसेच परदेशी जहाजांचे यशस्वी संरक्षण केले आहे. 18 नोव्हेंबर 2008 या दिवशी भारताच्या 'आयएएनएस तबर ' या लढाऊ जहाजाने सोमालियन चाचेचे 'मदर शिप 'च बुडवले. भारतीय नौदालानं केलेल्या या कारवाईमध्ये 20 पेक्षा जास्त सोमालियन चाचे मारले गेले. एवढेच नाही तर अगदी अलिकडे म्हणजे मार्च 2011 मध्ये भारतीय नौदालानं केलेल्या कारवाईमध्ये 61 सोमालियन चाच्यांना पकडण्यात भारतीय नौदलाला यश आलं. अमेरिका. ब्रिटन या सारख्या शक्तीशाली देशांना हेवा वाटावा अशी कामगिरी भारतीय नौदलाने केली आहे.

समुद्रावर कोणत्याही देशांचा कायदा चालत नाही. त्यामुळे या चाच्यांना शिक्षा देण्यात अडचणी येतात. या अडचणीवरही भारतीय नौदलाने मात केली आहे. भारतीय सत्र न्यायालयाने सोमालियन चाच्यांना सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायालयाची ही शिक्षा उच्च न्यायालयानेही कायम ठेवली आहे. भारतामधील या केस स्टडीचा आधार घेत जगभरातल्या नौदलाने आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल केला आहे. सोमालियन चाच्यांसाठी कर्दनकाळ असलेल्या भारतीय नौदलानं अनेकदा अमेरिकन व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याचे काम केले आहे.  भारतीय नौदलाची ही कामगिरी प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने ताठ करणारी आहे !

    समारोप --

        सोमालियातील राजकीय अस्थिरता हेच या परिस्थितीचे मुख्य कारण आहे. गेल्या 20 वर्षात या देशानं सरकार नामक यंत्रणा पाहिलेली नाही. त्यामुळे या चाच्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सोमालियात लोकशाहीवादी सरकार सत्तेवर येईल आणि हे सरकार स्थिर असेल याची खबरदारी जागतिक समुदायानं घ्यायला हवी.
        सोमालियन सागरी संपत्तीची पाश्चात्य देशांकडून होत असलेली अनिर्बंध लुट पाहूनचं अनेक सोमालियन मासेमार चाचेगिरीकडे वळाले. त्यामुळे सोमालियन आखाताला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहणे पाश्चात्य देशांनी थांबवले पाहिजे.
    सोमालियन चाच्यांमध्ये अल-कायदाने नेटवर्क तयार केले आहे अशी माहिती यापूर्वी अनेकदा उघड झालीय. ओसामा-बिन -लादेनच्या खातम्यानंतर निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीचा फायदा उचलण्याची संधी आता आहे. अल-कायदाला समर्थन करणा-या गटाचे आव्हान मोडून काढण्याची संधी आता आहे. जागतिक शांततेला आव्हान निर्माण कराणारा हा धोका लवकारात लवकर नाहीसा होणे आवश्यक आहे.
       सर्वात महत्वाचे म्हणजे सोमालियन नागरिक चाचेगिरीकडे वळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी सोमालियात विकासकामं होणं आवश्यक आहे. जागतिक शांततेची जबाबदारी वाहणा-या अमेरिका आणि इतर देशांनी सोमालियामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील. तेथील नागरिकांना रोजगार मिळेल. भूकबळी, दारिद्र्य, उपासमार पाचवीला पुजलेल्या या देशाचा कायपालट होईल यासाठी जागतिक समुदायानं तातडीनं पाऊले उचलणं आवश्यक आहे. सोमालियातील रिकामे हात चाचेगिरीकडे वळू नये यासाठी त्यांना समर्थ पर्याय निर्माण करण्याची जबादारी संयुक्त राष्ट्रावर आहे.

      शांततेला आव्हान देणा-या आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणा-या सोमालियन चाच्यां समस्यावर 'रामबाण' उपाय करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.



टीप -- हा ब्लॉग लिहण्यासाठी Piracy in Somalia  ह्या विषयावरचे विकीपिडीयावरचे लेख तसेच माझे मित्र श्रीयुत अमित जोशी यांच्याशी केलेल्या चर्चेची मोठी मदत झाली आहे. 





7 comments:

Saranga said...

this is quite informative and we are not aware about this... please keep posting such articals...

Niranjan Welankar said...

चांगला लेख आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. जरा ऑफ बीट विषय घेतल्याबद्दल आणि तुलनेने कमी वेळेत नवीन ब्लॉग लिहिल्यामुळे छान वाटलं. एकच वाटतं, देशांतर्गत घटक, आंतरराष्ट्रीय घटक इतके साधे नसावेत, अशा अशा कारणांमुळे हे होतं असे. त्यामध्ये हजार भानगडी असतात. जग इतकं सोपं, उघड नाही. असो. पुढच्या ब्लॉगची प्रतीक्षा.

santosh gore said...

सोमालियन चाच्यांची समस्या, त्यांची निर्मिती आणि त्यांच्यावरील उपाय या सर्वच घटकांचा व्यवस्थितपणे आढावा घेण्यात आला आहे.

sham shete said...

good information ,keep it up

sham shete said...
This comment has been removed by the author.
kush said...

Informative Article. good. keep it up.

Shirish Garje said...

Good Stuff to know...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...