Tuesday, May 31, 2016

विराट लव्हस्टोरी


विराट कोहलीवर सध्या अशा फॉर्ममध्ये आहे की तुम्ही त्याला रिओ ऑलिम्पिकला पाठवलं तरी तो पदक जिंकेल. सूर्य पूर्वेला उगवतो. दिवसानंतर रात्र होते किंवा शनिवार नंतर रविवार येतो हे तितकं नियमित घडतं तितक्याच नियमितपणे तो हल्ली 50 रन्स काढतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या वर्षाच्या पहिल्या सीरिजमध्ये त्याची बॅट  तळपली. त्यानंतर ती आता आग ओकतीय. जगातल्या बहुतेक बॉलर्सना त्याचे चटके बसलेत.
एखादं टार्गेट सेट करायचं ते पूर्ण करायचं. एखादं लक्ष्य पूर्ण करणे म्हणजे यश असेल तर हे लक्ष्य सातत्यानं पूर्ण करणं अधिक पुढचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून ते लक्ष्य न चुकता न थकता पूर्ण करणे म्हणजे ग्रेटनेस आहे. पण कोहलीसाठी बहुतेक वेळा टार्गेट हे अन्य सेट करतात. आणि ते पूर्ण करण्याचा त्याचा सक्सेस रेट हा 90 टक्यांपेक्षा जास्त आहे. मोठ्या टार्गेटच्या दबावात अनेक जण खांदे टाकतात. पण विराट त्वेषानं उभा राहतो. तो भार एकटा पेलतो. त्याचा खेळ पाहताना मला अनेकदा वाटतं की त्याची दुसरी गर्लफ्रेंड नक्कीच खूप लकी असेल कारण सेकंड इनिंगमधला तो सध्याचा बेस्ट प्लेअर आहे.

. 2005 साली विराट अंडर-17 ची मॅच खेळत असताना त्याच्या टीम समोर टार्गेट होतं 370. तो मैदानावर आला तेंव्हा स्कोअर होता 4 आऊट 70 . विराटनं नाबाद 251 रन्स करत टीमला मॅच जिंकून दिली. भविष्यात केलेल्या अनेक अविस्मिरणीय धावांच्या पाठलागाचा पाया त्यावेळी रचला गेला होता. त्यानंतर तीन वर्षांनी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला.मागच्या आठ वर्षात त्याच्या खेळात रिचर्डसची ऐट, पॉटींगचा ताठा आणि सचिनचं समर्पण अनेकदा दिसलंय. पण त्याचबरोबर त्याच्या एमटीव्हीतल्या एखाद्या कार्यक्रमात वापरले जाणारे सारे शब्दही आपल्याकडं आहेत हे त्यानं नेहमी दाखवून दिलंय.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड किंवा अनिल कुंबळे यासारख्या संस्कारी खेळाडूंचा खेळ पाहून मोठ्या झालेल्या माझ्यासारख्या पिढीला विराटचं हे वागणं नवं होतं. तर माझ्या आधिच्या पिढीला त्याचा मैदानावरचा आवेश पाहून यश त्याच्या डोक्यात गेलंय असंच अनेकदा वाटलं असेल. सचिन, राहुल आणि कुंबळेच्या काळातही दादा होता. जो आक्रमकतेसाठी प्रसिद्ध होता. पण लॉर्डसवर शर्ट काढणं असो किंवा स्टिव्ह वॉला टॉससाठी ताटकळत ठेवण दादाच्या आक्रमकतेमध्ये हिशेब चुकता करण्याची रित होती. ऐरवी तो ही सभ्य खेळाडू म्हणूनच ओळखला जायचा.एखाद्या नायिकेसोबत अफेअर करुन , ते जगभर मिरवून त्यानंतर ब्रेक अप पचवूनही यशस्वी होता येतं. आपली लोकप्रियता केवळ टिकवता येत नाही तर प्रत्येक मॅचमध्ये कित्येक पटीनं वाढवता येते हा दाखवून देणारा विराट हा या देशातला पहिलाच क्रिकेटपटू आहे.

  दिल्लीमधल्या कोणत्याही पार्टीत हनी सिंगच्या गाण्यावर थिरकणाऱ्या पोरांपैकी एक, 'तू जानता नही मेरा बाप कौन है?' असं कुणालाही कधीही विचारु शकेल अशा कळपातल्या वाटणा-या विराटचा फिटनेस लाजवाब आहे. सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये सर्व प्रकारच्या परिस्थितीत सतत खेळत असूनही त्यामध्ये त्याचं शंभर टक्के योगदान आहे. त्याची फिटनेस आणि डाएटमधली टोकाची कमिटमेंट त्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते. त्यामुळेच तो 15 ओव्हर्सच्या मॅचमध्येही एका हाताला लागलेलं असतानाही सेंच्युरी झळकावू शकतो.

         सचिन तेंडुलकशी विराटची नेहमी तुलना केली जाते. क्रिकेटवेड्या देशाला विराटच्या रुपानं नवा सुपरस्टार सापडलाय. तर जाहिरातदारांना पुढची अनेक वर्ष पुरणारा ब्रँड. केवळ खेळावर नाही तर संपूर्ण देशातल्या तरुणांच्या एका पिढीवर प्रभाव टाकणारे हे दोन खेळाडू आहेत. पण त्यांची प्रभाव टाकण्याची पद्धत वेगळी आहे. सचिनचा वावर, त्याचा खेळ यामुळे तुम्ही सचिनचे भक्त बनता. अनेकांनी त्याला देवत्व बहाल केलंय. पण विराटचा खेळ तुम्हाला प्रेमात पडायला लावतो. देवाची भक्ती करायची असते. त्याचं श्रेष्ठत्व निर्विवाद मान्य करावं लागतं. पण प्रेम तुम्हाला रागवण्याचा,  प्रश्न विचारण्याचा अधिकार देतं.

  आयपीएलच्या नवव्या सिझनमध्ये कोहलीनं अनेक रेकॉर्ड तोडले. त्याचा खेळ पाहून अगदी डॉन ब्रॅडमनलाही कबरीमधून उठून, '' अरे हा माझ्यासारखा खेळतोय" असं सांगवासं वाटलं असेल. विराटला फायनलमध्ये जिंकता आलं नाही. त्यातही विशेष म्हणजे चेस करताना तो अपय़शी ठरला. त्यामुळे विराटवर प्रेम करणारे माझ्यासारखे चाहते दुखावले नक्कीच गेले. पण असं होऊ शकतं याची आम्हाला जाणीव आहे. जशी प्रेमात पडलेल्या जोडप्यांनाही शेवट शोकात्म होणार आहे याची जाणीव असते. पण त्यामुळे त्यांचं प्रेम अटत नाही. प्रेम करतानाच त्यांनी ते स्विकारलेलं असतं. सचिननं भारवून गेलेल्या देशाला विराटच्या प्रेमात पडण्याची सवय लागायला लागलीय. या विराट लव्हस्टोरीची आता तर सुरुवात झालीय.
            

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...