Sunday, April 3, 2011

स्वप्नपूर्ती !




माझ्या 28 वर्षांच्या आयुष्यात मी इतका आनंदी कधी झालो नाही. मला नोकरी लागली किंवा एखादी परीक्षा पास झाल्यावरही मला इतका आनंद कधी झाला नव्हता. जेवढा आनंद मला सध्या झालाय. होय आपली टीम विश्वविजेती बनलीय. मला संपूर्ण जगाला ओरडून सांगावासं वाटतंय.... आता आमच्या टीमला टोमणे मारण्याचे, त्यांच्यावर शेरेबाजी करण्याचे दिवस संपलेत. संपूर्ण क्रिकेट विश्व आमच्या पायाशी आलंय. तब्बल 28 वर्षानंतर त्यातही महत्वाचं म्हणजे मी जन्मल्यापासून पहिल्यांदाच भारताची टीम विश्वविजेता बनली आहे.

                 ही फक्त बॅट्समन्सची टीम आहे, सचिन-सेहवागला आऊट करा की काम संपलं, यांच्यापेक्षा ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचे गल्लीतले बॉलर्सही चांगले आहेत,   घरच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा दबाव ह्यांना पेलता येणार नाही, ही टीम फक्त जाहिराती करु शकते वर्ल्ड चॅम्पियन नाही बनू शकत. अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप, कुत्सित शेरेबाजी अनेकांनी केली. मागच्या 28 वर्षातला इतिहास पाहिला तर हे सर्व खरंही होतं. यंदा मात्र भारतीय टीमनं या सर्व टीकाकारांचे दात घशात घातलेत. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत विशेषत: बाद फेरीत  अगदी दृष्ट लावावा असा खेळ केला. साखळी फेरीत वेस्ट इंडिज,क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया, सेमी फायनलमध्ये पाकिस्तान आणि फायनलमध्ये श्रीलंका या चार माजी विश्ववेजेत्या टीमला पराभूत करुन आपली टीम विश्वविजेता बनली आहे. क्रिकेट विश्वचषक दोनदा जिंकणारी पहिली आशियाई टीम म्हणून आपल्या टीमची क्रिकेटच्या इतिहासात नोंद झालीय.

           1983 मध्ये कपिल देवच्या टीमनं विजेतेपद पटकावलं ते एक आश्चर्य होतं. कपिलच्या आर्मीवर भूतकाळाचं दडपण किंवा भविष्यकाळाचं ओझं नव्हतं. कपिलचा परीसस्पर्श लाभलेल्या या टीमनं वर्ल्ड कपच्या इतिहासातली सर्वात बलाढ्य टीम मानली जाणा-या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडिजचा पराभव करत इतिहास रचला.यंदा मात्र परिस्थिती संपूर्ण वेगळी होती. भारतीय टीम फेवरिटच्या टॅग घेऊन गेल्या वर्षभरापासून वावरत होती. सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा वर्ल्ड कप होता.त्यामुळे सचिन आणि भारतीय टीमवर मोठा मानसिक दबाव येण स्वाभाविक होतं.  121 कोटी भारतीय, प्रायोजक, भारतीय मीडिया आणि बरेच काही यांचा मोठा दबाव या टीमवर होता. या वर्ल्ड कपमध्ये क्रिकेटविश्व ख-या अर्थाने समतल होतं. भारतीय पिच आणि वातावरण यांचा आता बाकीच्या टीमना चांगलाच सराव झाला होता. लॅपटॉप क्रिकेटच्या या युगात सर्वच टीमना एकमेकांच्या शक्ती स्थानांचा तसंच कमकुवत बाजूंचा सराव होता. मात्र ह्या सर्व अथडळ्यांवर मात करत धोनीच्या या टीमनं विजेतेपद पटकावलंय. त्यामुळे याचं मोल जास्त आहे.

   

       या स्पर्धेत सेहवागनं जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्यानं बांग्लादेशविरुद्ध 175 रन्स काढले. .पाकिस्तान विरुद्ध उमर गुलवर त्यानं खास सेहवागी थाटात हल्ला चढवला. पाकिस्तान विरुद्ध भारताच्या यशाचा पाया वीरुनंच रचला. सचिननं आपला क्लास जपला  इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या चार बड्या टीमविरुद्धच्या मोठ्या मॅचमध्ये तो आपल्या लौकिकाला जागला. फायनलमध्ये तो फेल गेला. पण नो प्रॉब्लेम. गौतम गंभीरनंही फायनलमध्ये सचिन आणि सेहवाग आऊट झाल्यानंतर निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावला. भारताने T-20 विजेतेपद पटकावले त्यावेळीही फायनलमध्ये गंभीरनं सर्वात जास्त रन्स काढले होते. यंदाही त्यानं तेच केलं.सौरव गांगुलीच्या निवृत्तीनंतर एक आक्रमक सलामीवीराची कमतरता आपल्याला भासणार नाही. याची काळजी त्यानं घेतलीय. टीम इंडियाचा हा एंग्री यंग मॅन भविष्यकाळात नक्की कॅप्टन होऊ शकेल. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सेंच्युरी मारण्याची भाग्य त्याला मिळालं नाही. क्लाईव्ह लॉईड, रिचर्ड, डेव्हिड बून, अरविंद डिसल्वा, रिकी पॉन्टिंग, गिलख्रिस्ट यांच्या यादीत गौतम गंभीर हे नाव येणार नाही. म्हणून त्याच्या 97 रन्सचं महत्व कमी होणार नाही. त्याची फायनलमधली इनिंग करोड भारतीयांच्या -हदयात कायमची कोरली गेलीय.

झहीर भाई का तो क्या कहना... बॅट्समन्सच्या या टीममध्ये भारतीय बॉलिंगचा भार या पठ्यानं एकहाती वाहिला. त्यानं तब्बल 21 विकेट्स घेतल्या.भारतीय टीम अडचणीत सापडली की धोनीला झहीरची आठवण यायची. आणि झहीरनं त्याला कधीच निराश केलं नाही. धोनीला झहीरची इतकी सवय झालीय की आता आयपीएलमध्येही तो कदाचित झहीरला शोधेल. कोणतीही टीम फक्त बॅटींगच्या जोरावर जिंकू शकत नाही. बॅट्समन्सच्या आक्रमणाला बॉलर्सच्या भेदकतेचीही जोड मिळणं आवश्यक असतं. झहीरनं ही खिंड एकहाती लढवली. इंग्लंड विरुद्ध त्यानं विजयाच्या जवळ आणलं होतं. आफ्रिकेविरुद्ध त्यानं टेन्शनमध्ये 49 वी ओव्हर्स लाजवाब टाकली. कांगारुंचा पांढरी तोंड काळी केली. पाकिस्तान विरुद्ध टीमला स्टार्ट मिळवून दिला. तसंच फायनलमध्ये त्याचा पहिला स्पेल होता 5 ओव्हर्स 3 मेडन 6 रन्स आणि 1 विकेट.


 
    युवराज सिंगच्या आठवणीशिवाय हा ब्लॉग पूर्ण होऊचं शकत नाही. युवराज खेळला तरचं भारत वर्ल्ड कप जिंकेल. असं भाकित मी वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होण्याच्या एक महिना पूर्वीच केलं होतं. ( माझं फेसबूक प्रोफाईल चेक करा हवं तर ) युवराजनं मला खरं ठरवलं. एक परफेक्ट फिनिशर हा त्याचा जुना रोल त्यानं या स्पर्धेत पुन्हा एकदा वठवला.संपूर्ण स्पर्धेत भारतीय टीम चार बॉलर्सनी खेळली कारण युवराजनं पाचव्या बॉलर्सची कमतरता जाणवू दिली नाही.  1983 च्या टीममधल्या मोहिंदर अमरनाथची आठवण यावी असा त्याचा खेळ होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बॅकफूटला गेलेल्या टीम इंडियाला विजेतेपदाची गाडी पकडून दिली ती युवीनंच. हॅट्स ऑफ टू यूवी.

               आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे कॅप्टन धोनी. तो  भारतीय टीममधला माझा सर्वात नावडता खेळाडू होता. भारतीय टीमचा डॅरेन सॅमी म्हणजे धोनी असं मला नेहमी वाटायचं. संपूर्ण स्पर्धेत तो फ्लॉप गेला. इंग्लंड विरुद्ध स्ट्रॉसचा कॅच त्याला ऐकू आला नाही. फायनलमध्ये टॉसच्या वेळी संगकारा काय बोलला हे त्याला समजले नाही. त्यानं अश्विनला वारंवार वगळलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कातडी बचाव बॅटिंग केली. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध अवसानघात केला. अगदी फायनलमध्ये श्रीशांत खेळवण्याचं अफाट धाडस दाखवलं. त्याचा हा सारा भंपकपणा आता माफ आहे. भारताचा हा डॅरेन सॅमी ( सॉरी धोनी ) फायनलमध्ये अगदी  गिलख्रिस्टची आठवण यावी असा खेळला. कोहली आऊट झाल्यानंतर फॉर्मात असलेल्या युवराजला बसवून तो बॅटिंगला आला. त्यावेळी 121 कोटी भारतीयांचा दबाव त्याच्या खांद्यावर होता. या परीक्षेत तो डगमगला असता तर त्याची खैर नव्हती. त्याची कॅप्टनसी तर गेलीच असती. पण धोनी नावाचा ब्रॅन्डही इतिहासजमा झाला असता. मात्र निर्णायक क्षणी अगदी फायनल मॅचमध्ये तो आपल्या आयुष्यातली सर्वोच्च इनिंग खेळला. कॅप्टन्स नॉक म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असंत. धोनी मला क्षमा करं मी तूला आता किमान वर्षभर तरी शिव्या देणार नाही.

      2007 च्या अपेक्षाभंगानंतर भारतीय टीमनं मिळवलेलं हे विजेतेपद ऐतिहासिक आहे. मागच्या चार वर्षात या टीमनं T-20 चं विजेतेपद जिंकलं. वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली. ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये वारंवार पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेला आफ्रिकेत बरोबरीत रोखलं. टेस्टमध्ये नंबर 1 पटकावलं. आणि आता विश्ववेजेतेपद पटकावलं क्रिकेटमधल्य भारतीय युगाची ही सुरुवात झालीय. ये तो बस ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त

              

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...