Wednesday, February 25, 2009

स्लमडॉगच्या निमित्तानं


पोलीसांना त्रास देणारी वात्रट पोरं...या पोरांना पिटाळणारे ,पोलीस या पोलीसांपासून दूर पळणारे झोपडपट्टीतले मुलं..धारावीची अरुंद गल्लीबोळं आणि ठिकठिकाणी दिसाणारं घाणीचं,अस्वच्छतेचं,दारीद्र्याचं साम्राज्य...खरं तर कोणत्याही बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये सहज खपून जाईलं असं हे दृश्य. पण आज या दृश्याचा प्रचंड जयघोष केला जातोय कारण हे दृश्य आहे तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळवणा-या स्लमडॉग मिलिनिअर या चित्रपटामधलं.


मी काही चित्रपट समीक्षक नाही. एखाद्या चांगल्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं योग्य कथानकाच्या साह्यानं बनवलेला कोणताही चित्रपट मला सहज प्रभावित करु शकतो.यापूर्वी अशा अनेक चित्रपटांनी मला सहज भूरळ घातलीय.त्यामुळे स्लमडॉग मिलिनिअर पाहण्यापूर्वी या चित्रपटाबद्दलची अनेक परीक्षण मी वाचली होती.त्यामुळे हा चित्रपट एक अविस्मरणीय,मास्टरपीस,क्लासीक आणि असा आणखी बराच काही असेल..या चित्रपटाचा कालावधीत एका वेगळ्याच अनोख्या दुनियेचं वास्तववादी दर्शन मला घडेल.अशा कल्पनेत मी होतो.परंतु माझं दुर्दैव असं की माझ्या मनातले मांडे अगदी मनातच राहीले.यापैकी काहीही मला वाटलं नाही.एक चांगला परंतु असामान्य अजिबात नाही असा आणखी एक चित्रपट मी पाहिला.अशीच भावना हा चित्रपट पाहील्यानंतर माझ्या मनात उमटली.
स्लमडॉग ही संपूर्ण बॉलिवूड कथा आहे. विकास स्वरुप यांच्या मूळ कथेवर डॅनी बॉयलनं छान चित्रपट तयार केलाय.परंतु ही कथा इतकी सशक्त आहे की या कथेवर बालिवूडमधले दर्जात्मक सिनेमे बनवणारा एखादा भारतीय दिग्दर्शक याच्यापेक्षा सरस चित्रपट अगदी सहज बनवू शकला असता.अशी पैज लावण्यास मी तयार आहे.
स्लमडॉग ही जमाल आणि लतीका यांची प्रेमकथा आहे.परंतु यापेक्षा कितीतरी सरस प्रेमकथा आपल्या मुंबईत तयार झाल्या आहेत. मुस्लीम नायकाच्या आईला जातीय दंग्यामध्ये हिंदूंनी मारणे,खलनायकाच्या शक्तीवर आपल्या युक्तीनं मात करुन सहज पसार होणारे छोटे जमाल आणि सलीम...लतिकाच्या भेटीनं मुंबईत सर्व धोका पत्कारुन आलेला नायक जमाल..हे सगळे अगदी टिपीकल हिंदी फिल्मी घटक या चित्रपटामध्ये दिसतात.
जमाल आणि त्याच्या भाऊ सलीम यांचीही ही कथा आहे. या कथेमध्ये एक भाऊ चांगला आणि दूसरा गैरमार्गी असणे हा अगदी दिवार (किंवा कदाचीत त्याच्याही आधीपासून मला चित्रपटांबद्दल फारसं माहीत नाही ) सुरु असलेली प्रथा या चित्रपटामध्येही पाळण्यात आलीय.त्याचबरोबर खलप्रवृत्तीच्या भावाच्या मृत्यूला त्याचा सदाचारी भाऊच जबाबदार असणे हा फॉर्म्युला या चित्रपटातही वापरण्यात आलाय.या चित्रपटाच्या शेवटी नायकाचा विजय होतो.परंतु लगान चित्रपटाच्या शेवटी नायकाच्या यशाशी जसे प्रेक्षक एकरुप होतात. आमीर खानच्या प्रत्येक फटक्यावर जसा प्रेक्षकांमध्ये जल्लोष तसा कोणताही जल्लोष अथवा चित्रपटाशी एकरुपता या चित्रपटाशी प्रेक्षकांचा निर्माण होत नाही.
लगान,तारे जमींपर,सलाम बॉम्बे,मदर इंडिया यासारखे कित्येक सरस चित्रपट भारतामध्ये तयार झालेत.परंतू हे सर्व चित्रपट परदेशी भाषेच्या विभागात मोडतात.त्यामुळे या चित्रपटाला जगभरातल्या सर्वच तगड्या चित्रपटांशी तूलना करावी लागली.त्यामुळेच आजवर भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळू शकलेले नाही असं मला वाटतं. (अर्थात याला ऑस्करसाठी भारतीय चित्रपटाची निवड करणारी निवड समितीही तेवढीच जबाबदार आहे. दिल तो पागल है,तसंच एकलव्य सारखे चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवणा-या निवड समितीकडून कोणत्या अपेक्षा करणं हेच मुळात चूक आहे. ) त्यामुळेच ब्रिटीश निर्मात्याकडून निर्माण झालेल्या या चित्रपटाला अधिक नामांकनं मिळणं ऑस्करची निवड प्रक्रीया पाहीली तर अगदी स्वाभाविक वाटतं..थोडक्यात स्लमडॉगची इंग्रजी भाषा आणि त्याचा इंग्रजी दिग्दर्शक ही ऑस्करसाठी हा चित्रपट निवडला जाण्याची एक मोठी बलस्थाने आहेत.
स्लमडॉगच्या यशाचा अर्थ बदललेल्या जागतिक परिस्थितीमध्ये आहे. भारतानं 1991 साली खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं.त्यानंतर काही वर्षांनीच विश्वसुंदरी आणि जगत सुंदरी हे किताब भारतीय युवतीनं सतत काही वर्षे पटकावली. सोंदर्यप्रसाधनं आणि यासारख्या अनेक परदेशी उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी ह्या स्पर्धेचा या स्पर्धेतल्या विजयी सुंदरींचा अत्यंत हूशारपूर्वक वापर केला.आज अमेरिकेसह सा-या जगात मंदीच वातावरण आहे.ह्या मंदीचा मोठा फटका हॉलिवूडला बसलाय.त्यामुळे मंदीच्या या वातवरणात बॉलिवूड ह्या जगातल्या सर्वात मोठ्या फिल्म उद्योगात शिरकाव करण्यासाठी एक साधन म्हणून स्लमडॉगवर ऑस्करचा वर्षाव केला जात नाही ना असाही एक स्वाभाविक प्रश्न आहे. अमेरिका तसंच ब्रिटनचा आजवर राजकीय,सामाजिक आणि व्यापारी इतिहास पाहीला तर या प्रश्नाचं उत्तर ठामपणे नाही असं म्हणता येणार नाही.
स्लमडॉगच्या यशाचा येता जाता जयघोष करणा-या भारतीयांनी या चित्रपटाच्या निमीत्तानं निर्माण झालेल्या प्रश्नांचा शांतपणे विचार करणं आवश्यक आहे.

Wednesday, February 18, 2009

पाकिस्तान खतरेमे !


पाकिस्तान भारतामधून वेगळा झालेला देश.14 ऑगस्ट 1947 या दिवशी हा देश भारतापासून वेगळा झाला.या देशाला सुरवातीपासूनच सतत कोणत्या ना कोणत्या समस्येनं ग्रासलंय.गरीबी,गुन्हेगारी.पूर्व पाकिस्तानमधले बांगला भाषक,सिंधमधले मोहाजीर किंवा बलूची लोक..वेगगळ्या धर्म,भाषा, संस्कृती घेऊन हा देश तयार झाला.भाषेच्या मुद्यावर या देशाची 1971 साली फाळणी झाली.तरीही या देशाचे राज्यकर्ते धडा शिकले नाहीत.वेगवेगळ्या मतभेदांनी पोखरलेल्या आपल्या देशवासियांना भारताचा बागलबूवा दाखवून हे राज्यकर्ते एकत्र ठेवत.त्यावेळी त्यांचा नारा असे इस्लाम खतरेमे !
भारताला आपला कट्टर वैरी समजणारा पाकिस्तान आता संकटात पडलाय.याची कबुली दिलीय खुद्द पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी.आपला देश आता तालिबानींच्या विळख्यात सापडलाय.अशी कबुली त्यांनी दिलीय.पाकिस्तानमधल्या स्वात खो-यात सध्या तालिबानी दहशतवाद्यांचे वर्चस्व आहे.या भागात पाकिस्तान सरकारनं गुडघे टेकलेत.या प्रांतात शरीयत कायदा लागू करण्यात आलाय.
पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला हा प्रदेश तालिबानी दहशतवाद्यांचे अभयारण्य म्हणून ओळखला जातो. संपूर्ण डोंगराळ भागानं या वेढलेल्या या प्रदेशात दळणवळणाच्या सुविधा आजही अगदी प्राथमिक अवस्थेत आहेत.शिक्षण,आरोग्यच्या मुलभूत गोष्टीही या प्रदेशात पोचलेल्या नाहीत अशी माहिती वारंवार समोर येती.त्यामुळेच या प्रदेशावर नियंत्रण मिळवणं धर्मवेड्या तालिबान्यांना सोप आहे.ओसामा बिन लादेन,मुल्ला उमरसह जगातले अनेक वॉँटेड दहशतवादी याच भागात लपलेले आहेत.असा हा प्रदेश आज संपूर्णपणे पाकिस्तानच्या हातामधून निसटला आहे.
खरं तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची राजकीय वाटचाल एकाचवेळी सुरु झाली.आज 62 वर्षांनी भारतामध्ये लोकशाहीचे मुळं अगदी घट्ट रुतलीय.तर पाकिस्तान हा फाळणीच्या उंबरठ्यावर उभा आहे.अल्ला,आर्मी आणि अमेरिका हेच तीन पाकिस्तानच्या राजकारणामधले सर्वात महत्वाचे घटक राहीले आहेत.पाकिस्तानचे लष्कर हे राजकीय दृष्ट्या महत्वकांक्षी आहे.धर्माचा दूराभिमानही पाकिस्तानच्या लष्करामध्ये आढळतो.सोवियत रशियानं अफगाणिस्तवर ताबा मिळवल्यानंतर त्यांच्या विरोधात तालिबानी तरुणांना लष्करी प्रशिक्षण देणारं पाकिस्तानचं लष्करचं होतं.तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर त्या देशाला सर्वात आगोदर मान्यता दिली ती पाकिस्ताननी.पाकिस्तानचे सरकार लष्कर यांनी जो भस्मासूर आजवर पाळला तोच आता त्यांच्यावर उलटलाय.बलूचिस्तान,वायव्य सरहद प्रांत आणि सिंध या पाकिस्तानमधल्या चार पैकी तीन प्रांतमध्ये आज अस्थिरता आहे.त्यामुळे एकट्या पंजाब प्रांतमधल्या लॉबीच्या जीवावर पाकिस्तानी राज्यकरते किती
तग धरतात हा महत्वाचा प्रश्न आहे.
पाकिस्तान हा धोक्यात सापडला असल्यामुळे ख-या अर्थानं अलर्ट राहण्याची गरज भारताला आहे.पाकिस्ताममध्ये लोकशाही सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या देशातल्या भारतविरोधी शक्ती ह्या नेहमीच सक्रीय होत असतानं दिसतात.भारताशी 1000 वर्षे युद्ध करु अशी भाषा करणारे झुल्फिकार अली भूट्टो असो अथवा काश्मिरी तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देणा-या बेनझीर भूट्टो अथवा कारगील आक्रमण करणारे नवाज शरीफ..पाकिस्तानमधले कोणतेही राज्यकर्ते भारताशी लढण्याची खूमखूमी प्रत्येक राज्यकर्त्यांनी दाखवलीय.सध्याच्या झरदारी प्रशासनाच्या काळातच भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्याला सर्व प्रकारची मदत पाकिस्तानमधूनच मिळाली,आता स्वात खो-यामध्ये पाकिस्तान सरकार पराभूत झालंय.स्वात खोरे किंवा पाकिस्तानमधल्या काही प्रदेशापुरती मर्यादीत असलेली तालिबानी शक्तीचा प्रभाव आता सिंध पंजाब प्रांतमध्येही निर्माण होऊ शकतो.या दोन्ही प्रांताला लागून भारताची फार मोठी सीमा आहे.त्यामुळे तालिबानी आणि अलकायदाची ही दहशतवादी लाट भारतावरही येऊन आदळू शकते.किंबहुना ही आता भारताच्या अगदी जवळ येऊन ठेपलीय.
भारताच्या अगदी जवळ या असूरी शक्ती आल्याचे पाच परिणाम भारतावर होऊ शकतात.सर्वात पहिला म्हणजे दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता पूर्वी पेक्षा आणखी वाढू शकते..दुसरा परिणाम म्हणजे काश्मीर खो-यातल्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो.काश्मिरमधले फुटीरतावादी पक्ष आणि संघटनाना अशा शक्तींपासून मोठं बळ मिळू शकतं.याचा तीसरा परिणाम भारतामधल्या काही कट्टरवादी मुस्लीम नागरिकांवरही होऊ शतको.ह्या व्यक्ती तालिबानी विचारधारेच्या प्रभावाखाली आल्या तर त्या देशातल्या काही भागात नक्कीच आपलं उपद्रवमुल्य दाखवू शकतात.दहशतवादी शक्तींशी लढणा-या अमेरिकेला भारतामध्ये पोचण्याचा नवा महामार्ग या अतिरेकी संघटना तयार करुन देऊ शकतात. आणि पाचवा परिणाम म्हणजे या शक्तीच्या हातामध्ये पाकिस्तानची अण्वस्त्रे लागली तर त्या अण्वस्त्रांचा वापर ते भारतावरही करु शकतात.
त्यामुळेच सध्याच्या या परिस्थीतीमध्ये पाकिस्तान जात्यात असला तर भारत सूपात आहे असंच म्हणावं लागेल.पाकिस्तानी राज्यकर्ते आमि समाजव्यवस्थेमध्ये असलेल्या दोषामुळे पाकिस्तान आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या सख्या शेजा-याचं घरं जळालं तर त्याचे चटके सर्वात जास्त आपल्यालाचं बसणार..ही आग लवकर विझावी याकरता भक्कम अग्नीशामक यंत्रणा उभारण्याचं आव्हानं भारत सरकारपुढं आहे.थोडक्यात प्रत्येक भारतीयांसाठी येणारी रात्र ही वै-याची असेल.

Wednesday, February 11, 2009

भाजपची गोची


डिसेंबर-1980

स्थळ-मुंबई
जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता आपली नवीन राजकीय वाटचाल ठरवण्याकरता पूर्वीच्या जनसंघातले नेते एकत्र आले होते.आपल्या पक्षाला एक वेगळी वैचारिक बैठक आहे.त्यामुळे एक नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचं त्यांनी ठरवलं.भाजपचे पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या ओजस्वी भाषणात मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फूंकलं..या भाषणात अटलजी म्हणाले होते

'' अंधेरा हटेगा,सुरज निकलेगा और कमल खिलेगा ''
आज या घटनेला 29 वर्ष झाली आहेत. 2 खासदरांपासून सूरु झालेल्या पक्षाचा ग्राफ 183 वर जाऊन पोचला.नंतर 2004 च्या निवडणुकीत तो 134 वर घसरला.मात्र या तीन दशकातल्या देशाच्या जडणघडणीमध्ये भाजपचा वाटा मोठा आहे.हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावं लागेल.खर तर हिंदुत्व विचाराच्या राजकीय क्षेत्रातल्या प्रसाराकरता जनसंघाची स्थापना 1950 च्या दशकात करण्यात आली.भाजप हे त्याचे नंतरचे रुप.भाजपच्या या वाटचालीचे तीन टप्यात विभागणी करावी लागेल.
1980 ते 1990 हा पहिला टप्पा. भाजपच्या स्थापनेचं हे दशक. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानभूतीच्या लाटेत भाजपची संपूर्ण वाताहत झाली.अगदी अटलजी आणी अडवानीसह सारे दिग्गज नेते पराभूत झाले.एक पक्ष म्हणून खर तर हा सर्वात खडतर काळ होता.एखादा कच्च्या विचारसरणीचा पक्ष असता तर हा संपूर्ण उद्धवस्त झाला असता.परंतू भाजपचं नेतृत्व नक्कीच तसं नव्हतं.अडवाणी अटलजींच्या या टिमनं 1989 च्या निवडणुकीत भाजपला 80 च्या पूढं पोचवलं.
ह्यानंतरचा काळ हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असावा असंच मला वाटतं. कॉँग्रेसचा 1989 च्या निवडणिकीत मोठा पराभव झाला. डावे,उजवे आणि समाजवादी पक्षाच्या युतीनं (जनता पक्षाची 12 वर्षानंतरची नवीन आवृत्ती ) व्ही.पी.सिंग सरकार सत्तेवर आलं.व्ही.पी सिंग यांच्या मंडल राजकारणाला उत्तर देण्याकरता भाजपनं कमंडल राजकारण सुरु केलं असा दावा नेहमी केला जातो.मात्र मला तसं वाटत नाही.भाजपची मूळ ज्या विचारधारेत आहेत त्या संघपरिवाराच्या विचारधारेचा अभ्यास केला तर राममंदीराचा मुद्दा भाजप मेन अजेंड्यावर घेणार हे कळून येत.सांस्कृतीक राष्ट्रवाद हाच या विचारधारेचा गाभा आहे.मात्र या राष्ट्रवादाचा राजकीय फायदा साधून घेण्याचं टायमिंग अडवानी-प्रमोद महाजन यांच्या टिमनं बरोबर साधलं.रामनामाची चादर ओढून 6 डिसेंबरला आयोध्येत लाखो कारसेवक पोहचले.या कारसेवांनी बाबरी मशीद पाडली.ही मशीद पडली आणी भाजपच्या समोरचा एक मोठा विषय एका क्षणात संपला.
जी बाबरी मशीद दाखवून अनेक निवडणुका जिंकता आल्या असत्या.लाखो भोळ्या-भाबड्या हिंदु मतदारांचे मतं जिंकता आली असती ती मशीदचं पडली. या घटनेनंतर इतर राजकीय पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली.शिवसेना,अकाली दल यासारखे काही मोजके पक्ष सोडले तर भाजपला जवळ करण्यास कोणीच तयार नव्हतं. याच कारणामुळे 1996 साली अचलजींना अवघ्या 13 दिवसात सत्ता सोडावी लागली. 1996 च्या या घटनेनंतर मात्र भाजपनं आरलं धोरण पूर्णपणे बदललं असंच म्हणावं लागेल.
निवडणुक जिंकण्याची शक्यता हाच एकमेव 'राम' मंत्र भाजपनं स्वीकारला.काश्मीर साठी वेगळी घटना मागणा-या नॅशनल कॉन्फरन्स पासून ते प्रभू रामचंद्राचे कट्टर वैरी करुणानिधीपर्यंत सर्वांनाच भाजपनं पावन करुन घेतलं.पार्टी विथ डिफरन्स या पक्षाच्या प्रतिमेला इतके तडे गेली की आता ही खरचं या पक्षाची प्रतिमा आहे का असा प्रश्न आता पडतोय.एकवेळ अशी होती की भाजपचे कट्टर विरोधकही असं म्हणंत ही माणसं चांगली सदप्रवृत्त आहेत.आता भाजपचे समर्थकही खाजगीत मान्य करतात आमचे अनेक नेते भ्रष्ट आहेत.संघाच्या मुशीत तयार झालेल्या भाजप नेत्यांनीही भ्रष्टाचार केला.संरक्षण सारख्या सर्वात संवेदनशील क्षेत्रातल्या प्रकरणात लाच घेताना भाजप अध्यक्ष पकडले गेले.संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेणरे सर्वात जास्त खासदार भाजपचे होते.माणूस स्खलशील आहे.कितीही संस्कार केले तरी लोभ संपत नाहीत...हे कटू वास्तव भाजपच्या बाबतीत ही खरं आहे असंच म्हणावं लागेल.शुद्ध चारित्र्या प्रमाणे स्वदेशी आणि सुरक्षेचा जप भाजप नेहमी करतो. मात्र अगदी संसदेवर हल्ला होऊनही ' अब आरपार की लडाई होगी 'इतपतच भाजपची आक्रमकता मर्यादीत राहीली. एकेकाळी स्वदेशीचा सतत जप करणा-या या पक्षानं निर्गुंतवणूक हे नवीन मंत्रालय निर्माण केलं.अनेक फायद्यातले सरकारी उद्योग मोडीत काढले. समान नागरी कायदा आणि 370 वे कलम रद्द करणे हे मुद्दे अडचणीचे ठरतात म्हणून कार्यक्रम पत्रिकेतून वगळले गेले.राममंदिराचा जप हा फक्त निवडणुका आल्या कीच करायचा हेच बहुधा या पक्षाचं धोरणं असावं.
खर तरं एक केडर बेस असा पक्ष अशी भाजपची ओळख आहे. पक्षाच्या वाढीकरता आपल्या संपूर्ण आयुष्याचा कण कण झिजवणारे अटलजी,कुशाभाऊ ठाकरे,सुंदरसिंग भंजारी,रामभाऊ म्हाळगी या सारख्या हजारो निस्वार्थ शुद्ध चारित्र्यांच्या रक्ताच्या सिंचणातून ह्या पक्षाला आज हा पक्ष सा-या देशात फोफावलाय.
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी हेही एक कडव्या पक्ष शिस्त पाळणारे, पक्षाला नेहमी वेगळी दिशा देणारे एक चिंतनशील नेते म्हणून ओळखले जातात.भाजप आणि एनडीए सरकारनी जी अनेक महत्वाचे निर्णय घेतले या निर्णयामागचा खरा ब्रेन अडवानींचा होता.हे त्यांचा अगदी कट्टर विरोधकही मान्य करेल.टिपीकील राजकीय प्रवृत्ती नसलेल्या व्यक्तींचा पक्ष अशी भाजपची सुरवातीची ओळख होती.मात्र तीच ओळख आता पुसट होत चाललीय.कॉँग्रेसची दूसरी बाजू म्हणजे भाजप ही आता नवीन ओळख ब-याच क्षेत्रात निर्माण होऊ लागलीय.ही ओळखचं अस्वस्थ करणारी आहे.
माझे सर आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याशी मागे एकदा या विषयावर चर्चा करत असताना त्यांनी एक गोष्ट मला सांगितली होती.तीच गोष्ट हा ब्लॉग लिहताना मला पून्हा पून्हा आठवतीय. एक आस्तित आणि एक नास्तिक यांच्यात एकदा कडाक्याचा वाद झाला देव आहे की नाही यावरुन. नऊ दिवस नऊ रात्र अखंड वाद घातल्यानंतरही निर्णय लागला नाही.त्यामुळे दोघंही आपआपल्या घरी निघून गेले.नास्तिक व्यक्तीनं घरी गेल्यानंतर घरी देव्हारा स्थापन करुन त्यात देवाच्या मुर्तीची स्थापना केली.तर आस्तिक व्यक्तीनं देवासकट देव्हाराचं फेकून दिला.आपल्या मुल्यांवरचा विश्वास हरवलेल्या,नेमक्या अस्मितेचं भान विसरलेल्या त्या आस्तिक माणसानं देवासकट देव्हारा फेकून देण्याचं दृष्टांत भाजपला अगदी फिट्ट बसतो.
राष्ट्रीय राजकारणात एक विचार म्हणून एक संघटना म्हणून भाजपची जी गोची झालीय..ती गोची ही गोष्टीतल्या या आस्तिक माणसासारखीच आहे असंच मला सतत वाटतं.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...