Wednesday, July 20, 2016

एका (रचलेल्या?) उठावाची गोष्ट...



'' टर्की या देशात इस्लाम आणि लोकशाही यांचं लग्न झालंय.या लग्नातून झालेलं मुल म्हणजे धर्मनिरपेक्षता. हे मुल वेळोवेळी आजारी पडतं, त्याचा आजार किती गंभीर आहे हे लक्षात घेऊन या मुलाचे डॉक्टर म्हणजेच लष्कर योग्य ते औषध घेऊन मुलाचा जीव वाचवतात" हे वाक्य आहे टर्कीतले माजी जनरल केव्हिक बिर यांचं.    टर्कीमध्ये 1923 पासून पाच उठाव झाले आहेत. यापैकी शेवटचा उठाव हा 1997 साली झाला. या उठावातले एक प्रमुख जनरल असलेल्या केव्हिक बिर यांच्या या वाक्याची आठवण 15 जुलै 2016 या दिवशी फसलेल्या उठावाच्या निमित्तानं होणं साहजिक आहे.

       ज्या देशाची 95 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे त्या देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता याचं संरक्षण करणं ही नक्कीच खायची गोष्ट नाही. केमाल अतातुर्क यांनी आधुनिक टर्कीची भक्कम पायाभरणी केली. त्यांनी देशाचं समाजमन आणि लष्कर बदललं. त्यामुळेच लष्करानं त्यानंतरच्या काळात टर्कीत वेळोवेळी उठाव करत देशातल्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचं रक्षण केलंय. पण यंदाचा फसलेला उठाव हा वेगळा आहे. त्यामुळे साहजिकच हा सारा बनाव होता का असाच संशय निर्माण होतोय.

                   1997 मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर   सहा वर्षांनी 2003 साली इस्लामीकरणाचे  पुरस्कर्ते रिसेप तय्यिप एर्दोगान हे टर्कीचे पंतप्रधान झाले. एर्दोगान महाशय पंतप्रधान होण्याच्या चार वर्ष आधी कट्टरवादी भाषणं केल्याबद्दल जेलमध्येही जाऊन आले होते. देशातल्या शहरी आणि सुशिक्षित वर्गामध्ये एर्दोगानबद्दल कितीही नाराजी असली तरी 2003 पासून अगदी आजपर्यंत एर्दोगान हे टर्कीतल्या 'आम आदमी'मध्ये आणि टर्कीतल्या ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. अशा या भक्कम लोकप्रियतेच्या आधारावर त्यांना नवा टर्की घडवण्याची संधी इतिहासानं दिलीय. पण एर्दोगान यांना वेगळाच टर्की हवा आहे.

       ओटोमन या कट्टर इस्लामी साम्राज्याशी असलेलं नातं तोडून केमाल अतातुर्क यांनी लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष टर्की घडवला. महिलांना हिजाब पाळण्यास आणि लष्कराला दाढी ठेवण्यास त्यांनी बंदी घातली.अतातुर्क यांची छाप 20 व्या शतकातल्या टर्कीवर पडलीय. पण अतातुर्क यांच्या मार्गापेक्षा एर्दोगान यांचा मार्ग वेगळा आहे. त्यांना टर्कीचं पुन्हा ओटोमन साम्राज्याशी नातं जोडायचं आहे. त्यासाठी त्यांनी  टर्कीचं वेगानं इस्लामीकरण सुरु केलं आहे.  

        टर्की जनतेला इस्लामीकरणाच्या चादरीत गुंडाळून निरकुंश हुकूमशाह होण्याचं एर्दोगान यांचं ध्येय आता काही लपून राहिलेलं नाही. गेल्या 12 वर्षाच्या राजवटीमध्ये त्यांनी देशातल्या प्रत्येक उदारमतवादी घटकाचा आवाज दाबलाय. आता या फसलेल्या उठावानंतर तर टर्कीमध्ये इतक्या झपाट्यानं लोकांना जेलमध्ये टाकणं सुरु झालंय की उद्या एर्दोगान  पहिलीत असताना त्यांच्यासोबत डबा खायला नकार दिलेल्या मुलालाही त्यांनी या संधीचा फायदा घेत जेलमध्ये टाकलं तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही.

    गेल्या 12 वर्षाच्या एर्दोगानशाहीत टर्कीनं उलट्या दिशेनं प्रवास सुरु केलाय.  कुर्द जनतेशी 10 वर्षांच्या संघर्षानंतर 2013 साली एर्दोगान यांनी करार केला. पण या करारानंतर तर परिस्थिती आणखी बिघडली. टर्की सरकार  आणि कुर्द यांच्या ताणलेल्या संबंधांनी सध्या नवं टोक गाठलंय. आग्नेय टर्की या कुर्द बहूल भागावर टर्कीचे सुलतान असलेल्या एर्दोगान यांचं वर्चस्व नाही. कुर्द बंडखोरांवर  सर्रास गोळ्या चालवणारं टर्कीचं लष्कराचं आयसिसच्या दहशतवाद्यांबद्दल मवाळ धोरण आहे. ( कारण एर्दोगान आणि आयसिस या दोघांचेही कुर्द हे समान शत्रू आहेत ) त्यामुळे एर्दोगानशाहीतला टर्की आयसिसचा छुपा सहानभुतीदार बनलाय.

         इराक आणि सीरियानंतर आयसिसचं सर्वात मोठं भरती केंद्र हे टर्कीच आहे. आयसिसच्या दहशतवाद्यांकडून पेट्रोल विकत घेऊन त्यांच्या अर्थव्यवस्थेला फुगवण्याचं कामही एर्दोगानशाहीत झालंय. एर्दोगान यांनी सुरुवातीच्या काळात रशियाशी चांगले संबंध ठेवले पण 2015 मध्ये रशियन विमान पाडल्याच्या घटनेनंतर रशियाशी त्यांचे संबंध बिघडलेत. सीरियातून आलेल्या लाखो नागरिकांना नागरिकत्व देत एर्दोगान यांनी आपली भविष्यातली व्होटबँक भक्कम करुन ठेवलीय. 12 वर्ष पंतप्रधान असलेले एर्दोगान नुकतेच अध्यक्ष बनलेत. त्यानंतर त्यांना  घटनादुरुस्ती करत देशाची राज्यघटनाच बदलून टाकायची आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या फसलेल्या उठावाकडे पाहिलं पाहिजे.

               या उठावाला कोणताही नेता नव्हता. लष्करातल्या कोणत्याही वरिष्ठ अधिका-यानी याची जबाबदारी स्विकारली नाही. टर्कीच्या लष्कराला यापूर्वीचा बंडाचा अनुभव आहे. अशा प्रकारचे उठाव हे सारा देश झोपलेला असताना सरकारी व्यवस्था गाफिल आहे हे पाहून करायचा असतो पण या लष्कारानं रात्री 9 च्या आसपास उठावास सुरुवात केली. काय घडतंय ? कुठं घडतंय ? कसं घडतंय ? हे समजण्यापूर्वी लष्करी क्रांती होणं अपेक्षित असतं इथं मात्र प्रत्येक गोष्टीची साऱ्या देशाला माहिती मिळत होती.

या उठावाच्या दरम्यान देशातली न्यूज चॅनल, रेडिओ आणि इंटरनेट मुक्तपणे सुरु होती. कोणताही हुकूमशाह सर्वप्रथम माध्यमांचा आवाज बंद करेल. पण ही मंडळी भलतीच उदार होती. त्यामुळे अध्यक्ष एर्दोगान यांचा स्मार्ट फोनवरचा संदेश एका क्षणात देशभर पोहचला. एर्दोगान यांनी आपल्या समर्थकांना लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. एर्दोगान समर्थक रस्त्यावर उतरले. टर्कीमधल्या विरोधीपक्षांनाही जनतेचा मूड लक्षात घेत लोकशाहीच्या रक्षणासाठी एर्दोगनला पाठिंबा द्यावा लागला. ( टर्कीमधल्या मशिदीमधूनही '' लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरा '' असं आवाहन करणारा भोंगा रात्रभर वाजत होता. असं ही घटना अनुभवणाऱ्या काही मंडळींनी लिहलं आहे )

                     टर्की पार्लमेंट किंवा सरकारमधल्या कोणत्याही व्यक्तीला लष्करानं अटक केली नाही. एर्दोगान यांच्या भव्य राजवाड्यावर केवळ 16 सैनिकांना पाठवण्यात आलं होतं ज्यांना पोलिसांनी सहज ताब्यात घेतलं अशीही माहिती आता समोर येतीय. कट्यार सारखं किरकोळ शस्त्र हाती घेतलेल्या सामान्य नागरिकांनी लष्काराचे टँक ताब्यात घेतले. यापुढचा कहर म्हणजे हे सर्व बंड सुरु असताना इस्तंबूल विमानतळ बंडखोरांनी ताब्यात घेतलं अशी बातमी आली. पण त्यानंतर थोड्याच वेळात अध्यक्ष एर्दोगान यांचं विमान इस्तंबूलमध्ये सुखरुप पोहचलं.  त्यानंतर एर्दोगान यांनी इस्तंबूलमध्ये पत्रकार परिषदही घेतली !!! अंकारा आणि इस्तंबूल या दोन शहरात बंडखोरांची वळवळ दिसली. पण त्याच्या पलीकडंही देश आहे याची कोणतीही जाणीव त्यांना नव्हती. या भागात त्यांचा प्रभाव शून्य होता.

      हा उठाव सुरु झाल्यानंतर थोड्याच वेळात टर्कीतली सारी माध्यमं आणि सरकारी यंत्रणेनं या हल्ल्याचे सूत्रधार हे फेतुल्ला गुलेन हे सध्या अमेरिकेत असलेले इस्लामी धर्मगुरु आहेत असं जाहीर केलं. टर्कीमध्ये घडलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीचा सूत्रधार फेतुल्ला गुलेन आहेत हे जाहीर करण्याची रीत एर्दोगानशाहीत रुढ झालीय.
       
    एर्दोगान यांनी 12 वर्षांच्या राजवटीमध्ये लष्कराची व्यवस्था बदलून टाकलीय. आपल्याला हव्या त्या अधिकाऱ्यांना बढती दिली. नको ते बाजूला केले किंवा जेलमध्ये घातले. त्याचा फायदा त्यांना या उठावा दरम्यान झाला. या उठावात लष्कराचे केवळ कनिष्ठ दर्जाचे अधिकारी आणि सैनिकच सहभागी झाले. त्यांच्या नाराजीची माहिती बहुधा टर्कीतल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना आणि गुप्तचर यंत्रणांना असावी त्यामुळेच त्यांनी ही वाफ बाहेर येऊ दिली.

     या उठावानंतर देशाच्या लोकशाहीचा रक्षणकर्ता ही आपली इमेज जगात तयार करायला एर्दोगान यांना मदत होणार आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी आत्ताच मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम सुरु केलीय. केवळ पोलीस, लष्कर किंवा न्यायव्यवस्था नाही तर शिक्षक आणि विद्यापीठाच्या काही हजार कुलगुरुंना बडतर्फ करण्यात आलंय.  टर्कीमध्ये अचानक या सर्व जागा रिकाम्या झाल्यात. या सर्व जागांवर एर्दोगान यांना आपले समर्थक बसवणे सहज शक्य आहे.  देशांतर्गत आणिबाणी लादून अधिकाधिक शक्तींचं केंद्रीकरण आता एर्दोगान यांच्याकडे झालंय. त्यामुळे आता त्यांना अपेक्षित असलेली घटना दुरुस्ती सहज शक्य आहे.

        हा फसलेला लष्करी उठाव म्हणजे नव्या टर्कीसाठी मिळालेला दैवी संदेश आहे. असं एर्दोगान यांनी म्हंटलंय. त्यांची ही प्रतिक्रियाच 15 जुलैला झालेला सर्व प्रकार म्हणजे रचलेला उठाव होता हा समज घट्ट करणारी आहे.
              

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...