Showing posts with label Usa. Show all posts
Showing posts with label Usa. Show all posts

Sunday, September 16, 2018

एका कलामांचा बळी



 'त्यांनी माझा सर्व प्रकारे कल्पनेच्या पलिकडे छळ केला. त्यांना हवी असलेली जबानी दिली नाही तर माझी बायको, मुलांचेही असेच हाल करू. बाजूच्या रूममध्ये तुझी 84 वर्षांची आई आहे. एकतर तिला पाहण्यापूर्वी तू मरशील किंवा तुझे हाल पाहून बसलेल्या धक्याने ती मरेल.

त्यांनी चौकशी दरम्यान मला बसायला खूर्ची नाकारली. पिण्यासाठी पाणी दिले नाही. पाणी पिण्याची तुझी लायकी नाही असे त्यांचे उत्तर होते. बहुधा मी 24 तासांपेक्षा जास्त काही न खाता-पिता आणि न झोपता या सर्वांचा त्रास सहन केला. 'क्रायोजनिक'चे स्पेलिंगही ज्यांना सांगता येणार अशी ती मंडळी होती. मी त्यांना तपास अधिकारी न म्हणता गुंड म्हणेन. ते आपल्या बॉसचा आदेश पाळत होती.त्यांना आदेश देणाऱ्या व्यक्ती बड्या होत्या. ही बडी मंडळी पडद्याअडूनच सूत्रं हलवत होती '

 भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ नंबी नारायण यांचा हा स्वअनुभव आहे. मालदिवमधील दोन महिलांच्या मदतीने इस्रोचे क्रायोजनिक इंजिनचे तंत्रज्ञान पाकिस्तानला विकण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आरोपाखाली 30 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांना अटक झाली होती. बरोबर 50 दिवसांनी 19 जानेवारी 1995 रोजी नारायण यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचे 1998 मध्ये सीबीआय तपासात सिद्ध झाले. त्यानंतर  2018  साली म्हणजे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तब्बल 24 वर्षांनी नारायण यांना विनाकारण त्रास दिल्याबद्दल नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रूपये देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला दिले आहेत. तसेच या प्रकरणी तीन सदस्यांची चौकशी समितीही नेमली आहे.

संपूर्ण देशाचे वैभव असलेल्या इस्रोच्या 'टेक ऑफ' ला यामुळे अनेक वर्ष 'सेटबॅक' बसला. सर्व प्रकारच्या अडीअडचणींवर मात करत देशाला अवकाश क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी, नवी दूरसंचार क्रांती घडवत मोठ्या परकीय उत्पन्नासाठी अहोरात्र झटणाऱ्या या संस्थेतील एका महत्त्वाच्या वैज्ञानिकाला या प्रकरणात अडकलणवारी मंडळी ही निर्विवाद देशद्रोहीच मानली पाहिजेत. आपल्या  हितसंबंधांना जपण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या या मंडळींनी कलामांच्या तोलामलाच्या शास्त्रज्ञाचा बळी घेतला.

हे प्रकरण जेंव्हा उघडकीस आले ते 1994 साल हे भारतीय अवकाश संस्थेच्या इतिहासातील मोठे महत्त्वाचे साल होते. उपग्रह प्रक्षेपणासाठी आवश्यक असे क्रायोजनिक इंजिन देण्यास अमेरिकेने भारताला नकार दिला होता. अन्य देशांनीही हे तंत्रज्ञान भारताला पुरवू नये यासाठी अमेरिका सर्व प्रकारच्या दादागिरीचा वापर करत होते. त्याचवेळी नंबी नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली 2000 जणांची टीम जियो सिंक्रोनस लाँच व्हेइकल ( GSLV )  तयार करण्याच्या मिशनने झपाटले होते.

अवकाशात सुमारे 36 हजार किलोमीटर उंचीपर्यंत उपग्रह सोडणे या GSLV तंत्रज्ञानामुळे सिद्ध होणार होते. टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन ट्रांसमिशन, टेलिफोन यासारख्या आज आवश्यक बनलेल्या गोष्टींसाठी याचा उपयोग मोलाचा होता. ज्या देशाकडे हे तंत्रज्ञान आहे त्यांना यामुळे मोठे आर्थिक उत्पन्न मिळत होते. अमेरिकेला 1994 साली GSLV मुळे सुमारे 300 अब्ज अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले होते.  अमेरिकेला हे तंत्रज्ञान बनवण्यासाठी लागलेल्या खर्चाच्या एक तृतियांश रकमेत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे ध्येय नारायण यांच्या टीमने निश्चित केले होते. साहजिकच त्यामुळे भविष्यात भारताला जगभरातून मोठा आर्थिक फायदा होणार होता. भारताच्या या आर्थिक फायद्याचे गुणोत्तर प्रमाण हे अमेरिकेच्या तोट्याशी निगडीत होते.


GSLV  या प्रचंड गुंतागुंतीच्या प्रकल्पातील सर्व धाग्यांना एकत्र जोडणारे नारायण हे या बनावट हेरगिरी प्रकरणातील तपास यंत्रणांचे मुख्य टार्गेट होते. दोन हजार जणांच्या या प्रकल्पावर काम करणा-या अनेक टिमचे ते मुख्य समन्वयक होते. 'मुळावर घाव घातला की वृक्ष कोसळतो' या तत्वाचा आधार घेत त्यांनी नारायण यांना अटक केले. त्यांच्या अटकेपूर्वी स्थानिक माध्यमातून संपूर्ण विरोधी वातावरण तयार करण्यात आले. 'मल्याळम मनोरमा' या केरळमधल्या प्रमुख वर्तमानपत्राने तर मालदिवला आपली टिम पाठवून मसाला स्टोरी छापल्या.

केरळमधील पेपरमध्ये येणाऱ्या इस्रो हेरगिरीच्या सर्व स्टोरी हा तपास सीबीआयकडे जाताच एकदम बंद झाल्या. त्यावरुन ही रसद कोण पुरवत होते याचा अंदाज येऊ शकतो. ज्या दिवशी (30 नोव्हेंबर 1994) ऩारायण यांना अटक झाली त्याच दिवशी ही हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केरळ सरकारने केली. सरकारचा सीबीआयकडे केस सोपवण्याचा निर्णय झालेला होता तर नारायण यांच्या अटकेचा निर्णयही सरकारने सीबीआयवर सोपवायला हवा होता. परंतू, केरळ सरकारला ते मान्य नव्हते त्यांनी केरळ पोलीस आणि आयबीच्या 'टॉर्चर रूम' मध्ये देशासाठी आपले आयुष्य वेचणारा शास्त्रज्ञ ढकलून दिला होता.

 मालदिवच्या ज्या दोन महिलांच्या मदतीने इस्रोची टीम पाकिस्तानला हे कागदपत्र पुरवणार आहे असा आरोप आयबीने ठेवला होता यापैकी एका महिलेला जेमतेम इंग्रजी येत होते. तर दुसरी एक शब्दही इंग्रजी बोलू शकत नव्हती. आंतरराष्ट्रीय राजकाराणात भारतापेक्षा कैकपटीने दुबळ्या असलेल्या या देशातल्या महिला त्रिवेंद्रमध्ये केरळ पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. त्यांनी या दोघींचा छळ करुन स्वत:विरुद्धच जबानी देण्यास त्यांना भाग पाडले.


नारायण आणि अन्य शास्त्रज्ञ हे तंत्रज्ञान मालदिवच्या दोन महिलांकडे सोपवणार होते. त्यांनतर या महिला हे तंत्रज्ञान कोरियामार्गे पाकिस्तानला पोहचवणार होत्या असा दावा केरळ पोलिसांनी केला होता. इस्रोला हे तंत्रज्ञान बनवण्यासाठी 2015-16 साल उजाडावे लागले. मग हे तंत्रज्ञान त्याच्या दोन दशके आधीच ही मंडळी कसे काय या महिलांच्या हाती सोपवणार होते?...


नारायण यांनी नंतर एका मुलाखतीमध्ये सांगितल्याप्राणे या तंत्रत्रानाचे बारकावे शिकण्यासाठी भारतीय इंजिनियर्सची टीम कायदेशीर करारानुसार काही वर्ष फ्रांसमध्ये अभ्यासासाठी गेली होती. असे असूनही काही कागदपत्रे आणि ड्रॉइंग सोपवली की झाली हेरगेरी अशा प्रकरणाच्या बाजारगप्पा केरळमधील तपास यंत्रणा आपल्या माध्यमस्नेही मंडळींच्या मदतीने देशभर पसरवत होती.

भारताने हे तंत्रज्ञान फ्रांसकडून शिकून घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाप्रमाणे त्यापूर्वी खरेदी केली. फ्रांसचा तुलनेने स्वस्त असा अधिकृत पर्याय असताना शत्रू राष्ट्रातील इंजिनियर्सकडून प्रचंड ओढाताण करून काळ्या बाजारात 400 कोटींना हे तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान का करेल?....

नारायण यांना गोवणाऱ्या तपास अधिकाऱ्यांमध्ये प्रमुख नाव आहे श्रीकुमार. गुजरात दंगलीमध्ये मोदींचा सहभाग सिद्ध करण्यासाठी आकाश-पाताळ एक करणारे अधिकारी म्हणून हे महाशय संपूर्ण देशात ओळखले जातात. मोदींवरच्या प्रत्येक आरोपात ते सर्वोच्च न्यायालयात उघडे पडले. गुजरातमध्ये राबवलेल्या या पॅटर्नची सुरुवात त्यांनी केरळमध्ये केली होती. केरळमध्ये प्रकरण अंगाशी येऊ लागले हे लक्षात येताच त्यांची होम केडर गुजरातमध्ये बदली करण्यात आली होती. अगदी 2013 साली अर्णब गोस्वामी यांनी 'टाईम्स नाऊ' वर इस्रो हेरगिरी प्रकरणावर केलेल्या कार्यक्रमात श्रीकुमार सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी त्यावेळी केलेल्या तपासकार्याबद्दल कोणताही  पश्चाताप व्यक्त केला नव्हता.

केरळमधील तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर सीबीआयने गंभीर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केले. तरीही न्याय मिळण्याचा नारायण यांचा संघर्ष अजून संपलेला नाही. सीबीआयने काय कारवाई करावी याची शिफारस केलीच नव्हती. त्यांनी केवळ योग्य कारवाई करा असे सुचविले. केरळ सरकारने ही शिफारस फेटाळून लावली. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांचे प्रमोशन, पेन्शन सारं काही व्यवस्थित सुरु आहे.

या प्रकरणाला राजकीय कांगोरेही आहेत. यामधील एक बाजू ज्याचा नेहमी उल्लेख करण्यात आला आहे तो म्हणजे केरळ काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा. हे प्रकरण घडले तेंव्हा के. करूणाकरण के काँग्रेस नेते मुख्यमंत्री होते. त्यांचे पक्षातील प्रमुख स्पर्धक ए.के. अँटोनी यांची तेंव्हा युवा आणि स्वच्छ नेते म्हणून प्रतिमा होती. करुणाकरण यांना अडचणीत आणण्यासाठी अँटोनी यांनी या प्रकरणाचा जोरदार उपयोग करुन घेतला. याच प्रकरणामुळे करुणाकरण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अँटोनी पुढे केरळचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री झाले. ते संरक्षणमंत्री असताना सैन्याला हवी असलेली लढाऊ विमाने, शस्त्र खरेदीचे सर्व व्यवहार बासनात गुंडाळून ठेवण्यात आले होते. या प्रकरणात षडयंत्र रचणाऱ्या पाच राजकीय नेत्यांची नावे मी न्यायालयीन समितीला सांगणार आहे. अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर करुणाकरण यांची मुलगी पद्मजा वेणूगोपाल यांनी दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया देखील खूप काही सांगणारी आहे.

 तपास यंत्रणांनी ज्यावेळी नारायण यांच्या घरी धाड टाकली त्यावेळी कोट्यवधी माया जमवलेल्या या माणसाच्या घरात केवळ बांबूच्या काही खुर्च्या आणि टेबल इतकीच संपत्ती आढळली. त्यांच्या घरी फ्रिजही नव्हते. ज्या माणसानी इस्रोसाठी या देशासाठी आपला घाम आणि रक्त दोन्ही गाळलं. तो माणूस 1994 ते 1998 त्रिवेंद्रम ते दिल्ली आपल्याला न्याय मिळावा म्हणून रेल्वेच्या विना आरक्षण डब्याने प्रवास करत होता. हेरगिरीच्या आरोपामुळे त्यांचा पगार इस्रोने थांबवला. त्यांच्या पत्नीला याचा मोठा धक्का बसला. त्या आजही यामधून पूर्णपणे सावरलेल्या नाहीत.

सरकारनेच नारायण यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. नारायण यांचे करियर, वैयक्तिक आयुष्य, कुुटुंब सारे काही पणाला लावून जवळपास पाव शतकानंतर त्यांनी या प्रकरणातला एक मोठा टप्पा पार केला. तरीही त्यांना नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रूपये इतकेच हाती लागले. या आणि अशा अनेक प्रकरणांमुळेच  भारतीय न्यायव्यवस्था हा एक मोठा विनोद आहे, असे अनेकजण म्हणतात त्यात मग चूक काय? नारायण यांच्या आयुष्यालाच नाही तर संपूर्ण देशाला मोठा सेटबॅक देणारी मंडळी आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांचं आयुष्य अगदी सुशेगाद सुरू आहे.

सरकार येतील-जातील. राजकीय नेत्यांचा उदय होईल ते तळपतील नंतर त्यांचा अस्त होईल. पण या प्रस्थापित व्यवस्थेच्या पोलादी पडद्याआड दडलेली ही 'इको सिस्टिम' नागडी होणे आवश्यक आहे. या सिस्टममधले देशहितालाचा बळी देणारे चेहरे उघड होणे त्यांना त्यांच्या फायद्यासाठी देशाला डावाला लावल्याची शिक्षा मिळणे म्हणजे न्याय आहे.

 शेक्सपियरला कोट केलं, नैतिकतेवर भाषणं दिली की झालं...  न्याय मिळाला.... अशीच  जर आपली समजूत असेल तर मात्र...

Thursday, November 10, 2016

प्रस्थापितांचा पुन्हा पराभव


बाहेरचा व्यक्ती जिंकलाय. प्रस्थापित व्यवस्था पराभूत झालीय. अमेरिकेतल्या साऱ्या निषेधार्ह प्रवृत्तींचं ज्यांकडे नेतृत्व होतं असं सतत सांगितलं गेलं ते डोनाल्ड जॉन ट्रम्प आता अमेरिकेचे अध्यक्ष असतील. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसणारे संपूर्ण 'अराजकीय'  ट्रम्प जगातल्या सर्वात जुन्या लोकशाही देशाचं नेतृत्व करणार आहेत.

            ट्रम्प यांनी केवळ हिलरी क्लिंटन यांचा पराभव केलेला नाहीय. तर डावा आणि उदार चेहऱ्याचा भास दाखवणारा मीडिया, निवडणूक विश्लेषक, हॉलिवूड सूपरस्टार, वॉल स्ट्रीट, डेमॉक्रॅट पक्षातली अब्जावधी मंडळी आणि रिपब्लिकन पक्षातले उमराव, तसंच सामान्यांशी फटकून वागणाऱ्या जगभरातल्या मंडळींना धक्का दिलाय.

         डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्व व्यवस्थेला शिंगावर घेतलं. तरीही ते विजयी झाले. हा काही टिपीकल अमेरिकी श्वेतवर्णीय व्यक्तींचा विजय नाही. महिला अध्यक्ष नको अशी मानसिकता असलेली मंडळीही सरस ठरलेली नाहीत. तर समाजातल्या प्रस्थापित वर्गाबद्दलच्या नाराज मंडळींना सामान्यांनी दिलेला धक्का आहे. व्यक्तिगत आयुष्यातले स्कॅंडल आणि सार्वजनिक  वागणूक याचा ट्रम्प यांना  फटका बसला. तसंच केवळ ईमेल प्रकरणामुळे हिलरी पराभूत झाल्या नाहीत.  ज्यावेळी  रोजच्या आयुष्याशी परिणाम करणाऱ्या गोष्टींचा संबंध येतो त्यावेळी मतदार हे त्या उमेदवाराचं चारित्र्य तपासत बसत नाहीत. हेच या निकालातून स्पष्ट झालंय.

                यापूर्वी जगात हुकूमशाही राजवटींना दुसरा  राजा किंवा धार्मिक सत्ता आव्हान देत असे. औद्योगिक क्रांतीनंतर कॉर्पोरेट हाऊसचा उदय झाला. प्रिंटीग प्रेसला सुरुवात झाली त्यांचा विकास झाला. त्यानंतर वृत्तपत्रं, मासिकं आणि न्यूज चॅनल असा मीडियाचा प्रकार ( लोकशाहीचा चौथा खांब इ.इ. ) अस्तित्वात आला.पण ही व्यवस्था लवकरच काही विशिष्ट मंडळींची मक्तेदारी बनली. समाजमन याच व्यक्ती नियंत्रित करु लागल्या. या मंडळींच्या कल्चरमध्ये बसलेल्या व्यक्तींना देव्हाऱ्यात बसवण्यात आलं. या कल्चरशी विसंगत व्यक्तींना देशोधडीला लावण्याचे उद्योग सुरु झाले.

        नेमक्या याच काळात एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात सोशल मीडियाचा उदय झाला. आज या शतकाच्या दुस-या दशकामध्ये हा मीडिया अधिक शक्तीशाली बनलाय. आता माहितीचं नियंत्रण हे स्वत:ला लोकशाहीचा चौथा खांब समजणाऱ्या व्यवस्थेतील ठराविक मंडळींच्या हातामध्ये राहिलेलं नाही. तर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉगिंग तसंच अन्य सोशल मीडिया वापरणाऱ्या सामान्य मंडळींनी त्याचा ताबा आपल्याकडे घेतलाय.  माहिती सेन्सॉर होणार नाही याची खबरदारी हेच जगभरातले सामन्य सोशल मीडिया युझर्स घेतायत.


         डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्वाधिक टीका ही प्रस्थापित मीडियानं केली. हाच प्रस्थापित मीडिया त्यांच्या विजयातला महत्वाचा घटक ठरला. या प्रत्येक टीकेनंतर ट्रम्प अधिक शक्तीशाली बनले. त्यांना साथ देण्याचा ट्रम्प समर्थकांचा निर्धार पक्का झाला.एखादी व्यक्ती ही सतत टीकेचं लक्ष्य होत असेल तर त्याच्या पाठिमागे टिकाकारांचा काही अजेंडा असू शकतो हे जगाला आता समजायला लागलंय. 2014 साली भारतामध्ये हेच घडलं. प्रस्थापित इंग्रजी मीडिया, डावी तसंच बुद्धीजीवी मंडळी, सिव्हिल सोसायटी आणि अगदी भाजपमधली काही  मंडळी या साऱ्यांचा विरोध/ कुजबूज मोडून काढत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आता अमेरिकेतही हेच घडलंय.

          लोकांनी काय करावं हे आता ठरवता येत नाही. लोकांना गोंधळात टाकून आपल्या मतांच्या प्रभावामध्ये आणण्याचे दिवसही आता संपलेत. '' ट्रम्प जिंकले तर अमेरिकेतली लोकशाही धोक्यात येईल, अमेरिकन ड्रीम खलास होईल,अमेरिकन संस्कृती संपेल ''  असं अमेरिकेसह जगभरातल्या सेलिब्रेटी मागच्या महिनाभरापासून ओरडून सांगत होत्या. अमेरिकन मतदारांनी या आरडाओरडीकडं दुर्लक्ष केलं.  व्यवस्थेला धक्का लावण्यासाठी पूर्वी एक दशकही कमी पडत असे. आज सकाळी जन्माला आलेली आयडिया दुपारी व्हायरल होते आणि संध्याकाळपर्यंत ती जगभरात ट्रेंडसेटर झालेली असते. सोशल मीडियातल्या या ट्रेंडसेटर मंडळींनी हिलरी कॅम्पच्या प्रत्येक आरोपांची चिरफाड केली. हिलरींचा इतिहास जगभरात बोटाच्या क्लिकवर उपलब्ध करुन दिला. अगदी काही सोशल मीडिया मालकांशी हिलरींनी कसं संधान बांधलंय हे देखील जगाला समजलं सोशल मीडियाच्या मालकांना त्यापासून हवा तेवढा पैसा मिळवता येईल.पण या माध्यमातून तयार होणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवणं अशक्य आहे. हे या बिनचेहऱ्याच्या सामन्य मंडळींनी जगभरातल्या शक्तीशाली मंडळींना दाखवून दिलं.

          अमेरिकेतला सर्व मेनस्ट्रीम मीडिया हिलरींच्या पाठिशी भक्कपणे उभा होता. हिलरींचा पराभव हा केवळ त्यांना धक्का नाही तर त्यांच्या विश्वासहर्तेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. सर्व ओपिनियन पोलचे अंदाज चुकवत ट्रम्प विजयी झाले. हे ओपिनियन पोल मॅनेज होते. किंवा त्यांनी योग्य सँपल निवडले नाहीत असं मला वाटत नाही. तर आपण ट्रम्पला मतदान करणार आहोत हे या मतदारांनी या व्यक्तींना प्रामाणिकपणे सांगितलंच नसावं. अमेरिकेतला निकाल हा ओपिनियन पोल करणाऱ्या माध्यमांसाठीही मोठा धडा आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही सतत टार्गेट करत असाल तर लोकं तुमच्याशी मोकळेपणे बोलणार नाहीत. ते तुम्हाला 'पोलिटिकली करेक्ट' उत्तरं देतील,पण मतदानाच्या दिवशी पालंथं पाडतील. हे या जाणकार मंडळींनी आता तरी लक्षात घेणं आवश्यक आहे.
.  

         अमेरिका संपलेली नाही. उलट अमेरिका जिवंत आहे.आपल्या हक्कांसाठी जागरुक आहे. अर्ध्या अमेरिकन नागरिकांमध्ये आपल्याकडे दुर्लक्ष होतंय हा असंतोष खदखदतोय. यापैकी अनेकांना पोटाची चिंता  सतावतीय. त्यांना नोकऱ्या हव्या आहेत. जागतिकीरणामुळे आलेल्या असुरक्षिततेवर त्यांना तोडगा हवाय. आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींकडेच व्यवस्थेचं नियंत्रण आहे, हे या मंडळींनी ओळखलं. हिलरी याच प्रस्थापित मंडळींच्या नेत्या होत्या.  मतपेटीच्या माध्यमातून या प्रस्थापित मंडळींना अमेरिकन मतदारांनी धक्का दिलाय.  आपल्या आयुष्यात ज्यामुळे बदल घडेल अशी आशा दाखवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष केलंय.

लोकशाही म्हणजे दुसरं काय असतं ?

टीप - अमेरिकन निवडणुकीतल्या पराभूत उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याबद्दलचा माझा ब्लॉग वाचण्यासाठी
इथे  क्लिक करा

            

Saturday, November 9, 2013

न्यूयॉर्क ते नेवांग



न्यूयॉर्कच्या 135 मजली टोलेजंग पॉश इमारतीच्या अवाढव्य पार्किंगमध्ये नेमक्या जागेवर  कैवल्यनं  नेहमीच्या सफाईनं गाडी पार्क केली. बाहेर दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या आफ्रिकन-अमेरिकन गार्डनं ठोकलेल्या सॅल्युटचा शिष्टशीर पद्धतीनं स्विकार केला. डोक्यात दिवसभराच्या सा-या कामांच, बोर्ड मीटिंगचं चक्र त्याच्या डोक्यात घूमू लागलं. त्याचा प्रत्येक मिनिट नं मिनिटं हा ‘लाख’ मोलाचा होता. आज सोमवार. आठवड्याचा पहिला दिवस. आज सारी कामं नेहमीच्याच सफाईनं आणि 100 टक्के बिनचूक पद्धतीनं झाली पाहिजेत.  पहिला दिवस चांगला गेला तरच आठवडा चांगला जातो, अशी त्याची ठाम समजूत. याच मनोनिग्रहानं तो ऑफिसात शिरला. कामाच्याच विचारात असलेल्या कैवल्यनं सहका-यांच्या हाय सर, हॅलो सर, गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू सर चा नेहमीच्याच परिटघडानं स्विकार केला आणि आपल्या केबिनमधल्या खूर्चीवर स्थानापन्न झाला. 
ऑफिसात आल्यानंतर आधी सर्व मेल चेक करायची हा त्याचा शिरस्ता. मेल चेक करत असतानाच भारतामधल्या पेपरच्या साईट त्यानं नेहमीच्या सवयीनं ओपनं केल्या. आज सलग तिस-या दिवशी मणिपूरच्या अशांततेची बातमी प्रमुख पेपरनं फ्रंट पेजवर घेतली होती हे कैवल्यला त्याची ई एडिशन पाहताना समजले. एरवी मणिपूरसारख्या दुर्गम राज्याला फारसं महत्त्व न देणारी ही सारी वृत्तपत्र सलग तिस-यांदा मणिपूरची बातमी देतायत. म्हणजे मामला गंभीर आहे. 
मणिपूरच्या बातम्यांमध्ये रस असण्याचं त्याचं कारण म्हणजे त्याची रियल लाईफमधली सर्वात जवळची दोन माणसं  त्य़ाचे आई-बाबा मणिपूरच्या विवेकानंद केंद्रात सेवाव्रतीचं काम करत होते.  धुमसत्या मनस्थितीला शांत करत कैवल्यनं ऑफिसातली काम नेटानं सुरु ठेवली.


दिवसभराची कामं संपवून घरी परतल्यावर नेहमीच्या रितेपणासह कैवल्य घरात शिरला. आज पैसा, प्रतिष्ठा, स्टेटस, बॅँक बॅलेंस सारं काही त्याच्याजवळ आहे. पण हे सारं शेअर करायला कुणीच नाही. आपण आनंदी आहोत, यशस्वी आहोत हे समाजाला दाखवण्याचा आणि स्वत:ला समजवण्याचा प्रयत्न तो सतत करतो.पाच दिवस भरगच्च काम आणि नंतर दोन दिवस भरपूर एन्जॉय अगदी अमेरिकन लाईफस्टाईल अंगात भिनलंय. तरी हे सर्व करत असताना आपले आई-बाबा तिकडं सात समुद्रापार घरापासून हजार किलोमीटर दूर असलेल्या मणिपूरमध्ये एका खेड्यात सेवाव्रतीचं आयुष्य जगतायत. किती बुलशीट आहे हे सारं ? हा सारा डोलारा आपण कुणासाठी उभा करतोय ? त्यांचे समाजसेवीची डोहाळं कधी पूर्ण होणार ? ही सारी प्रश्न  कैवल्याच्या डोक्याचा रोज रात्री केमिकल लोचा करतात.  या केमिकल लोच्याची रिएक्शन त्याला जाणवू लागली होती अखेर 15 दिवसांच्या रजेचा मेल ऑफिसला टाकला आणि भारताला जाण्याचे निश्चित केल्यानंतरच कैवल्यला किती तरी दिवसांनी शांत झोप लागली.  

दुस-या दिवशी सकाळी कैवल्यनं  ट्रॅव्हल एजंटला तातडीनं फोन केला. “ एक नवी दिल्ली अगदी तातडीनं लगेच हो, हो अगदी फास्ट, महाग असेल तरी चालेल. भारतात सध्या पावसळा आहे ?, असू दे महापूर येऊन सारं काही वाहून जाण्याची वेळ आलीय आता आयुष्यात त्यामुळे आहे ते वाचवण्यासाठी पावसाळा असो की उन्हाळा मला तिकीट तातडीनं हवंय. काहीही चौकशी न करता थेट तिकीट काढणारा तो ट्रॅव्हल एजंटचं पहिलंच गि-हाईक असावा. ऑफ सिजनमध्ये वाटेल ती किंमत मोजणारं गि-हाईक मिळाल्यानं एजंटही खूश झाला. त्यानं तातडीनं ते तिकीट त्याच्या हाती ठेवलं. 

विमानात उडल्यानंतर अगदी वेगळाच फिल येतो. सारं जग आपल्या खाली आणि आपण आकाशात...अगदी वर टॉपला. टॉपला जाण्याचं वेड आपल्याला कधी शिरलं हे कैवल्य आठवू लागला. शाळेत असेपर्यंत वर्गातल्या हुशार मुलांमध्ये कधीच नव्हतो आपण. अगदी ढ ही नाही आणि हुशारही नाही. त्यामुळे कोणत्याच कारणामुळे शाळेत कुणाच्या लक्षात आलो नाही. 

घरी आई आणि वडील. वडील प्रपंच चालवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून नोकरी करत बाकी सारा वेळ सामाजिक कार्य. परिसरातल्या दुष्काळगस्त भागातल्या केंद्राच्या कामात प्रत्येक शनिवार-रविवार वेळ दे. त्यांना धान्य वाटप कर. ऊस कामगारांच्या मुलांसाठी सुरु असलेल्या साखर शाळांच्या कामाचा आढावा घे. भूकंपाने उद्धवस्त झालेलं एक गावं नव्यानं वसवण्याची जबाबादारी  स्वामी विवेवेकानंद केंद्रानं त्यांच्यावर सोपवलेली. सामाजिक काम असलं की वडिलांना नवा उत्साह येत असे. त्या गावाचं पूनर्वसन हॆच आपले जीवतकार्य आहे, त्यामुळे ते अधिकाधिक निर्दोष पद्धतीनं पूर्ण झालं पाहिजे या ध्येयानं ते झपाटलेले. हा सारा परमार्थ करत असताना घराकडे त्यांचं फारसं लक्ष नसायचंच.  

कैवल्यला वडिलांच्या या सा-या कामाबद्दल आदर होता. पण आपणही तसंच काम करांव हा वडिलांचा आग्रह त्याला मान्य नव्हता.त्यामुळे तो वडिलांपासून लांब लांब राहू लागला. वडिलांबद्दल आदर, प्रेम सारं काही आहे पण तरी जवळीकता साधणं त्याला जमायचे नाही. त्याचा घरातला सारा व्यवहार आईच्या मार्फत चालयचा. 
10 वी ला बरे मार्क पडले. मग सामाजिक प्रथेप्रमाणे आणि मुख्य म्हणजे घरापासून दूर राहता येईल म्हणून त्यानं शहरातल्या कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला.  बारावीत आणखी छान मार्क्स. मग इंजिनियरिंग. अभ्यासाची चटक लागलेल्या कैवल्यालं तिथं थेट गोल्ड मेडल मिळाल्यानं अमेरिकतल्या विद्यापीठात स्कॉलरशीपसह नोकरीची संधी चालून आली. अगदी 9/11 ऩंतर अमेरिकनं आपलं व्हिसा धोरण कडक केलं असूनही त्याला सहजगत्या व्हिसा मिळाला. सतत पुढं जाण्याच्या ओढीनं धावणा-या कैवल्यनं घरच्यांशी काहीही चर्चा न करता अमेरिका गाठली.

   अमेरिकेत गेल्यानंतर नव्या वातावरणात तो रमला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी आपसूक चालून आली. आता आई-वडिलांनी आपल्याकडे यावं असा त्याचा आग्रह. तर त्यांना देशाची काळजी पडलेली. ‘देशाची काळजी घ्यायला सरकार आहे, ना  लष्कराच्या भाक-या भाजण्याचे तुमच्यासारखे उद्योग मला जमणार नाहीत.  ‘  अमेरिकेची भव्यता, वर्क कल्चरला महत्त्व देणारी इथली मंडळी, ज्या देशात माझ्या गुणवत्तेचं चीज होतोय. आरक्षण, दप्तर दिरंगाई, भ्रष्टाचार, जातीयता, नक्षलवाद याच्या चक्रव्युवाहात माझं प्रोजेक्ट अडकत नाही. त्याच देशात मला राहण्याची इच्छा आहे, कृपया आता भारतात परत यावं असा आग्रह करु नये. तुमचा हाच आग्रह कायम असेल तर आता आपण एकमेकांशी संपर्क  न करणे उत्तम. असं निर्वाणीचं पत्र त्यानं घरी पाठवलं होतं त्यालाही आता सहा वर्ष उलटून गेली होती.  आई-बाबा निवृत्तीनंतर महाराष्ट्र सोडून मणिपूरात स्थायिक झालेत. तिथल्या विवेकानंद केंद्रातल्या शाळेत ते शिकवतात. अशी वार्ता त्याला नातेवाईक-मित्रमंडळीकडून समजली होती. पण तरीही त्यानं त्याबाबत कधी आई-वडिलांकडे विचारणा केली नाही. तर त्याच्या शेवटच्या पत्रानं दुखावलेल्या आई-बाबांनीही त्याला ते कधी कळवले नव्हते. त्यामुळेच आता असे अचानक आई-बाबांना भेटल्यानंतर आपण एकमेकांशी कसे रिएक्ट होऊ हा विचार त्याला प्रवासभर छळत होता.


नवी दिल्लीत उतरल्यानंतर मागच्या दहा वर्षात देशातल्या सप्तसिंधुमधून बरेच पाणी वाहून गेलंय याची जाणीव कैवल्यला झाली. आता अमेरिकीची छोटी आवृत्ती नवी दिल्ली विमानतळ परिसरात आढळत होती. दिल्लीच्या कायदा-सुव्यवस्थेचा वाजलेला बो-या, वीजेची टंचाई, वाढती झोपडपट्टी हे सारे प्रश्न आपण पेपरात वाचतो. पण त्याचबरोबर दिल्लीला शहरीकरणामुळे आलेली सूज त्याला जाणवत होती. मॉल्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, रस्त्याच्या बाजूला सिनेस्टार आणि क्रिकेटपटूंच्या वेगवेगळ्या वेशातली वेगवेगळ्या प्रॉडक्टची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, मेट्रो रेल्वे, पाण्यापेक्षाही अगदी सहजगत्या मिळणारे कोक-पेप्सी, स्मार्ट फोनमध्ये रमलेली तरुण पिढी, यामुऴे दिल्लीचं होतं असलेलं जागतिकीकरणाचा अनुभव घेत कैवल्य गुवाहाटीच्या रेल्वेत बसला.

  गुवाहटीत गेल्यानंतर मागच्या दहा वर्षात आपण किती बदललोय आणि या बदलामुळे सभोवतलाच्या परिस्थितीशी जुळवून घेणं किती अडचणीचं आहे हे कैवल्यला जाणवू लागलं. त्यातचं इफांळला जाणारी गाडी उद्या रात्री असल्यामुळे आजची रात्र हॉटेलात राहणं भाग होतं. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. त्याला पाऊस फक्त सिनेमात बघायला आवडयचा. गुवाहटीचा नखशिखान्त हलवलणारा पाऊस आणि या पावसात हॉटेल निवडण्याची कटकट त्यानं खिशात असलेल्या भक्कम पैशांच्या जोरावर पार पाडली. चला, तर खिशात भक्कम पैसे असले की जगात कुठेही अडचणीच्या वेळी मार्ग निघतोच हे त्याचं गृहितक पुन्हा एकदा पक्क झाल्याचं जाणवताच तशाही परिस्थितीत  आत्मिक हासू फुटलं.

   दुस-या दिवशी पावसानं उघडीप दिल्यानं गुवाहटी ते इंफाळ प्रवास कसा होईल हे पाहण्यासाठी कैवल्यनं हालचाल सुरु केली. ज्या नेवांग गावाला त्याला जायचे होते ते गोयपांग इंफाळच्या 1 तास अलिकडे आहे, याची नोंद त्यानं जवळच्या जीपीआरएसनं केली होती. मात्र भारतामधून मणिपूरला जाण्याचा मार्ग बंद होता. 
भारतामधून मणिपूरला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक आसाममधल्या सिल्चरमधून येणारा हायवे क्रमांक 53. पण दहशतवादी कारवाया आणि हायवेची दुरावस्था यामुळे तो मार्ग 20 वर्षांपासून बंद आहे. दुसरा मार्ग आसाम, नागालॅँड, मणिपूरमधल्या नागा हिल्स, कुकी हिल्स मार्गे मैदानी प्रदेशात येतो. बंडखोर नागा संघटनांनी हा मार्ग रोखून धरल्यानं मणिपूरचा श्वास आवळला गेलाय.

  या भागात, ना अन्नधान्य पोहचंत, ना औषधं. जगण्याची कोणतीच साधनं जिथं जाऊ शकत नाहीत अशा राज्यातली जनता मागच्या दोन महिन्यांपासून आयुष्य ढकलतीय. हे जाणवल्यानं इतके दिवस सुबत्तेच्या राशीवर लोळणारा कैवल्य वास्तवाच्या जमिनीवर आला. मागची सहा वर्ष केवळ मी भोवती फिरणा-या त्याच्या विश्वात आठवडाभरापासून आई-बाबा आले होते. आता ते विश्व अधिक विस्तारत मणिपुरची जनताही त्यात सामवली जात होती. 

    अर्थात कोणत्याही आपत्तीचं आपल्या फायद्यासाठी रुपांतर करणारी जात जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळते. याची जाणीव कैवल्यला होतीच. मणिपुरची ही समस्या तर मानवनिर्मित होती. त्यामुळे या भागात काळाबाजार करणा-यांकडे येणा-या पैशांचा वेग हा गुवाहाटीत दिवसभर कोसळणा-या पावसापेक्षा जास्त होता. 
मणिपूरला सुटणा-या गाड्यांच्या स्थानकावर सर्वत्र माणसांचा नुसता समुद्र पसरलेला असताना बसमध्येही माणसांनी खच्चून बसावं याचं कैवल्यला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याचा गणिती विचार करणाच्या त्याची वृत्ती आता मागे पडली होती. नेवांगला नेणारी हीच एकमेव बस आता आहे. त्यामुळे या बसमध्ये चढताना, बसमधली हवा, सीट, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे भाडं या पैकी कशाचीही घासाघीस करायची नाही हे त्याला उमजले होते.
बसमध्ये बसल्यानंतर आजूबाजूला सर्व एकाच चेह-याची माणसं आणि सर्वांच्या चेह-यावर एकच प्रकारची काळजी. गोरी, बुटकी, बारीक डोळ्याची बसक्या नाकांच्या मंडळींसोबत प्रवास करताना कैवल्यला वर्गातला मणिपूरचाच झोराम आठवला. स्वत:बद्दल कधीही काही न बोलणारा,मागेमागेच राहणारा, अबोल, बुजरा माणूसघाणा म्हणता येईल इतपत एकलकोंडा. तो आपल्या वर्गात चार वर्ष होता. पण त्याला कुणी समजून, सामावून घेतलाच नव्हता. अगदी टिपकील चीनी, नेपाळी असं म्हणून त्याची कुणी हेटाळणी केली नसेल. पण कॉलेज संपल्यानंतर झोराम कुठे गेला, त्याचं काय सुरु आहे याचं कुणालाच पडलेलं नव्हतं. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस एप सारख्या वेगवेगळ्या संपर्क माध्यमांनी वर्गातलं सगळं पब्लिक एकमेकांशी कनेक्ट असताना एकट्या झोरामची कनेक्टेव्हीटी कुठे आणि कधी तुटली ?

विचारांची ही तंद्री सुरु असतानाच त्यानं मणिपूरच्या प्रश्नाबाबत बोलण्यासाठी बाजूच्या काकांशी कधी सुरुवात केली हे कैवल्यलाही समजले नाही. आम्ही भारतीय आहोत, अगदी महाभारत कालापासून याचे दाखले आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेल्या आझाद हिंद सैन्यातही मणिपुरी जनतेनं आपलं ‘खून’ दिलं ते देशाच्या ‘आझादी’साठीच ना ? स्वातंत्र्यानंतरच्या तीन्ही युद्धात मणिपूरच्या युवक अन्य जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढलेत. आशियाई स्पर्धेत मणिपूरच्या खेळाडूनंनी पदकं जिंकलीत. राष्ट्रीय स्पर्धेत मणिपूर नेहमी अग्रेसर असंत. या स्पर्धांचं नेटकं आयोजनही आम्ही केलंय. इतकचं काय तर च महिला बॉक्सिंगचं विश्वविजेतेपद मेरी कोमनं पटकावलं ते  मणिपूरसाठी नाही तर भारतासाठीच.
दिल्ली, मुंबईत होणा-या छोट्याश्या आंदोलनाचीही लगेच दखल घेतली जाते. त्यावर संसदेत चर्चा होते. पण मणिपूरमध्ये ब्लॉकेडमुळे लोकं उपाशी मरतायत, त्यांचा देशाशी संपर्क तुटतोय. पेट्रोल 150 च्या पुढे, कांदा 75 रुपये किलो. डाळीनं 80 चा टप्पा ओलंडलाय.अगदी एटीएममधून पैसा काढण्यासाठी चार-चार तास रांगा लावाव्या लागत असल्यानं पैसा ही इथं महाग झालाय. मागच्या आठड्यात वृत्तवाहिन्यांनी याची ‘ब्रेकींग न्यूज’ खाली दखल घेतली. इंग्रजी
वृत्तपत्रांनी शब्दमर्यादेचं आणि संपादनाचं काटेकोर कौशल्य वापरत 250 शब्दात या बाबतच्या बातम्या दाखवल्या. पण यामुळे मणिपूरचे प्रश्न सुटले का ? याचा फॉलो-अप किती जणांनी केला ?

मणिपुरी काकांच्या एक-एक प्रश्नानं कैवल्यनं स्वत:भोवती गुंफून घेतलेले कोष गळून जात होते. ज्या सामाजिक संस्कारात तो लहाणाचा मोठा झाला. ज्या सामाजिकतेचं भान वडिलांनी आयुष्यभर जपलं आणि निवृत्तीनंतरच आयुष्य घालवण्यासाठी विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून त्यांनी मणिपूरची निवड का केली हे त्याला समजू लागलं होतं. आपण काही करु शकतो ही भावनाच मरुन जावी इतकी विषण्णता या मणिपूरच्या हवेत साठून राहिल्याचं त्याला जाणवू लागलं.
 हताशा, हतबलता, परकीय घुसखोरी, बेरोजगारी, व्यसनाधिनता, विघटनवाद, आणि नाकरलेपणाची भावना या सारख्या समस्यांनी ग्रासलेल्या या राज्यातल्या जनतेमध्ये सकारात्मकतेचा, एकात्मतेचा, समरसेतेचा आणि राष्ट्रीयत्वचा धागा जोडण्यासाठी आपले आई-बाबा काम करतायत हे समजताच त्याला त्यांचा प्रचंड अभिमान वाटला. आता या कामात त्यांना संपूर्णपणे मदत करायची हे त्यानं नेवांगमध्ये बस दाखल होण्यापूर्वीच पक्क केलं होतं. ज्या देशात आपण जन्मलो, ज्या समाजात आपण मोठे झालो त्याचं देणं आपल्याला चुकवावंच लागतं. आपले बाबा मागची चाळीस वर्ष हेच करतायत. आता आपणही तेच करायचं हे न्यूयॉर्क ते नेवांग हा प्रवास पूर्ण करेपर्यंत कैवल्यनं निश्चित केलं होतं. त्याच्या आयुष्याचं ‘लक्ष्य’ त्याला सापडलं होतं. 


टीप - झी २४ तास डॉट कॉमच्या दिवाळी अंकात सर्वप्रथम प्रसिद्ध

Monday, September 12, 2011

दहशतवाद विरोधी लढाई आणि अमेरिका


अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदा या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याला आता दहा वर्षे झालीत. 2001 पूर्वीही या जगात दहशतवादी हल्ले झाले. मात्र त्याचे बहुतेक उद्देश हे स्थानिक होते. एखादी राजवट उलथवून टाकणे,  तत्कालीन घटनेचा बदला घेणे किंवा एखादा प्रदेश बळकावणे हाच या दहशतवादी हल्लायांचा उद्देश होता. मात्र 9/11 च्या हल्ला हा ख-या अर्थाने जागतिक स्वरुपाचा होता.

                  सौदी अरेबिया तसेच वेगवेगळ्या मुस्लीम देशांत अमेरिका करत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात ओसामा बिन लादेन या कडव्या दहशतवाद्यांने आपल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या माध्यामातून ( ज्या संघटनेत पाकव्याप्त काश्मिर पासून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान. सौदी अरेबिया, येमेन यासह काही आशियाई आणि आफ्रिकन दहशतवाद्यांचा समावेश होता. ) थेट अमेरिकेवर हल्ला चढवला. 20 व्या शतकात अमेरिकेनं अनेक युद्ध खेळली. मात्र पर्ल हर्बरवर वर जपानने केलेल्या हल्ल्याचा अपवाद सोडल्यास अमेरिकन भूमीला प्रत्यक्ष युद्धाची झळ बसली नव्हती. त्यामुळे 21 व्या शतकाच्या सुरुवातीला थेट अमेरिकेच्या गंडस्थळावर झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते. त्या काळातील अमेरिक अध्यक्ष जॉर्ज बूश आणि इतर नेत्यांची वक्तव्य वाचली तर अमेरिकेचा या हल्ल्यानं सपशेल गोँधळ उडाला होता हे सहज लक्षात येते.

               अमेरिकेच्या साम्राज्याला आव्हान देणा-या या हल्ल्याचा बदला अमेरिकेनं अगदी त्यांच्या स्टाईलने घेतला.  प्रथम अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. तालिबाननांना अफगाणिस्तानच्या बाहेर हुसकावून लावण्यात अमेरिका तेंव्हा तरी यशस्वी झाली. हाच युद्धज्वर कायम ठेवत बूश प्रशासनाने इराकवर हल्ला चढवला. इराकमधली सद्दाम राजवट संपुष्टात आली. सद्दाम हुसेनला प्रथम पकडण्यात आणि नंतर फासावर लटकवण्यात अमेरिकेला यश आलं. याच वर्षी मे महिन्यात ओसामा बिन लादेनला ठार मारुन अमेरिकेनं दहशतवाद विरोधी लढ्यातला एक मोठा टप्पा पार केलाय. अफगाणिस्तान आणि इराक जिंकले, सद्दाम आणि ओसामाला ठार मारले तरीही अमेरिकेला या  लढाईत निर्णायक यश आलेले नाही.

             दहशतवादाला मदत करणा-या प्रत्येक शक्तीविरुद्ध, देशांविरुद्ध अमेरिका युद्ध पुकारत आहे. असं दहा वर्षांपूर्वी जॉर्ज बूश यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यांच हे युद्ध अफगाणिस्तान, इराक आणि काही अंशी पाकिस्तान इतपतचं मर्यादीत राहिलं.  इराण, सीरिया, लेबनॉन, पॅलिस्टाईन या देशातूनही  दहशतवाद्यांना पाठिंबा मागच्या दशकात मिळतचं राहिला. मात्र त्या देशांविरुद्ध अमेरिकेनं कोणतीही लष्करी कारवाई केली नाही.

             अमेरिकेविरुद्धच्या युद्धात  आपण जिंकणार नाही याची खात्री ओसामाला नक्कीच होती. मात्र अमेरिकन नागरिकांना अस्वस्थ करण्यात, अफगाणिस्तान, इराक यासारख्या मुस्लीमबहुल देशात अमेरिकेला युद्ध लढायला लावण्यात तो यशस्वी झालाय.या युद्धामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला, दोन हजार पेक्षा जास्त अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांचे सैनिक मारले गेले तरीही अमेरिकेला इराक आणि अफगाणिस्तानवर निर्णायक यश मिळवता आलेलं नाही. या वर्षाखेरिस अमेरिेकेचे सैन्य इराकमधून बाहेर पडेल त्यानंतर इराकमध्ये  यादवी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच 2014 मध्ये  नाटोच्या सैन्यानी  अफगाणिस्तानमधून आपले समान पॅक केल्यानंतर तिथली लोकशाही राजवट कितपत तग धरु शकेल ?

        शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेसमोर सोव्हियत रशिया हा एक ठोस शत्रू होता. सोव्हित रशिया आणि सोव्हियत संघराज्यातील राष्ट्रे अशा आघाडीविरुद्ध लढयाचे आहे याची माहिती होती. मात्र या दहशतवाद विरोधी लढाईत तसे नाही. या लढाईत नेमका शत्रू कोण हे अमेरिकेला अजूनही ठरवता आलेलं नाही. ही दहशतवाद विरोधातली लढाई आहे असे जॉर्ज बूश यांनी जाहीर केलं होतं. इस्लामी दहशतावाद्यांनी अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेणे आणि संभाव्य हल्ल्यापासून अमेरिकेचे रक्षण करणे हा अमेरिकेचा उद्देश होता. परवा सद्दाम हुसेन आणि इराक  काल ओसाम बिन लादेन आणि अलकायदा अमेरिकेचे या लढाईतले  शत्रू होते. हे शत्रू तर मारले गेलेत. मात्र तरीही अमेरिकेचे भय संपलेले नाही. हमास, हिजबूल्लाह आणि इराण हे अमेरिकेचे जूने शत्रू हे 9/11 पेक्षा आज अधिक सशक्त झालेत. हमासचे गाझा पट्टीवरचे वर्चस्व कायम आहे. येत्या निवडणुकीतही पुन्हा एकदा हमास जिंकण्याची शक्यता आहे.  हिजबूल्लाहचे लेबॉनॉनवरची पकड आणखी घट्ट झालीय. तर अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणनं आपली लष्करी शक्ती वाढवलीय इराण बहुधा अण्वस्त्र सज्जही झालाय.

         या जुन्या शत्रूंबरोबरच आणखी एका  शत्रूची चिंता आता अमेरिकेला करावी लागणार आहे ती म्हणजे पाकिस्तान. गेल्या 60 वर्षात अमेरिकेच्या मदतीवर आपले अर्थकारण चालवणा-या देशातली बहुस्ंख्य जनता आज अमेरिकेच्या विरोधात आहे. 20 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला पाकिस्तान आज जागतिक दहशतवादाचे नंदनवन आहे. संपूर्ण जगभरात चाललेल्या दहशतवादी कारवायांचे कोणते ना कोणते कनेक्शन पाकिस्तानशी जोडलेले असते. अस्थिर सरकार, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था, राजकीय महत्वकांक्षा असलेले लष्कर, आणि जिहादी कारवाई करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेली धर्मांध जनता ही जागतिक विद्धवंसाला कारणीभूत ठरु शकेल अशी सूपीक परिस्थिती पाकिस्तानात आहे.

           त्यामुळे आज 9/11 ऩंतर दहा वर्षांनी कदाचित अमेरिकेचा भूभाग अधिक सुरक्षित झाला असेल. मात्र ज्या पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाई भागात अमेरिका ही लढाई लढत आहे त्या ठिकाणी अमेरिकेची परिस्थिती अधिकच अवघड होऊन बसलीय. जगातली एकमेव महासत्ता होण्याच्या महत्वकांक्षेनं झपाटलेल्या अमेरिकेसाठी ही परिस्थिती नक्कीच अभिमानास्पपद नाही. आपल्या स्वार्थासाठी राजकीय रंगमंचावर वाटेल तशी टोपी फिरवणे आणि अगदी कोणत्याही स्तराला जाण्याची नेहमीच तयारी असणा-या अमेरिकेच्या आजवरच्या धोरणामुळेच या देशावर ही परिस्थिती ओढवली आहे.

                संकट आली की त्यामधून उसळी मारयची आणि आपल्या शक्तीशाली सामर्थ्यानं जगाचे डोळे दिपून टाकयचे हा अमेरिकेचा आजवरचा इतिहास आहे. 19 व्या शतकातील अमेरिकन यादवी, 1929 ची महामंदी, दुसरे महायुद्ध, कोल्ड वॉर यासारख्या प्रत्येक घटनांमध्ये ह्या 'ग्रेट अमेरिकन पॉवर' चे दर्शन जगाला झाले आहे. आता आपल्या पल्लेदार भाषणांमधून Yes We Can चा नारा देत अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले बराक ओबामा पुन्हा एकदा या 'ग्रेट अमेरिकन पॉवर' चे दर्शन जगाला घडवून देतात का हा खरा प्रश्न आहे.
          

Tuesday, August 18, 2009

शाहरुख पब्लिसिटी खान


शाहरुख खान या बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला चौकशीकरता अमेरिकेतल्या नेवार्क या विमानतळावर थांबवण्यात आलं.त्याच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. तो ग्लोबल आयकॉन आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगात त्याचे फॅन्स आहेत.भारतामधील अगदी वरपर्यंतच्या वर्तुळात त्याच्या ओळखी आहेत.अगदी कशाचाही त्या खडूस तपासणी अधिका-यांवर परिणाम झाला नाही.त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतरच त्यांनी त्याची मुक्तता केली.खरंतर शाहरुख सारख्या सेलिब्रिटीनी हा विषय समंजसपणे हाताळायला हवा होता.पण माझं नाव मुस्लिम आहे म्हणूनच मला थांबवण्यात आलं.असा दावा त्यानं केला.

एप्रिल महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम कॉन्टिनेंटल एअरलाईन्सनं दिल्लीहून न्यूयॉर्कला जात होते. विमानाकडं जात असताना विमानाच्या चार कर्मचा-यांनी त्यांना वाटेतच थांबवलं. आणि त्यांची झडती सुरु केली. कलामांनी कसलाही विरोध न करता सर्व प्रक्रिया पुर्ण केली. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, बुट काढा तर त्यांनी तेही केलं. त्या टिनपाट कर्मचा-यांपुढं आपला रुबाब गाजवावा असं त्यांना चुकूनही वाटलं नाही.

ह्या विषयावरचे नेटवरील संदर्भ अभ्यासत असताना माणिक मुंढे या माझ्या जुन्या सहका-याने त्याच्या ब्लॉगवर लियो टॉलस्टायबद्दलचा लिहलेला एक प्रसंग वाचण्यात आला.हा प्रसंग जशाच्या तशा लिहण्याचा मोह मला होतोय.टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होते. ते आपल्या काही सैनिकांची स्टेशनवर वाट पाहत होते. मॉस्कोत गोठवणारी थंडी असते त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ कुली आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळले. पण त्यांनी पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका कुलीला का सॅल्यूट मारतायत? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर कुलीला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

हे तीन प्रसंग आहेत तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे..तीन्ही व्यक्तींनी आपल्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तुत्व सिद्ध केलंय. हे कर्तुत्व सिद्ध केल्यानंतर जो समंजसपणा यायला हवा तो शाहरुखमध्ये आलाय..असं काही वाटतं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून मुस्लिम नट टॉपला आहेत. ' खान ' नावांच्या खानदानाची कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याची बातमी कधी तरी आल्याचं आठवतंय का ? परंतु घर नाकारलं गेल्यावर किसर किंग इमरान हश्मीलाही तो मुस्लिम असल्याचा साक्षात्कार होतो.अमेरिकेत तपासणी झाल्यावर शाहरुखला मुस्लिम म्हणून मिळणारी सहानभूती कॅश करण्याचा प्रयत्न करतो.

अमेरिकन नागरिकांमध्ये मुस्लिमांबद्दल खरचं द्वेष असाता तरं बराक हुसेन ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष कसे झाले असते ? अमेरिकेमध्ये आज लाखो मुस्लिम नागरिक राहातायत.त्यामधील अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत. पाकिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये गैरमुस्लिम नागरिकांना मिळणा-या वागणुकीपेक्षा कित्येक पटीनं सन्मानाची,प्रतिष्ठेची आणि बरोबरीची वागणूक या मुस्लिमांना मिळते.

9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेमधील परिस्थीती झपाट्याने बदललीय. सर्व सार्वजनिक ठिकाणी अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. कोणत्याही व्यक्तीची तपासणी होत असताना त्याची प्रतिष्ठा,पद समाजातील राजकीय स्थान कशा कशाचाही विचार केला जात नाही.अमेरिकेत जाऊन आलेल्या लाखो भारतीयांनी याचा अनेकदा अनुभव घेतलाय.परंतु त्यांनी त्याचा कधीही ब्रभा केला नाही.अमेरिकेत येणा-या,वावरणा-या प्रत्येक नागरिकांच्या हलचालींवर अमेरिकन सुरक्षा अधिका-यांचे बारीक लक्ष असते.त्यामुळेच अमेरिकेवर 9-11 नंतर एकही मोठा हल्ला होऊ शकला नाही.त्याच्या नेमक्या उलट आपल्याकडची परिस्थिती.26-11 नंतर आपण सतर्क झालो.असा एक समज आहे.पण आजही सीएसटी स्टेशनच्या परिसरात अगदी सहजपणे वावरता येतं..मेटल डिटेक्टर सुरक्षा अधिकारी काय आणि कसे काम करतात याची अनुभती अनेक जण रोज घेत असतात.त्यामुळेच या देशात कुठेही आणि कधीही अगदी सहज हल्ला होऊ शकतो.

देशातील सरंजामशाही नष्ट झाली.संस्थानिकांचे तनखे रद्द झाले.मात्र तरीही या देशातीन अनेकांच्या रक्तातील संरजामी गूण गेली नाही.उलट राजकारणी,सनदी नोकरशाहा,चित्रपट कलावंत,क्रिकेटपटू यांच्यातील सरंजामदाराची नवीन जमात या देशात निर्माण झालीय.आपल्या देशात मिळणा-या व्हीव्हीआयपी वागणुकीची त्यांना इतकी सवय झालीय की त्यांना परदेशातही हीच वागणूक मिळावी अशी अपेक्षा असते.

लालु प्रसाद यादव, शिवराज पाटील, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान अशा सत्तेत नसलेल्या लोकांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकार घेत आहे, याचा सुगावा या मंडळींना लागला आणि त्यांनी अख्खी संसद डोक्यावर घेतली. या कसलाही धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी सरकार दरवर्षी पाचशे कोटी रूपये खर्च करतं. या पाचशे कोटींमध्ये विकासाची कित्येक काम होऊ शकतात.आपल्या देशात अशीही एक व्यक्ती आहे, ज्याची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, तो कधी या देशाचा पंतप्रधान नव्हता वा राष्ट्रपती. तो कधी सरन्यायधीशपदावरही राहिलेला नाही.ही व्यक्ती आहे पंडित नेहरुंचा पणतूजावाई,इंदिरा गांधीचा नातजावाई,सोनिया गांधींचा जावई आणि प्रियंका गांधीचा नवरा रॉबर्ट वढेरा.गांधी घराण्याचा जावाईच हीच त्याची एकमेव ओळख.केवळ याच गोष्टींमुळे तो देशातील सर्वशक्तीशाली नागरिकांमध्ये जाऊन बसतो.

शाहरुखच्या चाहत्यांना हा संपूर्ण देशाचा अपमान वाटला.आपल्याकडे ही बातमी गाजत असताना अमेरिकेत आणखी एक प्रकार घडला. बॉब डिलन या वयोवृद्ध अमेरिकन संगीतकाराला एका चौकशी अधिका-याने अडवलं.बॉब डिलन आज ८४ वर्षांचे आहेत. गेल्या पाच दशकांत त्यांच्या संगीताने जगभरातल्या संगीतकारांवर प्रचंड प्रभाव टाकला आहे. अमेरिकेसह जगभरातल्या संगीत रसीकांवर त्यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे.असे हे जगप्रसिद्ध बॉब डिलन अमेरिकेतल्या एका चौकशी अधिका-याच्या 'अपमानास्पद' वागणुकीला सामोरे गेले. परंतु बॉब यांनी आपण संगीतकार आहोत,वृद्ध आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे सेलिब्रिटी आहोत..असा कोणताही गवगवा केला नाही.

ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.या जॉर्ज ऑरवेल यांच्या वाक्याची सतत आठवण येत राहते..मोअर इक्वल या प्रकारात मोडणारे अनेक शाहरुख आपल्या देशात आहेत.त्यांच्या या समजूतीला कोणी धक्का दिला की काही जण आदळाआपट करतात.कुणाला तो दलित महिलेचा अपमान वाटतो तर कुणाला आणखी काही..शाहरुख सारखे काही हूशार व्यक्ती त्याचा पब्लिसिटीसाठी वापर करुन घेतात.या देशातील भोळी-भाबडी जनता मात्र त्यांच्या अशा नाटकी वागण्याला बळी पडते.त्यांचा अपमान हा स्वत:चा अपमान समजते. कोणी आपला आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करुन घेतयं हे त्यांच्या गावीही नसतं.सरंजामशाही नष्ट झाले, संस्थानिकांचे तनखे रद्द झाले परंतु संस्थानिकांना देव समजण्याची खास भारतीय प्रवृत्ती अजूनही नष्ट झालेली नाही.

भारतीय मनोवृत्ती आणि अमेरिक मनोवृत्तींमध्ये असलेला हा एक सर्वात मोठा फरक.अमेरिकेची बरोबरी करायाला निघालेल्या आपण सर्वांनी सुरवातीला ही मनोवृत्ती बदलायला हवी.पण याची तयारी किती जणांची आहे ?

Tuesday, November 11, 2008

ओबामांची अमेरिका


बराक हुसेन ओबामा हे वादळ आता सा-या जगावर धडकायला सज्ज झालंय.ज्या अमेरिकेला वंशवाद,गुलामगिरी आणि वर्णभेदाचा मोठा इतिहास आहे त्या देशात बराक हुसेन ओबामा या सारख्या चमत्कारीक नावाचा अमेरिकन आफ्रिकन अध्यक्ष होणं ही एक क्रांतीकारक घटना आहे.फक्त बारा वर्षीपूर्वी प्रचलित राजकारणात उतरलेल्या ओबामांनी अमेरिकेमधले सर्वशक्तीमान पद काबीज केलंय.तेही प्रस्थापित व्वस्थेचा भाग बनत,समन्वयवादी भूमीकेतून (कोणतेही जातीय अथवा आर्थिक आरक्षण न घेता किंवा 'अल्पसंख्याक' कार्ड न वापरता...)

अमेरिकेच्या 44 व्या अध्यक्षपदासाठी झालेली निवडणुक हीच मुळात मोठी ऐतिहासीक होती.आठ वर्षाच्या बुशशाहीचा शेवट यंदा होणार हे नक्की होतं..बुश यांच्या पक्षानं जॉन मॅकेन यांना झटपट उमेदवारी जाहीर केली.मात्र डेमॉक्रेटीक पक्षाची उमेदवारी मिळवण्याकरता ओबामांना मोठा संघर्ष करावा लागला.हिलरी क्लिंटन सारख्या हाय प्रोफाईल उमेदवाराशी त्यांची फाईट विलक्षण रंगली.या निवडणुकीत हिलरीबाजी मारणार हा सा-यांचा होरा चुकवत ओबामांनी बाजी मारली.डेमॉक्रेटीक पक्षाच्या निवडणुकीत ओबामांनी हिलरीचा पराभव करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं तिकीट मिळवलं. 232 वर्षांच्या अमेरिकन लोकशाहीत प्रथमच एखादा ब्लॅक उमेदवार अध्यक्षपदाचा प्रमुख उमेदवार बनला होता.

बुश यांच्या कारभाराला त्रासलेल्या अमेरिकन जनतेला नवा चेंज हवा होता.बुश अध्यक्ष बनताच वर्षभराच्या आतंच वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला.ह्या हल्ल्याचे निमीत्त साधून युद्धपिपासू बुश प्रशासनानं प्रथम अफगाणिस्तान आणि नंतर इराक बेचीराख केलं.या दोन्ही देशात लक्षावधी लोकं मारले गेले.सद्दाम हुसेन यांना फासावर चढवण्यात आलं.इराक आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे कठपूतळी सराकार स्थापन करण्यात आले.मात्र तरीही अमेरिकेला या युद्धात विजय मिळाला नाही. खनिज तेलावर संपूर्ण ताबा मिळवण्याचं अमेरिकन ड्रीम भंग पावलंय. उलट इराकमध्ये रोज मरणारं सैन्य परत बोलवण्याकरता कोणतं कारण तयार करायचं हा प्रश्न आज अमेरिकेपुढ पडलाय.खनिज तेलाच्या किंमती वाढल्यामुळे निर्माण झालेल्या चलनवाढीचा मोठा फटका अमेरिकन अर्थव्यवस्थेला बसलाय.1929 नंतरच्या सर्वात मोट्या अमेरिकन महामंदीला आज अमेरिकाच नाही तर सारं जगं सामोरं जातंय..या सर्व परिस्थिनं गांजलेल्या अमेरिकन जनतेला म्हणबनच यंदा चेंज हवा होता.

मात्र एवढा क्रांतीकारी चेंज अमेरिकन नागरिक स्विकारतील का खरचं मोठा प्रश्न होता.केनियामध्ये जन्मलेला,इंडोनेशीयात बालपण घालवलेल्या बराक ओबामा या 47 वर्षाचे बराक हुसेन ओबामा यांच्या उमेदवारीनं सा-या अमेरिकन नागरिकांना मोठ्या कसोटीवर आणले होते.मात्र या कसोटीमधून अमेरिकन जनता यशस्वीपणे बाहेर पडलीय.अमेरिकेत काहीही अशक्य नाही या ओबांमांच्या विश्वासाला या निवडणुकीत अमेरिकेनं पावती दिलीय.अब्रामह लिंकन,मार्टीन ल्यूथर किंग यांच्या विचारांना आज 21 व्या शतकातल्या भांडवलवादी अमेरिकन्सनं प्रत्यक्षात आणलंय.मध्यमवर्ग आणि युवक या राजकारणामध्ये सहसा लक्ष न घालणा-या समाज घटकांनी यंदा प्रथमच ओबामांना भरभरुन मतदान केलंय.या अमेरिकन निवडणुकीतला हाही एक मोठा बदल आहे.

ओबामांच्या या विजयाचा भारतीय दृष्टीकोणातून अभ्यास करताना मला काही वेगळेच प्रश्न पडलेत. धर्म,वर्ण यांच्या पलीकडं जातं ओबांमानी अमेरिका काबीज केलीय.मात्र भारतीय राजकारण्यांची अस्मिता देशावरुन प्रदेशाकडं प्रदेशावरुन विभागाकडं केंद्रीत होत चाललीय.गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या या आसेतु हिमाचल भारतवर्षावर गारुड करु शकेल असा एकही नेता आज दिसत नाही.उलट राजकीय नेते मी पाटण्याचा,मी मुंबईचा ,मी चेन्नईचा या सारख्या विचारांनी देशाच्या एकात्मतेला वारंवार आव्हान देत आहेत.या सारख्या परिस्थीतीमध्ये आधी देश मग प्रदेश असा विचार करणारा नेता भारताला कधी मिळणार हा प्रश्न मला सतावतोय.

अमेरिचे सतत अंधानुकरण करणारे भारतीय युवक ओबामांच्या विजयांचे अनुकरण करणार का ? YES WE CAN ची भारतीय आवृत्ती कधी अनुभवयाला मिळेल याचीच वाट मी सध्या पाहतोय...


LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...