बाहेरचा व्यक्ती जिंकलाय. प्रस्थापित व्यवस्था पराभूत झालीय. अमेरिकेतल्या साऱ्या निषेधार्ह प्रवृत्तींचं ज्यांकडे नेतृत्व होतं असं सतत सांगितलं गेलं ते डोनाल्ड जॉन ट्रम्प आता अमेरिकेचे अध्यक्ष असतील. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसणारे संपूर्ण 'अराजकीय' ट्रम्प जगातल्या सर्वात जुन्या लोकशाही देशाचं नेतृत्व करणार आहेत.
ट्रम्प यांनी केवळ हिलरी क्लिंटन यांचा पराभव केलेला नाहीय. तर डावा आणि उदार चेहऱ्याचा भास दाखवणारा मीडिया, निवडणूक विश्लेषक, हॉलिवूड सूपरस्टार, वॉल स्ट्रीट, डेमॉक्रॅट पक्षातली अब्जावधी मंडळी आणि रिपब्लिकन पक्षातले उमराव, तसंच सामान्यांशी फटकून वागणाऱ्या जगभरातल्या मंडळींना धक्का दिलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्व व्यवस्थेला शिंगावर घेतलं. तरीही ते विजयी झाले. हा काही टिपीकल अमेरिकी श्वेतवर्णीय व्यक्तींचा विजय नाही. महिला अध्यक्ष नको अशी मानसिकता असलेली मंडळीही सरस ठरलेली नाहीत. तर समाजातल्या प्रस्थापित वर्गाबद्दलच्या नाराज मंडळींना सामान्यांनी दिलेला धक्का आहे. व्यक्तिगत आयुष्यातले स्कॅंडल आणि सार्वजनिक वागणूक याचा ट्रम्प यांना फटका बसला. तसंच केवळ ईमेल प्रकरणामुळे हिलरी पराभूत झाल्या नाहीत. ज्यावेळी रोजच्या आयुष्याशी परिणाम करणाऱ्या गोष्टींचा संबंध येतो त्यावेळी मतदार हे त्या उमेदवाराचं चारित्र्य तपासत बसत नाहीत. हेच या निकालातून स्पष्ट झालंय.
यापूर्वी जगात हुकूमशाही राजवटींना दुसरा राजा किंवा धार्मिक सत्ता आव्हान देत असे. औद्योगिक क्रांतीनंतर कॉर्पोरेट हाऊसचा उदय झाला. प्रिंटीग प्रेसला सुरुवात झाली त्यांचा विकास झाला. त्यानंतर वृत्तपत्रं, मासिकं आणि न्यूज चॅनल असा मीडियाचा प्रकार ( लोकशाहीचा चौथा खांब इ.इ. ) अस्तित्वात आला.पण ही व्यवस्था लवकरच काही विशिष्ट मंडळींची मक्तेदारी बनली. समाजमन याच व्यक्ती नियंत्रित करु लागल्या. या मंडळींच्या कल्चरमध्ये बसलेल्या व्यक्तींना देव्हाऱ्यात बसवण्यात आलं. या कल्चरशी विसंगत व्यक्तींना देशोधडीला लावण्याचे उद्योग सुरु झाले.
नेमक्या याच काळात एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात सोशल मीडियाचा उदय झाला. आज या शतकाच्या दुस-या दशकामध्ये हा मीडिया अधिक शक्तीशाली बनलाय. आता माहितीचं नियंत्रण हे स्वत:ला लोकशाहीचा चौथा खांब समजणाऱ्या व्यवस्थेतील ठराविक मंडळींच्या हातामध्ये राहिलेलं नाही. तर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉगिंग तसंच अन्य सोशल मीडिया वापरणाऱ्या सामान्य मंडळींनी त्याचा ताबा आपल्याकडे घेतलाय. माहिती सेन्सॉर होणार नाही याची खबरदारी हेच जगभरातले सामन्य सोशल मीडिया युझर्स घेतायत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्वाधिक टीका ही प्रस्थापित मीडियानं केली. हाच प्रस्थापित मीडिया त्यांच्या विजयातला महत्वाचा घटक ठरला. या प्रत्येक टीकेनंतर ट्रम्प अधिक शक्तीशाली बनले. त्यांना साथ देण्याचा ट्रम्प समर्थकांचा निर्धार पक्का झाला.एखादी व्यक्ती ही सतत टीकेचं लक्ष्य होत असेल तर त्याच्या पाठिमागे टिकाकारांचा काही अजेंडा असू शकतो हे जगाला आता समजायला लागलंय. 2014 साली भारतामध्ये हेच घडलं. प्रस्थापित इंग्रजी मीडिया, डावी तसंच बुद्धीजीवी मंडळी, सिव्हिल सोसायटी आणि अगदी भाजपमधली काही मंडळी या साऱ्यांचा विरोध/ कुजबूज मोडून काढत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आता अमेरिकेतही हेच घडलंय.
लोकांनी काय करावं हे आता ठरवता येत नाही. लोकांना गोंधळात टाकून आपल्या मतांच्या प्रभावामध्ये आणण्याचे दिवसही आता संपलेत. '' ट्रम्प जिंकले तर अमेरिकेतली लोकशाही धोक्यात येईल, अमेरिकन ड्रीम खलास होईल,अमेरिकन संस्कृती संपेल '' असं अमेरिकेसह जगभरातल्या सेलिब्रेटी मागच्या महिनाभरापासून ओरडून सांगत होत्या. अमेरिकन मतदारांनी या आरडाओरडीकडं दुर्लक्ष केलं. व्यवस्थेला धक्का लावण्यासाठी पूर्वी एक दशकही कमी पडत असे. आज सकाळी जन्माला आलेली आयडिया दुपारी व्हायरल होते आणि संध्याकाळपर्यंत ती जगभरात ट्रेंडसेटर झालेली असते. सोशल मीडियातल्या या ट्रेंडसेटर मंडळींनी हिलरी कॅम्पच्या प्रत्येक आरोपांची चिरफाड केली. हिलरींचा इतिहास जगभरात बोटाच्या क्लिकवर उपलब्ध करुन दिला. अगदी काही सोशल मीडिया मालकांशी हिलरींनी कसं संधान बांधलंय हे देखील जगाला समजलं सोशल मीडियाच्या मालकांना त्यापासून हवा तेवढा पैसा मिळवता येईल.पण या माध्यमातून तयार होणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवणं अशक्य आहे. हे या बिनचेहऱ्याच्या सामन्य मंडळींनी जगभरातल्या शक्तीशाली मंडळींना दाखवून दिलं.
अमेरिकेतला सर्व मेनस्ट्रीम मीडिया हिलरींच्या पाठिशी भक्कपणे उभा होता. हिलरींचा पराभव हा केवळ त्यांना धक्का नाही तर त्यांच्या विश्वासहर्तेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. सर्व ओपिनियन पोलचे अंदाज चुकवत ट्रम्प विजयी झाले. हे ओपिनियन पोल मॅनेज होते. किंवा त्यांनी योग्य सँपल निवडले नाहीत असं मला वाटत नाही. तर आपण ट्रम्पला मतदान करणार आहोत हे या मतदारांनी या व्यक्तींना प्रामाणिकपणे सांगितलंच नसावं. अमेरिकेतला निकाल हा ओपिनियन पोल करणाऱ्या माध्यमांसाठीही मोठा धडा आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही सतत टार्गेट करत असाल तर लोकं तुमच्याशी मोकळेपणे बोलणार नाहीत. ते तुम्हाला 'पोलिटिकली करेक्ट' उत्तरं देतील,पण मतदानाच्या दिवशी पालंथं पाडतील. हे या जाणकार मंडळींनी आता तरी लक्षात घेणं आवश्यक आहे.
.
अमेरिका संपलेली नाही. उलट अमेरिका जिवंत आहे.आपल्या हक्कांसाठी जागरुक आहे. अर्ध्या अमेरिकन नागरिकांमध्ये आपल्याकडे दुर्लक्ष होतंय हा असंतोष खदखदतोय. यापैकी अनेकांना पोटाची चिंता सतावतीय. त्यांना नोकऱ्या हव्या आहेत. जागतिकीरणामुळे आलेल्या असुरक्षिततेवर त्यांना तोडगा हवाय. आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींकडेच व्यवस्थेचं नियंत्रण आहे, हे या मंडळींनी ओळखलं. हिलरी याच प्रस्थापित मंडळींच्या नेत्या होत्या. मतपेटीच्या माध्यमातून या प्रस्थापित मंडळींना अमेरिकन मतदारांनी धक्का दिलाय. आपल्या आयुष्यात ज्यामुळे बदल घडेल अशी आशा दाखवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष केलंय.
लोकशाही म्हणजे दुसरं काय असतं ?
टीप - अमेरिकन निवडणुकीतल्या पराभूत उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याबद्दलचा माझा ब्लॉग वाचण्यासाठी
इथे क्लिक करा