तो खेळताना त्याचे पाय हलत नाहीत....
त्याचा फॉर्म हरपलाय ......
कर्णधार पदाचे गांभीर्य त्याच्या बॅटिंगमध्ये दिसत नाही
त्याचे रनिंग-बिटविन द विकेट गचाळ आहे सहकारी खेळाडूंना तो हमखास बाद करतो किंवा स्वत: बाद होतो
त्याच्या शारिरीक हलचाली मंदावल्या आहेत... त्याच्या कानात दोष निर्माण झाला आहे ...
इंदूरमध्ये आज झालेल्या वन-डे पूर्वी वीरेंद्र सेहवागर अशा अनेक प्रकरे टीका होत होती. एखादा सामान्य खेळाडू अशा प्रकारच्या टीकेमुळे कोषात जाऊ शकतो. पण हा वीरेंद्र सेहवाग आहे. त्याचे खेळताना पाय हलत नाहीत पण तो जेंव्हा खेळतो त्यावेळी धावफलक इतक्या जोराने पळू लागतो की समोरच्या टीमच्या खेळाडूंना अक्षरश: धाप लागते. त्याचा फॉर्म हरपलाय अशी जेंव्हा टीका होते त्यावेळी तो अशी काही खेळी खेळतो की त्याची हेटाळणी करणा-यांचे दात घशात जाऊन वेगळ्याच वाटेने शरिराच्या बाहेर पडतील की काय अशी शक्यता निर्माण होते.
एक कॅप्टन म्हणून आज तो जी खेळी खेळला आहे. तो विक्रम मोडण्याचे स्वप्न बघत आता भविष्यातले कित्येक महान कॅप्टन निवृत्त होणार आहेत. त्याच्या रनिंग बिटिवन-द विकेटमध्ये नेहमीच घोळ असतो. त्यामुळे सहकारी खेळाडू रन-आऊटही होतात. मात्र तो रंगात असला की या चुकीची सव्याज परतफेड करु शकतो. आजही गंभीर आणि रैना चांगले सेट झाल्यानंतर रन-आऊट झाले. मात्र ते कुणीही खिचगणतीत पकडले नाही. त्याच्या शारिरीक हलचाली मंदावल्या असतील पण जागेवर उभे राहून काही कळायच्या आत बॉलला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देण्याची शक्ती त्याच्या मनगटात आहे. मध्यंतरी त्याच्या कानात दोष निर्माण झाला होता. पण त्याच्या फटकेबाजीमुळे उत्साहित झालेले प्रेक्षक जेंव्हा मैदान डोक्यावर घेतात. तेंव्हा त्यांच्या आवाजाने मैदानावर उपिस्थत असलेल्या खेळाडूंचे कान बधिर होऊ शकतात. ७० च्या दशकात अमिताभ पडद्यावर आला की त्याच्या सोबत कोण आहे याकडे कुणाचेही लक्ष नसायचे. सर्वांची नजर अमिताभ काय करणार यामध्ये सर्वांचे लक्ष असायचे.तसे सेहवाग भरात असला की त्याच्या सोबत कोणताही ग्रेट बॅट्समन खेळत असला तरी त्याची पर्वा कुणीच करत नाही. त्यामुळेच वन-डे क्रिकेटमध्ये २०० रन्सचा टप्पा सर्वात प्रथम सेहवाग पार करेल असा माझा अंदाज होता. यापूर्वीच्या माझ्या ब्लॉग
मध्ये मी तो व्यक्तही केला होता. पण तो टप्पा सर्वप्रथम सचिनने पार केला. आता सेहवागने सचिनचा हा रेकॉर्ड नुसताच मोडला नाही तर आणखी उंचीवर नेऊन ठेवला आहे.
मराठी साहित्य निर्मितीमध्ये जेंव्हा व्याकरणाच्या नियमांचा बोलबाला होता. त्याकाळात मराठीमध्ये मुक्तछंद हा कविता प्रकार सुरु झाला. वीरेंद्र सेहवागची बॅटिंग म्हणजेही मुक्तछंदामधली कविता असते. क्रिकेटमध्ये कोणत्याही नियमांमध्ये चौकटीमध्ये त्याला बसविता येत नाही.
देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाप्रमाणे त्याची बॅट नेहमी प्रतिस्पर्धी खेळाडूंना आव्हान देत असते. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या ! असा इशारा तो समोरच्या प्रत्येक बॉलर्सना देत असतो. चांगला बॉल, खराब बॉल, उसळता बॉल किंवा आखूड बॉल अशा प्रत्येक प्रकारच्या बॉलवर त्याने षटकार खेचला आहे. अगदी शतकाच्या नव्हे तर त्रिशतकाच्या उंबरठ्यावरही त्याने हे अचाट साहस वारंवार केले आहे. कधी तो फसतो या प्रयत्नात तो २९३ किंवा १९५ वर आऊटही झाला आहे. म्हणून तो कधीही दडपणामध्ये येत नाही. अगदी या इंदूर वन-डेमध्येही त्याने १५० ते २०० हे अंतर अवघ्या २८ बॉल्समध्ये पार केले.
क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूंचे मोठेपण हे नेहमी आकड्यांच्या तराजूमध्ये मोजले जाते. सचिन, ब्रॅडमन, लारा, द्रविड किंवा पॉन्टिंग यांनी शतके किंवा त्यांच्या नावावर असलेली भरमसाठ रन्स याचे दाखले नेहमी दिली जातात. या सर्व महान खेळाडूंच्या यादीत सेहवागच्या नावाचा फारसा उल्लेख केला जात नाही.
टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी आणि वन-डेमध्ये डबल सेंच्युरी मारणारा तो जगातला एकमेव बॅट्समन आहे. टेस्टमध्ये दोन वेळा ३०० चा जादूई आकडा पार करणे हे केवळ ब्रायन लारा ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवागला जमले आहे. या यादीमध्ये त्याच्या पुढे फक्त सर डॉन ब्रॅडमन हे एकच नाव आहे. टेस्टमधली सर्वात जलद ट्रिपल सेंच्युरी आणि वन-डेमधली सर्वात जलद डबल सेंच्युरी त्यानेच झळकावली आहे. १० वर्षांच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये २२ सेंच्युरी त्यापैकी १४ वेळा दिडशेपेक्षा जास्त रन्स , ४ डबल सेंच्युरी आणि २ ट्रिपल सेंच्युरी करण्याचा पराक्रम हा दुस-या कोणत्याही भारतीय बॅट्समनने केलेला नाही. इंग्लंड विरुद्ध २००८ साली चेन्नई टेस्टमध्ये चौथ्या इनिंगमध्ये साधारण १०० ओव्हर्समध्ये ३८७ रन्स करण्याचे टार्गेट वीरेंद्र सेहवाच्या झंझावती सुरुवातीमुळेच ( ६८ बॉल्स ८३ रन्स ) शक्य झाले होते.
तसेच जेंव्हा टेस्ट मॅच वाचवण्याची वेळ येते तेंव्हाही सेहवागने भारतीय टीमच्या मदतीला धावून आला आहे. २००८ साली अॅडलेड टेस्टमध्ये टीममध्ये जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन केल्यानंतर त्याने काढलेल्या १५१ रन्समुळे भारताला पराभव टाळता आला होता. तसेच त्याच वर्षी श्रीलंकेमध्ये त्याने सलमीला येऊन शेवटपर्यंत नाबाद राहत २०१ रन्सची खेळी केली होती. ( त्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा स्कोअर होता सर्वबाद ३२९ ).
वेस्ट इंडिजच्या पिचवर हॅल्मेट नसताना उसळत्या बॉल्सचा सामना करत गावस्करने झळकावलेली शतके जबडा फाटल्यावर बॉलिंग करणारा कुंबळे किंवा चेन्नई टेस्टमध्ये जीवघेण्या पाठदुखीवर पर्वा न करता सचिनने विजयासाठी केलेली एकाकी धडपड या इनिंग सर्वांच्या लक्षात आहेत. या सर्व इनिंग ग्रेट आहेत याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सेहवागला त्याच्या करियरमध्ये अशा प्रकारची कोणती मोठी दुखापत आजवर झाली नाही. मात्र २००७ मध्ये त्याला टीमच्या बाहेर बसवण्यात आले. त्याच्या खेळण्याच्या तंत्रामध्ये दोष आहे. त्याची वृत्ती क्रिकेट खेळण्यास साजेशी नाही अशा प्रकारची वारंवार टीका त्यावर केली गेली. या सर्व मानसिक दडपणानंतरही सेहवागने आपले तंत्र बदलले नाही. आपली वृत्ती सोडली नाही. उलट २००८ ते २००११ या मागील चार वर्षातील त्याच्या अनेक खेळी थक्क करुन सोडणा-या आहेत. आपल्याला नावं ठेवणा-या जगाला अंगावर घेऊन खेळातील तंत्रामध्ये फारसा बदल न करता, आक्रमक वृत्तीला मुरड न घालता यशस्वी होता येते हे सेहवागने सिद्ध करुन दाखवले. अशा प्रकारचा कणखरपणा जगातील किती क्रिकेटपटूंमध्ये आहे ?
जंगलात अनेक प्राणी असतात. कुणी बुद्धीमान असतो, कुणी चतूर असतो, कुणी चपळ असतो तर कुणी प्रचंड शक्तीशाली असतो. पण या सर्वांच्या गर्दीमध्ये सिंहाचे श्रेष्ठत्व कुठेही झाकले जात नाही. तसेच शतके अनेक जण झळकावतात... सिक्स फोर्सची बरसातही अनेक करतात... मोठ्या खेळी करणारेही अनेक आहेत. पण जेंव्हा सेहवाग हे सर्व करतो त्याची सर अन्य कुणालाच येत नाही. वीरेंद्र सेहवाग हा क्रिकेट विश्वातला सिंघम आहे.
वीरेंद्र सेहवागवरील माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
7 comments:
अप्रतिम पोस्ट.. आवडलीच :)
>> वीरेंद्र सेहवागची बॅटिंग म्हणजेही मुक्तछंदामधली कविता असते. क्रिकेटमध्ये कोणत्याही नियमांमध्ये चौकटीमध्ये त्याला बसविता येत नाही.
हे खूप आवडलं... पूर्णतः सहमत !!
>> इंग्लंड विरुद्ध २००८ साली चेन्नई टेस्टमध्ये चौथ्या इनिंगमध्ये साधारण १०० ओव्हर्समध्ये ३८७ रन्स करण्याचे टार्गेट वीरेंद्र सेहवाच्या झंझावती सुरुवातीमुळेच ( ६८ बॉल्स ८३ रन्स ) शक्य झाले होते.
ही सेहवागची वन ऑफ द बेस्ट इनिंग्ज होती !! प्रश्नच नाही.
जोरदार............ जय वीरू...... लेख छानच आहे. पण वीरूच्या खेळीचे ह्या व्यतिरिक्तही अन्य महान पैलू समोर येऊ शकले असते. द्रविड, लारा किंवा सचिन जितक्या थिंकिंग लेव्हलचे आहेत; जितके सखोल बॅटसमन आहेत; तितकाच वीरूसुद्धा आहे. त्याच्या बॅटिंगमागे किंवा एकूणच व्यक्तिमत्वामागे मोठा बेस आहे. त्याचं बोलणं, राहणं व त्याने सुरू केलेली स्पोर्टस ऍकॅडमी ह्या सर्वांमागे सेहवाग व्हिजन आहे. निव्वळ हाणामारी करणे ह्याच्या पलीकडे सेहवाग अथांग प्रकारे मोठा आहे. इथे- http://niranjan-vichar.blogspot.com/2010/08/surrender-to-virender.html थोडी माहिती मिळू शकेल. धन्यवाद... जय हो.......
अजून थोडं ऍड करतो. सेहवागच्या खेळीला दिलेल्या उपमा अप्रतिमच आहेत...... राई राई एवढ्या चिंधड्य़ा झाल्यामुळेच काल सॅमी बॉलिंगवरून पळून गेला........
ख्रिस गायल ह्यानेही दोन त्रिशतक केले आहेत. सेहवागचे द्विशतक 5 आहेत. अर्थात तीन वेळेस 293 पर्यंत पोचणारा तो डॉन ब्रॅडमन नंतर पहिलाच आहे. मुख्य म्हणजे अशा गतीने इतका खेळणारा पहिलाच आहे.
"क्रिकेटमध्ये कोणत्याही नियमांमध्ये चौकटीमध्ये त्याला बसविता येत नाही." हे तर खरंच; पण तो कोणत्याच गोष्टीचा पूर्वग्रह करत नाही; त्याचं मन uncluttered; विमुक्त व उत्स्फूर्त असतं. असो. धन्यवाद.
.Nice post,He really is a dashing player....
हेरंब,
धन्यवाद रे. चेन्नई टेस्टमधील सेहवागची खेळी ही त्याची वन ऑफ द बेस्ट इनिंग्ज होती यात शंका नाही.
सेहवाग मैदानात असतो तेव्हा कोणतही टार्गेट सेफ नसते याची जाणीव प्रत्येक बॉलर्सला असते.
सचिन द्रविडबद्दल प्रतिस्पर्धी टीम्सना आदर असेल पण सेहवागबद्दल त्यांच्या मनात दहशत असते
निरंजन,
सविस्तर आणि अभ्यासू प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
ख्रिस गेलचा उल्लेख अनावधानाने राहिला होता. ती चूक आता दुरुस्त केली आहे. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
सेहवागच्या टेस्ट क्रिकेटमधील खेळाचा परिच्छेद असल्यामुळे चार डबल सेंच्युरी असे लिहले आहे. यामध्ये वन-डेमधील डबल सेंच्युरीचा उल्लेख त्यामुळेच केला नाही.
>>> पण वीरूच्या खेळीचे ह्या व्यतिरिक्तही अन्य महान पैलू समोर येऊ शकले असते.
अगदी बरोबर आहे. परंतू हा सेहवागवरचा ब्लॉग आहे त्याच्यावरचा प्रबंध नाही. त्यामुळे सर्व गोष्टींची माहिती यामधून करणे चूक आहे. मला तो जसा भावला जसा दिसला तसा मी लिहला.
एखाद्याला तो यापेक्षा अगदी भिन्न वाटू शकतो ते त्याने त्याच्या लेखात खुशाल मांडावे. जसे तू तुझ्या ब्लॉगमध्ये मांडले आहेस.
रितेश कदम,
प्रतिक्रीयेसाठी खूप खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत
Post a Comment