Thursday, December 4, 2008

दोन लातूरकर..




मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्यानंतर दोन लातूरकरांचा राजकीय बळी गेलाय.या हल्ल्यानंतर उसळलेल्या जनक्षोभापूढे नमतं घेत (खर तर निवडणुकांची गणितं समोर ठेवून) गृहमंत्री शिवराज पाटील आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा देण्याचे निर्णय कॉँग्रेस हायकमांडन दिले.केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचं मुख्यमंत्री ही दोन्ही अत्यंत महत्वाची पदं गेली चार वर्षे लातूरकडं होती.लातूरचं नाव देशात चर्चेत ठेवण्यात या दोन नेत्यांचा नेहमीच महत्वाचा वाटा राहीलाय.एक लातूरकर या नात्यानं या दोन्ही नेत्याची राजकीय काराकीर्द मला जवळून पाहता आलीय.
मला आठवतीय 1996 लोकसभा निवडणूक शिवराज पाटील हरणार असंच सा-या लातूर शहरात वातावरण होतं.त्यांच्या विरोधात गोपाळराव पाटील सारखा तगडा उमेदवार भाजपनं दिला होता.त्या काळातला भाजप हा आजच्या भाजपपेक्षा बराच सोज्जवळ होता.भाजपची सा-या देशभर हवा होती.अटलबिहारी वाजपेयी यांच्या रुपानं पंतप्रधान पदाचा एक चांगला उमेदवार देशापुढं होता.त्या अटलजींच भाषण ऐकण्याकरता लातूरच्या राजस्थान शाळेच्या मैदानावर मोठी गर्दी झाली होती.मी अटलजींच प्रत्यक्ष ऐकलेलं ते पहिलं भाषण..सारा जीव कानात एकवूटन मी अटलजींच प्रत्येक भाषण ऐकलेलं आहे.त्या भाषणात अटलजी एक वाक्य बोलले होते,''शिवराज पाटील बहूत अच्छे नेता है उन्होने संसद काफी अच्छी तरहसे चलायी''अटलजींच्या त्या एकाच वाक्यामुळे माझ्या मनात शिवराज पाटील यांच्याबद्दलचा आदर अनेक वर्ष टिकवून ठेवला होता.
खरतर शिवराज पाटील यांची प्रकृती ही परंपरागत राजकारण्यासारखी कधीच नव्हती.पांढरे बूट,पांढरी कडक इस्त्रीची सफारी,चोपून बसवलेला भांग आणि अगदी अगम्य इंग्रजी बोलणारा माणूस म्हणजे शिवराज पाटील अशीचं त्यांच्याबद्दल माझी लहाणपणी प्रतिमा होती.ते 1972 पासून राजकारणात आहेत.या 36 वर्षात आमदार,खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष,अगदी केंद्रीय गृहमंत्री अशी अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवली.पण या 36 वर्षात त्यांनी लातूरकरता काय केलं याचा शोध मला आजपर्यंत कधीच लागलेला नाही.राजकारणी लोकांप्रमाणे जनसंपर्क,कार्यकर्त्यांचा गराडा,सर्वसामान्य जनतेची वर्दळ या माणसानं कधीचं अनुभली नाही.हा गांधी घराण्याशी निष्ठा हा महत्वाचा कॉँग्रेसी बाणा
त्यांच्यामध्ये पुरेपूर भिनलाय..
मला आठवतंय 30 स्पटेंबर 1993 ला लातूर जिल्ह्यात मोठा भूकंप झाला होता.या भीषण भूकंपानंतर सा-या जगभरातून लातूर जिल्ह्यात मदत कार्य सुरु होतं.या सा-या मदतकार्यात हे आमचे लातूरचे सन्माननीय खासदार महाशय पूर्णपणे गायब होते.ते अवतरले थेट सोनिया गांधीच्या लातूर दौ-यात.त्या काळात सोनिया गांधी सक्रीय राजकारणात नव्हत्या.पण भूकंपग्रस्तांची पाहणी करायला म्हणून पहिल्यांदाच जाहीररीत्या त्या जनतेत आल्या होत्या.हे आमचे खासदार लातूरच्या ग्रामीण भागात अपला सूट सांभाळत दबकत दबकत फिरत होते.कोण काय म्हणंत ते बाईंना इंग्रजी अनुवाद करुन सांगत होते.या आपत्तीमध्ये शिवराज पाटलांचे आंम्हाला झालेले हे एकमेव दर्शन.
गांधी घराण्याच्या याच निष्ठेचं फळं त्यांना 2004 साली मिळालं.वास्ताविक ते लातूरची लोकसभा निवडणुक हरले होते.(मी आणि माझ्या मित्र कंपनीनं केलेलं ते पहिलं मतदान,आमच्या मतामुळे एक मातब्बर निष्क्रीय खासदार हरला याचा आनंद आंम्हा सा-यांना होता.) पण या निकालानंतर सोनिया गांधीनी आंम्हाला मोठा धक्का दिला.ज्या शिवराज पाटलांना लातूरकरांनी नकारलं होतं त्या शिवराज पाटलांना त्यांनी थेट गृहमंत्री म्हणून सा-या देशाच्या डोक्यावर बसवलं.
त्याच्या अगदी उलट विलासरावांचं राजकारण होतं.बाभुळगावच्या सरपंचपदापासून त्यांनी आपली काराकिर्द सुरु केली.ते लातूरचे आमदार बनले.अंतुलेंच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री बनले.त्यांच्याच प्रयत्नामुळे 1982 साली लातूर जिल्हा बनला.त्या नंतरच्या 26 वर्षात विलासरावांनी अनेक वेगवेगळी मंत्रीपद सांभाळली.1999 साली मुख्यमंत्री होण्यापूर्वी जवळपास सा-या खात्याच्या मंत्रीपदाचा त्यांना अनुभव होता.एक आमदार म्हणून मंत्री म्हणून मोठं होत असताना त्यांनी लातूरच्या विकासाकडंही जातीनं लक्ष पुरवलं हे मान्य करावचं लागेल.आज लातूर जिल्हा हा महाराष्ट्रातला एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो.नैसर्गिक दृष्ट्या लातूरकडं कोणतीही जमेची बाजू नाही.रेल्वे सारख्या विकासाच्या महत्वाच्या दळणवळण साधनापासून लातूर अगदी अलिकडच्या काळापर्यंत अलग होत.( लातूरमधल्या माझ्या अनेक मित्रांनी वयाच्या 17 व्या 18 वर्षी पुण्यात आल्यावर पहिल्यांदा रेल्वे पाहिली आहे) या सर्व अडचणींवर मात करत लातूर विकासाच्या दिशेनं झेपावतंय.याचं महत्वाचं श्रेय विलासरावांच्या नेतृत्वालाच द्यावं लागेल.
या दोन्ही लातूरकरांची शेवटचा कार्यकाळ मात्र नेहमी वादग्रस्त ठरला.कॉँग्रेसमधला सर्वात सोयीचा नेता म्हणून शिवराज पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आलं.तर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला छेद देणारा तगडा मराठा नेता म्हणून विलासराव दुस-यांदा मुख्यमंत्री झाले.शिवराज पाटलांच्या काळात देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचे पार वाभाडे निघाले.दिल्ली,जयपूर,हैदराबाद,बेंगळूरु,अहमदाबाद,मालेगाव यांच्यासह गुवाहटी,आगरतळा या सारख्या इशान्य भारतामधल्या देशात बॉम्बस्फोट झाले.मुंबईवर हल्ला करुन दहशतवाद्यांनी सा-या देशाशीच युद्ध पुकारलं होतं.तरीही दहशतवाद्यांना शोधून काढू आणि त्यांना कठोर शासन देऊ, अशी साचेबंद प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी प्रत्येक वेळी दिली.दिल्ली बॉम्बस्फोटानंतर तरदेशाचे गृहमंत्री ठिकठिकाणी भेट देण्यासाठी आपले सफारी सूट बदलण्यात मश्गूल होते. सुरक्षा दलांना आवश्यक ते आदेश देण्यापेक्षा आणि बॉम्बस्फोटातील जखमी तसेच मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यापेक्षा त्यांना आपले कपडे बदलणे महत्त्वाचे वाटले.सा-या देशाला या सुटातल्या 'निरोची' लाज वाटली होती.
विलासरावांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही अनेक आपत्ती राज्यावर आल्या.26 जुलैला मुंबईत झालेली अतिवृष्टी,रेल्वे बॉम्बस्फोट,खैरलांजी प्रकरण, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या या प्रत्येक आपत्तीत विलासरावांच सरकार ढिम्मचं राहीलं.राज ठाकरेंच्या काठीनं शिवसेनेचा साप मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला.राज यांची जी लार्जर दॅन लाईफ प्रतिमा मुंबई आणि परिसरात निर्माण झालीय.ही प्रतिमा बवनण्यात विलासराव सरकारचाचं मोठा वाटा आहे.मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला या दोन्ही लातूरकरांच्या अकार्यक्षम कारभाराचा कळसअध्याय ठरला.कोणतीही आपत्ती असू दे बेफिकीर राहयची सवय विलासरावांना लागली होती.याच बेफीकीरीतून ते ताज हॉटेलची पाहणी करायला रामगोपाल वर्माला घेऊन गेले.माध्यमांनी हे सर्व प्रकरण उचलून धरल्यानंतरही त्यांचा देशमुखी बेफीकीरपणा कमी झालेला नव्हता.
आता या दोन्ही लातूरकरांच्या खुर्च्या गेल्या आहेत.एकुण विचार केला तर शिवराज पाटील यांची राजकीय काराकिर्द आता संपली असंच म्हणावं लागेल.विलासराव देशमुखांना मात्र कॉँग्रेस पक्षामध्ये अजुनही भवितव्य आहे.कोणतीही राजकीय परिस्थिती नसताना हे दोन्ही लातूरकर देशाच्या तसंच राज्याच्या राजकारणात मोठे झाले.पश्चिम महाराष्ट्रातल्या तसंच उत्तर भारतामधल्या प्रबळ लॉबीला नमवून महत्वाची पद त्यांनी हस्तगत केली.एवढी महत्वाची पद मिळूनही हे नेते स्वत:च्याच धुंदीत मग्न राहीले.हायकमांडची मर्जी राखण्याकरता त्यांनी जितकी खटपट केली त्याच्या निम्मी जरी कार्यक्षमता दाखवली असती तरी त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती.
राजकीय क्षेत्रातल्या या नेत्यांच्या लातूर पॅटर्नला आज सेटबॅक बसला आहे.मात्र ह्या नेत्यांच्या चुकांपासून बोध घेत विकासाचा,कार्यक्षमतेचा प्रगतीचा नवा लातूर पॅटर्न कोण निर्माण करणार हा प्रश्न माझ्यातल्या एका लातूरकराला पडलाय.

5 comments:

ashishchandorkar said...

Gud observations. Shivraj Patil is Humbug man. He was there just becoz he was loyal to congress and gandhi family.

Niranjan Welankar said...

Good. But some personal points- mi he pahila, mi he aikla, thode khatakale. Uttam analysis, tatastha vishleshan.

Unknown said...

I completely agree with what Onkar says...

Congrats Onkar you are really exploring yourself with good writing supported by facts, individual style and historical approach...Keep it up..

Unknown said...

Good article..
Its fact,these two political bulls is loyal to the party but not for the people.shivraj patil and vilasrao deshmukh always bowed to the hierarchy and not the people.Congress is there from last nine years but still they are dissemenating about progress and planning.Home minister in the centre and CM in the state is of no use to the state.
Mr omkar please I expect you to write in details about there work to worship of last nine years.
thank you
vikram

dev said...

first class. mahiti atishay uttam aahe sundar

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...