Monday, August 18, 2014

श्रीलंकन क्रिकेटचा बुद्ध


1990 च्या दशकात अंतर्गत यादवीनं होरपळत असलेल्या श्रीलंकन मनाला काही प्रमाणात उभारी देण्याचं काम क्रिकेटनं केलं. रणतुंगा सारखा हुशार कॅप्टन, क्लासिकल अरविंद डिसल्वा, धडाकेबाज जयसुर्या आणि बेधडक कालुवितरणाच्या केमिस्ट्रीच्या जोरावर श्रीलंकेनं 1996 मध्ये थेट विश्वचषकालाच गवसणी घातली. रणतुंग-डिसल्वा आणि जयसुर्या या त्रिकूटानं श्रीलंकनं क्रिकेटमधल्या 'अच्छे दिन' ला सुरुवात केली. त्यांची ही मशागत वाया जाणार नाही याची काळजी जयवर्धने-संगकारा आणि मुरलीधरन त्रिकुटानं नंतरच्या कालखंडात घेतली आहे.

          मुरलीधरन यापूर्वीच निवृत्त झालाय. आता जवर्धनेनंही टेस्ट क्रिकेटमधून आपली बॅट म्यान केली. 1997 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केल्यापासून ऑगस्ट 2014 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या टेस्टपर्यंत त्यानं टीमला नव्या वैभवाला नेलं. या 149 टेस्टमधली त्याची प्रत्येक इनिंग हे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याचं एक वेगळं उदाहरण होती. नालंदा कॉलेजच्या मैदानापासून ते लॉर्डसच्या सेंच्युरी बोर्डापर्यंत वेगवेगळ्या वातावरणात त्याच्या बॅटनं नजाकत दाखवली. त्याचे कव्हर ड्राईव्हस बॉलला मैदानाच्या कोणत्याही दिशेला सहज पिटाळत असत. डिप मिडवेकटपासून ते फाईनलेगपर्यंत मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रात तो सहजगत्या स्वीप करत असे. लेगसाईडला सापळा रचलाय हे लक्षात येताच हूक आणि पूलचा वापर करत ते चक्रव्यूह उधळून लावणारा महेला पाहून तो दिवस सार्थकी झाला अशी माझी अनेकदा भावना झालीय.

      महेला रंगात असताना त्यानं नुसता तटावलेला चेंडूही एक कलात्मक उंची देऊन जायचा. मैदानातल्या रिकाम्या जागा भरत त्यानं काढलेले 2 किंवा  3 रन्स प्रतिस्पर्धी टीममधल्या प्रत्येकालाच 'कामाला' लावत असत. मुंबईत वानखेडेवर वर्ल्ड कप फायनलमधलं महेलाचं शतक हे त्याच्या या सा-या बॅटिंग प्रकाराचं एक उदाहरण. या इनिंगमध्ये टीम अडचणीत असताना त्यानं डॉट बॉल खेळून काढले. नंतर एक-एक रन काढत धावफलक ढकलायला सुरु केलं. मैदानातल्या मोकळ्या जागा फिल्डर्स आणि कॅमेरामनला दाखवत दोन-दोन रन्स काढले. भारतीय फिल्डर्सला मैदानाच्या सर्व दिशांना पिटाळतं 3 रन्स वसूल केले. आणि नंतर शेवटच्या ओव्हर्समध्ये गाडी सराईतपणे टॉप गियरला टाकत फोर, सिक्स आपल्या बॅटच्या कुंचल्यातून अलगद शिंपडले. धोनीच्या विजयी शायनिंग इनिंगपुढे महेलाची ही क्लासिकल इनिंग विस्मरणात गेली. पण ज्याला क्रिकेटपटूंच्या टेंपरामेंटचा अभ्यास करायचा त्यांना महेलाची ही वर्ल्ड कप फायनलमधली इनिंग गाळून पुढे जाणं अशक्य आहे.

         एक कॅप्टन म्हणूनही महेलानं आपली छाप सोडलीय. स्लीपमध्ये सदैव दक्ष असणा-या महेलानं टेस्टमध्ये  200 पेक्षा जास्त झेल घेतले. यापैकी केवळ मुरलीधरनच्या बॉलिंगवर 77 झेल घेतले. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात यशस्वी बॉलर-फिल्डर जोडी आहे. स्लिपमध्ये महेला उभा राहत असला तरी त्याची संपूर्ण मैदानावर हुकमत असायची. नवोदित बॉलर्सला 'गोष्टी सांगेन  युक्तीच्या चार ' म्हणत सतत मार्गदर्शन करणारा महेलाकडे अनुभवी बॉलर्सला हवी तशी फिल्डिंग लावण्याचे स्वातंत्र्य दाखवणारी परिपक्वताही होती. प्रतिस्पर्धी बॅट्समनला फटके मारण्यापूर्वी विचार करायला लावेल अशी फिल्डिंग तो लावत असे. आपल्या सापळ्यात बॅट्समन अडकला की स्लिपमधून बॉलर्सच्या दिशेनं जल्लोष करत येणारा महेला हे मैदानावरचं नेहमीचं चित्र होतं. 2008 मध्ये त्यानं स्वत:हून कॅप्टनसी सोडली. त्यानंतर संगकारा आणि दिलशान कॅप्टन झाले. पण हे दोघही आणिबाणीच्या वेळी महेलावर विसंबून राहत असत. महेलानंही हातचं राखून न ठेवता त्यांच्या कॅप्टनसीमध्येही आपल्या नेतृत्वगुणाची झलक दाखवली. अगदी अलिकडे एंजलो मॅथ्यूजला कॅप्टन म्हणून ग्रृम करण्याची जबाबदारी कुणावर सोपवयाची असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी श्रीलंकन बोर्डाला एकच नाव आठवलं ते म्हणजे महेला जयवर्धने.

     
     बॉलिवूडमध्ये  लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, शंकर-जयकिशन अशा जोड्या गाजल्या.या जोडीतल्या कोणत्याही एकाचं नाव घेतलं की दुसरं नाव आपसूक ओठावर येतं तसंच जयवर्धनेच्या खेळाचा ताळेबंद मांडताना संगकारा हे नाव नैसर्गिक रित्या मांडावं लागतं. जयवर्धने आणि संगकारा हे दोघे जर वकील, बिल्डर किंवा सी.ए. असते तर त्यांनी त्यांच्या भागिदारीतल्या फर्मचं नाव कदाचित जयवर्धने एण्ड संगकारा असोसिएट्स असं ठेवलं असंत. पण हे दोघं क्रिकेटपटू असल्यानं त्यांच्या एकत्रित फर्मचं नाव होतं श्रीलंकन क्रिकेट. डिसल्वा-रणतुंगा किंवा जयसूर्या- अट्टापटू अशा यशस्वी जोड्या श्रीलंकेनं यापूर्वी अनुभवल्या होत्या.पण जयवर्धने-संगकारा जोडीनं भागीदारीतला एक नवा उच्चांक प्रस्थापित केला.

        या जोडीनं 120 इनिंगमध्ये 6 हजार 554 रन्सची पार्टनरशिप केली. क्रिकेटच्या इतिहासात केवळ ( सचिन -द्रविड 143 इनिंगमध्ये 6 हजार 920 रन्सची पार्टनरशिप) ही जोडी महेला-संगाच्या पुढे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 मध्ये सिंहली स्पोर्ट क्लबच्या मैदानात या जोडीनं 624 रन्सची पार्टनरशिप केली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातली ही कोणत्याही विकेटसाठी एका इनिंगमध्ये केलेली सर्वोच्च पार्टनरशिप आहे. याच इनिंगमध्ये महेलानं आपल्या कारकिर्दीमधली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 374 नोंदवली. गेली दहा वर्ष श्रीलंकन बॅटिंगचा टेस्ट क्रिकेटमध्ये भार पेलण्याचं काम या जोडीनं केलंय. हेन्स-ग्रिनिच, हेडन-लॅँगर, पॉन्टिंग-लॅँगर , द्रविड-लक्ष्मण, सेहवाग-गंभीर, अमला-कॅलिस, किंवा स्ट्रॉस-कूक या सर्व बेस्ट पयेरला मागे टाकत या जोडीनं ही कामगिरी साध्य केलीय.

       घरच्या मैदानावरचा सिंघम अशी महेलाची हेटाळणी नेहमीच केली गेली. पण जे पिच मुरलीची बॉलिंग सुरु असताना  फिरकीचा चक्रव्यूह वाटयचे तेच महेलाची बॅटिंग सुरु असतना अगदी पाटा वाटावे इतके निर्जीव भासायचे. यात महेलाच्या सर्वांगसहज बॅटिंगचा वाटा कसा नाही ? अगदी सर डॉन ब्रॅडमनपासून प्रत्येक महान बॅट्समनचे सर्वाधिक रन्स हे  आपल्या होम पिचवरच झाले आहेत. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड हा जर भारतीय उपखंडताल्या खेळाडूंच्या यशस्वीतेचा निकष मानला गेला ( य़ापैकी केवळ दक्षिण आफ्रिकेत महेलाला टेस्ट सेंच्युरी झळकवता आली नाही ) तर उपखंडा बाहेरचे खेळाडू भारतात किती यशस्वी झाले याचा अभ्यास करुन क्रिकेटमधले महानतेचे निकष पुन्हा एकदा लिहायला हवेत.

              लाहोरमध्ये श्रीलंकन टीमवर जेंव्हा हल्ला झाला त्यावेळी घरच्यांचा विचार करण्यापूर्वी आपले टीममधले सर्व कितपत सुखरुप आहेत, याचा विचार आपल्या मनात आल्याचं महेलानं त्यानंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं.  जखमी खेळाडूंची वैद्यकीय मदत आणि या जीवघेण्या हल्ल्यानंतर घरच्यांचा विचार न करता टीममधल्या सहका-यांचे मनोधैर्य खचणार नाही याची काळजी वाटणं यासाठी तुमच्या मानसिकतेमध्ये गौतम बुद्धांच्या मानसिकतेचा काही तरी अंश असायला हवा. महेला जयवर्धनेच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर श्रीलंकन क्रिकेटचा बुद्ध ही उपमा त्या निश्चितच चपखलपणे लागू होते.

     
         

1 comment:

PICKYOUPIC said...

Fantastic and Knowledgeable Blog...Thanks for Sharing!!!
Best photographer in Allahabad

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...