Tuesday, February 1, 2011

वर्ल्ड कपचे दावेदार ( भाग 3 ) ---- ऑस्ट्रेलिया


ऑस्ट्रेलिया. 'बस नाम ही काफी है'. या शब्दात या क्रिकेट टीमचे वर्णन करावे लागेल. फुटबॉल वर्ल्ड कप म्हंटले की पहिला दावेदार म्हणून जसे ब्राझीलचे नाव येते त्याचप्रमाणे क्रिकेट वर्ल्ड कपच्या दावेदारांची यादी ऑस्ट्रेलियापासून सुरु होते. आतापर्यंत या टीमने 4 वर्ल्ड कप विजेतेपदे ( 1987,1999,2003, 2007 )  आणि 2 उपविजेतेपदे ( 1975,1996 ) पटकावली आहेत.वर्ल्ड कप विजेतेपदाची हॅटट्रिक नोंदवणारी एकमेव टीम ऑस्ट्रेलिया आहे. एवढंच नाही तर 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने साखळी लढतीत त्यांना 10 रन्सने पराभूत केले होते. त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये या टीमने वर्ल्ड कपमध्ये एकही पराभव पाहिलेला नाही. सलग 29 वर्ल्ड कप मॅचेस जिंकण्याचा रेकॉर्ड याच टीमच्या नावावर आहे. या टीमची क्रिकेटमधली दादागिरी इतकी आहे की मागच्या तीन्ही वर्ल्ड कप फायनल त्यांनी अगदी एकतर्फी जिंकल्यात. अशीही वन-डे क्रिकेटमधली नंबर 1 टीम आपले विजेतेपद राखण्याच्या उद्देशाने भारतीय उपखंडात 'जी जानसे' खेळणार आहे.

       ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी 2010 हे वर्ष अत्यंत खराब गेले. टेस्ट क्रिकेटमध्ये तर कांगारुंचा कडेलोट झाला.  मात्र इंग्लंड विरुद्धची वन-डे सीरिज जिंकून त्यांनी आपली ताकत दाखवून दिली आहे. आजही वन-डेमध्ये नंबर 1 वर असलेल्या या टीममध्ये अनेक मॅचविनर्स खेळाडूंचा समावेश आहे.

                   रिकी पॉन्टिंग आणि माईक हसी या दोन प्रमुख प्लेअर्सला झालेली दुखापत हा ऑस्ट्रेलिया समोरचा सर्वात मुख्य प्रश्न आहे. ह्या दोन्ही प्लेअर्सनी यामुळे इंग्लंड विरुद्धची सीरिज खेळलेली नाही. वर्ल्ड कपपर्यंत पॉन्टिंग फिट होईल पण हसी चे काय ? एक झुंजार प्लेअर असलेला हसी कांगारुंच्या कॅम्पमधला महत्वाचा खेळाडू आहे. पाचव्या किंवा 6 व्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन एक फिनिशरची भूमिका पार पाडण्याचा त्याचा हातखंडा आहे.असा हसी वर्ल्ड कपमध्ये नसला तर त्याची कमी कांगारूंना नक्की जाणवेल. हसीच्या ऐवजी शॉन मार्शचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. पश्चिम ऑस्ट्रेलियाचा हा बॅट्समन आयपीएलच्या पहिल्या सीझनमधला टॉप स्कोअरर होता. इंग्लंड विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये सेंच्युरी  झळकावून त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलीय. मात्र आघाडीचा बॅट्समन असलेल्या मार्शला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळावे लागेल. त्यामुळे एक फिनिशर म्हणून त्याची चांगलीच कसोटी लागू  शकते.

                  गिलख्रिस्ट-हेडन ही प्रतिस्पर्ध्यांना धडकी  भरवणारी ओपनिंग जोडी यंदा ऑस्ट्रेलियाकडे नाही.  वॉटसन- हॅडिन त्यांच्या इनिंगची सुरुवात करेल. सध्याच्या वन-डे क्रिकेटमधला एक  बेस्ट ऑलराऊंडर म्हणजे शेन वॉटसन. ऑस्ट्रेलियाला आपले विजेतेपद राखायचे असेल तर वॉटसन पूर्ण भरात असणे आवश्यक आहे. मेलबॉर्नमध्ये याच वर्षी त्यानं इंग्लंड विरुद्ध 161 रन्सची जबरदस्त इनिंग खेळलीय. भारतीय पिचवरची त्याची कमाल आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये सर्वांनी पाहिलीच आहे. ऑस्ट्रेलियाच्या भक्कम इनिंगची पायाभरणी करण्याचे काम वॉटसनला करावे लागेल. त्यानंतर बॅटिंगला येणारे रिकी पॉन्टिंग आणि मायकल क्लार्क हे पूर्णपणे भरात नाहीयंत. इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पराभव झाल्यानं पॉन्टिंगच्या करियरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यातचं बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्यापुढच्या अडचणी आणखी वाढल्यात. पण हा रिकी पॉन्टिंग आहे. आव्हानांना शिंगावर घेऊन त्याला मैदानाच्या बाहेर फेकणारा पॉन्टिंग क्रिकेट जगाने यापूर्वी  ( आठवा 2003 ची वर्ल्ड कप फायनल ) पाहिलाय. आता  करियरच्या उतरणीला लागलेल्या पॉन्टिंगला आपली आजवरची प्रतिष्ठा जपण्यासाठी या वर्ल्ड कपमध्ये सर्वस्व लावावे लागेल. सलग 3 वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव कॅप्टन बनण्याची अभूतपूर्व संधी  त्याला आहे. पॉन्टिंगचा वारसदार म्हणून ओळखला जाणारा मायकल क्लार्क ही कांगारुंपुढची सर्वात कमजोर कडी आहे. क्लार्कचा फॉर्म सध्या पार हरपलाय. काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये  अगदी शाळकरी क्रिकेटच फॅन्सकडून बॅटिंगचे जाहीर सल्ले ऐकण्याची वेळ सध्या त्याच्यावर आली होती. अनुभव, पूर्व लौकीक आणि कॅप्टनसी याचे कौशल्य याच्या जोरावर त्याची टीममध्ये निवड झालीय. पण त्याच्या खराब फ़ॉर्ममुळे तो टीममची कमजोर कडी ठरु शकतो.


  आघाडीच्या फळीतल्या बॅट्समन्सच्या खराब फॉर्ममुळे ( वॉटसन वगळता ) ऑेस्ट्रेलियाच्या मिडल ऑर्डरला मोठी जबाबदारी उचलावी लागेल.. कॅमेरुन व्हाईट आणि डेव्हिड हसी हे दोन अस्सल आक्रमक बॅट्समन त्यांच्या मिडल ऑर्डरमध्ये आहेत. व्हाईट हा मोठी गुणवत्ता असलेला बॅट्समन आहे. तो कांगारुंचा भावी कॅप्टन आहे असे मी मानतो. काही ओव्हर्समध्ये मोठा झंझावात निर्माण करण्याची त्याची क्षमता आपण विशाखापट्टनम वन-डे मध्ये पाहिली आहे. कांगारुंच्या जनरेशन नेक्सटमधला हा बॅट्समन या वर्ल्ड कपमध्ये काय कामगिरी करतो ह्याकडे माझे लक्ष्य लागलंय. डेव्हिड हसीही स्ट्रोक प्लेअर आहे हे आपण आयपीएलमध्ये पाहिलं आहे. मात्र या दोघांच्यानंतर येणारा माईक हसी अनफिट असेल तर कांगारुंचे समीकरण बिघडू शकते. त्यांनी जॉन हॅस्टिंग्स या अनअनुभवी ऑल राऊंडरवर मोठा विश्वास दाखवलाय.त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियन बॉलिंगमध्ये वैविध्यता आलीय. पण हॅस्टिंगच्या बॅटिंगचे काय ? ब्रॅड हॉज या अनुभवी ऑल राऊंडरला वगळण्याचा जुगार कांगारुंना महाग पडू शकतो. 8 देशांतर्गत वन-डे मॅचमध्ये हॉजनं 82 च्या सरासरीने 494 रन्स केलेत. त्यामध्ये 3 सेंच्युरिचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट आहे 97. अशा जबरदस्त फॉर्मात असलेल्या हॉजला वगळून एक मोठे धाडस ऑस्ट्रेलियन निवड समितीने केले आहे. विशेषत: माईक हसीचा सहभाग अनिश्चित असताना हॉजची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवू शकते.  भारतीय उपखंडातला त्याचा अनुभवही टीमला कामी आला असता.  बहुउपयोगी अशा  हॉजला वगळून ऑस्ट्रेलियन निवड समितीने आपणही इतर देशांच्या निवड समितीपेक्षा वेगळे नसल्याचे दाखवून दिलंय.

            

          शॉन टेट, मिचेल जॉन्सन. ब्रेट ली आणि डग बोलिंगर हे चार फास्टर  या टीममध्ये आहेत. हे चारही कांगारुंचे सर्वात चांगले बॉलर आहेत. पण चौघेही मोठे महागडेही ठरु शकतात. विशेषत: ब्रेट ली आणि शॉन टेट  यांच्या इकॉनॉमी रेटमध्ये वारंवार चढ- उतार पाहयला मिळतो.मात्र या चौघांमध्येही प्रचंड वेगाने अचूक मारा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ही फास्ट बॉलर्सची फौज कांगारुंची मोठी शक्ती आहे. डर्क नान्स आणि पीटर सीडल हे दोघं यंदा कमनशिबी ठरले.आता या चौघांपैकी कोणी जखमी झाल्यास यापैकी एकाची टीममध्ये निवड होऊ शकते. त्याचप्रमाणे शेन वॉटसन हा उपयुक्त फास्ट बॉलरही उपखंडातल्या पिचवर मोठा उपयोगी पडू शकतो.

      स्पिन बॉलिंगमध्ये कांगारुंची यादी शेन वॉर्नपाशी सुरु होते... आणि वॉर्नवरच संपते. वॉर्ननंतर त्यांचा स्पिनर्सचा सुरु असलेला शोध अजुनही संपलेला नाही. नॅथन हॉरित्झ हा एकमेव फूल टाईम स्पिनर या टीममध्ये आहे. हॉरित्झनं भारतामध्ये यापूर्वी 70 च्या सरासरीने केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत. संपूर्ण ऍशेस सीरिजमध्ये हॉरित्झचा ऑस्ट्रेलियन निवड समितीला विसर पडला होता. आता थेट त्याला वर्ल्ड कपचे तिकूीट देण्यात आलं आहे. हॉरित्झच्या मदतीला डेव्हिड हसी आणि स्टीव्ह स्मिथ हे पार्ट टाईम स्पिनर 10 ओव्हर्सचा कोटा पूर्ण करु शकतात. पण भारतीय उपखंडातल्या पिचवर एकही धोकादायक स्पिनर नसणे ही ऑस्ट्रेलियन बॉलिंगसमोरची मोठी डोकेदुखी आहे. त्यांच्या बॉलिंग  ऐटॅकला कमजोर स्पिनर दुबळा बनवू शकतो.त्याशिवाय ब्रॅड हॅडिन आणि टीम पेन हे दोन विकेट किपर या विश्वविजेत्या टीममध्ये आहेत. एक ओपनर आणि चांगला किपर या नात्याने हॅडिनचा अंतिम 11 मधला समावेश नक्की आहे.

             या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्रुप A मध्ये समावेश करण्यात आलाय. या ग्रुपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान या माजी विश्वविजेत्या टीमबरोबरचं कांगारुंचा कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचाही समावेश आहे. तसेच झिम्ब्बावे, कॅनडा आणि केनिया या दुबळ्या टीमही या ग्रुपमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्वार्टर फायनलमधला प्रवेश निश्चित आहे. मात्र ते आपल्या ग्रुपमध्ये अव्वल क्रमांक राखणार का हे सांगणे अवघड आहे. कांगारुंचा पहिला क्रमांक हुकल्यास भारत, दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंड या आणखी धोकादायक टीमशी त्यांचा क्वार्टर फायनलमध्ये मुकाबला होऊ शकतो.

    ऑस्ट्रेलियाचे टेस्टमधले साम्राज्य तर आता खालसा झालंय. आता वन-डेमधील त्यांची एकाधिकारशाही संपवण्यासाठी सर्वच टीम आतुर आहेत. या सर्वच टीम्सना यापूर्वीच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी केंव्हा ना केंव्हा या टीम्सना मानहानीकाररित्या पराभूत केले आहे. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी प्रत्येक टीम आणखी त्वेषाने खेळेल.ऑस्ट्रेलियाचे वन-डे साम्राज्य नष्ट करण्यासाठी ' एक धक्का और दो' अशीच काहीशी घोषणा अन्य देशांची असेल. त्यामुळे मागच्या १२ वर्षांपासून आपल्याकडे असलेल्या वर्ल्ड कपचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक ऑस्ट्रेलियन प्लेअरला यंदा आपल्या क्षमतेच्या १०० नाही तर २०० टक्के खेळ खेळावा लागणार आहे.

9 comments:

Niranjan Welankar said...

लेख नेहमीप्रमाणेच जोरदार आहे. भरपूर माहिती; मनाला भिडणारं वर्णन आणि विश्लेषण ह्यामुळे वाचनीय होतो. काही कमेंटस किंचित खटकतात- उदा., ऑस्ट्रेलियाचं कसोटी साम्राज्य खालसा. एक बोलावसं वाटतं, की लेखनाची गुणवत्ता नि:संशय दर्जेदार आहे. पण दर्जा तोच आहे; त्यामध्ये लेखकाच्या अनुभवाच्या आणि योग्यतेच्या दृष्टीने अपेक्षित ती पुढील वाटचाल फारशी जाणवत नाही. ब्लॉग लेखन हे निव्वळ माहिती देणं किंवा न्यूज रिपोर्टिंग/ विश्लेषण असं न मानता त्याहून व्यापक मानलं; तर ह्यामध्ये अजूनही सौंदर्य आणता येईल. म्हणजे; काहीसं संझगिरींच्या वर्णनाप्रमाणे- “शेवटच्या दोन खेळाडुंना घेऊन मॅच ड्रॉ करणे म्हणजे ऑक्सीजन न घेता एव्हरेस्टवर चढण्यासारखं आहे.” किंवा “2003 वर्ल्ड कप सेमीफायनलच्या केनियाविरुद्धच्या मॅचमध्ये युवराज आला, सेट झाला आणि तेव्हा भारतीय डावाचं टॅहा टॅहा ऐकू आलं (बाळसं धरलं; इतका तोपर्यंतचा डाव अवघड होता)” असं. लेखकाने ती उंची गाठावी आणि स्वत:च्या प्रतिभेला आणि योग्यतेला न्याय द्यावा; त्यात काहीच वावगं नाही असं वाटतं. धन्यवाद.

Niranjan Welankar said...

क्षमस्व; प्रतिक्रेयेमध्ये उल्लेख केला ती भारत- केनिया मॅच सेमीफायनल नसून सुपर लीगमधली होती. धन्यवाद.

Onkar Danke said...

@ निरंजन सर्वप्रथम मनमोकळ्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. मला केवळ ब्लॉग चांगला होता..या टिपीकल प्रतिक्रीया नको आहे्त.अशाच प्रकारच्या सूचना माझ्या लेखनाला नवा आयाम देण्यास मदत करतील.

लेखन विश्लेषनाच्या बाबतीत कमी पडत असेल. ते अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न नक्की करेल. पण सध्या सुरु असलेल्या सीरिजचा उल्लेख केवळ वाचकांना प्रमुख दावेदार टीमची ओळख करु देणं हाच आहे. यामध्ये त्यांचा पूर्व इतिहास, सध्याचा फॉर्म, टीमचे कॉम्बिनेशन आणि विजेतेपदाची दावेदरी ह्या विषांना धरुन लेखन करण्याचे मी ठरवले आहे.ही सर्व माहिती अन्य वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांवर येत असेलही...पण माझा ब्लॉग या सर्वांच्या तोडीचा करण्याचा माझा प्रयत्न आहे. किंबहुना माझा ब्लॉग वाचल्यावर किमान एका वाचकाला तरी या टीम्सबाबत अन्य कोणत्याही ठिकाणी वाचण्याची गरज पडली नाही तर माझा ब्लॉग लेखनाचा काहाणी सूफळ संपन्न होईल.

भरपूर माहिती देणं ही माझी शैली आहे. त्यामध्ये सौंदर्य आणण्यासाठी प्रयत्न करता येतील. पण निव्वळ संझगिरी स्टाईलने लिहणं मला जमणार नाही. संझगिरींच्या स्टाईलने लिहलेले वाचण्यासाठी संझगिरींचे लेख आहेत. तोच शोध या ठिकाणी घेऊ नये.

माझ्याकडून संझगिरी टाईप लेखनाची अपेक्षा करणे म्हणजे हरभजन सिंगला तो केवळ सरदार आहे म्हणून बिशनसिंग बेदींसारखी बॉलिंग टाक असे सांगण्यासारखे आहे. ( कदाचित अशाप्रकारच्या उदाहरणामुळे तुला लवकर समजेल. )

साधक said...

ओंकार,
माहिती छान आहे. तुझे ब्लॉग वाचून एवढी माहिती मिळावी की तुझ्या वाचकाला कुठेही मित्रांसोबत गप्पा मारताना आपल्याला हे माहित नाही ते माहित नाही असं होवू नये.
बास. >>एका वाचकाला तरी या टीम्सबाबत अन्य कोणत्याही ठिकाणी वाचण्याची गरज पडली नाही तर माझा ब्लॉग लेखनाचा काहाणी सूफळ संपन्न होईल.
उद्दिष्ट छान आहे.

Onkar Danke said...

@ साधक, धन्यवाद मित्रा

Unknown said...

ऑस्ट्रेलिया:- अ‍ॅशेस हारल्यावर ऑसीज एकदम पेटले आहेत, इंग्लंडला हारवुन त्यांनी दाखवुन दिले आहे की वन डे मध्ये त्यांना हारवणे खुप कठिण आहे, ब्रेट ली चे पुनरागमन त्यांच्या पथ्यावर पडणारे आहे, तसच वॅटसनचा जबरदस्त फॉर्म आणि मायकल क्लार्कचे फॉर्ममध्ये येणे यामुळे ऑसीज पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी सज्ज आहेत. ऑस्ट्रेलियाचे एक सांगायचे तर मोठ्या मॅचेसच्या वेळेस ते मानसिक दृष्ट्या इतर टीम्स पेक्षा अधिक चांगल्याप्रकारे तयार असतात. त्यामुळे त्यांचा खेळ आपोआपच उंचावतो. तसच अ‍ॅशेस हारल्यानंतर पॉंटिंगवर सर्व ठिकाणुन टीका झाली आहे आणि वर्ल्डकप जिंकणे हे या टीकेला एक जबरदस्त उत्तर असेल.

megha kuchik said...

article nehamipramane mahitipurn aahe...pan thod moth aahe vachak kadachit motha lekh vachayala kantaltil pan sachha cricket fan nakki vachel...konachi nakkal karayachi(dwarkanah vaigare) garaj nahi tu tuzi vegali style develop karu shakatos....

Onkar Danke said...

@ गौरव ऑस्ट्रेलियाचे एक सांगायचे तर मोठ्या मॅचेसच्या वेळेस ते मानसिक दृष्ट्या इतर टीम्स पेक्षा अधिक चांगल्याप्रकारे तयार असतात. त्यामुळे त्यांचा खेळ आपोआपच उंचावतो. तसच अ‍ॅशेस हारल्यानंतर पॉंटिंगवर सर्व ठिकाणुन टीका झाली आहे आणि वर्ल्डकप जिंकणे हे या टीकेला एक जबरदस्त उत्तर असेल.

अगदी बरोबर आहे. त्यामुळेच ते या वर्ल्ड कपचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत.

Onkar Danke said...

@ मेघा, प्रतिक्रीयेसाठी धन्यवाद.
पोस्ट थोडी मोठी झालीय हे खरं आहे. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेट माझा अभ्यासाचा विषय असल्यानं त्याबाबत लिहताना हात थांबत नाहीत. की हात थांबत मनात आलं ते झरझर ब्लॉगवर उतरुन टाकलं.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...