Showing posts with label Mumbai. Show all posts
Showing posts with label Mumbai. Show all posts

Friday, February 5, 2010

मराठीचे प्रयोग !


महाराष्ट्रापुढचे सर्व प्रश्न बहुधा संपले आहेत. राज्यात इतका उजेड पडलाय की आता भारनियमन कुणाला आठवत नाही. गहू, साखर सर्व आवश्यक वस्तू आता मुबलक प्रमाणात मिळू लागल्यात. सिंचनाचा अनुशेष केंव्हाच भरलाय. कुपोषणाची समस्या संपलीय. नक्षलवाद्यांनी आता शस्त्र खाली ठेवलीत. सवर्ण-दलित यांच्यातली दरी संपलीय. त्यामुळे आता एकचं प्रश्न आता महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना सतावतोय तो म्हणजे मराठीचा अभिमान टिकला पाहिजे. या राज्यात मराठी भाषेला गंभीर धोका निर्माण झालाय. त्यामुळे आता मराठीच्या रक्षण करणे हेच विरोधीपक्ष ( शिवसेना आणि मनसे ) यांचे मुख्य काम उरलंय. मराठी, मराठी, मराठी अगदी कंटाळा आलाय आता या चावून चावून चोथा झालेल्या मुद्याचा.


मी मराठी आहे. मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मी त्याच्या अगोदर मी भारतीय आहे. भारतीय असण्याचा मला गर्व आहे. पण हे मी उघडपणे बोलू लागलो की मी महाराष्ट्र द्रोही ठरतो. तरी नशीब मी कोणी मोठा सेलिब्रिटी नाही. नाही तर लगेच माझ्यावर बंदीचे फतवे छापले गेले असते. मुंबई भारतीयांची आहे.असं म्हणा-या व्यक्तींना एकटं पाडण्याचे प्रयत्न केले जातायत.


राजकीय पक्षांचे ठिक आहे हो.... तो त्यांचा धंदाच आहे. पण माध्यमांचे काय ? राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सध्या सर्व हिंदी मीडिया तुटून पडलाय. राज-उद्धव यांचा मराठीचा गजर स्वार्थी आहे हे मान्य आहे. पण ही माध्यमं टीआरपीची रॅट रेस जिंकण्यासाठी मराठी द्वेषाचे बीज हिंदी भाषकांच्या मनात निर्माण करण्याचे काम करतायत. राज ठाकरेंना कधी भिंद्रानवाले तर कधी महंमद अली जिना संबोधण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. राज ठाकरेंचे भाषण हे आग आणि किंवा जहर ओकणारे असते आणि अबु आझमी किंवा मुलायमसिंग यांच्या भाषणातून ज्ञानेश्वरांच्या ओव्या बाहेर पडत असतात का ? लालू- मुलायम उघडपणे सिमी सारख्या दहशतवादी संघटनेचे समर्थन करतात.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग यांना बटाला हाऊसमधले एन्काउंटर हे बनावट असल्याचा साक्षात्कार आता होतो. पण ही मंडळी धर्मनिरपेक्षता या गोंडस नावाखाली त्याकडे दुर्लक्ष करतात.पण राज आणि उद्धव यांना खलनायक ठरवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.


मला मान्य आहे की वरील दोन्ही परिच्छेदामधील मुद्दे हे काहीसे परस्परभिन्न आहेत.पण गेल्या काही दिवसांत या सा-या घडामोडी इतक्या वेगाने घडतायत की डोक्याचा पार ' केमीकल लोचा ' झालाय.अगदी अटलजींच्या शब्दात सांगयाचे तर,'' कौरव कोण पांडव कोण बडा तेढा सवाल है चारों और शकुनी का फैला मायजाल है ''असं म्हणण्याची पाळी माझ्यावर येतीय.


आता या सर्व गदारोळात भर पडलीय ती राहुल गांधींची. अनेकांना ते युथ आयकॉन वाटतात. काँग्रेसी कार्यकर्त्यांना ते मर्यादा पुरुषोत्तम आणि अगदी भावी पंतप्रधान वाटतात.गांधी घराण्याचा पंतप्रधान असता तर बाबरी मशीद पडलीच नसती. अशी दर्पोक्ती काही वर्षांपूर्वी करणारे हेच ते राहुल गांधी आहेत.आता काँग्रेसच्या या युवराजांना राज्याभिषेक करण्याची घाई झालीय. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये होणा-या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या महत्वकांक्षेने त्यांना सध्या झपाटलंय. निवडणुका जिंकणे ही राजकीय नेत्यांची महत्वकांक्षा असणे स्वाभाविक आहे. पण बिहारच्या निवडणुका जिंकण्याकरता महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यातली दरी वाढवण्याचे काम ते करत आहेत.


खरं तर प्रादेशिक अस्मितांना गोंजारण्याचे काम काँग्रेसी राज्यकर्त्यांनी वारंवार केलंय. भिंद्रनवालेचे पंजाबमध्ये भूत इंदिरा गांधींनी निर्माण केले होते. वेगळ्या काश्मीरचा नारा देणा-या पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या सारख्या प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसने अनेकदा युती केलीय.सुरवातीच्या काळात शिवसेना आणि नंतर मनसे यांना मोठं करण्याचे काम काँग्रेसने केलंय. एवढंच नाही तर प्रभाकरन चे समर्थन करणा-या, राजीव गांधींच्या हत्येची चौकशी करणा-या जैन आयोगाच्या अहवालात ज्यांच्यावर ठपका ठेवलाय अशा द्रमुक पक्षाबरोबर काँग्रेसची गेल्या साडेपाच वर्षांपासून युती आहे.सत्तेसाठी सर्व प्रकारचे मार्ग वैध समजण्याची प्रथा सर्वप्रथम काँग्रेसने सुरु केली. आज प्रत्येक राजकीय पक्ष ही प्रथा अगदी कसोशीने पाळतायत.


आता राहुल गांधींना बिहारची निवडणूक जिंकण्याची स्वप्न पडतायत. यासाठी देशाकरता लढणा-या सैन्यामध्ये प्रांतीय भेद निर्माण करण्याचे काम ते करतायत. भारतीय लष्करांमध्ये लढणा-या जवांनांना प्रांत, जात, धर्म नसतो. त्यांचा केवळ एकच देश असतो तो म्हणजे भारत. आजवर सर्वच राज्यांनी राज्यकर्त्यांनी ह्याचे भान पाळलंय. मात्र अनेक मोठ्या (?) व्यक्ती ज्यांना भावी पंतप्रधान समजतात अशा राहुल गांधींना सभेत भाषण करत असताना याचे भान राहीलेले नाही.


बरं महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. 105 जणांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालीय. ही एकच टेप बाळासाहेबांची आणि राजसाहेबांची सेना कायम वाजवत असते. ( संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या बद्दल मला आदर आहे.कृपया कोणताही गैरसमज करु नये.) परंतु या व्यक्तींच्या बलिदानाचा राजकीय वापर किती काळ करणार ? शिवरायांच्या पुण्याईवर जगणारी उत्तर पेशवाई इंग्रजांनी बुडवली. आता हे नाकर्ते राज्यकर्ते महाराष्ट्र बुडवण्यास सज्ज झाले आहेत.


महाराष्ट्रातल्या निम्या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. महागाईने सामान्य नागरिकांना जगणे नकोसे झालंय.मानव विकास निर्देशांकात राज्यातले अनेक जिल्हे मागे पडलीत. विभागवार अनुशेष वाढत चाललाय. मोठे उद्योग राज्यात येत नाहीत.शहरे बकाल आणि खेडी भकास बनत चाललीत. पण त्याची पर्वा कुणाला आहे ? महागाईच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अशोक चव्हाण अनुपस्थित राहीले. कारण त्यांना राहुल गांधींचे स्वागत करायचे होते.राज्याचा मुख्यमंत्री सुमारे दोन तास घाटकोपरमध्ये काँग्रेसच्या युवराजाची प्रतिक्षा करत होते. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेचे जबाबदारी आहे. पण त्यांना राहुल गांधींचे जोडे सांभाळणे महत्वाचे वाटले.संजय गांधींचे जोडे सांभाळण्याचे काम शंकरराव चव्हाण यांनी केलं होत. त्याच ग्रेट काँग्रेसी परंपरेचं पालन रमेश बागवे करत आहेत.


राहुल गांधींचा मुंबई दौरा हा तसा या राज्यासाठी महत्वाचा विषय नाही.पण ही जणू काही एखाद्या स्वातंत्र्यसेनानीचा दौरा होता. राहुल गांधी हे जणू सुभाषचंद्र बोस यांचे अवतार ! त्यांनी शिवसैनिकांच्या हातावर तूरी देऊन लोकलने कसा प्रवास केला.याची वर्णने केली जातील.शिवसेना संपली,वाघ घायळ झाला, मुंबई जिंकली, ठारे हरले अशा प्रकारच्या हेडलाईन्सला आता जोर येईल. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना पुन्हा एखादा नवा ड्रामा करेल. त्यावर तुरी देण्यासाठी राज ठाकरेंचे नवे प्रयोग.... महाराष्ट्रातले सर्व प्रश्न संपले आहेत. महाराष्ट्र आबादी -आबाद आहे. त्यामुळे या मराठीच्या प्रयोगाला पुन्हा सर्वत्र जोर येऊ लागेल.

Tuesday, December 9, 2008

इलेक्ट्रॉनिक मिडिया नवे सॉफ्ट टार्गेट


महाराष्ट्रात कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट घडली तर त्याला गोष्टीला शरद पवारचं जवाबदार आहेत.असं म्हणायची पद्धत गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रचलित आहे.(याला वैतागून लातूरचा भूंकपही मीच घडवला असा आरोप करा असं शरद पवार एकदा म्हणाले होते) त्याच प्रमाणे देशातल्या कोणत्याही घटनेनंतर त्या घटनेची भीषणता वाढण्यास इलेक्ट्रॉनिक मिडियाचं जवाबदार आहे असा आरोप अशा प्रकारचा नवा ट्रेंड सर्वत्र (विशेषत: मुद्रीत माध्यमांमध्ये) प्रचलीत झालाय. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियावर वेगवेगळे आरोप करण्याची जणी स्पर्धाचं वाढलीय. ही स्पर्धा सध्या इतकी वाढलीय की हा हल्ला आपला टिआरपी वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिडियानंचं घडवून आणला असा आरोप कोणी केला तर मला याचं आश्चर्य वाटणारं नाही.

सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की मुंबईवरचा हा हल्ला एवढा भयानक असेल की याची कल्पना सुरवातीच्या काही तासात कोणालाचं आली नव्हती.अगदी इलेक्ट्रॉनिक मिडियाही त्याला अपवाद नाही.असं असतानाही ह्या हल्ल्ल्याच्या काळात कोणतीही चूकीची अथवा भीती पसरेल अशा प्रकारची बातमी जाणार नाही याची आंम्ही सारे जण काळजी घेत होतो.26/11 च्या रात्री सा-या बातम्या इतक्या वेगानं येऊन आदळंत होत्या की त्या कुठून येतायत हेही कळत नव्हतं.अशा परिस्थीतही देशात कोणत्याही प्रकारचा तणाव वाढेल अशी बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिली नाही.अशा भयानक परिस्थीतीमध्ये अत्यंत संयमानं वार्तांकन कराव याची जाणीव आंम्हा सर्व पत्रकारांना नक्कीच आहे.त्यामुळेच मृतदेह,सांडलेल्या रक्ताचा सडा,अथवा असाप्रकारचे बटबटीत अनेक दृश्य आमच्याकडं असूनही आंम्ही ती दाखवण्याचं टाळलं. तसंच यासंबधीची जी दृश्य दाखवली गेली त्यामधल्या बटबटीत आणि चित्त विचलीत करु शकतील अशी दृश्यांना ''ब्लर'' ही करण्यात आलं होत.

हेमंत करकरे आणि अन्य पोलीस अधिका-यांचा मृत्यू इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळेच झाला.अशी बातमी एका माझ्या आवडत्या वृत्तपत्राच्या संकेत स्थळावर मी वाचली होती. एकांगी विचाराचा हा अस्सल नमुना आहे.वास्ताविक ज्यावेळी सगळीकडून अंदाधुंद गोळीबार होत होता त्यावेळी टीव्ही बघायला या अधिका-यांना वेळ तरी होता का ? उलट खराब दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळेचं या अधिका-यांचा मृत्यू झाला.ही वस्तुस्थीती सरकारसमोर मांडण्याचं काम इलेकट्रॉनिक माध्यमांनीचं सर्वप्रथम केलं.दुसरा आणखी एक फालतू मुद्दा म्हणजे की अतिरेक्यांना टीव्हीमुळे बाहेर काय चालले आहे याची खडा न् खडा माहिती मिळत होती.जणू काही तुमच्या वाहिन्यांवरच्या बातम्या बघूनच ते त्यांची रणनीती ठरवत होते. असा लोकांचा समज होता. पण या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, हे सर्व अतिरेकी अत्यंत तयारीने आले होते आणि आपल्याला काय करायचे आहे याचे पूर्ण भान त्यांना होते म्हणून ते मुंबईचे एवढे नुकसान करु शकले.ताज आणि ओबेरॉय मधील विद्युतप्रवाह आणि टीव्ही कनेक्शन त्वरीत बंद केले होते याची माहिती जनतेसमोर दडवण्यातचं अनेकजण धन्यता मानत आहेत.

उलट ह्या हल्ल्याची परिणामकारता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळेच तात्काळ सा-या जगभरात पोचली.हा हल्ला किती गंभीर आहे.ह्याची जाणीव देशातल्या नागरिकांना या बातम्यांमुळे तात्काळ झाली.त्यामुळेच या हल्ल्याच्या दुस-या दिवशी अनेक मुंबईकरांनी घराबाहेर जाणं टाळलं.त्यामुळे मुंबईच्या व्यवस्थेवर निर्माण होणारा ताण यामुळेचं टळला.या महत्वाच्या प्रसंगी राजकीय नेत्यांची असंवेदनशीलता सर्वांपर्यंत पोचवण्याचं कामही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीच केलं. आर.आर.पाटलंच या हल्ल्याबाबतचं धक्कादायक विधान,विलासराव देशमुखांची ताज टूर याच माध्यमांमुळे जनतेपर्यंत पोचली. शिवराज पाटील सारख्या संवेदनशून्य नेत्याचे 'कपडे' काढण्याचं काम इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीचं अनेक वेळा केलं आहे.

ह्या हल्ल्याच्या पाठिमागेही पाकिस्तानचं कनेक्शन आहे.ह्याची जाणीव अगदी पहिल्याच क्षणी सा-यांना झाली होती.तरीही ठोस पुरावा हाती आल्याशिवाय या प्रकरणात पाकिस्तानचं नावं घेणं इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी टाळंलं.ह्या नाजूक क्षणी कोणताही नवा तणाव निर्माण होणार नाही ह्याची काळजी सर्व माध्यमं घेत होती.एक याबाबत आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की इलेक्ट्रॉनिक मिडियात कोणतीही बातमी सांगताना ती बातमी सिद्ध करणारी VISUALS , BYTE असल्याशिवाय दाखवता येत नाही.बाप दाखव नाही तर श्राद्ध करं असा हा प्रकार असतो.उलट वृत्तपत्रामधल्या अनेक बातम्या ह्या टेबल न्यूज असतात हे अगजी उघड गूपीत आहे.कदाचित याच कारणामुळे इलेक्ट्रॉनिक मिडियाची सर्वसामान्य जनतेमधली विश्वासहर्ता जास्त आहे.(नेमक्या याच असूये पोटी इलेक्ट्रॉनिक मिडियाला वारंवार टार्गेट केलं जात नसेल ना ? )

युद्ध, दहशतवादी हल्ला अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये माध्यमांचं व्यवस्थापन कसं करावं याचं व्यवस्थापन या देशात अजूनही विकसीत झालेलं नाही.ओबेरॉय हॉटेलमध्ये झालेल्या कमांडो कारवाईची दृश्य दाखवली गेली नाही.कारण या ठिकाणी कारवाई करणा-या कमांडोमनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यमांना अशा प्रकारची सूचना केली होती.सर्वच माध्यमांनी ही सूचना पाळली.यापूर्वीही जम्मूमध्ये झालेल्या एका लष्करी ऑपरेशनमध्ये प्रसिद्धी माध्यमांना घटनास्थळाच्या दोन किलोमीटर आगोदरच थांबवण्यात आलं होतं.ह्या निर्णयालाही कोणत्यीच प्रतिनिधीनं विरोध केला नाही. अशा नाजूक प्रसंगी सरकारशी सहयोग आंम्ही नेहमीच केला आहे.मात्र सरकारी यंत्रणेमध्येच जर समन्वय नसेल तर या भोंगळ कारभारचं खापर इलेक्ट्रॉनिक मिडियावर फोडण्याचं काम सरकारकडून केलं जातं.

या देशात 24 तास काम करणा-या वृत्तवाहिन्याचं वय अवघी दहा वर्षे आहे. या अपु-या अनुभवामुळे या माध्यमांकडून कळत नकळत काही चूका झाल्या असतील.अशावेळी या चुका संमजसपणे निदर्शनास आणून देण्याचं काम या देशातल्या उज्जवल परंपरा असलेल्या वृत्तपत्रांनी करावं.या माध्यामातल्या पत्रकारांना हा वडीलकीचा नक्कीच अधिकार आहे.परंतु या पत्रकारांकडून सध्या उघड उघड भाऊबंदकी सुरु आहे. याच वृत्तपत्रांनी घालून दिलेल्या ट्रेंडच पालंन लबाड राजकारणी,बेजावबदार पोलीस अधिकारी किंवा निगरगट्ट प्रशासकही करु लागलेत.या सा-यांना इलेक्टॅनिक मिडियाच्या रुपानं एक नव स्फॉट टार्गेटचं सापडलंय.अशा प्रकारचा अंधाधुंद हल्ला आणखी किती काळ करायचा याचा विचार ज्यानं त्यानंच करायला हवा.

Saturday, November 29, 2008

मुंबई 26/11...


मुंबईसह सा-या देशाला 59 तास वेठीस धरणारा दहशतवाद्यांचा नंगानाच आता संपलाय.देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा चिंधड्या उडवणा-या या घटनेचे अनेक कंगोरे येणा-या काही दिवसात पुढं येतील.मात्र या घटनेतून तीन महत्वाच्या गोष्टी समोर येतायत.
यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या संपुर्णपणे चिंधड्या उडाल्या हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.यापुर्वीही कारगील युद्ध किंवा संसदेवरच्या हल्ल्याच्या प्रसंगीही ही गोष्ट समोर आली होती.या दारुण नामुष्कीनंतर वास्ताविक गुप्तचर यंत्रणेनं सावध राहयला हवं होत.मात्र तरीही ही यंत्रणा बेफीकीर राहीली.मुंबईच्या या ताज्या हल्ल्यानंतरतर आपल्या देशाची यंत्रणा जगातली सर्वात खराब गुप्तचर यंत्रणा आहे हेच सिद्ध झालंय.देशातली प्रत्येक इमारत आणि प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणं जगातल्या कोणत्याही पोलीस यंत्रणेला शक्य नाही.कोणत्याही दहशतवादाचा सामना हा गुप्तचर यंत्रणेच्या साह्यानंच केला जातो.आपली यंत्रणा याबाबत संपुर्णपणे झोपलेली होती.हे सर्व दोन डझन अतिरेकी बोटीनं भारतामध्ये आले.मुंबईमधल्या आपल्या इच्छित स्थळी जाऊन पोचले.या संपुर्ण स्थळांची माहिती त्यांच्याकडं होती.या सर्व दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक जण या शहराचे स्थानिक नागरिक होते.त्यांच्या या कार्याला अनेक जगभरातल्या अनेक ठिकाणांहून आर्थिक मदत केली गेली,मात्र याचा पत्ता गुप्तचर यंत्रणेला लागला नाही.हे सर्व दहशतवादी बिनभोबाटपणे शहरात घुसले.त्यांना हव्या त्या ठिकाणी नागरिकांना त्यांनी वेठीस धरलं आणि ठार मारलं.गेले अनेक दिवस वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड पकडले गेले हा भारतीय सुरक्षा यंत्रणेचा दावा किती बिनबूडाचा होता हेच यातून सिद्ध झालंय.
यामधून समोर आलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर चाललेला जिहाद दहशतवाद्यांनी भारतीय भूमीवरही पुढं सुरु ठेवला.ह्या पूर्वीच्या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवरुन मदत केली जायचे.त्यांच्या घातपातामागची कारणंही स्थानिक होती.(गुजरात दंगल, बाबरी ढाचा पाडणं इ...)मात्र या दहशतवाद्यांचे लक्ष्य वेगळं होत.अमेरिकन ब्रिटीश आणि इस्त्रायल ही दूष्ट राष्ट्रांची नागरिक हेच त्यांचं मुख्य टार्गेट होतं.ताज.ओबेरॉय किंवा नरिमन हाऊस ह्या वास्तू त्यांनी ताब्यात घेतल्या.ह्याचही हेच कारण होतं.धर्माची अफूची गोळी घेऊन जीवावर उदार झालेले हे संतप्त तरुण नव्हते.तर हे तरुण जागतिक दर्जाचे व्यवसायिक दहशतवादी होते.दहशतवादांच्या जागतिक युद्धात आता भारताची जमीनही वापरली जाणार ही गोष्ट या प्रकरणातून समोर आलीय.
या प्रकरणातली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा भारताच्या आर्थिक साम्राज्यावरचा हल्ला आहे.अमेरिकेवर 9/11ला झालेल्या या हल्ल्याशीच याची तुलना करावी लागेल.अल कायदानं वर्ल्ड ट्रेड सेंटर निवडलं कारण त्यांना अमेरिकेच्या आर्थिक गंडस्थळावर हल्ला करायचा होता.सा-या अमेरिकेची शान असलेली वास्तू त्यांनी उडवून लावली.या देशात कोणताच अमेरिकी नागरिक सुरक्षित नाही ही भिती त्यांना अमेरिक नागरिकांच्या मनात निर्माण करायची होती. नेमकी हीच भिती सर्व भारतीयांच्या मनात निर्माण व्हावी म्हणून अतिरेक्यांनी यंदाच्या हल्ल्याची ठिकाणं निवडली आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबईतली सर्वात क्रिम समजले जाणारी हॉटेल त्यांनी निवडली.दक्षिण मुंबई हा मुंबईतलाच नाही तर सा-या देशातला सर्वात सुरक्षित भाग समजला जातो.ताज आणि ओबेरॉयमध्ये येणारा व्यक्ती हा देशातला सर्वात उच्चभ्रू समाजातलाच असतो.जगातल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तसंच बॅंकांची मुख्यालंय या इमारतीमध्ये आहेत. या इमारतींना वेठीस धरुन अतिरेक्यांनी सा-या देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाच जबरी हादरा दिलाय.विकसीत भारताची स्वप्न देशांनी ज्या व्यक्तींच्या,संस्थेच्या जोरावर पाहिली होती,त्या नव्या युगाच्या स्वप्नांना या अतिरेकी हल्ल्यानं तडा दिलाय.दहशतवादाच्या 59 तास चाललेल्या नंग्यानाचानंतर या तीन महत्वाच्या बाबी समोर आल्यात.
भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही शक्ती आहे.या देशाला हाजारो वर्षांचा सांस्कृतीक इतिहास आहे.या देशाच्या लष्करी शक्तीचा सा-या जगात दरारा आहे.या देशाच्या आर्थिक शक्तीची सा-यांनाच आदरयुक्त जाणीव आहे.या महान भारत वर्षावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.अगदी बगदादमध्ये गेला महिनाभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईपेक्षा कमी नागरिक मारले गेलेत. सा-या देशासाठी या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकते.
अशा प्रकारचे हल्ले अमेरिका,ब्रिटनवर यापुर्वी झालेत.मात्र या देशांनी या हल्ल्यानंतर धडा घेतलाय.9/11 नंतर अमेरिकेनं जागतिक दबाबवाला बळी न पडता ( तसंच मानवअधिकार आयोगाच्या थयथयाटाकडं दुर्लक्ष करतं ) आपली संरक्षण व्यवस्था भक्कम केलीय.त्यामुळेच दहशतवाद्यांना आता अमेरिकेऐवजी भारतासारखी 'सॉफ्ट टार्गेट' निवडावी लागत आहेत. भारतावर अशा प्रकारचा हल्ला होणार आणि त्या हल्ल्याला पाकिस्तानचे मदत मिळणार याची माहिती आपल्याला होती.तरीही आपलं सरकार गाफील राहील,त्याचे परिणाम आज शंभर कोटींचा देश भोगतोय.
आताही केंद्र सरकारनी अनेक आश्वासनं दिली आहेत मात्र आता आपल्याला आश्वासनं नको कृती हवी आहे.नुसती सैन्याची जमवाजमव नकोय तर या देश तोडणा-या परकीय शक्तीं विरुद्ध आर पारची लढई हवी आहे...


LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...