Wednesday, November 19, 2008

इंदिरा आणि भारत !


19 नोव्हेंबर हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही.याच दिवशी माझ्या बाबांचा वाढदिवस असतो.माझ्या आयुष्यातल्या आजवरच्या आणि यापुढच्या आयुष्यातही बाबांचा प्रभाव कायम राहील.मात्र स्वत:विषयी लिहण्यासाठी मी हा ब्लॉग वापरणार नाही.हे मी पुर्वीच ठरवलंय.त्यामुळे 19 नोव्हेंबरचं माझ्या देशासाठी आजच्या दिवसाचं असलेल्या महत्वाविषयी मी आज लिहणार आहे.

19 नोव्हेंबर हा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा जन्मदिवस.भारताच्या आजवरच्या सर्वात खंबीर पंतप्रधान म्हणून त्यांच नाव आजही अनेकवेळा घेतलं जातं. 1966 साली तडजोडीच्या उमेदवार म्हणून त्या पंतप्रधान बनल्या. त्या काळी आणि (अगदी आजही) कॉँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक दिग्गज नावं शर्यतीमध्ये होते.मात्र या सा-यांना दूर सारुन पंतप्रधान पद त्यांच्याकड चालत आलं (यानंतर अशाच अगदी अनेपेक्षीतपणे 1991 साली राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहरावांकडे पंतप्रधान बनले) मात्र आपण गंगी गुडीया नाही हे त्यांनी नंतरच्या काळात वारंवार सिद्ध केलं.

मोरराजी देसाईंच्या नेतृत्वाखालील दिग्गज कॉँग्रेस नेत्यांचा त्यांना विरोध होता.याच वादामुळे 1969 च्या बंगलोर (आत्ताच बंगळूरु) अधिवेशनात कॉँग्रेसमध्ये पहिल्यांदा फूट पडली.पंडित नेहरुंनी रंगवलेल्या स्वप्नामधून भारतीय बाहेर पडत होते.बंगाल,पंजाब,तामिळनाडू सारख्या महत्वाच्या राज्यात कॉँग्रेस पराभूत झाली होती. जनसंघ,समाजवादी, कम्युनिस्ट यासारखे कॉँग्रेस विरोधी पक्ष सांसदीय राजकारणात बाळसं धरु लागले होते. चीन आणि पाकिस्तान यांच्याशी झालेल्या युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता.अन्नधान्यांच्या बाबतीत अमेरिकन मदतीवर देशाला अवलंबून राहवं लागयंच या सा-या आव्हानात्मक परिस्थीतीमध्ये वयाच्या 49 व्या वर्षी 1966 साली इंदिराजींना पंतप्रधानांची शपथ घेतली.एखादी सामान्य राजकरणी या ओझ्यामुळं दबून गेली असती.मात्र इंदिराजी सामान्य कधीच नव्हत्या.या सा-या दबावात्मक परिस्थितीमध्ये उसळी मारण्याची क्षमता त्यांच्यात होती.इंदिराजींनी मारलेल्या उसळीनंतर देशातल्याच नाही तर जगभरातल्या अनेक शक्ती गाडल्या गेल्या.

त्यांनी 1969 साली 14 प्रमुख बॅंकाच राष्ट्रीयकरण केलं.या निर्णयाला मोराराजींसह अनेकांचा मोठा विरोध होता.मात्र आज जागतिक मंदीच्या काळातही भारतीयांचा राष्ट्रीय बॅंकावरचा विश्वास जराही कमी झालेला नाही.राष्ट्रीयकरणाच्या जवळपास चार दशकानंतर इंदिरांजींच्या या निर्णयाचं महत्व तितकचं परिणामकारकरित्या पटतंय..अन्नधान्या समस्येवर मात करण्याकरता इंदिराजींच्याच काळात हरीतक्रांतीला चालना देण्यात आली.कृषी विषयक वेगवेगळे संशोधन प्रकल्प उभारणे,रासायनिक खतांचा वापर करुन जमीनीची उत्पादन क्षमता वाढवणे यासारखे वेगवेगळे प्रयोग या काळात राबवले गेले.आज शंभर कोंटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा महान भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे याचं श्रेय याच हरितक्रांती योजनेला आहे.इंदिरांजींनी जगाचा केवळ इतिहास नाही तर भूगोल हबदलवला.पूर्व पाकिस्तानमधल्या लोंढ्यांचा भारतावर पडणारा ताण त्यांनी सहन केला नाही.पाकिस्तानला पोकळ इशारे दिले नाहीत,अथवा जागतीक समुदायाकडं मदतीची फारशी याचना केली नाही.तर देशाच्या लष्कराचा योग्य वापर करुन त्यांनी पाकिस्तानची फाळणी करुन बांगलादेश निर्माण केला...अमेरिका आणि चीन या पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांच्या अगदी नाकावर टिच्चून भारतानं हा विजय मिळवला होता. जनरल सॅम मानेकशा यांच्या खंबीर युद्ध सेनापती बरोबरच इंदिराजींच्या पोलादी नेतृत्वाला या यशाचं सार श्रेय द्यावं लागेल.याच पोलादी नेतृत्वामुळे बंदूकीची कोणतीही गोळी न झाडता सिक्किमचे भारतामध्ये विलीनीकरण झाले.याच कणखर नेतृत्वामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का देत भारतानं 1974 साली पोखरणमध्ये अणूचाचणी केली.भारत अण्वस्त्रधारी देश बनला.देशाच्या इतिहासात कालालीत बदल घडवणा-या या सा-या इष्ट घटनांमध्ये इंदिराजींचा वाटा सिंहाचा होता हे मान्यचं कराव लागेल.

ह्या झाल्या इंदिराजींच्या सर्व जमेच्या बाजू.मात्र एक या सर्वात खंबीर पंतप्रधानांच खर्चाचं खातंही तेवढंच भक्कम आहे.कॉँग्रेस संघटनेला दुबळं कारण्याच काम त्यांच्याच काळात सुरु झालं.पंडितजींच्या काळात एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सर्वात शक्तीशाली नेता असे.विधीमंडळ आणि पक्षसंघटना या दोन्ही आघाडींवर त्याचीच कणखर पकड असे.मात्र अशा प्रकारचे नेतृत्व राज्यात कधीचं तयार होणार नाही ह्याची काळजी इंदिरांजींनी नेमली.मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशअध्यक्ष या सध्याच्या खास कॉँग्रेसी परंपरेची सुरवात त्यांच्यच काळात झाली.स्वत:च्या मर्जीप्रमाणे मुख्यमंत्री बदलले गेले.विरोधी पक्षांची सरकार बरखास्त करण्यात आली.राजकीय स्वार्थासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्याचा सध्याचा सर्वत्र प्रचलित असलेला ट्रेंड त्यांनीच सुरु केला.इंदिरांजीना सतत असुरक्षिततेनं ग्रासलेलं असायचं असं अनेक इतिहासकार सांगतात.याच असुरक्षिततेमुळं संजय गांधींचा काही काळ वगळता ( तो ही शेवटी आणि सुरवातीला त्यांचाच मुलगा होता) दोन क्रमांकाचा नेता त्यांनी कॉँग्रेसमध्ये निर्माण होऊ दिला नाही.आज भाजप आणि कम्युनिस्ट वगळता जवळपास सर्वचं पक्षांची सुत्र एका विशीष्ट घराण्याकडं आहेत.या राजकीय घराणेशाहीला खतपाणी घालणार वातावरणं याच इंदिरा'आम्मांनी ' केलं.गांधी घरण्याची सवयच त्यांनी कॉँग्रेस पक्षाला लावली.यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.राजीवजींच्या नंतर सोनिया गांधीनी नेतृत्व स्विकारावं म्हणून 1991 साली (अगदी शरद पवारांसह) सर्व दिग्गज कॉँग्रेस पदाधिकारी 10 जनपथवर धावले होते.अगदी आजही सोनिया गांधीनंतर कॉँग्रेसचा नेता कोण अशी यादी तयार करायती ठरवली तर ही यादी राहुल गांधीपासून सुरु होऊन राहुल गांधींपशीच संपते.

इंदिराजींच स्मरण करत असताना जून 1975 ते मार्च 1977 हा त्यांच्या आयुष्यातला काळ कधीच विसरता येणार नाही. रायबरेली निवडणुकीत त्यांनी पदाचा गैरवापर केला.त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी असा निर्णय अलहाबाद न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या.सिन्हा यांनी दिला होता.वास्ताविक इंदिराजी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकल्या असत्या.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्या पंतप्रधान पदाला काहीच धोका नव्हता.तरीही इंदिराजींनी अतिशय अन्यायकार (आणि अमानुषपणे ही ) देशावर आणिबाणी लादली. त्यांच्या डाव्या आणि उजव्या विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं. गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरेला विशाल भारत देश इंदिरा आणि संजय या मातापुत्रांच्या वळचळणीला त्यांनी या काळात बांधला.काहीही करुन सत्तेवर टिकून राहण्याची जी वृत्ती सध्याच्या सर्वच पक्षातल्या सत्ताधीशांमध्ये सध्या दिसते.याच पूर्वीच्या काळातलं अगदी क्लासीक उदाहरण म्हणेज इंदिरा गांधी...भारतीय लोकशाहीच्या गळा घोटणा-या या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांना कधीही माफ करता येणार नाही.
राजकीय स्वार्थासाठी समाजतल्या एखाद्या संघटनेला अथवा व्यक्तीला गोंजारण्याची विघातक पद्धत त्यांनीच सुरु केली. पंजाबमधल्या अकाली दलाच्या वर्चस्वाला शह देण्याकरता भिंद्रणवाले हा भस्मासूर त्यांनीच निर्माण केला.ह्या भस्मासुरानं पुंढं देशाच्या एकात्मतेलाचं आव्हान दिलं.तेंव्हा याचा बिमेड करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम त्यांनी राबली.इंदिराजींच्या या धाडसी निर्णयाला सलाम केलाच पाहीजे.याच निर्णयाच्या बदल्यात त्यांना त्यांच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली.राजकीय महत्वकांक्षेचा टोकाचा हव्यास इंदिरांजीनी टाळला असता तर हा कटू निर्णय त्यांना घ्यावा लागला असता का याचं उत्तर मला अजुनही सापडलेलं नाही....(तुमच्याकडं असेल तर मला नक्की कळवा.)

आज इंदिराजींच्या मृत्यूला 24 वर्षे झालीत.त्यांच्या हत्येनंतर लहाणची मोठी झालेली 'यंग इंडिया' 21 व्या शतकाचं आव्हान पेलण्यास तयार झालीय.मात्र आजही किंवा या नंतरही पाकिस्तान,दहशतवाद,आर्थिक आणि कृषीविषयक प्रश्वांनाचा विचार करताना इंदिरांजींच्या या क्षेत्रातल्या कामगिरीला विसरता येणार नाही. अगदी ज्या प्रमाणे कालचा,आजचा, आणि अगदी उद्याचा माझा शोध घेणा-या मला माझ्या आयुष्यावरचा माझ्या बाबांचा प्रभाव कधीच पुसता येणार नाही.

माझं आयुष्य आणि माझा देश याचा विचार करत असताना 19 नोव्हेंबर हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही ते याकरताच....

3 comments:

Vinod Patil said...

Politics is very much connected to power and 'Power corrupts the man (woman)' so be it money or anything. I hope this answer can work out.

WE THE PEOPLE said...

खरच छान आहे. तुझ्या नॉलेजची आणि अनॅलीसीस पावरची योग्य सांगड घातलीस............

anilpaulkar said...

Great! also wish Happy Birthday to Dear Uncle Arun Danke.

Anil Paulkar,
Latur.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...