Saturday, October 18, 2008

एक सचिन दुसरे बाकी सर्व...


स्थळ-भारतामधलं प्रेक्षकांनी भरलेलं कोणतही क्रिकेटचं मैदान
सामना-भारताविरुद्ध कोणताही देश
प्रसंग-सचिन तेंडुलकर ग्लोज घालत बॅट घेऊन मैदानावर चालत येतोय....
मैदानात जमलेले हाजारो प्रेक्षक, नाक्यावरच्या टिव्हीवर घोळका करुन बघणारी लाखो पब्लीक,घराघरात टिव्ही बघणारे कोट्यावधी क्रिकेटवेडे या सा-यांची नजर असते फक्त सचिन तेंडूलकरवर....त्याच्या प्रत्येक फटक्यानं ते मोहरुन जातात,त्याच्या चौकार षटकारनं बेभान होतात,त्यानं किमान शतक मारावं हीच त्यांची नेहमी अपेक्षा असते...आणि तो बाद झाला की..मैदानावर टाचणी पडेल अशी शांतता पसरते.नाक्यावरची गर्दी नाहीशी होती,टिव्हीवर क्रिकेट बघणारा रसीक चडफडतो आणि चॅनल चेंज करतो.गेली दिड वर्ष या शंभर कोटीच्या खंडप्राय देशानं हे चित्र वारंवार अनुभवलंय.एखादा कच्चा खेळाडू असता तर या ओझ्यानं केंव्हाच दबून गेला असतो.पण तो सचिन तेंडुलकर आहे.जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज असतात एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे बाकी सर्व...
152 कसोटींच्या खडतर तपश्चर्येनंतर सचिननं आज कसोटी क्रिकेटमधलं अढळपद मिळवलंय.वयाच्या सोळाव्या वर्षी वकार,अक्रम,इम्रान सारख्या खूंखार गोलंदाजाविरुद्ध सचिननं पदार्पन केलं.या खेळाडूंच्या स्पीडला तो घाबरला नाही,त्याच्या शेरेबाजीनं तो खचला नाही,कडव्या पाकिस्तानी प्रेक्षकांना तो दबला नाही.या सा-या दबावांना त्यानं आपल्या बॅटमधून उत्तर दिलं. या घटनेला 19 वर्षे झाली.मात्र कोणत्याही आक्रमनाला बॅटनं उत्तर द्यायचं ही त्याची सवय अजूनही मोडलेली नाही.
सचिनची सोनेरी कारकिर्द अनेक अविस्मरणीय खेळींनी सजलीय.पर्थच्या जगातल्या सर्वात वेगवान खेळपट्टीवरचं शतक, टिपीकल इंग्लीश वातावरणात 1990 साली मॅच वाचवणारी त्याची खेळी,जीवघेण्या पाठदुखीकडं दुर्लक्ष करत चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध मॅच वाचवण्यासाठी केलेली एकाकी धडपड जगातल्या कोणत्याही खेळपट्टीवर भारतीय संघाची फसलेली नौका बाहेर काढण्याचं काम सचिनच्या बॅटनं वारंवार केलंय.सचिननं खेळलेल्या ज्या 47 कसोटीत भारत जिंकलाय त्या 47 कसोटीत त्याची सरासरी आहे 62.11.उलट ज्या 43 कसोटीत त्याची सरासरी 36 वर घसरलीय नेमक्या त्याच 43 कसोटी भारत हरला आहे.सचिन स्वत:साठी खेळतो असं म्हणा-यांचे समाधान करण्याकरता आणखी कोणत उदाहरण द्यायचं.मोहम्मद अझरुद्दीन,सौरव गांगुली,राहुल द्रविड यासर्वांच्या नेतृत्वाखाली त्यानं सर्वस्व ओतून खेळ केलाय.एवढचं काय तर युवा खेळाडूंचा सतत जयघोष करणा-या महेंद्र सिंह धोनीच्या संघातही त्याचं स्थान अगदी फिट्ट आहे.जी ऑस्ट्रेलियातली तिरंगी मालिका जिंकल्यापासून धोनीचे शेअर्स गगनाला भिडलेत.त्या स्पर्धेतल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन्ही सामन्यात सचिननंच मॅचविनींग बॅटींग केली होती.हे कोणीही विसरुन चालणार नाही.
फक्त एकदिवसीय क्रिकेट,कसोटी क्रिकेट,शतक,विक्रम एवढ्यापूरतं सचिनचं मोठेपण आहे ? अजिबात नाही.चित्रविचीत्र पोशाख ,डिस्कोमध्ये उशीरापर्यंत धिंगाना, नटींसोबतचे अफेयर्स, आपल्या संघातल्या किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूंवर किंवा निवड समितीबरोबर वाद यासारखे प्रकार त्यानं कझीचं केले नाहीत.अशाच प्रकारच्या प्रश्न विचारल्यास '' मला फक्त क्रिकेट खेळणं माहीती आहे " असं उत्तर सचिन देतो.मला वाटतं सचिनचं हेच उत्तर त्याला महान बनवंत.
गेली 19 वर्षे सचिन सतत खेळतोय.या 19 वर्षात आपल्या देशात अनेक उलाथपालथी झाल्या. कित्येक सरकार आली आणि गेली,देशाच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला,अर्थव्यवस्थेला आव्हान देणारे घोटाळे झाले,कित्येक जातीय दंगली झाल्या,भूंकप,महापूर,चक्रीवादळ,सूनामी सारख्या मोठमोठ्या नैसर्गिक आपत्तींना देशाला सामाना करावा लागला.केवळ सामाजिक आयुष्यात नाही तर व्यक्तीगत आयुष्यातही या शंभर कोटींच्या भारतीय नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलंय.मात्र या सा-या आपत्तीचा विसर पाडणारं टॉनीक सचिनच्या बॅटनं आपल्याला वारंवार दिलंय़.
आता सचिननं क्रिकेटमधली बहुतेक सारी शिखरं सरं केलीत.मात्र तरीही भारतीयांच समाधान अजुनही झालेलं नाही.आता 2011 मध्ये होणारा विश्नचषक सचिननं जिंकून द्यावा.हीच आपली त्याच्याकडून अपेक्षा आहे.अशी अपेक्षा ठेवणंही अगदी रास्त आहे.कारण मी सुरवातीलाच म्हंटलंय....
जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज असतात एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे बाकी सर्व...

2 comments:

Niranjan Welankar said...

Great !! Very very splendid, fabulus, thrilling, exciting, deep description of similar performance. Great timing and placement of appropriate words. A master and a masterstroke.. Vva !

Unknown said...

sachin zindabad

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...