
मुंबईसह सा-या देशाला 59 तास वेठीस धरणारा दहशतवाद्यांचा नंगानाच आता संपलाय.देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा चिंधड्या उडवणा-या या घटनेचे अनेक कंगोरे येणा-या काही दिवसात पुढं येतील.मात्र या घटनेतून तीन महत्वाच्या गोष्टी समोर येतायत.
यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या संपुर्णपणे चिंधड्या उडाल्या हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.यापुर्वीही कारगील युद्ध किंवा संसदेवरच्या हल्ल्याच्या प्रसंगीही ही गोष्ट समोर आली होती.या दारुण नामुष्कीनंतर वास्ताविक गुप्तचर यंत्रणेनं सावध राहयला हवं होत.मात्र तरीही ही यंत्रणा बेफीकीर राहीली.मुंबईच्या या ताज्या हल्ल्यानंतरतर आपल्या देशाची यंत्रणा जगातली सर्वात खराब गुप्तचर यंत्रणा आहे हेच सिद्ध झालंय.देशातली प्रत्येक इमारत आणि प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणं जगातल्या कोणत्याही पोलीस यंत्रणेला शक्य नाही.कोणत्याही दहशतवादाचा सामना हा गुप्तचर यंत्रणेच्या साह्यानंच केला जातो.आपली यंत्रणा याबाबत संपुर्णपणे झोपलेली होती.हे सर्व दोन डझन अतिरेकी बोटीनं भारतामध्ये आले.मुंबईमधल्या आपल्या इच्छित स्थळी जाऊन पोचले.या संपुर्ण स्थळांची माहिती त्यांच्याकडं होती.या सर्व दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक जण या शहराचे स्थानिक नागरिक होते.त्यांच्या या कार्याला अनेक जगभरातल्या अनेक ठिकाणांहून आर्थिक मदत केली गेली,मात्र याचा पत्ता गुप्तचर यंत्रणेला लागला नाही.हे सर्व दहशतवादी बिनभोबाटपणे शहरात घुसले.त्यांना हव्या त्या ठिकाणी नागरिकांना त्यांनी वेठीस धरलं आणि ठार मारलं.गेले अनेक दिवस वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड पकडले गेले हा भारतीय सुरक्षा यंत्रणेचा दावा किती बिनबूडाचा होता हेच यातून सिद्ध झालंय.
यामधून समोर आलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर चाललेला जिहाद दहशतवाद्यांनी भारतीय भूमीवरही पुढं सुरु ठेवला.ह्या पूर्वीच्या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवरुन मदत केली जायचे.त्यांच्या घातपातामागची कारणंही स्थानिक होती.(गुजरात दंगल, बाबरी ढाचा पाडणं इ...)मात्र या दहशतवाद्यांचे लक्ष्य वेगळं होत.अमेरिकन ब्रिटीश आणि इस्त्रायल ही दूष्ट राष्ट्रांची नागरिक हेच त्यांचं मुख्य टार्गेट होतं.ताज.ओबेरॉय किंवा नरिमन हाऊस ह्या वास्तू त्यांनी ताब्यात घेतल्या.ह्याचही हेच कारण होतं.धर्माची अफूची गोळी घेऊन जीवावर उदार झालेले हे संतप्त तरुण नव्हते.तर हे तरुण जागतिक दर्जाचे व्यवसायिक दहशतवादी होते.दहशतवादांच्या जागतिक युद्धात आता भारताची जमीनही वापरली जाणार ही गोष्ट या प्रकरणातून समोर आलीय.
या प्रकरणातली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा भारताच्या आर्थिक साम्राज्यावरचा हल्ला आहे.अमेरिकेवर 9/11ला झालेल्या या हल्ल्याशीच याची तुलना करावी लागेल.अल कायदानं वर्ल्ड ट्रेड सेंटर निवडलं कारण त्यांना अमेरिकेच्या आर्थिक गंडस्थळावर हल्ला करायचा होता.सा-या अमेरिकेची शान असलेली वास्तू त्यांनी उडवून लावली.या देशात कोणताच अमेरिकी नागरिक सुरक्षित नाही ही भिती त्यांना अमेरिक नागरिकांच्या मनात निर्माण करायची होती. नेमकी हीच भिती सर्व भारतीयांच्या मनात निर्माण व्हावी म्हणून अतिरेक्यांनी यंदाच्या हल्ल्याची ठिकाणं निवडली आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबईतली सर्वात क्रिम समजले जाणारी हॉटेल त्यांनी निवडली.दक्षिण मुंबई हा मुंबईतलाच नाही तर सा-या देशातला सर्वात सुरक्षित भाग समजला जातो.ताज आणि ओबेरॉयमध्ये येणारा व्यक्ती हा देशातला सर्वात उच्चभ्रू समाजातलाच असतो.जगातल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तसंच बॅंकांची मुख्यालंय या इमारतीमध्ये आहेत. या इमारतींना वेठीस धरुन अतिरेक्यांनी सा-या देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाच जबरी हादरा दिलाय.विकसीत भारताची स्वप्न देशांनी ज्या व्यक्तींच्या,संस्थेच्या जोरावर पाहिली होती,त्या नव्या युगाच्या स्वप्नांना या अतिरेकी हल्ल्यानं तडा दिलाय.दहशतवादाच्या 59 तास चाललेल्या नंग्यानाचानंतर या तीन महत्वाच्या बाबी समोर आल्यात.
भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही शक्ती आहे.या देशाला हाजारो वर्षांचा सांस्कृतीक इतिहास आहे.या देशाच्या लष्करी शक्तीचा सा-या जगात दरारा आहे.या देशाच्या आर्थिक शक्तीची सा-यांनाच आदरयुक्त जाणीव आहे.या महान भारत वर्षावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.अगदी बगदादमध्ये गेला महिनाभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईपेक्षा कमी नागरिक मारले गेलेत. सा-या देशासाठी या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकते.
अशा प्रकारचे हल्ले अमेरिका,ब्रिटनवर यापुर्वी झालेत.मात्र या देशांनी या हल्ल्यानंतर धडा घेतलाय.9/11 नंतर अमेरिकेनं जागतिक दबाबवाला बळी न पडता ( तसंच मानवअधिकार आयोगाच्या थयथयाटाकडं दुर्लक्ष करतं ) आपली संरक्षण व्यवस्था भक्कम केलीय.त्यामुळेच दहशतवाद्यांना आता अमेरिकेऐवजी भारतासारखी 'सॉफ्ट टार्गेट' निवडावी लागत आहेत. भारतावर अशा प्रकारचा हल्ला होणार आणि त्या हल्ल्याला पाकिस्तानचे मदत मिळणार याची माहिती आपल्याला होती.तरीही आपलं सरकार गाफील राहील,त्याचे परिणाम आज शंभर कोटींचा देश भोगतोय.
आताही केंद्र सरकारनी अनेक आश्वासनं दिली आहेत मात्र आता आपल्याला आश्वासनं नको कृती हवी आहे.नुसती सैन्याची जमवाजमव नकोय तर या देश तोडणा-या परकीय शक्तीं विरुद्ध आर पारची लढई हवी आहे...