छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, हे वाक्य सतत
सर्वबाजूने सर्व प्रकारच्या/विचारांच्या माणसांकडून आपल्याला ऐकू येत असते.
शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे आद्य आदरणीय
व्यक्तीमत्व. ‘आद्य शंकराचार्यांनंतर संपूर्ण हिंदू समाजाचा या देशाचा विचार करणारी
दुसरी व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज’ असे मला नेहमी वाटते. महाराज 1680 मध्ये गेले. आज
340 वर्षांनंतरही त्यांचे समाजावरचे गारूड कमी झालेले नाही. आयुष्याच्या प्रत्येक
टप्प्यावर त्यांची लहाणपणी ऐकलेली/ वाचलेली प्रतिमा ही आणखी ‘लार्जर दॅन लाईफ’ होते.
शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता? शिवाजी महाराजांनी
ज्या समाजाला संघटीत केलं त्या समाजाची अवस्था काय होती? शिवाजी महाराजांनी मातीच्या गोळ्याला आकार
दिला असं म्हणतात.कारण महाराष्ट्राची अक्षरश: माती झाली होती. ज्या काळात शिवाजी
महाराज जन्मले त्या काळात ‘हर हर महादेव’ ही घोषणा देत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन,
भवानीमातेची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य कुणी स्थापन करेल अशी कल्पना ही कवी
कल्पनेच्याही पलिकडे होती. महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र समजून घ्यायचा
असेल तर गो. नी. दांडेकर (गोनीदा) यांची ‘बया दार उघड’ ही कादंबरी वाचली पाहिजे.
या पुस्तकाला शिवशाहीर आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची
प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत शिवशाहीर म्हणतात, ‘कादंबरीला नायक, नायिका असतात. त्यांच्या
आयुष्यात घडणाऱ्या घटना याचे बोट धरुन वाचक कादंबरीच्या शेवटापर्यंत वाचत जातात.
परंतू गोनीदांच्या या कादंबरीची गोष्ट वेगळी आहे. ही कादंबरी व्यक्तिप्रधान किंवा
घटनाप्रधान नाही तर कालप्रधान किंवा परिस्थितीप्रधान आहे. तत्कालिन समाजजीवनाची
जवळून ओळख या कादंबरीतून होते.’ गोनीदांनी या पुस्तकातून शिवकाल उभा केलाय.
शिवाजी महाराजांच्या काळातील भाषा वापरली आहे. ती भाषा, तो काळ ते स्वत: जगले आहेत. असंख्य
कागदपत्रांचा अभ्यास केलाय. तो परिसर पालथा घातलाय. ही कादंबरी म्हणजे एक शोधनिबंध
नाही तर शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्राचं गोनीदांनी केलेलं जिवंत चित्रण आहे.
मावळ्यांनी शेतामध्ये ढोरासारखे कष्ट करावे. भर पावसात गुडघाभर चिखलात
नांगर फिरवावा. उर फुटेपर्यंत मरावं, आणि घास अगदी हातातोंडाशी आला की सुलतानी
राजवटीच्या प्रतिनिधींनी दाणा न् दाणा उचलून न्यावा. त्यानंतर मोहाची फुलं वेचणं
आणि त्याच्या भाकऱ्या करून खाणे हे त्यांचे आयुष्य. कित्येक दिवाळी आल्या आणि
गेल्या. दिवाळीनं कोणतंही सुख दिले नाही. ‘कशाची दीन दीन
दिवाळी आणि कुठल्या गाई म्हशी ओवाळी!’
सुलतानी राजवटीचे प्रतिनिधी म्हणजे साक्षात सैतानाचे दूत. वाट्टेल
तितके आणि वाट्टेल तसे वेठबिगार राबवीत. पंचक्रोशीतले भावकीचे तंटे हवे तसे तोडत.
सोम्याची जमीन गोम्याला बहाल करत. दोघांकडूनही खंडणी लुटत. मनात येईल त्या रयेतेला
चावडीसमोर बांधून मारत. कैवल्येश्वराचं मंदीर त्यांनीच फोडलं. तिथं कैद्यांकडून
मशिद बांधून घेतली. खेडोपाड्यातील अन्न ओहटलं असलं, तरी अंमलदारांची कोठारं भरलेली
होती. इथं लेकरंबाळं अन्नाविना तडफडत होती, तिथं माजलेले घोडे तोबऱ्यांकडे
ढुंकूनही पाहत नव्हते.
कुणाघरची देखणी तरणीताठी सून गर्भधानाच्याच रात्री पळवून नेली जात
असे. कुणाच्या गोठ्यातले बैल कसायाच्या सुरीखालून जाऊन मियाँबीबीच्या पोटात पोहचत.
कुणाच्या उत्तम फळबागा लुटून झाडांचा सत्यानाश होत. कुठं कुणी जरासा प्रतिकार
करायचं मनीं आणताच पेटत्या मशालींनी ते गाव फुंकून टाकले जात असे. कारण अगदी साधं
होतं. उत्तरेतून दिल्लीच्या पातशहाच्या सैन्यांची चाहूल मावळातील निजामशाही
सैन्याला लागली होती. आपली सद्दी आहे तोवर हाती लागेल ते भोगून घ्या, उद्याचं कुणी
पाहिलं आहे! पळवा लुटा, जबरदस्तीनं हिरावून घ्या, बळजबरी करा, मिळालं नाही तर
पेटवून द्या असा सरळ हिशेब निजामशाही सैन्याचा होता.
गोनीदांच्याच ‘हर हर महादेव’ या कादंबरीतही शिवाजी महाराजांच्या
पूर्वीच्या महाराष्ट्राचं वर्णन आढळतं. ‘बया दार उघड’मध्ये देखील हाच काळ आहे. त्यामुळे
पुस्तकांतर करुन ‘हर हर महादेव’ या कादंबरीत गोनीदा काय लिहितात हे देखील वाचले
पाहिजे. ‘भीमा,
भामा, मुळा, मुठा, कुकडी, कृष्णा, कोयना, प्रवरा अवघ्या नद्यांचे डोह प्रेतांनी
दाटले आहेत!. महाराष्ट्रमंडळी हिंडावं, तर रानांवनातून जागोजाग प्रेतं पडलेली
आढळतात. कुत्रीं अन् गिधाडं आतडी बाहेर ओढीत, विस्कटीत असलेली दिसतात! गावंढ्याशेजारी तर
एकही बरं झाड असं उरलं नाहीं, कीं ज्यावर कुण्या बापड्यानं फास लावून घेतला नाही.
पदार्थमात्र
तितुका गेला
नुस्ता देशचि
उरला
होय, महाराष्ट्राची अवस्था ही फक्त नुस्ता देशचि उरला अशी झाली होती.
मात्र तरीही इथल्या समाजातल्या काही मंडळींच्या आशा संपलेल्या नव्हत्या. त्या
करुणासागरालाही जर वनवास चुकला नाही, तर मग आम्हा येरागबाळांची काय कथा? रात्र व्हायचीच. ही
रात्र काही अंथरुन-पांघरून घेऊन मुक्कामाला आलेली नाही. पूर्व दिशा उजळेल.
तांबडफुटी होईल. सारे गगनमंडल स्वच्छ होईल असा विश्वास त्यांना होता. ज्या परंपरा,
जो कुलाचार, जो धर्म त्यांनी परकीय राजवटीमध्ये प्राणपणे जपला होता. त्या हिंदू
धर्मातलीच ही शिकवण त्यांना विपरीत परिस्थितीमध्येही घट्ट उभे राहण्यात मदत करत
होती.
निजामशाही वरंवंट्याखाली नित्य भरडल्या जाणाऱ्या बिबेवाड गावात बाल
मावळा होता. राणोजी त्याचे नाव. गावजवळ असलेल्या किल्ल्याचा किल्लेदार दूर गेलाय,
म्हणून गावकरी गावात भागवत सप्ताह ठेवात. भागवाताच्या निमित्ताने गावात भजनं,
भारुड पुन्हा एकदा गायली जातात. गावकरी मोठं भारूड म्हणू लागतात...
नमो आदिमाया भगवती! अनादिसिद्ध मूळप्रकृति! महालक्ष्मी त्रिजगतीं!
बया दार उघड !!
अलक्षपुर भवानी दार उघड बया दार उघड
माहुरलक्ष्मी बया दार उघड बया दार उघड
कोल्हापुरलक्ष्मी बया दार उघड बया दार उघड
पाताळलक्ष्मी बया दार उघड बया दार उघड
अष्टभुजालक्ष्मी बया दार उघड बया दार उघड
चार पुरुषार्थ गोंधळी ! सनकादिक तेथें संबळी ! तेहेतीस कोटी भुतावळी
दिवट्या पाजळोनी तिष्टति !
म्हैषासुर दैत्य मातला प्रबळ ! अबबब पीडा केली अंबे!
दार लावुनी काय बसलीस बया !
बया दार उघड, अग बया दार उघड !
राणोजी अगदी गोंधळून जातो. हे सगळे कुणाला दार उघडायला सांगताहेत, हे
त्याला समजत नाही. तो घरी आईकडे परततो. आई त्याला त्यांच्या कुटुंबाच्या झालेल्या
फरफटीची कथा ऐकवते. ‘जानतंसवरतं हो, पाचपन्नास साथीदार जमव, छापा घाल आणि मानाची देशमुखी
परत मिळव’ असं
राणोजीची आई त्याला सांगते.
बाल राणोजीला आईने दाखवलेलं स्वप्न एक रात्र देखील पाहण्याची संधी
मिळत नाही. त्याच रात्री गावावर निजामशाही किल्लेदाराचा छापा पडतो. राणोजीच्या
आईसह गावातले अनेक जण बंदी होतात. त्यानंतर राणोजीची लहान म्हणून सुटका होते.
त्याची आई मात्र अब्रूचे रक्षण करताना मृत्यूला कवटाळते.
आईविना एकटा राणोजी एका
मराठा सरदाराच्या सैन्यात दाखल होतो. काही वर्षांनी एका युद्धात शत्रूंशी लढताना
तो जखमी होतो. आपल्या तुकडीशी त्याचा संपर्क सुटतो. आयुष्यात अनेक उलाथापलथी
झालेल्या असतात, पण ‘बया दार उघड’ ही आरोळी त्याला आजही साद घालत असते. दार कधी
उघडणार ही अस्वस्थता त्याला सतावत असते. त्याच अस्वस्थतेतून तो शहाजी राजांचा
मुक्काम असलेल्या संगमनेर जायला निघतो.
संगमनेर मुक्कामी एका महिलेची अब्रू वाचवताना राणोजी जखमी होतो. पण
त्याच्या या लढवय्या वृत्तीने राणी जिजाऊ प्रभावित होतात. जखमी राणोजीची देखभाल
स्वत: करण्याचा
निर्णय घेतात. कर्मधर्म संयोगामुळे शहाजी राजे राणोजीची नेमणूक राणी जिजाऊंच्या
संरक्षक सैन्यात करतात. राणोजी जिजाऊंसोबत संमनेरहून शिवनेरीला रवाना होतात.
राणी जिजाऊ देखील अस्वस्थ असतात. निजामशाहीशी एकनिष्ठ अशा माहेरच्या
मंडळींची दौलताबादच्या किल्ल्यात भर दिवसा झालेली हत्या. पुण्याच्या पुण्यभूमीवर
आदिलशाही फौजेने फिरवलेला गाढवाचा नांगर. रयतेची केलेली ससेहोलपट. घरादाराच्या
केलेल्या होळ्या. यामुळे जिजाऊंचे देवीकडे एकच मागणे असते,
धरित्रीमण्डळास झालेला भार दूर करील, असा पूत्र दे!
दैत्यकुळांचा संहार करील असा –
त्यांच्या छात्यांवर आपल्या हातींच्या खड्गाचे वार करील असा पुत्र दे !
शिवजन्म होतो. गुरव गाभाऱ्याचं दार उघडतात. राणोजीला आत असलेल्या
मुर्तीकडे पाहून जाणवतं, देवीच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव मावळलाय. जणू ती आता
प्रसन्न झालीय. कृपाळूपणे लेकरांकडे पाहतेय.
शेवटी बयानं दार उघडलं आहे!
No comments:
Post a Comment