Friday, December 25, 2009

अटल कहाणी


राजकारण हे सभ्य लोकांचे क्षेत्र नाही. सर्वसामान्य व्यक्ती राजकारणात तगू शकत नाही. ध्येय, विचारधारा या गोष्टींना राजकारणात स्थान नाही.या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर जात, पैसा, घराणे आणि पक्ष असे राजकीय मेरीट तुमच्याकडे असावे लागते. या सारख्या गोष्टी आपण सारेजण वारंवार ऐकतो. स्वातंत्र्यानंतर अगदी आत्तापर्यंतचे वेगवेगळे राजकारणी पाहिले की या गोष्टी ख-या आहेत याची खात्री वाटू लागते. परंतु गेल्या सहा दशकांत अशी काही मोजक्या राजकारणी व्यक्ती आठवल्या की वाटतं..अजुनही आशेला जागा आहे. पैसा, पक्ष, जात, विचारधारा या सारख्या कोणत्याही गोष्टींची तडजोड न करता या क्षेत्रात यशस्वी होता येतं. अगदी या देशाचे तीन वेळा पंतप्रधानही होता येतं. होय अटलबिहारी वाजपेयी हे या देशातल्या अशा मोजक्या राजकरण्यांपैकी एक आहेत. ज्यांचा अभिमान सर्वांना वाटायला हवा. .

आतापर्यंत या देशाने 7 काँग्रेसेतर पंतप्रधान पाहिले. परंतु ख-या अर्थाने एकमेव गैरकाँग्रेसी पंतप्रधान म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. सुमारे सहा दशकं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक, जनसंघ आणि नंतर भाजप या माध्यमातून त्यांनी समाजकाराण आणि राजकारण केलं. 1957 मध्ये बलरामपूर या लोकसभा मतदारसंघातून ते सर्वात प्रथम निवडून आले. सुमारे सहा दशकं त्यांच्यामधील कुशल संसदपटूचा अनुभव सा-या देशाने घेतला आहे.

वाजपेयींचं एकूणच व्यक्तिमत्त्व एखाद्या खानदानी उत्तर भारतीय कुटुंबप्रमुखासारखं. शिवाय ओजस्वी आणि सभा जिंकणारं वक्तृत्व साथीला. त्यामुळे अल्पावधीतच संसदेतील त्यांचं स्थान अपरिहार्य बनलं आणि ते परराष्ट्र धोरणावर बोलू लागले की पंडित नेहरूही सभागृहात आवर्जून येऊन बसत. ज्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि काँग्रेस ह्याच पक्षाचे राज्य होते. पंडित नेहरु इंदिरा गांधी यासारख्या प्रचंड मासबेस असलेल्या व्यक्ती देशाच्या पंतप्रधान होत्या.त्या काळात विरोधी पक्षात तेही जनसंघासारख्या एका विशिष्ट विचाराधारेनं भारलेल्या पक्षात राहून स्वत:चे स्थान निर्माण करणे ही अत्यंत अवघड बाब होती. परंतु अटलजीने ती अगदी लिलया केली.


सर्वसमावेशकता हा अटलजींच्या व्यक्तीमतवामधला अत्यंत महत्वाचा गुण. त्यांच्या याच कौशल्यामुळे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने त्यांना प्रोजेक्ट केलं. अण्णा द्रमुक ते असम गण परिषद आणि शिवसेना ते नॅशनल काँन्फरन्स यासारख्या अगदी अठरापगड पक्षांची मोट त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ शकली. अठरापगड पक्षांना एकत्र येऊन या देशात सरकार बनू शकतं. तसेच ते संपूर्ण कालावधी चालू शकतं हे अटलजींनीच सर्वप्रथम या देशाला दाखवून दिलं.


अटलजींच्या पंतप्रधान पदाची सहा वर्षे अत्यंत वादळी अशी होती. 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या दिवशी भारताने पोखरणमध्ये अणूस्फोट केला. इंदिरा गांधींनतर अणूचाचणी घेण्याचे धाडस दाखवणारे दुसरे पंतप्रधान म्हणजे अटलजी. जय जवान जय किसान यांच्याबरोबरच जय विज्ञान असा नवा नारा त्यांनी देशाला दिला. या देशाला अण्वस्त्रसज्ज त्यांनी केलं. जागतिक समुदायाच्या दबावाची तसेच निर्बंधाची त्यांनी पर्वा केली नाही. पाकिस्तान, चीन बांग्लादेश या सारखे विश्वासघातकी शत्रूराष्ट्र सभोवती असताना संरक्षण सज्जता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अणूचाचणी करुन सा-या जगाला त्यांनी आपले लष्करी सामर्थ्य दाखवून दिले.


अटलजींच्या कारकिर्दीतला दुसरा कसोटीचा काळ म्हणजे कारगील युद्ध. पाकिस्तान सोबत मैत्रीचे संबंध राहावे हीच त्यांची प्रमाणिक इच्छा होती. याच एकमेव उद्देशाने लाहोर बस यात्रा सारखे अत्यंत धाडसी पाऊल त्यांनी उचलले. लाहोर घोषणापत्रामध्येही त्यांनी पाकिस्तानकडे अत्यंत दिलदारपणे मैत्रीचा हात पुढे केला होता. परंतु पाकिस्तानच्या ना 'पाक' राज्यकर्त्यांना त्यांचे हे प्रामाणिक प्रयत्न मान्य नव्हते.त्यामुळेच त्यांनी कारगिलचे युद्ध भारतावर लादले.


कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेली घुसखोरी हे भारतीय गुप्तचर संस्थांचे अपयश होते. हा मुद्दा बरोबर आहे. परंतु ही घुसखोरी लक्षात आल्यानंतर अगदी तातडीने अटलजी सरकारने पाऊले उचलली हे मान्य करावे लागेल. नियंत्रण रेषा पार न करता प्रतिकूल भौगोलिक आणि सामरिक परिस्थितीवर मात करत भारतीय लष्कराने या युद्धात विजय मिळवला. भारतीय लष्कराच्या प्रत्येक कृतीला अटलजींच्या सरकारने खंबीर पाठिंबा दिला. जागतिक दडपणाचा दबाव न जुमानता पाकिस्तानी लष्कराला भारतीय सैन्याने नियंत्रणरेषेच्या बाहेर पिटाळले.' हम जंग न होने देंगे ' अशी एकेकाळी कविता करणारा हा कवी -हदयाचा पंतप्रधान प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगात किती खंबीर बनू शकतो हे सा-या देशाने या काळात अनुभवलं. ऑपरेशन विजय यशस्वी होण्यामागे भारतीय लष्कराला अटलजींच्या सरकारने दिलेली तोलामोलाची साथ तितकीच महत्वाची होती.


संपूर्ण देशाला पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर जोडणारी पंतप्रधान ग्रामसडक योजना, देशातल्या प्रत्येक व्यक्तीला साक्षर करण्यासाठी सुरु केलेले सर्वशिक्षा अभियान, देशातला दुष्काळ आणि पाणीटंचाई सारख्या समस्या कायम स्वरुपात संपण्याकरता नदी जोड सारखी 'भगीरथ' योजना, दुरसंचार क्षेत्राचे व्यापक जाळे, मोबाईल क्रांती या सारख्या अनेक कल्याणकारी योजना वाजपेयी सरकारने आपल्या सहा वर्षांच्या काळात सुरु केल्या. नरसिंह राव सरकारने सुरु केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रीयेला त्यांनी चालना दिली. सार्वजनिक प्रकल्पात खाजगी गुंतवणूक वाढवली. शंभर कोटी लोकसंख्येच्या भारतीय बाजारपेठेचे आत्मभान जागवण्याचे काम याच सरकारच्या कारकिर्दीत झाले. सा-या जगाला भारतीय बाजारपेठेच्या शक्तीची जाणीव करुन देण्याचे काम अटलजी सरकारने सर्वप्रथम केले.


अटलजी सरकारच्या सर्वच गोष्टी आलबेल होत्या असे नाही. या सहा वर्षात अशा काही गोष्टीही घडल्या की त्या काळात अटलजी पंतप्रधान होते हे आठवलं तरी मन अस्वस्थ होतं. किंबहूना अटलजींसारखे व्यक्ती देशाचे पंतप्रधान असताना या गोष्टी घडू शकतात याचा कधी कधी विश्वास बसत नाही. IC-814 या विमानाचे झालेले अपहरण हा असाच एक दुर्दैवी अध्याय.काठमांडूहून दिल्लीला निघालेले विमान दहशतवाद्यांनी कंदहारला नेले. ह्या विमानातले प्रवासी सोडवण्याकरता मौलना अझर मसूद सहीत काही कडव्या दहशतवाद्यांना अटलजी सरकारने सोडून दिले. प्रबळ राष्ट्रवादी विचाराशी नाळ घट्ट जोडलेले सरकार दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकू शकते हे करुन चित्र या जगाने पाहिले.


संसदेवर झालेला हल्ला आणि त्यांनंतर काहीही न करता पार पडलेलं ऑपरेशन पराक्रम या दोन गोष्टींबाबतही या सरकारला माफ करणे अवघडं आहे. भारतीय लोकशाही सर्वोच्च मंदींरावर भारतीय संसदेवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामागील पाकिस्तानी कनेक्शन सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. अशा काळातही अटलजी सरकार केवळ ' अब आर पार की लडाई होगी ' इतकेच म्हणत राहिले. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान सीमेवर भारतीय लष्कराची सर्वात मोठी जमावाजमव याचकाळात करण्यात आली. सुमारे वर्षभर भारतीय सैन्य केंद्र सरकारच्या आदेशाची वाट बघत सीमेवर उभे होते. कारगील युद्धाच्या वेळी ताठ कणा दाखवणारे अटलजी सरकार त्यानंतर तीन वर्षांनी जागतिक समुदायपुढे किंवा अन्य कोणत्याही शक्तीपुढे का झुकले हे न उलगडलेलं कोडं आहे.


राममंदीर, समान नागरिक कायदा,370 वे कलम रद्द करणे हे भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेवरचे अस्सल विषय. भाजपला पार्टी विथ डिफरन्स बनवणारे. आघाडीधर्माचे पालन करण्यासाठी भाजपने हे विषय गुंडाळले हे मान्य आहे. आघाडी धर्माचे पालन करताना अटलजींना येणारी मर्यादाही समजता येते. परंतु हे विषय पुढ सरकावे किमान ते पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जीवंत राहावेत याकरताही फारसे प्रयत्न केले नाहीत. भाजपचे काँग्रेसीकरण होण्याचे जी उदाहरणे गेल्या काही वर्षांत ठळकपणे समोर आलीत. हे काँग्रेसीकरण होण्याच्या परंपरेलाही अटलजी पंतप्रधान असताना अधिक चालना मिळाली हे वास्तव नाकरता येत नाही. भाजप नेत्यांनीही भ्रष्टाचार केला.संरक्षण सारख्या सर्वात संवेदनशील क्षेत्रातल्या प्रकरणात लाच घेताना भाजप अध्यक्ष पकडले गेले. माणूस स्खलशील आहे.कितीही संस्कार केले तरी लोभ संपत नाहीत...हे कटू वास्तव भाजपच्या बाबतीत ही खरं आहे. भाजपची ही वैचारिक घसरण सुरु होण्याच्या काळात अटलजी पंतप्रधान होते हे पचण्यास जड असलं तरी दुर्दैवाने खरं आहे.


ह्या सर्व खर्चाचे मुद्दे धरले तरी एक नेता म्हणून अटलजींची उंची हिमालयाइतकी मोठी आहे हे मान्य करावेच लागते. अटलजीं सारख्या योगी व्यक्तींनी सुमारे चार दशकं केलेल्या साधनेच्या जोरावर भाजपला सत्तेची उब अनुभवता आली. एक संघस्वयंसेवक देशाचा पंतप्रधान बनू शकतो हे एकेकाळी अशक्य वाटणारे वास्तव अटलजींनी खरे करुन दाखवले. अटलजी वेगळे आहेत. अटलजी सर्वसमावेशक आहेत. कावळ्यांच्या कळपातले राजहंस आहेत अशा प्रकारची मिठ्ठास वाणी अनेकांनी वेगवेगळ्या प्रसंगात अनेकदा वापरली. दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा असो किंवा विश्वासदर्शक प्रस्तावाची लढाई कोणत्याही 'आणिबाणी'च्या प्रसंगी त्यांनी आपल्या मुलभूत विचारधारेशी आपल्या परिवाराशी परिवारातल्या संस्कारांशी तडजोड केली नाही. फळाची कोणतीही अपेक्षा न करता काँग्रेसला भाजपच्या रुपाने राष्ट्रव्यापी पर्याय निर्माण करण्याचे काम या कुशल राजकरण्याने केलं आहे.


भ्रष्टाचार, वशिलेबाजी, घराणेशाही, गुंडगिरी, जात यापैकी कशाचाही आधार घ्यावा लागत नाही. एका प्रमाणिक विचाराधारेनं प्रेरित होऊन यशस्वी होता येतं. नुसतं यशस्वी नाही तर अगदी या देशाचे पंतप्रधान होता येतं हे अटलजींनी दाखवून दिले आहे. 25 डिसेंबरला त्यांच्या 85 व्या वाढदिवशी त्यांना आठवताना ह्या एकाच गोष्टीचे स्मरण सर्वांनी केले तर अटलजींच्या स्वप्नातला समर्थ भारत साकारता येऊ शकेल.

Wednesday, November 11, 2009

.... नाठाळाच्‍या माथी हाणू काठी !!!


मी मनसेचा समर्थक नाही. राज ठाकरेंचा फॅन नाही.मराठीचा दुराभिमानी नाही. लोकशाहीच्या मंदिराचा आदर ठेवला पाहिजे. विधानसभा हे चर्चेचे व्यासपीठ आहे. हे सारे मला पटते. तरीही मनसेच्या आमदारांनी अबु आझमीला जो चोप दिला त्याला माझे समर्थन आहे.


या प्रकरणात ज्या व्यक्तीला चोप देण्यात आलाय.तो अबु आझमी हा अत्यंत मस्तवाल माणूस आहे.(मला मान्य आहे की लिखानाचे संकेत जपण्याकरता अबु आझमींचा उल्लेख आदरपूर्वक करायला हवा.परंतु अबु आझमीला आदरआर्थी लिहण्यासाठी माझे बोट काही वळत नाही..सॉरी ) अबु आझमीवर मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचे आरोप झाले. अनेक प्रक्षोभक आणि धार्मिक तेढ भाषणे करण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्या मुलाला कोकेन घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. हे सारे करताना त्याला कधीही भारतीय राज्यघटना, महान परंपरा याची आठवण आली नाही. आता मात्र आपल्या स्वार्थासाठी त्याला राज्यघटनेतील कलमांची आठवण होतेय.


तेरा वर्षापूर्वी अबु आझमीच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभेत शपथ घेऊ द्यावी याकरता राडा केला होता. हे आज सर्वजण विसरले आहेत. तेरा वर्षापूर्वी त्यांना हिंदू- मुस्लिम अशी तेढ निर्माण करायची होती. आज या पक्षाला मराठी -हिंदी भाषिक यांच्यात फाळणी करायची आहे.सिमी सारख्या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणारे समाजवादी पक्षाचे नेते हेच आजचे भिंद्रनवाले आहेत.हा इतक्या कलंकीत पार्श्वभूमी असलेला अबु आझमी निवडून कसा येतो याचेच खरे आश्चर्य आहे.लोकशाही राजवटीतल्या सर्व मर्यादांचा अत्यंत खुबीने वापर करत अबु सारखे हे आमदार निवडून येतात. ते ही एक नाही तर दोन विधानसभा मतदारसंघातून..देशातल्या प्रत्येक समजदार व्यक्तींनी याचा खरेच गंभीरपणे विचार करायला हवा.


अबु आझमी २० वर्षे इथे रहात आहे, २ का ३ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची मातॄभाषा हिंदी आहे. मराठी व हिंदीची स्क्रिप्ट सारखीच म्हणजे देवनागरी असल्याने त्यांना समस्त महाराष्ट्रीय जनतेचा आदर ठेवण्यासाठी "४ ओळी" मराठीत वाचणे जड होते का ? परंतु नाही....राज ठाकरेंच्या 'मराठी खतरेमे ' या ना-याला तेवढ्याच तडफेने उत्तर द्यायचे असेल तर हिंदीच्या आग्रहाची अडेलतट्टू भूमिका घेतली पाहीजे. हे या अबु आझमीला बरोबर माहित आहे. एक मुस्लिम आमदार हिंदीचा कैवार घेतो. हा नवीन प्रतिमा अबुने आता बनवली आहे. अबु आझमीच्या भावी राजकीय काराकिर्दीसाठी ही प्रतिमा नक्कीच उपयोगी पडणार आहे.

अबु प्रमाणे अन्य काही आमदारांनी अन्य भाषेत शपथ घेतली. काहींनी इंग्रजी, काहींनी हिंदी काहींनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. परंतु त्यांच्या शपथ घेण्याच्या उद्देशात कोणता मस्तवालपणा नव्हता.त्यामुळे त्यांना मनसेने कोणताही विरोध केला नाही हे योग्य झाले. माझाही विरोध हिंदी किंवा अन्य भाषेत शपथ घेण्यास नाहीय..तर अबु आझमींच्या मस्तवालपणाला आहे.


या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारची भूमिकाही संशयास्पद होती.राज ठाकरे ह्यांनी दिलेले आव्हान आणि त्याला अबु आझमीने दिलेले प्रतिआव्हान ह्यामुळे हे सर्व प्रकरण पेटणार याची कल्पना सर्वांना होती. तरीही तडजोडीचे कोणतेही प्रयत्न सरकार दरबारातून करण्यात आले नाहीत.यापूर्वी अनेकदा विधानसभेत मार्शल बोलवण्यात आले आहेत. सोमवारी ही खबरदारी का घेण्यात आली नाही. मनसेच्या काठीने अबु आझमीचा साप ठेचण्याची सरकारची योजना होती ?


विधानसभेत राडा करणा-या मनसे आमदारांना शिक्षा ही व्हायलाच हवी. परंतु त्यांना चप्पल दाखवणा-या अबु आझमीला मोकळे का सोडण्यात आले. ? अबु आझमीने बाळासाहेबांच्या विरोधात प्रक्षोभक विधान केलं.त्याच्या समर्थकांनी भिवंडीमध्ये बसेस फोडल्या.याबाबत गुन्हा नोंदवणे सोडा साधा निषेध करण्याचे धाडसही मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याने दाखवलेलं नाही. याचे कारण उघड आहे. बिहार आणि झारखंडच्या निवडणुका तोंडावर आहेत.अशा परिस्थीतीमध्ये हिंदी करता झगडणा-या (!!!) या मुस्लिम नेत्याला विरोध करणे काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.


सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा अहंगंड सध्या कमालीचा वाढलाय. दुर्दैवाने भाजप- शिवसेना युतीमध्ये सध्या सुतकी वातावरण आहे. ही पोकळी भरुन काढण्याचे काम राज ठाकरेंची मनसे करतेय. ( ही पोकळी भरुन काढण्याकरता त्यांचा जो मार्ग आहे..तो अजिबात योग्य नाही ) परंतु अबु आझमी सारख्या नाठाळ व्यक्तीला ताळ्यावर आणण्याकरता मनसेचे आमदार जर काठी उगारणार असतील. तर हे आमदार मला चालतील. त्यांचा यामागचा उद्देश पवित्र नसेल .. किंबहुना तो नाहीच. त्यांना त्यांची मराठीची दुकानदारी भक्कम करायची असेल, शिवसेनेची गोची करायची असेल हे सारे मला पटतंय..समजतंय परंतु महाराष्ट्रला खरा धोका हा अबु आझमीसारख्या धर्मांध शक्तीचा आहे. मनसेच्या काठीने का होईना हा साप ठेचला जात असेल.. तर त्या मारहाणीस माझे समर्थन आहे.

Tuesday, October 27, 2009

अर्थ निकालाचा


महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अगदी अपेक्षित असेच लागले आहेत.हे निकाल लागल्यावर मला यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेतची आठवण येतीय.. या स्पर्धेत कोलकता नाईट रायडर्सचा संघ हरणार यामध्ये अगदी सगळ्यांचे एकमत होते.या निवडणुकीत नाईट रायडर्सची जागा भाजप-शिवसेना युतीने घेतली होती. अगदी नाईट रायडर्स प्रमाणे युतीनेही अगदी विजयाच्या तोंडातून पराभव खेचून आणला. नाईट रायडर्सप्रमाणे युतीच्या टीममध्येही अनेक स्टारर्स होते.मात्र या स्टारर्समध्ये एकवाक्यता नव्हती. जॉन बुकाननची मल्टीपल कॅप्टनची थियरी त्यांनी अगदी निवडणूक प्रचारातच अमलात आणली होती.ऐन निवडणुक प्रचार रंगात असतानाचे युतीचे नेते आणि आयपीएलच्या दरम्यानचे नाईट रायडर्सचे खेळाडू यांचे चेहरे एकमेकांच्या बाजूला लावले तर हे दोन्ही चेहरे आणि चेह-यावरचे भाव अगदी सारखेच दिसतील.राजकारण आणि क्रिकेट या गोष्टी भारतीय समाजात किती बेमालुमपणे मिसळलेल्या आहेत याचे उदाहरण म्हणून हे पुरेसे असावे.

आघाडी सरकारचा नाकार्तेपणा त्यांना सत्तेपासून दूर खेचण्याकरता पुरेसा होता.परंतु या नाकर्त्या राजवटीला हटवण्यासाठी समर्थ पर्यायच युतीने उभा केला नाही. शिवसेनेचा सारा प्रचार राज ठाकरेंभोवतीच फिरत राहीला. तर भाजपची अवस्था जुने वैभव आठवत बसणा-या व्यक्तींसारखी झालीय.लोकसभेत झालेल्या पराभवातून हा पक्ष अजुनही बाहेर पडलाय असे वाटत नाही.या निवडणुकीत एक पक्ष म्हणून भाजप उतरलाय असे कधीच वाटले नाही. राज्य भाजपचे युनीट एकत्र बांधण्याची जी शक्ती प्रमोद महाजनांच्याकडे होती ती ताकत त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मिरवणा-या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे नाही.हे या निवडणुकीत सिद्ध झालंय.

पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवणा-या भाजपने यंदाच्या निवडणुकीत अन्य पक्षांप्रमाणे घराणेशाहीचा पॅटर्न राबवला.गोपीनाथ मुंडेंनी आपली मुलगी पंकजा, भाजी पूनम महाजन आणि जावाई मधुसूदन केंद्रे यांना भाजपचे तिकीट मिळवून दिले.यापैकी पंकजा वगळता अन्य वारस या निवडणुकीत पराभूत झाले.मात्र या पंकजा मुंडेंना निवडून आणण्याकरता मुंडेंची बरीच शक्ती घालवावी लागली. मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्ये भाजप -सेनेला 6 पैकी केवळ परळीची एकमेव जागा मिळवता आली.संपूर्ण मराठवाड्यात परळी आणि उदगीर ह्या दोनच जागा भाजपला जिंकता आल्या.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा बाळगणा-या मुंडेंनी या पराभवाने कठोर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

भाजपची ही अवस्था तर दुसरिकडे शिवसेनेमध्येही यंदा आश्चर्यकारक असा गोंधळ होता.राडे, धाक, मारामारी आणि परप्रांतीयांचा द्वेष ह्या सारख्या घटकांच्या मदतीने शिवसेना मुंबईत आणि राज्यभर वाढली.उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्षपदाची सुत्रे घेतल्यापासून शिवसेनेचा हा राडेबाज चेहरा कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि राज ठाकरे या सारख्या नेत्यांना उद्धव यांची ही नवी संस्कृती मानवण्याची शक्यताच नव्हती.त्यामुळे ते शिवसेनेपासून दूर झाले. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा एकखांबी तंबू होता. राज्याच्या राजकारणात आपले अस्तित्व गडद करण्याकरता स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याकरता त्यांनी गेले पाच वर्षे भरपूर प्रयत्न केले. मात्र ऐन निवडणुक काळात राज यांच्या भुलभुलैयाला बळी पडून उद्धव स्वत:चा मार्ग भरकटले. हा मार्ग भरकटल्याची शिक्षा मतदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिली आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झालेला उदय हे या निवडणुकीतील महत्वाचे वैशिष्ट मानावे लागेल. अवघ्या साडेतीन वर्षात स्वत:चे 13 आमदार निवडून आणण्याची कामगिरी राज ठाकरेंनी केलीय.राज ठाकरेंच्या राजकीय कौशल्याला नक्कीच सलाम करावा लागेल. परंतु मनसेने हा विजय कसा मिळवला आहे. या यशाकरता कोणता शॉर्टकट त्यांनी वापरला ह्याचाही विचार त्याच्या जोडीने करायला हवा.

राज यांच्या काठीने शिवसेना नावाचा साप मारला गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मंडळीना तसेच अनेक स्वयंभू सेक्यूलर विचारवंताना आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविक आहे. किंबहुना, युतीला रुळावरून उतरवण्यासाठी मनसेच्या इंजिनाला कोळसा आणि तेलपाणी कोणी पुरवले याचा विचारही व्हायला हवा. 'मराठी खतरे में' असा नारा देत मराठी माणसाचा एकमेव तारणहार असल्याचा दावा करत बाळासाहेब ठाकरेंनी पूर्वी राजकारण केले.आता बाळासाहेबांचा हा वारसा राज ठाकरे पुढे चालवत आहे. मराठी माणसांच्या नावाने दुकानदारी करणा-या या पक्षांना किती महत्व द्यायचे याचा विचार मराठी माणसांनीच करायला हवा.

राज्यातील जनतेच्या मनात आघाडी सरकारविषयी जो रोष होता, तोच मनसेच्या मतांमुळे विभागला गेला आहे. मनसेमुळे युतीच्या 40 जागा गेल्या. मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत हा जो प्रचार निवडणुकीपूर्वी युतीने केला आहे. ते या निकालाने सिद्ध झाले आहे. आघाडीला सत्तेवर आणण्याकरता राज ठाकरेंच्या या 'अशोकसेनेचा ' मोठा वाटा आहे..

शिवसेनेचा लढाऊ बाणा संपला, , मवाळ झाली, सर्वसमावेशक झाली, म्हणून तिचे पारंपरिक मतदार मनसेकडे वळले, असे मानले जाते. तसे असेल, तर ते मराठी माणसांसाठी किती घातक आहे. याचा विचार सर्व सुजाण मराठी माणसांनी करायला हवा. कोणत्याही मुद्द्यावर नाक्यानाक्यावर राडा करणारे, नोकरीच्या शोधात आलेल्या परप्रांतीयांना पिटाळून लावणारे, टॅक्सी फोडणारे मराठी नेते जर मसीहा म्हणून ओळखले जात असतील तर ही अत्यंत अस्वस्थ करणारी बाब आहे.

मराठी माणसांची ओळख भलेही कुणाला आक्रमक अस्मितेचा साक्षात्कार घडवणारी वाटो, ही ओळख ही न्यूनगंडामधून निर्माण झालेली आहे. मराठी समाज हा भावनिक भुललैय्यात अडकलेला आहे. या भुलभैलैय्यातून बाहेर काढणारे नेते सध्या महाराष्ट्राला हवे आहेत. ह्या समर्थ पर्यायाचा शोध मराठी मतदारांना लागेपर्यंत नाकर्त्या सरकारची राजवट राज्यातून जाणे अवघड आहे.

Sunday, October 4, 2009

चीन @ 60


चीन. भारताचा शेजारी देश.चीन जगातली सध्याची एक महासत्ता.. क्रीडा,लष्कर,व्यापार आणि आणखी ब-याच काही क्षेत्रात जगात अव्वल स्थान मिळवायचेच.या महत्वकांक्षेने झपाटलेला देश .भारताशी सीमाप्रश्नावर उभा दावा मांडणारा देश. पंचशील कराराचे उल्लंघन करत 1962 मध्ये आपले लचके तोडणारा देश. जगातल्या सर्व भारतविरोधी शक्तींना उदारहस्ते मदत करणारा शेजारी..आणि बरेच काही

1 ऑक्टोबर 2009 या दिवशी चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीला 60 वर्षे झालीत. माओंच्या नेतृत्वाखाली चिनी शेतक-यांनी साम्यवादी क्रांती केली. मागच्या साठ वर्षात यांगेत्से नदीच्या पात्रातून 'लाल' पाणी वाहून गेलंय. वर्गसंघर्षाविरुद्ध लढे उभारणा-या चीनमध्ये गेल्या साठ वर्षात राज्यकर्त्यांनी वेगवेगळी प्रयोग केलेत.केंद्रीय सत्ता आणि साम्यवादी राजवट मजबूत करणे हाच या सर्व प्रयोगांमधील मुख्य उद्देश होता. विसाव्या शतकात चीनमध्ये झाली इतकी सांस्कृतिक आणि भौतिक पातळीवरची घुसळण क्वचितच कोणत्या देशात झाली असेल.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत श्रीमंत म्हणून राहण्यापेक्षा समाजवादी अर्थरचनेत गरीब राहणे कधीही चांगले’, अशी माओच्या सांस्कृतिक क्रांतीची हाक होती. माओंच्या या हाकेपासून थेट मांजर काळे असो वा गोरे, जे उंदीराची शिकार करते ते मांजर चांगले.’ असा डेंग झिओपिंग पर्यंतचा बाजरपेठीय दृष्टीकोन असा थक्क करणारा प्रवास चीनने गेल्या साठ वर्षात केला आहे.

माओने 1949 मध्ये चीनची सत्ता साम्यवादी क्रांतीने ताब्यात घेतली.परंतु माओचे साम्यवादी मॉडेल हे रशियन मॉडेलपेक्षा वेगळे होते.चीनी शेतकरी हा या मॉडेलचा मूळ गाभा होता.तर रशियन राज्यक्रांतीमध्ये मजुरांना सर्वात जास्त महत्व होते. माओंची प्रयोगशाळा होती अख्या चीन देश. सामुदायीक शेती, उद्योगांची नवी रचना यासारखे अचाट आणि अजस्त्र प्रयोग त्याने याकाळात केले.या प्रयोगाच्या जोरावर साम्यवादी पक्षात एक प्रबळ जमात तयार झाली होती.सत्तेचे टॉनिक घेऊन सशक्त बनलेला हा वर्ग आपल्याला भारी पडेल अशी भिती माओंना सतत सतावत होती.

साम्यवादी राजवटीच्या आशिर्वादाने बलवान होत चाललेल्या या भांडलवादी जमातीला त्यांनी मुळापासून उखाडायचे ठरवले.सांस्कृतिक क्रांतीची हाक त्यांनी कोट्यावधी जनतेला दिली.आपल्याच पक्षातल्या तळागळातल्या कार्यकर्त्यांना केंद्रीय नेत्यांवर हल्ला करण्यास चिथावले.त्याकाळातील चिनी समाजात घडत असलेल्या हिंसाचाराची वर्णने करणारी पुस्तके वाचली तर कुणीही बधीर होऊन जाईल. चंगेझ खानपासून ते हिटलर पर्यंत जगातल्या सर्व हुकूमशाहांना लाजवेल असे अभूतपूर्व शिरकाण याकाळात चीनमध्ये झाले. तेही सरकारी आशिर्वादाने.

माओंच्या नंतर चीनमध्ये डेंग झिओपिंग यांची राजवट आली.या राजवटीत माओंच्या उद्दीष्टांपासून पूर्णपणे फारकत घेण्यात आली.बदलत्या परिस्थितीशी दूळवून घेतले नाही तर ह्या महाकाय देशाचे तुक़डे होतील हे बहुधा डेंग यांनी ओळखले असावे.त्यामुळेच 1979 नंतर त्यांनी उदारीकरणाचे नवे युग चीनमध्ये आणले. गोर्बोचेव्ह यांनी सोव्हिएत युनियनमध्ये ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोइका’- स्वातंत्र्य आणि आर्थिक पुनर्रचनेचे नारे दिले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.कोंडून पडलेला रशियन समाज या वा-याने इतका मुळासकट हलला की या देशाची अनेक शकले झाली.डेंग यांनी गोर्बोचेव्हच्या आधीच हे बदल सुरु केले होते.मात्र टप्प्याटप्याने.केंद्रीय नेतृत्वाची पकड सैल होऊ न देता.

वर्गसंघर्षाविरुद्ध एकेकाळी नारे देणा-या चीनमध्ये आता ' आहे रे ' गटाचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.स्पेशल इकॉनॉमिक झोन, आक्रमक बाजार, गगनचुंबी इमारती, पंचतारांकित झगमगाट , अजस्त्र असे खाजगी प्रकल्प याच्या जोरावर एक नवा साम्यवादी राजवटीतला अस्सल भांडवलशाही चीन आज तयार झालाय.एवढ्या टोकाचा अंतर्गत विरोध घेऊन आत्मविश्वासाने वाटचाल करणारा चीन हा अधुनिक युगातील एक चमत्कार मानला पाहिजे.

चीनला झोपेतच राहू द्या. तो उठला, तर सारे जग हादरवून सोडेल’ ह्या नेपोलियनच्या प्रसिद्ध वाक्याची या देशाने गेल्या काही वर्षात जगाला वारंवार आठवण करुन दिली आहे.सोव्हियट युनीयनच्या पतनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचे हे काम या देशाने केले आहे. अगदी क्रिडा क्षेत्रावरही चीनने आपली हुकमत आता सिद्ध केलीय.आज रिपब्लिक ऑफ चायना म्हणून जो देश ओळखला जातो, त्या देशाने सुरुवातीचा बराच काळ ऑलिंपिककडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही.

१९४९नंतर प्रथम म्हणजे १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये चिनी अ‍ॅथलीट्स प्रथम उतरले. त्या स्पर्धेत चीनने थेट चौथा क्रमांक पटकावला. त्यानंतर जवळपास प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत चीनने आपला ठसा उमटवला आहे. 2008मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये चीनने 51 सुवर्णपदके घेऊन पहिला क्रमांक पटकावला. .तर या वर्षी सारा भारत वर्ष अभिनव बिंद्राला मिळालेल्या पहिल्या वाहिल्या वैयक्तिक सुवर्णपदकांच्या आनंदामध्ये मग्न झाला होता.

चीनची लष्करी ताकदही महाकाय आहे.जगातील सर्वात मोठे पायदळ चीनकडे आहे.चीनकडे 23 लाख खडे सैन्य आहे. भारताची सर्व महत्वाची शहरे चीनी क्षेपणअस्त्रांच्या टप्प्यात येतात.चीनचे वायूदळही तितकेच प्रभावशाली आहे. भारतानेही नुकतीच चीनच्या तुलनेत आपले हवाईदलाचे सामर्थ्य एक तृतियांशही नसल्याची नुकतीच कबुली दिली आहे. 1964 सालीच अण्वस्त्रधारी बनलेल्या या राष्ट्राकडे आज सुमारे 400 अणवस्त्र असल्याची शक्यता आहे.इराण, उत्तर कोरियाप्रमाणेच पाकिस्तान या आपल्या कट्टर शत्रूला अणवस्त्रधारी बनवण्यात चीनची सक्रीय मदत लाभलेली आहे.

भारताचा शेजारी देश असल्याने चीनमध्ये घडणा-या प्रत्येक घटनांचे थेट आपल्यावर परिणाम होऊ शकतो.चीनबाबतीत गाफील राहीलो तर काय होऊ शकते याचा अनुभव आपण 1962 मध्ये घेतला आहे.पाकिस्तान,म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ मालदिव आणि श्रीलंका अशा भारताच्या बाजूच्या सर्व देशात चीनने आपले जाळे विणले आहे. तिबेटच्या दुर्गम भागात अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या लोहमार्गाचा उद्देश जलद गतीने लष्करी हलचाली करता याव्यात हाच आहे. भारताच्या सीमाभागात चीनने वाढवलेल्या हलचालींनी वेळीच सावध होण्याची गरज आपल्याला आहे.

गेल्या साठ वर्षात चीनने जगात आपला दरारा निर्माण केलाय.परंतु अनेक समस्यांनी चीनला ग्रासलंय.. तिबेट आणि सिंकिंयाग हे चीनचे दोन अवघड दुखणे,हे दुखनं कधी उसळी मारेल याचा नेम नाही. दारिद्रय आणि भूकबळीने गेल्या साठ वर्षात लाखो लोकांना जीव गमावावा लागला आहे. आर्थिक सुधारणांचे वारे अंगात गेलेल्या तरुण वर्गाला 1989 मध्ये चिनी राज्यकरत्यांनी रणगड्यांखाली चिरडले. या उठावाला आता वीस वर्षे झालीत.परंतु भविष्यातही असा उठाव होऊ शकतो ही भिती चीनी राज्यकर्त्यांना सतत पोखरत असते.त्यामुळे कोणतेही लहाण मोठे उठाव पाशवीपणे चीनमध्ये दडपले जातात.बेकारी आणि विषमता चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलीय. एकेदिवशी या सा-याचा विस्फोट होऊन चीनी महासत्तेचा मुखवटा गळून पडेल असा अंदाज अनेकांनी वर्तवलाय.

ऐक शेजारी देश म्हणून चीनमध्ये होणा-या प्रत्येक गोष्टीकडे सावध नजर भारताला ठेवायला हवी.इतिहास, अर्थकारण, व्यापार, राजकारण व हजारो मैलांची सीमा या गोष्टींनी दोन देशांचे ऋणानुबंध अतूट आहेत. चिनी अर्थव्यवस्था कोसळली किंवा कम्युनिस्ट राजवट कोसळून तेथे राजकीय गोंधळ उडाला, तर त्याचे परिणाम युरोप-अमेरिकेपेक्षा भारताला अधिक भोगावे लागतील. चीनच्या हिरक महोत्सावाने दबून अथवा हुरळून न जाता डोळसपणे त्याचा सामना करण्याचे धोरणच भावी काळात भारताला उपयोगी पडणार आहे.

Friday, September 4, 2009

हिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप सैरभैर झालाय.प्रमुख नेत्यामंधील मतभेद वाढलेत.पक्षाला नवा नेता सापडलेला नाही.अडवाणीनंतर कोण ? संघ भाजपचा ताबा घेणार का ? अशा प्रकारचे प्रश्न सध्या वारंवार विचारले जातायत.अगदी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही भाजपचे काय होणार ? ही चिंता सतावतेय.देशातला एक प्रमुख पक्ष दुबळा झालाय.असं मत सध्या व्यक्त केलं जातंय.भाजपचे काय होणार ? हाच देशापुढचा सर्वात महत्वाचा आणि चिंतेचा प्रश्न बनलाय.असंच चित्र गेल्या आठवड्यात माध्यमांनी उभं केलं होतं.

भाजपचे काय होणार ? असा प्रश्न माझे अनेक मित्र मला सध्या विचारतायेत.मला याबाबत एक जुनी गोष्ट आठवते.एक अस्तिक आणि एक नास्तिक यांच्यात एकदा कडाक्याचा वाद झाला देव आहे की नाही यावरुन. नऊ दिवस नऊ रात्र अखंड वाद घातल्यानंतरही निर्णय लागला नाही.त्यामुळे दोघंही आपआपल्या घरी निघून गेले.नास्तिक व्यक्तीनं घरी गेल्यानंतर घरी देव्हारा स्थापन करुन त्यात देवाच्या मुर्तीची स्थापना केली.तर आस्तिक व्यक्तीनं देवासकट देव्हाराचं फेकून दिला.आपल्या मुल्यांवरचा विश्वास हरवलेल्या,नेमक्या अस्मितेचं भान विसरलेल्या त्या आस्तिक माणसानं देवासकट देव्हारा फेकून देण्याचं दृष्टांत भाजपला अगदी फिट्ट बसतो.

भाजपचे काय होणार ? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना या पक्षातील चार महत्वाच्या अप्रवृत्तीचा विचार करायला हवा.

1) धोरणांमध्ये कमालीचा गोंधळ

2 ) प्रमुख नेत्यांमधील टोकाचे मतभेद

3) भाजपचे झालेले काँग्रेसीकरण

4 ) भाजपचा नवा चेहरा कोण ?


धोरणांमध्ये कमालीचा गोंधळ :

गेल्या काही वर्षात भाजपचे धोरण कमालीचे टोकाचे बनले आहे.सत्ता असताना सर्वधर्म समभाव आणि सत्तेत नसताना हिंदुत्ववाद. सत्तेत असताना पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी कोणत्याही थराला जायचे आणि सत्तेत नसताना, पाकिस्तानविरोधी प्रचार करायचा . सत्तेत असताना आर्थिक उदारीकरणासाठी फायद्यातील उद्योग विकण्याचा सपाटा, सत्तेत नसताना, दुस-या सरकारने स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणाचा विरोध. सत्तेत असताना अमेरिकेबरोबर अणुकराराकरता पुढाकार दुस-या सरकारच्या याच कराराला कमालीचा विरोध असे कमालीचे टोकाचे अगदी दुटप्पी वाटावे असे धोरण या पक्षाने राबवले आहे.

स्वदेशी आणि सुरक्षेचा जप भाजप नेहमी करतो. मात्र अगदी संसदेवर हल्ला होऊनही ' अब आरपार की लडाई होगी ' असं भाषणातून गरजण्याइतपतचं भाजपची आक्रमकता मर्यादीत राहीली. एकेकाळी स्वदेशीचा सतत जप करणा-या या पक्षानं निर्गुंतवणूक हे नवीन मंत्रालय निर्माण केलं.अनेक फायद्यातले सरकारी उद्योग मोडीत काढले. समान नागरी कायदा आणि 370 वे कलम रद्द करणे हे मुद्दे अडचणीचे ठरतात म्हणून कार्यक्रम पत्रिकेतून वगळले गेले.राममंदिराचा जप हा फक्त निवडणुका आल्यावरच करायचा हेच बहुधा या पक्षाचं धोरणं असावं.

प्रमुख नेत्यांमधील कमालीचे मतभेद :

पार्टी विथ डिफरन्स ही भाजपची एकेकाळाची ओळख. मात्र आता पार्टी विथ डिफरन्सेस अशी नवी ओळख पक्षाची बनली आहे.जसवंत सिंग सारखा संपूर्ण हयात पक्षामध्ये घालवलेला नेता आपल्या पुस्तकांमध्ये जिनांचे कौतुक करतो.अरुण शौरीपांसून ते वसुंधराजे पर्यंत भाजपचे नेते पक्षासमोरील डोकेदुखी बनले आहेत.लोकसभा निवडणुका जिंकू न शकणारे अनेक नेत्यांनी पक्षात महत्वाच्या जागा बळकावल्यात.यापैकी काही नेत्यांचे संघटनात्मक किंवा व्यवस्थापनात्मक कौशल्य उत्तम आहे.परंतु आपली वैयक्तिक महत्वकांक्षा साध्य करण्यासाठी एकमेकांच्या बातम्या हेच नेते माध्यमांना पुरवतात.जसवंत सिंग-यशवंत सिन्हा-अरुण शौरी यांनी लिहलेलं अध्यक्षांना पत्र सार्वजनिक कसे झाले ? बाळ आपटे समितीचा अहवाल माध्यमांना कुणी पुरवला ? या आणि अशा प्रश्नांचा कठोरपणे मागोवा घेण्याची वेळ पक्षावर आलीय.गोपिनाथ मुंडे,नरेंद्र मोदी,शिवराज सिंह चौहान,वसुंधराजे शिंदे,यदीयुराप्पा विजयकुमार मल्होत्रा अशा राज्यपातळीवरील प्रमुख नेत्याला अपशकून करण्याकरता तितकाच मोठा गट पक्षात सतत कार्यरत असतो.भाजपच्या झालेल्या काँग्रेसीकरणाचे हे एक महत्वाचे उदाहरण.

भाजपचे काँग्रेसीकरण :-

जनसंघाची एक तर हिंदुमहासभा होईल किंवा काँग्रेस’ असे विधान जनसंघाच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले होते. हिंदुत्ववादाची पताका घेतलेल्या जनसंघाला ना हिंदुमहासभेचा आकार मिळाला, ना काँग्रेसचे रूप घेता आले. याच जनसंघाचा तीन दशकांनंतरचा अवतार म्हणजे भारतीय जनता पक्ष. तो मात्र काँग्रेस हिंदुत्ववादी अवतार किंबहुना हिंदुत्ववादाचा काँग्रेसी अवतार बनतो आहे, असे खुद्द भाजपच्या नेते-कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना आता वाटू लागले आहे.

भाजपचे काँग्रेसीकरण झाले, ते मुख्यत: गेल्या दोन दशकांत. वाजपेयी सरकारवर नजर टाकली तरी ते लक्षात येते. सुरेश कलमाडी, अरुण नेहरू आणि सुखराम यांच्यासारखे आयाराम ,गयाराम खूपच झाले ते सोडून दिले तरी वाजपेयी सरकारमधील किती मंत्री अस्सल संघवादी किंवा भाजपचे होते? जसवंतसिंह, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, राम जेठमलानी, मनेका गांधी, यांचा संघाशी किंवा संघाच्या विचारसरणीशी तरी काय संबंध? जसवंतसिंह लष्कारातील निवृत्त मेजर. यशवंत सिन्हा दोन तपे नोकरशाहीत वावरले आणि संधी मिळताच राजकारणात येऊन चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये थेट अर्थमंत्री बनले. पुढे १९९६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून वाजपेयी मंत्रिमंडळात सत्तेची ऊब कायम राखली. आता तर संजय गांधींचे चिरंजीव, मनेकापुत्र वरुण म्हणजे भाजपची मुलुखमैदान तोफ मानली जाते. अरुण नेहरू, मनेका आणि वरुण यांनी हिंदुत्ववादी भाजपचे प्रतिनिधित्व करावे, यात नेहरू-गांधी घराण्याला खिजवण्याचे समाधान भाजपला मिळत असले, तरी ही भाजपचीही थट्टा आहे, हे त्यांना समजत नाही. अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

भाजपचा नवा चेहरा कोण ? :-

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी गेली तीन दशके भाजपची धुरा सांभाळलीय. भाजपला प्रभावी राष्ट्रीय पक्ष बनवण्यात आणि सत्तेपर्यंत पोचवण्यात या दोन्ही नेत्यांचा महत्वाचा वाटा आहे.आज अटलजी पार थकलेत.अडवाणींचा शक्तीपात झालाय.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचा हा लोहपुरुष कमालीचा एकाकी पडलाय.कंदहारच्या मुद्यावर अडवाणी सारख्या मुरब्बी आणि अस्सल राष्ट्रीय विचाराच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली आहे ती खरीच अस्वस्थ करणारी आहे.त्यांना ही भूमिका जाणीवपूर्वक घेण्यास भाग पाडले असावे.अशीही शंका मनात येत राहते.भाजप थिंक टॅंकच्या अनेक फसलेल्या आणि अंगाशी आलेल्या धोरणांपैकी हे एक महत्वाचे उदाहरण.

भाजपच्या दुस-या फळीतल्या नेत्यांचा विचार केला तर भाजपचा चेहरा बनू शकेल असं एकच नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे नरेंद्र मोदी. 59 वर्षांचे नरेंद्र मोदी हे एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजराथमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.मोदींच्या कार्यकाळात गुजराथमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.मोदींचे हे मॅजिक या लोकसभा निवडणुकीत चालले नाही.असा एक महत्वाचा दावा त्यांचे विरोधक करतात.मात्र खुद्द अटलजी आणि अडवाणींचे मॅजिक चालण्याची सुरवात 1989 पासून झाली.मोदी कार्डचा वापर तर पक्षाने यंदा प्रथमच केलाय.

संघपरिवाराशी घट्ट जुळलेली नाळ हे मोदींचे आणखी एक बलस्थान.संघाच्या शक्तीशिवाय आणि मदतीशिवाय भाजप हा अधुरा आहे.हे एक अगदी उघड सत्य आहे.मोदी हे संघाचे अनेक वर्ष प्रचारक होते.संघाच्या मुशीत तयार झालेला नेता अशीच त्यांची पहिली ओळख पूर्वी होती आणि आजही आहे.अटलजींप्रमाणे मोदीही अविवाहीत आहेत.त्यामुळे इतर राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला असणारे नातेवाईकांचे कोंडाळे त्यांच्याभोवती नाही. हा मुद्दाही मोदींच्या फायद्याचा ठरला. स्वच्छ प्रतिमेमुळेच "खातो नथी, खावा देतो नथी' ही मोदींची घोषणा ब-यापैकी मोदीत्वाची ब-यापैकी ओळख करुन देते.

गुजराथची दंगल हा मोदींवरील डाग आहे.तसेच अल्पसंख्याक मतं भाजपला मोदींमुळे मिळाली नाहीत असाही प्रचार केला जातो.मात्र गेल्या आठ वर्षात साबरमती नदीमधून बरेच पाणी वाहून गेले आहे.एक विकासाची कास धरणारा राज्याला प्रगती पथाकडे नेणारा नेता अशी ओळख करुन देण्यात ते यशस्वी झालेत.विकासकामांना अडथळा येतो म्हणून अतिक्रमणं करुन बांधलेली अहमदाबादमधील मंदीरे पाडण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. मागील गुजराथ विधानसभे निवडणुकीत संघपरिवारातील एका 'प्रवीण' नेत्याने मोदींविरुद्ध मोहिम उघडली होती.ये तो सारे संत है, मोदी तेरा अंत है'' अशा घोषणा असलेल्या जाहिराती प्रकाशित केल्या. पण तरीही मोदी त्यामुळे विचलीत झाले नाहीत.मोदींच्या कट्टरवादाचा बाऊ करणा-यांनी ही उदाहरणे आवर्जून लक्षात घ्यायला हवीत.

ये देशाचे कट्टर धर्मांध व्यक्तीने जेवढे नुकसान नाही केले तेवढे बेगड्या धर्मनिरपेक्ष व्यक्तींने केले आहे.
धर्मनिरपक्षतेच्या नावाखाली बांगालदेशी घुसखोरांपासून ते अफजल गुरुंपर्यंत सर्वांचे लाड करणे हेच अनेकांचे धोरण असते. अशा प्रकारच्या बेगड्या वृत्तींचा भाजपमध्ये शिरकाव झालाय.हिंदुत्व हाच भाजपाचा वैचारीक गाभा आहे. हा गाभा हलवण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजपच्या इमारतीला सध्या चिरा गेल्यात.या चिरा बुजवायच्या असतील तर नरेंद्र मोदींकडेच पक्षाची धूरा सोपवायला हवी.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपला धक्का नक्कीच बसला असेल.परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही.आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले, पण अद्यापही भाजप उभा चिरला जावा, तसा फुटलेला नाही.एका प्रमाणिक विचारांनी भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांचे मोठे बळ भाजपच्या मागे उभे आहे.हे बळ जोपर्यंत भाजपकडे आहे तोपर्यत या पक्षाला मरण नाही.
वैचारिक गोंधळ झाल्यामुळे देवासंकट देव्हारा फेकून देणा-या व्यक्तीचा दृष्टांत भाजपला लागू होतो.असं मी या ब्लॉगच्या सुरवातीलाच सांगितलंय. या देवाची पक्षात पुन्हा एकदा स्थापना करायची असेल तर यासाठी करायला लागणा-या पुजेचे पौरोहित्य मोदींकडेच द्यायला हवे.

Wednesday, August 26, 2009

ऑस्ट्रेलियन युगाचा अंत


जो पिछले कई साल मे नही हूआ वो अब हो गया है !

हो हे खरं आहे. क्रिकेट विश्वातील ऑस्ट्रेलियाची दादागिरी संपलीय. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियानं सलग दुस-यांदा अ‍ॅशेस मालिका गमावली.कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत पॉंन्टिंगचा संघ पहिल्या,दुस-या किंवा तिस-या नाही तर थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय.जगातील सर्व गोलंदाजांची चिंधड्या उडवणारे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅट म्नान न करणारे कांगारु फलंदाज आता दोनशे धावाही करु शकत नाहीत.शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्राचा वारसा सांगणा-या कांगारुंच्या गोलंदाजाना एंडरसन-पानेसार ही शेवटची इंग्लंडची जोडी तासभर घाम गाळूनही फोडता येत नाही. फक्त इंग्लंड नाही तर भारत श्रीलंका आणि न्यूझिलंड संघाच्या विरुद्धही ऑस्ट्रेलियानं कसोटी गमावलीय.सलग सोळा कसोटी दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम करणा-या कांगारुंना सलग दोन कसोटी जिंकतानाही धाप लागतीय.क्रिकेटविश्व आता समतल पातळीवर आलंय.

मी क्रिकेटमधील वेस्टइंडिजचे युग पाहिले नाही.लॉईड,रिचर्डस,ग्रिनीच,मार्शल या सारख्या खेळाडूंचा खेळ मी पाहू शकलो नाही.परंतु ऑस्ट्रेलियन युग मात्र पुर्णपणे अनूभवलंय.सलग तीन विश्वचषक, सलग सोळा कसोटी जिंकण्याचा दोन वेळेस विक्रम, कित्येक कसोटी आणि एकदिवसीय मालिकांमध्ये अगदी एकतर्फी विजय मिळवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.विजयाचे दुसरे नाव म्हणजे ऑस्ट्रेलिया.प्रतिस्पर्धीला कोणतीही दयामाया न दाखवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.सामना जिंकून देणारे एक नाही तर अकरा खेळाडू एकाच संघात बाळगणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. कोणत्याही खेळाडूचे अथवा कर्णधाराचे अजिबात लाड न करणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.क्रिकेटमधील सर्वात खडूस स्वभावाची टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.

मला आठवतोय इंग्लंडमध्ये 1999 साली झालेला विश्वचषक.दक्षिण अफ्रिका संघ नेहमीप्रमाणे तुफान फॉर्मात होती.उपांत्य सामन्यात कांगारुचा संघ दोनशेही धावा करु शकला नव्हता.पण ते डगमदले नाहीत.त्यांच्या गोलंदाजांनी खांदे टाकले नाहीत.किवा क्षेत्ररक्षकांनी नाहक चूका केल्या नाहीत.शेन वॉर्नने एक अप्रतिम स्पेल टाकला.दक्षिण अफ्रिकेची प्रमुख फळी कापून काढली.शेवटच्या षटकात कांगारुंना विजयाकरता नऊ धावा हव्या होत्या.स्ट्रायकवर होता त्या विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडू लान्स क्लूसनर.पहिल्या दोन चेंडूवर क्लूसनरने चौकार मारले.सामना बरोबरीत आणला.चार चेंडू शिल्लक होते.क्रिकेट पाहणा-या सर्व प्रेक्षकांनी सामन्यांचा निकाल गृहित धरला होता.मात्र मैदानावर खेळणारे ते 11 ऑस्ट्रेलियन लढाऊंनी अजून हार पत्कारली नव्हती.तिस-या चेंडूवर क्लूसनरचा अतिउत्साह आणि डोनाल्डचा भित्रेपणा यांचा संगम झाला.चाणाक्ष कांगारुंनी ती संधी साधली.काही कळायच्या आत क्लूसनरला धावचित केले.सरस धावगतिच्या जोरावर कांगारु अंतिम फेरीत गेले.मोक्याच्या क्षणी कच खाणा-या दक्षिण अफ्रिकन वृत्तीला कधीही हार न मानणा-या कांगारुंच्या जिद्दीने धूळ चारली.या सामन्यानंतर झालेले तिन्ही (99.2003,2007 ) हे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकलेत.दक्षिण अफ्रिकेची मात्र विश्वविजेतेपदाची प्रतिक्षा अजून संपलेली नाही.

उगवलेला सूर्य हा मावळतोच. भरतीच्या वेळी खवळलेला सागरही शांत होतो.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन युगाचा अंत आता जवळ आलाय. शेन वॉर्न.ग्लेन मॅग्रा,मॅथ्यू हेडन,गिलख्रिस्ट हे ऑल टाईम ग्रेट ऑस्ट्रेलियन फलंदाज आता निवृत्त झालेत.त्यांची जागा घेणारे खेळाडू त्यांना अजुनही मिळालेले नाहीत.ब्रेट लि या दौ-यात केवळ टुरिस्ट ठरला.मिचेल जॉन्सचा फॉर्म पार हरपलाय.सलामीच्या जोडीचा प्रश्न अजनही सुटलेला नाही.शेवटच्या तीन कसोटीत शेन वॉटसनला सलामीला पाठवण्याचा त्यांचा निर्णय हा असाच अंगाशी आला.प्रभावी बेंच स्ट्रेन्थच्या अभावी ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला थकलेल्या आणि अनअनुभवी खेळाडूंवर अवलंबून राहावे लागले.या सर्व कारणामुळे पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडमध्ये सलग दुस-यांदा अ‍ॅशेस गमावल्यात.गेल्या शंभर वर्षात अशी नामुष्की कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघावर ओढावली नव्हती.कधी फ्लिंटॉफ,कधी स्टुएर्ट ब्रॉड तर कधी जोनाथन ट्रॉट अशा वैयक्तिक कामगरिच्या जोरावर इंग्लंडने ही मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे बलस्थान मानले जाणा-या ऑस्ट्रेलियन आत्मविश्वासाच्याच 'अ‍ॅशेस' झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या या पराभवानंतर टीम इंडियानेही बोध घेतला पाहिजे.ऑस्ट्रेलियन संघ हा काही ठरावीक खेळाडूंवर अवलंबून होता.हे आता स्पष्ठ झालंय. कसोटी सामन्यात भारतीय संघ अजूनही सचिन-द्रविड-लक्ष्मण-सेहवाग यांच्या पलिकडे जाऊ शकलेला नाही.अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर एकहाती सामना जिंकून देणारा गोलंदाज कोण याचे उत्तर आपल्याला ठामपणे देता येत नाही.एकदिवसीय संघातही वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले.युवा रक्ताला वाव दिला.परतु दोन वर्षानंतर पुन्हा एकदा तिस-या क्रमांकार खेळण्याकरता राहुल द्रविड हाच एकमेव पर्याय निवड समितीसमोर उरलाय. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या T-20 विश्वचषकात सेहवागची कमतरता जाणवली.युवराजला कसोटी संघात अजुनही आपला क्लास सिद्ध करता आलेला नाही.रोहित शर्मा ,रैना अनअनुभवी आहेत.हरभजन बेभरवशाचा तर झहीर खान सतत दुखापतीने घेरलेला.गेली दोन वर्ष भारतीय संघ ज्या नावाभोवती फिरतोय तो महेंद्र सिंग धोनी आपला खरा खेळ पार विसरलाय.अशा परिस्थितीमध्ये एकटा गंभीर संघाचा भार कसा वाहणार ? हा प्रश्न आहे.येत्या काही वर्षात सचिन-लक्ष्मण-राहुल हे निवृत्त होतील.हे महान खेळाडूंच्या निवृत्तीआधीच त्यांच्या पर्यायाचा शोध आपण गांभिर्याने घ्यायला हवा.अन्यथा अटलजी विना भाजपची झालीय त्याहीपेक्षा केविलवाणी अवस्था टिम इंडियाची होऊ शकते.क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियन युगाचा अंत होत असताना या सरत्या युगापासून हाच धडा टिम इंडियाने घ्यायला हवा.

Tuesday, August 18, 2009

शाहरुख पब्लिसिटी खान


शाहरुख खान या बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला चौकशीकरता अमेरिकेतल्या नेवार्क या विमानतळावर थांबवण्यात आलं.त्याच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. तो ग्लोबल आयकॉन आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगात त्याचे फॅन्स आहेत.भारतामधील अगदी वरपर्यंतच्या वर्तुळात त्याच्या ओळखी आहेत.अगदी कशाचाही त्या खडूस तपासणी अधिका-यांवर परिणाम झाला नाही.त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतरच त्यांनी त्याची मुक्तता केली.खरंतर शाहरुख सारख्या सेलिब्रिटीनी हा विषय समंजसपणे हाताळायला हवा होता.पण माझं नाव मुस्लिम आहे म्हणूनच मला थांबवण्यात आलं.असा दावा त्यानं केला.

एप्रिल महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम कॉन्टिनेंटल एअरलाईन्सनं दिल्लीहून न्यूयॉर्कला जात होते. विमानाकडं जात असताना विमानाच्या चार कर्मचा-यांनी त्यांना वाटेतच थांबवलं. आणि त्यांची झडती सुरु केली. कलामांनी कसलाही विरोध न करता सर्व प्रक्रिया पुर्ण केली. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, बुट काढा तर त्यांनी तेही केलं. त्या टिनपाट कर्मचा-यांपुढं आपला रुबाब गाजवावा असं त्यांना चुकूनही वाटलं नाही.

ह्या विषयावरचे नेटवरील संदर्भ अभ्यासत असताना माणिक मुंढे या माझ्या जुन्या सहका-याने त्याच्या ब्लॉगवर लियो टॉलस्टायबद्दलचा लिहलेला एक प्रसंग वाचण्यात आला.हा प्रसंग जशाच्या तशा लिहण्याचा मोह मला होतोय.टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होते. ते आपल्या काही सैनिकांची स्टेशनवर वाट पाहत होते. मॉस्कोत गोठवणारी थंडी असते त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ कुली आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळले. पण त्यांनी पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका कुलीला का सॅल्यूट मारतायत? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर कुलीला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

हे तीन प्रसंग आहेत तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे..तीन्ही व्यक्तींनी आपल्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तुत्व सिद्ध केलंय. हे कर्तुत्व सिद्ध केल्यानंतर जो समंजसपणा यायला हवा तो शाहरुखमध्ये आलाय..असं काही वाटतं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून मुस्लिम नट टॉपला आहेत. ' खान ' नावांच्या खानदानाची कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याची बातमी कधी तरी आल्याचं आठवतंय का ? परंतु घर नाकारलं गेल्यावर किसर किंग इमरान हश्मीलाही तो मुस्लिम असल्याचा साक्षात्कार होतो.अमेरिकेत तपासणी झाल्यावर शाहरुखला मुस्लिम म्हणून मिळणारी सहानभूती कॅश करण्याचा प्रयत्न करतो.

अमेरिकन नागरिकांमध्ये मुस्लिमांबद्दल खरचं द्वेष असाता तरं बराक हुसेन ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष कसे झाले असते ? अमेरिकेमध्ये आज लाखो मुस्लिम नागरिक राहातायत.त्यामधील अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत. पाकिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये गैरमुस्लिम नागरिकांना मिळणा-या वागणुकीपेक्षा कित्येक पटीनं सन्मानाची,प्रतिष्ठेची आणि बरोबरीची वागणूक या मुस्लिमांना मिळते.

9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेमधील परिस्थीती झपाट्याने बदललीय. सर्व सार्वजनिक ठिकाणी अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. कोणत्याही व्यक्तीची तपासणी होत असताना त्याची प्रतिष्ठा,पद समाजातील राजकीय स्थान कशा कशाचाही विचार केला जात नाही.अमेरिकेत जाऊन आलेल्या लाखो भारतीयांनी याचा अनेकदा अनुभव घेतलाय.परंतु त्यांनी त्याचा कधीही ब्रभा केला नाही.अमेरिकेत येणा-या,वावरणा-या प्रत्येक नागरिकांच्या हलचालींवर अमेरिकन सुरक्षा अधिका-यांचे बारीक लक्ष असते.त्यामुळेच अमेरिकेवर 9-11 नंतर एकही मोठा हल्ला होऊ शकला नाही.त्याच्या नेमक्या उलट आपल्याकडची परिस्थिती.26-11 नंतर आपण सतर्क झालो.असा एक समज आहे.पण आजही सीएसटी स्टेशनच्या परिसरात अगदी सहजपणे वावरता येतं..मेटल डिटेक्टर सुरक्षा अधिकारी काय आणि कसे काम करतात याची अनुभती अनेक जण रोज घेत असतात.त्यामुळेच या देशात कुठेही आणि कधीही अगदी सहज हल्ला होऊ शकतो.

देशातील सरंजामशाही नष्ट झाली.संस्थानिकांचे तनखे रद्द झाले.मात्र तरीही या देशातीन अनेकांच्या रक्तातील संरजामी गूण गेली नाही.उलट राजकारणी,सनदी नोकरशाहा,चित्रपट कलावंत,क्रिकेटपटू यांच्यातील सरंजामदाराची नवीन जमात या देशात निर्माण झालीय.आपल्या देशात मिळणा-या व्हीव्हीआयपी वागणुकीची त्यांना इतकी सवय झालीय की त्यांना परदेशातही हीच वागणूक मिळावी अशी अपेक्षा असते.

लालु प्रसाद यादव, शिवराज पाटील, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान अशा सत्तेत नसलेल्या लोकांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकार घेत आहे, याचा सुगावा या मंडळींना लागला आणि त्यांनी अख्खी संसद डोक्यावर घेतली. या कसलाही धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी सरकार दरवर्षी पाचशे कोटी रूपये खर्च करतं. या पाचशे कोटींमध्ये विकासाची कित्येक काम होऊ शकतात.आपल्या देशात अशीही एक व्यक्ती आहे, ज्याची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, तो कधी या देशाचा पंतप्रधान नव्हता वा राष्ट्रपती. तो कधी सरन्यायधीशपदावरही राहिलेला नाही.ही व्यक्ती आहे पंडित नेहरुंचा पणतूजावाई,इंदिरा गांधीचा नातजावाई,सोनिया गांधींचा जावई आणि प्रियंका गांधीचा नवरा रॉबर्ट वढेरा.गांधी घराण्याचा जावाईच हीच त्याची एकमेव ओळख.केवळ याच गोष्टींमुळे तो देशातील सर्वशक्तीशाली नागरिकांमध्ये जाऊन बसतो.

शाहरुखच्या चाहत्यांना हा संपूर्ण देशाचा अपमान वाटला.आपल्याकडे ही बातमी गाजत असताना अमेरिकेत आणखी एक प्रकार घडला. बॉब डिलन या वयोवृद्ध अमेरिकन संगीतकाराला एका चौकशी अधिका-याने अडवलं.बॉब डिलन आज ८४ वर्षांचे आहेत. गेल्या पाच दशकांत त्यांच्या संगीताने जगभरातल्या संगीतकारांवर प्रचंड प्रभाव टाकला आहे. अमेरिकेसह जगभरातल्या संगीत रसीकांवर त्यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे.असे हे जगप्रसिद्ध बॉब डिलन अमेरिकेतल्या एका चौकशी अधिका-याच्या 'अपमानास्पद' वागणुकीला सामोरे गेले. परंतु बॉब यांनी आपण संगीतकार आहोत,वृद्ध आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे सेलिब्रिटी आहोत..असा कोणताही गवगवा केला नाही.

ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.या जॉर्ज ऑरवेल यांच्या वाक्याची सतत आठवण येत राहते..मोअर इक्वल या प्रकारात मोडणारे अनेक शाहरुख आपल्या देशात आहेत.त्यांच्या या समजूतीला कोणी धक्का दिला की काही जण आदळाआपट करतात.कुणाला तो दलित महिलेचा अपमान वाटतो तर कुणाला आणखी काही..शाहरुख सारखे काही हूशार व्यक्ती त्याचा पब्लिसिटीसाठी वापर करुन घेतात.या देशातील भोळी-भाबडी जनता मात्र त्यांच्या अशा नाटकी वागण्याला बळी पडते.त्यांचा अपमान हा स्वत:चा अपमान समजते. कोणी आपला आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करुन घेतयं हे त्यांच्या गावीही नसतं.सरंजामशाही नष्ट झाले, संस्थानिकांचे तनखे रद्द झाले परंतु संस्थानिकांना देव समजण्याची खास भारतीय प्रवृत्ती अजूनही नष्ट झालेली नाही.

भारतीय मनोवृत्ती आणि अमेरिक मनोवृत्तींमध्ये असलेला हा एक सर्वात मोठा फरक.अमेरिकेची बरोबरी करायाला निघालेल्या आपण सर्वांनी सुरवातीला ही मनोवृत्ती बदलायला हवी.पण याची तयारी किती जणांची आहे ?

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...