Tuesday, October 27, 2009

अर्थ निकालाचा


महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अगदी अपेक्षित असेच लागले आहेत.हे निकाल लागल्यावर मला यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेतची आठवण येतीय.. या स्पर्धेत कोलकता नाईट रायडर्सचा संघ हरणार यामध्ये अगदी सगळ्यांचे एकमत होते.या निवडणुकीत नाईट रायडर्सची जागा भाजप-शिवसेना युतीने घेतली होती. अगदी नाईट रायडर्स प्रमाणे युतीनेही अगदी विजयाच्या तोंडातून पराभव खेचून आणला. नाईट रायडर्सप्रमाणे युतीच्या टीममध्येही अनेक स्टारर्स होते.मात्र या स्टारर्समध्ये एकवाक्यता नव्हती. जॉन बुकाननची मल्टीपल कॅप्टनची थियरी त्यांनी अगदी निवडणूक प्रचारातच अमलात आणली होती.ऐन निवडणुक प्रचार रंगात असतानाचे युतीचे नेते आणि आयपीएलच्या दरम्यानचे नाईट रायडर्सचे खेळाडू यांचे चेहरे एकमेकांच्या बाजूला लावले तर हे दोन्ही चेहरे आणि चेह-यावरचे भाव अगदी सारखेच दिसतील.राजकारण आणि क्रिकेट या गोष्टी भारतीय समाजात किती बेमालुमपणे मिसळलेल्या आहेत याचे उदाहरण म्हणून हे पुरेसे असावे.

आघाडी सरकारचा नाकार्तेपणा त्यांना सत्तेपासून दूर खेचण्याकरता पुरेसा होता.परंतु या नाकर्त्या राजवटीला हटवण्यासाठी समर्थ पर्यायच युतीने उभा केला नाही. शिवसेनेचा सारा प्रचार राज ठाकरेंभोवतीच फिरत राहीला. तर भाजपची अवस्था जुने वैभव आठवत बसणा-या व्यक्तींसारखी झालीय.लोकसभेत झालेल्या पराभवातून हा पक्ष अजुनही बाहेर पडलाय असे वाटत नाही.या निवडणुकीत एक पक्ष म्हणून भाजप उतरलाय असे कधीच वाटले नाही. राज्य भाजपचे युनीट एकत्र बांधण्याची जी शक्ती प्रमोद महाजनांच्याकडे होती ती ताकत त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मिरवणा-या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे नाही.हे या निवडणुकीत सिद्ध झालंय.

पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवणा-या भाजपने यंदाच्या निवडणुकीत अन्य पक्षांप्रमाणे घराणेशाहीचा पॅटर्न राबवला.गोपीनाथ मुंडेंनी आपली मुलगी पंकजा, भाजी पूनम महाजन आणि जावाई मधुसूदन केंद्रे यांना भाजपचे तिकीट मिळवून दिले.यापैकी पंकजा वगळता अन्य वारस या निवडणुकीत पराभूत झाले.मात्र या पंकजा मुंडेंना निवडून आणण्याकरता मुंडेंची बरीच शक्ती घालवावी लागली. मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्ये भाजप -सेनेला 6 पैकी केवळ परळीची एकमेव जागा मिळवता आली.संपूर्ण मराठवाड्यात परळी आणि उदगीर ह्या दोनच जागा भाजपला जिंकता आल्या.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा बाळगणा-या मुंडेंनी या पराभवाने कठोर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

भाजपची ही अवस्था तर दुसरिकडे शिवसेनेमध्येही यंदा आश्चर्यकारक असा गोंधळ होता.राडे, धाक, मारामारी आणि परप्रांतीयांचा द्वेष ह्या सारख्या घटकांच्या मदतीने शिवसेना मुंबईत आणि राज्यभर वाढली.उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्षपदाची सुत्रे घेतल्यापासून शिवसेनेचा हा राडेबाज चेहरा कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि राज ठाकरे या सारख्या नेत्यांना उद्धव यांची ही नवी संस्कृती मानवण्याची शक्यताच नव्हती.त्यामुळे ते शिवसेनेपासून दूर झाले. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा एकखांबी तंबू होता. राज्याच्या राजकारणात आपले अस्तित्व गडद करण्याकरता स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याकरता त्यांनी गेले पाच वर्षे भरपूर प्रयत्न केले. मात्र ऐन निवडणुक काळात राज यांच्या भुलभुलैयाला बळी पडून उद्धव स्वत:चा मार्ग भरकटले. हा मार्ग भरकटल्याची शिक्षा मतदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिली आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झालेला उदय हे या निवडणुकीतील महत्वाचे वैशिष्ट मानावे लागेल. अवघ्या साडेतीन वर्षात स्वत:चे 13 आमदार निवडून आणण्याची कामगिरी राज ठाकरेंनी केलीय.राज ठाकरेंच्या राजकीय कौशल्याला नक्कीच सलाम करावा लागेल. परंतु मनसेने हा विजय कसा मिळवला आहे. या यशाकरता कोणता शॉर्टकट त्यांनी वापरला ह्याचाही विचार त्याच्या जोडीने करायला हवा.

राज यांच्या काठीने शिवसेना नावाचा साप मारला गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मंडळीना तसेच अनेक स्वयंभू सेक्यूलर विचारवंताना आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविक आहे. किंबहुना, युतीला रुळावरून उतरवण्यासाठी मनसेच्या इंजिनाला कोळसा आणि तेलपाणी कोणी पुरवले याचा विचारही व्हायला हवा. 'मराठी खतरे में' असा नारा देत मराठी माणसाचा एकमेव तारणहार असल्याचा दावा करत बाळासाहेब ठाकरेंनी पूर्वी राजकारण केले.आता बाळासाहेबांचा हा वारसा राज ठाकरे पुढे चालवत आहे. मराठी माणसांच्या नावाने दुकानदारी करणा-या या पक्षांना किती महत्व द्यायचे याचा विचार मराठी माणसांनीच करायला हवा.

राज्यातील जनतेच्या मनात आघाडी सरकारविषयी जो रोष होता, तोच मनसेच्या मतांमुळे विभागला गेला आहे. मनसेमुळे युतीच्या 40 जागा गेल्या. मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत हा जो प्रचार निवडणुकीपूर्वी युतीने केला आहे. ते या निकालाने सिद्ध झाले आहे. आघाडीला सत्तेवर आणण्याकरता राज ठाकरेंच्या या 'अशोकसेनेचा ' मोठा वाटा आहे..

शिवसेनेचा लढाऊ बाणा संपला, , मवाळ झाली, सर्वसमावेशक झाली, म्हणून तिचे पारंपरिक मतदार मनसेकडे वळले, असे मानले जाते. तसे असेल, तर ते मराठी माणसांसाठी किती घातक आहे. याचा विचार सर्व सुजाण मराठी माणसांनी करायला हवा. कोणत्याही मुद्द्यावर नाक्यानाक्यावर राडा करणारे, नोकरीच्या शोधात आलेल्या परप्रांतीयांना पिटाळून लावणारे, टॅक्सी फोडणारे मराठी नेते जर मसीहा म्हणून ओळखले जात असतील तर ही अत्यंत अस्वस्थ करणारी बाब आहे.

मराठी माणसांची ओळख भलेही कुणाला आक्रमक अस्मितेचा साक्षात्कार घडवणारी वाटो, ही ओळख ही न्यूनगंडामधून निर्माण झालेली आहे. मराठी समाज हा भावनिक भुललैय्यात अडकलेला आहे. या भुलभैलैय्यातून बाहेर काढणारे नेते सध्या महाराष्ट्राला हवे आहेत. ह्या समर्थ पर्यायाचा शोध मराठी मतदारांना लागेपर्यंत नाकर्त्या सरकारची राजवट राज्यातून जाणे अवघड आहे.

5 comments:

Niranjan Welankar said...

नमस्कार. अत्यंत रोखठोक, सडेतोड आणि तरीही पक्ष निरपेक्ष लेखन. निष्पक्ष पत्रकारिता याहून वेगळी असू शकेल का ? लेखकाचे विश्लेषण अत्यंत समर्पक आणि लॉजिकली विलक्षण मजबूत. लेखमालेच्या गुणवत्तेला हा लेख संपूर्ण साजेसा. भारतीय समाज आणि क्रिकेट यांना एकत्र बघणे आवडले.
ह्या लेखात नेहमीपेक्षा किंचित कमी माहिती मिळाली असं वाटलं. तरीही जोरदार !

अमोल परांजपे said...

ओंकार... तुमचे लेख नेहमीच चांगले असतात... अपवाद फक्त या लेखाचा. यातलं तुमचं लेखन अतिशय एकांगी वाटलं. राज ठाकरे आणि मनसेवर तुम्ही ओढलेले ताशेरे फारसे पटणारे नाहीत. शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणात राज ठाकरे स्वतःचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करणारच. ही परिस्थिती हाताळणं शिवसेना-भाजपला जमलं नाही हे त्यांचं अपयश आहे. त्याकरता राज ठाकरे आणि मराठी मुद्द्याला टार्गेट करायचं कारण काय? बाकी आयपीएल-राजकारण तूलना आवडली...

Gary said...

bhai ye blog shayad tumne jaldi me likha hai...but no exuse for u...expectation par tum khare nai utre is baar...cong-ncp k bare me tumne kch b nai likha...mns-raj k bare me b itna kch nai hai...aur infomation jyada aur critisizm kam ho gaya hai...
aur ye blog 23 july ko aata to bhot achha lagta kyuki ab pool k niche se bhot pani beh gaya hai...
ab cm k ummidwar pe blog expect karta hu(cm koun hoga aur kyu) aur thoda bhujbal k d-cm banne par...
means in short...
the blog on race of power n kursi...

santosh gore said...

मला वाटतं शिवसेनेचा प्रयत्न प्रामाणिक होता. जनतेच्या प्रश्नावर त्यांची भूमिकाही योग्य होती. मात्र मनसे, रिडालोसमुळे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असलेलं जनमत विखुरलं गेलं. आणि ते आघाडी सरकारच्या पथ्यावर पडलं. नसता विधानसभेवर भगवा डौलाने फडकला असता. पण काय करणार म्हणतातना 'आमची माणसं, आमची माती' तेच खरं.

Nima said...

ओंकार, ब्लॉगची सुरुवात तर मस्तच झालीय. पण मनसेला मत देताना लोक का विचार करतील, कारण नाव सो़डलं तर राज ठाकरेंनी अक्षरशः संपूर्ण पक्षच हायजॅक केलाय. जात-पात, धर्म, भाषा, या मुद्यांवर जोपर्यंत मतदान होतं, तोपर्यंत राज्याचंच काही भलं होणार नाही. खरे प्रश्न त्यामुळे सुटणार नाहीत, लोकांना हे कळत नाही हे दुर्दैव. बाकी शिवसेना सत्तेत आली असती तरी काही दिवे लावले असते असं मुळीच वाटत नाही. वाईट पर्याय आणि खूप वाईट पर्याय यातून लोकांनी वाईट पर्याय निव़डलाय.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...