Showing posts with label IPL. Show all posts
Showing posts with label IPL. Show all posts

Wednesday, November 1, 2017

नेहराजी का जवाब नही !

मी क्रिकेट पाहयला सुरुवात केली त्यावेळी वासिम अक्रमचा दबदबा होता. त्याच्या अचुकतेचा हेवा वाटायचा. अगदी गल्ली क्रिकेटमध्येही एखाद्या फास्ट बॉलरनं चांगला बॉल टाकला की त्याला '' क्या बात है अक्रम ''  अशी सहज दाद आमच्याकडून दिली जायची. अक्रमसारखा डावखुरा फास्ट बॉलर आपल्याकडं का नाही ? असं सारखं वाटयचं. त्यानंतर काही वर्षांनी श्रीलंकेच्या टीममध्ये चामिंडा वास आला. मुरलीधरनच्या जोडीनं वासनं श्रीलंकन बॉलिंगचा भार अनेक वर्ष वाहिला. वासच्या अचुकतेसोबतच त्याचं डावखुरेपण हे आणखी मोहित करत असे. चामिंडा वास, नुवान झोयासा, संजीवा डिसल्वा, रुचीरा परेरा अशा चार डावखुऱ्या बॉलरनं 90 च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं. पण आपल्याकडं एकही डावखुरा फास्ट बॉलर नव्हता नव्हता. ही शोधयात्रा आशिष नेहरानं संपवली. आशिष नेहरा हा माझ्या पिढीनं पाहिलेला पहिला भारतीय डावखुरा फास्ट बॉलर. करसन घावरी हा  यापूर्वीचा  डावखुरा फास्ट बॉलर 1981 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यामुळे 1999 साली श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये पहिला बॉल टाकण्यापूर्वीच नेहरा माझ्यासाठी स्पेशल बनला होता.


    फेब्रुवारी 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 28 ओव्हर्स टाकून नेहराला अवघी एक विकेट मिळाली. त्यानंतर तो थेट दोन वर्षांनी बुलावायोमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध दुसरी टेस्ट खेळला. या मॅचमध्ये त्यानं स्विंगवर जबरदस्त हुकमत गाजवली. झिम्ब्बावेसाठी तो अनप्लेयबल बॉलर होता. बॉलिंग अॅक्शन आणि बॉल स्विंग करण्याची क्षमता यामुळे नेहराची अनेकदा वासिम अक्रमशी तुलना केली गेली. आपल्या 18 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये नेहरानं त्याच्यातल्या क्षमतेला क्वचितच न्याय दिलाय.


    एकापेक्षा एक रथी-महाराथी बॅट्समन्सच्या प्रभावात वावरणाऱ्या भारतीय फॅन्सकडून  एखाद्या पराभवाचं खापर हमखास आशिष नेहराच्या डोक्यावर फोडलं जायचं. 2016 पर्यंत नोकियाचा बेसिक फोन वापरणारा  नेहरा हा ट्विटर आणि फेसबुक ट्रोल्सचं हमखास टार्गेट होता. त्याची टर उडवणाऱे पोस्ट्स, कार्टून्स यांनी या सोशल मीडियावरच्या पेजच्या लाईकर्समध्ये मोठी भर पडलीय. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर नेहराला मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आलं होतं. अशा प्रकारच्या ट्रोल्सच्या टोळधाडीपासून बचाव करण्यासाठी 'सेन्स ऑफ ह्युमर' आणि  'निश्चयी वृत्ती' या दोन गोष्टींची आवश्यकता असते. नेहरामध्ये या दोन्ही गोष्ठी ठासून भरल्या होत्या. त्यामुळेच क्रिकेट करियरच्या शेवटच्या टप्प्यात किरोकळ अंगकाठी आणि दुखापतींनी जर्जर असलेला आशिष नेहरा सर्वांचा 'नेहराजी' बनला.

   
     नेहराची 18 वर्षाची कारकीर्द ही दुखापतींनी गच्च भरलेली आहे.  ' दोन दुखापतींच्यामध्ये कुठतरी माझं शरीर आहे ' असं नेहरानचं एकदा म्हंटलं होतं. अनेक फास्ट बॉलर्सच्या करियरवर दुखापतीमुळे मोठा परिणाम झाला. त्यांनी या दुखापतीला कंटाळून क्रिकेटचा डाव अर्ध्यावरच मोडला. पण 12 ऑपरेशन्स होऊनही नेहरा तब्बल 18 वर्ष खेळलाय. मोहम्मद अझहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, अजय जाडेजा,. सौरव गांगुली, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली अशा सात भारतीय कॅप्टनच्या नेतृत्वामध्ये नेहरा खेळलाय. इतक्या विविध कॅप्टनच्या नेतृत्वात खेळलेला यापूर्वीचा भारतीय खेळाडू हा फक्त सचिन तेंडुलकर आहे. ( सचिन 6 कॅप्टनच्या नेतृत्वाखाली खेळलाय. तो स्वत: ही कॅप्टन होता. तसा हिशेब केल्यास ही संख्या 7 होते) नेहरानं पदार्पण केलं तेंव्हा विराट कोहली साडेनऊ वर्षांचा होता. तर 1999 साली अवघ्या दीड वर्षाच्या असलेल्या ऋषभ पंत या पोरासोबतही नेहराजींनी एक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलाय. नेहराच्यानंतर काही महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा एमएसके प्रसाद हा सध्या निवड समितीचा अध्यक्ष आहे.

       
      2003 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धचा त्याचा स्पेल कुणीही विसरु शकणार नाही. डरबनच्या मैदानावरची ती रात्र ही फक्त आशिष नेहराची होती. ताशी 150  किमीच्या वेगानं नेहरानं केलेल्या गोळीबारानं इंग्लंडचे सहा बॅट्समन गळपटले. वन-डेमध्ये भारतीय बॉलर्सच्या टॉप टेन कामगिरीत नेहराच्या या स्पेलचा नक्कीच समावेश करावा लागेल. पाकिस्तान दौऱ्यात मोईन खानसारखा खत्रूड बॅटसमन समोर असतानाही त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये सहा रन्सचं संरक्षण करत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. अगदी 2011 वर्ल्डकपमध्ये मोहालीत झालेल्या भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये त्यानं टिच्चून बॉलिंग केली. 10 ओव्हर्समध्ये अवघे 33 रन्स देत 2  विकेट्स घेतल्या. त्याच मॅचमध्ये फिल्डिंग करताना नेहराच्या बोटाला दुखापत झाली. लय सापडलेला नेहरा वर्ल्ड कपची फायनल खेळू शकला नाही. वर्ल्ड कपच्या 'विनिंग फोटो' मध्ये तुटक्या बोटाचा नेहरा आपल्याला दिसतो. 2011 ची वर्ल्ड कप फायनल न खेळल्याचं शल्य त्याला आणि माझ्यासारख्या नेहरा फॅनला नेहमी जाणवत राहिल.

       2011 च्या वर्ल्ड कपनंतर निवड समितीनं नेहराचा वन-डेसाठी कधीही विचार केलाच नाही. दुखापत साथ सोडायला तयार नव्हती. क्रिकेटमध्ये फास्ट बॉलर्ससाठी असलेली साधारण कारकीर्द केंव्हाच संपली होती. अनेक नवे बॉलर्स उदयाला आले होते. नेहराचे समवयस्क सहकारी निवृत्त झाले. काहींवर निवृत्तीसाठी दबाव आणण्यात आला. त्यांच्यापर्यंत निरोप पोहचवले गेले. भोवताली चाललेला हा सारा संगर पाहून नेहरा थिजला नाही. तर तो उभा राहिला. धावला. त्यानं विकेट्स मिळवल्या.

      टी-20 या क्रिकेटमधल्या सर्वात नव्या आणि फास्ट फॉरमॅटमध्ये नेहराला आपल्यातलं क्रिकेट नव्यानं गवसलं. मॅचमध्ये केवळ 4 ओव्हर्स टाकणं त्याच्या शरिराला मानवणारं होतं. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेयरडेव्हिलकडून आयपीएल खेळलेला पण काहीसा दुर्लक्षित झालेल्या नेहराला चेन्नई सुपरकिंग्जनं  करारबद्ध केलं. तेंव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. पण 2015 चा आयपीएल सिझन नेहरानं गाजवला. 2015 च्या सीझनमधला तो यशस्वी बॉलर होता. पहिल्या सहा ओव्हर्समधला पॉवर प्लेचा खेळ असो किंवा शेवटच्या 4 ओव्हर्समधली हाणामारी फास्ट क्रिकेटमधल्या या दोन्ही आव्हानात्मक परिस्थितीमध्ये नेहराच्या बॉलिंगमधलं सोनं हे घासून जगासमोर आलं.

       कधीही हार न माणण्याच्या त्याच्या या वृत्तीमुळेच  5 वर्षांनी नेहरानं टी-20 मध्ये त्यानं कमबॅक केलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरद्ध बंगळुरुमध्ये झालेल्या महत्वाच्या लढतीमध्ये हार्दीक पांड्याला शेवटच्या ओव्हर्समध्ये मौल्यवान टिप्स देणारा नेहराजी साऱ्या क्रिकेट विश्वानं पाहिला. नेहराचा तो कानमंत्र उपयोगी ठरला. बांगलादेशविरुद्धचा धक्कादायक पराभव भारतानं टाळला. कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात नेहरानं भारतीय बॉलर्सनं घडवण्याचं काम केलं. केवळ हार्दिक पांड्याच नाही तर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, बुमराह ही भारतीय फास्ट बॉलर्सची सध्याची पिढी झहीर खानच्या साथीनं नेहरानं घडवलीय.

 2004 साली पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडीमध्ये झालेल्या टेस्टमध्ये नेहरानं टेस्ट करियरमधला शेवटचा बॉल टाकला. त्यावेळी त्याचं वय अवघं 25 होतं. तर 2011 साली पाकिस्तानविरुद्धच वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये चांगली कामगिरी करुनही त्याचा वन-डेसाठी पुन्हा कधीही विचार झाला नाही. पण आपली प्रत्येक मॅच ही शेवटची आहे, असा विचार करुन मैदानावर उतरलेल्या नेहरानं नेहमीच आपल्यातलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलाय.

  साधारण महिनाभरापूर्वीच नेहराजींची गौरव कपूरनं मस्त दिलखुलास मुलाखत घेतलीय. युट्यूबर ती मुलाखत आवर्जुन पहा. आशिष नेहरा हा माणूस अस्सल सोनं आहे हे तुम्हालाही पटेल.  घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय करियरचा शेवट करण्याचं भाग्य अलिकडच्या काळात फक्त सचिन तेंडुलकर याच भारतीय क्रिकेटरला मिळालंय. आता सचिन तेंडुलकरनंतर हे भाग्य आशिष नेहराला मिळणारय. भारतीय क्रिकेटचा हा आनंदयात्री निवृत्त होतोय. त्याला निरोप देताना पाणवलेल्या डोळ्यांनी त्याचे चाहते एकच वाक्य उच्चारतील 'नेहराजी का जवाब नही !'  

Tuesday, October 8, 2013

सावलीतला सूर्य तो...


राहुल द्रविडनं T-20 खेळणं म्हणजे साने गुरुजींनी सावरकरांसारखे जहाल भाषण देण्यासारखे आहे. सहा वर्षांपूर्वी जेंव्हा आयपीएलला सुरुवात झाली त्यावेळी माझा एक मित्र मला कुत्सितपणे हे हिणवत होता. अर्थात त्याच्या या टवाळखोर विधानाला आधारही तितकाच होता. पंचपक्वान्नावर वाढलेल्या व्यक्तीला रस्त्यावरचे फास्ट फुड मानवणारच नाही. आणखी वेगळ्या शब्दात सांगयचे म्हंटलं तर मोहम्मद रफी सारखा स्वर्गीय आवाजाचा गायक जर मिल्का प्रमाणे लैला ते ले लेगी म्हणू लागला तर काय होईल तशीच सा-यांची अवस्था द्रविडच्या T-20 खेळण्याबाबत झाली होती.

आता राहुल द्रविड टेस्ट आणि वन-डे प्रमाणेच टी-20 मधूनही निवृत्त झालाय. तो ज्या राजस्थान रॉयल्सच्या टीमचा कॅप्टन म्हणून चॅम्पियन्स लीग खेळला त्या टीममध्ये एक शेन वॉटसन सोडला तर कोणीही आंतरराष्ट्रीय स्टार नव्हता. तरी त्या टिमनं फायनलपर्यंत अपराजित राहण्याची किमया साधली. 18 वर्षाचा संजू सॅमसन ते 42 वर्षांपर्यंतच्या प्रवीण तांबेपर्यंत राजस्थानच्या प्रत्येक खेळाडूला रॉयल फॉर्म सापडला याचे कारण होते राहुल द्रविडचे नेतृत्व.

अर्थात टीमसाठी सर्वस्व ओतण्याची आणि सहका-यांच्या सर्वोत्तम खेळाचा अविभाज्य घटक बनण्याची त्याला सवय अगदी पहिल्या टेस्टपासून आहे. लॉर्डसमध्ये स्विंग खेळपट्टीवर सातव्या क्रमांवर फलंदाजीला येऊन पदार्पण करताना त्यानं काढलेल्या 95 रन्समध्ये कॉपीबूकमधले अनेक फटके सापडतील. पण सर्वांना लक्षात आहे त्या टेस्टमधलं सौरव गांगुलीचं नवाबी पदार्पण आणि त्यांची तडफदार सेंच्युरी. सचिन तेंडुलकरच्या स्पेशल आणि लक्ष्मणच्या मॅजिकल इनिंगमध्ये द्रविडचा सहभाग हा नेहमीच मोलाचा आणि महत्त्वाचा राहिलाय.

1999 च्या वर्ल्डकपमध्ये तो भारताचा टॉप स्कोअरर होता हे किती जणांच्या लक्षात आहे ? त्याच वर्ल्डकपमध्ये गांगुलीनं श्रीलंकेविरुद्ध काढलेले 183 आणि पुढे काही महिन्यांनी हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सचिनच्या 186 रन्सच्या  इनिंगची आठवणी आजही रंगवल्या जातात. मात्र या दोन्ही इनिंग द्रविडच्या 145 आणि 153 रन्सशिवाय पुर्ण होऊ शकल्या असत्या का ? वन-डे क्रिकेटमध्ये 300 रन्सच्या दोन पार्टनरशिपमध्ये सहभागी असणारा द्रविड हा एकमेव खेळाडू आहे.

परदेशी खेळपट्यांवर विशेषत; स्वींग गोलंदाजीवर भारतीय बॅटसमनची उडणारी भंबेरी ही नेहमीचीच बोंब. द्रविडनं 2002 मध्ये इंग्लंड दौ-यात तीन सेंच्युरी झळकावत परदेशी वातावरणात कसं खेळायचं याच उदाहरण घालून दिलं. पुढच्या आठ वर्षात भारतानं परदेशात मिळवलेल्या अनेक संस्मरणीय विजयाचा पाया या तीन सेंच्युरीनं रचला गेला. 
  
2004 मध्ये भारताचा पाकिस्तान दौ-याचा हिरो ठरला तो मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग. मात्र त्याच सीरिजमधल्या शेवटच्या टेस्टमध्ये दोन्ही टीममधल्या अन्य कोणत्याही खेळाडूला सेंच्युरी झळकवण्यात अपयश आले असताना राहुल द्रविडनं 270 रन्स काढले होते. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात याच मालिका विजयात याच 270 धावांचे किती मोल होते हे सांगण्याची कोणती वेगळी गरज आहे ?
राहुल द्रविडमध्येही काही मर्यादा होत्या. मात्र आपल्या मर्यादा समजून घेत टीमसाठी सर्वस्व ओतणारा खेळाडू म्हणून तो नेहमीच ओळखला जाईल. त्याची प्रत्येक लाजवाब खेळी ही त्याच सामन्यात त्याच्या सहकारी खेळाडूनं केलेल्या एखाद्या ऐतिहासिक खेळीपुढे झोकाळून गेलीय. समोरचा खेळाडू संपूर्ण बहरात असताना त्याला टीमच्या हितासाठी साथ देणे आणि त्याचबरोबर आपला सर्वोत्तम खेळ ही तितक्याच योग्यतेने खेळण्याची कला असलेले किती सभ्य खेळाडू आज क्रिकेटजगतात शिल्लक आहेत ?

अजिंक्य राहणे,संजू सॅमसन, दिनेश याज्ञिक, स्टुअर्ट बिन्नी, अशोक मनेरिया, प्रवीण तांबे, राहुल शुक्ला, कूपर  या सा-या नवख्या खेळाडूंना घेऊन जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा पाडाव करणारा कॅप्टन हा केवळ राहुल द्रविडच असू शकतो. संघासाठी आणि सहका-यांसाठी निस्वार्थीपणे सारं काही देण्याच्या त्याच्या या वृत्तीमुळेच फिक्सिंगच्या राखेतून राजस्थान रॉयल्सचा संघ फिनिक्सभरारी मारु शकला.

सामान्य खेळाडूंच्या असमान्य खेळामुळेच राजस्थान रॉयल्सची टीम ही आयपीएलमधली अनेकांची आवडती टीम आहे. या टीमचा पहिला कॅप्टन शेन वॉर्नही हरहुन्नरी होता. पण शो मनशिप त्याच्या रक्तातच होती. टी-२० ला लागणारा सारा मसाला त्याच्यामध्ये भरलेला होता.राहुल द्रविडनं त्याच्या उलटपद्धतीनं आणि तितक्याच परिणामकतेनं रॉयल्सची कॅप्टनसी सांभाळली.

राहुल द्रविडप्रमाणेच सचिन तेंडुलकरही आता टी-२० मधून निवृत्त झालाय. आयपीएल आणि चॅम्पियन लीग या दोन्ही स्पर्धा जिंकणा-या टीमचं सदस्य होण्याचं भाग्य सचिनला लाभलं. इथेही सचिननं आपल्या जुन्या सहका-यावर मातच केली. पण सचिनच्या मुंबई इंडियन्सकडे स्टार-सुपरस्टार खेळाडूंचा भरणा होता. ग्लेन मॅक्सवेलसारखा मिलीयन डॉलर बेबी खेळाडू ते जेवताना लोणचे वापरावे तितकाच वापरु शकतात. त्या उलट राजस्थान रॉयल्सचं आहे. मर्यादीत रिसोर्सेमधून सर्वोत्तम आऊटपूट काढण्याची पद्धत या टीममध्ये आहे. जे आऊटपूट सुरुवातीच्या काळात शेन वॉर्ननं काढलं. त्याचा नैसर्गिक वारसा द्रविडनं पुढं वाढवला. आता सचिनच्या निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी आणखी एखाद्या महागड्या,  आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सलामीवीराला घेऊन सचिनची मुंबई इंडियन्समधली जागा सहजगत्या भरुन काढू शकतील. 

पण राहुल द्रविडचा वारसदार राजस्थान रॉयल्सला मिळणे अशक्य आहे. कायम सावलीत राहिलेल्या या सुर्याचं महत्त्व हे त्याच्या निवृत्तीनंतर प्रखरतेनं जाणवणार आहे ते असं.  

टीप - भारतीय क्रिकेटचा सच्चा सेवक हा माझा राहुल द्रविडवरचा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दिपस्तंभ हा माझा राहुल द्रविडवरचा जुना ब्लॉग वाचण्याठी इथे क्लिक करा 

Wednesday, April 21, 2010

आयपीएलचे काय करायचे ?





इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल आणि वाद हे समीकरण अगदी घट्ट आहे. आयपीएलच्या जन्मापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही स्पर्धा वादग्रस्त बनलीय. कधी खेळाडूंचा लिलाव, चिअरलिडर्सचा नाच, नॉन स्टॉप खेळाचा ओव्हरडोस, संघ मालकांचा हस्तक्षेप अशा वेगवेगळ्या कारणामुळे ही स्पर्धा वादग्रस्त बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या एकूण कारभार ( गैर) वेगवेगळ्या बातम्या समोर येतायत. हे प्रकरण प्रचंड व्यापक, गुंतागुतीचे आणि गंभीर आहे. मॅच फिक्सिंग नंतर भारतीय क्रिकेट समोरची सर्वात मोठी समस्या आयपीएलने उभी केलीय. त्यामुळेच सध्या सडकेपासून संसदेपर्यंत एकच प्रश्न चर्चेला जातोय तो म्हणजे आयपीएलचे काय करायचे ?




भारतीय क्रिकेटच्या सुरवातीच्या दिवसांबद्दल वाचलेला एक जुना किस्सा मला इथे लिहावासा वाटतो. 1950 च्या दशकात टेस्ट खेळणा-या भारतीय खेळाडूला दरडोई 250 रुपये वेतन दिले जायचे. या काळात न्यूझीलंड विरुद्धची मॅच भारताने 4 दिवसात जिंकली. या विजेत्या टीम इंडियाला दरडोई 200 रुपये वेतन दिले गेले. या कमी पगाराबद्दल खेळाडूंनी बोर्डाच्या अधिका-यांकडे तक्रार केली. त्यावेळी, '' चार दिवसात तुम्हाला मॅच जिंकण्यास कोणी सांगितले होते ? पाचव्या दिवसाचा खेळ झाला नाही म्हणून तुमचे दरडोई 50 रुपये कापून घेण्यात येतायत.


आज क्रिकेट खेळणा-या आणि पाहणा-या कोणत्याही भारतीयाला विश्वास बसणार नाही. पण हा किस्सा अगदी खरा आहे. पाच दशकानंतर आयपीएलने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. देश सोडा पण आपल्या राज्याच्या टीमकडूनही न खेळणा-या खेळाडू आता लाखोपती-करोडपती बनतायत. वर्षातून सात आठवडेच चालणा-या या क्रिकेटच्या बाजारात त्यांची मोठी कमाई होतीय. एकाच सिझनमध्ये होणारी त्यांची कमाई जुन्या काळात टेस्ट खेळणा-या खेळाडूंच्या आयुष्यभरातल्या कमाईपेक्षा जास्त आहे.



जागतिक मंदीचा अनिष्ट प्रभाव अजून ओसरलेला नाही. आयपीएलच्या विश्वाला मंदीची अजिबात झळ बसलेली नाही. पुणे आणि कोची ह्या दोन टीम 3200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीला विकल्या गेल्या. पुणे आणि कोची या दोन संघांनी मिळून जो पैसा ओतलाय, तो आयपीएलमधल्या सध्याच्या सर्वाधिक महागडय़ा म्हणजे मुंबई इंडियन्स टीमसाठी 2008 मध्ये मुकेश अंबानींनी गुंतवलेल्या रकमेच्या सातपट जास्त आहे..! जागतिक क्रिकेटमध्ये क्रांतीकारी बदल घडवणा-या क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्याचे काम ललित मोदींनी केले आहे. मोदींना त्याचे श्रेय द्यायलाच हवे.



क्रिकेटमध्ये पैसा येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. क्रिकेट खेळाडूंनी पैसा कमावण्यावरही कुणाचा आक्षेप असता कामा नये. कॉर्पोरेट कंपन्यांनी क्रिकेटमध्ये पैसा गुंतवणे आणि त्यातून नफ्याची अपेक्षा करणे निदान मला तरी वावगे वाटत नाही. आयपीएलमध्ये पैसा आहे... येतोय यात काही आक्षेप नाही खरा प्रश्न आहे हा पैसा कोणत्या मार्गाने येतो ? आयपीएलच्या टीममध्ये कोणाकोणाचे समभाग आहेत ? श्रीनीवासन सारख्या बोर्डाच्या खजिनदाराने आयपीएल टीम विकत घेणे हे कितपत नियमाला धरुन आहे ?



माजी परराष्ट्र राज्य मंत्री शशी थरुर यांनीही आयपीएलच्या वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटच्या कारभारात ढवळाढवळ करणारे थरुर काही पहिले राजकारणी नाहीत. शरद पवार, अरुण जेटली, फारुख अब्दुल्ला आणि प्रफुल्ल पटेल हे राजकारणीही आयपीएलशी या ना त्या कारणामुळे संबधित आहेत.केवळ क्रिकेटच नाही तर प्रत्येक क्रीडा संघटनेचा या राजकारण्यांनी खेळ खंडोबा केलाय. राजकारण्यांच्या या कारभारची कोण आणि कधी चौकशी करणार ?



आयपीएल स्पर्धेवर बंदी घालावी अशी मागणी आता अनेक जण करु लागलेत मला हे मान्य नाही


1 ) आयपीएल सारख्या स्पर्धा हे 21 व्या शतकातले क्रिकेट आहे. त्यामुळे भारतात नाही तर अन्य कोणत्या तरी देशात ह्या स्पर्धा नक्की होणार. त्या देशातल्या स्पर्धेत हे खेळाडु खेळतील..मग ह्या स्पर्धा भारतामध्ये घेण्यात काय वावगे आहे ?



2 ) आयपीएल स्पर्धेमुळे एक मोठी क्रिकेट इकॉनॉमी तयार झालीय. या इकॉनॉमीतून मोठा महसूल मिळू शकेल..त्यामुळे आयपीएल स्पर्धा होणे आवश्यक आहे.



3 ) आयपीएल स्पर्धेमुळे काही तरुण खेळाडू पुढे आले आहेत.. तरुण खेळाडुंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यात ही स्पर्धा महत्वाची ठरते. तसेच सिनियर्स खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ मिळतो. सचिनच्या मार्गदर्शनामुळे सौरभ तिवारी आणि रायडूचा खेळ बहरला. कुंबळेच्या कानमंत्रामुळे विनय कुमारच्या आक्रमणाला चांगली धार आली.



4 ) टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय खेळाडूंचे असते. मात्र ते सर्वांचे पूर्ण होऊ शकते असे नाही. त्यामुळे अशा युवा खेळाडूंना पैसा, प्रसिद्धि आणि ग्लॅमर मिळवण्यासाठी आयपीएलचा उपयोग होऊ शकतो.



5 ) आयपीएल स्पर्धेला क्रिकेट रसिकांचा मोठा पाठिंबा मिळालाय. तिन्ही सिझनमधलील मॅचेसना होणारी गर्दी हे याचेच उदाहरण आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचे भक्कम पाठबळ लाभलेली ही स्पर्धा बंद करण्याचा अधिकार बीसीसीआय किंवा केंद्र सरकारला नाही.


आयपीएलच्या चेअरमनपदावरुन ललित मोदींना निलंबित करण्यात आलंय. आयपीएलचा कारभार सुधारण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे. अजुनही काही महत्वाचे बदल आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये व्हायला हवेत...


भारतीय क्रिकेटचा सुधारणा कार्यक्रम -


1 ) आयपीएल बाबतच्या सर्व गैरकारभारची चौकशी लवकरात लवकर व्हायला हवी.यातील दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा करण्यात यावी


2 ) आयपीएल चेअरमनला निरंकुश अधिकार देण्यात येऊ नयेत. नवा ललित मोदी तयार होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी


3 ) आयपीएलमध्ये काळा पैसा गुंतला आहे का ? कंपनी व्यवहार नियमांचे किती उल्लंघन आयपीएल मालकांनी केले हेही तपासायला हवे


4 ) आयपीएलच्या लिलावात लागणारी बोली, टीम मालकांनी यात गुंतवलेला पैसा, टीमच्या मालकांचे नाव त्यांचा उद्योग, समभागधारक व्यक्ती, आयपीएल फ्रेंचायझींना होणारा फायदा-तोटा ही सर्व माहिती वेळोवेळी जाहीर करण्याचे बंधन घालण्यात यावे.तसेच माहिती अधिकाराखाली ही माहिती वेळोवेळी तपासण्यात यावी


5 ) आयपीएल मॅचदरम्यान मॅच फिक्सिंग करण्यात आले अशीही चर्चा आहे. आयसीसी आणि भारतीय पोलीसांनी याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.


6 ) आयपीएल मॅचेसवर करमाफीचा वर्षावर करु नये. या स्पर्धांमधून मोठ्या प्रमाणात महसूल राज्य सरकारला मिळू शकतो.


7 ) यावर्षीच्या आयपीएलमध्ये 60 सामने खेळवण्यात आले. पुढील वर्षी त्याची संख्या 95 होणार आहे. हे अतिक्रिकेट खेळाच्या मुळाशी येतं. ऐन उन्हाळयात इतकी दिर्घकाळ स्पर्धा चालवण्यात येऊ नये.खेळाडूंच्या फिटनेसवर याचा गंभीर परिणाम झालाय.


8 ) आयपीएल सामन्यांची संख्या निम्याने कमी करावी. तीन आठवड्यांपेक्षा याचा जास्त कालावधी असू नये.


9 ) सर्वात महत्वाचे म्हणजे क्रिकेट रसिकांनी आयपीएलला किती महत्व द्यायचे याचा विचार करायला हवा. व्यवसायिक फायदा मिळवण्यासाठी निर्माण करण्यात आलेला हा क्रिडाप्रकार आहे. आंतराष्ट्रीय खेळापेक्षा याला जास्त महत्व देण्यात येऊ नये.


महागाई, नक्षलवाद, दुष्काळ, राष्ट्रीय सुरक्षा यासारखे अनेक महत्वाचे प्रश्न सध्या देशाला भेडसावतायत. प्रश्नांच्या या जंजाळात आयपीएल सारख्या विषयाला एवढे अवास्तव महत्व देणे किती योग्य आहे ? याचा विचार सर्वांनीच डोकं शांत ठेवून करायला हवा. असा विचार खरंच झाला तर आयपीएलचे काय करायचे ? या प्रश्वाचे उत्तर मिळू शकेल.

Saturday, January 23, 2010

नो पाकिस्तानी प्लीज !



भारतीयांची पाकिस्तान बद्दलची भूमिका प्रत्येक पिढीनुसार बदलत चाललीय. माझ्या आजोबांच्या पिढीतल्या व्यक्तींना पाकिस्तान बद्दल कुठतरी हळवा कोपरा होता. फाळणी ही काही काळापूरती झालेली गोष्ट आहे. काही काळानंतर भारत-पाकिस्तान एकत्र येतील ( हिंदी सिनेमात जसे लहानपणी हरवलेले दोन भाऊ शेवटी एकत्र येतात. ) असा त्यांचा विश्वास होता. पंडित नेहरुंचे लाहोरमधील संपूर्ण स्वराज्याबाबतचे भाषण, खान अब्दुल गफार खान यांचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, कराची, लाहोर या शहरांबद्दलच्या आठवणींनी त्यांच्या -हदयात घट्ट घर करुन ठेवलं होतं.


माझ्या वडिलांच्या पिढीने भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली दोन युद्ध पाहिली. युद्ध असो वा क्रिकेट कोणत्याही क्षेत्रात भारतीयांना कोणत्याही मार्गाने हरवायचे. ही खास पाकिस्तानी मनोवृत्ती या पिढीने जवळून अनुभलीय. पाकिस्तानी नागरिक आपले पूर्वीचे भाऊ आहेत. हे त्यांनाही मान्य होतं. परंतु बदलत्या काळात पाकिस्तानच्या सिंधू- रावी किंवा भारताच्या गंगा-यमुना नदीतून बरेच पाणी वाहून गेलंय. हे त्यांना उमजू लागलं होतं. तरीही हे दोन भाऊ एकत्र नाही तर जवळ येतील असं त्यांनाही वाटत असे. व्यापार, संगीत, चित्रपट आणि क्रिकेट यासारख्या मिळेल त्या माध्यमातून पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या पिढीने केला. इंडो-पाक पीस फोरम सारख्या अनेक संस्था याच काळात निर्माण झाल्या. पाकिस्तानी नागरिकांच्या मानगुटीवरचे भारत विरोधी उतरवण्याचा प्रयत्न ह्या पिढीने अनेकदा अनेक माध्यमातून केला.


माझ्या पिढीच्या नजरेतून पाकिस्तान कसा वाटतो ? काश्मिरी पंडितांना हूसकावून लावण्याकरता दहशतवाद्यांना मदत करणारा देश, शिख बांधवांमध्ये अलग खलिस्तानाची भावना वाढवणारे कपटी राष्ट्र, कारगीलच्या बर्फाळ शिखरांवर घुसखोरी कराणारा विश्वासघातकी शेजारी, देशाच्या वेगवेगळ्या शहरात बॉम्बस्फोट घडवणारी ना 'पाक' शक्ती म्हणजे पाकिस्तान. अशीच पाकिस्तानची वेगवेगळी ओळख लहानपणापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर आंम्हाला होत आलीय.


13 डिसेंबर 2001 हा दिवस आमचीच काय कोणतीही भारतीय पिढी कधी विसरु शकणार नाही. भारतीय संसदेवर, लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरावर या दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला रसद पाकिस्तानमधून पूरवण्यात आली हे लगेच सिद्ध झाले. या दिवसानंतर दोन्ही देशाच्या सीमेवरची परिस्थिती कमालीची बदलली. भारतीय लष्कराची मोठी जमावाजमव पाकिस्तानच्या सीमेवर करण्यात आली. कोणत्याही क्षणी पाकिस्तानबरोबरच्या युद्धाला आपला देश आता तयार झालाय. हे आम्हाला जाणवतंय. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यानंतर तर दोन देशांमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन अण्विक शक्तींमध्ये युद्ध होऊ नये याकरता जागतिक समुदयाचा मोठा दबावगट कार्यरत आहे. त्यामुळेच या दोन देशांमधले युद्ध गेल्या दहा वर्षांपासून टळत आलंय. परंतु पाकिस्तानबरोबरच्या युद्धाला कधीही या तोंड फूटू शकते याची जाणीव माझ्या पिढीला आहे.


या सा-या इतिहासाची आठवण माझ्या पिढीत ताजी आहे. त्यामुळेच ‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या तिस-या आवृत्तीच्या लिलावात पाकिस्तानी खेळांडूंवर बोली लागली नाही याचे दु:ख अथवा आश्चर्यही आमच्या पिढीतल्या अनेकांना वाटले नाही. आयपीएल ही निव्वळ व्यवयासियक स्पर्धा आहे. हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले जातात. जगातल्या सर्वात मोठय़ा सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठय़ा मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी यामध्ये गुंतलेली आहेत.त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्वकांक्षी व्यक्तीने तयार केलेले हे मॉडेल आहे. यामुळे यामध्ये निव्वळ व्यवसायिक गोष्टींना सर्वात जास्त महत्व येणे स्वाभाविक आहे.


या स्पर्धेतले संघ मालक जेंव्हा एखाद्या खेळाडूवर बोली लावतात. त्यावेळी त्या खेळाडूकरता लावलेला प्रत्येक पैसा वसूल होईल याची खबरदारी ते घेणार हे उघड आहे. त्यामुळेच संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असलेल्या पोलार्ड, बाँड, रोच आणि पानेर्ल या खेळाडूंना त्यांनी अधिक पसंती दिली. शाहिद अफ्रिदी किंवा उमर गुल या सारख्या खेळाडूंच्या गुणवत्तेबद्दल कोणाला शंका नाही. मात्र राजकीय परिस्थितीमुळे हे खेळाडू भारतात येऊच शकणार नसतील तर त्यांच्यासाठी करोडो रुपये कशाला मोजायचे ?


आयपीएल स्पर्धा मार्चमध्ये सुरु होणार आहे. मार्चपर्यंत अथवा ही स्पर्धा सुरु असताना भारतात एखादा दहशतवादी हल्ला होणार नाही याची खात्री कोणी देऊ शकेल ? मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तान बद्दलचे भारतीय जनमत प्रक्षुब्ध आहे. पाकिस्तानी खेळाडू दहशतवादी नाहीत हे मान्य. पण भारतविरोधी दहशतवादी पुरवणा-या देशाचे ते प्रतिनिधी आहेत हे कोण विसरेल ? देशातल्या नागरिकांच्या रोषाला, राजकीय संघटनेच्या दादागिरीला ते बळी पडू शकतात. अशा परिस्थीत त्यांच्या सुरक्षेचा खर्च संघ व्यवस्थानाने का पेलावा ? यासारखे अनेक प्रश्न या लिलावानंतर उपस्थित झाले आहेत.


या लिलावानंतर पाकिस्तानंमध्ये उमटलेल्या प्रतिक्रीया अनेकांना अतातायी किंवा आक्रस्ताळ्या वाटतील. पण ह्या सर्व पाकिस्तानी मनोवृत्तीला साजेशा अशाच आहेत. पाकिस्तानी शिष्टमंडळाचा भारतीय दौरा रद्द करण्यात आला. पाकिस्तान संघाच्या कबड्डी दौ-यावरही सरकारी कु-हाड कोसळली. भारत सरकारला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सरकारने केला. पाकिस्तानी केबल चालकांनी आयपीएल स्पर्धा न दाखवण्याचा निर्णय घेतलाय. (भारतीय चित्रपटांनाही पाकिस्तानमध्ये बंदी होती. मात्र त्याकाळातही भारतीय चित्रपटांच्या व्हीडीओ कॅसेट पाकिस्तानात सर्रास मिळत असे ) आयपीएल स्पर्धा ही पाकिस्तानी फॅन्सना या पद्धतीने पाहायला मिळणार यात शंका नाही. आता पीसीबी आयसीसीकडे या प्रकरणाची तक्रारही करणार आहे. पाकिस्तानी सडकेपासून ते संसदेपर्यंत सर्व माध्यमातून आयपीएलच्या निमित्ताने तयार झालेले भारतविरोधी वातावरण एकवटण्याचा प्रयत्न सध्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून केला जातोय.


पाकिस्तानमधल्या सध्याच्या परिस्थीतीला ब-याच अंशी पाकिस्तानी राज्यकरतेच जबाबदार आहेत. या राज्यकर्त्यांने जे पेरले तेच आता पाकिस्तानमध्ये उगवलंय.. जागतिक दहशतवाद्यांचे पाकिस्तान माहेरघर बनला आहे. आता परिस्थिती आमच्या हातामध्ये नाही याची कबुली पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही दिलीय. त्यामुळेच कोणताही संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला तयार नाही.चॅम्पीयन्स ट्रॉफी, विश्वचषक या सारख्या महत्वाच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला गमवावे लागले आहे. श्रीलंका संघाव हल्ला करणा-या मारेक-यांचा शोध अजुनही लागलेला नाही.


पाकिस्तानच्या या सध्याच्या अवस्थेला त्यांचे खेळाडू जबाबदार नाहीत. हे मान्य. पण ज्या देशातून भारतविरोधी शक्तींना सतत खतपाणी घातले जाते. त्याच देशाचे ते प्रतिनिधी आहेत. मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांचे ते देशबांधव आहेत. हे आमची पिढी कधीही विसरु शकणार नाही. याबद्दल कोणत्याही पाकिस्तानीला माफ करण्याचा आमचा मूड नाही. आमच्या पिढीची ही मानसिकता ओळखून आयपीएल मालकांनी, 'नो पाकिस्तानी प्लीज ' असा बोर्ड लावला तर त्यात वावगे काय ?

Tuesday, May 26, 2009

आयपीएल धमाका


आयपीएल ही क्रिकेट जगतामधली एक सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धेची दुसरी आवृत्ती आता पार पडलीय. 'इंडियन प्रिमियर लीग' स्पर्धा अनेक वादविवाद उलट-सुलट चर्चेनंतर दक्षिण अफ्रिकेत पार पडली.या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले गेले होते. जगातल्या सर्वात मोठय़ा सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठय़ा मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी गुंतलेली आहेत.त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्वकांक्षी व्यक्तीची ही स्पर्धा असल्यामुळे ही स्पर्धा पार पडणार हे नक्की होत.या स्पर्धेमध्ये क्रिकेटबाहेरचे अनेक गोष्टींना कमालीचे महत्व होते.त्याची चर्चाही झाली.परंतु प्रत्यक्ष मैदानावर खेळ करत असताना मात्र केवळ क्रिकेटच्याच कौशल्यांना अजुन महत्व आहे.त्यामुळेच अस्सल क्रिकेटपडूंचं नाण या स्पर्धेत खणखणीत वाजलं.

टी -२० हे केवळ युवा क्रिकेटपटूंसाठीच असते या गृहितकाला यंदाच्या स्पर्धेत जोरदार तडा गेलाय.या स्पर्धेत ज्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला त्या गिलख्रिस्टचे वय आहे 37.अंतिम सामन्याचा मानकरी आणि संपूर्ण स्पर्धेत ज्यानं अत्यंत जिगरबाज खेळ केला तो अनिल कुंबळे आहे 38 वर्षाचा..तर या स्पर्धेत ज्यानं सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली तो मॅथ्यू हेडन आहे 37 चा.या तिन्ही खेळांडूंना कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता केंव्हाच सिद्ध केलीय.किंबहूना सर्व प्रकारची आव्हान यशस्वीपणे पार केल्यानंतरच त्यांनी निवृत्ती स्विकारली. या खेळाडूंना आता कोणासमोरही काहीही सिद्ध करायचे उरलेले नाही.तरीही या तिघांनी तरुणांना लाजवेल असा खेळ केला.

गुणवत्ता ही जर अस्सल असेल तर ती कालातीत असते.एखादा क्रिकेटपटू वयस्कर झाला की त्याची विनाकारण थट्टा करण्याचा ट्रेंडचं बनलाय.दर्जेदार खेळाडूंना T-20 चे कारण देत पेन्शनीत काढणा-या सर्व क्रिकेटतज्ज्ञ आणि काही खेळाडूंना या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी सणसणीत चपराक दिलीय.

यंदाचे आयपीएल हे भारताच्या बाहेर खेळवले गेले. अफ्रिकेत भारताप्रमाणे पाटा खेळपट्टी नाहीत.त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातला चांगला संघर्ष या स्पर्धेत पाहायला मिळालाय.संपूर्ण स्पर्धेत 200 ची धावसंख्या केवळ एकदाच राजस्थान रॉयल्सने पार केली.केवळ दोनच शतकं नोंदवले गेले. भारतीय खेळपट्ट्यावर खो-याने धावा काढणारे या स्पर्धेत अपयशी ठरले. भारतीय सुवा खेळाडूंनीही या स्पर्धेमधून ब-याच काही गोष्टी शिकल्या असतील.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने मागच्या स्पर्धेत सर्वांनाच चकीत केलं होतं.यंदाही त्यांनी झुंजार वृत्ती जिवंत असल्याचं सिद्ध केलंय.राजस्थानकडे त्यांच्या हंगामातले सर्वात यशस्वी खेळाडू सोहल तन्वीर आणि शेन वॉटसन नव्हते.काही खेळाडू जखमी झाले,कमरान खान पकंज सिंगच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित केल्या गेल्या.तरीही शेन वॉर्नचा हा संघ शेवटपर्यंत उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम होता.काही मोजक्या गोष्टी सुधारल्या तर हा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार बनू शकेल.

कोलकता आणि मुंबई या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे एक दुस्वप्नचं ठरलं.कोलकता संघ मैदानाबाहेरच्या गोष्टीमुळेच अधिक अडचणीत आला.मल्टीपल कॅप्टन्सचा वाद,सौरव दादाची कर्णधारपदावरुन केलेली हाकालपट्टी,'भू-खा-नन' चे अनाकलनीय डावपेच आणि फेक ब्लॉगरचा पाठलाग यामुळे हा संघ अगदी रसातळाला गेला.संपूर्ण स्पर्धेत हा संघ केवळ हरण्यासाठीच खेळत होता.विजयाच्या तोंडातून अनेक पराभव या संघाने खेचून आणले. मुंबई इंडियन्सचे सारेच डावपेच अनाकलनीय होते.सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे.परंतु त्याला कर्णधार पदाचा भार पेलवत नाही...ही बाब या स्पर्धेत पुन्हा एकदा सिद्ध झाली.फलंदाजीच्या क्रमावारीत होणारा बदल,झहीरची दुखापत,हरभजनच्या भूमिकेबाबत गोंधळ ,जयसूर्याचा हरवलेला फॉर्म,सचिनच्या बॅटमधला चढ-उतार या बाबी संघाला सातव्या क्रमांकावर घेऊन गेल्या. युवराजच्या लहरी फलंदाजी प्रमाणेच पंजाबचा खेळ या स्पर्धेत राहीला.या संघानं शेवटपर्यंत झूंज दिली.परंतू शॉन मार्शची अनुपस्थिती आणि जयवर्धेनेला अत्यंत महत्वाच्या क्षणी झालेली दुखापत यामुळे हा संघ यंदा उपांत्य फेरी गाठू शकला नाही.

दिल्ली आणि चेन्नई हे या स्पर्धेतले सर्वात संतुलीत संघ होते.भारतीय आणि परदेशी खेळाडूंचे योग्य मिश्रण या संघात आहे.दिल्लीनं साखळी सामन्यात अत्यंत धडाकेबाज पद्धतीनं खेळ केला.नेहरानं या स्पर्धेत शानदार कमबॅक केलं.डिव्हीलीयर्स-दिलशान जोडूनं जबाबदार खेळं केला.कार्तिक- भाटीया-संगवान या युवा भारतीय खेळाडूंनीही दिल्लीला विजय मिळवून दिले.गिलख्रिस्टच्या जबरदस्त खेळीमुळे दिल्ली संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.परंतु संपूर्ण स्पर्धेत ग्लेन मॅग्राला बेंचवर बसवण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता.विशेषत: विजेतेपदाच्या जवळ येऊन दिल्ली संघ पराभूत झाला.त्यामुळे मॅग्राला न खेळवण्याची सल सेहवागला जाणवत राहील. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा चेन्नईला भोवला.सोपे झेल सोडण्याबाबत चेन्नईची कोलकताशी जणू काही स्पर्धाच सुरु होती.तर मुरलीधरन वगळता प्रमुख गोलंदांमध्ये कोणतीच शिस्तबद्धता नव्हती.कोलकत्ता नाईट रायडर या स्पर्धेतल्या सर्वात दुबळ्या संघाविरुद्ध चेन्नईचे गोलंदाज 188 धावांचे संरक्षण करु शकले नाहीत.धोनीने गोलंदाजीमध्ये काही कल्पक बदल केले.परंतु त्याच्यामधला विध्वसंक फलंदाज गेल्या काही काळात संपूर्णपणे लोप पावलाय.उंपात्य सामन्यात तर धोनीच्या संथ खेळामुळेच चेन्नईच्या वेगाला खिळ बसली.हाच महेंद्र सिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार आहे.T-20 विश्वचषक स्पर्धा अगदी तोंडावर आली असताना धोनीचा हा खराब फॉर्मची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. एक कल्पक कर्णधार या एकमेव निकषाच्या जोरावर महेंद्र सिंग धोनी ही विश्वचषक स्पर्धा खेळेल.अशीच चिन्ह आहेत.त्यामुळे कर्णधार पदासाठी धोनीचा समर्थ पर्याय आपण लवकरचं शोधायला हवा.

डेक्कन आणि बंगळूरु या संघाने या स्पर्धेत अगदी फिनीक्स भरारी घेतली.डेक्कनने सलग चार विजय मिळवत शानदार सुरवात केली.मधल्या काळात हा संघ ढेपाळला.परंतु गिलख्रिस्ट आणि रोहीत शर्माच्या झंझावाताला डेक्कनच्या युवा फलंदाजांनीही साथ दिली.या स्पर्धेचा पर्पल कॅप विजेता आर.पी.सिंग डेक्कनचाच.संपूर्ण स्पर्धेत त्यानं सातत्यपूर्ण गोलंदाजी केली.या स्पर्धेमुळे त्याचं संघातलं स्थान पक्क झालंय.शेवटच्या हाणामारीच्या षटकात त्यानं अनेकदा थंड डोक्याने गोलंदाजी केली.T-20 विश्वचषकात त्याच्या या कौशल्याचा भारतीय संघाला महत्वाचा उपयोग होऊ शकेल.

आयपीएल-2 मधली सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ते अनिल कुंबळेचं मॅजिक..आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेत अगदी दृष्ट लावणारा खेळ केला.मागच्या वर्षीच्या राजस्थान प्रमाणेच बंगळूरुच्या विजयात कोणत्याही एका खेळाडूचा महत्वाचा वाटा नव्हता.राहुल द्रविड- जॅक कॅलीस या बुजूर्ग खेळाडूंपासून ते विराट कोहली-मनीष पांडे या युवा खेळाडूंना जम्बोनं एका संघात बनवलं.प्रत्येक खेळाडूला विश्वास दिला,सुरक्षिततता दिली.हे सर्व होत असताना कुंबळेनं युद्धभूमीवर आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व केलं.अंतिम सामन्यातली त्याची गोलंदाजी कोण विसरु शकेल.

क्रिकेटमध्ये धंदेवाईक वृत्ती वाढत चाललीय.लॅपटॉप प्रशिक्षणाचं युग आलंय. खेळाडू हे यंत्रमानव बनलेत अशी ओरड नेहमी केली जाते.परंतु कितीही यांत्रिक प्रयत्न केले तरी गुणवत्ता आणि क्रिकेटवरची निष्ठा महत्वाची असते.क्रिकेट या खेळाचे चाहते लाखोंमध्ये आहेत.परंतु हा खेळ खेळणारे देश अगदी मौजकेच आहेत.या मोजक्या देशातल्या अगदी असमान्य खेळाडूंमध्ये अनिल कुंबळेचं नाव घ्यावं लागेल.आयपीएल जिंकण्यास तो अपयशी ठरलाय.परंतु करोडो क्रिकेट रसीकांच्या -हदयामधले स्थान त्यानं अढळ ठेवलंय.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...