Wednesday, April 21, 2010

आयपीएलचे काय करायचे ?





इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल आणि वाद हे समीकरण अगदी घट्ट आहे. आयपीएलच्या जन्मापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही स्पर्धा वादग्रस्त बनलीय. कधी खेळाडूंचा लिलाव, चिअरलिडर्सचा नाच, नॉन स्टॉप खेळाचा ओव्हरडोस, संघ मालकांचा हस्तक्षेप अशा वेगवेगळ्या कारणामुळे ही स्पर्धा वादग्रस्त बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या एकूण कारभार ( गैर) वेगवेगळ्या बातम्या समोर येतायत. हे प्रकरण प्रचंड व्यापक, गुंतागुतीचे आणि गंभीर आहे. मॅच फिक्सिंग नंतर भारतीय क्रिकेट समोरची सर्वात मोठी समस्या आयपीएलने उभी केलीय. त्यामुळेच सध्या सडकेपासून संसदेपर्यंत एकच प्रश्न चर्चेला जातोय तो म्हणजे आयपीएलचे काय करायचे ?




भारतीय क्रिकेटच्या सुरवातीच्या दिवसांबद्दल वाचलेला एक जुना किस्सा मला इथे लिहावासा वाटतो. 1950 च्या दशकात टेस्ट खेळणा-या भारतीय खेळाडूला दरडोई 250 रुपये वेतन दिले जायचे. या काळात न्यूझीलंड विरुद्धची मॅच भारताने 4 दिवसात जिंकली. या विजेत्या टीम इंडियाला दरडोई 200 रुपये वेतन दिले गेले. या कमी पगाराबद्दल खेळाडूंनी बोर्डाच्या अधिका-यांकडे तक्रार केली. त्यावेळी, '' चार दिवसात तुम्हाला मॅच जिंकण्यास कोणी सांगितले होते ? पाचव्या दिवसाचा खेळ झाला नाही म्हणून तुमचे दरडोई 50 रुपये कापून घेण्यात येतायत.


आज क्रिकेट खेळणा-या आणि पाहणा-या कोणत्याही भारतीयाला विश्वास बसणार नाही. पण हा किस्सा अगदी खरा आहे. पाच दशकानंतर आयपीएलने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. देश सोडा पण आपल्या राज्याच्या टीमकडूनही न खेळणा-या खेळाडू आता लाखोपती-करोडपती बनतायत. वर्षातून सात आठवडेच चालणा-या या क्रिकेटच्या बाजारात त्यांची मोठी कमाई होतीय. एकाच सिझनमध्ये होणारी त्यांची कमाई जुन्या काळात टेस्ट खेळणा-या खेळाडूंच्या आयुष्यभरातल्या कमाईपेक्षा जास्त आहे.



जागतिक मंदीचा अनिष्ट प्रभाव अजून ओसरलेला नाही. आयपीएलच्या विश्वाला मंदीची अजिबात झळ बसलेली नाही. पुणे आणि कोची ह्या दोन टीम 3200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीला विकल्या गेल्या. पुणे आणि कोची या दोन संघांनी मिळून जो पैसा ओतलाय, तो आयपीएलमधल्या सध्याच्या सर्वाधिक महागडय़ा म्हणजे मुंबई इंडियन्स टीमसाठी 2008 मध्ये मुकेश अंबानींनी गुंतवलेल्या रकमेच्या सातपट जास्त आहे..! जागतिक क्रिकेटमध्ये क्रांतीकारी बदल घडवणा-या क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्याचे काम ललित मोदींनी केले आहे. मोदींना त्याचे श्रेय द्यायलाच हवे.



क्रिकेटमध्ये पैसा येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. क्रिकेट खेळाडूंनी पैसा कमावण्यावरही कुणाचा आक्षेप असता कामा नये. कॉर्पोरेट कंपन्यांनी क्रिकेटमध्ये पैसा गुंतवणे आणि त्यातून नफ्याची अपेक्षा करणे निदान मला तरी वावगे वाटत नाही. आयपीएलमध्ये पैसा आहे... येतोय यात काही आक्षेप नाही खरा प्रश्न आहे हा पैसा कोणत्या मार्गाने येतो ? आयपीएलच्या टीममध्ये कोणाकोणाचे समभाग आहेत ? श्रीनीवासन सारख्या बोर्डाच्या खजिनदाराने आयपीएल टीम विकत घेणे हे कितपत नियमाला धरुन आहे ?



माजी परराष्ट्र राज्य मंत्री शशी थरुर यांनीही आयपीएलच्या वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटच्या कारभारात ढवळाढवळ करणारे थरुर काही पहिले राजकारणी नाहीत. शरद पवार, अरुण जेटली, फारुख अब्दुल्ला आणि प्रफुल्ल पटेल हे राजकारणीही आयपीएलशी या ना त्या कारणामुळे संबधित आहेत.केवळ क्रिकेटच नाही तर प्रत्येक क्रीडा संघटनेचा या राजकारण्यांनी खेळ खंडोबा केलाय. राजकारण्यांच्या या कारभारची कोण आणि कधी चौकशी करणार ?



आयपीएल स्पर्धेवर बंदी घालावी अशी मागणी आता अनेक जण करु लागलेत मला हे मान्य नाही


1 ) आयपीएल सारख्या स्पर्धा हे 21 व्या शतकातले क्रिकेट आहे. त्यामुळे भारतात नाही तर अन्य कोणत्या तरी देशात ह्या स्पर्धा नक्की होणार. त्या देशातल्या स्पर्धेत हे खेळाडु खेळतील..मग ह्या स्पर्धा भारतामध्ये घेण्यात काय वावगे आहे ?



2 ) आयपीएल स्पर्धेमुळे एक मोठी क्रिकेट इकॉनॉमी तयार झालीय. या इकॉनॉमीतून मोठा महसूल मिळू शकेल..त्यामुळे आयपीएल स्पर्धा होणे आवश्यक आहे.



3 ) आयपीएल स्पर्धेमुळे काही तरुण खेळाडू पुढे आले आहेत.. तरुण खेळाडुंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यात ही स्पर्धा महत्वाची ठरते. तसेच सिनियर्स खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ मिळतो. सचिनच्या मार्गदर्शनामुळे सौरभ तिवारी आणि रायडूचा खेळ बहरला. कुंबळेच्या कानमंत्रामुळे विनय कुमारच्या आक्रमणाला चांगली धार आली.



4 ) टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय खेळाडूंचे असते. मात्र ते सर्वांचे पूर्ण होऊ शकते असे नाही. त्यामुळे अशा युवा खेळाडूंना पैसा, प्रसिद्धि आणि ग्लॅमर मिळवण्यासाठी आयपीएलचा उपयोग होऊ शकतो.



5 ) आयपीएल स्पर्धेला क्रिकेट रसिकांचा मोठा पाठिंबा मिळालाय. तिन्ही सिझनमधलील मॅचेसना होणारी गर्दी हे याचेच उदाहरण आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचे भक्कम पाठबळ लाभलेली ही स्पर्धा बंद करण्याचा अधिकार बीसीसीआय किंवा केंद्र सरकारला नाही.


आयपीएलच्या चेअरमनपदावरुन ललित मोदींना निलंबित करण्यात आलंय. आयपीएलचा कारभार सुधारण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे. अजुनही काही महत्वाचे बदल आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये व्हायला हवेत...


भारतीय क्रिकेटचा सुधारणा कार्यक्रम -


1 ) आयपीएल बाबतच्या सर्व गैरकारभारची चौकशी लवकरात लवकर व्हायला हवी.यातील दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा करण्यात यावी


2 ) आयपीएल चेअरमनला निरंकुश अधिकार देण्यात येऊ नयेत. नवा ललित मोदी तयार होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी


3 ) आयपीएलमध्ये काळा पैसा गुंतला आहे का ? कंपनी व्यवहार नियमांचे किती उल्लंघन आयपीएल मालकांनी केले हेही तपासायला हवे


4 ) आयपीएलच्या लिलावात लागणारी बोली, टीम मालकांनी यात गुंतवलेला पैसा, टीमच्या मालकांचे नाव त्यांचा उद्योग, समभागधारक व्यक्ती, आयपीएल फ्रेंचायझींना होणारा फायदा-तोटा ही सर्व माहिती वेळोवेळी जाहीर करण्याचे बंधन घालण्यात यावे.तसेच माहिती अधिकाराखाली ही माहिती वेळोवेळी तपासण्यात यावी


5 ) आयपीएल मॅचदरम्यान मॅच फिक्सिंग करण्यात आले अशीही चर्चा आहे. आयसीसी आणि भारतीय पोलीसांनी याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.


6 ) आयपीएल मॅचेसवर करमाफीचा वर्षावर करु नये. या स्पर्धांमधून मोठ्या प्रमाणात महसूल राज्य सरकारला मिळू शकतो.


7 ) यावर्षीच्या आयपीएलमध्ये 60 सामने खेळवण्यात आले. पुढील वर्षी त्याची संख्या 95 होणार आहे. हे अतिक्रिकेट खेळाच्या मुळाशी येतं. ऐन उन्हाळयात इतकी दिर्घकाळ स्पर्धा चालवण्यात येऊ नये.खेळाडूंच्या फिटनेसवर याचा गंभीर परिणाम झालाय.


8 ) आयपीएल सामन्यांची संख्या निम्याने कमी करावी. तीन आठवड्यांपेक्षा याचा जास्त कालावधी असू नये.


9 ) सर्वात महत्वाचे म्हणजे क्रिकेट रसिकांनी आयपीएलला किती महत्व द्यायचे याचा विचार करायला हवा. व्यवसायिक फायदा मिळवण्यासाठी निर्माण करण्यात आलेला हा क्रिडाप्रकार आहे. आंतराष्ट्रीय खेळापेक्षा याला जास्त महत्व देण्यात येऊ नये.


महागाई, नक्षलवाद, दुष्काळ, राष्ट्रीय सुरक्षा यासारखे अनेक महत्वाचे प्रश्न सध्या देशाला भेडसावतायत. प्रश्नांच्या या जंजाळात आयपीएल सारख्या विषयाला एवढे अवास्तव महत्व देणे किती योग्य आहे ? याचा विचार सर्वांनीच डोकं शांत ठेवून करायला हवा. असा विचार खरंच झाला तर आयपीएलचे काय करायचे ? या प्रश्वाचे उत्तर मिळू शकेल.

6 comments:

Niranjan Welankar said...

नमस्कार. सर्वप्रथम इतक्या दिवसांनी ब्लॉग लिहिल्याबद्दल अभिनंदन. वाचून बरं वाटलं. पण लेख नेहमीच्या गुणवत्तेसारखा, अत्यंत वाचनीय वाटला नाही. विषय, त्यातील मते आणि सूचना बर्‍याच उथळ वाटल्या. आयपीएलकडे बर्‍याच सकारात्मक प्रकारे पाहिलं गेलं, असं वाटलं. त्यात पैसा खोर्‍याने आहे; पण तो कशा प्रकारे वितरित होतो; ह्याचाही विचार करायला हवा ना. लेखक शेवटच्या परिच्छेदात स्वत: विसंगत ठरतो; आयपीएलपेक्षा असंख्य महत्त्वपूर्ण आणि "खरे" मुद्दे असताना ह्या विषयाला ब्लॉग लिहिण्याएवढं महत्त्व तरी का ? असो. ब्लॉग लिहिला; ह्याचा आनंद ह्यापेक्षा जास्त आहे.

Onkar Danke said...

@ निरंजन,
आयपीएल ही क्रिकेटमधील सकारात्मक गोष्ट आहे. असं माझं ठाम मत आहे.यातील काही गंभीर चूका दूर करायला हव्यात.आयपीएलमधला पैसा त्याचे वितरण यावर अनेकांनी लिहलंय. 24X7 त्यावर कार्यक्रमही दाखवले गेलेत. पुन्हा मी काय लिहू ? सूचाना उथळ वाटणे हा तुझा अधिकार आहे.मी त्याचा आदर करतो.धन्यवाद मनमोकळ्या प्रतिक्रीयेबद्दल. पण ह्या साध्या आणि सरळ सूचना आहेत.किमान एवढे केले तरी आयपीएल स्पर्धा सुधारु शकते.
आयपीएलपेक्षा महत्वाचे मुद्दे आहेत. पण देशाच्या क्रिडा,राजकारण आणि अर्थव्यवस्था यावर परिणाम करणारी आयपीएलही मोठी स्पर्धा आहे. क्रिडा क्षेत्र कव्हर करण्या-या माझ्या सारख्या पत्रकारासाठी ती महत्वपूर्ण आहे. म्हणून हा ब्लॉग.
याचे अवास्तव स्तोम माजवू नये असं माझ्यातल्या भारतीयला वाटते. म्हणून शेवटचा परिच्छेद लिहला आहे.

Niranjan Welankar said...

त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद. खरं आहे. Many critical issues are involved in it.

sharayu said...

ही राजकारण्यांची मारामारी आहे. त्यात शशांक मनोहरसारखी जळकी लाकडे संधी साधून घेत आहेत इतकेच.

आनंद पत्रे said...

मला मुद्दे बर्‍याच प्रमाणात पटले...

Amit Joshi says said...

इग्लिश प्रिमियर लिग किंवा युरोपियन फुटबॉलसारखं जागतिक महत्व आपल्याला यावं यासाठी आयपीएल प्रयत्न करत आहे. यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. फुटबॉल हा जागतिक खेळ आहे तर क्रिकेट फक्त जेमतेम 15 देशांपर्यंत पोहचला आहे. आणि फुटबॉल क्लबच्या खेळांमध्ये एकही मोठा वाद-घोटाळा समोर आला नाहीये हे लक्षात ठेवलं पाहिजे.

तेव्हा नाकापेक्षा मोती जड होणार नाही याची काळजी आयपीएलने घ्यावी. उलाढाल जरुर झाली पाहिजे पण ती पूर्णपणे पारदर्शक व्हावी. आयपीएल बंद करुन नये कारण ते सर्वजण एन्जॉय करत आहेत.

देशात समस्या अनेक आहेत मग आयपीएल कशाला चित्रपट,मनोरंजनाची सर्व साधने बंद करावीत. असे फालतू प्रश्न उपस्थित करु नये......

ब-याच दिवसांनतर ब्लॉग बघायला मिळाला......डोंबिवलीकर अभिनंदन

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...