Showing posts with label T-20 Cricket. Show all posts
Showing posts with label T-20 Cricket. Show all posts

Sunday, August 16, 2020

''मैं हर इक पल का शायर हूँ''

 DHONI finishes off in style...

A magnificent strike in to the crowd...

India lift the world cup after 28 years... 

महेंद्र सिंह धोनीची  यापुढे जेंव्हा आठवण काढली जाईल त्या प्रत्येक वेळी रवी शास्त्री यांचे हे वाक्य सर्वांना आठवेल. क्रिकेट पाहत मोठे झालेल्या माझ्या पिढीसाठी आजवरची सर्वात चांगली आठवण आहे. 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये नुवान कुलसेखराचा तो बॉल धोनीनं अगदी शांत आणि सहजपणे मिडऑनवरुन मैदानाच्या बाहेर फेकला. धोनीच्या या सिक्सरसोबत टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

 कपिल देवच्या युवा आणि उत्साही टीमनं मिळवलेलं विजेतपद आम्ही केवळ टीव्हीवर हायलाईट्समध्ये पाहिलं होतं. त्यानंतर 28 वर्ष या क्षणाची देशानं प्रतीक्षा केली. सर्व देशवासियांच्या अपेक्षा धोनीच्या टीमने पूर्ण केल्या. क्रिकेटच्या पंढरीतसुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरच्या मुंबईत धोनीनं सिक्सर खेचत सर्व भारतीयांची स्वप्नपूर्ती केली.

 महेंद्रसिंह धोनी टीम इंडियामध्ये स्थान नक्की करत असतानाच 'बंटी आणि बबलीहा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात 'छोटे छोटे शहरोंसे खाली भोर दुपहरोंसे हम तो झोला उठाके चलेबारीश कम-कम लगती हैं नदीयां मद्धम लगती है हम समंदर के अंदर चलेअसं गाणं आहे. देशात जागतिकीकरण स्थिरावत असलेला तो काळ होता. छोट्या शहरातल्या तरुणांची मोठी पिढी महानगराकडे धाव घेत होती. छोट्या गावात त्यांनी पाहिलेली स्वप्न महानगरात म्हणजेच स्पर्धेच्या महासागरात ही पिढी पूर्ण करत होती.

सिस्टिमच्या बाहेरच्या या मंडळींनी देशात घुसळण सुरु केली होती. याच काळात रांचीमधला म्हणजेच भारतीय क्रिकेटमधल्या प्रस्थापित शहरी बेटांच्या बाहेरचा महेंद्रसिंह धोनी हा तरुण टीममध्ये दाखल झाला. 2002 मधला रेल्वेतला सामान्य टिकीट चेकर ते  स्वत:चं जेट विमान सहज घेऊ शकेल असा देशातला श्रीमंत खेळाडू हा  धोनीचा प्रवास आहे. या काळात फक्त धोनीचा बँक बॅलेन्स वाढला नाही. तर क्रिकेटविश्वातली सारी मानाची  विजेतेपद टीम इंडियाच्या कपाटात आली आहेत.

महेंद्र सिंह धोनी येण्यापूर्वी भारतीय टीममध्ये काही ठरावीक महानगरांमधील खेळाडूच प्रामुख्याने होते. धोनीनं छोट्या शहरातील खेळाडूंसाठी टीमचा दरवाजा सताड उघडला. भारतीय टीमवरील  काही ठरावीक शहरांची मक्तेदारी संपली. छोट्या शहरातील खेळाडूंना टीममध्ये स्थिरवण्यासाठी आणि सर्वोच्च पातळीवर सर्वोत्तम खेळ करण्यासाठी आवश्यक वेळ, पाठिंबा आणि मार्गदर्शन धोनीकडून मिळाले.

 प्रत्येक कॅप्टनचं एक वैशिष्ट्य असतं. कपिल देव स्वत: अग्रभागी राहून टीमला चांगलं खेळण्यासाठी प्रोहत्साहित करत असे. सौरव गांगुलीनं टीममधल्या प्रत्येकाचा खेळ उंचवण्यावर भर दिला. लढाऊ वृत्तीला मैदानातल्या कुशल डावपेचाची जोड राहुल द्रविडनं दिली. महेंद्र सिंह धोनीचं वैशिष्ट्य काय किंवा धोनीनं टीम इंडियाला काय दिलं या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्याचं असेल तर धोनीनं टीम इंडियाला जगातली यशस्वी टीम बनण्याची 'प्रोसेसदिली.

होय प्रोसेस. धोनीच्या बोलण्यात नेहमी येणारा शब्द. धोनीच्याच वेगवेगळ्या वाक्यांचा आधार घेत सांगायचं झालं तर प्रोसेस म्हणजे,  "एखाद्या कामासाठी शारीरिक आणि मानसिक रित्या पूर्णपणे तयार असणं, भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा विचार न करता ते लक्ष्य गाठण्यासाठी स्वत:ला मैदानावर झोकून देणं. निकाल काय लागेल तो फारसा महत्वाचा नाही. पण त्यासाठी तुम्ही 90 किंवा 95 टक्के नाही तर 100 टक्के मेहनत घेतली आहे का हे महत्वाचं आहे. टीमचं हे 100 टक्के कमिटमेंट म्हणजेच प्रोसेस "

 याच प्रोसेसपूर्तीचा ध्यास घेऊन धोनी खेळला. त्यामुळेच तो केवळ टीम इंडियाचा नाही तर जगातला एक यशस्वी कॅप्टन बनला. मैदानावर असताना संपूर्णपणे फोकस होऊन खेळणं आणि  खेळताना घडलेल्या घटनामिळालेलं यशापयश हे मैदानाच्या बाहेर पडल्यावर मैदानावरच सोडणं हे धोनीचं वैशिष्ट्य होते. ही 'स्विच ऑन- स्विच ऑफवृत्ती धोनीकडं आहे. त्यामुळेच तो भारतीय क्रिकेट फॅन्सचा अमर्यादीत दबाव सहजपणे सहन करु शकला.

 धोनीने टीममध्ये येण्यापूर्वी क्रिकेटचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले नव्हते.

प्रथमश्रेणी सामन्यातही  कधी कॅप्टन नसलेला हा पठ्या थेट राष्ट्रीय टीमचा कॅप्टन झाला. कॅप्टन झाल्यानंतर  क्रिकेटचं शास्त्रीय प्रशिक्षण न घेणं त्याच्या फायद्याचं ठरलं. मैदानावरच्या समस्यांची पुस्तकी उत्तरं त्यानं शोधली नाहीत. तर आपल्या ओरिजनल मेथडनं त्यानं प्रतिस्पर्धी टीमला गोंधळात टाकलं. सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला. टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.

धोनी हा कॅप्टन म्हणून अनेकदा प्रतिस्पर्धी प्लेयर्सच्या एक पाऊल पुढे असे. तो अगदी ओरिजनल सुचण्याच्या बाबतीत 'भारतीय क्रिकेटचा स्टीव्ह जॉब्ज ' होता. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बॉल आऊटमध्ये भारताने मिळवलेला विजय हा धोनीच्या याच 'एक पाऊल पुढे' विचाराचा परिणाम होता. त्याने नेहमीच्या फास्ट बॉलर्सच्या नाही तर संथ बॉल टाकून स्टंप उडवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंच्या हाती बॉल दिला होता. 


बॉल आऊटमध्ये बॉलरचे टार्गेट स्टंप होते. धोनी बरोबर स्टंपच्या मागे अशा पद्धतीने बसला की बॉलरला बॉल टाकताना टार्गेट स्पष्ट दिसत होते. बॉलर हातातून बॉल सोडेपर्यंत तो त्या जागेवरुन अजिबात हलला नाही. त्याचा योग्य परिणाम झाला. सेहवाग, हरभजन आणि उथप्पा या भारताच्या तीन्ही बॉलर्सनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले. त्याच्या अगदी उलट पाकिस्तानच्या बॉलर्सची निवड आणि विकेट किपरची स्टंपमागची पोझिशन हे सर्व काही चुकले होते. त्यामुळे त्यांच्या एकाही बॉलरला बॉल आऊटमध्ये यश मिळाले नाही.

बांगलादेश विरुद्ध २०१६ च्या टी -२० वर्ल्ड कपमध्येही धोनीच्या इतरांच्या पुढे विचार करण्याच्या वृत्तीने टीम इंडियाला तारले. हार्दिक पंड्याचा बॉल स्ट्राईकवरील बॅट्समनपर्यंत पोहचेपर्यंत त्याच्या सहकाऱ्याने अर्धे क्रिज पार केले होते. धोनीनं तो बॉल शांतपणे पकडला. थ्रो करताना हातातून निसटू नये म्हणून ग्लोज काढण्याचीही खबरदारी घेतली आणि चपळाईने समोरच्या खेळाडूला रन आऊट करत बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला.  

टी-20 वर्ल्ड कपचॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांची विजेतेपद जिंकणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. या तिन्ही विजेतेपदामध्ये धोनीची विचार करण्याची ओरिजनल मेथड उपयोगी पडली. यामुळेच त्यानं टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटची ओव्हर हरभजनला नाही तर जोगिंदर शर्माला दिली. वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली आऊट झाल्यानंतर फॉर्मात असलेल्या युवराजच्या ऐवजी स्वत: मैदानावर उतरला. चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंडला विजय डोळ्यासमोर असताना त्यानं इशांत शर्माच्या हातात बॉल दिला.

सहकाऱ्यांबद्दलचा विश्वासत्यांचा खेळ उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत हाच धोनीच्या यशाचा 'एक्स फॅक्टरआहे. एकदा मिळालेलं यश हे  योगायोग असू शकतं. पण त्या यशाची पुनरावृत्ती होत असेल तर त्या यशामध्ये 'एक्स फॅक्टरनिर्णायक असतो.  सभोवतल्या व्यक्तींना नियंत्रित करतोय याची कल्पनाही न देता प्रभावित करणं हा महान नेत्यांचा 'एक्स फॅक्टरअसतो. अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुयायी सहजपणे विकसित होत असतात.

धोनी कॅप्टन असताना मैदानात आणि ड्रेसिंग रुममधली शांतता, सर्वोच्च यश आणि पराकोटीचं अपयश आल्यानंतरही त्याला सारख्याच स्थितप्रज्ञतेनं सामोरं जाण्याची धोनीची वृत्ती याचा सहकाऱ्यांवर मोठा प्रभाव पडला हे नक्की. त्यामुळेच धोनीच्या टीममधले खेळाडू मैदानातल्या कठीण प्रसंगाला न डगमगता सामोरं गेले. या टीमनं खेळाचा आनंद लुटला.

संपूर्णपणे फोकस करुन खेळतानाही हा फक्त खेळ आहे. हा खेळ म्हणजे आयुष्य नाही हा धोनीमंत्र टीममध्ये कुठेतरी रुजला असावा. त्यामुळेच टी वर्ल्ड कपचॅम्पियन्स ट्रॉफीवर्ल्ड कपआशिया कपऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेचं विजेतेपदआयसीसी टेस्ट रँकींगमध्ये पहिला नंबरवन-डे रँकींगमध्ये पहिला नंबरटी-20 रँकींगमध्ये पहिला नंबरहे सारं धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला मिळवता आलं.

आज टीम इंडियाच्या फिटनेसचा स्तर उंचावलाय. हा कॅप्टन धोनीच्या प्रभावाचा मोठा भाग आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सीबी सीरिजपूर्वी 'संथ हलचाली करणारे खेळाडू टीममध्ये नको' असं त्यानं निवड समितीला सांगितलं होतं. एका ओव्हरमध्ये बॉलर्सना किंवा सिक्सर लगावल्यानंतर बॉलर्सवर भडकलेला धोनी कुणी पाहिला नाही. सलग चार वाईड बॉल टाकले तरी चेहऱ्यावरची रेषाही हलू न देणारा विकेटकिपर-कॅप्टन धोनी सर्वांनी पाहिलाय. पण ढिसाळ फिल्डिंगला धोनीकडं कधीही माफी नव्हती. अशावेळी धोनीनं केलेली कानउघडणी स्टम्पमधल्या मायक्रोफोनमधून साऱ्या जगानं ऐकलीय.

फिल्डिंग आणि 'रनिंग बिटविन द विकेटहा क्रिकेटमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे. यामध्ये प्रत्येकानं आपलं सर्वस्व ओतलं पाहिजे हे सर्वांमध्ये बिंबणारा कॅप्टन म्हणून इतिहास धोनीला लक्षात ठेवणार आहे. धोनीचा हा वारसा विराट कोहलीने नव्या उंचीवर नेलाय. 

 'कोणताही खेळाडू हा त्याच्या नावावर नाही तर खेळाच्या जोरावर टीममध्ये असायला हवा. तो टीमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरतो की नाही हे कॅप्टनला ठरवू द्या' असा नियम धोनीनं तयार केला.याच नियमाच्या आधारावर त्यानं गांगुलीलक्ष्मण आणि द्रविड या तिघांना टीममधून वगळलं. धोनीची टेस्टमधील निवृत्ती आणि वन-डे, टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णयही त्याने असाच अगदी सहज घेतला. १०० टेस्ट खेळण्याचा किंवा २०० वन-डे मध्ये कॅप्टनसी करण्याचा विचार त्याने केला नाही. कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर, बीसीसाआयला फक्त काही ओळींचे औपचारिक पत्र पाठवून धोनीनं त्याची निवृत्ती जाहीर केली होती. 

धोनीनं वन-डे टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर मागच्या तीन वर्षात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल वारंवार चर्चा झाली. त्याचा खेळ संथ झाला होता. त्याला मैदानात आल्यावर स्थिर होण्यास बराच वेळ लागत असे. न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही तो अगदीच संथ खेळला. त्याच्या संथ खेळामुळे झटपट रन्स बनवण्याच्या नादात हार्दिक पंड्या आऊट झाला. रवींद्र जडेजा संपूर्ण भरात होता. त्यावेळी धोनीनं फक्त प्रत्येक बॉलला एक रन काढून त्याला साथ देणे आवश्यक होते, पण तो दिवस धोनीचा नव्हता. वर्ल्ड कप फायनलमध्ये बटलर-स्टोक्स जोडीनं जवळपास याच परिस्थितीतून मॅच बरोबरीत आणली होती. पंड्या आणि जडेजाच्या मदतीनं नेहमीच्या धोनीला मॅच जिंकणे सहज शक्य होते, पण त्या दिवशी नेहमीचा धोनी दिसलाच नाही.

धोनी आणि क्रिजमध्ये अखेर अगदी काही इंचाचे अंतर राहिले. मार्टिल गप्टीलच्या थेट थ्रो ने धोनी रन-आऊट झाला. त्यावेळी मॅचचे लाईव्ह समालोचन करणाऱ्या सौरव गांगुलीसह जगभरात मॅच पाहणाऱ्या तमाम भारतीयांचा आवाज नंतरचा काही काळ बंद झाला होता. धोनीनं रिटायरमेंटचा जो 4.2 मिनिटांचा अधिकृत व्हिडिओ प्रसिद्ध केलाय त्यात जवळपास 20  सेकंद त्याचे हे शेवटचे रन आऊट दाखवलंय. मैदानावरचे यश आणि अपयश शांतपणे स्विकारणाऱ्या आणि ते मैदानावर सोडून पुढच्या क्षणी सामान्य आयुष्य जगणे ही ज्या धोनीची सवय आहे, त्या धोनीलाही 'ती आठवण' किती छळतीय  हे आपल्याला समजण्यासाठी धोनीनं त्या रन आऊटच्या प्रसंगाला दिलेला इतका वेळ पुरेसा आहे.

धोनी वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर एकही सेमी फायनल खेळला नाही. 'तो रिटायर कधी होणार?' 'तो रिटायर का होत नाही?' 'तो जागा अडवून का बसलाय?' ' त्याने इतरांना जो नियम लावला त्याची स्वत: का अंंमलबजावणी करत नाही?' यासारखे अनेक प्रश्न अनेकांनी विचारले. धोनी त्याच्या स्वभवाप्रमाणे शांत होता. त्याच्यात आणि निवड समितीत काय चर्चा झाली का? याचे अंदाज अनेकांनी बांधले. ठराविक दिवसांनी त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु होत असे. अखेर तो त्याने ठरवले त्याच दिवशी, त्याच्या नेहमीच्या शांत पद्धतीने निवृत्त झाला. 

त्याचे लग्न, टेस्टमधील निवृत्ती, वन-डे आणि टी-२० कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय याच प्रमाणे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती यापैकी कोणतीही बातमी जगात कुणालाही 'ब्रेक' करता आली नाही. आता त्याच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा सर्वांनी त्याच्या 'टायमिंगवर' 'वेळकाढू' चर्चा सुरु केलीय. 'हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीप्रमाणे अनेकजण त्यावर काथ्याकूट करतायत. धोनीचा स्वभाव पाहता या सर्वांना त्याच्याकडून उत्तर मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काळातही अनेक जण 'आपल्यातल्या शेरलॉकला अनलॉक करत' नवे-नवे सिद्धांत मांडत स्वत:ची पाठ थोपटून घेतील हे नक्की.

सौरव गांगुलीनं नव्या भारतीय टीमची उभारणी केली. टीम इंडियाला आक्रमक बनवलं. धोनीनं या आक्रमकतेला शांततेची जोड दिली. 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2008 साली सीबी सीरिज जिंकल्यानंतर अगदी सामान्य विजयासारखे राहा, अवास्तव सेलिब्रेशन करु नका' अशी स्पष्ट सूचना धोनीनं टीममधल्या सर्व सहकाऱ्यांना दिली होती. 'ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे ही जगासाठी मोठी गोष्ट असेल. आमच्यासाठी ही एक सामान्य बाब आहे'. हा संदेश ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्वाला टीम इंडियानं दिला होता. 

यश आणि अपयश हे खेळाचा आणि आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. यशानंतर अपयश आणि अपयशानंतर पुन्हा यश ही सर्व प्रोसेस सतत सुरु राहणार आहे. आपण या प्रोसेसचा अभ्यास करायचा. आपले स्कील अधिक घोटीव करायचे आणि त्यानंतर जे काही होईल त्याला शांतपणे समोर जायचे. या विस्तीर्ण ब्रह्मांडातला आपण एक बिंदू आहोत, आपल्यापूर्वी इथे अनेक सरस होऊन गेले आणि पुढेही अनेक अव्वल होतील. आपण फक्त काल आणि उद्या या साखळीला जोडणारा आज आहोत. हा आज आपल्याला अधिक समृद्ध करायचा आहे. धोनीचं करियर हीच शिकवण देते.

महेंद्र सिंग धोनीनं निवृत्तीसाठी देखील याच प्रकारचे गाणे निवडले आहे. करियरमधील सर्वोच्च क्षण आणि अगदी तळाचे क्षण याला या व्हिडिओमध्ये समान महत्व देण्यात आलंय. धोनीचा तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आले. त्यानंतर पुन्हा प्रत्येकदा व्हिडिओ पाहतानाही डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. त्यामधील प्रत्येक प्रसंग हा माझ्यासह अनेकांच्या तारुण्याची गोष्ट आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हे पाहताना त्या सर्व आठवणीने डोळ्यात पाणी येणार आहे.

धोनीला निवृत्तीच्या प्रसंगी जगाला काय सांगायचे आहे ते त्याने साहिर लुधियानवी यांच्या शब्दात सांगितले. माझ्यासाठी धोनी काय आहे हे सांगण्यासाठी देखील मला साहिरचेच शब्द आठवतात....

रिश्तों का रूप बदलता है, बुनियादे खतम नही होती

ख्वाबो और उमंगों की मियादें खतम नही होती

- ''मैं हर इक पल का शायर हूँ''

 


Wednesday, November 1, 2017

नेहराजी का जवाब नही !

मी क्रिकेट पाहयला सुरुवात केली त्यावेळी वासिम अक्रमचा दबदबा होता. त्याच्या अचुकतेचा हेवा वाटायचा. अगदी गल्ली क्रिकेटमध्येही एखाद्या फास्ट बॉलरनं चांगला बॉल टाकला की त्याला '' क्या बात है अक्रम ''  अशी सहज दाद आमच्याकडून दिली जायची. अक्रमसारखा डावखुरा फास्ट बॉलर आपल्याकडं का नाही ? असं सारखं वाटयचं. त्यानंतर काही वर्षांनी श्रीलंकेच्या टीममध्ये चामिंडा वास आला. मुरलीधरनच्या जोडीनं वासनं श्रीलंकन बॉलिंगचा भार अनेक वर्ष वाहिला. वासच्या अचुकतेसोबतच त्याचं डावखुरेपण हे आणखी मोहित करत असे. चामिंडा वास, नुवान झोयासा, संजीवा डिसल्वा, रुचीरा परेरा अशा चार डावखुऱ्या बॉलरनं 90 च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं. पण आपल्याकडं एकही डावखुरा फास्ट बॉलर नव्हता नव्हता. ही शोधयात्रा आशिष नेहरानं संपवली. आशिष नेहरा हा माझ्या पिढीनं पाहिलेला पहिला भारतीय डावखुरा फास्ट बॉलर. करसन घावरी हा  यापूर्वीचा  डावखुरा फास्ट बॉलर 1981 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यामुळे 1999 साली श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये पहिला बॉल टाकण्यापूर्वीच नेहरा माझ्यासाठी स्पेशल बनला होता.


    फेब्रुवारी 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 28 ओव्हर्स टाकून नेहराला अवघी एक विकेट मिळाली. त्यानंतर तो थेट दोन वर्षांनी बुलावायोमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध दुसरी टेस्ट खेळला. या मॅचमध्ये त्यानं स्विंगवर जबरदस्त हुकमत गाजवली. झिम्ब्बावेसाठी तो अनप्लेयबल बॉलर होता. बॉलिंग अॅक्शन आणि बॉल स्विंग करण्याची क्षमता यामुळे नेहराची अनेकदा वासिम अक्रमशी तुलना केली गेली. आपल्या 18 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये नेहरानं त्याच्यातल्या क्षमतेला क्वचितच न्याय दिलाय.


    एकापेक्षा एक रथी-महाराथी बॅट्समन्सच्या प्रभावात वावरणाऱ्या भारतीय फॅन्सकडून  एखाद्या पराभवाचं खापर हमखास आशिष नेहराच्या डोक्यावर फोडलं जायचं. 2016 पर्यंत नोकियाचा बेसिक फोन वापरणारा  नेहरा हा ट्विटर आणि फेसबुक ट्रोल्सचं हमखास टार्गेट होता. त्याची टर उडवणाऱे पोस्ट्स, कार्टून्स यांनी या सोशल मीडियावरच्या पेजच्या लाईकर्समध्ये मोठी भर पडलीय. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर नेहराला मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आलं होतं. अशा प्रकारच्या ट्रोल्सच्या टोळधाडीपासून बचाव करण्यासाठी 'सेन्स ऑफ ह्युमर' आणि  'निश्चयी वृत्ती' या दोन गोष्टींची आवश्यकता असते. नेहरामध्ये या दोन्ही गोष्ठी ठासून भरल्या होत्या. त्यामुळेच क्रिकेट करियरच्या शेवटच्या टप्प्यात किरोकळ अंगकाठी आणि दुखापतींनी जर्जर असलेला आशिष नेहरा सर्वांचा 'नेहराजी' बनला.

   
     नेहराची 18 वर्षाची कारकीर्द ही दुखापतींनी गच्च भरलेली आहे.  ' दोन दुखापतींच्यामध्ये कुठतरी माझं शरीर आहे ' असं नेहरानचं एकदा म्हंटलं होतं. अनेक फास्ट बॉलर्सच्या करियरवर दुखापतीमुळे मोठा परिणाम झाला. त्यांनी या दुखापतीला कंटाळून क्रिकेटचा डाव अर्ध्यावरच मोडला. पण 12 ऑपरेशन्स होऊनही नेहरा तब्बल 18 वर्ष खेळलाय. मोहम्मद अझहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, अजय जाडेजा,. सौरव गांगुली, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली अशा सात भारतीय कॅप्टनच्या नेतृत्वामध्ये नेहरा खेळलाय. इतक्या विविध कॅप्टनच्या नेतृत्वात खेळलेला यापूर्वीचा भारतीय खेळाडू हा फक्त सचिन तेंडुलकर आहे. ( सचिन 6 कॅप्टनच्या नेतृत्वाखाली खेळलाय. तो स्वत: ही कॅप्टन होता. तसा हिशेब केल्यास ही संख्या 7 होते) नेहरानं पदार्पण केलं तेंव्हा विराट कोहली साडेनऊ वर्षांचा होता. तर 1999 साली अवघ्या दीड वर्षाच्या असलेल्या ऋषभ पंत या पोरासोबतही नेहराजींनी एक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलाय. नेहराच्यानंतर काही महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा एमएसके प्रसाद हा सध्या निवड समितीचा अध्यक्ष आहे.

       
      2003 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धचा त्याचा स्पेल कुणीही विसरु शकणार नाही. डरबनच्या मैदानावरची ती रात्र ही फक्त आशिष नेहराची होती. ताशी 150  किमीच्या वेगानं नेहरानं केलेल्या गोळीबारानं इंग्लंडचे सहा बॅट्समन गळपटले. वन-डेमध्ये भारतीय बॉलर्सच्या टॉप टेन कामगिरीत नेहराच्या या स्पेलचा नक्कीच समावेश करावा लागेल. पाकिस्तान दौऱ्यात मोईन खानसारखा खत्रूड बॅटसमन समोर असतानाही त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये सहा रन्सचं संरक्षण करत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. अगदी 2011 वर्ल्डकपमध्ये मोहालीत झालेल्या भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये त्यानं टिच्चून बॉलिंग केली. 10 ओव्हर्समध्ये अवघे 33 रन्स देत 2  विकेट्स घेतल्या. त्याच मॅचमध्ये फिल्डिंग करताना नेहराच्या बोटाला दुखापत झाली. लय सापडलेला नेहरा वर्ल्ड कपची फायनल खेळू शकला नाही. वर्ल्ड कपच्या 'विनिंग फोटो' मध्ये तुटक्या बोटाचा नेहरा आपल्याला दिसतो. 2011 ची वर्ल्ड कप फायनल न खेळल्याचं शल्य त्याला आणि माझ्यासारख्या नेहरा फॅनला नेहमी जाणवत राहिल.

       2011 च्या वर्ल्ड कपनंतर निवड समितीनं नेहराचा वन-डेसाठी कधीही विचार केलाच नाही. दुखापत साथ सोडायला तयार नव्हती. क्रिकेटमध्ये फास्ट बॉलर्ससाठी असलेली साधारण कारकीर्द केंव्हाच संपली होती. अनेक नवे बॉलर्स उदयाला आले होते. नेहराचे समवयस्क सहकारी निवृत्त झाले. काहींवर निवृत्तीसाठी दबाव आणण्यात आला. त्यांच्यापर्यंत निरोप पोहचवले गेले. भोवताली चाललेला हा सारा संगर पाहून नेहरा थिजला नाही. तर तो उभा राहिला. धावला. त्यानं विकेट्स मिळवल्या.

      टी-20 या क्रिकेटमधल्या सर्वात नव्या आणि फास्ट फॉरमॅटमध्ये नेहराला आपल्यातलं क्रिकेट नव्यानं गवसलं. मॅचमध्ये केवळ 4 ओव्हर्स टाकणं त्याच्या शरिराला मानवणारं होतं. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेयरडेव्हिलकडून आयपीएल खेळलेला पण काहीसा दुर्लक्षित झालेल्या नेहराला चेन्नई सुपरकिंग्जनं  करारबद्ध केलं. तेंव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. पण 2015 चा आयपीएल सिझन नेहरानं गाजवला. 2015 च्या सीझनमधला तो यशस्वी बॉलर होता. पहिल्या सहा ओव्हर्समधला पॉवर प्लेचा खेळ असो किंवा शेवटच्या 4 ओव्हर्समधली हाणामारी फास्ट क्रिकेटमधल्या या दोन्ही आव्हानात्मक परिस्थितीमध्ये नेहराच्या बॉलिंगमधलं सोनं हे घासून जगासमोर आलं.

       कधीही हार न माणण्याच्या त्याच्या या वृत्तीमुळेच  5 वर्षांनी नेहरानं टी-20 मध्ये त्यानं कमबॅक केलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरद्ध बंगळुरुमध्ये झालेल्या महत्वाच्या लढतीमध्ये हार्दीक पांड्याला शेवटच्या ओव्हर्समध्ये मौल्यवान टिप्स देणारा नेहराजी साऱ्या क्रिकेट विश्वानं पाहिला. नेहराचा तो कानमंत्र उपयोगी ठरला. बांगलादेशविरुद्धचा धक्कादायक पराभव भारतानं टाळला. कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात नेहरानं भारतीय बॉलर्सनं घडवण्याचं काम केलं. केवळ हार्दिक पांड्याच नाही तर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, बुमराह ही भारतीय फास्ट बॉलर्सची सध्याची पिढी झहीर खानच्या साथीनं नेहरानं घडवलीय.

 2004 साली पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडीमध्ये झालेल्या टेस्टमध्ये नेहरानं टेस्ट करियरमधला शेवटचा बॉल टाकला. त्यावेळी त्याचं वय अवघं 25 होतं. तर 2011 साली पाकिस्तानविरुद्धच वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये चांगली कामगिरी करुनही त्याचा वन-डेसाठी पुन्हा कधीही विचार झाला नाही. पण आपली प्रत्येक मॅच ही शेवटची आहे, असा विचार करुन मैदानावर उतरलेल्या नेहरानं नेहमीच आपल्यातलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलाय.

  साधारण महिनाभरापूर्वीच नेहराजींची गौरव कपूरनं मस्त दिलखुलास मुलाखत घेतलीय. युट्यूबर ती मुलाखत आवर्जुन पहा. आशिष नेहरा हा माणूस अस्सल सोनं आहे हे तुम्हालाही पटेल.  घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय करियरचा शेवट करण्याचं भाग्य अलिकडच्या काळात फक्त सचिन तेंडुलकर याच भारतीय क्रिकेटरला मिळालंय. आता सचिन तेंडुलकरनंतर हे भाग्य आशिष नेहराला मिळणारय. भारतीय क्रिकेटचा हा आनंदयात्री निवृत्त होतोय. त्याला निरोप देताना पाणवलेल्या डोळ्यांनी त्याचे चाहते एकच वाक्य उच्चारतील 'नेहराजी का जवाब नही !'  

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...