Friday, May 22, 2020

नेपाळची नाजूक जखम


भारत सध्या चायनीज व्हायरस या जागतिक संकटाचा सामना करतोय. त्याचवेळी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतामधल्या कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या भागावर नेपाळचा हक्क सांगितला आहे. नेपाळच्या पंतप्रधानाने देशाचा नवा नकाशा जाहीर करत भारताची कुरापत काढलीय. भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील संबंध हे रामायणाइतके पवित्र आणि हिमालय पर्वतासारखे भक्कम आहेत. त्यामुळे या संबंधांना कुणी नख लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे काळजीपूर्वक पाहायला हवे.

काय आहे वाद ?

ब्रिटीश आणि नेपाळ यांच्यात 1814 ते 1816 दरम्यान झालेल्या युद्धानंतर 1816 साली सुगौलीमध्ये करार झाला. या करारानुसार महाकाली नदी ( भारतामधील नाव काली किंवा शारदा ) ही भारत आणि नेपाळमधील पश्चिम सीमा निश्चित करण्यात आली. या नदीच्या पूर्वेकडील भाग हा नेपाळचा तर पश्चिमेकडील भाग हा भारताचा असेल हे या कराराने ठरवण्यात आले. नेपाळने हा करार मान्य केला. त्यानंतर 1920 आणि 1929 अशी दोन वर्षे भारत - नेपाळ यांच्यात या सीमेवर संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी देखील नेपाळला हा करार आणि पर्यायाने भारत आणि नेपाळमधील पश्चिम हद्द मान्य होती.

नेपाळने या प्रकरणात पहिला आक्षेप 1997 साली नोंदविला. महाकाली नदीचा उगम हा कालापानीच्या उत्तरेला लिंपियाधुरामध्ये होतो त्यानंतर ही नदी नैऋत्येला वाहते असा नेपाळने दावा केला. त्यामुळे या सर्व परिसरावर नेपाळने त्यांचा हक्क सांगितला. तर महाकाली नदीचा उगम हा लिपुलेखच्या खालच्या परिसरातील काळ्या झऱ्यांमध्ये होतो, अशी भारताने भूमिका मांडली. हा परिसर उत्तराखंड राज्यात येत असल्याने आमचा भाग आहे अशी भारताची भूमिका आहे.

गुजराल नीतीचा फटका 

 इंद्रकुमार गुजराल हे भारताचे माजी पंतप्रधान. पंतप्रधान होण्यापूर्वी गुजराल हे परराराष्ट्र मंत्री होते. या काळात भारताचे शेजारच्या देशांसोबत संंबंध सुधारावे म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले. हे धोरण गुजराल नीती म्हणून प्रसिद्ध आहे. गुजराल नीतीमध्ये नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव या पाच देशांनी भारताकडे जितके मागितले त्यापेक्षा अधिक कशाचीही अपेक्षा न करता भारताने द्यावे असे तत्व होते.

इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाल्यानंतर १९९७ साली नेपाळ दौऱ्यावर गेले. या दौऱ्यापूर्वी भारत - नेपाळ सीमेचा वाद नेपाळमध्ये पेटवला जात होता. नेपाळचे तत्कालीन उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी गुजराल यांच्याबरोबरच्या चर्चेत हा वाद उपस्थित केला. गुजराल नीतीचा फायदा घेत कालापानी, लिपुलेख आणि लिंपीयाधुरा या भागावरील नेपाळचा दावा भारताने मान्य करावा अशी मागणी त्यांनी केली. नेपाळची ही खोडसाळ मागणी गुजराल यांनी त्याच चर्चेत तातडीने फेटाळणे आवश्यक होते. मात्र गुजराल यांनी तसे केले नाही. त्यांनी हा विषय वादग्रस्त असल्याचे मान्य करत संयुक्त सीमा समितीकडे सोपवला.

2019 साली काय झाले ?

गुजराल सरकार वर्षभरात गडगडले तसेच नेपाळमधील सरकारही गडगडले. या प्रकरणात 2019 पर्यंत म्हणजेच 22 वर्षे काही विशेष प्रगती नव्हती. नेपाळच्या आघाडीवर या प्रकरणात फार काही पेटावापेटवीची भाषा नव्हती. भारत सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करत जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. भारताने नोव्हेंबर 2019 मध्ये या फेररचनेसह नवा अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला. त्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश दाखवण्यात आले. जम्मू काश्मीमधील हे दोन प्रशासकीय बदल सोडले तर उर्वरित भारताचा नकाशा हा तोच होता. या नकाशात काहीही बदल नव्हता. हा नकाशा पाहताच नेपाळ सरकारला आपल्या जुन्या मागणीची अचानक आठवण झाली.

नेपाळ सरकारला ही आठवण होण्यामागे चीनी कनेक्शन आहे. नोव्हेंबर 2019 पूर्वी सामान्य नेपाळींमध्ये चीनबद्दलच्या असंतोषात वाढ झाली होती. चीनच्या PLA कडून नेपाळच्या उत्तर भागात अतिक्रमण करण्यात आले होते. चीनी सैन्याने दादागिरी करत आपल्या तुकड्या या परिसरात तैनात केल्या. सीमा भागात रस्ते बांधणीचे काम हाती घेतले. त्याचबरोबर नेपाळ सरकारच्या प्रमुख संकेतस्थळाचे हॅकिंग, अवैध मानवी व्यापार यामध्ये चीनी नागरिकांचा सहभाग असल्याची प्रकरणं या काळात उघडकीस आली. नेपाळी नागरिकांचे या आंदोलनातून लक्ष वळवण्यासाठी नेपाळच्या चीन धार्जिण्या सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये सीमावाद उकरुन काढला.

मे 2020 मध्ये काय ?

गेल्या दोन महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जग चायनीज व्हायरसनं त्रस्त आहे. चीनच्या वूहान शहरात सर्वप्रथम आढळलेल्या या व्हायरसनं जग लॉकडाऊन केलंय. या काळात पाकव्याप्त काश्मीर हा आपलाच परिसर ताब्यात घेण्याचा नुसता विचार  सोशल मीडियावर मांडणे देखील 'मानवता द्रोह' समजून विचारणाऱ्याची जात काढत पुरोगामी टोळी त्याचे लचके तोडत आहेत. त्याचवेळी नेपाळने भारताच्या भूभागावर दावा केलाय.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी हा दावा करण्याच्या काही दिवस आधी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिबेटमधील कैलास मानससरोवर या तीर्थस्थळाला भेट देण्याऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नव्या मार्गाचे उद्धघाटन केले. उत्तराखंडातील पिठोरगड जिल्ह्यातून जाणारा हा 80 किलोमीटर लांबीचा रस्ता कैलासदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधला आहे. हा संपूर्ण रस्ता भारताच्या हद्दीतून जाणारा आहे. यापूर्वी कैलासदर्शसाठी जाणारे दोन्ही मार्गातील ८० टक्के भाग हा चीनच्या ताब्यातील आहे. आता नव्या रस्त्याने हे चित्र बदलणार आहे.

चीनच्या जाळ्यात नेपाळ

 नेपाळची एकेकाळी जगातील एकमेव हिंदूराष्ट्र अशी ओळख होती. ही ओळख पुसण्यासाठी अनेकांनी जंग पछाडले. अखेर देशाची राज्यघटना बदलण्यात त्यांना यश आले. राज्यघटनेत बदल करणे हा एखाद्या देशाचा अंतर्गत प्रश्न असला तरी नेपाळची राज्यघटना ही कम्युनिस्ट सरकारने बदलली आहे. कम्युनिस्ट पक्षाची चीनवरील निष्ठा ही जगजाहीर आहे. नेपाळमध्ये हे सरकार सत्तेत आल्यापासूनच चीनचा नेपाळमधील हस्तक्षेप वाढला. गुंतवणुकीच्या नावावर देशात प्रवेश करत नेपाळी नागरिकांमध्ये भारताविरोधी वातावरण निर्माण करणे  हा चीनचा मुख्य उद्देश आहे. नेपाळमधील मधेशी नागरिकांना नव्या राज्यघटनेद्वारे दिली गेलेली दुय्यम वागणूक ही नेपाळच्या भारतविरोधी राजकारणाचे प्रतिक आहेच. त्याचबरोबर देशांतर्गत फूट पाडणारे देखील आहे.

नेपाळमधल्या माऊंट एव्हरेस्टवर या जगातील सर्वोच्च पर्वत शिखरावर चीनने मे महिन्यातच दावा केलाय. नेपाळमधील सरकार अस्थिर आहे. कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी ओली यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी केलीय. पक्षाचे नेते पुष्पकमल दहल ( प्रचंड) आणि ओली यांच्यातील मतभेद शिगेला पोहचलेत. त्याचवेळी नेपाळचे चीनमधील राजदूत हू यांछी यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत हा पेचप्रसंग सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. एखाद्या देशातल्या सत्ताधारी पक्षातील पेचप्रसंग सोडवण्यासाठी परदेशी राजदूत त्यातही विशेष म्हणजे चीनच्या राजदूताने बैठका घेणे ही घटना पुरेशी बोलकी आहे.

 चायनीज व्हायरसमुळे नेपाळमधील आरोग्य व्यवस्थेची बिकट अवस्था आणखीनच चव्हाट्यावर आली आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करण्यास नेपाळ सरकार असमर्थ आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरलाय. या व्हायरसचे खापर भारत - नेपाळ यांच्यातील खुल्या सीमेवर फोडण्याचं काम नेपाळचे पंतप्रधान ओली करत आहेत. आपली खुर्ची भक्कम करण्यासाठी चीनची मदत घेत लोकांमध्ये भारतविरोधाची आग ते पेटवतायत. त्यातूनच त्यांनी नेपाळचा नवा नकाशा जाहीर करत भारत सरकारवर जोरदार टीका केलीय. साम्राज्यवादी चीनने ओलींना हाताशी धरत चीनभोवती टाकलेलं आपलं जाळं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सध्याच्या जागतिक आपत्तीमध्येही मोठ्या जोमाने केलाय.

नेपाळ वेगळे का ?

पाकिस्तान आणि चीन यांच्यानंतर भारताच्या भूभागावर दावा करणारा नेपाळ हा तिसरा देश बनलाय.यापैकी  पाकिस्तान आणि चीन या दोन देशांच्या ताब्यात भारतीय भूभाग आहे, तर नेपाळच्या ताब्यात नाही. नेपाळच्या सरकारी माध्यमातून भारतविरोधी आग पेटवली जात असतानाही भारत सरकारने संयमी प्रतिक्रिया दिलीय.

या लेखाच्या पहिल्याच परिच्छेदात म्हंटल्याप्रमाणे भारत - नेपाळ यांच्यातील संबंध हे रामायणाइतके पवित्र आणि हिमालयासारखे भक्कम आहेत. हिंदूधर्माच्या समान संस्कृतीने हे दोन देश बांधले गेले आहेत. लाखो नेपाळी नागरिक भारतामध्ये अनेक पिढ्यांपासून राहतात. नेपाळमधील गोरखा नागरिकांची भारतीय सैन्यात खास रेजिमेंट आहे. या रेजिमेंटने 1947 नंतरच्या सर्व युद्धात अतुलनीय पराक्रम केलाय. गोरखपूरमधल्या गोरखनाथ मठाशी नेपाळच्या राजांचे खूप पूर्वीपासून संंबंध आहेत. मकर संक्राती उत्सवात गोरखनाथ मंदीर परिसरात मोठा उत्सव भरतो. या उत्सवात गोरखबाबांना खिचडीचा पहिला नैवेद्य दाखवण्याचा मान हा नेपाळच्या शाही परिवाराला आहे. नेपाळमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर नेपाळमधील नागरिकांसाठी भारतीयांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती.

नेपाळचे पंतप्रधान ओली हे चीनचे बाहुले बनलेत. थ्री इडियट्सच्या भाषेत सांगयचे तर सध्या ' बोल वो रहे है लेकिन शब्द चीन के है ' भारताने नेपाळला नेहमीच संरक्षण दिलंय. सर्व बाजूंनी जमिन असलेल्या नेपाळला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भारतमार्गे मोठ्या प्रमाणात केला जातो. परकीय देशाची जमीन हडप करण्याची भारताची संस्कृती नाही. कोणत्याही देशावर स्वत:हून आक्रमण न करणारा भारत हा देश आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यामध्ये काही शक्तींकडून मोठ्या प्रमाणात हवा भरली जात आहे. 'नेपाळने भारताला ललकारले' या सारख्या हेडलाईनच्या माध्यमातून दोन्ही देशात परस्परविरोधी भावना भडकवण्याचे काम ही प्रचारयंत्रणा करतीय. या प्रचाराला बळी पडून सत्ताधारी भाजपच्या एका तरी नेत्याने नेपाळविरोधी विधान करावे अशी या सर्वांची इच्छा आहे. यापूर्वी माधुरी दीक्षित किंवा ऋतिक रोशन यासारख्या कलाकारांच्या विधानांचा विपर्यास नेपाळमध्ये करण्यात आलाय.

आताही भारताच्या राष्ट्रवादाची हिटलरशी तुलना करत देशाच्या 'आत्मनिर्भर'तेच्या प्रयत्नांना ब्रेक लावण्याचा भारतविरोधी शक्तींचा प्रयत्न  आहे. भारत सरकारकडून सीमेवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जातोय.त्यामुळे देखील पाकिस्तान आणि चीनच्या डोकेदुखीत वाढ झालीय. 'चायनीज व्हायरस'मुळे चीनची जागतिक राजकारणातील प्रत्येक मंचावर कोंडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं सुरु केलाय. तर सीमाभागात भारताने जोरदार हलचाली करत आपली सज्जता वाढवलीय. 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा अवस्थेत अडकलेला चीनी ड्रॅगन आता नेपाळला हाताशी धरत ही चाल करतोय.

पाकिस्तान आणि चीन हे भारताचे शत्रू देश आहेत. या देशांशी नेपाळची तुलना करण्याची गरज नाही. मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये आक्रमक खेळण्याची गरज नसते. एखादी ओव्हर मेडन खेळणे देखील आवश्यक असते. नेपाळने निर्माण केलेला सध्याचा प्रश्न हा तसाच नाजूक आहे. त्यासाठी आक्रमक नाही तर संयमी खेळाची आवश्यकता आहे.

Monday, May 11, 2020

रवींद्र जडेजा : योद्धा क्रिकेटर



'' First they ignore you, then they laugh at you,, then they fight you, then you win''  ESPN Cricinfo या क्रिकेटच्या आघाडीच्या संकेत स्थळावरील रवींद्र जडेजाच्या प्रोफाईलची सुरुवात महात्मा गांधींच्या या जगप्रसिद्ध वाक्याने होते. महात्मा गांधींच्या जन्मगावापासून साधारण १२५ किलो मीटर अंतरावर असलेल्या जामनगरच्या या 'योद्धा क्रिकेटर'ची ही सार्थ ओळख आहे.

भारताने २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. जडेजा या टीमचा सदस्य. डाव्या हाताने स्पिन बॉलिंग करणाऱ्या भारतातील अनेक बॉलरपैकी एक म्हणून त्याच्याकडे त्यावेळी अनेकांचे दुर्लक्ष झाले. त्यानंतर २००९ साली टी - २० वर्ल्ड कपमध्ये लॉर्ड्सवर इंग्लडविरुद्ध १५४ चा पाठलाग करताना धोनीने त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. त्या मॅचमध्ये जडेजाला ३५ बॉल्समध्ये २५ रन्सच करता आले. भारताच्या पराभवाचे खापर या संथ खेळीवर फोडण्यात आलं. क्रिकेट फॅन्सना व्हिलन सापडला. देशांतर्गत स्पर्धेत तीन त्रिशतक झळकावूनही त्याच्यावरील लोकांचे हसणे थांबले नाही. टेस्ट टीममध्ये 'धोनीचा माणूस' म्हणून तो घुसला असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मागील आठ वर्षात  मोठ्या संघर्षानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात रवींद्र जडेजाने स्वत:ला सिद्ध केलंय.फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंगमधील उपयुक्तता सिद्ध केलीय.

जडेजा हा सौराष्ट्रमधील जामनगच्या एका सुरक्षा रक्षकाचा मुलगा. त्याच्या भावकीतले पूर्वज स्वातंत्र्यपूर्व काळात कच्छचे राजे हॉते. राजेशाही वंशातील कोणाताही श्रीमंती त्याच्या घरात नव्हती. जडेजाचे वडील त्याला जामनगरच्या 'रॉयल स्पोर्ट ऑफ क्रिकेट' या क्लबमध्ये कधी तरी घेऊन जात. ते त्या क्लबमध्ये कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षकाचं काम करत. सौराष्ट्राचे दोन मोठे क्रिकेटपटू रणजीतसिंहजी आणि दुलीपसिंहजी हे एकेकाळी या क्लबमध्ये क्रिकेट खेळत असत. मोठी परंपरा असलेल्या याच क्लबमध्ये सौराष्ट्राच्या तिसऱ्या मोठ्या क्रिकेटरची क्रिकेटची पहिली ओळख झाली.

जडेजासाठी क्रिकेट हा फावल्या वेळातील खेळ नव्हता. तर घरच्या गरिबीमुळे जे काही मिळत नाही त्याचा त्रास विसरण्याचे ते माध्यम होते. रॉयल स्पोर्ट्स क्लबच नाही तर संधी मिळेल तिथे तो क्रिकेट खेळत असे. जामनगरचे वर्षातील काही दिवस ५० अंश सेल्सियसच्या जवळ जाणारे तापमान, ओसाड जमिनीवर तासंतास करावी लागणारी फिल्डिंग, मोठ्या वयोगटातल्या मुलांच्या दादागिरीमुळे बहुतेकदा न मिळणारी बॅटिंग यापैकी कशाचाही परिणाम त्याच्या क्रिकेटबद्दलच्या समर्पणात झाला नाही.

 जडेजाच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये दोन महेंद्रचं मोठं योगदान आहे. यापैकी दुसरा महेंद्र म्हणजे महेंद्रसिंह धोनी हा सर्वांना माहिती आहे. पहिले महेंद्र होते महेंद्रसिंह चौहान. त्याचे पहिले क्रिकेट कोच. पोलीस दलात काम केलेले महेंद्रसिंह हे प्रशिक्षित कोच नव्हते. पण ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जात. क्रिकेटच्या सरावात कोणतीही हलगर्जी त्यांना खपत नसे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण व्हावी म्हणून ते त्यांना रट्टे द्यायलाही मागे-पुढे पाहत नसत. क्रिकेट आणि अभ्यास या व्यक्तीरिक्त कोणतीही गोष्ट त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेली त्यांना खपत नसे.  जडेजाने एका मॅचमध्ये भरपूर रन्स दिले होते. दुसऱ्या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्येही त्याने मागच्या मॅचमधील चुकांची पुनरावृत्ती करत भरपूर रन्स दिले. या ओव्हरनंतर स्लिपमध्ये फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या जडेजाची महेंद्रसिंह यांनी मैदानातच धुलाई केली. त्यांच्या या शिक्षेचा तात्काळ परिणाम झाला. जडेजाने त्या मॅचमध्ये ५ विकेट्स घेतल्या !

जामनगर ते सौराष्ट्र क्रिकेटची राजधानी राजकोट हा प्रवास जडेजाने निव्वळ क्रिकेटमधील गुणवत्तेच्या जोरावर केला. घरात आनंद, पेपरमध्ये नाव, समाजात ओळख हे सर्व क्रिकेटमुळेच मिळालं. १९ वर्षाखालील राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर तर घरात पैसा आणि गाडीचे क्रिकेटच्याच जोरावरच आगमन झाले. त्याच दरम्यान जडेजाची आई गेली. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पोरासाठी हा मोठा धक्का होता. या धक्क्याने तो अबोल बनला. एकटा पडला. क्रिकेटनंच त्याला यामधून बाहेर काढलं. मोठा क्रिकेटपटू होण्याचं आईचं स्वप्न पूर्ण करणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय बनलं.

पहिली फिल्डिंग, दुसरी बॉलिंग आणि तिसरी  बॅटिंग असं पॅशन जपणारा जडेजा २००८ च्या १९ वर्षाखालील विश्वविजेत्या टीमचा भाग होता.राजस्थान रॉयल्सने त्याला पहिल्याच ट्रायलमध्ये टीममध्ये निवडलं. फिरकीचा जादूगर शेन वॉर्न त्याच्या खेळानं भलताच प्रभावित झाला. लांब केस, सडसडीत शरीर आणि मैदानावरील ऊर्जेचा अंखड स्रोत असलेला हा पोरगा भविष्यातला 'रॉक स्टार' आहे, असं त्याने जाहीर केलं. आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सनं सर्वांनाच धक्का देत विजेतेपद पटाकवलं. या विजेतेपदासाठी जडेजानं जाम मेहनत घेतली होती.

इंग्लंडमधील २००९ चा टी-२० वर्ल्ड कप सेटबॅक होता. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सशी नियमबाह्य वाटाघाटी करताना सापडला. एक वर्षाची आयपीएल बंदीची शिक्षा भोगली. चेन्नई सुपर किंग्जने २०१२ साली त्याला मोठ्या किंमतीमध्ये खरेदी केलं. लोकांनी त्याच्यावर 'धोनीचा माणूस' म्हणून शिक्कामोर्तब केलं. जडेजाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या त्रिशतकांवर सारं जग हसत होतं, धोनीनं टेस्ट बॉलर म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ साली झालेल्या सीरिजमध्ये सहा पैकी पाच वेळा मायकल क्लार्कला आऊट करत त्यानं हा विश्वास सार्थ ठरवला.  इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी तो व्हिलन ठरला होता. त्याच इंग्लंडमध्ये २०१३ साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात त्याच्या बॉलिंगचं मोलाचं योगदान होतं.

इंग्लंड दौरा आणि रवींद्र जडेजा यांच्यात काही तरी वेगळंच नातं आहे. सर्व काही सुरळीत सुरु झालंय असं वाटत असताना २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली. 'ट्रेंटब्रिजच्या ड्रेसिंग रुम आणि खेळपट्टी यांच्यातील पॅसेजमध्ये जेम्स अँडरसनने रवींद्र जडेजाला ढकलंलं.' अशी तक्रार धोनीनं आयसीसीकडं केली. ही घटना घडली त्या पॅसेजमध्ये कोणताही सीसीटीव्ही नव्हता. भारताकडे कोणताही पुरावा नव्हता. इंग्लंडचे प्लेयर्स अँडरसनच्या विरुद्ध बोलतील ही कल्पनाही अशक्य होती. तरीही धोनीनं आयसीसीकडे तक्रार केली. लॉर्ड्स टेस्टपूर्वी सर्व फोकस जडेजावर शिफ्ट झाला.

लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या इनिंगमध्ये भारताची अवस्था ६ आऊट १७९ अशी असताना जडेजा बॅटिंगला आला. त्यानंतर त्याने अँडरसनच्या प्रत्येक बॉलला टार्गेट केलं. अँडरसनच्या बॉलवर तो कधी बीट व्हायचा पण नंतर  भिरकावून द्यायचा...पुन्हा चुकायचा, पुन्हा फेकून द्यायचा. दबावाच्या ओझ्यात त्याने खांदे पाडले नाहीत. त्याच्यातला 'योद्धा क्रिकेटर' जागा झाला होता. याच मॅचमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर जडेजानं पहिल्यांदा  तलावारीसारखी बॅट फिरवत आनंद साजरा केला. त्यानंतर जडेजाचे हे ट्रेडमार्क सेलिब्रेशन बनले. ५७ बॉल ६८ रन्स अशी आक्रमक मॅच विनिंग इनिंग तो खेळला.  भारतीय टीम २०११ नंतर जमेकाचा अपवाद वगळता पहिल्यांदाच उपखंडाच्या बाहेर टेस्ट मॅच जिंकली होती.

भारतीय टीममधलं धोनी युग संपलं. विराट युग सुरु झालं. जडेजाच्या भोवती टीकाकारांना सदैव दिसणारं धोनीचं संरक्षण कवच संपलं होतं. तरीही जडेजा टीममध्ये भक्कम उभा होता. विराट कोहलीच्या टीममध्येही त्याचं स्थान अबाधित होतं. भारतीय पिचवरचा तो आर. अश्विनचा भक्कम साथीदार बनला. आता तर भारतीय उपखंडाबाहेर अश्विनच्या अगोदर त्याचा विचार होतो.

पिचची साथ नसेल तर कधी - कधी अश्विनची जादू चालत नाही. अश्विनचा खराब दिवस असतानाही कॅप्टन जडेजावर विसंबून राहू शकतो. तो आपल्या 'बोरिंग लाईन'च्या जोरावर बॅट्समन्सला अडचणीत आणतो. विशाखपट्टणम ( 2016 )  टेस्टच्या शेवटच्या इनिंगध्ये कुक मैदानावर घट्ट चिकटून उभा होता. जडेजाने त्याला बोरिंग लाईनवर बॉलिंग करत भंडावून सोडलं. दिवसातल्या शेवटच्या ओव्हरमध्ये तरी जडेजा काही तरी वेगळं करेल अशी कुकला आशा होती. जडेजानं त्याचं व्रत सोडलं नाही. त्याच्या बॉलची 'लाईन अँड लेन्थ' ओळखण्यात कुकने छोटी चूक केली. या चुकीचा फटका त्याला बसला. कुक आऊट झाला. इंग्लंडची टेस्ट ड्रॉ करण्याची आशा संपुष्टात आली. कुक शेवटच्या ओव्हरमध्ये चुकला नसता तर दुसऱ्या दिवशी जडेजानं पुन्हा त्याच पद्धतीनं बॉलिंग केली असती. ग्लॅमरस बॉलिंगप्रमाणे बोरिंग लाईनही टीमला मॅच जिंकण्यात आवश्यक असते हे या 'बोरिंग लाईनच्या राजा' ला पक्कं माहिती आहे.

इंग्लंडमधल्या २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पराभवाचे खापर अश्विन आणि जडेजावर फुटले. दोघांचीही टेस्ट टीममधून हकालपट्टी झाली. चहल - कुलदीपचा उदय झाला होता. त्यानंतर अश्विनला आजवर वन-डे टीममध्ये कमबॅक करता आलं नाही. संजय मांजरेकरनं २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये ज्याचं वर्णन 'Bits & pieces players' असं केलंय त्या जडेजानं फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग या तिन्ही क्षेत्रातील योगदानाच्या जोरावर वन-डे टीममध्ये पुनरागमन केलं. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी झालेल्या आशिया कपमध्ये शांत डोक्यानं बॅटिंग करत जडेजानं अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव टाळला. वर्ल्ड कपमधलं टीममधलं स्थान पक्कं केलं.

वर्ल्ड कपमध्ये जडेजा सुरुवातीला १२ वा खेळाडू म्हणून खेळला. निव्वळ फिल्डर म्हणून 'अंतिम ११ मध्ये निवड हवी' अशी पात्रता असलेला तो पहिला भारतीय खेळाडू. सुरुवातीच्या मॅचमध्ये तो १२ वा खेळाडू या नात्याने फक्त फिल्डर म्हणूनच मैदानावर उतरला. वर्ल्ड कपच्या काळात ऋतिक रोशनच्या 'सुपर ३०' सिनेमाचं ट्रेलर सर्वत्र सुरु होतं. त्या सिनेमात ऋतिकचा एक डायलॉग आहे. समाजताल्या गरीब, वचिंत गटातल्या मुलांना उद्देशून ऋतिक म्हणतो, '' जब समय आएगा तो सबसे लंबा और सबसे बडा छल्लांग हम ही मारेंगे '' ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये जडेजानं मॅक्सवेलचा घेतलेला कॅच आठवून पहा...ऋतिकच्या त्या फिल्मी डायलॉगचा तो 'लाईव्ह डेमो' होता. समाजातील अती गरीब वर्गातील  सुरक्षा रक्षकाच्या मुलानं क्रिकेटच्या सर्वोच्च स्पर्धेत बड्या टीम विरुद्धच्या मॅचमध्ये निर्णायक क्षणी मारलेली ती 'छल्लांग' होती.

जडेजा वर्ल्ड कपमध्ये त्याचं काम चोख करत होता. त्याचवेळी कॉमेंट्री करताना वाहवत जाणाऱ्या आणि नकारत्मकतेचा डोस पाजणाऱ्या संजय मांजरेकरनं एक ट्विट करत विनाकारण वाद उकरुन काढला. नाराज जडेजानं मांजरेकरला ट्विटरवरच चोख भाषेत उत्तर दिलं. जडेजाचं हे ट्विट अनेकांना वरिष्ठ खेळाडूचा केलेला अपमान वाटलं. वर्ल्ड कपसारखी सर्वात महत्त्वाची स्पर्धा सुरु असताना वरिष्ठ खेळाडू मर्यादाभंग करत वाट्टेल ते बरळतात. त्यामुळे आपल्या देशाच्या खेळाडूच्या मनस्थितीवर काय परिणाम होईल याचा ते विचार करत नाहीत. पण त्याला संबंधित खेळाडूंनी काहीच उत्तर द्यायचं नाही....

जडेजा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकटा लढला. रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे प्रमुख बॅट्समन आऊट झाल्यानंतर तो बॅटिंगला आला. त्यावेळी २४० च्या टार्गेटचा पाठलाग करताना ६ बाद ९२ अशी आपली नाजूक अवस्था होती. न्यूझीलंडचे बॉलर्स फॉर्मात होते. त्यांना पिच आणि हवामानाची साथ मिळत होती. महेंद्र सिंह धोनी 'आऊट ऑफ टच' होता. जडेजानं 'योद्धा क्रिकेटर' सारखा त्वेषानं प्रतिहल्ला चढवला. त्याच्या ७७ रन्समुळे आपण मानहानीकारक पराभव टाळू शकलो.

फिल्डिंग आणि बॉलिंग प्रमाणे जडेजा आता बॅटिंगही अधिक गांभीर्याने करु लागला आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत टॉप आणि लोअर ऑर्डरमधील समन्वयाचं काम त्याला जमलंय. टेस्ट क्रिकेटमधील फक्त १६ इनिंगमध्ये त्याची सरासरी ही २९.४० वरुन ३५. ४२ इतकी सुधारली आहे. २०१८ आणि २०१९ या वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये सहा ते नऊ क्रमांकावर बॅटिंगला येणाऱ्या फलंदाजामध्ये (किमान १५ इनिंग बॅटिंग हा निकष ) त्याची सरासरी  सर्वात जास्त ५७.०९ इतकी आहे.  ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, जोस बटलर, मोईन अली, बेअरस्ट्रो, क्विंटन डी कॉक या सर्वांपेक्षा जडेजाची या क्रमांकावरील बॅटिंग सरासरी जास्त आहे.

चायनीज व्हायरसमुळे अनेक देश सध्या लॉकडाऊन अनुभवत आहेत. या काळात खेळाडू वेगवेगळे व्हिडिओ करुन फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतायत. जडेजानं हवेत तलवारबाजीचा एक व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर शेअर केला होता.





त्याचे फॅन्स या  व्हिडिओमुळे खुश झाले. काही पत्रकारांना मात्र हा व्हिडिओ चांगलाच झोंबला. 'जडेजा, तू क्रिकेटर कधी होणार ? ' असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांच्या लेखातून त्याला विचारला. जडेजाचं वागणं जातीय आहे. तो स्थानिक गुंड मुलगा आहे का ? हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल यांच्यावर गैरवर्तनाबद्दल (!!!) बीसीसीआयनं कारवाई केली होती, याची आठवण करुन देत जडेजाच्या अशा व्हिडिओचे कोणत्याही प्रकारे समर्थन होत नाही, असं त्यांनी या लेखात सांगितले होते.  ( लेखाची लिंक देऊन मी जाहिरात करणार नाही. गरजवंतांनी शोध घ्यावा )

खेळाडूंनी सतत 'पोलिटिकली करेक्ट' राहण्याची भाषा करणे हे चुकीचे आहे. त्याचबरोबर जागतिक खेळाडू कसं वर्तन करतात याची माहिती नसल्याचे/ त्यांचा निकष जडेजाला न लावण्याचे हे उदाहरण आहे. बॉक्सर मोहम्मद अली जाहीरपणे राजकीय मतं सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असत. त्यांची धार्मिक ओळख ठामपणे सांगत. अनेक क्रिकेटर्सनी इंग्लंडच्या राणीकडून वेगवेगळ्या संरजामी पदव्या आनंदाने घेतल्या आहेत. त्या अभिमानाने मिरवल्या आहेत.हशीम अमलाने धार्मिक कारण देत मद्याच्या जाहिरातीचा लोगो जर्सीवर लावण्यास नकार दिला. या खेळाडूंच्या स्वातंत्र्याचा ते आदर करतात. त्याचे त्यांना कौतूक वाटते मग जडेजाच्या स्वातंत्र्यावर त्यांचा थयथयाट का होतो ?

रवींद्र जडेजा गेली १२ वर्ष व्यवसायिक पातळीवरचं सर्वोच्च क्रिकेट खेळतोय. कॅप्टन विराट कोहलीच्या बरोबरच त्याची कारकीर्द सुरू झाली. विराट झपाट्याने मोठा होत आज महान खेळाडू बनलाय. रवींद्र जडेजानं प्रत्येक पातळीवर संघर्ष करत स्वत:ला सिद्ध केलंय. टीममधील उपयुक्तता वेळोवेळी जगाला दाखवून दिलीय. आज तो त्याच्या पिढीतील सर्वोत्तम फिल्डर आहे. टेस्ट टीममध्ये अश्विनच्या आधी त्याचा विचार केला जातो. बॅटिंगमधील त्याची सरासरी वाढलीय.  तो काही वर्षांनी निवृत्त होईल. तेंव्हा क्रिकेट फॅन्स त्याचे नेहमी ' Bits & pieces' क्रिकेटर म्हणून नाही तर टीमसाठी सतत कमिटेड असलेला 'ऑलराऊंडर' म्हणून स्मरण करतील.  रवींद्र जडेजा या 'योद्धा क्रिकेटर'चा हाच सर्वोच्च सन्मान असेल.
 

Thursday, May 7, 2020

दारूबंदी हवीच कारण....


If I was appointed dictator for one hour for all India, the first thing I would do would be to close without compensation all the liquor shops, and compel factory owners to produce humane conditions rooms where these workmen would get innocent drinks and equally innocent amusements.   ( M.K. Gandhi , Young India ( 25-6-31) 


संपूर्ण देश ज्यांचा राष्ट्रपिता म्हणून गौरव करतो. ज्यांच्या मार्गावर चालण्याच्या शपथा आजही अनेक जण वर्षातील किमान दोन दिवस तरी नक्की घेतात त्या महात्मा गांधी यांचे हे दारूबद्दलचे विचार आहेत. गांधीजींच्या स्वतंत्र भारताबद्दलच्या अनेक चांगल्या संकल्पना त्यांच्या अनुयायांनी धुळीस मिळवल्या.दारूबंदीचा आग्रह ही त्यापैकी एक चांगली संकल्पना.

चायनीज व्हायरसमुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात महसूल वाढीसाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता तातडीने दारु पिणे आवश्यक आहे, अन्यथा जेल होईल या काळजीनं अनेक मद्यप्रेमी रस्त्यावर उतरले.

दारू पिल्यानंतर नशा चढते आणि माणूस झिंगतो हे माहिती होतं/पाहिलं होतं. पण या मद्यप्रेमींना सरकारच्या  निर्णयानंतरच नशा चढली. त्याच नशेत झिंगत त्यांनी थेट दारुच्या दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या. देशात चायनीज व्हायरस पसरलाय. त्यामुळे देशभर लॉकडाऊन सुरुय.  हा व्हायरस संसर्गामुळे पसरतो. दारू दुकानासमोर मोठ्या श्रद्धेनं रांगेत उभ्या असलेल्या या 'प्या' रे मंडळींपैकी एकाला जरी या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला असेल, तर रांगेतील अनेकांना तो होऊ शकतो. चायनीज व्हायरस हा कसा गुणाकार करतो....त्याबद्दलचे  व्हॉट्सअपवर व्हायरल झालेले अनेक मेसेज सर्वांनीच वाचले आहेत. मोठ्या तत्परतेने इतरत्र फॉरवर्ड केलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हायरसच्या गुणाकाराचा उल्लेख त्यांच्या संवादातून  केला आहे.

देशात लॉकडाऊन का सुरू आहे ? तिन्ही त्रिकाळ कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे ? हे सतत सर्व माध्यमातून सांगितलं जात असूनही, त्याची कसलीही आठवण या मंडळींना नव्हती. दारू मिळणार या कल्पनेनंच ती पिण्यापूर्वीच शुद्ध गमावत त्यांनी रस्त्यांवर गर्दी केली. या गर्दीमुळे देशातील चायनीज व्हायरसचा मुक्काम किती लांबणार आहे हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

या 'प्या' रे मंडळींचा सतत एक दावा असतो की, ' दारूमुळे राज्याला महसूल मिळतो. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये हा महसूल राज्याला अत्यंत आवश्यक आहे...' एखाद्या अर्थव्यवस्थेचा आधार हा दारू विक्री असेल तर ती अर्थव्यवस्था किती ठिसूळ आहे हे वेगळं सांगायला नको. राज्य आणि देशाने याचा गांभिर्याने विचार करायला हवा.

चायनीज व्हायरसग्रस्त अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ग्रीन झोनच्या भागातील रस्ते, पडक्या शाळा, पाण्याच्या टाक्या किंवा अन्य पायाभूत सुविधा उभारणीसाठी मजुरांना कामाला लावायला हवं. यामुळे सध्या घरात बसून राहिलेल्या मजुरांना रोजगार मिळेल. हातावर पोट असलेल्या मोठ्या वर्गाची चिंता मिटेल. मजुरांना त्यांच्या गृह राज्यात कसे पाठवायचे ? हा प्रश्न निर्माण होणार नाही. दारू दुकानं उघडण्यासाठी लॉबिंग करणारे आणि त्याचं समर्थन करत चढ्या भावात बाटल्या खरेदी करून घरात बार उघडणाऱ्या प्रत्येक करदात्या मंडळींनी दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरला तरी अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. ऐन लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची ढाल पुढे करत दारूची दुकाने उघडणे हा 'रोगापेक्षा इलाज भयंकर' प्रकार आहे.

 सध्या 'प्या' रे गटातल्या एका गृहस्थाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो गृहस्थ अगदी आनंदाने वेडापिसा झालाय. ' मी किती बाटल्या घेतल्या, त्यापैकी आता किती पिणार, मला किती जाम भारी वाटतंय, मी आता कसं समाधानाने झोपणार'  याचं तो अगदी 'हाय जोश' मध्ये वर्णन करतोय. व्यसनी मंडळींचं वर्णन करण्यासाठी तळीराम  हा शब्द आता चांगलाच प्रचलित झालाय.  तुम्हाला त्यांना दारुडे किंवा बेवडे हे अस्सल मराठी शब्द वापरणे बरं वाटत नाही हे एकवेळ ठीक. पण ज्या शब्दात राम आहे असा शब्द तुम्ही या व्यसनी मंडळींना कसा लावू शकता ? श्रीराम हे काय दारु पित होते का ? मग या व्यसनी लोकांचा उल्लेख करताना 'राम' ही जोड कशाला हवी ?

'अमेरिकन / युरोपीयन लोकं दारू पितात. अमुक देशाची ही दारू आहे. तमुक देशाची ही दारू आहे. दारू पिणे ही तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. भारतातच संस्कृतीरक्षकांना दारूचे वावडे आहे' असा प्रचार काही मंडळींकडून केला जातो. वास्ताविक अमेरिकन / युरोपीयन देशांकडून घेण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या देशातील मंडळींमध्ये फिटनेस , खेळाची आवड आहे. अगदी लहानवयापासून ही आवड जोपासली जाते. त्यासाठी वेळ दिला जातो. त्यावर मेहनत घेतली जाते.त्यामधून ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंची मोठी साखळी तयार होते. इतिहास असो वा शिल्पकला आपल्या देशातील सर्व संस्कृती उत्तम पद्धतीने जतन करण्याची त्यांना सवय आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत, नवे-नवे शोध लावण्याच्या बाबतीत ही मंडळी सदैव आघाडीवर असतात. सार्वजनिक स्वच्छतेची सवय तर या मंडळींमध्ये जन्मजात म्हणावी इतकी सहज असते. या देशांकडून इतक्या चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असताना त्यांची फक्त दारू पिण्याचीच सवय आपल्याकडे आणण्याचा अट्टहास कशाला ?

'त्याचा पैसा आहे, तो वाट्टेल ते खरेदी करेल' हे लॉजिक असेल तर अंमली पदार्थांची खरेदी सरकारने कायदेशीर करावी. लोकं आपल्या पैशाने शहरातल्या ड्रग्ज पार्कमध्ये जावून आवडीचे अंमली पदार्थ खरेदी करतील.  गांजाची शेती करायला परवानगी देत त्यावर कर लावावा. त्यामुळे शेतकरी श्रीमंत होतील आणि सरकारलाही कर मिळेल. आणखी एक उपाय सांगितला जातो तो म्हणजे दारूवरील कर वाढवा ती आणखी महाग करा. आता दारूवर कर वाढवला की हातभट्टीवरील अवैध दारूच्या निर्मितीचा धंदा वाढणार.  गरीब मंडळी तिकडं मोठ्या प्रमाणात वळणार या प्रकारची दारू पिल्याने जीव गेल्याच्या अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कर वाढला की काळाबाजार आणखी वाढणार. करवाढ हा जर सर्व गोष्टींवरील उपाय असेल तर प्रत्येक वस्तूवर ११० टक्के कर लावला की सरकारचे काम संपेल. आपल्याला या प्रकारच्या समाजवादी अर्थव्यवस्थेत देशाला पुन्हा ढकलायचे आहे का ?

महात्मा गांधींपासून अभय बंगांपर्यंत अनेक मंडळींनी दारूबंदीचा सातत्याने आग्रह केला आहे. दारू पिणे इतकेच प्रतिष्ठेचे असेल तर त्यांनी याबाबत मार्गदर्शन करणारे क्लासेस काढले असते. दारू ही कोणत्याही प्रकारातील असो ती शरिराला अपायकारच असते. हे WHO पासून ते आपल्या घरातील बायको, आई, वडिल किंवा अन्य वडिलधा-या मंडळींपर्यंत अनेक जण सतत सांगत असतात. 'दारू पिण्याला सेफ लिमिट असते' हा देखील एक जागतिक प्रोपगंडा आहे. जितकी अधिक दारू प्याल तेवढे दुष्परिणाम अधिक होतात. 'व्हायरस' हा श्रीमंत - गरीब असा भेद करत नाही, हे आपण सध्या वारंवार ऐकतो तसंच दारू देखील श्रीमंत- गरीब असा कोणताही भेद करत नाही. गंमत म्हणून, सामाजिक वातावरण म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सुरू केलेली दारू अगदी सहज व्यसन बनू शकते.

व्यसनाचा अंमल असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालाय. व्यसनी माणसाचे शरीर खंगत  जाते. अनेकदा नंतर पश्चाताप करुन किंवा औषधोपचारावर अफाट खर्च केल्यानंतरही फरक पडत नाही. दारूच्या नशेत होणारा हिंसाचार ही देखील मोठी समस्या आहे. या हिंसाचाराच्या छायेत अनेक महिला आणि त्यांची मुलं जगत असतात. त्यांचे संसार उद्धवस्त होतात. अनेकांची कमाई, बचत सर्व काही दारूच्या पुरात वाहून जाते. दारूबंदीच्या मागणीसाठी महिला वर्ग सातत्याने आग्रही  असतो याचे हे मुख्य कारण आहे. समाजातल्या एका मोठ्या वर्गाच्या मागणीकडे आपण फक्त महसूल प्राप्तीच्या हव्यासापोटी दुर्लक्ष किती दिवस करणार ?

पत्रकार पराग फाटक यांनी एक छान मुद्दा त्यांच्या फेसबुक वॉलवर मांडलाय. पराग लिहितात, 'ऑफिसात दारू पिऊन येऊ शकत नाही, दारू पिऊन गाडी चालवू शकत नाही, दारू पिऊन देवळात जाता येत नाही. आणखी अनेक गोष्टी दारू पिऊन करता येत नाहीत. ज्या अर्थी एवढ्या ठिकाणी दारूबंदी आहे त्याअर्थी काहीतरी लॉजिकल कारण असणार. जिथे जबाबदारीचं काम आहे तिथे दारू पिऊन यायला, काम करायला परवानगी नाही.'

  आपल्याला जबाबदार, चांगल्या सवयी असलेला, निरोगी समाज हवा आहे की व्यसनी, खंगलेला, स्वनियंत्रण गमावलेला समाज हवा आहे ? याचा सरकार आणि समाज या दोघांनीही विचार करणे आवश्यक आहे. दारू न पिणारे सर्वच जबाबदार, चांगल्या सवयी असलेले आणि निरोगी असतात असा माझा अजिबात भाबडा समज नाही. पण दारूबंदी करून सर्वांनाच चुकण्याची एक खूप मोठी सवय कायमची निकालात काढता येऊ शकते.

 दारूबंदी न करता प्रबोधनातून समाज व्यसनमुक्त झाला असता तर आज व्यसनमुक्ती केंद्र कायमची बंद झाली असती. 'संसाराला उद्धवस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू' ही १९९० च्या दशकातील टीव्हीवरील अगदी परिणामकारक जाहिरात होती. ती परिणामकारक होती म्हणूनच आजही अनेकांच्या लक्षात आहे. या प्रकराच्या अनेक जाहिरांतीवर सरकारने आणि स्वयंसेवी संस्थांनी बराच खर्च केलाय. तरीही स्त्री आणि पुरुषांमध्ये भारतात दारू पिण्याचं प्रमाण हे सतत वाढत आहे, असे सर्व अहवाल सांगतात.

स्वनियंत्रण, वेगवेगळ्या प्रचारात्मक साहित्यामधून प्रबोधन हा देशामध्ये उपाय असता तर चायनीज व्हायरस लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर २४ तास पोलीस तैनात करावे लागले नसते. दारूची नशा रोखण्यासाठी देखील हेच लागू आहे. दारूच्या दुष्परिणामातून देशातील खूप मोठ्या पिढीचा बचाव करायचा असेल तर सार्वत्रिक दारूबंदी हाच उपाय आहे. 

Wednesday, April 15, 2020

सीतेवरील अन्याय आणि शंबुक वध - रामायणातील खोट्या गोष्टी



चायनीज व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात टीव्हीवर सर्वात जास्त बघितला जाणारा कार्यक्रम म्हणजे रामायण. हजारो किलोमीटर लांब आणि वेगवेगळ्या भाषा, जाती, चाली-रिती यांचा समावेश असलेल्या भारत देशाला एकत्र बांधून ठेवणारे तीन अक्षरी नाव म्हणजे श्रीराम. श्रीरामाच्या आयुष्यावर आधारित रामायण ही मालिका तीन दशकांपूर्वी जितकी लोकप्रिय होती तितकीच आजही आहे हे आता सिद्ध झाले आहे.

मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाच्या आयुष्यावर प्रश्न विचारणे ही भारतामध्ये ‘पुरोगामी’ होण्यासाठी सर्वात आवश्यक बाब आहे. या पुरोगामी मंडळींकडून श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वाधिक वादग्रस्त भासवला जाणारा भाग म्हणजे सीतेची अग्निपरीक्षा, सीतेला वनवासाला पाठवणे आणि शंबुक या शूद्राचा श्रीरामाने शिरच्छेद करणे हा आहे. या घटनांमुळे श्रीराम हे असुरक्षित, स्त्रीविरोधी आणि जातीयवादी आहेत असा कांगावा या मंडळींकडून सतत केला जातो. दुर्दैवाने देशातल्या अनेक ग्रंथांमध्ये आणि रामायणातील उत्तरकांडात याबाबत उल्लेख असल्याने हे प्रसंग श्रीरामाच्या आयुष्यात घडले असा अनेकांचा समज आहे. पण हे प्रसंग प्रत्यक्ष रामायणात घडलेच नाहीत. हे पुराव्यासह मांडण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे.

सीतेची अग्निपरीक्षा

याबबात सांगितली जाणारी कथा थोडक्यात : रावण वधानंतर श्रीरामाने सीतेच्या पावित्र्यावर संशय घेत त्यांना परत घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी सीतेने आपल्या चारित्र्याची खात्री श्रीरामाला व्हावी यासाठी अग्निपरीक्षा दिली. ( सीता यांनी अग्नीत उडी घेतली) त्यावेळी अग्नीदेवतेने सीतेला सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर सर्व देवांनी एकत्रपणे रामाला सीता यांचे पावित्र्य पटवून दिले आणि रामाने सीतेचा स्विकार केला. काही जणांच्या मते रावणाने खऱ्या सीतेला पळवले नव्हतेच. रावणाने पळवलेल्या सीता ह्या ख-या सीतेची सावली होत्या. खऱ्या सीता ह्या अग्नीदेवतेकडे होत्या. त्यामुळे अग्नीपरीक्षेनंतर सीतेची सावली अग्नीमध्ये जाताच खऱ्या सीता प्रकट झाल्या.

रामायणात स्त्रियांना बरोबरीचे स्थान होते. श्रीरामाच्या आई कौसल्या या राज्यकारभारात भाग घेत असत. कैकेयी यांनी तर दशरथ राजाला युद्धात मदत केली. त्या दशरथ राजाबरोबर युद्धात सहभागी होत्या. श्रीरामाच्या पत्नी सीता यांनीही त्यांचा अभ्यास पूर्ण केला होता. त्यांनी स्वयंवरातून जोडीदार निवडला. त्यांचे लग्न जनक राजाने ठरवले नव्हते. संपूर्ण रामायणात असलेले हे समानतेचे सूत्र सीतेच्या अग्निपरीक्षेच्यावेळी अचानक कसे तुटले? याचा विचार करायला हवा.

श्रीराम स्वत:ही धर्म आचरण करण्याचे मुर्तीमंत प्रतिक मानले जातात. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना आहेत. राजा सुग्रीवाच्या पत्नीला त्यांच्या मोठ्या भावाने वालीने कैद केले होते. बलिला मारल्यानंतर सुग्रिवाच्या पत्नीची कैदेतून सुटका झाली. त्यावेळी श्रीरामाने सुग्रीवाला पत्नीचा स्विकार करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे श्रीरामाने सीता यांच्या अग्निपरीक्षेचा आग्रह धरणे ही त्यांच्या संपूर्ण स्वभावधर्माच्या विरुद्ध गोष्ट वाटते.

कोणत्याही स्त्रीच्या पावित्र्याचा मापदंड हा अग्निपरीक्षा म्हणजेच तिचे शरीर हे अग्नीरोधक असणे हा कसा असू शकतो? असं असेल तर सर्व पवित्र स्त्रीने अग्निरोधक असायला हवं पण ते शक्य नाही. अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना मान्यता दिली तर भविष्यात कर्मकांड बळावेल आणि समाजातील स्त्रीयांचे स्थान दुर्बल होईल हे श्रीरामाला नक्कीच माहिती असणार त्यामुळे ते अशा प्रकारच्या प्रथांना परवानगी देतील हे पटत नाही.

रामायणाची गती ही प्रवाही आहे. ही प्रवाही गती रावण वधानंतर श्रीराम – सीतेची जेंव्हा पहिल्यांदा भेट होते त्यावेळी अचानक गडबडते. युद्धकांडातील सर्ग ११४ मध्ये श्रीरामाने सीतेला परत भेटण्याचे वर्णन हे अगदी भावनाविवश होऊन केले आहे. पण त्यानंतर त्याच्या पुढच्या टप्प्यात अचानक श्रीराम सीतेला भरत, लक्ष्मण, सुग्रीव किंवा विभीषणाजवळ राहयला सांगतात. त्यानंतर सर्ग ११६ मध्ये सीता लक्ष्मणांना अग्निपरीक्षेची तयारी करायला सांगतात. सीता अग्नीत प्रवेश करतात. सर्ग ११७ मध्ये अग्नीदेवतेसह सीता आणि स्वर्गातून सर्व देव प्रकट होतात. त्यानंतर सर्ग ११८ मध्ये राम आणि सीता एकमेकांना आनंदाने भेटतात.

आता सर्ग ११४ मधील रामाचे सीतेसाठी भावनाविवश होणे... या श्लोकानंतर पुढचे  श्लोक काढले आणि सर्ग ११८ मधील आणि त्यापुढे  राम आणि सीता एकमेकांना आनंदाने भेटतात, हा श्लोक ठेवला तर संगती लागते. या दोन श्लोकांमधील सर्व श्लोक हे नंतरच्या काळात रामायणात घुसडण्यात आले आहेत याची खात्री पटते.  


उत्तरकांड रामायणाचा भाग नाही

श्रीरामाने सीतेचा त्याग करणे आणि शंबुकाचा शिरच्छेद करणे हे दोन प्रसंग श्रीराम राजा बनल्यानंतरचे आहेत. रामायणातील उत्तरकांडात त्याचे वर्णन केले आहे. उत्तरकांड हे रामायणातले सातवे आणि शेवटचे प्रकरण. पण हे प्रकरण मुळ रामायणात महर्षी वाल्मिकी यांनी लिहलेच नव्हते. युद्धकांड या सहाव्या प्रकरणानंतर रामायण समाप्त झाले. उत्तरकांड नंतरच्या काळात लिहिले गेले असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. यासाठी या अभ्यासकांनी अनेक पुरावे देखील दिले आहेत. हे पुरावे कोणते ते पाहूया

पहिला पुरावा – हिंदू धर्माच्या कोणतेही प्रसिद्ध ग्रंथ, स्त्रोत्र किंवा आरतीमध्ये त्याच्या शेवटी हा ग्रंथ वाचून, स्त्रोत्र किंवा आरती म्हंटल्यानंतर काय फायदा होईल याचे हमखास वर्णन असते. ज्याला फलश्रृती असे म्हणतात. रामायणाची फलश्रृती ही महर्षी वाल्मिकींनी युद्धकांडाच्या शेवटी सर्ग १२८ मध्येच लिहिली होती. त्यामुळे हे सिद्ध होते युद्धकांड हेच रामायणातले शेवटचे प्रकरण आहे.

दुसरा पुरावा – रावणाच्या दरबारात कैदेत असलेल्या हनुमाला ठार मारण्याचे आदेश रावण देतो. त्यावेळी विभीषण रावणाला सांगतो की हनुमान हा श्रीरामाचा दूत आहे, दूताला मारल्याची घटना आजवर कधीही झालेली नाही. शास्त्राला मान्य नाही. त्यावेळी रावण विभीषणाचे मत मान्य करतो आणि हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश देतो. पण उत्तरकांडात अचानक रावणाने कुबेराच्या दुताला ठार मारल्याचा उल्लेख आहे. या दोन परस्पर विरोधी घटना आहेत. महर्षी वाल्मिकी ही एकच व्यक्ती या घटना लिहू शकत नाही.

तिसरा पुरावा –  महर्षी वाल्मिकींनी युद्धकांडात स्पष्ट लिहलंय की रामराज्यात कुणाचाही अकाली मृत्यू होत नाही. कोणत्याही वडिलांवर मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ कधीही आली नाही. पण उत्तरकांडात मात्र अचानक एक ब्राह्मण आपल्या मुलाचे प्रेत घेऊन श्रीरामाच्या दरबारात येतो आणि सांगतो, ‘शंबुकाने माझ्या मुलाचा वध केला’  त्यानंतर ब्राह्मणाच्या विलापामुळे संतापलेले श्रीराम मागचा-पुढचा विचार न करता शंबुकाचा वध करतात. या दोन्हीही परस्परविरोधी घटना आहेत. ज्यामुळे सिद्ध होतं की उत्तरकांड हे मुळ रामायणाचा भाग नसून त्यानंतर हजारो वर्षानंतर लिहिले गेले आहे.

चौथा पुरावा – रामायण आणि महाभारत यांच्यात सुमारे तीन हजार वर्षांचा कालावधी आहे असे मानले जाते. महाभरातामधील वनपर्वात मार्केंडेय ऋषी युधिष्ठिराला रामायण समजावून सांगतात, याचे वर्णन आहे. यामध्ये देखील मार्केंडेय ऋषी युधिष्ठिराला युद्धकांडापर्यंत रामायण सांगातात. याचे कारण महाभारताच्या काळातही युद्धकांड हेच रामायणातील शेवटचे प्रकरण होते.

पाचवा पुरावा – रामायणातले सर्वात जुने हस्तलिखीत काही वर्षांपूर्वी सापडले. हे हस्तलिखित सहाव्या शतकातील आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर हजारो वर्षांनंतरचे हे हस्तलिखित आहे. या हस्तलिखितामध्येही उत्तरकांडचा उल्लेख नाही. युद्धकांडनंतरच हे रामायण समाप्त होते.


नाविकाचा मान राखणारे, जटायूचा वडिल मानून त्यांचा अंत्यसंस्कार करणारे, सुग्रीवावरील अन्याय दूर करणारे, शबरीची उष्टी बोरं आवडीनं खाणारे श्रीराम हे उत्तरकांडात अचानक एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरुन मागचा पुढचा विचार न करता शंबुकाचा वध कसा करु शकतात? संपूर्ण रामायणात स्त्रीयांना सन्मान द्या अशी शिकवण आहे. त्यानंतर अचानक उत्तरकांडात एका धोब्याच्या सांगण्यावरुन श्रीराम सीतेवर अविश्वास कसा दाखवू शकतात? निर्वासित अहिल्याला आई म्हणणारे श्रीराम, वनवासात पाठवलेल्या कैकेयीबद्दल कोणतीही कटूता न ठेवणारे श्रीराम आपल्या पत्नीला दुय्यम वागणूक कशी देऊ शकतात ? पत्नीचा त्याग कसे करु शकतात? याचा अर्थ स्पष्ट आहे, उत्तरकांड हे मुळ रामायणाचा भाग नाही.

ज्या लोकांची भारतीय संस्कृतीवर श्रद्धा नाही त्यांनीच सीतेची अग्निपरीक्षा, सीता त्याग आणि शंबुक वध या गोष्टींचा रामायणात समावेश केला आहे. श्रीराम हे देखील अपयशी होते असा प्रचार करण्यासाठी या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. 

आपला देश हा अफवांचा देश आहे. या देशात एकाच गोष्टीचे, बातमीचे अनेक व्हर्जन सतत प्रचलित असतात. सध्याच्या व्हॉट्सप युगात तर याचा सर्वांनाच अनुभव आहे. रामायणातले उत्तरकांड आणि या लेखात उल्लेख केलेल्या तीन गोष्टी देखील अशाच प्रकारचे व्हर्जन आहे. अनेक सामान्य भक्त हे आजवर रामायणातील अफवांना बळी पडले आहेत. 

हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाला मला शेवटी कळकळीनं विचारावं वाटतं, 'तुमचा भाऊ, नवरा किंवा मुलाच्या चारित्र्यावर विश्वास आहे ना ? मग आदर्श भाऊ, आदर्श पती आणि आदर्श पूत्र असलेल्या श्रीरामाच्या चरित्रावर तुम्ही कसा अविश्वास दाखवू शकता? तुम्ही खरोखरच मनुष्य असाल तर सीतेची अग्निपरीक्षा, सीतेचा त्याग आणि शंबुकाचा शिरच्छेद या घटना रामायणात घडल्या आहेत, ही समजूत काढून टाका. भ्रामक कथा, दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका आपल्या -हदयातील श्रीरामाला जागृत करा '.

जय श्रीराम. 

Saturday, March 21, 2020

बया दार उघड !

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, हे वाक्य सतत सर्वबाजूने सर्व प्रकारच्या/विचारांच्या माणसांकडून आपल्याला ऐकू येत असते. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे आद्य आदरणीय व्यक्तीमत्व. ‘आद्य शंकराचार्यांनंतर संपूर्ण हिंदू समाजाचा या देशाचा विचार करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज’ असे मला नेहमी वाटते. महाराज 1680 मध्ये गेले. आज 340 वर्षांनंतरही त्यांचे समाजावरचे गारूड कमी झालेले नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची लहाणपणी ऐकलेली/ वाचलेली प्रतिमा ही आणखी ‘लार्जर दॅन लाईफ’ होते.

शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता? शिवाजी महाराजांनी ज्या समाजाला संघटीत केलं त्या समाजाची अवस्था काय होती? शिवाजी महाराजांनी मातीच्या गोळ्याला आकार दिला असं म्हणतात.कारण महाराष्ट्राची अक्षरश: माती झाली होती. ज्या काळात शिवाजी महाराज जन्मले त्या काळात ‘हर हर महादेव’ ही घोषणा देत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन, भवानीमातेची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य कुणी स्थापन करेल अशी कल्पना ही कवी कल्पनेच्याही पलिकडे होती. महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गो. नी. दांडेकर (गोनीदा) यांची ‘बया दार उघड’ ही कादंबरी वाचली पाहिजे.

या पुस्तकाला शिवशाहीर आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत शिवशाहीर म्हणतात, ‘कादंबरीला नायक, नायिका असतात. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना याचे बोट धरुन वाचक कादंबरीच्या शेवटापर्यंत वाचत जातात. परंतू गोनीदांच्या या कादंबरीची गोष्ट वेगळी आहे. ही कादंबरी व्यक्तिप्रधान किंवा घटनाप्रधान नाही तर कालप्रधान किंवा परिस्थितीप्रधान आहे. तत्कालिन समाजजीवनाची जवळून ओळख या कादंबरीतून होते.’ गोनीदांनी या पुस्तकातून शिवकाल उभा केलाय. शिवाजी महाराजांच्या काळातील भाषा वापरली आहे. ती भाषा, तो काळ ते स्वत: जगले आहेत. असंख्य कागदपत्रांचा अभ्यास केलाय. तो परिसर पालथा घातलाय. ही कादंबरी म्हणजे एक शोधनिबंध नाही तर शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्राचं गोनीदांनी केलेलं जिवंत चित्रण आहे.

मावळ्यांनी शेतामध्ये ढोरासारखे कष्ट करावे. भर पावसात गुडघाभर चिखलात नांगर फिरवावा. उर फुटेपर्यंत मरावं, आणि घास अगदी हातातोंडाशी आला की सुलतानी राजवटीच्या प्रतिनिधींनी दाणा न् दाणा उचलून न्यावा. त्यानंतर मोहाची फुलं वेचणं आणि त्याच्या भाकऱ्या करून खाणे हे त्यांचे आयुष्य. कित्येक दिवाळी आल्या आणि गेल्या.  दिवाळीनं कोणतंही सुख दिले नाही. ‘कशाची दीन दीन दिवाळी आणि कुठल्या गाई म्हशी ओवाळी!’

सुलतानी राजवटीचे प्रतिनिधी म्हणजे साक्षात सैतानाचे दूत. वाट्टेल तितके आणि वाट्टेल तसे वेठबिगार राबवीत. पंचक्रोशीतले भावकीचे तंटे हवे तसे तोडत. सोम्याची जमीन गोम्याला बहाल करत. दोघांकडूनही खंडणी लुटत. मनात येईल त्या रयेतेला चावडीसमोर बांधून मारत. कैवल्येश्वराचं मंदीर त्यांनीच फोडलं. तिथं कैद्यांकडून मशिद बांधून घेतली. खेडोपाड्यातील अन्न ओहटलं असलं, तरी अंमलदारांची कोठारं भरलेली होती. इथं लेकरंबाळं अन्नाविना तडफडत होती, तिथं माजलेले घोडे तोबऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नव्हते.

कुणाघरची देखणी तरणीताठी सून गर्भधानाच्याच रात्री पळवून नेली जात असे. कुणाच्या गोठ्यातले बैल कसायाच्या सुरीखालून जाऊन मियाँबीबीच्या पोटात पोहचत. कुणाच्या उत्तम फळबागा लुटून झाडांचा सत्यानाश होत. कुठं कुणी जरासा प्रतिकार करायचं मनीं आणताच पेटत्या मशालींनी ते गाव फुंकून टाकले जात असे. कारण अगदी साधं होतं. उत्तरेतून दिल्लीच्या पातशहाच्या सैन्यांची चाहूल मावळातील निजामशाही सैन्याला लागली होती. आपली सद्दी आहे तोवर हाती लागेल ते भोगून घ्या, उद्याचं कुणी पाहिलं आहे! पळवा लुटा, जबरदस्तीनं हिरावून घ्या, बळजबरी करा, मिळालं नाही तर पेटवून द्या असा सरळ हिशेब निजामशाही सैन्याचा होता.

गोनीदांच्याच ‘हर हर महादेव’ या कादंबरीतही शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या महाराष्ट्राचं वर्णन आढळतं. ‘बया दार उघड’मध्ये देखील हाच काळ आहे. त्यामुळे पुस्तकांतर करुन ‘हर हर महादेव’ या कादंबरीत गोनीदा काय लिहितात हे देखील वाचले पाहिजे. ‘भीमा, भामा, मुळा, मुठा, कुकडी, कृष्णा, कोयना, प्रवरा अवघ्या नद्यांचे डोह प्रेतांनी दाटले आहेत!. महाराष्ट्रमंडळी हिंडावं, तर रानांवनातून जागोजाग प्रेतं पडलेली आढळतात. कुत्रीं अन् गिधाडं आतडी बाहेर ओढीत, विस्कटीत असलेली दिसतात! गावंढ्याशेजारी तर एकही बरं झाड असं उरलं नाहीं, कीं ज्यावर कुण्या बापड्यानं फास लावून घेतला नाही.

                पदार्थमात्र तितुका गेला
                 नुस्ता देशचि उरला

होय, महाराष्ट्राची अवस्था ही फक्त नुस्ता देशचि उरला अशी झाली होती. मात्र तरीही इथल्या समाजातल्या काही मंडळींच्या आशा संपलेल्या नव्हत्या. त्या करुणासागरालाही जर वनवास चुकला नाही, तर मग आम्हा येरागबाळांची काय कथा? रात्र व्हायचीच. ही रात्र काही अंथरुन-पांघरून घेऊन मुक्कामाला आलेली नाही. पूर्व दिशा उजळेल. तांबडफुटी होईल. सारे गगनमंडल स्वच्छ होईल असा विश्वास त्यांना होता. ज्या परंपरा, जो कुलाचार, जो धर्म त्यांनी परकीय राजवटीमध्ये प्राणपणे जपला होता. त्या हिंदू धर्मातलीच ही शिकवण त्यांना विपरीत परिस्थितीमध्येही घट्ट उभे राहण्यात मदत करत होती.

निजामशाही वरंवंट्याखाली नित्य भरडल्या जाणाऱ्या बिबेवाड गावात बाल मावळा होता. राणोजी त्याचे नाव. गावजवळ असलेल्या किल्ल्याचा किल्लेदार दूर गेलाय, म्हणून गावकरी गावात भागवत सप्ताह ठेवात. भागवाताच्या निमित्ताने गावात भजनं, भारुड पुन्हा एकदा गायली जातात. गावकरी मोठं भारूड म्हणू लागतात...

नमो आदिमाया भगवती! अनादिसिद्ध मूळप्रकृति! महालक्ष्मी त्रिजगतीं!
बया दार उघड !!
अलक्षपुर भवानी दार उघड बया दार उघड
माहुरलक्ष्मी बया दार उघड बया दार उघड
कोल्हापुरलक्ष्मी बया दार उघड बया दार उघड
पाताळलक्ष्मी बया दार उघड बया दार उघड
अष्टभुजालक्ष्मी बया दार उघड बया दार उघड
चार पुरुषार्थ गोंधळी ! सनकादिक तेथें संबळी ! तेहेतीस कोटी भुतावळी
दिवट्या पाजळोनी तिष्टति !
म्हैषासुर दैत्य मातला प्रबळ ! अबबब पीडा केली अंबे!
दार लावुनी काय बसलीस बया !
बया दार उघड, अग बया दार उघड !

राणोजी अगदी गोंधळून जातो. हे सगळे कुणाला दार उघडायला सांगताहेत, हे त्याला समजत नाही. तो घरी आईकडे परततो. आई त्याला त्यांच्या कुटुंबाच्या झालेल्या फरफटीची कथा ऐकवते. ‘जानतंसवरतं हो, पाचपन्नास साथीदार जमव, छापा घाल आणि मानाची देशमुखी परत मिळव’ असं राणोजीची आई त्याला सांगते.

बाल राणोजीला आईने दाखवलेलं स्वप्न एक रात्र देखील पाहण्याची संधी मिळत नाही. त्याच रात्री गावावर निजामशाही किल्लेदाराचा छापा पडतो. राणोजीच्या आईसह गावातले अनेक जण बंदी होतात. त्यानंतर राणोजीची लहान म्हणून सुटका होते. त्याची आई मात्र अब्रूचे रक्षण करताना मृत्यूला कवटाळते.

आईविना एकटा राणोजी एका मराठा सरदाराच्या सैन्यात दाखल होतो. काही वर्षांनी एका युद्धात शत्रूंशी लढताना तो जखमी होतो. आपल्या तुकडीशी त्याचा संपर्क सुटतो. आयुष्यात अनेक उलाथापलथी झालेल्या असतात, पण ‘बया दार उघड’ ही आरोळी त्याला आजही साद घालत असते. दार कधी उघडणार ही अस्वस्थता त्याला सतावत असते. त्याच अस्वस्थतेतून तो शहाजी राजांचा मुक्काम असलेल्या संगमनेर जायला निघतो.

संगमनेर मुक्कामी एका महिलेची अब्रू वाचवताना राणोजी जखमी होतो. पण त्याच्या या लढवय्या वृत्तीने राणी जिजाऊ प्रभावित होतात. जखमी राणोजीची देखभाल स्वत: करण्याचा निर्णय घेतात. कर्मधर्म संयोगामुळे शहाजी राजे राणोजीची नेमणूक राणी जिजाऊंच्या संरक्षक सैन्यात करतात. राणोजी जिजाऊंसोबत संमनेरहून शिवनेरीला रवाना होतात.

राणी जिजाऊ देखील अस्वस्थ असतात. निजामशाहीशी एकनिष्ठ अशा माहेरच्या मंडळींची दौलताबादच्या किल्ल्यात भर दिवसा झालेली हत्या. पुण्याच्या पुण्यभूमीवर आदिलशाही फौजेने फिरवलेला गाढवाचा नांगर. रयतेची केलेली ससेहोलपट. घरादाराच्या केलेल्या होळ्या. यामुळे जिजाऊंचे देवीकडे एकच मागणे असते,

धरित्रीमण्डळास झालेला भार दूर करील, असा पूत्र दे!
दैत्यकुळांचा संहार करील असा –
त्यांच्या छात्यांवर आपल्या हातींच्या खड्गाचे वार करील असा पुत्र दे !

शिवजन्म होतो. गुरव गाभाऱ्याचं दार उघडतात. राणोजीला आत असलेल्या मुर्तीकडे पाहून जाणवतं, देवीच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव मावळलाय. जणू ती आता प्रसन्न झालीय. कृपाळूपणे लेकरांकडे पाहतेय.

शेवटी बयानं दार उघडलं आहे!    

Sunday, December 15, 2019

धार्मिक भेदभावाचा बुरखा फाटला



तो महिना होता जानेवारी. वर्ष होते 1979 पश्चिम बंगालमधल्या मरीचछापी बेटावर बांगलादेशातून जीव वाचवून आलेले 40 हजार हिंदू राहत होते. बांगलादेशमध्ये छळ सहन केलेल्या लाखो हिंदूमधील तो छोटा हिस्सा होता. या हिंदूमध्ये बहुतेक जण जातीच्या भाषेत सांगायचे तर दलित होते. याच विस्थापितांना खोटी आशा दाखवत बंगालमध्ये डावे सरकार सत्तेवर आले होते. मात्र सत्तेवर येताच डाव्या सरकारने खरे रंग दाखवायला सुरूवात केली.

बंगालमध्ये हिंदू विस्थापित येण्यास निर्बंध घातले. मरीचछापी बेटाची नाकेबंदी केली. काही रानटी कायद्याच्या आधारे त्यांना तिथून हुसकावण्याचे उद्योग सुरु केले. अन्नपदार्थ, औषधे यासंह सर्व जीवनावश्यक वस्तूंपासून त्यांना तोडले. 31 जानेवारी 1979 या दिवशी डाव्या सरकारने या विस्थापितांवर पोलीस फायरिंग करत त्यांचा नरसंहार केला.

या भीषण नरसंहारानंतरही जवळपास 30 हजार हिंदू विस्थापित या बेटांवर जीव मुठीत धरुन राहत होते. त्यामुळे त्यांना हुसकावून लावण्यासाठी डाव्या सरकारने मे महिन्यात पुन्हा एकदा मोठा पोलीस फाटा तिथे पाठवला. यावेळी पोलिसांसोबत डाव्या पक्षाचे पाळीव गुंड देखील होते. तब्बल तीन दिवस त्या बेटांवर रक्ताचे तांडव चालले. त्यानंतरही जे हिंदू वाचले त्यांना बळजबरीने ट्रकमध्ये कोंबून दुधीकुंडी कँपमध्ये पाठवण्यात आले. मरीचछापी बेट हिंदू विस्थापितांपासून मुक्त करण्यात आलं. आपल्या देशात चाळीस वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आजही अनेकांना माहिती नाही. दीप हलदर यांच्या ‘ब्लड आयलँड’ या पुस्तकात याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. धर्माच्या आधारावर फाळणी होऊनही जे हिंदू गेली 70 वर्ष दुहेरी मार सहन करत आहेत अशा हिंदूंसाठी नागरिकत्व दुरूस्ती कायदा हे एक वरदान आहे.

फाळणीच्या वेळी झालेला हिंसाचार, कोट्यावधी नागरिकांच्या आयुष्याची अक्षरश: झालेली होळी विसरणे ही आधुनिक भारताची सर्वात मोठी शोकांतिका आहे. नागरिकत्व विधेयक दुरुस्तीच्या वेळी संसदेत जी खडाजंगी झाली त्या निमित्ताने हा इतिहास पुन्हा एकदा आठवण्याची गरज आहे. अन्यथा...’ डायरेक्ट अँक्शन भाग दोन’ आपल्या देशाला पाहयला मिळू शकतो. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार गेली काही दिवस सुरु होता, त्या हिंसाचाराचे जे व्हिडिओ समोर आले आहेत या व्हिडिओमधून डायरेक्ट अँक्शनचे ट्रेलर फाळणीचा इतिहास विसरलेल्या देशाने पाहिले असेल.

फाळणीच्या वेळी हिंदू मुस्लिम आणि ब्रिटीश अशा तिन्ही पक्षांचा समज होता की काँग्रेस पक्ष हा हिंदूंच्या बाजूने वाटाघाटी करतोय. पण गांधी – नेहरुंना तसे वाटलेच नाही. कर्तारपूर साहिब सारखे शिखांचे पवित्र तिर्थस्थळ फाळणीच्या रेषेच्या काही किलोमीटर पलिकडे होते. पण ते भारतामध्ये यावे यासाठी काँग्रेसने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. हे काँग्रेसच्या उदासीन धोरणाचे मुख्य धोरण आहे. मुस्लिम लीगच्या धमक्यांना घाबरुन किंवा सत्ता उपोभोगण्याची घाई झालेल्या काँग्रेसच्या तत्कालिन नेत्यांनी फाळणीचा मसुदा घाई – घाईने मान्य केला. देशाच्या पश्चिम आणि पूर्व भागात जे मुस्लिम राष्ट्र आपण तयार करतोय तिथे कोट्यावधी हिंदू बांधव राहत आहेत. जे हिंदू बांधव गांधी – नेहरुंना देव मानत होते. डायरेक्ट अँक्शनचा चटका सहन करुनही हे देव या आगीतून आपली सुटका करतील. आपल्या आया-बहिणींची अब्रू वाचवतील अशी आशा त्यांना होती. पण सत्तर वर्षांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी अडचणीत सापडलेल्या हिंदू बांधवांची पर्वा केली नाही. मुस्लिम लीगची हातमिळवणी करत फाळणीच्या मसुद्याला मान्यता दिली. आज सत्तर वर्षानंतरही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला कोर्टात आव्हान देण्यासाठी मुस्लिम लीगने दंड थोपाटले आहे. त्यांचे वकिलपत्र काँग्रेसच्या नेत्यांनी घेतले आहे. काँग्रेसचा ‘हात’ सत्तर वर्षांपूर्वीही मुस्लिम लिगसोबत होता. सत्तर वर्षानंतर त्यांनी सत्तेसाठी शिवसेनासारखे पक्ष जवळ केले असले तरी आजही काँग्रेसचा हात हा मुस्लिम लिगच्या हातामध्ये घट्ट आहे, हेच यातून सिद्ध होतंय.

‘’I am now convinced that Hindus and Muslims could never become one nation as their religion and way of life is quite distinct from each other’’ हे वाक्य देशाच्या फाळणीसाठी ज्यांचा ‘हिंदुत्व’ हा प्रबंध जबाबदार आहे असं सतत बिंबवलं जातं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाही. तर अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांचे आहे. त्यांनी 1876 साली म्हणजे स्वा. सावरकर यांच्या जन्मापूर्वीच अशा स्पष्ट शब्दात पाकिस्तान निर्मितीचे बीज रोवले होते. सर सय्यद यांनीच भारतीय मुस्लिमांमध्ये ‘अलिगढ मुव्हमेंट’ सुरु केली. सुधारणावादाचा चेहरा असलेल्या या चळवळीतूनच पुढे 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. या लीगच्या स्थापनेनंतर तीन वर्षांनीच म्हणजे 1909 साली मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याच्या अन्वये मुस्लिमांना मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतरची खिलाफत चळवळ, गांधींच्या काळात वाढलेला मुस्लिम अनुनय, जिनांनी मुस्लिम लीगला दिलेली नवसंजीवनी यामधूनच पाकिस्तानची निर्मिती झाली.

देशाची फाळणी आणि त्यामधील मुस्लिमांची भूमिका याबद्दल नेमक्या शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता. श्री उदय माहूरकर यांनी 3 मे 2016 या दिवशी daily O या संकेतस्थळावर लिहलेल्या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि ‘Pakistan or Partition of India’ आणि ‘Thoughts on Pakistan' या दोन पुस्तकांमधील आंबेडकरांचे विचार मांडले आहेत. मुळ इंग्रजीतले हे विचार भाषांतर करुन नेमक्या शब्दात कदाचित पोहचणार नाहीत, म्हणून मी देखील डॉ.आंबेडकरांचे विचार इंग्रजीतच या लेखात ठेवत आहे.

‘Pakistan or Partition of India’ या पुस्तकात डॉ. आंबेडकर लिहितात - “The methods adopted by the Muslim invaders have left behind them their aftermath. One aftermath is the bitterness between the Hindus and the Muslims which they have caused. This bitterness between the two is so deep-seated that a century of political life has neither succeeded in assuaging it, nor in making people forget it. As the invasions were accompanied with destruction of temples and forced conversions, with spoliation of property, with slaughter, enslavement and abasement of men, women and children, what wonder if the memory of these invasions has ever remained green, as a source of pride to the Muslims and as a source of shame to the Hindus? But these things apart, this north-west corner of India has been a theatre in which a stern drama has been played. Muslim hordes, in wave after wave, have surged down into this area and from thence scattered themselves in spray over the rest of India. These reached the rest of India in thin currents. In time, they also receded from their farthest limits; while they lasted, they left a deep deposit of Islamic culture over the original Aryan culture in this north-west corner of India which has given it a totally different colour, both in religious and political outlook. The Muslim invaders, no doubt, came to India singing a hymn of hate against the Hindus”.

डॉ. आंबेडकर इथेच थांबत नाहीत तर ‘Thoughts on Pakistan' या पुस्तकातही त्यांनी याबाबत चिंतन केले आहे. ते या पुस्तकात लिहितात -  "The Islamic injunction to Muslims not to take the side of non-Muslims in any strife is the basis of pan-Islamism. It is this which leads Muslims in India to say that he is Muslim first and an Indian afterwards. It is this sentiment that explains why the Indian Muslim has taken so small a part in the advancement of India but has exhausted himself by taking up the cause of Muslim countries. And why Muslim countries occupy the first place and India the second place in their minds. Savarkar’s principle of one man one vote would mean a democratic, Hindu majority state. It would not be a Muslim state and hence Islam prohibits the Muslims from living in it. Islam can never allow a true Muslim to adopt India as his motherland. That is probably the reason why Maulana Mohammed Ali (once the president of Congress and Khilafat movement leader in 1920s), a great Indian but a true Muslim, preferred to be buried in Jeruslem rather than India.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालिन किंवा विद्यमान सरसंघचालकांच्या भूमिकेपेक्षाही कठोर शब्दात  फाळणी आणि हिंदू – मुस्लिम प्रश्नाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चिरफाड केली आहे.

1947 साली देशाची फाळणी झाली. त्यानंतर 1971 साली पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. अफगाणिस्तानसह पाकिस्तान आणि बांगलादेश (ABP) या राज्यघटनेच्या माध्यमातून इस्लाम धर्म स्विकारला. या देशांमधील धर्मांध व्यक्तींचा नंगा नाच आणि भारतीय कायद्यांमधील अडचणी अशा दुहेरी संकटात केवळ हिंदूच नाही तर जैन, बौद्ध, पारसी, शीख आणि ख्रिश्चन देखील सापडले होते. अशा सर्व पीडित नागरिकांची प्रतिक्षा नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावर संसदेने शिक्कमोर्तब केल्याने पूर्ण झाली आहे.

या दुरुस्ती कायद्यातून मुस्लिमांना वगळण्यात आले आहे, त्यामुळे ‘समानता’ या तत्वाला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप नेहमीची मंडळी करत आहेत. जे एकसारख्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्याशी व्यवहार करताना समानतेचे तत्व पाळा असे कायदा सांगतो. जर सिंह आणि उंदरासाठी वेगळे कायदे असतील तर त्या दोघांशी वागताना भेदभाव झाला असे कायदा सांगत नाही.

भारताच्या शेजारच्या ABP इस्लामिक देशांमध्ये जगणं तेथील अल्पसंख्यांक नागरिकांना असह्य झाले आहे, त्यामुळे त्यांना भारतामध्ये स्थालंतर करण्याची कायद्याने परवानगी देणे हा या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्याचा आधारच जर शेजारील देशांमधील अल्पसंख्याक नागरिकांचे संरक्षण करणे हा आहे, तर त्यामधून त्या देशाच्या राज्यघटनेचा धर्म असणाऱ्या नागरिकांना वगळणे हे स्वाभाविक आहे. या कायद्याचा आधार धार्मिक आहे. याच आधारावर देशाची फाळणी झाली होती. आर्थिक आधारावर हा कायदा केलेला नाही. एखाद्या व्यक्तीला राजकीय दडपशाहीला कंटाळून भारताचे नागरिकत्व स्विकारयचे असेल तर त्यांना अन्य पर्याय आहेत.

 ABP देशांमध्ये शिया आणि सुन्नींमध्ये संघर्ष आहे. अहमदीया, शिया आणि सुन्नी यांचा परस्पर संघर्ष आहे. पण या कायद्याचा उद्देश हा धर्माच्या अंतर्गत वादाची सोडवणूक करणे हा नाही. तर धार्मिक भेदभाव सहन करणाऱ्या नागरिकांची सुटका करणे हा आहे. ABP देशांमधल्या प्रत्येक नागरिकांची छाननी करुन ते त्रास सहन करत असतील तर त्यांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा करणे हे भारताचे काम नाही. हे त्या देशाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदयाचेही उल्लंघन होईल.

श्रीलंकेतील तामिळ नागरिकांचाही या कायद्यांतर्गत समावेश करावा अशीही मागणी काही जणांनी केली. श्रीलंकेतील तामिळांची अवस्था ही ABP देशांमधील अल्पसंख्याक नागरिकांसारखी नाही. 1980 च्या दशकात किंवा 90 च्या दशकाच्या सुरुवातीला तामिळ नागरिक भारतामध्ये आले. पण ते बेघर नव्हते. त्यांची श्रीलंकेत जमीन तसेच संपत्ती होती. श्रीलंकेतली परिस्थिती सामान्य झाल्यावर यामधील बहुसंख्य नागरिक परत गेले. काही जण येत्या काळात जातील असा स्थानिकांचा अंदाज आहे. काही थोड्या नागरिकांनी भारताकडे नागरिकत्व मागितले. त्यांना कायद्यातील सामान्य तरतूदींच्या आधारे देशात सामावून घेता येईल. तामिळ नागरिकांना न विचारता किंवा त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास न करता त्यांच्यावर भारताचे नागरिकत्व थोपवणे हे चूक आहे. त्यांना नागरिकत्वच्या विशेष कायद्यांतर्गत आणून सिंहली कट्टरता किंवा LTTE चा प्रोपगंडा यांना भारताने बळी पडता कामा नये.

नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिकत्व पडताळणी या दोन्ही गोष्टी या राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी या दोन्ही परस्परविरोधी आघाड्यांना हव्या आहेत. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात सुरु झालेल्या या गोष्टीच आता मोदी सरकार खंबीरपणे पुढे नेत आहे. पण काँग्रेस आणि मित्र पक्षांची याबाबतची कार्यपद्धती वेगळी आहे.

बांगलादेशातून भारतात घुसलेल्या सर्व मुस्लिम घुसखोरांना देशात स्थायिक होण्यास त्यांची मुळं इथे घट्ट करण्यात काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मदत केली. त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रं या इको सिस्टमने पुरवली. आसमी नागरिकांना आपल्या राज्यातून सर्व बाहेरच्यांना बाहेर काढायचे आहे. त्यामुळे नागरिकत्व पडताळणी (NRC) ला आसामी नागरिकांनी पाठिंबा दिला. तीन कोटींपेक्षा जास्त आसामी नागरिक या पडताळणी प्रक्रियेत सहभागी झाले. पण NRC मध्ये मुस्लिम घुसखोरांची नाही तर इको सिस्टमचा आधार नसलेल्या लाखो हिंदूंची नावं वगळण्यात आली. आता नागरिकत्व दुरुस्तीमुळे आसाममधील हिंदू स्थालंतरितांना मदत होणार आहे. त्याचबरोबर NRC ची प्रक्रियाही नव्याने राबवण्यात येणार असल्याने याचा थेट फटका बांगलादेशी नागरिकांना बसेल.

त्याचबरोबर या कायद्यामुळे भारतीय नागरिक होणाऱ्या ABP देशांमधील अल्पसंख्याक नागरिकांचा ताण हा आसाम किंवा पूर्वांचलातील कोणत्याही राज्यांवर पडणार नाही, याची खबरदारी घेणे हे केंद्र सरकारचे काम आहे. या नागरिकांची देशाच्या वेगवेगळ्या भागात पाठवणी करण्याची गरज आहे. आसाम आंदोलनाच्या शेवटी 1986 साली तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी आणि आसू यांच्यात आसाम करार झाला. या करारातील 6 व्या कलामामध्ये असमिया भाषा, साहित्य, संस्कृती, सामाजिक आणि राजकीय अधिकार याचे संरक्षण व्हावे असा उल्लेख आहे. त्याचे आजवर पालन झालेले नाही. त्यामुळे मोदी सरकारने यासाठी एक समिती स्थापन करून तिला जानेवारी 2020 पर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर आसाम करार 6 वे कलम लागू होण्यासाठी अधिक वेगाने हलचाली होतील.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा फायदा हा ABP देशांमधील दलित, आदिवासी, भटके, अतिमागास नागरिकांना होणार आहे. असे नागरिक जे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील जमीनदार वर्गाने त्यांच्या चाकरीसाठी फाळणीनंतर आपल्याजवळ ठेवून घेतले होते. बळजबरीने धर्मांतरण, घरातील महिलांचे अपहरण, देवतांची विटंबना, नोकरी तसेच सामजिक क्षेत्रातील सततचा भेदभाव, रोजच्या जगण्यातील असुरक्षितता याला कंटाळून ही मंडळी आपला जीव मुठीत धरुन भारतामध्ये आली. 

या नागरिकांना यापूर्वीच्या काँग्रेसी सरकारने कधीही आपलं केलं नाही. डॉ. मनमोहन सिंग सारख्या ज्येष्ठ व्यक्तीने यापूर्वी विरोधी पक्षात असताना संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. डॉ. मनमोहन सिंग पुढे 10 वर्ष भारताचे पंतप्रधान होते. काँग्रेसच्या हायकमांडने त्यांना हा प्रश्न सोडवू दिला नाही. हक्काची मतपेढी जाण्याची भीती काँग्रेस आणि त्यांच्या परंपरेतल्या पक्षांना गेल्या 70 वर्षांपासून सतावत आहे. त्यामुळेच त्यांनी ही दुरुस्ती बाजूला ठेवली होती. त्यांचा भेदभावाचा बुरखा संपूर्ण देशासमोर फाडण्याचे काम नागरिकत्व दुरूस्ती कायद्याने केले आहे. या कायद्याचे सर्वांनी स्वागत करायला हवे.

Saturday, January 19, 2019

पांड्या-राहुल आणि बीसीसीआयचे #80YearsChallenge



'लाला अमरनाथ यांना 1936 साली इंग्लंडच्या दौऱ्यातून परत पाठवण्यात आले होते. आता ही असेच व्हायला हवे'  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कारभार चालवण्यासाठी ज्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने केली आहे त्या डायना एल्डुजी यांचे हे विचार आहेत.  'कॉफी विथ करण' या  उडाणटप्पू कार्यक्रमात सहभागी झालेल्या हार्दिक पांड्या- के.एल. राहुल या दोन खेळाडूंवर कारवाई करताना  डायनाबाईंना 80 वर्षांपूर्वीचा हा इतिहास आठवला आहे. सध्या सोशल मीडियावर #10YearsChallenge हा प्रकार लोकप्रिय झालाय. आजच्या या ट्रेंडिंग पिढीला डायनाबाईंनी दिलेले हे #80YearsChallenge आहे. 

करण जोहरच्या ज्या कार्यक्रमामुळे हे दोघेही अडचणीत आले आहेत, त्या कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे हे सर्वांना माहिती आहे. या कार्यक्रमात विचारले जाणारे प्रश्न आणि त्याला मिळणारी उत्तरं याला देखील आता अनेक जण सरावली आहेत. तरीही त्या कार्यक्रमात हार्दिक आणि राहुल यांनी त्यातही विशेषत: हार्दिक पांड्याने जी काही उत्तरं दिली त्यावरून सोशल मीडियातील काही जणांना एकदमच सात्विकतेचं भरतं आलं. त्यांनी आपल्या टोळीसोबत पांड्या-राहुलचं 'ऑनलाइन लिंचिंग' सुरू केलं. 

हार्दिक पांड्याचे या कार्यक्रमातील उत्तरं ही उद्धट होती. पण या मंडळींनी त्याला एकदम तिरस्करणीय व्यक्तींच्या यादीत नेऊन ठेवले. आता करण जोहर कॉफी सोबत 'संकष्टीला तुम्ही काय खाता?' असे प्रश्न काही विचारत नाही. त्यामुळे हा कसा कार्यक्रम आहे?  यामध्ये कोणत्या भागाला जास्त प्रसिद्धी दिली जाते? त्याच्या उत्तरामुळे काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव या दोन्ही खेळाडूंनी आणि त्यांच्या पीआर टीमने ठेवायला हवी होती. अर्थात त्यांना त्याचे गांभीर्य जाणवले नाही. तसंच या दोन करारबद्ध खेळाडूंना अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बीसीसीआयच्या कोणत्या अधिकाऱ्याने परवानगी दिली याचे उत्तर अजूनपर्यंत तरी समोर आलेले नाही. 

विनोद राय आणि डायना एल्डुजी यांची सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे कारभारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या या मंडळींच्या कार्यकालाची कोणतीही कालमर्यादा निश्चित नाही. त्यामुळे ही मंडळीही अगदी निवांतपणे बीसीसीआयची सत्ता उपभोगत आहेत. एकमेकांशी ईमेल-ईमेल खेळत राहणे आणि पाठवलेला प्रत्येक ईमेल माध्यमांच्या हातामध्ये जाईल याची व्यवस्था करणे हे या मंडळींच्या कार्यकाळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यांनी या प्रकरणात केलेले ईमेलही असेच उघड झाले आहेत. या मेलमध्येही प्रत्यक्ष कोणतीही जबाबदारी न घेता ईमेल देवाण-घेवाणीचे व्रत ही मंडळी या प्रकरणातही पाळतायत.

वास्ताविक या व्हिडिओवर ऑनलाइन आकांडतांडव करणाऱ्या मंडळींपैकी एकानेही अधिकृत तक्रार केलेली नाही. तरीही बीसीसीआयचे एक कारभारी असलेले विनोद राय यांनी या खेळाडूंवर दोन मॅच बंदीची शिफारस केली. खरं तर अशी शिफारस करण्यापूर्वी आणि हार्दिक पांड्याचा माफीनामा फेटाळताना विनोद राय यांनी स्वत: तो व्हिडिओ एकदा पाहणे किमान अपेक्षित आहे. पण आपण तो व्हिडिओ पाहिलेला नाही. याबाबत आपण फक्त माध्यमामध्ये आलेल्या बातम्या वाचल्या आहेत असे राय यांनी यामधील एका ईमेलमध्ये मान्य केले आहे.

प्रत्यक्ष व्हिडिओ न पाहता फक्त बातम्या वाचून या खेळाडूंवर दोन मॅच बंदी घालावी हा विनोद राय यांचा प्रस्तावच बरा होता असे वाटण्याची वेळ दुसऱ्या कारभारी डायना एल्डुजींमुळे आली आहे. त्यांना हे प्रकरण इतक्या लवकर संपवायचे नाही. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीची शिफारस केली. या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले. हे दोन्ही खेळाडू अगदी वर्ल्ड कप पूर्वीच्या वन-डे सीरिजमधून बाहेर गेले. ते टीममध्ये कधी परत येणार हे कुणालाही माहिती नाही. राय आणि एल्डुजी यांच्यातील या रस्सीखेचामुळे पांड्या-राहुल यांचे करियर मात्र चांगलेच ताणले गेले आहे.

स्वस्त डेटामुळे कायम ऑनलाइन असलेली मंडळी सोशल मीडियावर काय बडबडतात, कसली मागणी करतात किंवा कुणाला 'ट्रोल' करतात याला काहीही मर्यादा नाही. ही मंडळी सतत कशावर तरी चिडलेली असतात, त्यांना आपला राग शमवण्यासाठी दररोज काहीतरी टार्गेट हवं असतं. अशा या ऑनलाइन झुंडीच्या मागणीला किती महत्त्व द्यायचे हे उमजायला हवे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही मागील वर्षी अशीच चूक केली होती.

बॉल टेम्परिंग प्रकरणात आयसीसीच्या नियमानुसार स्टिव्ह स्मिथवर एक टेस्टची बंदी आणि बॅनक्राफ्टवर काही डिमेरीट पॉइंट आणि मानधनामध्ये कपात इतकीच कारवाई होणे योग्य होते. मात्र त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अशाच झुंडीच्या मागणीला बळी पडले. त्यांनी स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एक वर्षांची आणि बॅवक्राफ्टवर नऊ महिन्याची बंदी घातली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम गेली वर्षभर या प्रकरणाची झळ सहन करतंय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हाच चुकीचा पॅटर्न आता बीसीसीआयने पुढे नेला आहे. या बोर्डाचा कारभार पाहून आपण ऑस्ट्रेलिया किंवा भारतामध्ये जन्मलो नाही हे बरे झाले असेच बेन स्टोक्सला वाटले असेल. स्टोक्सचं सोडा विराट कोहलीचे मैदानावरचे बोलणे कसे असते हे सर्वांनाच माहिती आहे. आता उद्या विराटच्या बोलण्यावरून भावना दुखावतात अशी आरडाओरड - रडारड सुरू झाली तर विराटलाही पांड्या - राहुलप्रमाणे #80YearsChallenge मंडळी अनिश्चित काळासाठी निलंबित करणार का? हा मला पडलेला प्रश्न आहे.  

के.एल. राहुलचा फॉर्म सध्या खराब आहे. त्याने आपला खेळ सुधारण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळायला हवे होते. याच आठवड्यात बंगळुरूत कर्नाटक-राजस्थान यांच्यात रणजी स्पर्धेतला उपांत्यपूर्व सामना झाला. राहुलला हा सामना या बंदीमुळे खेळता आला नाही. 

हार्दिक तर या प्रकरणामुळे 'घरकोंबडा' झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मुंबईतील एका जिमखान्याने हार्दिकचे सदस्यत्व रद्द केले.  देशांतर एकीकडे मॅच फिक्सर खासदार होतो. त्याला देशातील प्रतिष्ठित मैदानावर सन्मानाने ओपनिंग बेल वाजवण्यासाठी बोलवले जाते. आणि दुसरिकडे हे असले 'ढोंगी' निर्णय घेतले जातात. 'मंकी गेट' प्रकरण 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने ज्या पद्धतीने हाताळले त्याचा फटका सायमंड्सच्या करियरवर झाला. क्रिकेट बोर्ड आपल्या पाठिशी ठामपणे उभे राहिले नाही या निराशेतून तो बाहेर आलाच नाही. यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. या प्रकरणानंतर सायमंड्सचा खेळ पुन्हा कधीच बहरला नाही. बीसीसीआयही हार्दिक पांड्याचा सायमंड्स करू पाहतंय. 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन वेगाने धावा जमवणे आणि पाचव्या गोलंदाजाचा प्रश्न सोडवण्यात मदत करणे ही दोन्ही कामे तो उत्तम प्रकारे करू शकतो. मात्र पांड्या सध्या अनिश्चित काळासाठी टीमच्या बाहेर गेलाय. पांड्या बाहेर असल्याने कुलदीप यादव- यजुवेंद्र चहल ही फिरकी जोडी एका सामन्यात खेळवण्याचा प्रयोग भारतीय संघ व्यवस्थापन करू शकत नाही. वन-डे क्रमवारीत पहिल्या सहामध्ये असणा-या या दोघांपैकी एकाला बीसीसीआयच्या या चौकशी धोरणामुळे वर्ल्ड कपमध्ये टीमच्या बाहेर बसावं लागणार आहे. वन-डेमध्ये रवींद्र जाडेजा हा सातव्या क्रमांकावरचा फलंदाज नाही हे यापूर्वीही सिद्ध झालंय. विजय शंकर अगदीच नवा आहे. महेंद्र सिंह धोनी आणि अंबाती रायडू  वेगाने धावा करू शकत नाहीत. त्यात पांड्याही टीममध्ये नाही. त्यामुळे मधल्या फळीचा भार हा दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांच्यावरच पडणार आहे. (यातही कार्तिक – केदार हे दोघे एकत्र खेळण्याची शक्यता कमी आहे.)

आयसीसी स्पर्धेतल्या पिचचा पॅटर्न पाहता या वर्ल्ड कपमध्येही बहुतेक सामन्यात 300 धावा होणार अशा परिस्थितीमध्ये अस्थिर मधली फळी आणि गोलंदाजांच्या वापरावर येणाऱ्या मर्यादा या भारतीय टीमसाठी मारक ठरू शकतात.

करण जोहरच्या कार्यक्रमात हार्दिक पांड्या  जे बोलला ते योग्य नसेल पण बीसीसीआयचे हे हंगामी प्रशासकांनी हे प्रकरण हाताळताना घोडचूक केलीय. याचा फटका आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला बसू शकतो. त्याचबरोबर नव्या पिढीतील नव्या दमाचे प्रश्न सोडवताना प्रशासक हे अशा प्रकारचं #80YearsChallenge देणार असतील तर त्यांचा कारभार किती दिवस सुरू ठेवायचा याचे उत्तरही आता शोधण्याची वेळ आलीय. 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...