Showing posts with label SAUDI ARABIA. Show all posts
Showing posts with label SAUDI ARABIA. Show all posts

Thursday, August 11, 2016

काश्मिरी जिहाद


बुरहान वानी या हिजबुल कमांडरला ठार मारल्यानंतर सुरु झालेल्या हिंसाचारानंतर काश्मीर प्रश्न पुन्हा एकदा देशाच्या केंद्रस्थानी आलाय. काश्मीरमधल्या पाकिस्तानी प्रवृत्तीचं प्रतिक असलेल्या बुरहानला 8 जुलै रोजी सुरक्षा रक्षकांनी ठार मारलं. तो अभ्यासात हुशार होता. शाळेतल्या हेडमास्तरांचा मुलगा होता. सोशल मीडिया कसं वापरायचं याची त्याला उत्तम समज होती. असं सारं काही गेल्या महिनाभरात भरपूर छापून आलंय. देशातल्या आदर्श लिबरल व्यक्तींनी तर त्याची तुलना भगतसिंहांशी करत त्याच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये भडकवण्यात आलेली आग सतत तापत कशी राहील याची काळजी घेतलीय.

  बुरहान जर खरोखरच इतका असमान्य आणि बुद्धीमान होता, तर तो काश्मीरमधल्या अन्य हुशार व्यक्तींप्रमाणे  आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झाला असता. अथवा भारतामधल्या एखाद्या चांगल्या कॉलेजात शिकून त्याला आवडणाऱ्या विषयात त्यानं प्रावीण्य मिळवलं असतं.  पण तो जिहादी मौलवींच्या नादी लागला. ज्या व्यक्तींमुळे तसच व्यवस्थेमुळे इस्लामची जगभर बदनामी होतीय त्या व्यवस्थेचा तो पोस्टर बॉय होता.

चोरट्या मार्गानं या देशाची बॉर्डर पार करुन पाकिस्तानात शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण घ्यायचं आणि काही हजार रुपयांसाठी काश्मीरसह देशभरातल्या निरपराध व्यक्तींची हत्या करायची हा दहशतवादी उद्योग गेल्या तीन दशकांपासून जम्मू काश्मीरमध्ये सुरु आहे. हा कारखाना चालवणाऱ्या हिजबुलच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या जिहादी शिष्यांनी  कधी तरी काश्मीरमधल्या गरिबांना मदत केलीय ?  ज्या आईचा तरुण  मुलगा या हिंसाचारात मारला गेलाय त्या आईचे डोळे पुसलेत ?   काश्मीरमधील भूकंप किंवा महापूर यामध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत केलीय ? काश्मीरमधले रस्ते, रेल्वेमार्ग याच्या उभारणीत मदत केलीय ?  काश्मीरमध्ये एखादा उद्योग उभा करुन हजारो काश्मीरी तरुणांना रोजगार निर्माण करुन दिलाय ?  जी काश्मीरियत जपण्याची गोष्ट ही मंडळी सतत करत असतात त्या काश्मीरीयतला अभिमान वाटेल यापैकी एक तरी गोष्ट या मंडळींनी मागच्या तीन दशकांमध्ये केली आहे का ? हे बाकी सोडा...या हिजबूल किंवा जेकेएलएफच्या वरिष्ठ नेत्यांची मुलं कधी सामान्य काश्मीरी मुलांप्रमणे दगडं घेऊन रस्त्यावर उतरली आहेत का ? भारतीय लष्कराच्या विरोधात जो जिहाद या पाकिस्तानी मंडळींनी उभारलाय त्यामध्ये या नेत्यांची मुलं का उतरत नाहीत ? भारतीय लष्कराच्या पुढे सामान्य काश्मीरी मुलं लढणार आणि या नेत्यांची मुलं विदेशात मौजमजा करणार हीच या मंडळींची  'इन्सानियत' आहे का ?

  बुरहान  मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये संचारबंदी लागू आहे. तिथं लष्कर दमनशाही करतंय. अन्यायी लष्कर आणि हिटरलरी केंद्र सरकारमुळे या देशाच्या मुळ गाभ्याला धक्का बसलाय. भारतीय असण्याच्या समजुतीला यामुळे छेद गेलाय असा प्रचारही गेला महिनाभरापासून सतत केला जातोय. भारतीय असणं म्हणजे काय ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी आपलं माझ्या अल्पबुद्धीला ताण देत काही गृहितकं मांडण्याचा प्रयत्न करतोय.

  चांगल्या भारतीयाला त्याच्या शेजाऱ्याबद्दल आदर असतो. त्यांच्या विश्वासाला तो जागतो. त्यांच्या अडीअडचणीला तो धावून जातो. तुमचा शेजारी एका दिशेनं वाकून प्रार्थना करत नाही म्हणून भारतीय व्यक्ती कधीही त्याला घराबाहेर हाकलत नाही. अशी चार लाख काश्मिरी पंडित विस्थापित होत असताना तो गप्प बसू शकत नाही. आपल्याच देशात आपले हे देशबांधव विस्थापीताचं आयुष्य जगतायत हे  त्याला सतत अस्वस्थ करतं.  भारतीय व्यक्ती आम्ही बहुसंख्य आहोत म्हणून कधीही देशाच्या साधनसंपत्तीमध्ये झुकतं माप आपल्याला मिळावं याची अपेक्षा करत नाही. चांगल्या भारतीय व्यक्तीची निवडणूक व्यवस्था आणि लोकशाही पद्धतीवर श्रद्धा असते. तो लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारचा आदर करतो. त्या सरकारची धोरणं त्याला आवडत नसली तरी तो पाच वर्ष शांतपणे वाट पाहतो. चांगला भारतीय कधीही आपले मत मांडण्यासाठी दगडं घेऊन रस्त्यावर उतरत नाही. तो कधीही देशाच्या सुरक्षा रक्षकांवर गोळ्या मारण्याचा विचार करु शकत नाही. राज्यघटनेनं जी चौकट आखून दिलीय त्याच चौकटीतून चांगला भारतीय व्यक्ती आपली नाराजी प्रकट करतो.

 देशाच्या फाळणीनंतर सिंध प्रांतामधले थर, अमरकोट, बाडी आणि मिरपूर खास हे चार हिंदूबहुल जिल्हे पाकिस्तानमध्ये गेली. खुल्ना आणि चितगाव हिल्स ही बंगालमधली दोन हिंदू बहुल जिल्हे पूर्व पाकिस्तानचा भाग बनली. मानवी इतिहासतलं एक मोठं स्थालांतर या काळात घ़डलं. यावेळी झालेल्या रक्तपाताचा जास्त फटका हिंदूंना बसला. त्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरला. अनेक जण मारली गेली. आया बहिणींची अब्रू लुटली गेली. ही भळभळती जखम विसरण्याचा प्रयत्न करत या भागातली हिंदू मंडळी भारतामध्ये स्थिरावली. पाकिस्तानात जी  राहिली त्यांनी त्यांच्यावर सतत अन्याय होत असूनही पाकिस्तानी मातीशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला.  पण आपल्याला काश्मीरमध्ये काय दिसतंय ? राजा हरिसिंग यांनी विलिनीकरणावर स्वाक्षरी केल्यानंतर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनलं. तरीही समानता हे राज्यघटनेतलं तत्व काश्मीरमध्ये पूर्णपणे पायदळी तुडवलं गेलंय. काश्मीर आणि भारतीयांमध्ये कलम 370 हा एक मोठा पर्वत उभा करण्यात आलाय. जो पर्वत काश्मीरचं भारतामध्ये पूर्णपणे विलीनीकरण होऊ देत नाही. कलम 370 मुळे काश्मीरमध्ये देशातल्या अन्य नागरिकांना गुंतवणूक करता येत नाही. त्यामुळे या राज्याचा आर्थिक विकास खुंटलाय. काश्मीरच्या विधानसभेत आमदारांच्या संख्येतही असमतोल आहे. ज्यामुळे आजवर केवळ काश्मीर खोऱ्यातला आणि तोही मुस्लिम व्यक्तीच काश्मीरचा मुख्यमंत्री होऊ शकला आहे.

काश्मीरमधल्या सध्याची परिस्थिती ही लष्कर किंवा गुप्तचर संस्थांनी निर्माण केलेली नाही. अयोग्य आणि संधीसाधू राजकारणी या परिस्थितीला सर्वात जास्त जबाबदार आहेत. कोणताही दहशतवाद परकीय शक्तीचा पाठिंबा मिळाल्यानंतर बलवान होतो. या दहशतवाद्यांनी भारताला टार्गेट केलंय. पण तरीही भारतामध्ये  यांचा सहानभूतीदार वर्ग मोठा आहे. हा मोठा वर्ग हीच काश्मीर समस्येचं खरं दुखणं आहे.

या विपरीत परिस्थितीमध्ये भारतीय लष्कर असामान्य शौर्य गाजवून काश्मीरचं फुटीरवृत्तीपासून आणि पाकिस्तानपासून रक्षण करतंय. त्यांना शत्रूला मारण्याचं प्रशिक्षण आहे. पण घरच्या भेदींशी लढण्यातच त्यांची मोठी शक्ती वाया जातीय. बुरहान  किंवा अन्य दहशतवाद्यांची नावं सर्रास घेतली जातात. त्यावर चर्चा होते. पण जे जवान देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात या दहशतवाद्यांशी लढताना शहीद होतात त्याची आठवण किती जणांना होते ?

 बुरहान  हा दहशतवादी उद्देश डोळ्यासमोर ठेवून जगणारा तरुण होता. हिजबुल मुजाहिद्दीन या पाकिस्ताननं निर्माण केलेल्या दहशतवादी संघटनेचा तो कमांडर होता. केवळ श्रीनगर किंवा काश्मीरवर नाही तर लाल किल्यावर इस्लामचा झेंडा फडकवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पवित्र युद्ध म्हणजे जिहाद करण्याची त्याची तयारी पक्की होती. बुरहानच्या या उद्देशांकडे डोळेझाक करुन त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा मृत्यू हा मानवी हक्काचा मु्द्दा आहे असा गळा काढणं या देशात किती दिवस सुरु राहणार आहे ? अशी गळेकाढू मंडळीच या दहशतवाद्यांचे खरे प्राणवायू आहेत.

 दहशतवादाबरोबरच इस्लामचा प्रसार हा आता पाकिस्तानचा काश्मीरमधला अजेंडा आहे. सौदी अरेबियाच्या मदतीनं सलाफी मदरशांची संख्या काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वाढवली जातेय. या मदरशातून इस्लामसाठी लढणारे रोबो पाकिस्तान तयार करणार आहे. काश्मीरमध्ये नित्य नियमानं फडकवले जाणारे आयसिसची झेंडे, बार, सिनेमा घर, व्हिडिओ पार्लर बळजबरीनं बंद करणारी तरुण पोरं, महिलांना गाडी चालवयला बंदी, हिजाब घातल्याशिवाय बाहेर फिरायला बंदी  ही या वाढत्या काश्मिरी जिहादाची काही प्रमुख लक्षणं आहेत.


 पंथनिरपेक्षता हा भारतीय राज्यघटनेचा मुळ गाभा आहे. या मुळ गाभ्याची लिटमस टेस्ट सध्या काश्मीरमध्ये होतीय. राज्यघटनेच्या या मुळ गाभ्याचं संरक्षण करण्यासाठी या काश्मिरी जिहादाच्या राक्षसाचा नायनाट होणं आवश्यक आहे. 

Monday, January 11, 2016

सौदी- इराणचा धोकादायक खेळ


पश्चिम आशियाची नव्या वर्षाची सुरुवातच स्फोटक झालीय. गेल्या दोन वर्षांपासून या भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी धूमाकूळ घातलाय. आयसिसचा नंगानाच थांबवण्यास अजूनही जगाला यश आलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सौदी अरेबिया आणि इराण हे पश्चिम आशियातले दोन जुने वैरी एकमेकांच्या जीवावर उठलेत. या दोन्ही देशांमध्ये थेट युद्धाची शक्यता कमी आहे. पण एकमेकांचा वचपा काढण्याची आणि परस्परांचा प्रदेश अशांत करण्याची एकही संधी ते आता सोडणार नाहीत. हे उघड आहे. याचा फायदा या परिसरात मुबलकपणे फोफावलेल्या दहशतवादी संघटनांना मिळणार आहे.

     शिया धर्मगुरु शेख निम्र अल निम्र यांना फाशी देताना या घटनेचे हिंसक पडसाद उमटतील याची जाणीव सौदी अरेबियाला निश्चितच होती.  2012 मध्ये सौदी अरेबियानं त्यांना अटक केली होती. मागचे चार वर्ष ते सौदीच्या जेलमध्ये होते. पण सौदी राजेशाहीचा 'नंबर एक शत्रू' असं ज्याचं वर्णन केलं गेलं. त्याला सौदीनं चार वर्ष जेलमध्ये पोसलं. तेथील न्यायव्यवस्थेचा वेग पाहता हा कालावधी भरपूर जास्त आहे. त्यामुळे शेख निम्र अल निम्र यांना फाशी देण्यासाठी सौदीनं हीच वेळ का निवडली हे समजावून घेणे आवश्यक आहे.

    सौदीच्या राजेशाहीसाठी हा सध्या खडतर काळ आहे. तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झालीय. अमेरिका-इराण करारामुळे तेल मार्केटमध्ये इराणच्या आगमन निश्चित झालंय. त्यामुळे या किंमती वाढण्याची शक्यता नाही. तसंच अमेरिका -इराण करारामुळे पश्चिम आशियातलं सौदीचं स्थान डळमळीत झालंय. येमेनमधल्या लढाईत भरपूर बॉम्ब आणि पैसे ओतल्यानंतरही हाती यश येत नाही. सीरियामधली असादशाही कायम आहे. इराकमधला इराणचा प्रभाव मोडता आलेला नाही.तेलाबाबत स्वयंपूर्ण झाल्यानं अमेरिका या सौदीच्या मित्र देशाचा या भागातला रस कमी झालाय. त्यातच सौदी अरेबियाची अर्थव्यवस्थाही अडचणीत सापडलीय. 2011 च्या अरब क्रांतीचा वणवा आपल्या देशात पसरु नये म्हणून सौदीच्या राजानं अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या होत्या.5 लाख घरं बांधून देणे, आरोग्य योजनेसाठी चार अब्ज डॉलर्सची तरतूद ह्या यामधीलच प्रमूख योजना. पण शेख निम्र अल निम्र यांना फाशी देण्याच्या एक आठवडा आधीच या वर्षाच्या अर्थसंकल्पात 100 अब्ज डॉलरची तूट राहीले असा अंदाज सौदीनं व्यक्त केला होता. त्यामुळे आता या कल्याणकारी योजनांनाही सौदी राजाला कात्री लावावी लागणार हे उघड आहे.

    ढासळती अर्थव्यवस्था आणि फसलेले परराष्ट्र धोरण याच्यावरुन देशाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी शेख निम्र अल निम्र यांना फासावर लटकवण्यात आलं. सौदी अरेबियातला कट्टर वर्ग यामूळे सुखावलेच.त्याशिवाय देशभर शिया विरोधी, इराण विरोधी, हौतीविरोधी गटांनाही सेलिब्रेशनची संधी मिळाली. देशातल्या या उन्मादी वातावरणात येमेनमध्ये सुरु असलेले युद्ध थांबवण्याची मागणी करणारा आवाज आता दबला गेलाय. जनतेचा आवाज दडपण्यासाठी कल्याणकारी योजना सुर करणे , दडपशाहीचा वापर करणे आणि हे दोन्ही शक्य नसेल तर परकीय शत्रूचं भूत उभं करुन देशातल्या नागरिकांचं लक्ष दुसरिकडे वळवण्याचं काम आजवर जगातला प्रत्येक हुकूमशाह करत आलाय. शेख निम्र अल निम्र यांना दिलेल्या फाशीच्या दोरखंडातून जनतेचा हाच आवाज दाबण्याचं काम सौदीच्या राजानं केलंय.

सौदी अरेबिया- इराण कोल्ड वॉर

सौदी अरेबियातल्या या फाशीकांडाला सौदी-इराण कोल्ड वॉरचा पदर आहे. सुन्नी समुदायाचा नेता असलेला सौदी अरेबिया आणि जगातलं सर्वात मोठा शिया देश असलेल्या इराणमध्ये शिया-सुन्नी वर्चस्वाची लढाई जूनीच आहे. अगदी इराणमध्ये इस्लामी क्रांती  होण्यापूर्वी हे दोन्ही देश अमेरिकेच्या गटात असूनही परस्पर ध्रूवांवर उभे होते. इराण-इराक युद्धात सौदी अरेबियानं सुन्नी असलेल्या सद्दाम राजवटीला सढळ मदत केली. शिय़ा बहुसंख्य असलेल्या इराकमध्ये सुन्नी सद्दामची राजवट होती. सद्दामला अमेरिकेनं फासावर लटकवले.या घटनेचा जॉर्ज बूश इतकाच इराणलाही आनंद झाला. त्यानंतर इराकमध्ये  शिय़ा राजवटीचे सरकार आले. त्या सरकारला आजवर इराणनं नेहमीच सक्रीय मदत केलीय. तर हे सरकार उलथवण्यासाठी इराकमधल्या सुन्नी दहशतवादी संघटना या सौदी अरेबियाकडून पोसल्या जातायत.सुन्नी -शिया वर्चस्वाच्या या लढाईत आज इराकचं स्माशनात रुपांतर झालंय. सीरियामध्येही सौदी आणि इराण परस्परांच्या विरोधात उभे आहेत. त्यांच्या या टोकाच्या लढाईत आयसिसचा भस्मासूर उभा राहिला. त्याचा फटका सीरियातल्या सामान्य नागरिकांना बसतोय. ते वाट फुटेल तिथं पळत सुटलेत.

     केवळ इराक आणि सीरिया नाही तर पश्चिम आशियातल्या प्रत्येक देशातल्या शियांचं पालकत्व इराणकडे आहे. तर सुन्नींचा सांभाळ सौदी अरेबियाकडून होतंय. परस्परांना शह-काटशह देण्यासाठी शिया -सून्नी अतिरेकाचा धोकादायक जुगार हे दोन्ही देशांनी पश्चिम आशियामध्ये मांडला आहे.

  सीरियामधली सध्याची परिस्थिती हे याचे क्लासिक उदाहरण.सीरियामधली लढाई सुरुवातीला तेथील नागरिक आणि असाद सरकार यांच्यामध्ये होती.पण असाद सरकारनं इराणची मदत घेतली.त्यामुळे सौदी अरेबिया बिथरला. असादच्या रुपानं त्यांना शत्रू गवसला. सौदीनं देशातल्या सून्नी बंडखोरांना आपल्या पंखाखाली घेतलं.सून्नी बंडखोरांच्या कट्टरतावादाला सौदीनं खतपाणी घातलं ज्यामुळे त्यांचा इराणबद्दलचा द्वेष वाढला. त्याच बरोबर हे बंडखोर सौदीचे पाईक बनले.

   पश्चिम आशियातली बहुतांश जनता ही सुन्नी असल्यानं सुन्नी समुदायाची बाजू घेणं ही सौदी अरेबियासाठी फायद्याची रणणिती आहे.त्याचबरोबर सुन्नी  समुदायाला सौदी आपल्याकडे खेचत असल्यानं शिय़ा आपोआपच इराणच्या गटात जातात. इराण आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश शिया -सुन्नी कट्टरवादाचा फैलाव पश्चिम आशियात करत आहेत. या दोन्ही देशांना जगभरातल्या मुस्लीमांचा नेता होण्याची प्रबळ महत्तवकांक्षा आहे.  सौदी अरेबिया मुसलमानांमधलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मक्का आणि मदिना या पवित्र स्थळाचा वापर करते. तर इस्लामी क्रांतीचे गोडवे गात इराण जगभरातल्या मुस्लिमांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आलाय. हे दोन्ही देश जगभरात एकमेकांची आक्रमक आणि स्वत:ची पीडित अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतात. पश्चिम आशिया हे त्यांच्यासाठी युद्धाचं मैदान आहे. 1980 च्या दशकात लेबनॉन, 2000 च्या दशकात इराण आणि आता सीरिया आणि येमेनमध्ये हे दोन देश परस्परांच्या विरोधात उभे आहेत. त्यांच्या या वर्चस्वाच्या लढाईत सामान्य मुसलमानांचाच बळी जातोय.

या दोन्ही देशातल्या वर्चस्वाच्या लढाईमुळे सीरियामधली शांतता प्रक्रीयाही पुढे सरकू शकत नाही. कारण इराण आणि सौदी अरेबियाला राजी केल्याशिवाय सीरियामध्ये शांतता प्रस्थापित होऊच शकत नाही.त्यामुळे सीरियातल्या नागरिकांचे भोग अजूनही कायम राहणार आहेत. त्याचबरोबर सौदी अरेबियानं केलेल्या फाशीकांडामुळे सुन्नी कट्टरवाद वाढेल. त्याचा फायदा आयसिसला होऊ शकतो. त्यामुळे हे फाशीकांड सौदी अरेबियाच्याही अंगाशी येऊ शकते. त्यामुळे धार्मिक कट्टरतावाद ही सौदी अरेबियासाठी दुधारी तलवार बनलीय. त्यामुळे तत्कालीन हेतू साध्य होतील. पण त्याचे दूरगामी तोटेच जास्त आहेत. धार्मिक कट्टरता हे सीरियामधल्या यादवीचे कारण नव्हते. पण त्यामुळे सीरियामधली यादवी ही अधिक विध्वंसकारी आणि गुंतागुतीची बनली. आयसिसचा उदयाचाहे ते कारण नव्हते. पण त्यामुळे आयसिसचा प्रचार अधिक जोमाने झाला. त्यामुळे सध्याच्या काळात धार्मिक कट्टरतेला खतपाणी घालून सौदीनं भविष्यातला आपलाच धोका वाढवलाय.

        पण सध्याच्या फायद्यापुढे सौदी राजवटीला हा धोका दिसत नाहीय. त्यामुळे सौदीकडून धार्मिक कट्टरता वाढवण्याचे काम जोमाने सुरु आहे. इराणकडूनही त्याला तितक्याच जोमाने उत्तर दिलं जातंय. त्यामुळे पश्चिम आशिया आणखी बरीच वर्ष हिंसाचाराचे चटके सहन करण्याची शक्यता जास्त आहे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...