
काही गोष्टींची कल्पना केल्यानंतर तूंम्हाला काय होतं..हे मला माहित नाही.पण माझी तर पार झोपचं उडते.कल्पना करा मुंबईच नव्हे तर सा-या देशातल्या एक महत्वाचं पर्यटनस्थळ असलेल्या गेट वे ऑफ इंडिया पाहायला तूंम्ही गेलाय..आणि गेट वे वर तूमचं स्वागत बहेनजी मायावतींचा पुतळा करतोय.तूंम्ही नवी दिल्लीत शहीद जवानांना सलाम करायला गेलात त्याच्या बाजूलाच तूंम्हाला मायामेमसाहबला सलाम करावा लागतोय.तूंम्ही ताजमहालचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी गेलात...त्याच्या भोवती वेगवेगळ्या व्यापारी संकुलाचा विळखा पडलाय. खरचं झोपेतून खडबडीत जागं व्हावं अशीच ही कल्पना आहे.पण हे प्रत्यक्षात घडू शकतं...बसपाच्या सर्वोच्च नेत्या...सोशल इंजिनिअरींगच्या शिल्पकार....आणि बरचं काही बहेनजी मायावती जर पंतप्रधान झाल्या तर ही गोष्ट खरंच प्रत्यक्षात पाहयला मिळू शकते.
निवडणुका जवळ आल्या की काही गोष्टी सुरु होतात... सर्वच पक्षात हूजरेगीरी वाढते. पाडापाडीचे राजकारण कसं करायचं याचे डावपेच सुरु होतात.जुने मित्र तूटतात.नवी सोयरीक जमते.अशाच प्रकारे प्रत्येक निवडणुकीपूर्वी तयार होणारी एक गोष्ट म्हणजे तिसरी आघाडी...कॉँग्रेस तसंच भाजपशी नाराज असणारे (किंवा भविष्यकाळात ज्यांना या पक्षाकडून मोठा लाभ घ्यायचा आहे ) अशा दहा पक्षांनी एकत्र येऊन तिस-या आघाडीची स्थापना केलीय. अशाच सर्व नाराज नेत्यांनी कर्नाटकातल्या तुमकूरमध्ये शक्तीप्रदर्शन केलं.
ही आघाडी निर्माण झाल्यापासून देशातल्या अनेक स्वयंभू राजकीय तज्ज्ञ कामाला लागलेत.ही आघाडी कसा समर्थ तिसरा पर्याय आहे. कॉँग्रेस आणि भाजपला कशा प्रकारे समर्थ पर्याय आहे असा राग अनेकजण आवळत आहेत...परंतू तिस-या आघाडीचा आजवरचा इतिहास पाहीला तरं ही आघाडी म्हणजे असंतूष्ट नेत्यांची सत्तेच्या दिशेनं धावणारी फूटकळ फौज आहे असंच म्हणावं लागेल.
या आघाडीतल्या सर्वात शक्तीमान नेत्या आहेत मायावती. माझा मायावती यांच्यावर कोणताही व्यक्तीगत राग नाही.परंतू केवळ जातीच्या जोरावर कोणाताही विधीनिषेध न बाळगता सर्व तत्वांना मूठमाती देत,मित्राला दगा देत शत्रूंना जवळ करणा-या टिपीकल राजकारणी व्यक्तींची जी जमात या देशात आहे त्या जमातीच्या मायावती ह्या राणी आहेत.माझा राग ह्या प्रवृत्तीवर आहे.कोणत्याही व्यक्तींवर नाही.
मायावती नाही तर जयललिता तयार आहेत... नाही तर मग पुन्हा झोपाळू नजरेच्या एच.डी.दैवेगोडा ह्या देशाची झोप उडवायला सज्ज आहेत.ज्यांना सर्व प्रकारचे अधिकार हवेत पण जबाबदारी नको.ज्यांना विदेशी गुंतवणूक फक्त बंगालमध्ये हवी आहे.गुजरात,महाराष्ट्रात कदापीही नाही.ज्यांना अणूकरार चीनबोरबर हवाय अमेरिकेबरोबर नाही असे डावे पक्ष ह्या आघाडीचे खरे निर्माते. खुल्या आर्थिक व्यवस्थेचे कडवे विरोधक डावे पक्ष तर त्याचे कडवे समर्थक चंद्रबाबू नायडू हे दोन प्रकारची टोकं एकाच आघाडीत आहेत.परस्पर विरोधी नेते आणि पक्ष असलेली ही आघाडी फार काळ टिकणार नाही हे वेगळं सांगायला नको.
तिस-या आघाडी बाबत मला सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे ह्या आघाडीतल्या नेत्यांना कोणतेही व्हीजन नाही.यामधल्या अनेक नेत्यांची धाव आपल्या राज्याच्या बाहेर नाही.शेजारी राष्ट्रांमधली अशांतता,बेरोदगारी आर्थिक मंदी ह्या सारखे प्रश्न देशासमोर असताना अशा प्रकारच्या स्थानिक किंवा फार तर प्रादेशिक पक्षाच्या नेत्याकडे देश सोपवणे ही लोकशाहीची सर्वात मोठी थट्टा मानावी लागेल.
परंतु आपल्यासाठी काही दिलासादायक गोष्टी आहेत.बंगालमध्ये कॉँग्रेस-तृणमुल महाज्योत मुळे डाव्या पक्षांना नक्कीच फटका बसणार.केरळमध्ये तर डाव्यात उघड दुफळी माजलीय.त्यामुळे पंधराव्या लोकसभेत डावे पक्ष 30 जागापर्यंत पोचतील असा माझा अंदाज आहे.आता मायावतींची हवा आहे हे जरी मान्य केलं तरी त्या जिंकून जिंकून किती जागा जिंकतील 50...(अन्य राजकीय पक्ष आणि नेत्यांना मी मूर्ख मानायला अजिबात तयार नाही.मायावतींच्या आव्हानाचा सामाना करायला सर्व पक्ष नक्कीच तयार असतील ) आता डावे आणि मायावती नंतर तिस-य़ा आघाडीतल्या सर्व पक्षाची शक्ती एकत्र केली तरी 120-140 च्या आसपास येऊन थांबतात.म्हणजेच कॉँग्रेस किंवा भाजपा ह्या दोन्ही पैकी एका राजकीय पक्षाची मदत घेतल्याशिवाय ही आघाडी सत्तेवर येऊचं शकत नाही.
ह्याचाच अर्थ ज्या उद्देशाकरता ही आघाडी सत्तेवर आली तो उद्देशचं संपुष्टात येणार.हे सरकार पाच वर्ष चालणार नाही. मग अशा प्रकारच्या अस्थिर आघाडीला मतदान का करायचे ? कॉँग्रेस आणि भाजपा ह्या दोन्ही पक्षांमध्ये अनेक दोष आहेत.परंतू ह्या पक्षाला देश चालवण्याचा अनुभव आहे.अर्थकारण,आंतरराष्ट्रीय राजकारण, वेगवेगळ्या प्रादेशिक समस्या निर्माण झाल्यानंतर कशाप्रकारे राज्य करावं ह्याचं भान ह्या पक्षातल्या अनेक नेत्यांना आहे.देशातल्या वेगवेगळ्या भागात प्रादेशिकवादी शक्ती डोकं वर काढंत असताना देशाची सत्ता राष्ट्रीय पक्षाकडे देणं हेच देशाच्या एकतेसाठी आवश्यक गोष्ट आहे.
त्यामुळेच ह्या निवडणुकीत मतदान करणा-या प्रत्येकाला माझी नम्र विनंती आहे की तूंम्ही मतदान एकतर भाजपाला करा किंवा कॉँग्रेसला करा..तिस-या आघाडीच्या मृगजळामागे धावून आपली शक्ती वाया घालवू नका.