Tuesday, March 17, 2009

'वार' करी आणि साहित्यिक यादवी


मेणाहून मऊ आम्ही विष्णूदास l
कठीण वज्रासही भेदू ऐसे ll

मेणाहून मऊ असणारे वारकरी आता वज्राहून कठीण झालेत.'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीत अवमानकारक मजकूर लिहला म्हणून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांच्या विरुद्ध शड्डू ठोकले होते.आता आनंद यादव यांनी साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. आनंद यादव यांच्यासारख्या एका सृजनशील लेखकाला, नवनिमिर्तीची आस बाळगणा-या सरस्वतीपूजकाला आणि संवेदनशीलतेने ग्रामीण वास्तव टिपून ते जिवंत करणा-या वाङ्मय-सेवकाला राजीनामा द्यावा लागल्याने आपला विजय झाला, अशी भावना या कादंबरीवर आक्षेप घेणा-या मंडळींना झाली असेल.पण या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्तान जे काही गंभीर मुद्दे उपस्थित झाले आहेत.त्यांचा यानिमित्तानं विचार होणं आवश्यक आहे.

कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीमध्ये मानवी पातळीवरचं लिखाण करणं हा गुन्हा आहे का ? तूंम्ही त्यांना पौराणिक कथांमध्येच,चमत्कारांच्या कोंदणातच बांधून ठेवलं पाहिजे..ही जी पारंपारीक प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे.त्या प्रथेचं आपण या एकविसाव्या शतकातही तितकंच पालन करत आहोत.उलट वरचेवर ह्या सर्व प्रथा ह्या आणखीनंच घट्ट होत चालल्यात.प्रत्येक महारपूरुष हा एखाद्या समाजाची मालमत्ता आहे असंच ह्या समाजाच्यातल्या व्यक्तींचं वर्तन असंत. भक्तीमार्गाची उज्जवल परंपरा सांभाळणारा वारकरी समाजही ह्या परंपरेपासून दूर नाही हेच कटू वास्तव या निमीत्तानं सिद्ध झालंय.

डॉ.यादव यांनी जे काही लिहले ते आक्षेपार्ह होते..तुकाराम महाराजांसारख्या जगद्दगुरुंबद्दल लिहताना
जबाबदारीचं तेवढं भान असायला हवं.तूमच्याकडे भक्कम पुरावे असायला हवे.कोणताही परिस्थितीमध्ये तुंम्ही आपल्या विचारांवर ठाम असायला हवं. याचं भान साहित्य विश्वात आपली संपूर्ण हयात घालवणा-या यादवांना नसावं हे आश्चर्यचं मानावं लागेल.

खरं तर वादग्रस्त लिखाण करणारे आनंद यादव हे काही या जगातले पहिलेच साहित्यिक नाहीत.यापूर्वीही तस्लिमा नसरीन,सलमान रश्दी,विजय तेंडुलकर यासारख्या अनेक लेखकांना असाच रोषाचा सामाना करावा लागलाय.तस्लिमा नसरीन आणि सलमान रश्दी यांच्या विरोधात तर फतवे निघाले. आश्रयासाठी देशोदेशी फिरावं लागलं. तरीही हे लेखक आपल्या लिखाणापासून मागं हटले नाहीत.आजही आपल्या पुस्तकात लिहलेल्या प्रत्येक विधानावर ते ठाम आहेत. एक लेखक म्हणून त्याचबोरबर एक माणूस म्हणून त्यांची उंची आज म्हणूनचं तितकीच मोठी आहे.त्याच्या उलट आनंद यादव यांच वर्तन होतं. त्यांनी एकाकी आपली कादंबरी मागं घेतली.त्याच पद्धतीनं अगदी तितक्याच तडकाफडकी अध्यक्षपदाचा
राजीनामा दिला.

आनंद यादव यांच्यावर ही वेळ का आली याचा विचार केला तर काही कारणं अगदी सहजपणे सापडतात. ते साहित्य संमेलानाचे नियोजीत अध्यक्ष होते. आपल्या या अध्यक्षांच्या पाठिमागनं संपूर्ण साहित्य विश्वानं एकदिलानं उभं राहायला हवं होतं.पण राम शेवाळकर यांच्यासारखा एखादा सन्मानजनक अपवाद सोडला तर एकही साहित्यिक त्यांच्या मागे उभा राहिला नाही.हेची फळ का मम तपाला ? असा
प्रश्न यादवांच्या मनात या निमित्तानं अगदी सहज उभा राहीला असेल.आणीबाणी ऐन भरात असताना क-हाडच्या साहित्य संमेलानात यशवंतरावाच्या उपस्थित आणिबाणीचा निषेध करणारे साहित्यिक आता संपले का ? या प्रश्नाचं उत्तर होय असंच आहे हे कोणीही मान्य करेल.

या प्रकरणातली सर्वात महत्वाची बाजू वारक-यांची आहे.भक्तीमार्गामध्ये तल्लीन होणारा कोणाच्याही अध्यात-मध्यात नसणारा हा संप्रदाय आता मूळ प्रवाहात आलाय.ह्या संप्रदायाची खरी शक्ती लक्षात आली ती डाऊ प्रकरणाच्या निमित्तानं...शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यालाही वारक-यांनी आपल्या शक्तीपुढं वाकायला लावलं.डाऊ प्रकरणानंतर वारकरी संप्रदायातल्या नेत्यांना आपल्या शक्तीची जाणीव झाली.बंडातात्या कराडकर सारख्या काही व्यक्ती आता महाराज नाही तर नेते बनलेत.सांस्कृतीक क्षेत्रात त्यांची सुरु असलेली दादागिरी ही त्यांच्या राजकीयतेची चूणूक दाखवतीय. त्याचबरोबर वारक-यांच्या बाजूनं संभाजी ब्रिगेड,मराठा महासंघ संघटना वारक-यांच्या मागं उभ्या आहेत. त्याचबरोबर साहित्य
विश्वातली अनेक स्वयंभू पीठंही या निमित्तानं गप्प राहीली.सामाजिक समरसता मंचाच्या व्यासपीठावर वावरलेला,ग्रामीण संस्कृतीशी घट्ट नाळ असलेल्या साहित्यका बाबत वाद सुरु आहे ना..मग सुरु पाहू दे बाबा..मला काय त्याचे ? हीच त्यांची वृत्ती आहे. आपल्या लिखानातून शब्दांचे मोठे मोठे इमले उभे करणा-या मराठी साहित्यकांचं जातीय ध्रुवीकरण झालंय.

तुकाराम महाराजांनीच 'करितो कवित्व म्हणाल कोणी। नोहे वाणी माझ्या पदरीची। माझिया युक्तीचा नोहे हा प्रकार। मज विश्वंभर बोलवितो।।' असे लीनतेने म्हटले आहे. तुकारामांच्या भक्तांमध्ये आता या ऋजुतेची जागा असहिष्णुतेने घेतलीय. आज या असहिष्णूतेनं आनंद यादव यांच्या अध्यक्षपदाचा बळी घेतलाय. आता संपूर्ण संतसाहित्यावर सेनॉस्रशीप लावण्यास हे 'वार'करी सज्ज झालेत.मात्र हे सुरु असताना साहित्य विश्वातही जी 'यादवी' सुरु आहे ती यादवी नक्कीच अस्वस्थ करणारी आहे.

5 comments:

checkamol said...

तुकाराम महाराजांच्या अंगावर शंभर वेळा थुंकणा-या माणसाला माफ करून तुकाराम महाराजांनी क्षमाशिलता दाखवली होती. वारक-यांनी 'वज्राहून कठीण' एवढीच तुकोबांची ओळ सोयीस्करपणे लक्षात ठेवलीय. 'मेणाहूनी मऊ' ही ओळ ते विसरले की काय, अशी शंका या घटनेतून येते. थोडक्यात वारक-यांनी आनंद यादवांचाच तुकाराम केला. तुकारामांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या होत्या, आता तर कादंबरीसह व्यक्तीलाही गटांगळ्या खायला लावल्या जातायत. पण असो. वारक-यांनी निर्धास्त रहावं. वैकुंठातून जर तुकाराम महाराज हा सगळा प्रकार बघत असतील, तर ते त्यांना नक्की माफ करतील.

Vinod Patil said...

'संतसूर्त तुकाराम' हे आनंद यादव यांनीच जन्माला घातलेलं अपत्य होतं. आणि त्यांनीच त्याचं अस्तित्व नाकारल्यानंतर कोण काय बोलणार. साहित्यविश्वातून त्यांना पाठिंबा मिळायला हवा होता अशी जी आपण बोंब ठोकतोय ती कितपत रास्त आहे? कारण नसरीन,रश्दी,तेंडुलकर यांनी दुस-यांच्या हिमतीवर आणि भरोशावर साहित्याची निर्मिती केली नाही. यादवांनी फार घाई केली.

Unknown said...

Atyant sunadr, vajandar lekh. Bharpur details ani vishleshan. Dow prakaran- Sharad Pawar ani Warkari sangharsha yache details kalu shaktil ka ?
Lekhacha shirshak pahun far interest vatla nahi pan lekh interesting hota.

santosh gore said...

यादव यांनी राजीनामा देवून ते त्यांच्या लिखाणावर ठाम नसल्याचं दाखवून दिलं. तर वारक-यांनीही टोकाची भूमिका घेवून राजीनाम्याचा हट्ट कायम ठेवला. या दोन्ही घटना एका लेखकाला आणि वारकरी संप्रदायाला शोभणा-या नाहीत.

Vijay Chormare said...

Yadav yani adhyaksha padasathi kadambari mage ghenyache paap kele aani shevti adyakshapadahi gele. Ekunach aaplya sahishnutecha rhaas hot chaalalaay.
Ekun vishleshan chhan aahe. Pan Taslima, Rashdi yanchi samajik paristhiti vegli aahe. Tyanchi tulna thet yadvanchya prakarnashi karne yogya tharnar nahi.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...