Showing posts with label Shivsena. Show all posts
Showing posts with label Shivsena. Show all posts

Sunday, June 21, 2015

मध्य लटपटीत

मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंडाला अस्मितेच्या कोंदणात बसवून राजकारण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 19 जून 1966 या दिवशी मुंबईत जन्मलेल्या शिवसेनेनं आता सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केलाय. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याच्यावरचा अन्याय  या भोवती फिरणारी शिवसेना मराठी माणसांच्या मनात तर आहे. पण दुर्दैवानं ती त्या प्रमाणात राजकारणात दिसते का याचा विचार होणं आवश्यक आहे.

              राज्य स्थापनेला सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचा जन्म झाला. ज्या मुंबईसाठी मराठी माणसांनी रक्त सांडलं त्या मुंबईत अन्य भाषकांकडून मराठी भाषकांवर  होणारा अन्याय हा चलनी मुद्दा होता. शिवसेनेनी तो मुद्दा आपल्या माथी लावला.  त्यानंतर सतत पाच दशकं शिवसेनेनं काळास वळण देण्यापेक्षा काळाच्या आहारी जाणं पसंद केलं . बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा हा सर्व शिवसैनिकांना जोडणारा समान धागा.या धाग्यानं एकत्र आलेल्या शिवसैनिकांसमोर आणि आपल्या मतदारांसमोर मद्रासी, गुजराती, कम्युनिस्ट, शीख, मुस्लिम आणि अलिकडच्या काळात उत्तर भारतीयांची भीती दाखवत  राजकारण केलं.

         सुरुवातीला शिवसेनेचा प्रभाव फक्त मुंबई आणि ठाण्यापुरता मर्यादीत होता. कनिष्ठ मध्यवर्गातले तरुण हे शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते. तर पांढरपेशा आणि बुद्धीजीवी वर्गाला शिवसेनेच्या राडेबाज आणि बाळासाहेबांच्या मराठी रॉबिनहूड शैलीचं आकर्षण होतं. सुरुवातीच्या काळात लोकाधिकार समिती, तसेच मराठी कामगार संघटनेच्या मार्फत शिवसेनेनं मराठी तरुणांना नोक-या मिळवून दिल्या. कारकून निर्मितीच्या या कारखाण्याचा लाभ याच पांढरपेशा वर्गाला झाला. त्यामुळे हा वर्ग शिवसेनेशी जोडला गेला. पण या लोकाधिकार समितीनं मराठी तरुणांना केवळ कारकून किंवा तत्सम तृतीय श्रेणीतल्या नोक-या मिळवून दिल्या. एकैा कुंपणाच्या पलिकडं नोकरीतल्य मराठी क्षितीजांचा विस्तार करण्यास त्यांना जमलं नाही, किंवा त्यांनी तो मुद्दा फारसा गांभीर्यानं घेतला नाही. असं म्हणावं लागेल.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून किर्लोस्कर, ओगले सारखे मराठी उद्योजक तयार झाले. पंडित नेहरुंनी पंतप्रधान झाल्यानंतर आयआयटी किंवा सरकारी उद्योगातले नवरत्न उभारुन एक रचानात्मक कार्य केलं.काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ उभारली. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातली घरं यामध्ये प्रथम जगाराशी आणि नंतर काँग्रेस पक्षाशी जोडली गेली. मुंबईवर दिर्घकाळ राज्य केलेल्या आणि अखिल महाराष्ट्राच्या विकासाचा ठेका आपल्याकडेच आहे अशा आविर्भावात राबणा-या शिवसेनेनं यापैकी कोणतंच संस्थात्मक किंवा विकासात्मक कार्य केलं नाही. युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस हाय-वे किंवा मुंबई शहराच्या भविष्यातल्या वाहतूकीची गरज ओळखून शहरात उड्डाण पूल बांधली गेली. पण त्याचं श्रेय नितीन गडकरी म्हणजेच भाजपचं. उलट झोपडपट्टी धारकांना मोफत घरं देण्याच्या बाळासाहेबांच्या सवंग निवडणूक घोषणेमुळे शहराच्या लोकसख्येंची सूच प्रमाणाच्या बाहेर गेली. शहरात उत्तर भारतीयांचे लोंढे वाढले. या उत्तर भारतीयांना गोंजरण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आपला मराठीचा मुद्दा पातळ करावा लागलाम. संजय निरुपम सारख्या उत्तर भारतीय नेत्याचं महत्व पक्षात वाढलं. 'मी मुंबईकर' सारखी (पुन्हा तत्कालिन फायदा देणारी) मोहीम शिवसेनेला राबवावी लागली.

            1980 च्या दशकात शिवसेना पूर्णपणे राजकारणात उतरली. भाजपशी युती झाल्यानंतर आक्रमक हिंदुत्वाचा पक्षानं पुरस्कार सुरु केला. त्याचवेळी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आणि मंडल आयोगाच्या शिफारशींना पक्षाचा विरोध होता. मराठा आणि दलित दोन्ही वर्गाच्या विरोधी बाळासाहेब बोलत असत. मंडल आयोगाच्या शिफारशींना उघड विरोध करत ओबीसींना दुखावण्याचं काम केलं. बाळासाहेबांना हिंदू-हदय सम्राट अशी प्रतिमा बनवण्याचा अट्टहास असलेली शिवसेना 1992 च्या कारसेवा आंदोलनात सक्रीय नव्हती. या कारसेवेचं नेतृत्व संघ परिवार आणि भाजपनं केलं. पण बाबरी मशीद पडल्यानंतर त्याचं क्रेडीट घेण्यास बाळासाहेब अचानक पुढे सरसावले.त्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलीच्या काळात पक्षानं आपण ब्रँड हिंदुत्व अधिकचं भगवं केलं. याचा फायदा त्यांना 1995 च्या निवडणुकीत झालं. देशात आणि राज्यात असलेल्या काँग्रेसविरोधी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला. बाळासाहेबांचा प्रचार, भाजपशी असलेल्या युतीमुळे होणारी बेरीज याच्या जोरावर शिवसेनेचे मनोहर जोशी सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

     यावेळी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे, शिवसेना जसा प्रादेशिक पक्ष आहे. तसंच द्रमुक त्यामधून नंतर फुटलेला अण्णा द्रमुक, अकाली दल, नॅशनल कॉन्फरन्स, असम गण परिषद, तेलगू देसम किंवा अगदी अलिकडच्या काळात स्थापन झालेला तेलंगणा राष्ट्र समिती ( टीआरएस) हे देखील देशातले मुख्य प्रादेशिक पक्ष आहेत. यापैकी टीआरएस हा पक्ष स्वबळावर एकदा तर अन्य प्रादेशिक पक्ष स्वबळावर किमान दोनदा आपआपल्या राज्यात सत्तेवर आले आहेत. उत्तर प्रेदशापुरंत मुख्यत्वे राजकारण असलेला समाजवादी पक्ष आणि बसपा, बिहारमधले राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड हे देखील मर्यादित अर्थानं प्रादेशिक पक्षच आहेत. त्यांनीही या राजकारणाच्या दृष्टीनं गंगेच्या पात्रापेक्षा अधिक खोल अशा प्रदेशात स्वबळावर सत्ता मिळवलीय. पण शिवसेनेला आपल्या 50 वर्षात महाराष्ट्रात एकदाही सत्ता मिळालेली नाही. याचं कारण  पक्षाच्या उत्सफुर्ततेच्या प्रकटीकरणाच्या राजकारणात आहे. ज्याला नेमक्या भाषेत वारंवार दिशा बदलणं असं म्हणता येईल.

        शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांच्या समोरचा शत्रू कसा बदलला याचा उल्लेख वरच्या परिच्छेदात केला आहेच. पण त्याच बरोबर त्यांच्या धोरणातही सतत बदल होतोय. भांडवलशाही विकासात मुंबईतल्या मराठी तरणांची होणारी कोंडी हा मुद्दा शिवसेनेनं सुरुवातीला उचलला. पण त्याचवेळी कारखाण्याती डाव्या संघटनांना मोडून काढण्यासाठीआपली ताकद त्यांनी मालकवर्गाला वापरु दिली. मुंबईचा गिरणी संप त्यातूनच चिघळला. मुंबईत मराठी माणसांचे सर्वात मोठे स्थालांतर शिवसेनेच्या प्रभावाखालीच झाले. शहरात टॉवर संस्कृती उभी राहिली. जागेचे भावं गगनाला भिडले. 'भूखंडाचे श्रीखंड' हा शब्दप्रयोग शिवसेनेनंच सर्वप्रथम आणला. पण मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता असतानाच  शहरातले मोक्याचे भूखंड अलगतपणे परप्रांतीय बिल्डराच्या घशात गेले. स्थानिक लोकाधिकार समितीच्या चळवळीचं राज ठाकरेंच्या शिवउद्योग सेनेत रुपांतर झालं. पण नंतर तो ही मुद्दा शिवसेनेनं सोडून दिला.

राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मिळालेली सारी पहिल्या क्रमांकाची पदं मुंबई आणि कोकणातल्याच नेत्यांना दिली. मुंबई आणि कोकणाशिवाय अन्य महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे शिवसेनेनं साफ दुर्लक्ष केलं. उर्वरीत महाराष्ट्रात शिवसेेनेचा एकही मोठा नेता आजवर तयार झालेला नाही. व्हँलेंटाईन डे ला विरोध हा शिवसैनिकांचा वार्षिक उद्योग. पण सेनेच्या नव्या  आदित्य राजेंना मुंबईत नाइट लाईफ सुरु करायची आहे. नाईट लाईफ सुरु करताना जगातल्या मोकळ्या संस्कृतीच्या शहरांचा उल्लेख शिवसेना करतं. पण त्याचवेळी डे संस्कृतींना शिवसेना विरोध करतं. म्हणजेच भावी नेतृत्वाची वैयक्तिक आवड जपण्यासाठी शिवसेनेला मुंबईत नाईट लाईफ  जपण्यासाठी शिवसेनेला मुंबईत नाईट लाईफ आणायची आहे का ? रोहिंग्टन मिस्त्रींचे पुस्तक मुंबई विद्यापाठीच्या अभ्यासक्रमातून बाद करायला लावणारे आदित्य ठाकरे खरे की मॅग्ना कार्टाला 800 वर्ष पूर्ण झाले याबद्दल स्मरण ट्विट करणारे आदित्य ठाकरे अस्सल ? अन्य पक्षातल्य विशेषत:  गांधी घरण्यातल्या घराणेशाहीला शिवसेनेनं सतत विरोध केला. पण शिवसेना ही अन्य प्रादेशिक पक्षांप्रमाणेच एकाच कुटुंबाची प्रॉपर्टी बनलीय. घरण्यातला सत्ता संघर्ष तीव्र झाल्यानंतरच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना करावी लागली. मराठी आणि हिंदू समाजाच्या हितासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दाखवणारे   बाळासाहेब आपल्याच घरातली ही फूट रोखू शकले नाहीत.

    2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं युती तोडली. भाजपला अगदी अफजलखानाची फौज हे विशेष लावून झालं. पण तरीही केंद्रातली मंत्रीपदं सोडली नाहीत. स्वाभिमानाचा जप करणा-या उद्धवसेनेनं मिळतील ती मंत्रिपद निमुटपणे स्विकारत  निवडणुकीनंतर सत्तेत सहभाग घेतला. सुरेश प्रभूंच्या निमित्तानं आपसूकपणे चालून आलेलं केंद्रीय रेल्वेमंत्रीपद पक्षानं विनाकारण नाकारलं. आणि सर्वात जुन्या पक्षावर भाजप अन्याय करत असल्याचं रडगाणं सुरुचं ठेवलं.

यापूर्वी बाळासाहेबांची गाठ अटलजी-अडवाणीसारख्या सहिष्णू नेत्यांशी होती. आता
उद्धव आणि आदित्य यांची गाठ मोदी-अमित शहा या 'शतप्रतिशत भाजप' या एकाच ध्येयानं पेटलेल्या चाणाक्ष राजका्रण्यांशी आहे. दोन पक्षातल्या विधानसभा निवडणुकीतली पहिली लढाई भाजपनं जिंकली.शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट जागा स्वबळावर जिंकल्या. आता मुंबई महापालिका निवडणुकीत या लढाईचा दुसरा अंक रंगणार आहे.

           पन्नाशी म्हणजे मध्याचा काळ. या काळात मागील शिलकीचा आढावा घेत पुढे होणा-या खर्चाचं नियोजन करणं आवश्यक असतं. पन्नाशीच्या आसपास असलेल्या महिलेच्या आयुष्यात असलेली अस्वस्थता गौरी देशपांडे यांनी 'मध्य लटपटीत' या आपल्या एका अजरामर कथेत मांडलीय. शिवसेनेची अवस्थाही पन्नाशीत  'मध्य लटपटीत' अशीच झालीय.      

Monday, November 10, 2014

महाराष्ट्राचे केजरीवाल !


उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम. एकापाठोपाठ इतके यू टर्न देशात फक्त अरविंद केजरीवाल घेतात. पण राज्यात हे यू टर्न घेणा-या व्यक्तीचे नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे.

      बाळासाहेब बेधडक निर्णय घेत असत. एक घाव दोन तुकडे पद्धतीनं घेतलेले निर्णय आणि बोललेला शब्द त्यांनी कधी फिरवला नाही. पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं सतत कानठळ्या बसेपर्यंत सभेत सांगणारे उद्धव ठाकरे निर्णय घेताना घालत असलेला घोळ पाहून आम आदमी पक्षाची एजन्सी मातोश्रीनं चालवायला घेतलीय का अशी शंका मला येऊ लागलीय. पक्षप्रमुखांचं डोकं चालत नाही, आणि आदेश मिळत नसल्यानं समर्थकांना राडे घालायला आणि व्हॉटसअपवर मेसेज फिरवायला संधी मिळत नाही, अशी मानसिक गुलामीची अवस्था या ठाकरे सेनेत आलीय.

हिंदुत्व, मराठी आत्मसन्मान, प्रतिष्ठा, स्वाभिमान या सा-या शब्दाचा अर्थ बहुधा उद्धव ठाकरे कंपनीला कुरवाळणे हाच होत असावा. जसं काही सर्व मराठी मतदार हे फक्त शिवसेनेलाच मतदान करतात. अण्णा द्रमुक, द्रमुक, तृणमुल काँग्रेस, तेलगु देसम, अकाली दल, बिजू जनता दल, असम गण परिषद या देशातल्या अन्य प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर किमान एकदा तरी सत्ता मिळवलीय. पण शिवसेनेला हे  उद्धव ठाकरेंचे वडील जिवंत असतानाही हे जमलं नाही. पण यांनी मात्र विधानसभा निवडणूक प्रचारात मोदींचा बाप काढला.


 मनोहर जोशी ( मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष - मुंबई), नारायण राणे ( मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता- कोकण),
सुरेश प्रभू ( कॅबिनेट मंत्री - कोकण), रामदास कदम ( विरोधी पक्ष नेता - कोकण), अनंत गिते ( केंद्रीय मंत्री - कोकण) आणि आता पुन्हा गटनेते एकनाथ शिंदे ( ठाणे + कोकण ) ही शिवसेनेकडून सर्वोच्च पदी बसलेल्या व्यक्तींची विभागवार यादी आहे. या पक्षाला आजवर मुंबई आणि कोकण सोडून उरलेल्या महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला सर्वोच्च पदी संधी द्यावीशी वाटली नाही.  आता विदर्भातला एक स्वच्छ प्रतिमेचा , हिंदुत्तववादी, तरुण नेता स्वबळावर मुख्यमंत्री बनलाय हेच यांना मान्य नाही. त्यामुळेच ते रोज मानापमान नाट्याचे नवे प्रयोग रंगवतायत.

. निवडणुकीच्या काळात शत्रू नंबर 1 ठरवलेल्या या उद्धव सेनेची भाषा मंत्रिपद समोर दिसताच मवाळ झाली, उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपदासह दहा मंत्रिपद म्हणजे यांचा सन्मान. उद्धव ठाकरेंकडे बहुमत नसताना त्यांच्या बोटाला धरुन मु्ख्यमंत्री करणं म्हणजे यांचा सर्वोच्च सन्मान. रिमोट कंट्रोलच्या जोरावर राज्य हाकणा-या बाळासाहेबांचं नावं लावणारी उद्धवसेना सत्तेच्या तुकड्यासाठी भाजपापुढे लाचार झालीय.

 
          अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा असलेला, महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं करु शकणारा सुरेश प्रभू हा चेहरा शिवसेनेला कॅबिनेट मंत्री म्हणून मान्य नव्हता. यापूर्वी बाळासाहेबांनीही त्यांचा तडकाफडी राजीनामा घेतला होता. मा्तोश्रीचे उंबरठे झिजवल्याशिवाय, स्वयंघोषीत मराठी सम्राटाला मुजरा केल्याशिवाय, किंवा पैशाचं राजकरण केल्याशिवाय उद्धवसेनेत मोठं होता येत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय.


   भाजपाची प्रचार टीम म्हणजे अफजलखानाच्या फौजा इतकं भंपक विधान बाळासाहेबांनी कधीच केलं नसंत
   भाजपाला अफजलखान आणि औरंगजेब म्हणारे उद्धवजी आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपाला आठवण करुन देतायत. 144 +144 = 288 इतकं साोप समीकरणं त्यांनी उधळून लावलं. युती झाली असती तर 210 जागी विजय मिळाला असता. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला असता. एमआयएमचा राज्यात शिरकावही झाला नसता. पण हे सर्व  उद्धव ठाकरेंनी होऊ दिलं नाही. राष्ट्रपतीपदाच्या मागील दोन निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्वादी पासून ते थेट एमआयएम  आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत असताना यांना कधीही हिंदुत्व आठवलं नाही.

      मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. याच काळात मुंबईतल्या बकालपणात झपाट्यानं वाढ झाली. झोपडपट्टीवासींना मोफत घरे देण्याच्या सवंग घोषणेमुळे मुंबईत परप्रातींयांची गर्दी नियंत्रणाच्या पलिकडं गेली. अमराठी वर्ग मुंबईत झपाट्यानं पुढं येत असताना,श्रीमंत होत असताना मराठी माणसाला काल शिवसेनेनं वडापावचा गाडा दिला. आज त्याचं नाव बदलून शिववडापावचा गाडा देण्यात येतोय. आता मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याच्या हलचाली सुरु होताच टक्केवारी बंद होण्याच्या भीतीनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा राग पुन्हा आळवला जातोय.


           सरकार चालवण्यासाठी आवश्यक असणारं पुरेसं गांभीर्य मोदींमध्ये आहे. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, उच्च शिक्षण आणि विकासाचं व्हिजन असलंं की  सत्ता मिळू शकते हे मनोहर पर्रिकर आणि  सुरेश प्रभुंना केंद्रीय मंत्री करुन त्यांनी दाखवून दिलंय. जात या निकषावर मुख्यमंत्री ठरत नाही हे महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये दिसलं. मोदींचं हेच मॉडेल राज्यात राबवण्याची कुवत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे.पण देवेंद्र फडणवीसांचा सुशासनाचा प्रयोग यशस्वी होऊ नये म्हणून भावनिक राजकारणाची नौटंकी सोबतच  सतत यू टर्न घेण्याची ' आप निती 'चे प्रयोग शिवसेना नेतृत्वाकडून दाखवले जातायत. सतत यू टर्न घेण्याची सवय असेल तर  अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हा अपघात झाला तर मराठी खतरे में असा नारा देत सुरु केलेलं राज्यातलं दुकान बंद होण्याची भीती बाळासाहेबांना सतावत असावी.त्यामुळेच दसरा मेळाव्यातल्या त्या भाषणात उद्धव आणि आदित्यला सांभाळा असं आवाहन बाळासाहेबांनी सभेस उपस्थित असलेल्या ' तमाम...' वर्गाला केलं असावं.

Saturday, February 26, 2011

त्रिकोणी युतीचा फॉर्म्युला





शिवसेना-भाजप युतीत मनसेला सामावून घेण्याच्या गोपीनाथ मुंडे यांनी मांडलेल्या "फॉर्म्युला'चे समर्थन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे. राज्यातील विरोधकांचे हे त्रिशूल एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट सरकारच्या गंडस्थळावर नक्कीच आघात होईल. गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राची सर्वच बाहतीत पिछेहाट झालीय.असं असलं तरी सर्वच पातळीवर नाकार्ते असलेले आघाडी सरकार 2009 साली सत्तेवर आले. आघाडी सरकारला हे यश केवळ मनसे फॅक्टरमुळेच मिळाले होते. हे त्या निकालाचा अभ्यास केला की लगेच स्पष्ट होते.


        2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 18 तर भाजपला 8 जागांचा फटका बसला. युतीचं संख्याबळं 116 वरुन थेट 90 जागांवर घसरले. 1990 सालापासून पाच विधानसभा निवडणुका भाजपा-सेनंनं एकत्र लढवल्या आहे. या पाच निवडणुकांमधला हा निचांक आहे. भाजपा-सेना युतीच्या मतांची टक्केवारीही सुमारे साडेतीन टक्यांनी यंदा घसरली. तर मनसेनं विधानसभेच्या 144 म्हणजे बरोबर निम्या जागा लढवूनही 13 जागा आणि 5.1 टक्के मतं जिंकली. लोकसभा निवडणुकीत मनेसेमुळे भाजप-सेनेला 8 जागांचा फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीत तब्बल 63 जागांचा युतीला फटका बसला आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की भाजप-सेना-मनसे हे तीन्ही पक्ष एकत्र असते तर 153 जागा जिंकत ही आघाडी सत्तेवर आली असती. नाकर्त्या आघाडीची सत्ता घालवण्याचे समाधान मराठी जनतेला मिळाले असते.


       राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे हे उघड आहे. मात्र या दोघांचीही महत्वकांक्षा परस्परांशी लढून पूर्ण होऊ शकणार नाही. मागच्या काही वर्षात मुंबई आणि ठाणे या शिवसेनेच्या अभेद्य गडाला राज ठाकरेंनी सुरुंग लावलाय. बाळासाहेब ठाकरेंना पुढे करुन  सर्व प्रकारचे भावनिक आवाहन करुनही हा गड लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत सेनेला वाचवता आला नाही. मुंबई -ठाणे परिसरातील भगदाडं बुझवल्याशिवाय उद्धव ठाकरेंना 'वर्षा' चा उंबरठा ओलांडता येणार नाही.


   मनसेची स्थितीही फारशी वेगळी नाही. राज ठाकरेंकडे करिष्मा आहे. पण नरेंद्र मोदी, नितीशकुमार किंवा दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचे मुख्यमंत्री यांच्यासारखा संपूर्ण राज्यभर त्यांना जनाधार नाही. राज ठाकरे हे एकहाती पक्ष चालवत आहेत. प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे, शिरीष पारकर, बाळा नांदगावकर यासारखी काही मंडळी या पक्षाकडे आहेत. पण नेत्यांची फौज नाही. त्यातही ही सर्व मुंबईतली नेते मंडळी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा मुंबई-ठाणे परिसरातचं मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठावाडा आणि विदर्भ या राज्यातल्या तीन महत्वाच्या भागात पक्षाचे संघटन करु शकेल निवडणुका जिंकू देऊ शकेल असा एकही नेता मनसेकडे नाहीत. त्यातंच या भागात मनसेचं हुकमी असे मराठी कार्ड चालण्याचीही सूतराम शक्यता नाही. त्यामुळे ज्या नवनिर्माणाच्या गर्जना राज ठाकरे आपल्या संभामधून करतात ते नवनिर्माण स्वबळावर करणे या पक्षाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.


     या त्रिकोणाताला तिसरा कोण आहे भाजपा. मध्यमवर्गीय, व्यापारी आणि मुंबईतील अमराठी मतदार ही या पक्षाची परंपरागत व्होट बॅंक आहे. गोपीनाथ मुंडेच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या परिश्रमामुळे माधवं ( माळी, धनगर आणि वंजारी ) या जातीच्या मतांची बेरीजही या पक्षाच्या वाढीत महत्वाची ठरली. नितीन गडकरींमुळे विदर्भात तर एकनाथ खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात या पक्षानं आपली पाळेमुळे रुजवली आहेत. मात्र प्रमोद महाजनांचे अकाली निधन, मुंडे-गडकरी गटांचा संघर्ष आणि एकूणच सत्तेपासून दूर राहिल्यामुळे केंद्रीय पातळीवर आलेली निराशा याचा फटका भाजपालाही बसलाय. त्यामुळे शत प्रतिशत भाजप हा राग चिंतन बैठकित अनेकदा गायल्यानंतरही तो प्रत्यक्षात येणं अवघड आहे. याची जाणीव आता त्यांना झाली आहे. त्यामुळेच भाजपाने आता त्रिकोणी युतीच्या फॉर्म्युल्याबाबत पुढाकार घेतला आहे.


     भाजपाला जी जाणीव झाली आहे त्याचं भान अजुनही सेना आणि मनसेला आलेलं नाही त्यामुळे  महाराष्ट्र सतत बदनाम होत असूनही  ह्या दोन्ही प्रादेशिक पक्षांना मुन्नी आणि झेंडुबाम यांचीच काळजी आहे. खरं तर या दोन्ही पक्षांचे नेतृत्व ठाकरे या एकाच घराण्याकडे आहे. दोन्ही पक्षात एकाधिकारशाही आहे. मराठी मतदार हाच त्यांच मुख्य आधार आहे.  बाळासाहेब ठाकरे हेच दोन्ही पक्षातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचे दैवत आहे.त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्या महत्वकांक्षेपोटी कितीकाळ वेगळा संसार करायचा याचा विचार या दोन्ही पक्षांनी करायला हवा.


     गेल्या 12 वर्षांपासून शिवसेना सत्तेपासून दूर आहे. सत्तेचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे नारायण राणे ते किरण पावसकर पर्यंत अनेक नेत्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. 2014 च्या निवडणुकीतही पराभव झाल्यास हा आऊटगोईंचा स्पीड आणखी वाढेल.बाळासाहेब ठाकरे आणि मराठी अस्मिता यासारख्या भावनिक मुद्यावर पक्ष कार्यकर्त्यांना भूल देण्याचे सेना नेतृत्वाचे प्रयोग फार काळ चालू शकणार नाहीत. मनसेमध्येही फारसे आलबेल नाही. श्वेता परुळेकर, प्रकाश महाजन यासारखी मंडळी केंव्हाच पक्षातून बाहेर पडली आहेत. कोणत्याही आंदोलनात न उतरता सभेच्या व्यासपीठावरुन बोलबच्चनगिरी करणं हेच राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासून केले आहे. तर त्याचवेळी तोडफोडीच्या आंदोलनात सक्रीय असलेल्या राज ठाकरेंच्या मावळ्यांना पोलीसांचा आणि कोर्टाचा जाच सहन करावा लागतोय. 'मराठी खतरे में' हा एकच नारा देऊन कार्यकर्त्यांना आपल्या ताब्यात ठेवणं राज ठाकरेंना फार काळ जमणार नाही.
     
      भाजपा, शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांच्या मर्यादा आहेत. या तिघांनाही दलित मतदारांमध्ये मजबूत बेस नाही. मुस्लिम मतांची फारशी अपेक्षा नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजुनही त्यांना शिरकाव करता आलेला नाही. ग्रामीण महाराष्ट्रात साखर कारखाने आणि सहकारी संस्थांचे पाठबळ नाही. असं असतानाही भाजपा-सेना x मनसे असा संघर्ष करण्यात किती अर्थ आहे याचा विचार आता या पक्षांनी करायला हावा. राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.. त्याठिकाणी केवळ हितसंबंध महत्वाचे असतात. हे घासून गुळगुळीत झालेलं सत्य राज आणि उद्धव या चुलत भावंडाला एकत्र का आणू शकत नाही ? 
         
       महाराष्ट्रात सध्या आनंद साजरा कराव्या अशा फार कमी गोष्टी आहे. वीज टंचाई, शेतक-यांच्या आत्महत्या, प्रादेशिक असमतोल, जमीन, पाणी आणि भेसळ माफियांचे साम्राज्य, बकाल शहरे, ओसाड खेडी, भ्रष्टाचारांचे 'आदर्श' उभी करणारी नोकरशाही आणि संवेदनाशुन्य सरकार याच्या विळख्यात आपला ' प्रिय आमुचा एक असा महाराष्ट्र दॆश ' अडकलाय. भाजपा-सेना-मनसे यांचे त्रिकोणी सरकार सत्तेवर आल्यास हे चित्र एका रात्रीत बदलेल अशी भाबडी आशा मला नाही. मात्र ह्या चित्राचे मुख्य चित्रकार असलेले नाकर्ते  सरकार तरी जायला हवे अशी माझी इच्छा आहे.


              राज ठाकरेंचा करिष्मा, उद्धव ठाकरेंचे व्यवस्थापन आणि गोपीनाथ मुंडेंचा जनाधार यांचा त्रिवेणी संगम आघाडी सरकारच्या साम्राज्यावर निर्णायक घाव घालू शकतो. यासाठी आता भाजपाने एक पाऊल पुढे टाकलंय...जय मराठी आणि जय महाराष्ट्र याचा अहोरात्र गजर करणा-या दोन्ही ठाकरेंच्या पक्षानेही त्याला साथ देण्याची आवश्यकता आहे. 


     

Wednesday, January 21, 2009

'बाळ' पर्व


बाळासाहेब ठाकरे. 23 जानेवारी 2009 या दिवशी ते आपल्या वयाची 83 वर्षे पूर्ण करतील.भारतीय राजकारणात अनेक नेत्यांना किंबहून प्रत्येक नेत्याला साहेब म्हणण्याची सवय आहे.मात्र ख-या अर्थाने साहेब हे नाव ज्या नेत्याला अगदी चिकटून बसलंय.ते म्हणजे बाळ केशव ठाकरे..अर्थात बाळासाहेब ठाकरे.गेली चाळीस वर्षात या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदरांच, मानाचं आणि धाकाचंही स्थान मिळवलंय.. महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनचा आजवरचा इतिहास लिहायचा झाल्यास बाळासाहेब ठाकरे ह्या नावाला टाळून पुढं जाणं अशक्य आहे.
काही व्यक्ती ह्या त्यांच्या जिवंतपणीच अगदी दंतकथा बनून गेल्या असतात..मला आठवतय 1992 साल..मी तेंव्हा जेमतेम नऊ वर्षाचा असेल.आंम्ही सारे त्यावर्षी दक्षिण भारतामध्ये प्रवास करण्यास गेलो होतो.त्या वर्शी आंम्ही जाऊ तिथं आंम्ही महाराष्ट्रीयन आहोत हे कळाले की दक्षिण भारतीय लोक बाळासाहेब ठाकरेंविषयी विचारत.त्यानंतर 2005 साली मी दिल्लीला गेलो होतो.त्याही ठिकाणी मी मराठी आहे हे समजताच दिल्लीकर लोक आंम्हाला आधी बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतचं विचारत.दिल्ली पासून अगदी कन्याकुमारी पर्यंतच्या भारतीयांच्या मनात सर्वात जास्त कुतूहल असलेले बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव मराठी नेते आहेत.गेली चाळीस वर्षे या नेत्यानं शिवसेना ही संघटना आपल्या मुठीत ठेवलीय.बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे एक अगदी घट्ट असं समीकरण आहे.
हे समीकरणं मुळात जन्माला आलं तो काळ मोठा विलक्षण आहे.महाराष्ट्र राज्याची स्थापना नुकतीच झाली होती.मराठी माणसांचं राज्य निर्माण झालं आपले सारे प्रश्न सुटतील असं वाटणारा एक मोठा समाज या राज्यात होता.मात्र नौकरी असो अथवा उद्योगधंदे प्रत्येक पातळीवर मराठी तरुण मागं पडलेत असं चित्र त्या काळात अनेकांनी दाखवायाला सुरु केली होती (हेच चित्र आजही अनेक जण रंगवतात ) वाचा आणि स्वस्थ बसा या नावाची मालिकाचं त्याकाळी बाळासाहेब ठाकरेंचे मार्मिक हे साप्ताहिक चालवत असे.मराठी माणसांच्या असंतोषाचा असा संपूर्ण वापर करत बाळासाहेबांनी 19 जून 1966 या दिवशी शिवसेनेची स्थापना केली.आज या घटनेला 42 वर्षे झाली आहेत.ज्या उद्देशाकरता शिवसेनेची स्थापणा झाली आहे त्यामधले किती प्रश्न अजून सुटले आहेत,याचा विचार सर्वच मराठी माणसांनी यानिमीत्तानं कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता शांतपणे करायला हवा.
रस्त्याच्या नाक्यावर टर्रेबाजी करणा-या,कोणत्याही मुद्यावर राडे करण्यास तयार असलेला संतप्त मराठी युवक हे शिवसेनेचं सर्वात मोठं बलस्थान होत.याच पोरांच्या जोरावर बाळासाहेबांचा आवाज सा-या राज्यभर आणि देशभर पोचला.बाळासाहेबांची आज जी लार्जर दॅन लाईफ अशी इमेज झालीय..ती इमेज बनवण्यात याच पोरांचा सर्वात जास्त वाटा आहे.
काही कालावधीनंतर शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिका आली...ठाणे,औरंगाबाद या महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला.सेनेचे आमदार,खासदार निवडूण आले.1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. खर तर शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा कालखंड ठरला असता. मराठी माणसांचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा उठता बसता गजर करणा-या शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रतल्या मतदारांनी कौल दिला होता.मला मान्य आहे तूंम्ही साडेचार वर्षात राज्य बदलू शकत नाहीत मात्र तूमच्याकडं ते बदलण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे हे तरी दिसायला हवं..परंतु त्या साडेचार वर्षात किंवा त्या कालावधीचा अभ्यास करत असताना आजही ही इच्छा शक्ती युती सरकारमध्ये होती असं आज वाटत नाही.युती सरकारचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातामध्ये होता असे मा.बाळासाहेब ठाकरे देखील या अपयशाला तेवढेच जवाबदार आहेत.
माझं हे बोलणं काहींना अतातयीचं वाटेल परंतु युती सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा मला होत्या.त्यामुळे या सरकारच्या अपयशी कामगिरीचं शल्य मला डसतय..ज्या एनरॉन करारला अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा या नेत्यांनी केली होती.त्य़ाच नेत्यांनी या कंपनीकरता लाल गालीचा अंथरला. धारावीतल्या झोपडपट्टीवासीयांना मोफत घर का बांधीन देण्याच्या 'ठाकरी' घोषणेचाही असाच बोजावरा उडाला..वीजेच्या बाबतीत एकेकाळी स्वयंपूर्ण असणारा महाराष्ट्र अंधारात बुडाला..मुंबईत घुसणारे बांगलादेशी लोंढे कमी झाले नाहीत,लालाबाग-परळ या भागातल्या मराठी कामागारांची झाडाझडती थांबली नाही. तरीही युतीचे हे नेते त्यांच्या युवराजानं प्रायोजीत केलेल्या मायकल जॅक्सनच्या शो मध्ये गुंग होते.विचार करा मायकल जॅक्सनला कोणी कॉँग्रेसी नेत्यानं मुंबईत आणलं असत...तर बाळासाहेबांनी किती गजहब केला असता..हा कोण अमेरिकी XXX म्हणून सा-या मुंबईत शिमगा करायला त्यांनी कमी केलं नसंत. पण लाडक्या युवराजाचा हट्ट पुरवण्यास सारं युती सरकार सज्ज होतं..एक मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग सोडला तर युती सरकारच्या कालावधीत फारसं चांगलं काय घडलं हेच आता आठवावं लागतं..
युतीचं सरकार पडलं, 2004 मध्ये अगदी अनुकूल वातावरण असतानाही युतीला सत्ता मिळवता आली नाही.याही वर्शी सत्ता मिळवण्यासाठी युतीमधल्या सर्वच नेत्यांना एकदिलानं अतिशय नेटानं प्रयत्न करावे लागतील. द्रमुक,तेलगू देसम,आसाम गण परीषद,अकाली दल यासारख्या प्रादेशीक पक्षांनी स्वत:च्या जीवावर आपआपल्या राज्यात सत्ता मिळवली आहे. शिवसेना बा महाराष्ट्रातला प्रादेशीक पक्ष स्वबळावर सत्ता मिळवेल अशी शक्यता नजीकच्या कालावधीमध्ये तरी कुठही दिसत नाही.मला वाटतं बाळासाहेबांच अनिश्चीत आणि लहरी राजकारणाचा हा परिणाम आहे.
अशा प्रकारचे मुद्दे अनेक सांगता येतील तरीही बाळासाहेबांचा करीष्मा कमी होत नाही.एक रोखठोक बिनधास्त आणि मनस्वी माणूस अशीच त्यांची प्रतिमा आहे.त्यांचा दबदबा इतका आहे की छगन भूजबळ,नारायण राणे राज ठाकरे यासारखे नेते त्यांना वंदन करुनचं आपली बंडखोरी रेटत असतात.
आपल्या एका शब्दावर पेटून उठणारे, आपल्या आयुष्याची होळी करणारे युवक आपले अनुयायी असावेत असं प्रत्येक नेत्याची महत्वकांक्षा असते.बाळासाहेब या बाबतीत नेहमीच श्रीमंत राहीले आहेत.महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर अशी श्रीमंती खचितच एखाद्या मराठी नेत्याच्या वाटेला आली असेल.
बाळासाहेब ठाकरे ही एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी ठरवलं सतं तर राज्याचा इतिहास हा बराच बदलला असता,...राज्याचा इतिहास बदलण्याची क्षमता असलेल्या या अत्यंत कमी नेत्यामंध्ये बाळासाहेबांच स्थान वरचे आहे. आपल्या शक्तीचा आणि क्षमतेचा या माणसांनं पूर्णपणे वापर खरचं केला का ? असा प्रश्न मला नेहमी पडतो..राज्याच्या इतिहासातील या झंझावती 'बाळ' पर्वाचा अभ्यास करत असताना मराठी माणसांनी खरचं अगदी शांतपणे कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता याचा विचार करायला हवा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...