अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातील मिनेएपोलीस शहरात जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन - अमेरिकन नागरिकाचा पोलीस अटक करताना मृत्यू झाला. या घटनेची दृश्य अंगावर शहारे आणणारी आहेत. त्याचबरोबर जगाची कोतवाली करणाऱ्या अमेरिकन व्यवस्थेचा हिंस्त्र चेहरा दाखवणारी आहेत. या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कारवाई ही व्हायलाच हवी यामध्ये कोणतेही दुमत नाही. मिनेएपोलीस शहरात जे घडलं हे अत्यंत दुर्दैवी असलं तरी ते अमेरिकेत पहिल्यांदा घडलेलं नाही.
अमेरिकेला वर्णद्वेषी घटनांचा मोठा इतिहास आहे. मात्र ही हत्या झाल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेतल्या प्रमुख शहरांमध्ये आंदोलन सुरु झाले. चायनीज व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये असलेली अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांमधील मंडळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. या सर्व आंदोलनात ANTIFA ( anti fascist political activist movement ) या अति डाव्या संघटनेचा सहभाग असल्याचा ठपका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला आहे. ट्रम्प यांनी या संघटनेला दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केल्याने पुन्हा एकदा जागतिक स्वातंत्र्याची लढाई ऐरणीवर आल्याची तक्रार नेहमीच्या काही मंडळींकडून केली जातेय.
अँटिफा काय आहे ?
'नावात काय आहे ?' हे शेक्सपियरचे जगप्रसिद्ध वाक्य खरं करणारी संघटना म्हणजे अँटिफा. जर्मनीमध्ये 1930 च्या दशकात या संघटनेची स्थापना झाली. त्यावेळी जर्मनीमधील हिटलरची नाझी राजवट आणि युरोपातील फॅसीझम पर्यायाने हुकुमशाही विचार रोखण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली, असा संघटनेचा दावा आहे. या संघटनेचे नावही तेच सांगतं. मात्र या संघटनेची स्थापना ही जर्मनीच्या कम्युनिस्ट पार्टीने केली होती. या संघटनेची निष्ठा ही सोव्हिएट युनियनचा त्यावेळेसचा सर्वेसर्वा आणि विसाव्या शतकातील प्रमुख हुकुमशहा जोसेफ स्टॅलिनच्या चरणी होती.(1) हिटलरचा नाझीवाद रोखण्यासाठी फॅसिझम विरोधी चळवळीचे नाव घेत स्टॅलिनचा अजेंडा चालावयचा अशी अँटिफा संघटनेची तेंव्हाची कार्यपद्धती होती. त्यामुळे शेक्सपियरचे 'नावात काय आहे?' हे जगप्रसिद्ध वाक्य खरी करणारी संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिले पाहिजे.
दुसरे महायुद्ध संपले. जर्मनीतील हिटलशाही समाप्त झाली. जर्मनीची फाळणी झाली. पूर्व जर्मनीत कम्युनिस्ट तर पश्चिम जर्मनीमध्ये लोकशाही राजवट सत्तेत आली. अँटिफा संघटना पूर्व जर्मनीत सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीचा भाग बनली. ( 1) पश्चिम जर्मनीमध्ये त्यांनी डाव्या संघटनांच्या माध्यमातून आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. जर्मनीत कालांतराने बर्लीनची भिंत कोसळली. पूर्व जर्मनीची कम्युनिस्ट राजवट इतिहासजमा झाली. एकत्र जर्मनीत लोकशाही व्यवस्था आली. त्यावेळी पुन्हा एकदा जर्मनीत हिटलरच्या नवनाझी चळवळ डोकं वर काढत असल्याचं सांगत अँटिफा संघटना सक्रीय झाली. वास्ताविक जर्मनीतील नवनाझीवाद रोखण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हा एकमेव उपाय असला पाहिजे. परंतू कम्युनिस्टांच्या सावलीत वाढलेल्या या संघटनेला तो मार्ग मान्य नाही.
अँटिफा इन अमेरिका
जगातील सर्वात बलाढ्य भांडवलशाही देश म्हणजे अमेरिका. कोल्ड वॉरच्या काळातील सोव्हिएत संघ आणि कम्युनिझमचा प्रमुख शत्रू. अमेरिकेत या संघटनेची चळवळ 1980 च्या दशकात सुरु झाली. राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी सुधारणांची वाट न पाहता थेट कृतीवर भर देणे हा या चळवळीचा उद्देश आहे. अमेरिकेतील हुकूमशाही विरोधी, मार्क्सवादी, समाजवादी आणि अराजकत्वाची मंडळी या चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र आलेली आहेत. या चळवळीचा झेंडा देखील जर्मनीतल्या अँटिफा चळवळीशी निगडीत असून साम्यवाद आणि अराजकता याचे प्रतिनिधित्व करतो. ( 2)
ज्या संघटनेचा झेंडाच अराजकतेचे प्रतिनिधित्व करतो ती संघटना लोकशाही जपणारी आणि मानवतावादी तत्वांचे संरक्षण करणारी कशी असू शकेल ? या संघटनेची कार्यपद्धती देखील अराजकता पसरवणारी आहे. विरोधी संघटनेनं निश्चित केलेल्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी ते सर्व मार्ग अवलंबतात. विरोधी व्यक्तीची सभा किंवा कार्यक्रम उधळणे, त्या सभेला उपस्थित राहणाऱ्या लोकांचा विरोध करणे, त्यासाठी प्रसंगी हिंसाचार करणे त्यांना मान्य आहे. ऑनलाईन ट्रोलिंगवरुन आपल्याकडे हल्ली बरीच चर्चा होते. आपल्याकडचे ट्रोलर्सलाही लाजवतील अशा प्रकारचे डिजिटल उद्योग ही मंडळी करतात. इतकेच नाही तर आपल्याला विरोधी विचारांच्या व्यक्तीला नोकरीवरुन काढून टाकण्यासाठी देखील ही संघटना प्रयत्नशील असते.
दहशतवादी चेहरा
या संघटनेचा दहशतवाद कसा चालतो याचे अनेक व्हिडिओ ऑनलाईन उपलब्ध आहेत. हा एक प्रातिनिधिक व्हिडिओ इथे देतोय. (https://www.youtube.com/watch?v=DZ02eeYPKEU ) कॅनडामधील एक कार्यक्रम अँटिफा संघटनेनं आपलं टार्गेट असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा कार्यक्रम उधाळण्यासाठी या संघटनेचे मंडळी या कार्यक्रमस्थळी सज्ज होते. या कार्यक्रम स्थळासमोरचा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या वृद्ध महिलेलाही या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करुन रोखलं. पीडित वृद्ध महिलेच्या वयाचा त्यांनी काहीही विचार केला नाही. या संघटनेसाठी ही पीडित वृद्ध महिला ही नाझीवादी होती. या महिलेला रस्ता ओलांडण्यापासून रोखणे म्हणजे जगातील नाझीवाद रोखण्यासारखे आहे असे या मंडळींना वाटत होते.
शाळेत असताना अनेकांना वाटतं की, इंग्रजांच्या काळात जन्मलो असतो तर देश स्वतंत्र करण्यासाठी जोरदार लढाई केली असती. या भाबड्या स्वप्नातून पुढे बहुतेक बाहेर येतात. काही त्याच स्वप्नात जगत असतात. त्यांना आपला देश सतत पारतंत्र्यात असल्याचा भास होत असतो. डोळ्यांवर स्वप्नांचा पडदा लावणारी मंडळीच अँटिफा सारख्या अति डाव्या संघटनेची सदस्य होतात.
या संघटनेच्या सदस्यांचा आदर्शवाद हा दुटप्पी असतो. नाझीवादाविरोधातली, हुकूमशाही राजवटीविरोधातील त्यांची लढाई फसवी आहे. याचे कारण म्हणजे ही मंडळी कधीही इराण, चीन किंवा उत्तर कोरियामध्ये निदर्शनं करत नाहीत. हाँगकाँगवासियांच्या हक्काच्या लढ्यात सहभागी होत नाहीत. कम्युनिस्ट देशात आंदोलन केलं तर आपल्याला गोळ्या घातल्या जातील हे त्यांना पक्के माहिती असतं. त्यामुळे ते फक्त लोकशाही राजवटीमध्ये गोंधळ घालतात
आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर लढाई लढण्याचा किंवा राजकीय सुधारणांसाठी प्रयत्न करण्याचा संयम त्यांच्यात नाही.
आपले 'हेट टार्गेट निश्चित करणे' आणि ते साध्य करण्यासाठी कुणालाही मारहाण करणे हे या संघटनेचे काम आहे. आपले ऐकत नाही तो विरोधक आणि विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हिंसाचार करणे हाच फॅसिझम आहे. फॅसिमझचा विरोध नावात घेऊन जन्म घेणारी संघटना देखील फॅसिझमचाच वापर करतेय. अशा प्रकारच्या विरोधामुळे काही मंडळींमध्ये दहशत निर्माण होईल पण त्यामुळे तुमच्या विरोधकांचे तसेच त्रयस्थ व्यक्तींचे मतपरिवर्तन होणार नाही. उलट अशी चळवळ नष्ट करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या झेंड्याखाली ही सारी मंडळी निर्धाराने एकत्र येतील.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर या संघटनेनं मोठ्या प्रमाणात उपद्रवमुल्य दाखवण्यास सुरुवात केलीय. या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत मृतप्राय झालेली संघटना ट्रम्प राजवटीमध्ये पुन्हा कशी जागी झाली ? या संघटनेला कोण छुपी मदत करत आहे ? ट्रम्प विरोधासाठी देशाची शांतता धोक्यात आणण्याची तयारी असलेला वर्ग मानवी हक्काचा रक्षणकर्ता कसा असू शकतो ?
बंदी कशी घालणार ?
डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी घालताच 'ही संघटना प्रचलित संघटनेपेक्षा वेगळी आहे' 'या संघटनेची नेमकी सदस्यसंख्या नाही' 'अमेरिकन कायद्यात अशी तरतूद नाही' असा प्रचार करत अँटिफाला पाठिशी घालण्याचे उद्योग सुरु झालेत. काळा ड्रेस, काळे मुखवटे घालून फिरणाऱ्या अँटिफा संघटनेच्या सदस्यांचा विचारही काळाच आहे. त्यामुळेच आपले खरे चेहरे जगाच्यासमोर येऊ नये म्हणून ते मुखवट्याआड लपतात. जंगलात लपून सुरक्षा संघटनांवर किंवा पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी/ नक्षलवादी आणि अँटिफाचे कार्यकर्ते या दोघांमध्ये हे एक महत्त्वाचे साम्य आहे.
दहशतवादी / नक्षलवादी संघटनेचे कार्यकर्ते कुठेही लपले असतील तरी त्यांना शोधणे आणि कायदेशीर मार्गाने शिक्षा करणे हे तपास यंत्रणांचे काम असते. ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे अँटिफाच्या सदस्यांना शोधण्याची आणि त्यांचे जाळे नष्ट करण्याची मोहीम वेग घेणार आहे. या संघटनेला भविष्यात नवे सदस्य मिळण्यास देखील यामुळे अडथळा निर्माण होईल. अमेरिकन कायद्यातील काही तरतूदी यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या असतील तर त्या बदलण्यासाठी ट्रम्प प्रशासन पुढाकार घेईल हे त्यांच्या मागील साडेतीन वर्षांच्या अनुभवावरुन नक्की सांगता येऊ शकते. त्याचबरोबर अमेरिकेनं अँटिफाला दहशतवादी संघटना घोषित केल्याने अन्य देशही या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकतात.
ट्रम्प यांना असे हरवणार ?
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. चार वर्षांपूर्वी या काळात डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या आणि पर्यायाने जागतिक राजकारणात आगमन झाले होते. 2016 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सहा महिन्याच्या पूर्वीपासून ते निकाल लागण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ट्रम्प निवडणूक हरणार यावर अमेरिकेतल्या प्रस्थापितांचे एकमत होते. त्यांच्या सततच्या प्रचारामुळे हिलरी क्लिंटन यांच्या शपथविधीची आता केवळ औपचारिकता बाकी आहे, असे जगभर वातावरण होते. प्रत्यक्षात प्रस्थापितांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प 2016 साली अमेरिकेचे अध्यक्ष बनले.
ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणूक प्रचारात 'अमेरिका फर्स्ट' ही घोषणा दिली होती. त्यांचा संपूर्ण कारभार हा याच घोषणेच्या भोवती सुरु आहे. अमेरिकन अध्यक्षांना जागतिक राजकारणात लुडबूड करण्याची आणि शस्त्रास्रांच्या बाजारपेठेला चालना देणारे कार्यक्रम राबवण्याचा इतिहास आहे. इतर देशांच्या भानगडीत कमीत कमी नाक खुपसणारा अमेरिकन अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांची इतिहासात नोंद होणार आहे. त्यांनी ट्विटरवरुन उत्तर कोरिया किंवा इराणला वाट्टेल त्या भाषेत धमकी दिली, पण शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या बराक ओबामापेक्षा ट्रम्प राजवटीमध्ये इतर देशांवर बॉम्बिंग कमी झाले हे सत्य आहे.
जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर आफ्रिकन- अमेरिकन नागरिकांवर अमेरिक होत असलेला अन्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन - अमेरिकन अध्यक्ष. ओबामांनी त्यांच्या रंगाचे जगभर मोठ्या खुबीनं मार्केटिंग केले त्यामुळे जगभरातील उदारमतवादी मंडळींचा ओबामा चेहरा बनले. ट्रम्प हे हेकट, लहरी आणि धंदेवाईक आहेत हे मला मान्य आहे. अमेरिकन वंशाचा अभिमान बाळगाणारी मंडळी हे ट्रम्प यांचे भांडवल आहे. या भांडवलाला रिटर्न्स देण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करत असतात. ओबामा तर उदारमतवादी, समंजस, समतेचा पुरस्कार करणारे, वचिंत मंडळींमधून मोठे झालेले अध्यक्ष होते. त्यांच्या राजवटीमध्ये आफ्रिकन- अमेरिकन नागरिकांवरील हल्ले का थांबले नाहीत ?
अमेरिकेला गुलामगिरीचा मोठा इतिहास आहे. ही प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. अमेरिकेतील पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील महानगरांमध्ये वर्णद्वेषाचे प्रमाण कमी झालंय. पण ग्रामीण भागात आणि मध्य अमेरिकेत हे प्रमाण आजही कायम आहे, असे अमेरिकेत राहत असलेले किंवा तिथे राहून आलेली भारतीय मंडळी सांगतात. वर्णद्वेषाची पंरपरा नष्ट करण्यासाठी ट्रम्प यांच्यापूर्वीच्या अध्यक्षांनी किती प्रयत्न केले ? त्यांनी प्रयत्न केले हे मान्य केले तरी त्यांना वर्णद्वेष संपवता आला नाही ही वस्तूस्थिती आहे. अशा परिस्थितीत फ्लॉईड हत्येनंतर अमेरिकेतल्या वर्णद्वेषी वातावरणासाठी ट्रम्प यांना दोषी धरणे किती योग्य आहे ?
चायनीज व्हायरसचा मोठा फटका अमेरिकेला बसलाय. या व्हायरसचे उगमस्थान चीनमध्ये आहे. त्यामुळे याला चायनीज व्हायरस म्हंटले पाहिजे असे सांगणारे डोनाल्ड ट्रम्प हे प्रमुख नेते आहेत. WHO कडून चीनला झुकतं माप मिळतं असं सांगत त्यांनी या संघटनेतून अमेरिका बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. यावेळी ट्रम्प यांनी केलेलं भाषण हे ऐकण्यासारखे आहे. ( 3)
चायनीज व्हायरस आणि WHO चे धोरण यामुळे अमेरिकेत लाखभर मंडळी मरण पावली असे ट्रम्प यांनी या भाषणात स्पष्ट केले. जगभर व्हायरस पसरवण्याची किंमत चीनने मोजली पाहिजे हाच ट्रम्प यांच्या भाषणाचा अर्थ आहे. ट्रम्प हे अमेरिकन राष्ट्रवादाला चालना देत असताना अमेरिकेतील डावी मंडळी ही अँटिफा सारख्या संघटनेला हाताशी धरुन अमेरिकेतल्या प्रमुख शहरांमध्ये हिंसाचार करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मतांच्या ध्रुवीकरणाचा आरोप करणारी मंडळी हिसांचाराच्या माध्यमातून ध्रुवीकरण नाही तर 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ' अशी गाणी गात आहेत का ? ट्रम्प यांच्या चीन विरोधी भूमिकेला या हिंसाचारामुळे अडथळा निर्माण होतोय. त्याचबरोबर या हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरल्याने अमेरिकेत पुन्हा एकदा चायनीज व्हायरसचा उद्रेक होण्याची भीती आहे. याचे भान ट्रम्प विरोधकांना नसले तरी ही जाणीव अमेरिकन मतदारांना नक्की असेल.
एखाद्या व्यक्तीवर सतत टिका होत असेल तर त्यामागे टिकाकारांचा काही अजेंडा असू शकतो हे जगाला आता समजलंय. 2014 आणि 2019 मध्ये भारतात हेच झालं. अमेरिकेत 2016 साली तेच घडलं.(4) आता डोनाल्ड ट्रम्प यांना खरंच हरवायचं असेल तर लढाईची ही पद्धत बदलली पाहिजे हे भान ट्रम्प यांच्या विरोधकांना येणे आवश्यक आहे.
अँटिफा या संघटनेला दहशतवादी ठरवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा देणं हे यासाठीच आवश्यक आहे. अराजकता आणि कम्युनिझम हा अजेंडा घेऊन काम करणाऱ्या या संघटनेचा फक्त ट्रम्प राजवटीला नाही तर जगातील प्रत्येक लोकशाही राजवटीला धोका आहे.
संदर्भ
3 comments:
Samuel Huntington यांचं हू आर वुई नावाचं पुस्तक तू वाचलच असशील त्यात त्यांनी अमेरिकन लोकशाहीच्या ज्या चिंधड्या उडवल्या आहेत आणि लक्तर टांगली आहेत त्यातून हेच सिद्ध होत की हे अँटीफा सारखे जीव तिथे कायमच वळवळ करत असतात. यातून शिकण्यासारखं एक आहे की जागतिक स्तरावर डाव्या विचारसरणीचा शत्रू एक आहे, संस्कृती एक आहे, तत्व एक आहेत कुठेही जा डावा हा तोच आणि एकप्रकारचा विचार करणारा असतो, त्याचा शत्रू पण एकच आहे पण उजवा सगळीकडे सारखा नाहीये तो पुन्हा वेगवेगळ्या उपासना पद्धतीत, भाषा,संस्कृती मधे विभागला गेला आहे त्यामुळे त्याची विचारसरणी बदलते त्याच लक्ष बदलत आणि शत्रू सुद्धा बदलत राहतात. याचा विचार करून जागतिक स्तरावर उजव्या विचारसरणीने एकत्र येऊन एक गट एक विचार एक शत्रू ठेवता येईल का याचा विचार करावा नाहीतर डावे पराभूत होणं कठीण आहे.
माहितीपूर्ण लेख। या विषयाचा पाठपुरावा करून नव्या घडामोडींचा मागोवा घेत असंच भाष्य आमच्यापर्यंत पोहोचवावं ही विनंती।
एक प्रश्न- आफ्रिकन अमेरिकन लोकांमध्ये इस्लामी धर्मांतरणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यासाठी काही celebs ना सुद्धा धर्मांतरित करण्यात आलं आहे अशी एक पोस्ट आज वाचली। हे खरे आहे का? यावर अधिक माहिती मिळाली तर बरे होईल
Post a Comment