Sunday, November 12, 2017

टिपू सुलतानचं सत्य


धर्मांधता आणि क्रूरतेच्या बाबतीमध्ये औरंगजेब हा सर्वात वरच्या दर्जाचा मुगल शासक मानला जातो. 50 वर्षांच्या राजवटीमध्ये औरंगजेबनं हिंदूंच्या जीवनपद्धती आणि परंपरेवर हल्ला केला. त्यांची देवस्थानं नष्ट केली. वेगवेगळे अन्यायकारक कर लावून त्यांना जगणं असह्य केलं. अनेकांचं बळजबरीनं धर्मांतर केलं. उत्तर भारतामधला बहुसंख्य भाग हा औरंगजेबाच्या टाचेखाली होता. सध्याच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरयाणा या राज्यातली हिंदूंनी पाच दशकं औरंगजेबाचा अन्याय सहन केला.

      औरंगजेबाचा हा वारसा दक्षिण भारतामध्ये टिपू सुलतान यानं चालवला.होय टिपू सुलतान. 'म्हैसूरचा वाघ' अशी ज्याची ओळख इतिहासाच्या पुस्तकांमध्ये केली जाते.ब्रिटीशांच्या विरोधात लढणारा थोर स्वातंत्र्य सेनानी म्हणून  डाव्या विचारवंतांना जो प्रात:स्मरणीय आहे  असा कर्नाटकतला मुस्लीम राजा टिपू सुलतान. 7 डिसेंबर 1782 ते 4 मे 1799 अशी साडेसोळा वर्ष टीपूनं राज्य केलं. सध्याच्या कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ अशा तीन राज्यांमध्ये त्याची राजवट होती. केवळ हिंदूचा नाही तर ख्रिश्चनांवरही टिपूनं साडेसोळा वर्षांच्या राजवटीमध्ये सर्वप्रकारे छळ केला.


           ब्रिटीश इतिहासकार लेविस राईस यांनी 'द हिस्ट्री ऑफ म्हैसूर अॅण्ड कूर्ग' या पुस्तकामध्ये लिहलंय, ''टिपू सुलतानच्या राजवटीच्या शेवटच्या कालखंडामध्ये श्रीरंगपट्टणमधल्या फक्त दोन मंदिरामध्ये रोजची पुजा होत असे. ही मंदिरं देखील टिपूची खुशमस्करी करणाऱ्या ज्योतिषांच्या ताब्यात होती. त्यामुळे आपल्या खुशमस्कऱ्यांना खिरापत म्हणून टिपूनं या दोन मंदिरांना धक्का लावला नाही. टिपूनं अन्य सर्व मंदिरांची  वेगवेगळे कर लावून जप्ती केली होती.

         समानता आणि सुधारणावादी तत्वांची टिपू जपणूक करत होता.टिपूचं म्हैसूर राज्य हे याच तत्वांवर आधारित आहे, अशी मांडणी अनेक पुरोगामी इतिहासकारांनी केलीय. पण म्हैेसूरचेच असलेले एम.एच. गोपाळ राव यांनी याबाबत काय म्हंटलंय हे पाहणं महत्वाचं आहे, आपल्या एका लेखात गोपाळ राव लिहतात ''टिपू सुलतानच्या राज्यातली करपद्धती ही धार्मिक असमानतेवर अधारित होती. आपले सहधर्मी असलेल्या मुसलमानांना  गृह कर, व्यापारी कर तसंच घरातील मौल्यवास्तूंवरील कर माफ होते. ज्यांनी धर्मांतर करुन मुस्लिम धर्म स्विकारला आहे अशा  कुटुंबांनाही ही सवलत होती. इतकंच नाही तर धर्मांतरीत कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही टिपू सुलतानकडून केला जात असे. सर्व सरकारी पदांवरुन त्यांनी हिंदूंची हकालपट्टी केली होती. टिपूचा पंतप्रधान पुर्णेया हा एकमेव हिंदू अधिकारी टिपूच्या राजवटीमध्ये होता. टिपूनं आपल्या या स्वामिनिष्ठ चाकरला शेवटपर्यंत अंतर दिलं नाही.''

             
   म्हैसूर राज्याची भाषा ही पार्शियन करण्याचा प्रयत्न टिपू सुलताननं केला.  आपल्या राज्यातल्या अनेक गावांची नावंही त्यानं बदलली होती. म्हैसूरचं नझाराबाद, मंगळूरचं जलालाबाद, कनवपुरमचं खुशानाबाद, दिंडूगुलंचं खलीकाबाद आणि कालिकतचं इस्लामाबाद असं टिपूनं नामकरण केलं होतं. टिपूच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी पुन्हा एकदा एक होत ही सारी नावं बदलली.

    कुर्ग, बिदनूर आणि मंगळूर या कर्नाटकातल्या तीन शहरांमध्ये टिपू सुलतानं आपल्या धर्मवेडातून अक्षरश: रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. 1788 साली टिपूनं कुर्गवर हल्ला केला होता. या हल्ल्याचं वर्णन टिपूचे दरबारी आणि आत्मचरित्रकार मीर हुसेन किरमानी यांनी केलंय.  ''या हल्ल्यात 'कुशालपुरा, ( सध्याचं कुशालनगर ), तलकावेरी आणि मडकेरी ही गावं जाळून टाकली होती.'' असं किरमानी लिहतात. टिपू सुलताननं कर्नुलच्या नवाबाला लिहलेल्या पत्रामध्येही कुर्ग राज्यातल्या 40 हजार हिंदूंचं धर्मांतर केलं किंवा त्यांना बंदी बनवलं असा उल्लेख आहे. टिपू इतक्यावरच थांबला नाही तर त्यानं कुर्गच्या राजकन्येचं अपहरणही केलं होतं. तसंच तिच्याशी बळजबरीनं लग्न करुन तिला त्यानं मुसलमान बनवलं. ब्रिटीशांविरुद्धच्या शेवटच्या लढाईत टिपू मारला गेला त्यावेळी देखील कुर्गमध्ये सुमारे एक हजार जण श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यामध्ये बंदी होते. टिपूच्या मृत्यूनंतर हे सर्वजण श्रीरंगपट्टणममधून कुर्गला परतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला.


        उत्तर कर्नाटकातल्या बिदनूरमध्येही  टिपूनं रक्ताचे पाट वाहिले अशी इतिहासामध्ये नोंद आहे.टिपूच्या सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी बिदनूरमधल्या अनेकांनी मुसलमान धर्म स्विकारला. मंगलोरवर स्वारी केल्यानंतर टिपूनं ख्रिश्चनांना लक्ष्य केलं. त्या भागातली चर्च पाडली. तसंच त्यांना सक्तीनं मुसलमान केलं. ब्रिटीशांचं दक्षिण भारतामध्ये वर्चस्व स्थापन होण्यापूर्वी मंगलोरवर अनेक वर्ष पोर्तुगिजांचं राज्य होतं. त्यांनी या भागातल्या मुसलमानांना ख्रिश्चन केलं होतं. या धर्मांतराची शिक्षा टिपूनं  दिली. तसंच ख्रिश्चन असलेल्या  ब्रिटीश राजवटीच्या विरोधात एकाच धर्मसमुहाचा म्हणजेच मुसलमानांचा समाज अधिक प्रखर झुंज देऊ शकेल असा टिपूचा युक्तीवाद होता.

कर्नाटकच नाही तर केरळमध्ये टिपूनं आपल्या धर्मवेडानं रक्ताचे पाट वाहिले आहेत. केरळमधल्या मलबार भागाला टिपूचा सर्वाधिक तडाखा बसला. त्या काळात मलबारमध्ये असलेले पोर्तुगीज मिशनरी Fr Bartholomew यांनी टिपूच्या अन्यायाचं वर्णन केलंय. ते लिहतात, " सुरवातीला 30 हजार रानटी माणसांनी आमच्यावर हल्ला केला. समोर दिसेल त्याला ठार मारणे किंवा त्याचं धर्मांतर करुन  त्यांना मुसलमान बनवणे हाच त्यांचा हेतू होता. त्यानंतर हत्तीवर बसलेल्या टिपू सुलतानची स्वारी राज्यात दाखल झाली. त्याच्यासोबतही आणखी 30 हजार सैन्य होतं. कालिकतमधल्या अनेक स्त्री-पुरुषांना त्यांनी फाशी दिली. बायकांच्या गुडघ्याला त्यांची लहान मुलं बांधून त्यांना मारुन टाकण्यात आलं. अनेक हिंदू आणि ख्रिश्चनांना नागडं करुन त्यांना हत्तीच्या पायाला बांधण्यात आलं. हत्तीच्या पायाखाली त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात आले. त्यांचं सक्तीनं धर्मांतर करण्यात आलं.  मुसलमानांशी लग्न लावून देण्यात आली. टिपूच्या सैन्यानं मी राहत असलेल्या गावावरही हल्ला केला होता. पण मी अनेक गावकऱ्यांसह बोटीतून नदी ओलांडली आणि माझा जीव वाचवला."


    केरळमधल्या थळी, थिरुवन्नूर, वरक्कल, पुत्तूर, गोविंदपूरम या सारख्या अनेक गावांमधली  मंदिरं टिपूनं जमिनदोस्त केली होती. 1792 च्या युद्धात टिपू पराभूत झाला. त्यानंतर श्रीरंगपट्टणममध्ये झालेल्या तहानंतर त्याची शक्ती क्षीण झाली. याच काळामध्ये या मंदिरांची पुन्हा एकदा उभारणी करण्यात आली. गुरुवायूर हे केरळमधलं महत्वाचं मंदिर टिपूच्या हल्ल्यातून बचावलं याचं श्रेय काही अंशी हैदरोस कुट्टी यांना जातं. हैदर अलीच्या राजवटीमध्ये धर्मांतरण केलेल्या कुट्टी यांनी संपत्ती कराच्या बदल्यात गुरुवायूरच्या मंदिराचं रक्षण केलं. तसंच  टिपूच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी गुरुवायूर मधली मुख्य मुर्ती ही त्रावणकोर राज्यामध्ये नेऊन ठेवली होती. टिपूची दहशत संपल्यानंतरच ही मुर्ती पुन्हा मंदिरात आणण्यात आली असंही मानलं जातं.



   टिपू सुलताननं श्रृंगेरी मठाला  मदत केली. उलट मराठ्यांनी 1791 साली या मठाची नासधूस केली होती. शंकराचार्यांच्या मठाला देणगी देणारा टिपू कसा धर्मनिरपेक्ष आहे. याचं वर्णन टिपूचं समर्थन करणारे मार्क्सवादी विचारवंत हमखास करत आले आहेत. ज्येष्ठ इतिहास लेखक श्री उदय कुलकर्णी यांनी आपल्या एका लेखात  एप्रिल 1791 मध्ये श्रृंगेरी मठामध्ये  जे घडलं ते सविस्तर लिहलंय.  हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे.  1790-92 या काळामध्ये मराठा सरदार टिपूच्या विरोधातल्या मोहिमेसाठी दक्षिणेत होते. त्यावेळी श्रृंगेरी मठावर मराठ्यांच्या कोणत्या प्रमुख सरदारांनी हल्ला केला नाही. तर पिंडारी या मराठा सैन्यातल्या एका गटानं हल्ला केला होता. पिंडारी हे मराठा सैन्यातले नियमित घटक नव्हते. त्यांच्यावर मराठा सरदारांचं थेट नियंत्रण नव्हतं. मराठा सैन्यानं दक्षिणेतल्या मोहिमांमध्ये जी वसूली केली त्यामध्ये पुरेसा हिस्सा न मिळाल्यानं पिंडारींचा गट नाराज होता. याच नाराजीतून संपत्तीची लूट करण्यासाठी श्रृंगेरी मठावर हा हल्ला झाला होता. अर्थात या हल्ल्याची दखल पेशव्यांनी गांभिर्यानं घेतली होती. पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या मोहिमेतले प्रमुख सरदार परशूरामभाऊ पटवर्धन तसंच अन्य मातब्बर मंडळींची याबाबत पेशव्यांनी कानउघाडणी केली.  त्यानंतर वर्षभरानंतर मराठा सरदारांनी श्रृंगेरी मठाला भेट देऊन शंकराचार्यांची माफी मागितली. तसंच त्यांना नुकसानभरपाई देखील दिली होती.

         भगवा जरीपटका घेऊन अटकेपार मजल मारणारे, शिवाजी महाराजांचे संस्कार  सांगणारे, औरंगजेबाच्या छळाची पर्वा न करता हिंदू धर्म न सोडणाऱ्या संभाजी महाराजांचा वारसा अभिमानानं मिरवणारे मराठा सरदार  श्रृंगेरी मठाची जाणीवपूर्वक नासधुस करतील यावर विश्वास ठेवणारे लोकं हे केवळ मार्क्सवादी इतिहासाकारांच्या लेखनाची पोथिनिष्ठ पारायणं करणारी मंडळीच असू शकतात.  याचबरोबर 1792 नंतरच्या काळात टिपूनं श्रृंगेरी मठाबद्दलचं आपलं धोरण जाणीवपूर्वक बदललं होतं.   मराठ्यांच्या एका टोळीनं हल्ला केल्यानं प्रक्षृब्ध झालेल्या शंकराचार्यांचे आशिर्वाद आपल्या राजवटीला मिळावे हा यामगील टिपूचा शुद्ध राजकीय हेतू होता. तसंच 1792 नंतर टिपूचा उतरता काळ सुरु झाला होता. प्रबळ आणि शिस्तबद्ध इंग्रजी फौजेच्या विरोधात आपला जीव वाचवण्यासाठी हिंदू धर्मातल्या काही मंडळींशी जुळवून घेऊन आपलं प्रतिमा संवर्धन करण्याचा प्रयत्न या काळामध्ये टिपूनं केला.  श्रृंगेरीतल्या शंकराचार्यांच्या मठाला टिपूनं दिलेली मदत ही याच कारणामुळे निव्वळ राजकारणाचा भाग म्हणून केली मदत होती.   

टिपू सुलतान हा ब्रिटीशांच्या विरोधात लढला म्हणून त्याला स्वातंत्र्यसेनानी म्हणून घोषित करणारी मंडळी  टिपूनं फ्रेंच सम्राट नेपोलियनला भारतामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं. याकडं दुर्लक्ष करतात. टिपूला हा देश इंग्रजांपासून मुक्त करायचा नव्हता. तर आपलं राज्य इंग्रजांपासून सुरक्षित ठेवायचं होतं. आपल्या राज्याच्या बदल्यात या देशाचा घास दुसरे साम्राज्यवादी असलेल्या फ्रेंचांच्या घशात भरवण्याची टिपूची आनंदानं तयारी होती.


           धर्मांध टिपूच्या अत्याचारानं इतिहासाची पानं भरलेली असतानाही टिपू सुलतानची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला. मुस्लिम समाजाच्या विकासाकडं लक्ष देण्याच्या ऐवजी काही तरी निरर्थक मुद्दे घेऊन आपली व्होट बँक मजबूत करणे हा काँग्रेसच्या निवडणूक यशाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळेच कुणीही फारशी मागणी केलेली नसतानाही कर्नाटक सरकारनं टिपू जयंती सरकारी पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकच्या जनतेची दोन गटांमध्ये विभागणी केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक गिरीश कर्नाड यांनीही टिपूच्या गौरवाचं 'सोनेरी पान' वारंवार कर्नाटकच्या जनतेपुढे मांडलं आहे. विजयनगर साम्राज्यातला कर्तबागार राजा आणि बंगळुरु शहराचा निर्माता केम्पेगौडा यांच्यापेक्षाही टिपू सुलतान त्यांना जास्त जवळचा वाटतो. त्यामुळेच बंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाला केम्पेगौडांच्या ऐवजी टिपू सुलतान यांचं नाव देण्याची मागणी गिरीश कर्नाड यांनी केली होती. अर्थात नंतर या विधानापासून कर्नाड यांनी माघार घेतली. बहुधा कर्नाटकामध्ये राजकीयदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या गौडा समाजाला दुखावणं चालणार नाही हे कर्नाड यांच्या हायकमांडनं  त्यांच्या लक्षात आणून दिलं असावं.

      गिरीश कर्नाड हे कट्टर टिपू प्रेमी आहेत. '' टिपू सुलतान हे मुसलमान ऐवजी हिंदू असते तर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा जो दर्जा आहे तो दर्जा टिपू सुलतान यांना कर्नाटकात मिळाला असता '' असंही विधान त्यांनी केलं होतं. 'शत्रूच्या राज्यातल्या गवतालाही हात लावू नका' असं आपल्या सैन्याला बजावणारे शिवाजी महाराज आणि शत्रूचं सारं काही लुटणारा आणि संपूर्ण देशात इस्लाम हा एकच धर्म असेल अशी स्वप्न पाहणारा टिपू हे एकसारखेच असल्याचं या वाक्यातून कर्नाड स्पष्ट करत आहेत.

   तसंच भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मामुळे नाही तर त्याच्या धर्मामुळे महत्व मिळतं हे देखील कर्नाड यांनी यामधून सांगून टाकलंय. समाजतला बुद्धीजीवी व्यक्तीच अशा प्रकारची मांडणी करत असेल तर सामान्यांकडून काय अपेक्षा ठेवणार. त्यांची धार्मिक आधारावर फाळणी करणं हे राजकारण्यांना सहज शक्य आहे. राजकारणी आजवर तेच करत आले आहेत.

       स्वातंत्र्य लढ्याचं स्मरण करत असताना महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार पटेल यांच्याबरोबरच त्याच दमात मौलाना आझाद, खान अब्दुल गफार खान यांची नावं घेतली जातात. ही नावं घेताना या यादीमधली मंडळी हिंदू आहेत की मुसलमान आहेत याचा कुणी विचार करत नाही. ती स्वातंत्र्यसेनानी आहेत हीच त्यांची ओळख पुरेशी असते.  पण आपल्याच सोयीनं इतिहास वाचला जावा असा हट्ट धरणाऱ्या मंडळींकडून  टिपू सुलतान  जयंती साजरी करण्यात येतीय. हिंदूंनी टिपू  जयंती साजरी करणं म्हणजे ज्यूंनी हिटलर जयंती साजरी करण्यासारखं आहे. ही जयंती साजरी करणं हे धर्मनिरपेक्षतेचं प्रतिक असेल तर आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेची व्याख्या नव्यानं करण्याची वेळ आता आली आहे.

10 comments:

Niranjan Welankar said...

फार फार जोरदार आणि अभ्यासपूर्ण लेख. फार ताकतीने लिहिलंय. आपण विसरत चाललेल्या इतिहासाचीपण छान माहिती दिली आहे! अभिनंदन. पण विषय गंभीर आहे.

इकडे-तिकडे-काकडे said...

एकदम सही वा..

Ashutosh said...

एकदम सही. खरी माहिती.

Unknown said...

चोख व चफकल वर्णन !

Swapnil said...

ओंकार, अभिनंदन आणि धन्यवाद !

अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहेस.
आपलं दुर्दैव हे की या सर्व इतिहास खुणा शाळेतील क्रमिक पुस्तकात कधीही दिसत नाहीत. किंबहुना, त्या राजकीय हेतूंनी विपर्यास करून शालेय अभ्यासक्रमात आणल्या जातात.
ज्या देशात इतिहासाशी अशाप्रकारे हेतुपुरस्सर हेळसांड होते तिथे नवीन पिढीकडून देशभक्तीची अपेक्षा करणे देखील चुकीचे ठरेल.

Santosh Gunale said...

खुप छान लिखाण आहे.
इतिहाचि दुसरि बाजू मांडली आहे...

rash said...

माहितीपूर्ण लेख ओंकार...

Unknown said...

Onkar saheb aapale shikshan kay zhale sangam ka?
Aani yatil sagli mahitib khoti aahe jara karnatak madhe jaun tipu sultan vishayi chauukashi kara mag kalel te kon hote te.
Maharashtra madhye jase chatrapati shivaji maharaj aahet tase karnatakache te chatrapati aahet .
Tumchya lekha varun ase kalate ki tumhi kattar hindutv wadi aahat.
Kahi chukich bolalo asel tar maaf kara pan jara nit abhyas kara tipu baddal. Bye

Suhas Joshi said...

फारच छान व नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.फक्त एकच गिरिश कर्नाडांना बुद्धिजीवी म्हणणं व ते टिपू सुलतानाचा उदोउदो करत असतील तर सामान्यांचं काय असं जे म्हटलं आहे ते पटलं नाही.कारण निदान भारतात अशा ढोंगी लोकांपेक्षा सामान्यांना जास्तच कळतं कारण ते वास्तविक जीवन जगत असतात, गिरिश कर्नाडांसारखे कचकड्याच्या दुनियेत वावरत नाहीत..बाकी लेख उत्तम

Suhas Joshi said...

गिरिश कर्नाड सारखा कलावंत या रानटी टीपूचे गोडवे गात होता तेव्हाच त्याने आपल्या बेअक्कलीचं प्रदर्शन केलं होतं व त्या निमित्ताने या देशातले सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारे किती ढोंगी व स्वार्थी असतात याची सूज्ञांची परत एकदा खात्री पटली.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...