Friday, January 19, 2018

गंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल !



पाच महिन्यांपूर्वी श्रीलंकेचा श्रीलंकेत 3-0 असा सहज फडशा पाडून  टीम इंडिया टॉपवर होती. आजवर जे कुणालाही जमलं नाही ते विराट कोहलीच्या टीमनं करुन दाखवलं. आज पाच महिन्यानंतर हीच विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत व्हाईटवॉशच्या उंबरठ्यावर आहे. '25 वर्षाचा बदला' तर सोडाच पण आजवर  कोणत्याही भारतीय टीमवर ओढावली नाही अशा नामुष्कीचा याच 'विराट' सेनेला सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

     2015 च्या वर्ल्ड कपनंतरच्या सर्व टेस्ट या भारतानं घरच्या मैदानावर, जयवर्धने-संगकाराच्या निवृत्तीनंतर अजूनही सावरु न शकलेल्या श्रीलंकेत किंवा ज्यांचा टेस्ट क्रिकेटमधला रस केंव्हाच संपला अशा वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या होत्या. त्यामुळे साहजिक टीम इंडियाच्या यशाचा आलेख हा गेली दोन वर्ष टॉपवरच होता. याच टॉपच्या धुंदीमध्ये ही विराटसेना आजवर कोणत्याही भारतीय टीमला परदेशात जे जमलं नाही ते करु शकेल असा आत्मविश्वास कोच रवी शास्त्रींनी दक्षिण आफ्रिका सीरिजपूर्वी बोलून दाखवला. वास्ताविक 2011 नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 24 टेस्टमध्ये भारताला अवघी एक टेस्ट जिंकता आलेली आहे. तर 17 टेस्टमध्ये पराभव झाला. तरीही कोणत्याही सराव सामन्याशिवाय राखेतून फिनिक्स भरारी घेऊच या अविर्भावात विराट-शास्त्रीची ही टीम दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली होती.


    टीम इंडियाच्या यापूर्वीच्या पराभवात परदेशी खेळपट्यांवरील टिपीकल वातावरणाचा मोठा वाटा होता. या सीरिजमध्ये या टिपीकल वातावरणाच्या पडद्यामागे लपण्याची सोय नाही.  दक्षिण आफ्रिकेची इनिंग गडगडली, टिपकील चोकर्स वृत्तीतून त्यांनी विकेट्स गमावल्या,  बॅट्समन मोक्याच्या क्षणी रन आऊटही झाले आणि विशेष म्हणजे विराट कोहलीनं ज्याचं वर्णन 'फ्लॅट विकेट' असं केलं अशी खेळपट्टी भारताला बनवून दिली.तरीही भारतानं आपल्या हक्काचा विजायचा घास दक्षिण आफ्रिकेला आग्रहानं भरवला. सर्व अनुकूल संधी समोर असूनही त्या  लाथाडून खडतर आयुष्य जगणाऱ्या संतांची मोठी परंपरा या देशाला आहे. भारतीय क्रिकेटर्सनी  हा आध्यात्मिक वारसा चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीनं वापरलाय.

     1990 च्या दशकामध्ये भारतीय टीम कुठेही असो सर्वाधिक फोकस सचिन तेंडुलकरवर असायचा. आता सचिनची जागा विराटनं घेतलीय.  क्रिकेट विश्वातल्या सर्वाधिक एक्स्प्रेसिव्ह खेळाडूंमध्ये विराटचा क्रमांक हा वरचा आहे. तो मैदानावर प्रचंड उर्जेनं उतरतो. मैदानावरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो संपूर्णत: समरस झालेला असतो. सतत फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये बदल करणे ही त्याची कॅप्टनसीची पद्धत आहे. सेंच्युरीनमध्ये आफ्रिकेच्या दुसऱ्या इनिंगमधल्या शेवटच्या 15 ओव्हर्समध्ये त्यानं पाच बॉलर्स वापरले. (बहुधा ज्या बॉलर्सचा पार्थिवला विकेट किपिंग करताना त्रास झाला त्याला पुढच्या मॅचमध्ये बाहेर बसवण्याचा विराटचा विचार असावा ) मैदानात सक्रीय असणं ही चांगली कॅप्टनसी मानली जाते, पण याचा अतिरेक हे स्वत:वर विश्वास नसल्याचं लक्षण आहे. तुमच्या डोक्यात नक्की योजना तयार नाही हा यामधून अर्थ निघतो. हेच अपुरे नियोजन टीमच्या निवडीमध्ये उतरल्यानं  गोंधळ आणखी वाढलाय.

       विराटनं आजवर 34 टेस्टमध्ये कॅप्टनसी केली आहे. या 34 टेस्टमध्ये त्यानं आजवर एकदाही सलग दोन टेस्टमध्ये एक टीम खेळवलेली नाही. या सीरिजमधल्या पहिल्याच टेस्टमध्ये टीम मॅनेजमेंटनं अजिंक्य रहाणेला वगळून रोहितला खेळवलं. या निर्णयाचा  'अजिंक्य अंतिम 11 मध्ये असेल याचा कुणीही विचार केला नव्हता' असा भक्कम बचाव विराटनं केला. हे असं इतकं काळं आणि पांढरं सांगून अजिंक्य रहाणेला आपण चुकीचा संदेश देत आहोतच पण त्याचबरोबर रोहित शर्मावरही अनावश्यक दबाब वाढवतोय याचं भान विराटनं जपलं नाही.


     सेंच्युरीयन टेस्टमध्ये भुवनेश्वर कुमारला वगळण्याचा निर्णय तर आणखी धक्कादायक होता. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध कोलकाता टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्यानंतर लगेच भुवनेश्वरला बाहेर बसवण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर होताच. भारतीय मैदानावर सर्वच जण बहारात असताना ते झाकून गेलं. दोन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेतही त्यानं ही परंपरा जपली. केपटाऊन टेस्टमध्ये केवळ बॉलिंग नाही तर बॅटिंग करतानाही भुवनेश्वर पहिल्या टेस्टमध्ये सर्वोत्तम टचमध्ये होता. सेंच्युरियनमध्ये जम बसलेल्या विराटला त्यानं नक्कीच उत्तम साथ दिली असती. सेंच्युरीयन टेस्ट सुरु होण्यापूर्वी  टीम मॅनेजमेंटनं हा सुटकेचा दोर सिंहगडावरच्या लढाईत मावळ्यांनी कापावा तसा कापून टाकला. त्यामुळेच 2016 च्या टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून विराटची  निवड झाली त्यावेळी हा माणूस आपल्या टीममध्ये स्टिव्ह स्मिथ आणि जेम्स अँडरसन यांना वगळून रोहित शर्मा आणि ईशांत शर्माचा समावेश करेल असा पहिला विचार माझ्या मनात आला. असमान्य बॅट्समन आणि गोंधळलेला  कॅप्टन हे भारतीय टीमनं 90 च्या दशकामध्ये अनुभवलंय. आता 2018 मध्येही आपण पुन्हा एकदा या 90 च्या दशकाकडं वाटचाल करतोय.


     आक्रमक खेळण्याचा रवी शास्त्रीचा मंत्र घेऊन ही टीम इंडिया मैदानात उतरली होती. वर्षातल्या सर्वात महत्वाच्या टेस्टमध्ये नवोदीत कुलदीप यादवचा समावेश करणे ही आक्रमकता आहे. दिवस संपायला पाच ओव्हर्स बाकी असताना डेल स्टेनला पुढे येऊन आत्मघातकी फटका मारणे ही आक्रमकता नाही. विराट सर्वोत्तम खेळत असताना एक बाजू लावून धरायला हवी हा क्रिकेटमधला नैसर्गिक नियम अगदी काही दिवसांपासून क्रिकेट पाहणारा व्यक्तीही सांगेल. सेंच्युरीयनच्या पिचवर हार्दिक पांड्या तर बागेत धावात तसं धावला आणि मैदानाबाहेर गेला.

       हार्दिक बागेत बागडत होता तर चेतेश्वर पुजाराचं रनिंग बिटविन द विकेट पाहून हा माणूस कधीच पळून जाऊन लग्न करणार नाही असा विश्वास त्याच्या आई वडिलांना असेल याची खात्री त्यानं सेंच्युरियन टेस्टमध्ये घातलेला घोळ पाहिलेला कुणीही देईल. चौथ्या इनिंगमध्ये मॅच वाचवण्याची गरज असताना विकेट फेकणं म्हणजे राजाच्या गालावर बसलेली माशी माकडानं तलवारीनं उडवण्याचा मुर्खपणा करण्यासारखं किंवा ऐन अॅप्रायजलच्या पूर्वी बॉसशी भांडण करण्यासारखे आहे.


      वृद्धीमान सहा जखमी झाल्यामुळे सेंच्युरीयन टेस्टमध्ये उतरलेला पार्थिव पटेल जुन्या अनुभवातून काहीच शिकलाय असं वाटलं नाही. पार्थिव यापूर्वी 2004 साली जानेवारी महिन्यातच सिडनीमध्ये टेस्ट खेळला होता. त्याच्या गचाळ विकेटकिंपीगमुळे भारतानं ती टेस्ट जिंकून परदेशात सीरिज जिंकण्याची अलिकडच्या काळातील सर्वोत्तम संधी गमावली होती.  14 वर्षानंतर पुन्हा एकदा गचाळ किपिंग करत त्यानं पराभवातला आपला वाटा उचलण्याचं काम केलं. बुमराहच्या बॉलिंगवर एल्गाच्या बॅटची कड लागून गेलेला बॉल पार्थिवच्या डाव्या दिशेनं आला होता. हा माणूस 70 वर्षांपासून क्रिकेट खेळत असूनही कॅच पकडणे काही त्याला जमले नाही. उलट तो पुजाराच्या दिशेनं बोट दाखवत होता. कॅच सुटल्यावर बाजूच्या फिल्डरकडे बोट दाखवणे ही  रवी शास्त्री खेळत असताना भारतीय टीमच्या खेळाडूंची सवय होती. आता इतक्या वर्षांनी कॉमेंट्री करुन करुन थकलेल्या घशाला आराम देण्यासाठी रवी शास्त्री कोच बनलाय.  ह्या परंपरेचं पार्थिव पटेल मोहब्बतेमधल्या नारायण शंकरच्या तोडीच्या निष्ठेनं पालन करतोय.

   
     दक्षिण आफ्रिकेतले हे पराभव टीम इंडियानं ओढावून घेतले आहेत. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पत्कारली तशी शरणागती  पत्करली नाही. त्यामुळे या पराभवाचं कठोर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. खिलाडूवृत्तीचा कितीही गवगवा केला तरी पराभव हा पराभव असतो आणि तो खेळाडूला आतमध्ये नक्कीच टोचतो. विशेषत: मॅच जिंकण्याची संधी असताना पराभूत होणे ही जास्त जिव्हारी लागणारी गोष्ट आहे.

     
    सलग दुसऱ्या पराभवानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना पत्रकार कोणते प्रश्न विचारणार याची विराटला नक्कीच कल्पना असेल. अशावेळी पत्रकारांचे प्रश्न निग्रहानं टोलवून लावण्याऐवजी विराटनं त्यांनाच उलटे प्रश्न विचारले. प्रत्येक देश आपल्याला अनुकूल अशा वातावरणात समोरच्या टीमला लोळवतो हा टेस्ट क्रिकेटमधला गेल्या काही वर्षातला ट्रेंड आहे. परदेशातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारी सर्वोत्तम टीम खेळवण्याऐवजी विराट दक्षिण आफ्रिकेतला भारतामधला इतिहास उगाळत होता. ( दक्षिण आफ्रिकेची भारतामधली कामगिरी ही भारताच्या दक्षिण आफ्रिकेतल्या कामगिरीपेक्षा किती तरी सरस आहे. ) विराटनं याबाबत त्याचा पूर्वीचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीकडून शिकण्यासारखं आहे. पत्रकारांच्या खोचक प्रश्नांना उत्तर देण्याची धोनीची खास पद्धत होती. धोनीच्या उत्तरामध्ये अनेकदा ह्यूमर आणि उपहास दडलेला असतो. विराटची शैली मात्र 2011-12 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात  'भारतामध्ये या आम्ही तुम्हाला दाखवतो' असं सांगणाऱ्या दिल्लीकर गौतम गंभीरशी जुळणारी आहे.

     विराट कोहली हा नैसर्गिक नेता आहे. जो आघाडीवर राहून टीमचं नेतृत्व करतो. त्यानं वन-डेमध्ये अगदी सहजगत्या पूर्ण केलेले अनेक टार्गेट्स हे याचं उदाहरण आहे. सध्या तरी विराटच्या दर्जाचा आणि त्याच्या कॅप्टनीसाला पर्याय ठरु शकेल असा खेळाडू टीम इंडियामध्ये नाही. त्याच्या या फायरब्रँड नेतृत्वाला योग्य दिशा देणारा समंजस व्यक्तीची गरज आहे. वन-डेमध्ये मैदानावर धोनी हे काम उत्तम रित्या करतो. टेस्टमध्ये  हे काम शास्त्रीनं करणं आवश्यक आहे. 

 

    मुर्खासारखे रन आऊट, कॅच सोडण्याचं सातत्य, विकेट फेकण्याची प्राचीन सवय आणि आक्रमकतेच्या नावावर भरकट चाललेली कॅप्टनसी या चार गोष्टी दक्षिण आफ्रिकेतल्या पराभवाचं कारण आहेत. टीम इंडियाच्या परदेशातल्या पराभवाची हीच गंगोत्री आहे.ही गंगोत्री शुद्ध झाली की विजयाचा अडलेला प्रवाह पुन्हा प्रवाहित होईल. या प्रवाहाला वाट करुन देणाऱ्या होयबाच्या मानसिकेतून बाहेर पडून विराटला योग्य सल्ला देणाऱ्या सल्लागारांची टीम इंडियाला गरज आहे.  भारतीय क्रिकेटची प्रचंड काळजी करणारं सन्माननीय सुप्रीम कोर्ट या योग्य सल्लागारांच्या निवडीचं किंवा आहे त्या सल्लागारांना पुरेशी समज देण्याचं काम करेल का ? पुढच्या आठवड्यात विनोद राय यांना बीसीसीआयचा कारभार हाती घेऊन एक वर्ष आणि लोढा समितीला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. 

2 comments:

Niranjan Welankar said...

जबरदस्त विश्लेषण!!!!!! खरं आहे.

कमलेश देवरुखकर said...

विस्तृत माहिती, अप्रतिम शैली...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...