DHONI finishes off in style...
A
magnificent strike in to the crowd...
India
lift the world cup after 28 years...
महेंद्र सिंह धोनीची यापुढे जेंव्हा आठवण काढली जाईल त्या प्रत्येक वेळी रवी
शास्त्री यांचे हे वाक्य सर्वांना आठवेल. क्रिकेट पाहत मोठे झालेल्या माझ्या पिढीसाठी आजवरची सर्वात चांगली आठवण
आहे. 2011 च्या वर्ल्ड कप
फायनलमध्ये नुवान कुलसेखराचा तो बॉल धोनीनं अगदी शांत
आणि सहजपणे मिडऑनवरुन मैदानाच्या बाहेर फेकला. धोनीच्या या
सिक्सरसोबत टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
कपिल देवच्या युवा
आणि उत्साही टीमनं मिळवलेलं विजेतपद आम्ही केवळ टीव्हीवर हायलाईट्समध्ये पाहिलं
होतं. त्यानंतर 28 वर्ष या क्षणाची
देशानं प्रतीक्षा केली. सर्व देशवासियांच्या अपेक्षा धोनीच्या टीमने
पूर्ण केल्या. क्रिकेटच्या पंढरीत, सुनील गावसकर आणि
सचिन तेंडुलकरच्या मुंबईत धोनीनं सिक्सर खेचत सर्व भारतीयांची स्वप्नपूर्ती केली.
महेंद्रसिंह धोनी टीम इंडियामध्ये
स्थान नक्की करत असतानाच 'बंटी आणि बबली' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात 'छोटे छोटे शहरोंसे खाली भोर दुपहरोंसे
हम तो झोला उठाके चले, बारीश कम-कम लगती
हैं नदीयां मद्धम लगती है हम समंदर के अंदर चले' असं गाणं आहे. देशात
जागतिकीकरण स्थिरावत असलेला तो काळ होता. छोट्या शहरातल्या तरुणांची मोठी पिढी
महानगराकडे धाव घेत होती. छोट्या गावात त्यांनी पाहिलेली स्वप्न महानगरात म्हणजेच
स्पर्धेच्या महासागरात ही पिढी पूर्ण करत होती.
सिस्टिमच्या बाहेरच्या या मंडळींनी
देशात घुसळण सुरु केली होती. याच काळात रांचीमधला म्हणजेच भारतीय क्रिकेटमधल्या
प्रस्थापित शहरी बेटांच्या बाहेरचा महेंद्रसिंह धोनी हा तरुण टीममध्ये दाखल झाला. 2002 मधला रेल्वेतला सामान्य टिकीट चेकर ते स्वत:चं जेट विमान सहज घेऊ शकेल असा देशातला श्रीमंत खेळाडू हा
धोनीचा प्रवास आहे. या काळात फक्त धोनीचा बँक बॅलेन्स
वाढला नाही. तर क्रिकेटविश्वातली सारी मानाची विजेतेपद टीम इंडियाच्या
कपाटात आली आहेत.
महेंद्र सिंह धोनी येण्यापूर्वी भारतीय टीममध्ये काही ठरावीक महानगरांमधील खेळाडूच प्रामुख्याने होते. धोनीनं छोट्या शहरातील खेळाडूंसाठी टीमचा दरवाजा सताड उघडला. भारतीय टीमवरील काही ठरावीक शहरांची मक्तेदारी संपली. छोट्या शहरातील खेळाडूंना टीममध्ये स्थिरवण्यासाठी आणि सर्वोच्च पातळीवर सर्वोत्तम खेळ करण्यासाठी आवश्यक वेळ, पाठिंबा आणि मार्गदर्शन धोनीकडून मिळाले.
प्रत्येक कॅप्टनचं
एक वैशिष्ट्य असतं. कपिल देव स्वत: अग्रभागी राहून टीमला चांगलं खेळण्यासाठी
प्रोहत्साहित करत असे. सौरव गांगुलीनं टीममधल्या प्रत्येकाचा खेळ उंचवण्यावर भर
दिला. लढाऊ वृत्तीला मैदानातल्या कुशल डावपेचाची जोड राहुल द्रविडनं दिली. महेंद्र
सिंह धोनीचं वैशिष्ट्य
काय ? किंवा धोनीनं टीम इंडियाला
काय दिलं ? या प्रश्नाचं उत्तर
एका वाक्यात द्याचं असेल तर धोनीनं टीम इंडियाला
जगातली यशस्वी टीम बनण्याची 'प्रोसेस' दिली.
होय प्रोसेस. धोनीच्या बोलण्यात नेहमी येणारा शब्द. धोनीच्याच वेगवेगळ्या वाक्यांचा आधार
घेत सांगायचं झालं तर प्रोसेस म्हणजे,
"एखाद्या कामासाठी शारीरिक आणि मानसिक रित्या पूर्णपणे तयार असणं, भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा विचार न
करता ते लक्ष्य गाठण्यासाठी स्वत:ला मैदानावर झोकून देणं. निकाल काय लागेल तो
फारसा महत्वाचा नाही. पण त्यासाठी तुम्ही 90 किंवा 95 टक्के नाही तर 100 टक्के मेहनत घेतली आहे का हे महत्वाचं
आहे. टीमचं हे 100 टक्के कमिटमेंट
म्हणजेच प्रोसेस "
याच प्रोसेसपूर्तीचा
ध्यास घेऊन धोनी खेळला. त्यामुळेच तो केवळ टीम इंडियाचा
नाही तर जगातला एक यशस्वी कॅप्टन बनला. मैदानावर असताना संपूर्णपणे फोकस होऊन
खेळणं आणि खेळताना घडलेल्या घटना, मिळालेलं यशापयश हे
मैदानाच्या बाहेर पडल्यावर मैदानावरच सोडणं हे धोनीचं वैशिष्ट्य होते. ही 'स्विच ऑन- स्विच ऑफ' वृत्ती धोनीकडं आहे.
त्यामुळेच तो भारतीय क्रिकेट फॅन्सचा अमर्यादीत दबाव सहजपणे सहन करु शकला.
धोनीने टीममध्ये
येण्यापूर्वी क्रिकेटचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले नव्हते.
प्रथमश्रेणी सामन्यातही कधी
कॅप्टन नसलेला हा पठ्या थेट राष्ट्रीय टीमचा कॅप्टन झाला. कॅप्टन झाल्यानंतर
क्रिकेटचं शास्त्रीय प्रशिक्षण न घेणं त्याच्या फायद्याचं ठरलं.
मैदानावरच्या समस्यांची पुस्तकी उत्तरं त्यानं शोधली नाहीत. तर आपल्या ओरिजनल
मेथडनं त्यानं प्रतिस्पर्धी टीमला गोंधळात टाकलं. सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला.
टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.
धोनी हा कॅप्टन म्हणून अनेकदा
प्रतिस्पर्धी प्लेयर्सच्या एक पाऊल पुढे असे. तो अगदी ओरिजनल सुचण्याच्या बाबतीत 'भारतीय क्रिकेटचा स्टीव्ह जॉब्ज ' होता. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बॉल
आऊटमध्ये भारताने मिळवलेला विजय हा धोनीच्या याच 'एक पाऊल पुढे' विचाराचा परिणाम होता. त्याने नेहमीच्या फास्ट बॉलर्सच्या नाही तर संथ
बॉल टाकून स्टंप उडवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंच्या हाती बॉल दिला होता.
बॉल आऊटमध्ये बॉलरचे टार्गेट स्टंप
होते. धोनी बरोबर स्टंपच्या मागे अशा पद्धतीने बसला की बॉलरला बॉल टाकताना टार्गेट स्पष्ट दिसत होते. बॉलर हातातून बॉल सोडेपर्यंत तो त्या जागेवरुन अजिबात हलला नाही.
त्याचा योग्य परिणाम झाला. सेहवाग, हरभजन आणि उथप्पा या
भारताच्या तीन्ही बॉलर्सनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले. त्याच्या अगदी उलट
पाकिस्तानच्या बॉलर्सची निवड आणि विकेट किपरची स्टंपमागची पोझिशन हे सर्व काही
चुकले होते. त्यामुळे त्यांच्या एकाही बॉलरला बॉल आऊटमध्ये यश मिळाले नाही.
बांगलादेश विरुद्ध २०१६ च्या टी -२०
वर्ल्ड कपमध्येही धोनीच्या इतरांच्या पुढे विचार करण्याच्या वृत्तीने टीम इंडियाला तारले.
हार्दिक पंड्याचा बॉल स्ट्राईकवरील बॅट्समनपर्यंत पोहचेपर्यंत त्याच्या सहकाऱ्याने
अर्धे क्रिज पार केले होते. धोनीनं तो बॉल शांतपणे पकडला. थ्रो करताना हातातून निसटू
नये म्हणून ग्लोज काढण्याचीही खबरदारी घेतली आणि चपळाईने समोरच्या खेळाडूला रन आऊट
करत बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला.
टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या
आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांची विजेतेपद जिंकणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. या तिन्ही
विजेतेपदामध्ये धोनीची विचार
करण्याची ओरिजनल मेथड उपयोगी पडली. यामुळेच त्यानं टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटची ओव्हर
हरभजनला नाही तर जोगिंदर शर्माला दिली. वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली आऊट
झाल्यानंतर फॉर्मात असलेल्या युवराजच्या ऐवजी स्वत: मैदानावर उतरला. चॅम्पियन्स
ट्रॉफीत इंग्लंडला विजय डोळ्यासमोर असताना त्यानं इशांत शर्माच्या हातात बॉल दिला.
सहकाऱ्यांबद्दलचा विश्वास, त्यांचा खेळ
उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत हाच धोनीच्या यशाचा 'एक्स फॅक्टर' आहे. एकदा मिळालेलं यश हे
योगायोग असू शकतं. पण त्या यशाची पुनरावृत्ती होत असेल तर त्या यशामध्ये 'एक्स फॅक्टर' निर्णायक असतो. सभोवतल्या
व्यक्तींना नियंत्रित करतोय याची कल्पनाही न देता प्रभावित करणं हा महान नेत्यांचा 'एक्स फॅक्टर' असतो. अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली
अनुयायी सहजपणे विकसित होत असतात.
धोनी कॅप्टन असताना
मैदानात आणि ड्रेसिंग रुममधली शांतता, सर्वोच्च यश आणि
पराकोटीचं अपयश आल्यानंतरही त्याला सारख्याच स्थितप्रज्ञतेनं सामोरं जाण्याची धोनीची वृत्ती याचा सहकाऱ्यांवर मोठा
प्रभाव पडला हे नक्की. त्यामुळेच धोनीच्या टीममधले
खेळाडू मैदानातल्या कठीण प्रसंगाला न डगमगता सामोरं गेले. या टीमनं खेळाचा आनंद
लुटला.
संपूर्णपणे फोकस करुन खेळतानाही हा
फक्त खेळ आहे. हा खेळ म्हणजे आयुष्य नाही हा धोनीमंत्र टीममध्ये
कुठेतरी रुजला असावा. त्यामुळेच टी वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड कप, आशिया कप, ऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेचं
विजेतेपद, आयसीसी टेस्ट
रँकींगमध्ये पहिला नंबर, वन-डे रँकींगमध्ये
पहिला नंबर, टी-20 रँकींगमध्ये पहिला नंबर, हे सारं धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम
इंडियाला मिळवता आलं.
आज टीम इंडियाच्या फिटनेसचा स्तर
उंचावलाय. हा कॅप्टन धोनीच्या प्रभावाचा
मोठा भाग आहे. 2008 मध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सीबी सीरिजपूर्वी 'संथ हलचाली करणारे
खेळाडू टीममध्ये नको' असं त्यानं निवड समितीला सांगितलं
होतं. एका ओव्हरमध्ये बॉलर्सना 2 किंवा 3 सिक्सर लगावल्यानंतर बॉलर्सवर भडकलेला धोनी कुणी पाहिला नाही.
सलग चार वाईड बॉल टाकले तरी चेहऱ्यावरची रेषाही हलू न देणारा विकेटकिपर-कॅप्टन धोनी सर्वांनी पाहिलाय.
पण ढिसाळ फिल्डिंगला धोनीकडं कधीही माफी
नव्हती. अशावेळी धोनीनं केलेली
कानउघडणी स्टम्पमधल्या मायक्रोफोनमधून साऱ्या जगानं ऐकलीय.
फिल्डिंग आणि 'रनिंग बिटविन द विकेट' हा क्रिकेटमधला अत्यंत महत्वाचा घटक
आहे. यामध्ये प्रत्येकानं आपलं सर्वस्व ओतलं पाहिजे हे सर्वांमध्ये बिंबणारा
कॅप्टन म्हणून इतिहास धोनीला लक्षात ठेवणार आहे. धोनीचा हा वारसा विराट कोहलीने नव्या उंचीवर नेलाय.
'कोणताही खेळाडू हा
त्याच्या नावावर नाही तर खेळाच्या जोरावर टीममध्ये असायला हवा. तो टीमच्या
भविष्यासाठी उपयुक्त ठरतो की नाही हे कॅप्टनला ठरवू द्या' असा नियम धोनीनं तयार केला.याच नियमाच्या
आधारावर त्यानं गांगुली, लक्ष्मण आणि द्रविड
या तिघांना टीममधून वगळलं. धोनीची टेस्टमधील निवृत्ती आणि वन-डे, टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णयही
त्याने असाच अगदी सहज घेतला. १०० टेस्ट खेळण्याचा किंवा २०० वन-डे मध्ये कॅप्टनसी
करण्याचा विचार त्याने केला नाही. कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर, बीसीसाआयला फक्त काही ओळींचे औपचारिक पत्र पाठवून धोनीनं त्याची निवृत्ती
जाहीर केली होती.
धोनीनं वन-डे टीमची कॅप्टनसी
सोडल्यानंतर मागच्या तीन वर्षात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल वारंवार चर्चा झाली.
त्याचा खेळ संथ झाला होता. त्याला मैदानात आल्यावर स्थिर होण्यास बराच वेळ लागत
असे. न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही तो अगदीच संथ खेळला.
त्याच्या संथ खेळामुळे झटपट रन्स बनवण्याच्या नादात हार्दिक पंड्या आऊट झाला.
रवींद्र जडेजा संपूर्ण भरात होता. त्यावेळी धोनीनं फक्त प्रत्येक बॉलला एक रन काढून त्याला साथ
देणे आवश्यक होते, पण तो दिवस धोनीचा नव्हता. वर्ल्ड कप फायनलमध्ये
बटलर-स्टोक्स जोडीनं जवळपास याच परिस्थितीतून मॅच बरोबरीत आणली होती. पंड्या आणि
जडेजाच्या मदतीनं नेहमीच्या धोनीला मॅच जिंकणे सहज शक्य होते, पण त्या दिवशी नेहमीचा धोनी दिसलाच नाही.
धोनी आणि क्रिजमध्ये अखेर अगदी काही इंचाचे अंतर राहिले. मार्टिल गप्टीलच्या थेट थ्रो ने धोनी रन-आऊट झाला. त्यावेळी मॅचचे
लाईव्ह समालोचन करणाऱ्या सौरव गांगुलीसह जगभरात मॅच पाहणाऱ्या तमाम भारतीयांचा
आवाज नंतरचा काही काळ बंद झाला होता. धोनीनं रिटायरमेंटचा जो 4.2 मिनिटांचा अधिकृत
व्हिडिओ प्रसिद्ध केलाय त्यात जवळपास 20 सेकंद त्याचे हे शेवटचे रन आऊट दाखवलंय.
मैदानावरचे यश आणि अपयश शांतपणे स्विकारणाऱ्या आणि ते मैदानावर सोडून
पुढच्या क्षणी सामान्य आयुष्य जगणे ही ज्या धोनीची सवय आहे, त्या
धोनीलाही 'ती आठवण' किती छळतीय
हे आपल्याला समजण्यासाठी धोनीनं त्या रन आऊटच्या प्रसंगाला दिलेला
इतका वेळ पुरेसा आहे.
धोनी वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर एकही
सेमी फायनल खेळला नाही. 'तो रिटायर कधी होणार?' 'तो रिटायर का
होत नाही?' 'तो जागा अडवून का बसलाय?' ' त्याने इतरांना जो नियम लावला त्याची स्वत: का अंंमलबजावणी करत नाही?'
यासारखे अनेक प्रश्न अनेकांनी विचारले. धोनी त्याच्या स्वभवाप्रमाणे
शांत होता. त्याच्यात आणि निवड समितीत काय चर्चा झाली का? याचे
अंदाज अनेकांनी बांधले. ठराविक दिवसांनी त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु होत असे.
अखेर तो त्याने ठरवले त्याच दिवशी, त्याच्या नेहमीच्या शांत
पद्धतीने निवृत्त झाला.
त्याचे लग्न, टेस्टमधील
निवृत्ती, वन-डे आणि टी-२० कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय याच
प्रमाणे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती यापैकी कोणतीही बातमी जगात कुणालाही 'ब्रेक' करता आली नाही. आता त्याच्या निवृत्तीनंतर
पुन्हा एकदा सर्वांनी त्याच्या 'टायमिंगवर' 'वेळकाढू' चर्चा सुरु केलीय. 'हत्ती
आणि सात आंधळे' या गोष्टीप्रमाणे अनेकजण त्यावर
काथ्याकूट करतायत. धोनीचा स्वभाव पाहता या सर्वांना त्याच्याकडून उत्तर मिळण्याची
शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काळातही अनेक जण 'आपल्यातल्या
शेरलॉकला अनलॉक करत' नवे-नवे सिद्धांत मांडत स्वत:ची पाठ
थोपटून घेतील हे नक्की.
सौरव गांगुलीनं नव्या भारतीय टीमची
उभारणी केली. टीम इंडियाला आक्रमक बनवलं. धोनीनं या आक्रमकतेला शांततेची जोड दिली.
'ऑस्ट्रेलिया
विरुद्ध 2008 साली सीबी सीरिज जिंकल्यानंतर अगदी सामान्य
विजयासारखे राहा, अवास्तव सेलिब्रेशन करु नका' अशी स्पष्ट सूचना धोनीनं टीममधल्या सर्व सहकाऱ्यांना दिली होती. 'ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे ही जगासाठी मोठी गोष्ट असेल. आमच्यासाठी
ही एक सामान्य बाब आहे'. हा संदेश ऑस्ट्रेलियासह संपूर्ण
क्रिकेट विश्वाला टीम इंडियानं दिला होता.
यश आणि अपयश हे खेळाचा आणि आयुष्याचा
अविभाज्य भाग आहेत. यशानंतर अपयश आणि अपयशानंतर पुन्हा यश ही सर्व प्रोसेस सतत
सुरु राहणार आहे. आपण या प्रोसेसचा अभ्यास करायचा. आपले स्कील अधिक घोटीव करायचे
आणि त्यानंतर जे काही होईल त्याला शांतपणे समोर जायचे. या विस्तीर्ण ब्रह्मांडातला
आपण एक बिंदू आहोत, आपल्यापूर्वी इथे अनेक सरस होऊन गेले आणि पुढेही अनेक
अव्वल होतील. आपण फक्त काल आणि उद्या या साखळीला जोडणारा आज आहोत. हा आज आपल्याला
अधिक समृद्ध करायचा आहे. धोनीचं करियर हीच शिकवण देते.
महेंद्र सिंग धोनीनं निवृत्तीसाठी देखील याच प्रकारचे गाणे निवडले आहे. करियरमधील सर्वोच्च क्षण आणि अगदी तळाचे
क्षण याला या व्हिडिओमध्ये समान महत्व देण्यात आलंय. धोनीचा तो व्हिडिओ पहिल्यांदा
पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आले. त्यानंतर पुन्हा प्रत्येकदा व्हिडिओ पाहतानाही डोळ्यातलं पाणी
थांबलं नाही. त्यामधील प्रत्येक प्रसंग हा माझ्यासह अनेकांच्या तारुण्याची गोष्ट आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हे पाहताना त्या सर्व
आठवणीने डोळ्यात पाणी येणार आहे.
धोनीला निवृत्तीच्या प्रसंगी जगाला काय
सांगायचे आहे ते त्याने साहिर लुधियानवी यांच्या शब्दात सांगितले. माझ्यासाठी धोनी
काय आहे हे सांगण्यासाठी देखील मला साहिरचेच शब्द आठवतात....
रिश्तों का रूप बदलता है, बुनियादे
खतम नही होती
ख्वाबो और उमंगों की मियादें खतम नही
होती
- ''मैं हर इक पल का
शायर हूँ''