Sunday, January 20, 2013

आता (तरी ) करुन दाखवा !


जयंती नटराजन ते दिग्विजय सिंह आणि संजय निरुपम ते अंबिका सोनीपर्यंतचे निष्ठावान, युवा, मागसवर्गीय,  अल्पसंख्यांक व महिला काँग्रेसजणांना मागील काही वर्षांपासून लागलेले डोहाळे अखेर पूर्ण झाले. काँग्रेसचे हुशार, व्हिजनरी, शोषिंतांचे प्रेषीत, युवकांचे आधारस्तंभ, वृद्धांची काठी, देशाची एकमेव आशा ( यातील प्रत्येक शब्दामागे किती उद्गारचिन्ह द्यावयचे किंवा नाही हे वाचकाने आपआपले ठरवावे). प्रत्यक्षात ११ राष्ट्रीय  सरचिटणींसापैकी एक असलेले राजमान्य राजर्षी राहुल राजीवजी गांधी ( काँग्रेसचे आजी अध्यक्ष सोनिया गांधी व माजी अध्यक्ष माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे चिरंजीव , माजी अध्यक्ष व माजी  पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू. माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे पणतू व माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरु यांचे खापर पणतू ). कंसातील वंशावळीचा इतिहास सर्वांनाच माहिती असला तरी तो दिल्याशीवाय राहुल गांधी यांची ओळख पूर्ण होत नाही किंबहूना या घरण्यातील असल्यामुळेच त्यांच्याकडे काँग्रेसचे उपाध्यक्षपद चालून आले आहे. पक्षाने त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपावली.
   
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये गांधी युग अवतरले. महात्मा गांधीच्या बोटाला धरुन जवाहरलाल नेहरु यांनी राजकारण गिरवले, त्यामध्ये जम बसविला आणि नंतर देशाचा कारभार केला. असहकार चळवळीला सुरुवात झाली ते १९२० ते सध्याचे २०१३ म्हणजे मागील ९३ वर्षांत काँग्रेसपक्षाचे नेतृत्व  कालावधी सोडला तर  या खंडप्राय देशाचे नेतृत्व हे गांधी- नेहरु घराण्यातील नेत्यांनी केला आहे.गांधी नेहरु घराण्याच्या सत्तेला पक्षांतर्गत  आव्हान निर्माण करणारे सुभाषचंद्र बोस ते शरद पवार आणि मोरराजी देसाई ते सीताराम केसरी हे सर्व नेते एकतर पक्षाच्या बाहेर गेले किंवा काँग्रेसजनांच्या विस्मृतीच्या कप्प्यात. त्यामुळे नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केला त्याचवेळी ते पक्षातील दोन क्रमांकाचे नेते असणार हे उघड झाले होते.आता नऊ वर्षांही जयपूरच्या अधिवेशनात ही औपचारिकता पूर्ण झाली इतकेच.

        भारतीय निवडणूक रचनेत लोकप्रतिनिधींना पाच वर्षांचा कालावधी दिला आहे. खासगी कंपनीतील कर्मचा-यांचे दर वर्षी तर सरकारी अधिका-यांचेही दर दोन वा तीन वर्षांनी मुल्यमापन होत असते. त्यामुळे नऊ वर्षे हा कालावधी राहुल गांधी यांच्या राजकीय कारकीर्दीचे मोजमाप करण्यास नक्कीच पुरेसा आहे.

जनमानसांची नस ओळखणारे नेते हे काँग्रेस पक्षाचे नेहमीची वैशिष्ट्य राहिले आहे. याच वैशिष्ट्याच्या जोरावर ह्या पक्षाची वृक्षाची पाळेमुळे देशात घट्ट रुजली त्यांना सत्तेची रसाळ गोमटी फळे लागली. केंब्रीज रिटर्न राहुल गांधी हा इंग्रजी बोलणा-या कोणत्याही उच्च मध्यवर्गीय भारतीय युवकाचा असा चेहरा आहे की ज्याचे जमीनीशी कोणते नाते नाही. ( हे नाते शोधण्यासाठीच त्यांना 'भारत की खोज' यात्रे अंतर्गत सनसनाटी दौरे करावे लागतात. ) २००४ मध्ये ते अमेठीचे खासदार झाले. २००७ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अमेठी व रायबरेली या बालेकिल्यात पक्षाचा धुव्वा उडाला. २०१० मध्ये त्यांच्याकडे बिहारची जबाबदरी सोपविण्यात आली बिहारत त्या पक्षाची संख्या एकेरी झाली. मागील वर्षी त्यांनी उत्तर प्रदेश पालथा घातला. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या जागा पूर्वीपेक्षा घटल्या. २०१० नंतर आजवर ते बिहारमध्ये फिरकले नाहीत. मागील वर्षभरात उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी दंगे झाले, कायदा व सुव्यवस्थेचा बो-या वाजला तरी त्यांना आपल्या गृहराज्यात धाव घ्यायला वेळ मिळाला नाही. निवडणुकीती अपयशापेक्षा राजकीय निष्क्रीयपण हे त्यांच्या कार्यक्षमतेवरील मोठे प्रश्नचिन्ह आहे.

      त्यांची हीच राजकीय शिथीलता सतत ठसठशीतपणे वेळोवेळी समोर आली आहे. नऊ वर्षांतील संसदीय कारकीदीमध्ये ते बेकबेंचर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. अण्णा हजारेंचे आंदोलन असो वा दिल्लीतील बलात्कार प्रकरण देशातील यंगिस्तानला अस्वस्थ करणा-या त्यांना रत्यावर उतरण्यास भाग पाडणा-या प्रश्नावर एरवी विद्यापीठातील युवकांना भाषणांचा डोस देत फिरणा-या या तरुण तुर्काला सामोरे जाण्याचे धाडस झाले नाही. युपीए -२ मध्ये भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणे उघडकीस आली, सुरेश कलमाडी, ए. राजा पासून ते थेट पंतप्रधानांपर्यंत सर्वजण संशयाच्या फे-यात अडकले असताना  राहुल संपूर्णपणे आऊट ऑफ फोकस होते. वास्ताविक सोनिया गांधी मागील वर्षभर आजारपणामुळे सक्रीय राजकारणापासून दूर असताना पक्ष व सरकार यांच्यासाठी संकटमोचक म्हणून भूमिका पार पाडण्याची मोठी संधी राहुल यांना होती. मात्र ती पेलण्याचे धाडस त्यांना करता आले नाही.

             जवाहरलाल नेहरु यांच्याकडे स्वांतत्र्य लढ्याची पुण्याई होती. इंदिरा गांधीचा कणखरपणा हा त्यांना तारण्यासाठी पूरेसा होता. राजीव गांधींना अत्यंत अपघाती पंतप्रधान पद मिळाले पण त्यांनी देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विकासाचा पाया रचला. या सगळ्या वंशावळीचा विचार करत असताना राहुल गांधी कुठे आहेत ?  राजीव गांधींच्या काळात व नंतरचे अडीज दशके ज्या सॅम पित्रोदा यांची 'आयटी मॅन' म्हणून ओळख होती  त्या पित्रोदा यांचे राहुल यांनी सुरुवातीला ओबीसी आणि नंतर गुजराथी असे राजकीय अवमुल्यन केले. देशातील प्रमुख मीडिया विरोधात असतानाही सोशल माध्यमांचा प्रभावी वापर करुन देशातील युवकांचे आयडॉल अशी प्रतिमा बनविण्यात राहुल यांचे मुख्य प्रतिस्पर्धी नरेंद्र मोदी कमालीचे यशस्वी झाले आहेत. 'नयी दुनीया' या उर्दू साप्ताहिकापासून ते 'यू ट्यूब ' या ग्लोबल माध्यमापर्यंत विविध पातळीवर वेगवेगळ्या गुगली प्रश्नांना मोदी सामोरे गेले आहेत. तर राहुल यांनी षटकार मारता येतील असे चेंडूही सोडून देण्याचे प्रसंग अधिक आहेत.

               'डिकोडिंग राहुल' हे पु्स्तक लिहणा-या आरती रामचंद्रन यांनी त्यांच्या अनुभव कथनामध्ये हीच बाब मांडली आहे. दीड वर्षे सतत पाठलाग करुनही राहुल यांनी आरती यांना मुलाखत देणे टाळले. अखेर त्यांना  राहुल यांच्या कार्यालयात लिखीत प्रश्न पाठवावी लागली. वेटिंग प्रायमिनीस्टर म्हणून ओखळले जाणारे राहुल यांचे परराष्ट्र धोरण, अर्थकारण यासारख्या प्रश्नांवर काय भूमिका आहे याचे कोडे  नऊ वर्षांनंतरही उलगडले नाही. मागील नऊ वर्षांत त्यांनी कोणत्याही नव्या मतदार वर्गाला काँग्रेसशी जोडलेले नाही. एकाही राज्यातील निकाल त्यांना बदला आले नाहीत. नवे मित्रपक्ष जोडण्यात ते अपयशी ठरलेत, आणि युवा वर्गाचे नेते होण्याच्या शर्यतीमध्ये ते शेकडो मैल दूर आहेत. एक राजकीय नेता म्हणून आवश्यक असलेली भूक त्यांच्यामध्ये दिसत नाही. असे 'द इकॉऩमिस्ट' ने केलेले त्यांचे वर्णन अगदी सार्थ वाटते.

     राजकीय भूक नसलेले राहुल पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, उडीसामध्ये नवीन पटनाईक, उत्तर प्रदेशात मायावती, मुलायम तामिळनाडूमध्ये जयललिता आणि आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यासारख्या मातब्बर नेत्यांचा सामना कसा करणार ?  शरद पवार, करुणानिधी, अजित सिंह यासारखी उभी हयात राजकारणात घालवलेल्या वा-याच्या दिशेप्रमाणे टोपी बदलण्यात पटाईत असलेल्या घटकपक्षांना आणखी १६ महिन्यांनी  २०१४ मध्येही काँग्रेससोबत ठेवणारे लोहचुंबक त्यांना सापडेल ? २०१४ सोडा आता याच वर्षात दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या चार राज्यांत त्यांचा भाजपशी थेट सामना आहे. या लढाईत सोनियांचे उत्तराधिकारी म्हणून काँग्रेसला मिळणा-या यशापयाशाच्या जबाबदारीपासून त्यांना आजवरच्या परंपरेप्रमाणे टाळता येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी आता (तरी) करुन दाखविणार का ?काँग्रेसचे नवे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे  ह्या प्रश्नापासून पळण्याचे दोर आता कापले गेलेत. 

Friday, December 21, 2012

नरेंद्र मोदी 3.0


कोणाला ते 'गुजरातचे हिटलर' वाटतात. तर कुणी त्यांना विकासपुरुष म्हणून संबोधतात. त्यांना 'मौत के सौदागर'  ठरवू पाहणारा मोठा शक्तीशाली गट या देशात कार्यरत असताना त्यांच्या पंतप्रप्रधानपदाच्या राज्याभिषेकाची तयारी करणा-यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. तथाकथत बुद्धीजवी वर्ग (?) त्यांच्या विकास मॉडेलचा फोलपणा शोधण्याचा व तो मोठा करण्याचा खटाटोप करत असताना  जगभरातील 'नेटकर' तरुणांमध्ये त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' होत चालली आहे. कोणत्याही घराण्याचा वारसा नाही की चित्रपटाची पार्श्वभूमी नाही. असे असूनही नरेंद्र मोदी हे सरत्या दशकातील ( 2002 ते 2012 ) भारतामधील सर्वात चर्चीत मुख्यमंत्री आहेत.
   गुजरातमध्ये भाजपने सलग पाचव्यांदा सत्ता हस्तगत केली. मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा सलग तिसरा विजय. सलग तीनदा सत्तेवर येणारे ते भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. लागोपाठ पाच निवडणुकीत भाजपला जनादेश देणारे गुजरात हे देशातील एकमेव राज्य. त्यामुळेच हा विजय हा नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांप्रमाणेच  भाजपच्या मतदारांनाही सुखावणारा आहे.
2002 आणि 2007 च्या निवडणुका ह्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोरावर मोदींनी जिंकल्या . आता यातील काहीच उपयोगी पडणार नाही.सौराष्ट्रमध्ये पटेल आणि लेवा पाटील नाराज आहेत. उत्तर गुजरातमधील शेतकरी देशोधडीला लागलाय. कच्छमध्ये अपु-या पाण्याच्या दुष्काळात मोदी होरपळणार. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मोदींचा पराभव हवाच आहे. संघ परिवार त्यांच्यावर नाराज आहे. मुस्लिम तर त्यांच्या बाजूने कधीच नव्हते असा दावा करत मोदी विरोधाची हवा तापवणारे 'इलेक्शन इंटलेक्च्युअल्स' मोदींच्या दोन जागा कमी झाल्या की !!! असे सांगत गरबा खेळत आहेत. किंवा आपणच मांडलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणापेक्षा मोदींना जागा कमी मिळाल्या त्यामुळे मोदींनी आत्मपरिक्षण करावे असा शाहजोग सल्ला आज दिवसभर दिला जातोय. ( आता हे सर्वेक्षण केल ते यांच्या 'पेड' सर्वेक्षकांनी. ते चुकले हे या माध्यमांची व त्यांच्याशी संबंधित असलेल्या मंडळींची जबाबदारी न ठरता मोदींचे अपयश कसे ठरते हे मला पामराला न उलगडलेले कोडे आहे. )
      अटलजींच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी भरण्यात अपयशी ठरलेल्या भाजपमध्ये मोदींनी नंबर वन पदासाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. प्रचारामध्ये मनमोहन सिंग सोनिया/ राहुल गांधी यांना टार्गेट करणे किंवा विजयानंतरचे भाषण गुजरातीमध्ये न देता देशाला समजण्यासाठी हिंदीमध्ये देणे या सारख्या संकेतांमधून मोदींची पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा सर्वांसमोर आलेली आहे. मोदींच्या पक्षांतर्गत स्पर्धकांपैकी अडवाणींची दावेदारी वाढत्या वयोमानानुसार कमकुवत होत चालली आहे. सुषमा स्वराज भाषण तर सुरेख करतात. पण निवडणुका जिंकण्याचा त्यांचा इतिहास फारसा बरा नाही. ( त्यांच्ये नेतृत्वाखालील दिल्ली भाजपला 14 वर्षांपूर्वी काँग्रेसने धूळ चारली होती.त्यानंतर आजपर्यंत दिल्लीत भाजपला सत्ता मिळवता आलेली नाही) आणि अरुण जेटली उत्कृष्ट बोर्ड रुम मॅनेजर असले तरी लोकसभेच्या रणधुमाळीत पाऊल ठेवण्याचे धाडस त्यांना अजूनही जमलेले नाही. दोन लोकसभा निवडणुकीतील पराभव, जबाबदार नेत्यांमधील बेजाबाबदार विधान करण्याच्या स्पर्धेमुळे पक्षावर निष्ठा असणा-या लाखो कार्यकर्त्यांची आज गोची झालेली दिसते. पराभूत मानसिकतेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी मोदींचा सहारा भाजपला वाटतोय तो यामुळेच मोदींच्या तिस-या इनिंगला त्यामुळेच मोठे महत्व आले आहे.
       अर्थात गांधीनगर ते नवी दिल्ली हे अंतर पार करत असताना मोदींसमोर दोन मोठे अडथळे आहेत.पहिला  अडथळा अर्थात मोदींच्या टेंपरामेंटचा आहे. एककल्ली स्वभावाचे आणि एकपक्षीय सरकारमध्येही एकाधिकारशाही गाजवणारे मोदींना आघाडी धर्माचे पालन कितपत करता येईल ? 'पार्टी विथ डिफरन्सेस'
म्हणून ओळखल्या जाणा-या भाजपमधील गटतटांना चुचकारण्यापासून ते संघ परिवाराशी पुन्हा जवळीक वाढविण्यापर्यंतच्या कसरती करणे हे मोदींसमोरील पहिले आव्हान असेल.
मोदी कार्डचा वापर केल्यास मित्रपक्ष मिळवतानाही भाजपची दमछाक होणार हे उघड आहे.जदयू सारख्या रालोआमधील जुन्या घटक पक्षाचा मोदींना तीव्र विरोध आहे. तसेच त्यांच्या उमेदवारीमुळे अण्णा द्रमुक, बीजू जनता दल, तृणमूल काँग्रेस हे रालोआचे संभाव्य मित्र पक्ष आघाडीपासून पुन्हा दूर जाण्याची शक्यता आहे.
अगदी सर्व अनुकूल बाजू आणि प्रस्थापित विरोधी लाटेचा फायदा गृहीत धरल्यानंतरही भाजपला 200 पेक्षा जास्त जागा 2014  मध्ये मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि अकाली दल वगळता अन्य मित्र पक्षांना जवळ करण्यासाठी मोदींपेक्षा स्वराज किंवा जेटली हे मध्यममार्गी नेतृत्वाला पसंती मिळू शकते.
2004 मध्ये रालोआ सरकारचा पराभव झाला, 2014 मध्ये या पराभवास दहा वर्षे होतील. मागील दहा वर्षात मनमोहन सरकाराच्या राजवटीला जनता निश्चितच कंटाळलेली आहे. वाढती महागाई, नित्य नव्या शुन्यांची भर घालत उघडकीस आलेले घोटाळे, रबर स्टॅम्प पंतप्रधान, धोरण लकव्यामुळे आलेली आर्थिक क्षेत्रातील मरगळ,काळा पैसा धारकांची यादी लपविण्यासाठी चाललेला खटाटोप, फाळणीचा इतिहास विसरून मतपेढी समोर डोळा ठेवून अल्पसंख्यांकाना आरक्षण देण्याचे होत असलेले प्रयत्न, ईशान्य भारताचे होत असलेले बांग्लादेशीकरण, अपु-या शस्त्रसज्जतेची लष्करप्रमुखांनीच दिलेली कबुली, दहशतवादी संघटनाचे जाळे उद्धवस्त करण्यात आलेले अपयश, यामुळे जनतेमधील असलेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी समर्थ विरोधी पक्ष नेत्याची आवश्यकता आहे. तो समर्थ पर्याय देण्याची क्षमता मोदींमध्ये निश्चितच आहे.
   अहमदाबादमध्ये चहाचा स्टॉल चालविणारा पो-या ते पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार हा मोदींचा प्रवास  राजकीय अभ्यासाचा विषय आहे. दंगलपुरुष ही  झालेली प्रतिमा सुधारत विकासपुरुष म्हणूनही ओळख निर्माण करण्यात मोदींची दुसरी इनिंग कामी आली. आता गुजरातच्या बाहेर पडताना, देशातील सर्वात शक्तीशाली गांधी घराणे आणि 'ग्रॅँड ओल्ड पार्टी' असलेल्या काँग्रेसला देशव्यापी पर्याय बनण्यासाठी मोदींना आपल्या तत्वांना मुठमाती न देता स्वभावाला मुऱड घालण्याचे मोठे आव्हान आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या देशाच्या विकासाचा सौदागर होण्याची क्षमता सिद्ध करण्याची संधी या इनिंगमध्ये त्यांना मिळणार आहे. मोदींच्या तिस-या आवृत्तीला यामुळेच केवळ राष्ट्रीय नाही तर जागतिक महत्व प्राप्त झाले आहे.
     
टीप - नरेंद्र मोदींवरील माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
     

Monday, November 26, 2012

यांची आम्हांला लाज वाटते !


महेंद्रसिंग धोनी, अॅलिस्टर कूक, मायकल क्लार्क, ग्रॅमी स्मिथ, महेला जयवर्धने आणि रॉस टेलर यांच्यात काय साम्य आहे ? तर हे सर्व जण सध्या आंतरराष्ट्रीय टीमचे कॅप्टन आहेत. धोनी आणि अन्य कॅप्टनमधील फरक काय ? तर हे सर्व कॅप्टन्स सध्या सुरु असलेल्या  टेस्ट मॅचमध्ये आपल्या टीमच्या वाटचालीत निर्णायक भूमिका ( कॅप्टन्स नॉक ) बजावत आहेत. ( यामधील महेला जयवर्धनेने हा ब्लॉग लिहत असताना कोलोंबो टेस्टमध्ये फलंदाजी केली नव्हती. मात्र यापूर्वी झालेल्या टी-20 विश्वचषकात श्रीलंकेच्या अंतिम फेरी पर्यंतच्या वाटचालीत त्याचा वाटा सिंहाचा होता. )
     महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होऊन आता पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. दोन विश्वचषक जिंकले ही सर्वात जमेची बाजू. पण आज त्या विश्वचषक विजयाचा आढावा घेत असताना काय लक्षात येते ? 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या दरम्यान टी-20 हा प्रकार जागतिक क्रिकेटला नवा होता. टीम इंडियासह कोणत्याच  संघाला याचा फारसा सराव नव्हता. युवराज सिंगचा जबरदस्त फॉर्म आणि त्याला अन्य युवा खेळाडूंनी दिलेली साथ ह्याच्या जोरावावर आपण तो विश्वचषक जिंकला. हां आता फायनलमध्ये धोनीचा जुगार फळला की मिसाबह-उल-हकचा उतावीळपणा पथ्यावर पडला ह्यावर वाद होऊ शकतो. ठीक आहे, आपण धोनीच्या कल्पकतेला संशयाचा फायदा देऊ. मग ही कल्पकता नंतरच्या तीन टी-20 विश्वचषकात कुठे लोप पावली ?

     त्यानंतरचे दोन विश्वचषक धोनीने सर (!!!) रवींद्र जाडेजाच्या प्रेमापोटी ओवाळून टाकले.यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीरेंद्र सेहवागला बसवले. फॉर्म हाच निकष लावयचा असेल तर सेहवागच्या आगोदर रोहित शर्माचा नंबर होता. पण रोहित प्रत्येक मॅच खेळला. कांगारुंनी आपल्या फलंदाजाचे नेहमीचेचे कच्चे दुवे हेरुन नेहमीप्रमाणेच आखूड टप्याचे चेंडू टाकले. भारतीय बॅटिंग गडगडली.आणि धोनीसाहेबांनी वॉटसन आणि वॉर्नर या कसायांच्या जोडीसमोर हरभजन आणि चावला हे भंपक बॉलर्स उभे केले. नऊ विकेट्सने सपाटून पराभव झाला. रनरेटचे गणित बोंबलले, ते शेवटपर्यंत सुधारलेच नाही.

आता 2011 च्या विश्वचषकाचा मागोवा घेऊया.मला आपल्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचा कुठेही अपमान करावयाचा नाही किंवा संशयही घ्यायचा नाही. पण त्या विश्वचषकात अन्य देशांची स्थिती कशी होती ? ऑस्ट्रेलिय टीम 'अॅशेस'च्या राखेतून बाहेर पडली नव्हती. इंग्लंडला भारतीय उपखंडात कधीच फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिका चोकर्स म्हणूनच ओळखली जाते. वेस्ट इंडिजचा      बो-या वाजलेला होता. न्यूझीलंडच्या यशाला नेहमीच मर्यादा असतात. पाकिस्तानचा कधीच भरवसा देता येत नाही. आता उरलेले दोन महत्वाचे संघ भारत व श्रीलंका फायनलमध्ये आले.
   फायनलमध्ये सुरुवातीच्या यशाचा फायदा उचलण्यात भारतीय बॉलर्स अपयशी ठरले. ( हे आपले नेहमीचे दुखणे आहे, दोन-तीन विकेट्स झटपट मिळाल्या की आपली टीम गाफिल होते. नंतर मग एखादी जोडी अशी काही जमते की यापूर्वीच्या सर्व कामगिरीचा बट्याबोळ होतो) झहीरने शेवटच्या स्पेलमध्ये 2003 च्या फायनलची आठवण करुन दिली. जयवर्धनेने एक अविस्मरणीय शतक झळकावले. आपल्यासमोर आव्हानात्मक टार्गेट होते.
        या टार्गेटचा पाठलाग करताना धोनीने स्वत:ला बढती दिली. त्याचा जुगार पुन्हा यशस्वी ठरला. पण फायनलमध्ये श्रीलंकाच्या ऐवजी ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका असते तर धोनी पाचव्या क्रमांकावर आला असता का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारुन पाहवा. मलिंगाचा पहिला स्पेल संपला होता. त्यामुळे त्याला शेवटासाठी राखून ठेवणे संगकाराला भाग होते. मुरलीधरन आणि निवृत्ती यामध्ये काही तासांचे अंतर उरले होते. मलिंगा आणि मुरलीशिवाय बाकी लंकेची बॉलिंग खेळणे धोनीला आरामात शक्य होते. ब्रेट ली, जॉन्सन. शॉन टेट किंवा मॉर्केल, स्टेन, कॅलीस ह्या मा-यासमोर धोनीने पाचव्या क्रमांकावर खेळण्याचे धाडस केले असते आणि तो त्यात यशस्वी ठरला असता हे  त्याच्या आजवरच्या इतिहासाचा आणि फलंदाजीतील वकूबाचा अभ्यास करता अगदी अशक्य वाटते.
        वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे कोच बदलले. धोनी-फ्लेचर जोडीने परदेशातील सलग आठ टेस्टमध्ये शरणागती पत्कारली. अगदी औषधालाही एखादी कसोटी वाचविता आली नाही. टीम इंडियाचे वस्त्रहरण  
 झाले.  
     आता सध्या सुरु असलेल्या भारत-इंग्लंड सीरिजला बदला सीरिज असे रुप आले आहे. अगदी बरोबर आहे. पण फॉर्मात नसलेल्या हरभजनला खेळवून बदला कसा पूर्ण होणार हा माझा प्रश्न आहे. सध्या सर्वच देश नव्या खेळाडूंना संधी देत आहेत. आपण मात्र तिसरा पर्याय म्हणून हरभजनची निवड करतो. वास्तविक इक्बाल अब्दुल्ला किंवा हरमीत सिंग हे युवा गोलंदाज आपल्याकडे आहेत. त्यांची शैलीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अगदीच अपरिचीत आहे.त्यांचा फायदा घेण्याची कल्पकता निवड समितीला दाखविता आली असती. धाडसी खेळ आणि डावपेचांसाठी प्रसिद्ध असलेल्या संदीप पाटील यांनी हरभजनला घेत टीमला  बॅकफूटवर ढकलले.
    आपल्या कॅप्टनची मागील काही कसोटीतील सरासरी ही अगदी अश्निनपेक्षाही कमी आहे. अहमदाबाद कसोटीत इंग्लंडच्या पडझडीतही कूकने लाजवाब संघर्ष केला. भारतीय खेळपट्यांचा धसका घेतलेल्या इंग्लिश संघला अहमदाबामध्ये 'कूकस्पर्श' मिळाला. कॅप्टन कूकने जागवलेल्या याच आत्मविश्वासाच्या जोरावर इंग्लिश संघाने साडेतीन दिवसांत टीम इंडियाची माती केली. दोन्ही डावात संघाची गरज पूर्ण करण्यात आपले 'कॅप्टन कूल' सपशेल अपयशी ठरले.

 भारतीय टीमच्या या पराभवात धोनीच्या बरोबरीने टीमचे कोच डंकन फ्लेचरही गुन्हेगार आहेत. फ्लेचरच्या काळात धोनी-सेहवागमधील शीतयुद्ध पुन्हा सुरु झाले. लक्ष्मणच्या खराब फॉर्मवर त्यांना शेवटपर्यंत उत्तर सापडलेच नाही. गौतम गंभीरने शेवटचे कसोटी शतक कधी झळकावले आहे हे आता राम गोपाल वर्मांनी शेवटचा चांगला चित्रपट कधी केला हे आठवण्याइतके अवघड होऊन बसले आहे. हरभजनचा भंपकपणा कायम आहे. रैनाची टेस्टमधील दैना अजून संपलेली नाही. विराट कोहली तर मागील दोन टेस्टमध्ये बाद झाल्यानंतर पॅव्हीलियनमध्ये परतताना वेगवेगळ्या भावना कशा दाखवयाच्या याचा सराव करत आहे. मनोज तिवारीचा उमेदीचा कालखंड बारावा खेळाडू म्हणून वाया जातोय. 'फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट' असे क्रिकेटमध्ये नेहमी म्हंटले जाते. मात्र 'बॉलिंग इज टेम्पररी बॅटिंग इज परमनंट ' अशी अश्विनची अवस्था झाली आहे. थोडक्यात त्याचा इरफान पठाण होण्याची चिन्हे आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यासारख्या देशात नव्या गोलंदाजांची फौज तयार होत असताना अजूनही फ्लेचर साहेबांना झहीरचा वारसदार शोधता आला नाही. त्यातच सचिन आणि झहीर हे दोघे आता अस्ताला आलेत. त्यांच्यानंतर टीम इंडियाची टेस्ट मॅच पाहणे सोडून द्यावे असा माझा विचार आता प्रबळ होत चालला आहे.
        पीटरसन-फ्लॉवरमधील संघर्ष सा-या जगाने नुकताच पाहिला. अहमदाबाद कसोटीत पीटरसन फ्लॉप झाल्यानंतर ह्याच फ्लॉवरने ग्रॅहम गूचच्या मदतीने पीटरसनच्या कच्या दूव्यावर मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचे फळ इंग्लंडला मिळाले.ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सीरीजमधील पहिल्या टेस्टमध्ये टीम अडचणीत असताना क्लार्कने डबल सेंच्युरी झळकावली. अॅडलेडमध्ये कांगारुंच्या विशाल धावसंख्येला उत्तर देताना ग्रॅमी स्मिथमधला कॅप्टन जागा झाला. कस्टर्न आणि कंपनीने केलेल्या मार्गदर्शनामुळेच ड्यू प्लेसीला आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये तेही चौथ्या डावात शतक झळकवता आले. कॅप्टन आणि कोच प्रेरणादायी असले की टीमच्या कामगिरीत सकारात्मक बदल तात्काळ दिसून येतात. हेच बदल घडविण्यात धोनी आणि फ्लेचर अपयशी होत आहेत. त्यामुळेच धोनी व फ्लेचर यांची आम्हांला लाज वाटते ! 

टीप- महेंद्रसिंग धोनीवरील कब तक धोनी ? हा माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Friday, August 10, 2012

वंचित समाजाचे बटबटीत वास्तव

 हिंदी चित्रपट निर्माते- दिग्दर्शक दोन प्रकारचे असतात एक प्रेक्षकांना गृहित धरणारे  आणि दुसरे  प्रेक्षकांच्या बुद्धीमत्तेवर  विश्वास ठेवून त्यांच्यापुढे सिनेमा सादर करणारे.  अनुराग कश्वायपचा गॅँग्ज ऑफ वासेपूर हा दुस-या प्रकारातला चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव फक्त इंग्रजी आहे, पण ही कथा अगदी याच मातीमधली आहे. या चित्रपटाची भाषा, लहेजा, शिव्या,हिंसा, प्रेम परस्परातील वैर, राजकारण आणि बदला प्रत्येक गोष्ट ही या मातीतील आहे. चोप्रा-जोहर यांच्या एनआरआय चित्रपटावर वाढलेल्या आणि  मल्टीप्लेक्स सिनेमाला सरावलेल्या प्रेक्षकांना हा प्रकार कदाचित आवडणार नाही. त्यांना हा चित्रपट अतिशय बटबटीत, अश्लील, नृशंस आणि अविश्वसनीय वाटेल.. पण महानगरात राहणा-या या मूठभर वर्गाच्या पलीकडेही एक मोठा समाज या देशात आहे. ज्या समाजातील पुढच्या पिढीच्या खांद्यावर मागच्या पिढीचे ओझे आपोओप येते. मागच्या पिढीचा वारसा ( त्यांचे प्रेम, भांडण, कोर्ट कचेरी ) ही पिढी इमानइतबारे पुढे चालवित असते. तीन तास डोके बाजूला ठेवून पाहण्याचा प्रकार म्हणजे सिनेमा असा ह्या वर्गाचा समज नसतो. तर या वर्गातील प्रत्येकाच्या डोक्यात स्वत:चा असा एक सिनेमा सुरु असतो. शहरी मानसिकेतपासून काहीसा विलग असलेल्या या समाजाचे बटबटीत वास्तव मांडणारी कथा अनुराग कश्यपने या दोन भागात जिवंत केली आहे.

      या चित्रपटाचा पहिला भाग जून महिन्यात तर दुसरा भाग हा आठ ऑगस्टला प्रदर्शित झाला. वासेपूर हा ख-या अर्थाने दोन भागातील चित्रपट आहे. असे पार्ट-2 किंवा पार्ट-3 प्रकारतील चित्रपट सध्या खो-याने आढळतात. पण ह्यामध्ये पहिल्या भागाचा दुस-याशी आणि दुस-याचा तिस-याशी फारसा संबंध नसतो.हे चित्रपट आपल्या पहिल्या भागाच्या यशाचा  ब्रँड पुढील भागात वापरतात.यापूर्वी रामगोमाल वर्माच्या रक्तचरित्रची कथाही दोन भागात दाखविली होती. वासेपूर हा ही त्याच पठडीतला चित्रपट आहे. पहिल्या भागाची कथा ज्या ठिकाणी संपते त्याच ठिकाणी दुसरा चित्रपट सुरु होतो. पहिल्या पिढीतील सूडभावना दुस-या पिढीत  गडद होते आणि तिस-या पिढीत कळसाला पोहचते. 1940 ते 2009 अशी सात दशके चित्रपटात जिवंत करण्याचे काम अनुरागने या साडेपाच तासांच्या दोन भागात केले आहे.

        2004 मधील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ह्या  लोकप्रिय मालिकेपासून ही कथा सुरु होते. एक मोठे कुटूंब एका लहानशा खोलीत ही मालिका पाहत असताना अचानक गोळीबार सुरु होतो.... अगदी पहिल्या फ्रेममध्ये चित्रपटगृहातील प्रेक्षक स्थिरावण्याच्या आत ह्या 'गोळ्यांची दिवाळी' अनुराग पडद्यावर साकार करतो. ही दिवाळी संपल्यानंतर व्हाईस ओव्हरच्या माध्यमातून समजते की वासेपूर आहे. जे पूर्वी बंगाल नंतर बिहार आणि आता झारखंडचा भाग आहे. ह्या गावात राहणा-या सरदार खानचा ( मनोज वाजपेयी ) एकच उद्देश आहे तो म्हणजे ब...द...ला !!! स्थानिक आमदार रामधीर सिंग ( तिग्मांशू धुलीया ) ला मारुन आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेणे हे एकच त्याचे ध्येय आहे.हा सूड त्याला आंधारात, बेसाववधपणे पूर्ण करायचा नाहीयं.. तर अगदी दिवसाढवळ्या, रामधीरला सूचना देऊन त्याच्या डोळ्याला डोळे भिडवत त्याला आपला सूड पूर्ण करायचा आहे. ( कहं के लूंगा )बदल्याची ही आग कायम ठेवत वासेपूरमध्ये होणारी स्थित्यंतर अनुराग आपल्याला दाखवत असतो. कोळशाची चोरी, रेतीचा व्यापार, खाण माफियांचे वास्तव त्याला मिळाणारी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची साथ ह्या सर्वांची उकल विविध दृश्यांमध्ये केली आहे. प्रेक्षकांना संदर्भ समजवण्यासाठी व्हाईस ओव्हरचा वापरही अनेक ठिकाणी करण्यात आला आहे.

चित्रपटाचा पहिला भाग हा मनोज वाजपेयी चा आहे. सत्यानंतर पहिल्यांदाच इतकी सशक्त भूमिका त्याच्या वाटेला आली आहे. भिकू म्हात्रे पाहून मोठा झालेल्या माझ्या सारख्या चाहत्यांच्या मनातील भिकूचा प्रभाव पुसण्याचे काम मनोजच्या या सरदार खानने केला आहे. सरदार खानमध्ये एकही गूण नाही..तरीही तो आपला वाटतो.  क्रूरता असो वा रोमान्स प्रत्येक प्रसंगातील त्याची सहजता मूग्ध करणारी आहे. त्याची पहिली बायको नगमा ( रिचा चढ्ढा ) आणि दुसरी दूर्गा ( रिमा सेन ) बरोबरच्या प्रसंगातून त्याचे कौटुंबिक आयुष्य समोर येते. रिमा सेनला फारसा स्कोप नसला तरी रिचाने दोन्ही भागात कमाल केली आहे. नव-याच्या बाहेररख्यालीला वैतागलेली, पोलिसांवर कोयता घेऊन धावणारी आणि दुस-या भागात आपल्या मुलाला बदला घेण्यास प्रवृत्त करणारी नगमा ही या पुरुष कलाकारांच्या गर्दीतही भाव खावून जाते.पहिल्या भागाच्या शेवटी मनोज वाजपेयी मरतो. आणि आता सरदारविना वासेपूर-2 कसा बघायचा ? हा प्रश्न पडलेला असतानाच त्याचा दुसरा मुलगा फैजल खान ( नवाजुद्दीन सिद्दीकी ) त्याची जागा घेतो. सचिनच्या जबरदस्त सुरुवातीनंतर  अर्धवट राहिलेले टार्गेट कोहली किंवा रैनाने त्याच तडफेने पूर्ण केल्यानंतर सच्चा क्रिकेटप्रेमीमंध्ये जे समाधान असते तेच समाधान वासेपूर-2 मध्ये फैजलने मिळवून दिले आहे.


फैजलच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनवर विश्वास टाकल्याबद्दल अनुराग कश्यपच्या सृजनात्मक साहसाची दाद द्यायला हवी. लूक, प्रेझेन्स ह्याचा विचार केला तर पारंपारिक हिरोच्या फ्रेममध्ये कुठेही न बसणारा हा हिरो त्याने निव्वळ अभिनय क्षमतेच्या जोरावर उभा केला आहे. त्याच्यावर चित्रीत झालेल्या प्रत्येक दृश्यात त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे.कायम नशेत चूर्र... असणा-या फैजलच्या आयुष्यात बापाच्या मोठ्या भावाच्या मृत्यूने्ही फारसा फरक पडलेला नसतो, पण आपल्या आईच्या त्राग्यानंतर तो जागा होतो.आपने दादा का, बाप का, भाई का सबका बदला घेण्याची कसम हा   हिंदी चित्रपटाच्या प्रभावात नेहमी  वावरणारा फैजल घेतो. फजलूचा गळा कापण्यापासून ते रामधीर सिंगच्या हत्येपर्यंतच्या टप्यात फ्रस्टेटेड, डिस्टर्ब आणि खूनशी असा फैजल प्रत्येक फ्रेममध्ये भाव खावून जातो. मोहसिना ( हुमा कुरेशी ) बरोबरची त्याची प्रणयदृश्यही विरंगुळा देणारी आहेत. दुस-या भागात केवळ फैजलच नव्हे तर मोहसिना, टेजंट, परपेंडिकूलर, फजलू, शमशाद आणि सूलतान ह्या प्रत्येकाने आपले काम चोख केले आहे. सत्यानंतर अशा प्रकारे एकत्रित कम करणारी गँग ही वासेपूरच्या निमित्ताने पाहयला मिळाली आहे.

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूवर भाष्य करणे हा काही माझा प्रांत नाही. मात्र राजीव रवीच्या कॅमेरामनची कमाल ही दोन्ही भागात जाणवते. दुस-या भागातील पाठलागाचा प्रसंग हा ख-या बाजारात चित्रीत केला आहे. अशा अवघड परिस्थितीमध्ये त्यांचा कॅमेरा चोख काम करतात. तसेच या चित्रपटातील संगीतही तितकच परिणामकारक आहे. पहिल्या भागातील इक बगल में चांद होगा, वुमनिया, आय एम हंटर, किंवा दुस-या भागातील चिचा लेदर, काला रे, आबरु की कसम, किंवा तार बिजली से पतले हमारे पिया ही गाणे कथेला पूढे नेण्यात आणि कलाकारांच्या स्वाभाव छटा दाखवण्यात महत्वाची भूमिका बजावितात. तार बिजली से पतले हमारे पिया म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून या भागातील जनता आहे. त्यांच्या या परिस्थिीतीला गांधीजी, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण हे देखील कुठेतरी जबाबदार आहेत असे गीतकाराला या गाण्यातून सांगायचे आहे. पियूष मिश्रा आणि वरुण ग्रोवर यांच्या गीतांना स्नेहा खानवलकर ह्या हरहुन्नरी संगीतकार ( की संगीतकारणी ) ने साज चढविला आहे. यशपाल शर्माने गायलेली चित्रपटाली गाणे आणि त्याचा बँड ही त्या विशिष्ट प्रसंगाला अधिक मार्मिक बनवितात.

अर्थात ह्या चित्रपटातही काही खटकणा-या गोष्टी आहेत. रामधीर सारखा आमदार सरदार खान सारख्या एका गावगुंडाला इतका का घाबरतो ते कळत नाही. दुस-या भागातील हिंसाचार जास्तच लांबला आहे. विशेषत: शेवटच्या भागात फैजलने अगदी अमिताभ बच्चनच्या स्टाईलने केलेली मारामारी जास्तच अविश्वसनीय वाटते तसेच दुस-या भागातील पात्र पुढे कसा वागेल किॆवा त्याचा शेवट कसा होईल याचाही अंदाज यायला लागतो. मात्र चित्रपटाचा एकंदरीत परिणाम लक्षात घेता ह्या त्रूटी दुर्लक्ष कराव्यात अशा आहेत.'बदला' हे पारंपरिक ढोबळ सूत्र वापरुन बनिवण्यात आलेले हे दोन्ही भाग ह्या तीन अक्षरी सूत्राच्या जोरावरच हटके ठरतात.

शहरी मानसिकेतेपासून शकडो मैल दूर असणा-या भारताची ही वासेपूर कथा आहे. या भागातील संघर्ष त्यांच्यातील ताण-तणाव, कट-कारस्थानेही ही देखील याच देशाचा भाग आहे. आपल्याला माहिती नसलेला हा भारत कसा आहे हे पाहण्यासाठी तरी वासेपूरचे दोन्ही भाग पाह्यलाच हवेत.

Friday, March 16, 2012

सेलिब्रेटिंग सचिन


संपूर्ण क्रिकेट विश्वाला गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेले डोहाळे पूर्ण झालेत. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकवण्याचा न भूतो  विक्रम सचिननं केलाय. 100 आंतरराष्ट्रीय शतक झळकवणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. सचिनच्या या शंभर शतकांचे सेलिब्रेशन करत असताना त्याच्या आजवरच्या काही अविस्मरणीय शतकांचा हा आढावा ( टीप - * खूण नाबाद असल्याचे दर्शविते )

10 )   119* विरुद्ध इंग्लंड ( मॅंचेस्टर , 1990 )
 
   सचिन तेंडुलकरचे हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक. मॅँचेस्टरच्या टिपीकल इंग्लिश वातावरणात अगदी प्रतीकूल परिस्थितीमध्ये त्यानं झळकावलेलं. तीन टेस्टच्या त्या सीरिजमध्ये भारतीय टीम 1-0 अशी पिछाडीवर होती.इंग्लंडचा कॅप्टन ग्रॅहम गुचनं यापूर्वीच्या लॉर्डस टेस्टमध्ये काढलेले 333 रन्सचे व्रण भारतीय टीमच्या मनावर ताजे होते. त्यातच मॅंचेस्टर टेस्ट जिंकण्यासाठी दुस-या डावात भारतासमोर आव्हान होते 408 रन्सचे. नवजोत सिद्धू, संजय मांजरेकर, अझहरुद्दीन, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि कपिल देव हे सहा रथी -महारथी धारातिर्थी पडले तेंव्हा स्कोअर होता 6 आऊट 183. पराभवाच्या कडेलोटावर उभं असताना 17 वर्षांचा कोवळा सचिन इंग्रजांविरुद्ध लढला. आक्रमकता आणि संयम याचा सुरेख संगम असलेली एक अविस्मरणीय इनिंग त्यानं क्रिकेटच्या माहेरघरात पेश केली. भारतीय टीमच्या गोकुळाचा डोलारा ह्या कोवळ्या सचिननं अगदी अलगत पेलला.  त्यानं काढलेल्या नाबाद 119 रन्समुळे ही टेस्ट अनिर्णित राखण्यात भारत यशस्वी ठरला.  क्रिकेट विश्वाला सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज आहे हे त्या दिवशी ख-या अर्थाने समजलं.

9)  140* विरुद्ध केनिया ( ब्रिस्टॉल, 1999 )


    आपल्या वडिलांच्या वियोगाचे दु:ख बाजूला ठेवत सचिननं झळकावलेलं हे शतक आठवलं की आजही अनेकांचे आपसूकच डोळे ओलावतात. झिम्बाव्वे विरुद्ध झालेल्या धक्कादायक पराभवामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक होता. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईला गेलेला सचिन केनिया विरुद्धची मॅच सुरु होण्याच्या काही तास अगोदरचं इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. संघहितासाठी आपलं अभाळाएवढं दु:ख त्यानं बाजूला ठेवलं. सचिनच्या बॅटनं निर्माण केलेल्या झंझावातामध्ये केनियाचे दुबळे बॉलर्स  पालापाचोळ्यासारखे उडून  गेले. सचिननं हे शतक आभाळाकडं बघत आपल्या वडिलांना अर्पण केलं. त्यानंतरच्या प्रत्येक शतकानंतर आभाळाकडे बघण्याची प्रथा सचिननं पाळली आहे.







                 8 ) -  103* विरुद्ध इंग्लंड ( चेन्नई 2008 )


   मुंबई हल्ल्या नंतर देशवासियांना झालेल्या जखमेवर मुंबईकर  सचिनचे हे शतक फुंकर घालणारं ठरलं. चेन्नई टेस्ट जिंकण्यासाठी 387 रन्सचं आव्हानात्मक टार्गेट भारतीय टीम समोर होतं. सेहवाग- गंभीर चांगल्या सुरुवातीनंतर परतले. भरवशाच्या द्रविड - लक्ष्मणनं निराशा केली. अशा कठिण परिस्थितीमध्ये सचिननं आपला सारा अनुभव पणाला लावत विजयाचा घास इंग्लंडच्या तोंडातून हिसकावून घेतला.  चेन्नईच्या त्या पिचवर पाचव्या दिवशी अचानक बॉल उसळत होते तसेच वळत ही होते अशा अवघड परिस्थितीमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये फारशा न सरावलेल्या युवराजच्या मदतीनं त्यानं हा अविस्मरणीय विजय प्रत्यक्षात आणला. चौथ्या इनिंगमध्ये तब्बल नऊ वर्षांनी शतक झळकवण्यात सचिन यशस्वी ठरला होता.दबावाखाली टीमला गरज असताना सचिन खेळत नाही असे ओरडणा-या टीकारांना सचिननं आपल्या बॅटनं दिलेलं हे खणणीत उत्तर होतं.


7 )  200 * विरुद्ध दक्षिण आफ्रिका  (ग्वाहलेर, 2010)


   वन-डेमधली पहिली डबल सेंच्युरी तीही साक्षात सचिननं झळकावलेली मी पाहिली आहे. असं मी पुढच्या पिढीला नेहमीच अभिमानाने सांगू शकेल. पहिली डबल सेंच्युरी कोण झळकवणार ?  ह्यावर सर्वांचेच आपले-आपले अंदाज होते. मात्र हा पराक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणा-या सचिननच्या बॅटमधून व्हाला असं नियतीला मंजूर होतं.वयाच्या 37 व्या वर्षी तब्बल 20 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घालवल्यानंतर सचिननं हा पराक्रम केला. विशेष म्हणजे त्याने या 200 धावा आफ्रिकन बॉलर्सच्या विरुद्ध केल्या. बांग्लादेश, केनिया, झिम्बाब्वे यासारख्या दुबळ्या देशांच्या बॉलर्सविरुद्ध नाही. डेल स्टेन, पारनेल, जॅक कॅलिस यासारखे दिग्गज बॉलर्सन आणि सर्व 11 च्या 11 वर्ल्ड क्लास दर्जाच्या क्षेत्ररक्षकांवर मात करत त्यानं ही ऐतिहासिक डबल सेंच्युरी पूर्ण केली. त्यामुळे त्याचे मोल अधिक आहे.

6 ) 117 * विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( सिडनी 2008 )


फायनल मॅचमध्ये सचिन खेळत नाही असे गृहितक मांडणारे क्रिकेट तज्ज्ञ त्याची ही इनिंग हमखास विसरतात.कॉमनवेल्थ बॅंक सीरिजच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं 240 धावांचे लक्ष्य सचिनच्या या शतकाच्या जोरावर भारताने सहज पार केलं. ब्रेट ली, नॅथन ब्रॅकन, मिचेल जॉन्सन आणि जेम्स होप्स या कांगारुच्या बॉलर्सची सचिननं मनोसोक्त धुलाई केली. सलग तीन वर्ल्ड कप पटकवणा-या ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठेला त्यांच्याच जमिनीवर तेही फायनलमध्ये सचिननं धक्का दिला.



5 ) 160 विरुद्ध न्यूझीलंड  ( हॅमिल्टन, 2009 )



     2003 च्या दौ-यात न्यूझीलंडच्या पिचचा अंदाज वीरेंद्र सेहवाग वगळता कोणालाच आला नव्हता. त्यामुळे या दौ-यात टीम इंडियासमोर या अपमानाचा बदला घेण्याचं आव्हान होतं. हॅमिल्टनच्या  पिचवर उसळणा-या बॉलची कोणत्याही भारतीय बॅट्समनला सवय नव्हती. सचिननं मात्र या पिचशी सहज जुळवून घेतलं. 90 च्या दशकात सचिन अगदी भरात असताना जशी बॅटिंग करत होता  अगदी तशाच पद्धतीनं त्यानं 2009 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी केली.  सचिनच्या शतकानं तब्बल 33 वर्षांनतर भारताला न्यूझीलंडमध्ये टेस्ट जिंकता आली. तसंच पुढे सीरिज जिंकण्यात आपली टीम यशस्वी ठरली. न्यूझीलंड दौरा म्हंटलं की वेगवान पिचचं आणि तिथल्या संपूर्णपणे अनोळखी वातावरणाचं भूत टीम इंडियाच्या मानगुटीवर बसतं. हे भूत उतरवण्यात सचिनचं हे शतक यशस्वी ठरलं. त्यामुळेच त्याचं हे शतक संस्मरणीय आहे.





              4 )      241* विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( सिडनी, 2004 )


  ऑस्ट्रेलियाचा महान कॅप्टन स्टीव्ह वॉ याची ही शेवटची टेस्ट. स्टीव्ह वॉ साठी भारताविरुद्धची सीरिज म्हणजे 'द लास्ट फ्रंटियर' होती. आपल्या लाडक्या कॅप्टनला सीरिज विजयाची भेट द्यायचीच या निर्धारानं कांगारु पेटले होते. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताचा स्कोअर सुरुवातीला 4 आऊट 157 आणि नंतर 7 आऊट 705 ! हा विशाल स्कोअर उभा राहिला तो सचिन आणि लक्ष्मण ( म्हणजे ऑस्ट्रेलियन टीमसाठी संताजी - धनाजी ) यांच्या संस्मरणीय शतकामुळे. या सीरिजपूर्वी सचिनला बराच काळ टेनिस एल्बोनं सतावलं होतं. ऑफ साईडला मारलेल्या काही फटक्यांवर तो आऊट झाला होता. दुखापत, खराब फॉर्म ह्या सा-यांना मुठमाती देत सचिननं सिडनीवर हा डबल धमाका केला. या टेस्टमध्ये ऑफ साईडच्या शॉट्सना मुरड घालत बहुतेक फटके लेगला मारत सचिननं  नाबाद 241 रन्स काढले. शेवटची टेस्ट जिंकण्याचं  स्टीव्ह वॉ चं स्वप्न धुळीस मिळालं. बॉर्डर - गावसकर ट्रॉफी भारताकडेच राहिली.



3)    155* विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( चेन्नई, 1998 )

    ऐन बहारात असलेला सचिन तेंडुलकर कसा खेळायचा याचा अभ्यास आणखी 50 वर्षानंतर कोणत्या क्रिकेट अभ्यासकाला करायचा असेल तर त्याला त्याची ही चेन्नईमधल्या इनिंगच्या हायलाईट्स पाहव्याच लागतील. जगातला 'ऑल टाईम ग्रेट' लेग स्पिनर शेन  वॉर्न अगदी बहरात होता. सचिन विरुद्ध वॉर्न यांच्यातील लढाईकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष होतं. पहिल्या इनिंगमध्ये सचिनला फक्त 4 रन्सवर आऊट करत वॉर्ननं पहिली फेरी आरामात जिंकली होती. दुस-या इनिंगमध्ये सचिनला परतफेड करण्याची संधी मिळाली.  टेस्टच्या चौथ्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये पिछाडीवर असलेल्या टीमच्या बॅट्समननं त्याकाळातील सर्वोत्तम लेगस्पिनरची जोरदार धुलाई केली. राऊंड- द-विकेट बॉलिंग करणा-या शेन वॉर्नला सचिननं स्वीप आणि पूल शॉट्सचा वापर करत खेचेले सिक्सर आणि फोर आठवले की आजही माझ्या अंगावर शहारे येतात. क्रिकेटमधल्या या दोन महान खेळाडूंच्या लढाईत विजेता कोण ? याचं उत्तर क्रिकेट विश्वाला मिळालं होतं. सचिननं केलेल्या याच धुलाईनंतर शेन वॉर्नला स्वप्नातही सचिन दिसू लागला.


     2 )    143 विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( 1998, शारजा )

     अमिताभ बच्चन म्हंटला की त्यानं दिवारमध्ये पिटर आणि त्याच्या पंटरची बंद खोलीत धुलाई हमखास आठवते. तसंच सचिन म्हंटला की त्याची ही शारजामधली वादळी इनिंग हमखास डोळ्यासमोर उभी राहते.फायनलमध्ये पोचण्यासाठी भारताला 254 रन्स करणे आवश्यक होते. डेमियन फ्लेमिंग, शेन वॉर्न, माइक कॅस्पारोविझ यासारखी विकेट्सला चटावलेली बॉलर्सची टोळी कांगारुंकडे होती. ही मॅच सुरु असतानाचं शारजाच्या वाळवंटात वादळ आलं त्यामुळे साहजिकचं मॅचमध्ये अडथळा निर्माण झाला. आता भारताला फायनल गाठण्यासाठी 46 ओव्हर्समध्ये 236 रन्स आवश्यक होते. कांगारुंचा तेंव्हाचा दबदबा पाहता हे टार्गेट हिमालयाएवढे वाटत होतं. पण दिवारमधल्या अमिताभप्रमाणे सचिन जिद्दीला पेटला होता. त्याच्या बॅट्नं त्यादिवशी  क्रिकेटमधली एक अविस्मणीय स्क्रिप्ट लिहली. त्यानं अवघ्या 131 बॉल्समध्ये 9 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं 143 रन्स काढले. शारजातील वाळवंटात होणारी वादळंही शुल्लक वाटावीत असा झंझावात त्या दिवशी सचिननं निर्माण केला होता. त्याच्या या झंझावातामुळेच भारतीय टीम फायनलमध्ये दाखल झाली होती हे वेगळं सांगयला नकोच. महत्वाच्या वेळेस सचिन खेळत नाही असे ओरडणा-या सचिन विरोधकांनी त्याची ही इनिंग नेहमी लक्षात ठेवावी. सचिनचे फॅन तर ही इनिंग कधीच विसरु शकणार नाहीत.



1)  136 विरुद्ध पाकिस्तान ( चेन्नई, 1999 )

  हे आहे सचिनचं माझ्या मते सर्वोत्तम शतक. तब्बल नऊ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेली ही ऐतिहासीक टेस्ट मॅच. पाकिस्तानकडे वासिम अक्रम आणि वकार .युनूस हे क्रिकेट  जगातले दोन खतरनाक बॉलर्स. त्यांच्या जोडीला संपूर्ण भरात असलेला 'दुसरा' फेम ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताक. युवा शाहिद आफ्रिदीनंही आपल्या 'हातचालाखी' च्या जोरावर  पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. क्रिकेटमधल्या या सर्वात हाय- व्होल्टेज मॅचमध्ये भारतासमोर विजयासाठी 271 रन्सचं लक्ष्य होतं. पाकिस्तानच्या भेदक बॉलिंगमुळे भारताची अवस्था 5 आऊट 82. सचिननं  एका बाजूला उभा होता. त्याची आणि नयन मोंगियाची जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 136 रन्सची पार्टरनरशिप केली. मोंगिया आऊट झाला तरी सचिन खेळत होता.चेन्नईचे दमट हवामान कोणत्याही क्रिकेटपटूच्या फिटनेसची परीक्षा घेणारचं असतं त्यातचं सचिनला त्या टेस्टमध्ये पाठदुखीनं हैराण केलेलं होतं. तरी देखील आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी विरुद्ध भारताला विजय मिळवून द्यायचाच या एकाच निर्धाराने त्यानं तब्बल 405 मिनिटं बॅटिंग केली. विजय अगदी हातातोंडाशी असताना सचिन आऊट झाला. सचिन परतला तेंव्हा भारताला केवळ 17 रन्स हवे होते. चौथ्या दिवसाचे काही ओव्हर्स आणि पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ बाकी होता. त्यामुळे अगदी रमत-गमत हे रन्स काढले तरी चालणारं होतं. तरी देखील शेवटच्या चौघांना हे लक्ष्य पार करता आलं नाही.सचिन परतल्यानंतर अवघ्या चार रन्समध्ये भारताच्या पुढच्या तीन विकेट्स पडल्या. सचिननं विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला भारत  12 रन्सने पराभूत झाला. नेता पडला की कोसळायचं ही आपली जुनी परंपरा ह्या शेवटच्या तिघांनी पाळली. या मॅचच्या हायलाईट्स आजही बघत असताना सचिन नंतर आऊट झालेल्या तिघांच्या कानाखाली समई पेटवावी असंच मला वाटतं.   
               

Friday, December 16, 2011

सोशल मीडियावरील नियंत्रण : शेरे, ताशेरे अन् मते, मतांतरे




सध्या फक्त एकच गोष्ट सेन्सॉर होण्याची गरज आहे आणि ती म्हणजे कपिल सिब्बल यांचे तोंड!'
'फेसबुकवर स्टेटस अपडेट करताना प्रत्येक वेळी सिब्बल यांची परवानगी घ्यायची काय?'अशा उपरोधिक प्रतिक्रियांपासून ट्विटरवर 'इडियट कपिल सिब्बल' असा हॅश टॅग देण्यापर्यंत विविध प्रकारे नेटकरांनी सिब्बल यांच्यावर हल्ला चढविला आहे. त्याला कारण आहे ती सिब्बल यांची सूचना. सोशल मीडिया संकेतस्थळावर नियंत्रण घालण्याची. फेसबुक, ट्विटर, ऑर्कूट आदी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर देशातील राजकीय नेते आणि धार्मिक समूहांच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह छायाचित्रे, मजकूर प्रसिद्ध होण्यापूर्वी संपादित करण्यात यावा किंवा हटविण्यात यावा, अशी सूचना माहिती-तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी याहू, गुगल या कंपन्यांना केली आहे. 


या संकेतस्थळांवर, त्यातही प्रामुख्याने फेसबुकवर सोनिया गांधी तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे संतप्त होऊन सिब्बल यांनी हा इशारा दिल्याचे म्हटले जाते. पण फेसबुकसारख्या संकेतस्थळांवरील विविध राजकीय नेते, संघटना, पत्रकारितेसारख्या अन्य क्षेत्रातील व्यक्ती यांच्याविरोधातील टीकेचा स्तर, त्यातील विखारीपणा पाहता सिब्बल यांना याबाबत संशयाचा फायदा देणे गरजेचे आहे. म्हणजे केवळ कॉंग्रेस नेत्यांवरील टीकेमुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहे, असेच काही म्हणता येणार नाही. गुगलकडे ते जेव्हा आपली सूचना घेऊन गेले, तेव्हा त्यांनी जो मजकूर व छायाचित्रे सादर केली होती, ती काही सगळीच सोनिया गांधी वा मनमोहन सिंग यांच्याबद्दलची नव्हती. गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे मुंबईतल्या एका उपनगरात दंगल भडकण्याची वेळ आली होती, हेही येथे लक्षात घेण्यासारखे आहे. यां सारख्या काही घटनांतून सिब्बल यांनी तशी सूचना केली असावी. आपल्या कार्यकाळात ट्विटर मंत्री म्हणून ओळखले जाणारे माजी परराष्ट्र मंत्री शशी थरूर, कॉंग्रेसचे खासदार मिलिंद देवरा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांसारख्या व्यक्तींनी सिब्बल यांच्या सूचनेला याच मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे. काही आक्षेपार्ह मजकूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची सेन्सॉरशिप आवश्यक आहे, असे ट्विट थरुर यांनी केले आहे. भाजपनेही या सूचनेला सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. पण या सर्वांहून विरोधाचा आवाज मोठा आहे.



सायबर विश्वातून तर सिब्बल यांच्यावर जणू ‘ऑनलाइन आक्रमण’च सुरु आहे. देशातील सर्वसामान्य नेटिझन्सचे ( विशेषत: युवकांचे ) विचारांचे प्रकटीकरण करण्याचे माध्यम म्हणून आता फेसबुक ओळखले जाते. फेसबुकचा वापर करणा-या अनेक युझर्सनी सिब्बल यांच्या या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियाचा गळा दाबून भारताला चीन किंवा पाकिस्तानाच्या रांगेत बसवण्याचे प्रयत्न थांबवा असे आवाहन काही नेटिझन्सनी केले आहे. काहींनी तर, सिब्बल यांच्या सेन्सॉरशिपवरील संभाव्य विधेयकाचे Social Networking Inspection Act ( SONIA ) असे बारसेच करून टाकले आहे! सामान्य नेटिझन्स प्रमाणे सेलिब्रिटींनींही टिविटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सोशल मीडियावर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. सरकारला हीच क्षमता सलत असावी, असे मत चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी व्यक्त केले आहे. तर केवळ आपल्या मॅडमचे खासगी आयुष्य जपण्यासाठी दहा कोटी इंटनेट युझर्सवर सरकार अन्याय करणार का ? असा सवाल स्तंभलेखिका शोभा डे यांनी विचारला आहे. चित्रपट निर्माते प्रीतीश नंदी यांनी, हा माझा देश आहे आणि मला माझ्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यावर आक्रमण करणा-यांनी नरकात जावे, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. 



सेन्सॉरच्या योग्यायोग्यतेचा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवला, तरी एक सवाल उरतोच. तो म्हणजे अशा प्रकारची सेन्सॉरशिप मुळात शक्य तरी आहे का? फेसबुक ट्विटरवरील चर्चेत नेटिझन्सनी आपला संताप व्यक्त करत असतानाचा ही सेन्सॉरशिप कितपत व्यवहार्य आहे. पुण्यातील गौरव मित्तल या अभियंत्याने याबातची सविस्तर आकडेवारीच मांडली आहे.  यू ट्यूबवर दर मिनीटाला सुमारे ४८ तासांचे व्हिडीओ अपलोड होत असतात. फेसबुकचे जगभरात ८० कोटी तर भारतामध्ये सुमारे २५ कोटी वापरकर्ते आहेत. ज्या प्रमाणे टेलिफोन कंपन्यांनाकडून त्यांच्या ग्राहकांकडून पाठविण्यात येणा-या प्रत्येक संदेशाचे नियंत्रण करणे अशक्य आहे. त्याच प्रमाणे सोशल नेटवर्किंग संकेत स्थळाकडूनही प्रत्येक वापरकर्त्याने अपलोड केलेल्या माहितीवर नियंत्रण ठेवणे हीसुद्धा अशक्य कोटीतील बाब आहे, असा बिनतोड युक्तिवाद गौरव यांनी केला आहे.

कपिल सिब्बल यांच्या विरोधातील एक कम्युनिटीही फेसबुकवर आहे. या कम्युनिटीची लोकप्रियताही मागील काही दिवसात वाढली आहे. या कम्युनिटींवर काही जणांनी आक्षेपार्ह भाषेत सिब्बल यांच्यावर ताशेरे ओढले असले तरी काही अभ्यासू युक्तिवादही केलेले आढळतात. नवी दिल्लीच्या आशिष माहेश्वरी या उद्योजक युवकाने मांडलेल्या मताचा याबाबत आवर्जून उल्लेख करावा लागेल. केंद्र सरकारला ग्रृप c च्या ५० लाख कर्मचा-यांना लोकपाल विधेयकाच्या अंतर्गत आणणे शक्य नाही. मात्र फेसबुक किंवा गुगलने सुमारे २५ कोटी युझर्सवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा कशी करता येईल असा सवाल माहेश्वरी यांनी विचारला आहे. काही आक्षेपार्ह शब्द किंवा काही चित्रांची यादी तयार करुन फार तर त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. पण त्यालाही मर्यादा आहेत. फेसबुक किंवा गुगल प्लसवरील काही बंदिस्त गटांमध्ये किंवा काही विशिष्ट मित्रांपुरत्या मर्यादीत असलेल्या मजकुरावर नियंत्रण कसे ठेवणार? त्या गटातील माहितीवर नियंत्रण ठेवणे हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरच हल्ला आहे. ज्या देशाने आपल्या राज्यघटनेत हे एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक नागरिकाला आचार-विचार-उच्चार स्वातंत्र्य दिले आहे. तेथे अशा प्रकारची सेन्सॉरशिप कोणत्या कलमात बसवणार, हे घटनातज्ज्ञ असलेल्या सिब्बल साहेबांनी देशाला समजवून सांगण्याची गरज आहे! अशा आशयाचा सूर या कम्युनिटीच्या सदस्यांनी आपल्या चर्चेतून व्यक्त केला आहे.


भारतामध्ये नाही तर सातासमुद्रापार अमेरिकेमधील भारतीयांमध्येही या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले आहेत.
अमेरिकेतील भारतीय नेटिझन्सनी यामध्ये अमेरिका आणि भारताची तुलना केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नावाने जर इंटरनेचवर सर्च केले तर अनेक आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ आपल्याला सहजपणे आढळतील. मात्र त्यामुळे अमेरिकेच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, अमेरिकेतील लोकशाहीचा गैरवापर होत आहे, अशा प्रकारची ओरड कोणीही करत नाही. अमेरिकेनेने सोशल माध्यमांचा, त्याच्या चांगल्या आणि त्रासदायक बाजूंसह स्वीकार केला आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तर मग भारतामध्ये सिब्बल साहेब या अमेरिकेच्या पॅटर्नचे अनुकरण का करत नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मीडियावर अंशत: सेन्सॉरशिप लादण्याचा विचार सिब्बल यांनी बोलून दाखवला आहे. गर्भधारणा आणि सेन्सॉर अंशतः असू शकत नाही, या आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. ती सिब्बल यांनी लक्षात घेतली नसावी. कारण सेन्सॉरशिप ही एकतर असते किंवा नसते.असा सूरही काही अमेरिकी नेटिझन्सनी व्यक्त केलेला आढळतो.


सोशल मीडिया लोकप्रिय झाला याचे महत्वाचे कारण म्हणजे या माध्यमामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्त होण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा वृत्तपत्रे यां माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींना अभिव्यक्त होण्यास काही  मर्यादा आहेत. सोशल मीडियाने मात्र प्रत्येकाला आपले विचार दुस-यापर्यंत पोहचवण्याचे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या माध्यमाच्या वापरकर्त्यांच्या संख्येत दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ हे याचेच द्योतक आहे. या व्यासपिठावर लोक चर्चा करतात, गप्पा मारतात, एकमेकांना विनोद सांगतात तसेच गंभीर विषयांच्या चर्चेत सहभागीही होतात. आपल्या परिसरातील, राज्यातील, देशातील समस्या या छायाचित्रे तसेच व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडतात. त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. अलिकडच्या काळात जगात झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांचा जन्म याच व्यासपीठावर झाला आहे. निपचित पडलेल्या सरकारला जागे करण्याचे काम पूर्वी हे काम राजकीय पक्ष किंवा संघटना करत असत, आता सामान्य नेटिझन्स करत आहेत. सोशल मीडियाच्या याच स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न सिब्बल करत आहेत अशी तक्रार या सोशल मीडियाशी एकरुप झालेल्या  वर्गाने केला आहे. कपिल सिब्बल यांचे तोंड सेन्सॉर करा अशा आशयाचा टाहो या वर्गातून फोडला जात आहे तो यामुळेच. 

टीप - दै. लोकसत्तामध्ये १२ डिसेंबर २०११ या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख  लोकसत्तामधील लेख इथे पाहता येईल 

Friday, December 9, 2011

सेहवाग नव्हे सिंघम !



तो खेळताना त्याचे पाय हलत नाहीत....
त्याचा फॉर्म हरपलाय ......
कर्णधार पदाचे गांभीर्य त्याच्या बॅटिंगमध्ये दिसत नाही
त्याचे रनिंग-बिटविन द विकेट गचाळ आहे सहकारी खेळाडूंना तो हमखास बाद करतो किंवा स्वत: बाद होतो
त्याच्या शारिरीक हलचाली मंदावल्या आहेत... त्याच्या कानात दोष निर्माण झाला आहे ...

इंदूरमध्ये आज झालेल्या वन-डे पूर्वी वीरेंद्र सेहवागर अशा अनेक प्रकरे टीका होत होती. एखादा सामान्य खेळाडू अशा प्रकारच्या टीकेमुळे कोषात जाऊ शकतो. पण हा वीरेंद्र सेहवाग आहे. त्याचे खेळताना पाय हलत नाहीत पण तो जेंव्हा खेळतो त्यावेळी धावफलक इतक्या जोराने पळू लागतो की समोरच्या टीमच्या खेळाडूंना अक्षरश: धाप लागते. त्याचा फॉर्म हरपलाय अशी जेंव्हा टीका होते त्यावेळी तो अशी काही खेळी खेळतो की त्याची हेटाळणी करणा-यांचे दात घशात जाऊन वेगळ्याच वाटेने शरिराच्या बाहेर पडतील की काय अशी शक्यता निर्माण होते.

एक कॅप्टन म्हणून आज तो जी खेळी खेळला आहे. तो विक्रम मोडण्याचे स्वप्न बघत आता भविष्यातले कित्येक महान कॅप्टन निवृत्त होणार आहेत. त्याच्या रनिंग बिटिवन-द विकेटमध्ये नेहमीच घोळ असतो. त्यामुळे सहकारी खेळाडू रन-आऊटही होतात. मात्र तो रंगात असला की या चुकीची सव्याज परतफेड करु शकतो. आजही गंभीर आणि रैना चांगले सेट झाल्यानंतर रन-आऊट झाले. मात्र ते कुणीही खिचगणतीत पकडले नाही. त्याच्या शारिरीक हलचाली मंदावल्या असतील पण जागेवर उभे राहून काही कळायच्या आत बॉलला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देण्याची शक्ती त्याच्या मनगटात आहे. मध्यंतरी त्याच्या कानात दोष निर्माण झाला होता. पण  त्याच्या फटकेबाजीमुळे उत्साहित झालेले प्रेक्षक जेंव्हा मैदान डोक्यावर घेतात. तेंव्हा त्यांच्या आवाजाने मैदानावर उपिस्थत असलेल्या खेळाडूंचे कान बधिर होऊ शकतात. ७० च्या दशकात अमिताभ पडद्यावर आला की त्याच्या सोबत कोण आहे याकडे कुणाचेही लक्ष नसायचे. सर्वांची नजर अमिताभ काय करणार यामध्ये सर्वांचे लक्ष असायचे.तसे सेहवाग भरात असला की त्याच्या सोबत कोणताही ग्रेट बॅट्समन खेळत असला तरी त्याची पर्वा कुणीच करत नाही. त्यामुळेच वन-डे क्रिकेटमध्ये २०० रन्सचा टप्पा सर्वात प्रथम सेहवाग पार करेल असा माझा अंदाज होता. यापूर्वीच्या माझ्या ब्लॉग
मध्ये मी तो व्यक्तही केला होता. पण तो टप्पा सर्वप्रथम सचिनने पार केला. आता सेहवागने सचिनचा हा रेकॉर्ड नुसताच मोडला नाही तर आणखी उंचीवर नेऊन ठेवला आहे.

मराठी साहित्य निर्मितीमध्ये जेंव्हा  व्याकरणाच्या नियमांचा बोलबाला होता. त्याकाळात मराठीमध्ये मुक्तछंद हा कविता प्रकार सुरु झाला. वीरेंद्र सेहवागची बॅटिंग म्हणजेही मुक्तछंदामधली कविता असते.  क्रिकेटमध्ये कोणत्याही नियमांमध्ये चौकटीमध्ये त्याला बसविता येत नाही.

देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाप्रमाणे त्याची बॅट नेहमी प्रतिस्पर्धी खेळाडूंना आव्हान देत असते. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या ! असा इशारा तो समोरच्या प्रत्येक बॉलर्सना देत असतो. चांगला बॉल, खराब बॉल, उसळता बॉल किंवा आखूड बॉल अशा प्रत्येक प्रकारच्या बॉलवर त्याने षटकार खेचला आहे. अगदी शतकाच्या नव्हे तर त्रिशतकाच्या उंबरठ्यावरही त्याने हे अचाट साहस वारंवार केले आहे. कधी तो फसतो या प्रयत्नात तो २९३ किंवा १९५ वर आऊटही झाला आहे. म्हणून तो कधीही दडपणामध्ये येत नाही. अगदी या इंदूर वन-डेमध्येही त्याने १५० ते २०० हे अंतर अवघ्या २८ बॉल्समध्ये पार केले.
            क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूंचे मोठेपण हे नेहमी आकड्यांच्या तराजूमध्ये मोजले जाते. सचिन, ब्रॅडमन, लारा, द्रविड किंवा पॉन्टिंग यांनी शतके किंवा त्यांच्या नावावर असलेली भरमसाठ रन्स याचे दाखले नेहमी दिली जातात. या सर्व महान खेळाडूंच्या यादीत सेहवागच्या नावाचा फारसा उल्लेख केला जात नाही.

टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी आणि वन-डेमध्ये डबल सेंच्युरी मारणारा तो जगातला एकमेव बॅट्समन आहे. टेस्टमध्ये दोन वेळा ३०० चा जादूई आकडा पार करणे हे केवळ ब्रायन लारा ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवागला जमले आहे. या यादीमध्ये त्याच्या पुढे फक्त सर डॉन ब्रॅडमन हे एकच नाव आहे. टेस्टमधली सर्वात जलद ट्रिपल सेंच्युरी आणि वन-डेमधली सर्वात जलद डबल सेंच्युरी त्यानेच झळकावली आहे. १० वर्षांच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये २२ सेंच्युरी त्यापैकी १४ वेळा दिडशेपेक्षा जास्त रन्स , ४ डबल सेंच्युरी आणि २ ट्रिपल सेंच्युरी करण्याचा पराक्रम हा दुस-या कोणत्याही भारतीय बॅट्समनने केलेला नाही. इंग्लंड विरुद्ध २००८ साली चेन्नई टेस्टमध्ये चौथ्या इनिंगमध्ये साधारण १०० ओव्हर्समध्ये ३८७ रन्स करण्याचे टार्गेट वीरेंद्र सेहवाच्या झंझावती सुरुवातीमुळेच ( ६८ बॉल्स ८३ रन्स ) शक्य झाले होते.

तसेच जेंव्हा टेस्ट मॅच वाचवण्याची वेळ येते तेंव्हाही सेहवागने भारतीय टीमच्या मदतीला धावून आला आहे. २००८ साली अॅडलेड टेस्टमध्ये टीममध्ये जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन केल्यानंतर त्याने काढलेल्या १५१ रन्समुळे भारताला पराभव टाळता आला होता. तसेच त्याच वर्षी श्रीलंकेमध्ये त्याने सलमीला येऊन शेवटपर्यंत नाबाद राहत २०१ रन्सची खेळी केली होती. ( त्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा स्कोअर होता सर्वबाद ३२९ ).

वेस्ट इंडिजच्या पिचवर हॅल्मेट नसताना उसळत्या बॉल्सचा सामना करत गावस्करने झळकावलेली शतके जबडा फाटल्यावर बॉलिंग करणारा कुंबळे किंवा चेन्नई टेस्टमध्ये जीवघेण्या पाठदुखीवर पर्वा न करता सचिनने विजयासाठी केलेली एकाकी धडपड या इनिंग सर्वांच्या लक्षात आहेत. या सर्व इनिंग ग्रेट आहेत याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सेहवागला त्याच्या करियरमध्ये अशा प्रकारची कोणती मोठी दुखापत आजवर झाली नाही.  मात्र २००७ मध्ये त्याला टीमच्या बाहेर बसवण्यात आले. त्याच्या खेळण्याच्या तंत्रामध्ये दोष आहे. त्याची वृत्ती क्रिकेट खेळण्यास साजेशी नाही अशा प्रकारची वारंवार टीका त्यावर केली गेली. या सर्व मानसिक दडपणानंतरही सेहवागने आपले तंत्र बदलले नाही. आपली वृत्ती सोडली नाही. उलट २००८ ते २००११ या मागील चार वर्षातील त्याच्या अनेक खेळी थक्क करुन सोडणा-या आहेत. आपल्याला नावं ठेवणा-या जगाला अंगावर घेऊन खेळातील तंत्रामध्ये फारसा बदल न करता, आक्रमक वृत्तीला मुरड न घालता यशस्वी होता येते हे सेहवागने सिद्ध करुन दाखवले. अशा प्रकारचा कणखरपणा जगातील किती क्रिकेटपटूंमध्ये आहे  ?

    जंगलात अनेक प्राणी असतात. कुणी बुद्धीमान असतो, कुणी चतूर असतो, कुणी चपळ असतो तर कुणी प्रचंड शक्तीशाली असतो. पण या सर्वांच्या गर्दीमध्ये सिंहाचे श्रेष्ठत्व कुठेही झाकले जात नाही. तसेच शतके अनेक जण झळकावतात... सिक्स फोर्सची बरसातही अनेक करतात... मोठ्या खेळी करणारेही अनेक आहेत. पण जेंव्हा सेहवाग हे सर्व करतो त्याची सर अन्य कुणालाच येत नाही. वीरेंद्र सेहवाग हा क्रिकेट विश्वातला सिंघम आहे.
          वीरेंद्र सेहवागवरील माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...