Egypt the oldest civilization in the world had the most civilized revolution. टि्वटरवर या विषयाच्या प्रतिक्रीया वाचत असताना ही एक कमेंट मला वाचायला मिळाली. इजिप्तमध्ये नुकत्याच झालेल्या क्रांतीचे अगदी चपखल असे वर्णन या मोजक्या शब्दामधल्या प्रतिक्रीयेमध्ये करण्यात आले आहे. आजवर जगात बंदूकीच्या, सत्याग्रहाच्या, साम्यवादाच्या, निवडणुकीच्या अशा वेगवेगळ्या पस्परविरोधी माध्यमातून क्रांती किंवा ऐतिहासिक असे सत्तांतरण पार पडले आहे.मात्र इजिप्तमध्ये नुकतेच पार पडलेले हे सत्तांतरणामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. हे एकप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेले सत्तांतरण आहे.
अधुनिक जगात दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र परस्परांमधली संवाद कमी होतोय हे अगदी चावून चोथा झालेलं वाक्य आहे. पण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. हा नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकलेला धडा आजही सर्वांच्या लक्षात आहे. प्रचंड व्याप असतानाही आपल्या प्रिय व्यक्तींच्या, समवयस्कांच्या, समान आवडी असणा-यांच्या संपर्कात राहण्याची ओढ सर्वांनाच असते. हीच ओढ सुरुवातीला ऑरकूट आणि आता फेसबुक, टि्वटर, ब्लॉग तसेच यू ट्यूब या सारख्या सोशल मीडियाच्या लोकप्रियतेचे कारण आहे.
एक टाइमपास, मत प्रदर्शित करण्याचे माध्यम किंवा मिंत्रांशी संपर्क साधण्याचा मार्ग म्हणून या साईट्सकडे पाहिलं जायचं. याच माध्यमाचा उपयोग अरब राष्ट्रांमधल्या काही तरुणांनी क्रांती करण्यासाठी केला. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण केवळ इंटरनेटशी नाही तर समाजाशी जोडले गेलेले आहोत हे इजिप्तमधल्या युवकांनी सिद्ध केलंय. आपल्या देशातील हुकूमशाही सरकारचा बुरखा त्यांनी जगासमोर उघडा केला. शेजारच्या देशात ज्या गोष्टी घडू शकतात त्या आपल्या देशात का घडू शकत नाहीत ? ह्या प्रश्न त्यांनी नेटवर्किंग साईट्सवर उपस्थित केला. केवळ प्रश्न विचारुन ते थांबले नाहीत तर आपले साध्य साध्य करण्यासाठीही याच माध्यमाचा वापर त्यांनी मोठ्या कौशल्याने केला.
इजिप्तच्या पूर्वी ट्युनिशियामध्ये सत्तांतरण झाले. याच काळात घडलेल्या घटनांचे धाडसी चित्रण अस्मा महफूज या इजिप्तियन तरुणीनं केलं. ते तिनं यू ट्युबच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवलं. इजिप्तमधली हुकमशाही राजवट किती दिवस सहन करणार असा सवाल तिनं आपल्या बांधवांना केला. अस्मानं पेटवलेल्या या ठिणगीचा वणवा झाला. संपूर्ण देशात तो पसरला. मुबारक राजवट हटवण्याच्या उद्देशानं हजारो इजिप्तच्या युवकांनी तहरीर चौकाकडे धाव घेतली. या सर्व युवकांना अशाप्रकारच्या चळवळींचा कोणताही अनुभव नव्हता. कोणीही नेता नव्हता. कोणतीही जबरदस्ती, प्रलोभनं नसताना ही हजारो मंडळी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ तहरीर चौकात ठाण मांडून बसली. त्यांच्या या न भूतो अशा क्रांतीचा दखल अमेरिकेपासून जपान पर्यंत ब्राझील पासून ते ऑस्ट्रेलिया पर्यंत सर्वांनी घेतली.या देशातल्या अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईट्सच्याच माध्यमातून या लढ्याला पाठिंबा दिला. एकप्रकारे या लढ्याला जागतिक अधिष्ठाणही याच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झाले. देशातील युवकांचा निर्धार आणि त्याला वाढत चाललेला जागतिक पाठिंबा ह्यापुढे अखेर होन्सी मुबारक यांनी गुडघे टेकले. मुबारक यांच्या 30 वर्षांच्या हुकूमशाही राजवटीमधून इजिप्त मुक्त झाला.
इजिप्तप्रमाणेच अशीच क्रांती भारतातही घडणार का ? आपल्याकडचे मुबारक कधी जणार ? अशा प्रकारचे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत. भारतामध्ये लोकशाही राजवट आहे. विरोधी पक्ष, प्रसिद्धीमाध्यम, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग यांना स्वातंत्र्य आहे. असं असलं तरी आपल्याकडे हे घडू शकतं का ? हा प्रश्न अनेकांना सतावू लागलाय. या प्रकारच्या क्रांतीचं सूप्त आकर्षण अनेकांच्या मनात निर्माण झालंय. हे मान्य करावेच लागेल.
वाढती महागाई, नक्षलवाद, देशातल्या कोणत्याही भागात आपलं टार्गेट पूर्ण करण्याची क्षमता असलेले दहशतवादी, भ्रष्टाचार, ढिसाळ आणि संवेदनशून्य प्रशासन , घराणेशाही, एखाद्या पक्षाकडे अथवा व्यक्तीकडे झालेले सत्तेचे केंद्रीकरण अशा प्रकारच्या अनेक अनिष्ट प्रवृत्तींनी या देशाला घेरलंय. संपूर्ण क्रांती घडण्यासाठी अगदी अनुकूल असे वातावरण ह्या देशांमध्ये आहे. मात्र तरीही अशा प्रकारची क्रांती घडण्याची चिन्हं इतक्यात दिसत नाही. हे असं का याचं उदाहरण आपल्या सोशल मीडियामध्येच सापडतं.
इजिप्तमधल्या युवकांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकारी दमनयंत्रणेची लक्तरं जगासमोर टांगली. तर भारतामध्ये मात्र अजुनही आपला किंवा मित्रांच्या वाढदिवसाचे अथवा सहलीचे फोटो लोड करणे, आपले दैनंदिन वेळापत्रक टाकणे या सारख्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जातंय. इजिप्तमधल्या युवकांनी या मीडियाचा वापर हा समाजाला जोडण्यासाठी केला. आपल्याकडचा सोशल मीडिया मात्र ब-याच प्रमाणात व्यक्तीकेंद्रित आहे. देशातल्या महानगरातून इंटनेटचा सतत वापर करणारे बहुतांश युवक मतदान करण्याचे कष्टही घेत नाहीत.मुंबईमध्ये मागच्या काही निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी 50 टक्यांपेक्षाही कमी होती. हा वर्ग मुंबई हल्ल्याच्या विरोधात मेणबत्ती मोर्चा काढतो. मात्र या मोर्च्यामध्ये तळमळीपेक्षा इव्हेंट साजरा करण्याची प्रवृत्तीचं जास्त असते. एखाद्या दिवशी एखादा इव्हेंट असल्याप्रमाणे ठराविक प्रकारचे कपडे, रंगरंगोटी घालून एकत्र यायचे तो दिवस संपला की पुन्हा आपल्या आयुष्यात स्वत:ला बंदिस्त करुन घेण्याचे प्रमाण महानगरांमधल्या तरी युवकांमध्ये तसेच या सोशल मीडिया वापरणा-या वर्गामध्ये जास्त आहे.
ज्या देशानं अन्यायी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी सत्याग्रह हा नवा मंत्र जगाला दिला. त्याच देशातील युवक देशातल्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वत:ला हा बंदिस्त कोषात गुरफूटून घेत आहेत. त्याचप्रमाणे 'शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात' ही आपली अगदी पूरातन वृत्ती आजही सर्वांना घट्ट चिकटून बसलीय.त्यामुळे इजिप्तच्या युवकांनी जे करुन दाखवलं त्याच्या बरोबर उलटा प्रवास आपल्याला पाहयाला मिळतोय.
हा उलटा प्रवास सुरु असेपर्यंत आपल्याकडचे मुबारक यांचे भाईबंदाना अस्वस्थ होण्याचे अथवा घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
10 comments:
भारतात इजिप्तच्या तुलनेत प्रसारमाध्यमे शेकडो पटीने भक्कम आहेत, पूढे आहेत.
प्रबळ प्रसारमाध्यमांची कमतरता इजिप्तमध्ये सोशलमिडियाने भरून काढली हे विसरता कामा नये.
शेवटी .......फोटो लोड करणे यासाठी भारतात फेसबूकचा वापर हे वाक्य चूकीचे वाटतो.किमान फेसबुकच्या निमित्ताने ( मोबाईलवर संवाद साधणे ) शक्य नसतांनासुद्धा आपण मित्रांच्या संपर्कात आलो आहोत, संवाद होत आहे हे काय कमी आहे.
लेख खूप चांगला झाला आहे....अभिनंदन
---- अमित जोशी
लेख चांगला आहे. उत्तम.
आभिनंदन .....ओंकार खुप ... चांगले लिहले आहेस ....आगे बढ़ो ...!!!!
@ अमित, सर्वप्रथम सविस्तर प्रतिक्रीयेबद्दल आभार.
भारतामध्ये प्रसारमाध्यमे ही इजिप्तपेक्षा शेकटो पटीने भक्कम आहेत. हे मान्य आहे. पण सोशल मीडियाचे काय ? प्रसार माध्यमांच्या शक्तीला सोशल मीडियाच्या कनेक्टेविटीची जोड मिळाली तरच समर्थ लोकशाहीच्या , पारदर्शक सरकारच्या निर्मितीस ख-या अर्थाने चालना मिळू शकेल.
फेसबुकवर आपले फोटो अपलोड करणे काहीच चूकीचे नाही. मी त्याच्या विरोधातही नाही. त्यामुळे मित्रांशी संपर्क वाढतो हे सारे मान्य. पण केवळ तेवढ्याच कारणासाठी फेसबुकचा वापर करावा का ? हा माझा प्रश्न आहे.
आपल्या देशात याच कारणासाठी फेसबुकचा वापर जास्त होतो. समाजाला व्यक्ततिकेंद्रीत बनण्यामध्येच फेसबुकही कुठेतरी कारण बनतंय. हे मला माझ्या ब्लॉगमधून मांडायचे आहे.
@ निरंजन, धन्यवाद..पण तुझ्याकडून मला सविस्तर प्रतिक्रीया अपेक्षित आहे. या विषयावरचे तुझे चिंतन प्रतिक्रीयेमध्ये उमटले तर आणखी मजा येईल.
@ शिवदास काका, खूप खूप धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.
आयटीच्या युगामुळं आता आगामी काळात घडणा-या क्रांतींची झलकच इजिप्तच्या क्रांतीतून दिसून येते. सोशल मीडियानं तिथं घडवलेली क्रांती भारतातही होऊ शकते. कारण इथल्या राज्यकर्त्यांनी देशाचा इजिप्त नव्हे तर अफगाणिस्तान केलेला आहे.
सोशल मीडियातून होणारी क्रांती कदाचित भारतामध्ये येत्या 50 वर्षात घडेल. मात्र भारताचा अफगाणिस्तान कधीच होणार नाही.
सोशल मिडीयामुळं क्रांती व्हायलाच हवी, असा अट्टाहास करण्यात काहीच अर्थ नाही. इजिप्तमधल्या क्रांतीला सोशल मिडीया हा निमित्त ठरला. तो नसता तर इतर काहीतरी माध्यम मिळालंच असतं. क्रांती करण्याची योग्य वेळ यावी लागते, असं मला वाटतं. मग त्यावेळी कुठलंही निमित्त आणि माध्यम पुरेसं ठरू शकतं.
@ अमोल, सोशल मीडियाने क्रांती व्हावा हा हट्ट नाही. पण ते एक क्रांतीचे प्रभावी माध्यम ठरु शकते. किमान त्याचा विधायक कामासाठी तरी वापर व्हायला हवा. इजिप्तच्या तरुणांनी तो केला म्हणून त्याचे कौतूकही व्हायला हवं
Post a Comment