महाराष्ट्रापुढचे सर्व प्रश्न बहुधा संपले आहेत. राज्यात इतका उजेड पडलाय की आता भारनियमन कुणाला आठवत नाही. गहू, साखर सर्व आवश्यक वस्तू आता मुबलक प्रमाणात मिळू लागल्यात. सिंचनाचा अनुशेष केंव्हाच भरलाय. कुपोषणाची समस्या संपलीय. नक्षलवाद्यांनी आता शस्त्र खाली ठेवलीत. सवर्ण-दलित यांच्यातली दरी संपलीय. त्यामुळे आता एकचं प्रश्न आता महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना सतावतोय तो म्हणजे मराठीचा अभिमान टिकला पाहिजे. या राज्यात मराठी भाषेला गंभीर धोका निर्माण झालाय. त्यामुळे आता मराठीच्या रक्षण करणे हेच विरोधीपक्ष ( शिवसेना आणि मनसे ) यांचे मुख्य काम उरलंय. मराठी, मराठी, मराठी अगदी कंटाळा आलाय आता या चावून चावून चोथा झालेल्या मुद्याचा.
मी मराठी आहे. मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मी त्याच्या अगोदर मी भारतीय आहे. भारतीय असण्याचा मला गर्व आहे. पण हे मी उघडपणे बोलू लागलो की मी महाराष्ट्र द्रोही ठरतो. तरी नशीब मी कोणी मोठा सेलिब्रिटी नाही. नाही तर लगेच माझ्यावर बंदीचे फतवे छापले गेले असते. मुंबई भारतीयांची आहे.असं म्हणा-या व्यक्तींना एकटं पाडण्याचे प्रयत्न केले जातायत.
राजकीय पक्षांचे ठिक आहे हो.... तो त्यांचा धंदाच आहे. पण माध्यमांचे काय ? राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सध्या सर्व हिंदी मीडिया तुटून पडलाय. राज-उद्धव यांचा मराठीचा गजर स्वार्थी आहे हे मान्य आहे. पण ही माध्यमं टीआरपीची रॅट रेस जिंकण्यासाठी मराठी द्वेषाचे बीज हिंदी भाषकांच्या मनात निर्माण करण्याचे काम करतायत. राज ठाकरेंना कधी भिंद्रानवाले तर कधी महंमद अली जिना संबोधण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. राज ठाकरेंचे भाषण हे आग आणि किंवा जहर ओकणारे असते आणि अबु आझमी किंवा मुलायमसिंग यांच्या भाषणातून ज्ञानेश्वरांच्या ओव्या बाहेर पडत असतात का ? लालू- मुलायम उघडपणे सिमी सारख्या दहशतवादी संघटनेचे समर्थन करतात.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग यांना बटाला हाऊसमधले एन्काउंटर हे बनावट असल्याचा साक्षात्कार आता होतो. पण ही मंडळी धर्मनिरपेक्षता या गोंडस नावाखाली त्याकडे दुर्लक्ष करतात.पण राज आणि उद्धव यांना खलनायक ठरवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
मला मान्य आहे की वरील दोन्ही परिच्छेदामधील मुद्दे हे काहीसे परस्परभिन्न आहेत.पण गेल्या काही दिवसांत या सा-या घडामोडी इतक्या वेगाने घडतायत की डोक्याचा पार ' केमीकल लोचा ' झालाय.अगदी अटलजींच्या शब्दात सांगयाचे तर,'' कौरव कोण पांडव कोण बडा तेढा सवाल है चारों और शकुनी का फैला मायजाल है ''असं म्हणण्याची पाळी माझ्यावर येतीय.
आता या सर्व गदारोळात भर पडलीय ती राहुल गांधींची. अनेकांना ते युथ आयकॉन वाटतात. काँग्रेसी कार्यकर्त्यांना ते मर्यादा पुरुषोत्तम आणि अगदी भावी पंतप्रधान वाटतात.गांधी घराण्याचा पंतप्रधान असता तर बाबरी मशीद पडलीच नसती. अशी दर्पोक्ती काही वर्षांपूर्वी करणारे हेच ते राहुल गांधी आहेत.आता काँग्रेसच्या या युवराजांना राज्याभिषेक करण्याची घाई झालीय. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये होणा-या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या महत्वकांक्षेने त्यांना सध्या झपाटलंय. निवडणुका जिंकणे ही राजकीय नेत्यांची महत्वकांक्षा असणे स्वाभाविक आहे. पण बिहारच्या निवडणुका जिंकण्याकरता महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यातली दरी वाढवण्याचे काम ते करत आहेत.
खरं तर प्रादेशिक अस्मितांना गोंजारण्याचे काम काँग्रेसी राज्यकर्त्यांनी वारंवार केलंय. भिंद्रनवालेचे पंजाबमध्ये भूत इंदिरा गांधींनी निर्माण केले होते. वेगळ्या काश्मीरचा नारा देणा-या पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या सारख्या प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसने अनेकदा युती केलीय.सुरवातीच्या काळात शिवसेना आणि नंतर मनसे यांना मोठं करण्याचे काम काँग्रेसने केलंय. एवढंच नाही तर प्रभाकरन चे समर्थन करणा-या, राजीव गांधींच्या हत्येची चौकशी करणा-या जैन आयोगाच्या अहवालात ज्यांच्यावर ठपका ठेवलाय अशा द्रमुक पक्षाबरोबर काँग्रेसची गेल्या साडेपाच वर्षांपासून युती आहे.सत्तेसाठी सर्व प्रकारचे मार्ग वैध समजण्याची प्रथा सर्वप्रथम काँग्रेसने सुरु केली. आज प्रत्येक राजकीय पक्ष ही प्रथा अगदी कसोशीने पाळतायत.
आता राहुल गांधींना बिहारची निवडणूक जिंकण्याची स्वप्न पडतायत. यासाठी देशाकरता लढणा-या सैन्यामध्ये प्रांतीय भेद निर्माण करण्याचे काम ते करतायत. भारतीय लष्करांमध्ये लढणा-या जवांनांना प्रांत, जात, धर्म नसतो. त्यांचा केवळ एकच देश असतो तो म्हणजे भारत. आजवर सर्वच राज्यांनी राज्यकर्त्यांनी ह्याचे भान पाळलंय. मात्र अनेक मोठ्या (?) व्यक्ती ज्यांना भावी पंतप्रधान समजतात अशा राहुल गांधींना सभेत भाषण करत असताना याचे भान राहीलेले नाही.
बरं महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. 105 जणांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालीय. ही एकच टेप बाळासाहेबांची आणि राजसाहेबांची सेना कायम वाजवत असते. ( संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या बद्दल मला आदर आहे.कृपया कोणताही गैरसमज करु नये.) परंतु या व्यक्तींच्या बलिदानाचा राजकीय वापर किती काळ करणार ? शिवरायांच्या पुण्याईवर जगणारी उत्तर पेशवाई इंग्रजांनी बुडवली. आता हे नाकर्ते राज्यकर्ते महाराष्ट्र बुडवण्यास सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्रातल्या निम्या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. महागाईने सामान्य नागरिकांना जगणे नकोसे झालंय.मानव विकास निर्देशांकात राज्यातले अनेक जिल्हे मागे पडलीत. विभागवार अनुशेष वाढत चाललाय. मोठे उद्योग राज्यात येत नाहीत.शहरे बकाल आणि खेडी भकास बनत चाललीत. पण त्याची पर्वा कुणाला आहे ? महागाईच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अशोक चव्हाण अनुपस्थित राहीले. कारण त्यांना राहुल गांधींचे स्वागत करायचे होते.राज्याचा मुख्यमंत्री सुमारे दोन तास घाटकोपरमध्ये काँग्रेसच्या युवराजाची प्रतिक्षा करत होते. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेचे जबाबदारी आहे. पण त्यांना राहुल गांधींचे जोडे सांभाळणे महत्वाचे वाटले.संजय गांधींचे जोडे सांभाळण्याचे काम शंकरराव चव्हाण यांनी केलं होत. त्याच ग्रेट काँग्रेसी परंपरेचं पालन रमेश बागवे करत आहेत.
राहुल गांधींचा मुंबई दौरा हा तसा या राज्यासाठी महत्वाचा विषय नाही.पण ही जणू काही एखाद्या स्वातंत्र्यसेनानीचा दौरा होता. राहुल गांधी हे जणू सुभाषचंद्र बोस यांचे अवतार ! त्यांनी शिवसैनिकांच्या हातावर तूरी देऊन लोकलने कसा प्रवास केला.याची वर्णने केली जातील.शिवसेना संपली,वाघ घायळ झाला, मुंबई जिंकली, ठारे हरले अशा प्रकारच्या हेडलाईन्सला आता जोर येईल. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना पुन्हा एखादा नवा ड्रामा करेल. त्यावर तुरी देण्यासाठी राज ठाकरेंचे नवे प्रयोग.... महाराष्ट्रातले सर्व प्रश्न संपले आहेत. महाराष्ट्र आबादी -आबाद आहे. त्यामुळे या मराठीच्या प्रयोगाला पुन्हा सर्वत्र जोर येऊ लागेल.
15 comments:
नमस्कार. सही लेख आहे. झणझणीत अंजन घालावा तसा. पण ह्या नैराश्याच्या परिस्थितीत मार्ग काय; ह्यासाठीचे चिंतन आणि उपाय ह्यावरही बोलावं असं वाटलं. झकास.
नमस्कार
तुमचा लेख एक्दम सही आहे. जर आपण हा विचार करु शकतो तर तो राज्य चालवणारे अणि स्वताला राजनीतिद्न्य म्हणवणारे का करत नाहीत? आपण पहिले भारतीय तर ते पण नाहीत का?
काही समजत नाही. इन्ग्रज गेले पण त्यान्ची राजनीति मागे ठेवून गेले. ते दुसर्यान्च्यात फ़ूट पाडत होते. आपण आपल्याच्यातच फ़ूट पाडत आहोत.
आता सर्व प्रथम राज-उध्दव यांनी केवळ आपण मराठी, या मुद्द्यांसाठी तरी एकत्र यावे आणि मगच बाकि तमाम जनतेस अक्कल शिकवावी एवढीच एक ईच्छा.
आशिष कुलकर्णी,
महाराष्ट्र माझा
अतिशय सुरेख लेख. खुपच मुद्देसूद... आवडला !!
उत्तम लेख
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
सध्या सुरु असलेला वाद बघून कंटाळा आला आहे, ऊबग आली आहे.काही दिवस लोकशाही जाऊन हुकुमशाही आणावी आणि या सर्वांना ठोकुन सुतासारखं सरळ कराव, असा चमत्कार व्हावा असं वाटतं. लेख छान आहे..........
नमस्कार. लेख नेहमीप्रमाणे चांगला झाला आहे.
त्या दिवशी सर्व प्रसारमाध्यमांनी राहुल गांधीचा दौरा यशस्वी झाल्याचं सांगितलं. पण त्यांचा "दौरा" नेमका काय होता ते कुणीच "Breaking News" मधे दाखवलं नाही. नंतर दाखवलं, पण फार उशिरा.
आपले लेख चांगले आहेत, पण यावरील उपायांबद्दल आपले विचार जाणुन घ्यायला आवडेल.
यशामुळे काँग्रेसच्या डोक्यात हवा गेली आहे. मात्र हे ही दिवस जातील. कारण काँग्रेस नेत्यांच्या लाचारीच्या प्रदर्शनामुळे हे नेते लोकांच्या नजरेतून उतरले आहेत.
CONGRESSLA AAMHICA NIVDUN DILE AAHE.TYAMULE AATA BOMBLUN KAHIHI HONAR NAHI.5 VARSHE HAAT CHOLAT BASNE HECH MAHARASHTRACHYA JANTECHYA NASIBAT AAHE.
मुंबई भारतीयांची आहे, मग कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद, पाटणा हे कुणाचे? या प्रश्नाचे उत्तर तिथल्या नागरिकांना विचारून माहीत करून घ्यावे आणि मगच मुंबई भारतीयांची असे म्हणावे.
Nice Article!!
मुद्देसुद लेख!
डंके महोदय, आपल्या म्हणण्यात बरेच तथ्य आहे.
Post a Comment