Thursday, April 2, 2009

लबाडाघरचे अवताण


सुप्रिया पवार यांच्या बारश्याची तारीख दोनदा बदलण्यात आली होती.याच कारण म्हणजे आपले 'साहेब'
पंतप्रधान होतील आणि ते पंतप्रधान झाल्यावर नव्या घरामध्ये धुमधडाक्यात सुप्रियाचे बारसे साजरे करु असा विचार पवारांच्या जवळच्या व्यक्तींनी केला होता.पंतप्रधान पद आणि शरद पवार याबाबतीत विचार करत असताना एकदा गप्पांमध्ये ऐकलेला विनोद मला नेहमी आठवतो.पंतप्रधान पदावर पवारांची नजर किती दिवसांपासून आहे..आणि त्याचबरोबर पवार समर्थकांना साहेबांना पंतप्रधान करण्याची जुनीच घाई आहे हा सर्व इतिहास या एका विनोदामधून स्पष्ट होतो.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अता चांगलाच वेग आलाय.यंदा काहीही झाले तरी साहेबांना पंतप्रधान करायचेच असा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय.या निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला अथवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे प्रत्येक आघाडीशी मैत्री ठेवून पवारांना पंतप्रधान बनवण्याचा चंग राष्ट्रवादी नेत्यांनी बांधलाय.आज देशातल्या चारही आघाडीमध्ये पवारांचे मित्र आहेत.युपीए आघाडीचे ते अधिकृत सदस्य आहेत.एनडीएमधल्या शिवसेनेला त्यांच्या प्रेमाचे वारंवार भरते येते.डाव्या आघाडीशीही त्यांची काही राज्यात युती आहे.मुलायम सिंगाच्या चौथ्या आघाडीलाही ते पंतप्रधान म्हणून हवे आहेत.साहेबांचे नेटवर्क अगदी 'पॉवर' फूल आहे. असाममधल्या प्रफुल्ल कुमार महंत पासून ते महाराष्ट्रातल्या संजय राऊत पर्यंत जम्मू काश्मीरमधल्या फारुक अब्दुल्ला पासून ते तामिळनाडूमधल्या करुणानिधीपर्यंत सर्वच नेत्यांना पवारांनी कधी ना कधी संमोहीत केले आहे.पक्षातीत संपर्क ठेवण्यामध्ये पवारांची बरोबरी करणारा एखादाच राष्ट्रीय नेता असेल.एवढं सारे मित्र असूनही पवार विश्वासनीय आहेत का हा मात्र मोठा प्रश्न आहे.

एकाच वेळी सर्व दगडीवर हात ठेवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.देशाचे संरक्षमंत्री असताना त्यांना मुंबईतल्या अनअधिकृत बांधकामांना नष्ट होत असलेल्या संरक्षणाची चिंता असते.शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी करत असताना पश्चिम महाराष्ट्रासह देशातल्या तमाम बागायतदार शेतक-यांचे कसे भले होईल याचीही ते काळजी घेतात.हिंदुत्तववादी शक्तींवर जोरदार टिका करतात त्याचवेळी पुलोद सरकार,मेघालयच निवडणुक किंवा पुणे पॅटर्न प्रत्येक वेळी या हिंदुत्ववादी शक्तींना पवित्र करण्याचे काम ते करतात.शाहु फुले आंबेडकरांचा सतत जयघोष करायचा आणि भांडराकर संस्थेतले हल्लेखोर, कुमार केतकरांचे घरफोडे यांना काही त्रास होणार नाही ही काळजी घ्यायची ही कलाही त्यांना अवगत आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्यापासून रामविलास पासवान पर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केलंय.परंतू त्यांच्या पक्षांतरानंतर खंजीर खुपसणे हा वाक्यप्रचार कोणत्याच नेत्यांबाबत वापरला गेला नाही.पासवान,द्रमुक,लोकदल ह्या पक्षांना जवळ घेण्यास डावे उजवे मधले सतत तयार असतात.परंतु आजवर भाजपाशी अधिकृतपणे कधीही युती न केलेल्या युपीए सरकारमधल्या या वजनदार मंत्र्याबाबत सर्वजण साशंक असतात.याचे कारण म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी वैचारीक निष्ठा यासारखे आजकालच्या सर्व पक्षातल्या नेत्यांमधून लोप पावत असलेल्या गुणांचा पवारांनी केंव्हाच त्याग केला आहे.एकवेळेस ते राजकीय सन्यास घेतील पण खरे बोलतील यावर कोणालाही विश्वास ठेवता येणं अवघड
आहे.पवारांच्या नादाला लागून रिपव्लीकन,शेकाप,जनता पक्ष आणि मार्क्सवादी हे महाराष्ट्रातले पक्ष आपली पारंपारिक विरोधी पक्ष ही ओळख विसरुन गेले.इंदिरा गांधीच्या घराणेशाहीला विरोध करत त्यांनी पुलोदचा प्रयोग राज्यात राबवला...पण त्यानंत 1986 मध्ये राजीव गांधींचे 'हात'बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.सोनिया गांधीना अध्यक्षपदासाठी पायघड्या त्यांनीच अंथरल्या.त्यानंतर 1999 मध्ये विदेशीपणाच्या मुद्यावरुन त्याच सोनियांच्या विरुद्ध स्वाभिमानी बंड केले.एवढं सर्व होऊनही देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासाच्या उद्देशानं सोनिया गांधीच्या मर्जीनुसार चालणा-या सरकारमध्ये कृषीमंत्रीपद त्यांनी स्विकारले.मला सांगा विश्वसनीयतेच्या बाबतीत एवढ्या सा-या गोष्टी एकत्रीतपणे ज्याच्या बायोडाटामध्ये आहेत अशा नेत्यावर कोणता पक्ष विश्वास ठेवेल ?

सध्याच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कमाल शक्यतांचा विचार करुन 15-20 जागा येतील अशी शक्यता आहे.त्यांना पाठिंबा देण्याची भाषा सध्या मुलायम करतात पण पवार-मुलायम युती ही जेट-सहारा या दोन कंपन्याच्या विलीनीकरणाप्रमाणे आहे.25 जागा मिळाल्या तर मुलायम पवारांना कधीही धोबीपछाड करतील.मायावतींना तर स्वत:लाच पंतप्रधान व्हायचे आहे.त्यांची शक्ती पवारांच्यापेक्षा अधिक असणार.याचाच अर्थ डाव्यासहीत सर्वच पक्ष मायावतींच्याच मागे जाणार.त्यांचा आजवरचा इतिहास पाहीला तर सोनिया गांधी ही त्यांना कधी पंतप्रधान बनवण्याचा धोका स्विकारणार नाहीत.आता शेवटचा पर्याय म्हणजे भाजपा अघाडी...त्या आघाडीनं अडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलंय.. जर पंतप्रधानपदाचा घास हातातोंडाशी आलाच तर तो सोडण्याचा अविचारपणा अडवाणी कधीच करणार नाहीत.
थोडक्यात काय शरद पवार पंतप्रधानपदी प्रोजेक्ट करणं हे राष्ट्रवादी पक्षाने दिलेलं 'लबाडाघरचे अवताण ' आहे.या अवताणाला काही जण बळी पडतील पण 272 खासदार बळी पडणं ही अवघड गोष्ट आहे.

3 comments:

Gireesh Mandhale said...

Mast..ekdum mast..!

arvind said...
This comment has been removed by the author.
santosh gore said...

शरद पवारांविषयी मांडलेली मते योग्य आहेत. पवारांचे सर्व पक्षात मित्र आहेत, मात्र पवार किती विश्वासार्ह आहेत हे कुणीच सांगू शकत नाही. पवारांच्या नादी लागून रामदास आठवले हा लढवय्या नेता संपला. रामदास आठवले एका खासदारकीसाठी शरददास आठवले झाले. त्यांचा पक्ष फक्त एका खासदारकीपुरता राहिला. पवारांच्या नादी लागले नसते तर त्यांना राज्यात पक्षाचा मोठा विस्तार करता आला असता. आता हेच पवार शिवसेनेला खुणावताहेत. आठवलेंची गत शिवसेनेत आठवणीत ठेवली तरी खुप झाले. बाकी राहिले पंतप्रधानपदाचे त्याचे काही खरे वाटत नाही. एकूण पाच ते सहा आघाड्या प्रत्येक आघाडीचे पाच दावेदार. त्यामुळे पुढिल पंतप्रधान हा एका नव्हे तर तीन आघाड्यांचा मिळून झाला तरी नवल वाटू नये.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...