Sunday, June 19, 2016

फद्दू कथेचा लल्लू सिनेमा !


उडता पंजाब या सिनेमाच्या पहिल्याच प्रसंगात पाकिस्तानातून हेरॉईनचं पाकिट भारतामधल्या ( पंजाबमधल्या ) शेतात फेकतात. 1 कोटी रुपयांचं हे हेरॉईन चौथ्या मजल्यावरच्या आईनं घरात गाडीची किल्ली विसरल्यावर खिडकीतून मुलाकडे फेकावं तितक्या सहजपणे फेकलं जातं. बरं चौथ्या मजल्यावरुन किल्ली फेकताना अनेकदा थ्रो चं जजमेंट नसतं, इथंही तसंच आहे. अगदी सहजपणे पाकिस्तानी फिल्डर्सही बरा थ्रो करतील असं वाटावं इतक्या बेफिकीर पद्धतीनं हे हेरॉईन फेकतात. चला मागच्या काही दिवसात याबाबत सतत वाचल्यानंतर आपण हे मान्य केलंय की पंजाबमधलं बादल सरकार हे भ्रष्ट आहे. पोलीस, बीएसएफ हे सारे ड्रग्ज माफियाकडून नियमित हप्ता घेतात. तरीही पाकिस्तानच्या स्मगलर्सचा भारतमधल्या स्मगर्लसशीही काहीच समन्वय नाही ? या स्मगलर्सच्या हातामध्ये हा माल मिळतच नाही. या शेतामध्ये मजुरी करणा-या आलिया भटच्या हातामध्ये हा माल पडतो.

 अनुराग कश्यप म्हणजे सिनेमाबद्दल माझी दृष्टी बदलणा-या सत्याचा लेखक. सेन्सॉरच्या कचाट्यात काही दिवस नाही तर वर्ष अडकलेला ब्लॅक फ्रायडे तसंच वंचित समाजाचे बटबटीत वास्तव मांडणाऱ्या गँग्ज ऑफ वासेपूरचा दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपबद्दल मला आदर आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी झालेले सारे वाद बाजूला ठेवून हा सिनेमा पाहण्याची मला मोठी उत्सुकता होती. पण इथं अनुरागनं साफ निराशा केलीय. बॉलिवूडमधली खान, कपूर, चोप्रा, जोहर अशी प्रस्थापित आणि धोपटमार्गी मंडळींच्या सद्दी मोडणाऱ्यापैकी एक असलेला अनुराग आता बडी प्रोडक्शन फिल्म काढून त्यांच्यामधलाच एक वाटू लागलाय.


फाळणी आणि खलिस्तानवादी फुटीर चळवळ याचा जबरदस्त फटका बसूनही पंजाबची संपन्न राज्य अशी ओळख आहे. हरितक्रांतीनंतर आलेली सुबत्ता आणि लष्करामध्ये असलेलं योगदान यामुळे देशातलं एक बलशाली राज्य अशी पंजाबची ओळख. पण याच पंजाबला ड्रग्जचा विळखा पडला. बाजूला असलेलं पाकिस्तान आणि खालिस्तान चळवळीपासून त्यांना साथ देणारी पंजाबमधली स्थानिक मंडळी यामुळे हे ड्ग्जचं विष पंजाबमध्ये फोफावलं. ड्रग्जनं एक पिढी बरबाद केली. हे सत्य आहे. त्यामुळे अनुरागसारखा निर्माता आणि ज्यानं विद्या बालनमधल्या दमदार अभिनेत्रीची ओळख बॉलिवूडला करुन दिली तो इश्कियावाला अभिषेक चौबे हा दिग्दर्शक अशी टीम असूनही हा सिनेमा सपशेल फसलाय.


मुळची बिहारी हॉकीपटू होण्याचं स्वप्न घेऊन पंजाबमध्ये आलेली आलिया भट, यो यो हनी सिंहचं क्लोन वाटेल असा पॉप सिंगर, अंगावर टॅटू, डोक्यात कोकेनची नशा,  सोबत उत्तर भारतीय पार्टीछाप पोर आणि युक्रेनची पोरगी, असा काफिला घेऊन बाळगणारा   पंजाबी रॉकस्टार  टॉमीसिंग ( शाहीद कपूर ), भाऊ ड्रग्जच्या विळख्यात अडकलाय हे लक्षात आल्यावर ही विषवल्ली उखाडण्यासाठी तयार झालेला पोलीस अधिकारी सरताज ( दलजीत सिंग दोसांज ) आणि अंमली पदार्थामुळे आयुष्य उद्धवस्त झालेल्यांवर उपचार करणारी डॉक्टर प्रीत ( करिना कपूर ) अशा चार व्यक्तिरेखांचा प्रवास या सिनेमात समांतर पद्धतीनं मांडलाय. अगदी  शाहीद आणि करिना हे दोघं एकदाही एकमेकांच्या समोर येणार नाहीत याची खबरदारी अभिषेक चौबेनं घेतलीय.

       ड्रग्जची भेदकता दाखवत असताना काही प्रसंग अंगावर शहारे आणतात. पण त्याच 'पंच'' नसल्यानं एकसंघपणा जाणवत नाही. पहिल्या हाफमध्ये डॉक्युमेंट्रीच्या अंगानं जाणारी कथा दुस-या  हाफमध्ये रुळावरुन घसरते आणि कश्यप कंपनीचं बॉलिवूडकरण कसं झालंय हे दाखवत जाते.

'' तिला बघितल्यापासून मला कोकेन घ्यावं असं एकदाही वाटलं नाही.माझ्या डोक्यात ट्यून वाजू लागलीय. डोळ्यासमोर फक्त तिचाच चेहरा आहे. माझ्यातली जादूई शक्ती परत आलीय "असं कोक आणि कॉक अशा शब्दांना जोडून गाणी तयार करणारा शाहीद कपूर पंजाबी सुपरस्टार बिहारी तरुणीला बघितल्यानंतर  या सिमेमात सांगतो. ड्रग्जच्या पायात स्वत:चं केवळ करियर नाही तर आयुष्य उद्धवस्त केलेला आत्मघातकी तरुण एक सुंदर चेहरा पाहिल्यानंतर ड्रग्जमुक्त कसा होऊ शकतो ? हा कसला भारी जोक आहे. असेच तरुण ड्रग्जमुक्त होणार असतील तर देशातल्या प्रत्येक ड्रग्जमुक्ती केंद्रात फक्त सुंदर तरुणींचे फोटो लावा,  काम संपलं. किती सोपा उपाय या सिनेमानं देशाला सांगितला आहे.

या सिनेमातलं दुसरं ड्रग्जच्या नशेत गेलेलं पात्र म्हणजे दलजीत सिंग दोसांजचा भाऊ. तो शाहीदपेक्षा कमी ड्रग्ज घेणारा पोरगा. पण  तो या सिनेमाचा हिरो नाही. त्यामुळे त्याला हिरोईन नाही. हिरोईन नसल्यानं कोणता सुंदर चेहरा तो पाहत नाही. त्यामुळे ड्रग्जमुक्ती केंद्रात अनेक दिवस राहुनही त्याचं व्यसन काही सुटत नाही. बिच्चारा...

  दलजीत आणि करिना कपूर तर एकदम हुशार आणि सुपर हिरो. ते ड्रग्जच्या अड्डयामध्ये अगदी जत्रेत किंवा मॉलमध्ये फिरावं तसं अगदी सहजपणे ये-जा करतात. कुणीही त्यांना पकडत नाही. तुम्हाला हे विलक्षण वाटत असेल तर खरी मजा पुढेच आहे. करिना आणि दलजीत ड्रग्ज गोडाऊनमध्ये जातात. अचानक 50 जणांची टोळी तिथं येते. कोणत्याही प्रकारची मारामारी न करता हे दोघेही तिथून बाहेर पडतात. कारण दलजीत त्या गोडाऊनचे लाईट बंद करतो. मनमोहन देसाई किंवा डेव्हिड धवनच्या सिमेमातही असला विनोदी प्रसंग नसावा.

    ही विनोदाची मालिका इथचं संपत नाही. पंजाबचा सुपरसिंगर, तरुणांचा आयडॉल टॉमीसिंग म्हणजेच शाहीद कपूर पळून जातो. तो फरार आहे पोलिस त्याचा शोध घेतायत असं अगदी टीव्हीवरही सांगतात. तरी तो 100 किलोमीटर सार्वजनिक ठिकाणांहून आरामात प्रवास करतो. कुणीही त्याला ओळखत नाही. शंभर किलोमीटर प्रवास तो सायकलवर करतो. एक ड्रग्ज अॅडिक्ट  ज्यानं दोन दिवस पुरेसं खाल्लंही नाही तो व्यक्ती आलियाच्या शोधासाठी 100 किलोमीटर सायकल चालवतो. काय कमालीचा फिटनेस  आहे !

आलिया भटला स्मगलर्सनं त्यांच्या सेफ हाऊसमध्ये डांबून ठेवलंय. शाहीद चक्कर येऊन ज्या शेतातमध्ये पडतो. त्याच शेताच्या बाजूला हे सेफ हाऊस असतं. पण हा सामाजिक दाहकतेवर भाष्य करणारा सिनेमा असल्यानं आपण असल्या योगायोगाकडे दुर्लक्ष करायचं...या सेफ हाऊसच्या कंपाऊड वॉलहून शाहीद आतमध्ये प्रवेश करतो. एकाच्या डोक्यात हॉकी स्टीक मारतो आणि मग थेट आलियाच्या खोलीत जाऊन तिची सुटका करतो. बहुधा गँगस्टर्स, गुंड यांचे अनेक सिनेमे करुन त्याचं वास्तव दाखवता दाखवता अनुरागला कंटाळा आला असावा. त्यामुळे त्यानं हे असले बावळट  स्मगलर्स या सिनेमामध्ये दाखवले आहेत.

     या सिनेमातल्या चौघांनीही काम चांगली केलीत. किंबहूना कथेची आणि दिग्दर्शकाची कोणतीही पकड नसताही प्रमुख पात्रं चांगली कामं करु शकतात याचा केस स्टडी म्हणून हा सिनेमा विद्यार्थ्यांना अभ्यासाला यापुढे द्यायला हवा. विशेषत: आलिया भटनं टेरिफीक काम केलंय. 23 वर्षांच्या आलियानं आपल्या सात सिनेमांच्या कारकीर्दीमध्ये प्रत्येक सिनेमात आपला दर्जा सुधारलाय. इथं तिला पंजाबच्या शेतामध्ये गाणं म्हणत बागडण्याचा रोल नव्हता. तर बिहारी तरुणी जी सुरुवातीला गरिबीच्या चक्रात सापडते. त्यानंतर हेरॉईनचं पाकिट हाती आल्यानंतर तिच्या आयुष्याला वेगळं वळण लागतं. ड्रग्ज अॅडिक्ट ते  सेक्स गुलाम असा प्रवास होऊनही जगण्याची उसळी मारणारी आणि परिस्थितीला 'कॉर्नर' करुन यशाच्या 'गोलपोस्ट'मध्ये स्कोअर करण्याची जिद्द असलेली  तरुणी आलियानं अतिशय सशक्तपणे रंगवलीय. पण विराट कोहलीच्या खेळाचा आरसीबीच्या बॉलर्सनी सत्यानाश करावा तसंच काहीसं आलियाचं या सिनेमात दिग्दर्शकामुळे झालंय.

           एखाद्या 'दे मार' सिनेमातल्या गोळ्यांची संख्या कमी असावी इतक्या शिव्या या सिनेमात आहेत. सिनेमा पाहताना एक दोनदा असं वाटतं की आपण वाक्यामध्ये शिव्या ऐकत नाही तर शिव्यांमध्ये एखादा सामान्य शब्द ऐकतोय. या शिवराळ सिनेमानं लॉजिकची अगदीच आई-माई एक केलीय. सिनेमाच्या शेवटी सतीश कौशिक आणि शाहीद कपूर जे जेलमध्ये असायला हवे होते ते गोव्यात मजा करताना दाखवलेत.

  या सिनेमात जवळपास पाच एक मिनिटं शाहीद कपूर आणि आलिया एकमेकांशी फुद्दू आणि लल्लू या शब्दामधल्या फरकावर चर्चा करत असतात. अखेरीस हा फद्दू कथेचा लल्लू सिनेमा आहे हेच पटतं. अनुराग कश्यपला ' गँग्ज ऑफ वासेपूर' सारखा सिनेमा बनवून खूप काळ लोटलाय. त्यानं लवकरात लवकर ट्रॅकवर परतायला हवं. यार, आमचा रोहित शर्माही 10 मॅचमध्ये एक पन्नास झळकावतो. 

2 comments:

Niranjan Welankar said...

मस्त!!! जीवंत वर्णन! समालोचनातली बॅटिंग जोरदार!

Gireesh Mandhale said...

This is second review I read of this movie. First, from @ArvindKejriwal !
Movie is created for political purpose. So it need not have any substance, that was for sure.
Also all the drama started on the same day Modi was going to address US joint Congress. So all intentions were clear..

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...