2014 हे खरोखरच एक अनोख वर्ष आहे. या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आलं. भ्रष्ट, नाकर्ते, सरंजामी, देशविघातक अशा युपीए सरकारचा पराभव होणार हे स्पष्ट होतं. मोदी लाट निकालात दिसेल याचाही अंदाज होता, पण सर्व शक्याशक्यतेच्या पलिकडं नेणारा सुखद धक्का मोदींनी दिला. केवळ भाजपाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवता येतं हे मोदींनी दाखवून दिलं.त्यापाठोपाठ दुस-या टप्प्यात राज्यात देवेंद्र फडणवीसच्या निमित्तानं भाजपाचा पहिला मु्ख्यमंत्री झालाय. भाजपाला स्पष्ट बहुमत नाही. तरीही 120 पेक्षा जास्त जागा जिंकत आणि आपल्या मतांची टक्केवारी दुप्पॉट करत भाजपानं राज्यातला नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवलाय. तोही अगदी स्वबळावर. 'मराठी खतरे में' असा नारा देत अस्मिताचं राजकारण करणा-या कोणत्याही ठाकरेंच्या अहंकाराला न कुरवाळता.
गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय. भाजपा कार्यकर्त्यांची निष्ठा, रा.स्व.संघाचे पाठबळ अमित शाह यांचे संघटन आणि मोदींचे नेतृत्व यांच्या जोरावरच आज देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्री झालेत.
भाजपाशी ऐन निवडणुकीत युती तोडून तथाकथित स्वाभिमान दाखवणारे उद्धव ठाकरे हे मागील महिनाभर अनेक पत्रपंडितांचे हिरो होते. ( वर्षभरापूर्वी केजरीवाल आणि नंतर राहुल गांधी यांना खांद्यावर घेणाराही हाच वर्ग होता) भाजपा नेतृत्त्वाला महाराष्ट्रविरोधी ठरवून, अफजलखानाची टोळी संबोधून भर सभेत टाळ्या मिळवता येतात. हेडलाईनही छान होते. पण यातून पक्ष वाढत नसतो. विरोधकांवर हल्ला करत असताना पक्ष वाढवण्याची जबाबदारीही पक्षप्रमुखाला पार पाडायची असते. काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल व्यापक नाराजीचा फायदा शिवसेनेलाही झाला. ही नाराजी नसती तर शिवसेना पन्नाशीही ओलांडू शकली नसती. 'शहा'णे व्हा असा सल्ला देणा-या उद्धव ठाकरेंनी समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपाला त्यांची युती सहन करावीच लागली असती. त्यांना आपसुक मोठेपणा मिळाला असता. आणि कुणास ठाऊक ज्या मु्ख्यमंत्रीपदासाठी त्यांनी हा सारा खटाटोप केला ते मुख्यमंत्रीपदही देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी त्यांना मिळाले असते.
'मराठी खतरे में' चा नारा देत एकगठ्ठा मराठी मतं मिळवण्याचा उद्धवसेनेचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. ' अफजलखानाच्या दरबारात ' शिवसेनेचे अनंत गिते 'विडे ' चघळत राहिले. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद महापालिकेतली साथ सोडण्याचा ताठ बाणा, ' मोडेन पण वाकणार नाही ' असा अभिमान बाळगणा-या या मराठीच्या कैवा-यांनी दाखवला नाही. उद्धव ठाकरेंच्या महत्वकांक्षेमुळे नारायण राणे, राज ठाकरे पक्ष सोडून गेले त्यामुळे शिवसेनेवर त्यांची एकहाती सत्ता आली. पण युतीवर एकहाती सत्ता राखू शकेल असं संघटन आपल्याकडे नाही. जनाधार तर त्याहून नाही हे उद्धव ठाकरेंना लक्षातच आलं नाही. निवडणूक निकालाने त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलीय.
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. इथे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भगवा फडकवण्याची भाषा करत असताना मराठी-गुजराती वाद उभा केला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला शत्रू क्रमांक एक जाहीर केलं. 15 वर्ष महाराष्ट्राला बरबाद करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीला नाही तर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 25 वर्ष संघर्ष केला. एकत्र स्वप्न पाहिलं त्या पक्षाला संपवण्याची सुपारी उद्धव सेनेनं घे्तली होती. युती असती तर एमआयएमचा एकही सदस्य विधानसभेत शिरु शकला नसता. पण अवास्तव महत्वकांक्षेनं पछाडलेल्या शिवसेना नेतृत्वाला हे काहीही दिसलं नाही. काही मोजके अपवाद वगळता शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर देशभक्त आहे. आपला वापर करुन आजवर केवळ वडापाची गाडी हाथी देणा-या आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून 24 वर्षाच्या आदित्य ठाकरेंचं नेतृत्व पक्षावर लादणा-या या ठाकरे कंपनीच्या हाती त्यांनी किती काळ आपल्या माना द्यायच्या याचा विचार त्यांनी करायला हवा.
प्रबळ विरोधक आणि ऐनवेळी समोर युद्धाला उभा राहिलेला मित्रपक्ष या सर्व लढाईनंतरही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ही व्यक्ती मु्ख्यमंत्री होणं याला मोठं महत्व आहे.जातीची व्होटबँक, उद्योगसमूह, सहकारी बँक, सहकारी कारखाना असं कोणतही पाठबळ नसताना मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेले आणि प्रखर वैचारिक निष्ठा जोपसणारे युवा मु्ख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेत.
देवेंद्र फडणवीस उच्चशिक्षित आहेत. अर्थशास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे. राजकीय आयुष्यात प्रामणिकता जपणा-या फडणवीसांसमोर राज्याचा कारभारही पारदर्शी करण्याची जबाबदारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्यावरुन धारेवर धरणा-या आणि चितळे समितीसमोर बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणा-या या मुख्यमंत्र्याला आता भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात पाठवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगानं शहरीकरण होत चालेलं राज्य आहे. उंची मॉल्स, विदेशी बनावटीच्या गाड्या, गज्ज भरलेल्या बाजारपेठा, अगदी लेटेस्ट मोबाईल्स, मल्टीप्लेक्स अशा स्मार्ट सिटी राज्यात उदयाला येतायत. त्याचवेळी ग्रामीण भागातली परिस्थिती झपाट्यानं बिघडतीय. वाशिम जिल्ह्यातल्या एका महिलेला शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र विकायला लावणारी निगरगट्ट यंत्रणा या राज्यात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा मेकओव्हर करण्याचं अभियान या सरकारला करावं लागेल. त्याचबरोबर प्रादेशिक असमतोल, नक्षलवाद आणि युवकांच्या मेंदूत भिनवत चालेलं ब्रिगेडी जातीयता आणि एमआयएमची धार्मिकता याचं भूत उतरवण्याचं आव्हानं पेलण्याची शक्ती या युवा मुख्यमंत्र्यांकडे असेल अशी आशा त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरुन करायला हवी.
आगामी काळातल्या जगात होणा-या बदलामध्ये 125 कोटींच्या या लोकसंख्येच्या देशाची भूमिका महत्त्वाची असेल. जागतिक आव्हांनाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये होणा-या बदलाचे केंद्रबिंदू असतील नरेंद्र मोदी. महाराष्ट्राविना राष्ट्र कसे चालेल ? महाराष्ट्रात हीच जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना पार पाडावी लागेल. प्राप्त परिस्थितीमध्ये देशाचं आणि राज्याचं नेतृत्व हे दोन सर्वोत्तम व्यक्तींच्या हाती 2014 या वर्षानं सोपवलंय.केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही भाजपाची घोषणा खरी ठरली. या घोषणेमुळे भाजपामध्ये मोठे बदल झाले पुढेही होतील. देशात आणि महाराष्ट्रातल्या बदलाची सुरुवातही 2014 मध्ये झालीय. हे वर्ष त्यामुळेच नेहमीच संस्मरणीय ठरणार आहे.
2 comments:
नमकार. चांगला झाला आहे ब्लॉग. सेनेचे डोळे उघडतील का हा प्रश्नच आहे.
Good points. Good to see the latest news point considered/used.
BJP seems to be the only relevant party since General Elections.
Post a Comment