न्यूयॉर्कच्या 135 मजली टोलेजंग पॉश इमारतीच्या अवाढव्य पार्किंगमध्ये नेमक्या जागेवर कैवल्यनं नेहमीच्या सफाईनं गाडी पार्क केली. बाहेर दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या आफ्रिकन-अमेरिकन गार्डनं ठोकलेल्या सॅल्युटचा शिष्टशीर पद्धतीनं स्विकार केला. डोक्यात दिवसभराच्या सा-या कामांच, बोर्ड मीटिंगचं चक्र त्याच्या डोक्यात घूमू लागलं. त्याचा प्रत्येक मिनिट नं मिनिटं हा ‘लाख’ मोलाचा होता. आज सोमवार. आठवड्याचा पहिला दिवस. आज सारी कामं नेहमीच्याच सफाईनं आणि 100 टक्के बिनचूक पद्धतीनं झाली पाहिजेत. पहिला दिवस चांगला गेला तरच आठवडा चांगला जातो, अशी त्याची ठाम समजूत. याच मनोनिग्रहानं तो ऑफिसात शिरला. कामाच्याच विचारात असलेल्या कैवल्यनं सहका-यांच्या हाय सर, हॅलो सर, गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू सर चा नेहमीच्याच परिटघडानं स्विकार केला आणि आपल्या केबिनमधल्या खूर्चीवर स्थानापन्न झाला.
ऑफिसात आल्यानंतर आधी सर्व मेल चेक करायची हा त्याचा शिरस्ता. मेल चेक करत असतानाच भारतामधल्या पेपरच्या साईट त्यानं नेहमीच्या सवयीनं ओपनं केल्या. आज सलग तिस-या दिवशी मणिपूरच्या अशांततेची बातमी प्रमुख पेपरनं फ्रंट पेजवर घेतली होती हे कैवल्यला त्याची ई एडिशन पाहताना समजले. एरवी मणिपूरसारख्या दुर्गम राज्याला फारसं महत्त्व न देणारी ही सारी वृत्तपत्र सलग तिस-यांदा मणिपूरची बातमी देतायत. म्हणजे मामला गंभीर आहे.
मणिपूरच्या बातम्यांमध्ये रस असण्याचं त्याचं कारण म्हणजे त्याची रियल लाईफमधली सर्वात जवळची दोन माणसं त्य़ाचे आई-बाबा मणिपूरच्या विवेकानंद केंद्रात सेवाव्रतीचं काम करत होते. धुमसत्या मनस्थितीला शांत करत कैवल्यनं ऑफिसातली काम नेटानं सुरु ठेवली.
दिवसभराची कामं संपवून घरी परतल्यावर नेहमीच्या रितेपणासह कैवल्य घरात शिरला. आज पैसा, प्रतिष्ठा, स्टेटस, बॅँक बॅलेंस सारं काही त्याच्याजवळ आहे. पण हे सारं शेअर करायला कुणीच नाही. आपण आनंदी आहोत, यशस्वी आहोत हे समाजाला दाखवण्याचा आणि स्वत:ला समजवण्याचा प्रयत्न तो सतत करतो.पाच दिवस भरगच्च काम आणि नंतर दोन दिवस भरपूर एन्जॉय अगदी अमेरिकन लाईफस्टाईल अंगात भिनलंय. तरी हे सर्व करत असताना आपले आई-बाबा तिकडं सात समुद्रापार घरापासून हजार किलोमीटर दूर असलेल्या मणिपूरमध्ये एका खेड्यात सेवाव्रतीचं आयुष्य जगतायत. किती बुलशीट आहे हे सारं ? हा सारा डोलारा आपण कुणासाठी उभा करतोय ? त्यांचे समाजसेवीची डोहाळं कधी पूर्ण होणार ? ही सारी प्रश्न कैवल्याच्या डोक्याचा रोज रात्री केमिकल लोचा करतात. या केमिकल लोच्याची रिएक्शन त्याला जाणवू लागली होती अखेर 15 दिवसांच्या रजेचा मेल ऑफिसला टाकला आणि भारताला जाण्याचे निश्चित केल्यानंतरच कैवल्यला किती तरी दिवसांनी शांत झोप लागली.
दुस-या दिवशी सकाळी कैवल्यनं ट्रॅव्हल एजंटला तातडीनं फोन केला. “ एक नवी दिल्ली अगदी तातडीनं लगेच हो, हो अगदी फास्ट, महाग असेल तरी चालेल. भारतात सध्या पावसळा आहे ?, असू दे महापूर येऊन सारं काही वाहून जाण्याची वेळ आलीय आता आयुष्यात त्यामुळे आहे ते वाचवण्यासाठी पावसाळा असो की उन्हाळा मला तिकीट तातडीनं हवंय. काहीही चौकशी न करता थेट तिकीट काढणारा तो ट्रॅव्हल एजंटचं पहिलंच गि-हाईक असावा. ऑफ सिजनमध्ये वाटेल ती किंमत मोजणारं गि-हाईक मिळाल्यानं एजंटही खूश झाला. त्यानं तातडीनं ते तिकीट त्याच्या हाती ठेवलं.
विमानात उडल्यानंतर अगदी वेगळाच फिल येतो. सारं जग आपल्या खाली आणि आपण आकाशात...अगदी वर टॉपला. टॉपला जाण्याचं वेड आपल्याला कधी शिरलं हे कैवल्य आठवू लागला. शाळेत असेपर्यंत वर्गातल्या हुशार मुलांमध्ये कधीच नव्हतो आपण. अगदी ढ ही नाही आणि हुशारही नाही. त्यामुळे कोणत्याच कारणामुळे शाळेत कुणाच्या लक्षात आलो नाही.
घरी आई आणि वडील. वडील प्रपंच चालवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून नोकरी करत बाकी सारा वेळ सामाजिक कार्य. परिसरातल्या दुष्काळगस्त भागातल्या केंद्राच्या कामात प्रत्येक शनिवार-रविवार वेळ दे. त्यांना धान्य वाटप कर. ऊस कामगारांच्या मुलांसाठी सुरु असलेल्या साखर शाळांच्या कामाचा आढावा घे. भूकंपाने उद्धवस्त झालेलं एक गावं नव्यानं वसवण्याची जबाबादारी स्वामी विवेवेकानंद केंद्रानं त्यांच्यावर सोपवलेली. सामाजिक काम असलं की वडिलांना नवा उत्साह येत असे. त्या गावाचं पूनर्वसन हॆच आपले जीवतकार्य आहे, त्यामुळे ते अधिकाधिक निर्दोष पद्धतीनं पूर्ण झालं पाहिजे या ध्येयानं ते झपाटलेले. हा सारा परमार्थ करत असताना घराकडे त्यांचं फारसं लक्ष नसायचंच.
कैवल्यला वडिलांच्या या सा-या कामाबद्दल आदर होता. पण आपणही तसंच काम करांव हा वडिलांचा आग्रह त्याला मान्य नव्हता.त्यामुळे तो वडिलांपासून लांब लांब राहू लागला. वडिलांबद्दल आदर, प्रेम सारं काही आहे पण तरी जवळीकता साधणं त्याला जमायचे नाही. त्याचा घरातला सारा व्यवहार आईच्या मार्फत चालयचा.
10 वी ला बरे मार्क पडले. मग सामाजिक प्रथेप्रमाणे आणि मुख्य म्हणजे घरापासून दूर राहता येईल म्हणून त्यानं शहरातल्या कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला. बारावीत आणखी छान मार्क्स. मग इंजिनियरिंग. अभ्यासाची चटक लागलेल्या कैवल्यालं तिथं थेट गोल्ड मेडल मिळाल्यानं अमेरिकतल्या विद्यापीठात स्कॉलरशीपसह नोकरीची संधी चालून आली. अगदी 9/11 ऩंतर अमेरिकनं आपलं व्हिसा धोरण कडक केलं असूनही त्याला सहजगत्या व्हिसा मिळाला. सतत पुढं जाण्याच्या ओढीनं धावणा-या कैवल्यनं घरच्यांशी काहीही चर्चा न करता अमेरिका गाठली.
अमेरिकेत गेल्यानंतर नव्या वातावरणात तो रमला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी आपसूक चालून आली. आता आई-वडिलांनी आपल्याकडे यावं असा त्याचा आग्रह. तर त्यांना देशाची काळजी पडलेली. ‘देशाची काळजी घ्यायला सरकार आहे, ना लष्कराच्या भाक-या भाजण्याचे तुमच्यासारखे उद्योग मला जमणार नाहीत. ‘ अमेरिकेची भव्यता, वर्क कल्चरला महत्त्व देणारी इथली मंडळी, ज्या देशात माझ्या गुणवत्तेचं चीज होतोय. आरक्षण, दप्तर दिरंगाई, भ्रष्टाचार, जातीयता, नक्षलवाद याच्या चक्रव्युवाहात माझं प्रोजेक्ट अडकत नाही. त्याच देशात मला राहण्याची इच्छा आहे, कृपया आता भारतात परत यावं असा आग्रह करु नये. तुमचा हाच आग्रह कायम असेल तर आता आपण एकमेकांशी संपर्क न करणे उत्तम. असं निर्वाणीचं पत्र त्यानं घरी पाठवलं होतं त्यालाही आता सहा वर्ष उलटून गेली होती. आई-बाबा निवृत्तीनंतर महाराष्ट्र सोडून मणिपूरात स्थायिक झालेत. तिथल्या विवेकानंद केंद्रातल्या शाळेत ते शिकवतात. अशी वार्ता त्याला नातेवाईक-मित्रमंडळीकडून समजली होती. पण तरीही त्यानं त्याबाबत कधी आई-वडिलांकडे विचारणा केली नाही. तर त्याच्या शेवटच्या पत्रानं दुखावलेल्या आई-बाबांनीही त्याला ते कधी कळवले नव्हते. त्यामुळेच आता असे अचानक आई-बाबांना भेटल्यानंतर आपण एकमेकांशी कसे रिएक्ट होऊ हा विचार त्याला प्रवासभर छळत होता.
नवी दिल्लीत उतरल्यानंतर मागच्या दहा वर्षात देशातल्या सप्तसिंधुमधून बरेच पाणी वाहून गेलंय याची जाणीव कैवल्यला झाली. आता अमेरिकीची छोटी आवृत्ती नवी दिल्ली विमानतळ परिसरात आढळत होती. दिल्लीच्या कायदा-सुव्यवस्थेचा वाजलेला बो-या, वीजेची टंचाई, वाढती झोपडपट्टी हे सारे प्रश्न आपण पेपरात वाचतो. पण त्याचबरोबर दिल्लीला शहरीकरणामुळे आलेली सूज त्याला जाणवत होती. मॉल्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, रस्त्याच्या बाजूला सिनेस्टार आणि क्रिकेटपटूंच्या वेगवेगळ्या वेशातली वेगवेगळ्या प्रॉडक्टची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, मेट्रो रेल्वे, पाण्यापेक्षाही अगदी सहजगत्या मिळणारे कोक-पेप्सी, स्मार्ट फोनमध्ये रमलेली तरुण पिढी, यामुऴे दिल्लीचं होतं असलेलं जागतिकीकरणाचा अनुभव घेत कैवल्य गुवाहाटीच्या रेल्वेत बसला.
गुवाहटीत गेल्यानंतर मागच्या दहा वर्षात आपण किती बदललोय आणि या बदलामुळे सभोवतलाच्या परिस्थितीशी जुळवून घेणं किती अडचणीचं आहे हे कैवल्यला जाणवू लागलं. त्यातचं इफांळला जाणारी गाडी उद्या रात्री असल्यामुळे आजची रात्र हॉटेलात राहणं भाग होतं. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. त्याला पाऊस फक्त सिनेमात बघायला आवडयचा. गुवाहटीचा नखशिखान्त हलवलणारा पाऊस आणि या पावसात हॉटेल निवडण्याची कटकट त्यानं खिशात असलेल्या भक्कम पैशांच्या जोरावर पार पाडली. चला, तर खिशात भक्कम पैसे असले की जगात कुठेही अडचणीच्या वेळी मार्ग निघतोच हे त्याचं गृहितक पुन्हा एकदा पक्क झाल्याचं जाणवताच तशाही परिस्थितीत आत्मिक हासू फुटलं.
दुस-या दिवशी पावसानं उघडीप दिल्यानं गुवाहटी ते इंफाळ प्रवास कसा होईल हे पाहण्यासाठी कैवल्यनं हालचाल सुरु केली. ज्या नेवांग गावाला त्याला जायचे होते ते गोयपांग इंफाळच्या 1 तास अलिकडे आहे, याची नोंद त्यानं जवळच्या जीपीआरएसनं केली होती. मात्र भारतामधून मणिपूरला जाण्याचा मार्ग बंद होता.
भारतामधून मणिपूरला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक आसाममधल्या सिल्चरमधून येणारा हायवे क्रमांक 53. पण दहशतवादी कारवाया आणि हायवेची दुरावस्था यामुळे तो मार्ग 20 वर्षांपासून बंद आहे. दुसरा मार्ग आसाम, नागालॅँड, मणिपूरमधल्या नागा हिल्स, कुकी हिल्स मार्गे मैदानी प्रदेशात येतो. बंडखोर नागा संघटनांनी हा मार्ग रोखून धरल्यानं मणिपूरचा श्वास आवळला गेलाय.
या भागात, ना अन्नधान्य पोहचंत, ना औषधं. जगण्याची कोणतीच साधनं जिथं जाऊ शकत नाहीत अशा राज्यातली जनता मागच्या दोन महिन्यांपासून आयुष्य ढकलतीय. हे जाणवल्यानं इतके दिवस सुबत्तेच्या राशीवर लोळणारा कैवल्य वास्तवाच्या जमिनीवर आला. मागची सहा वर्ष केवळ मी भोवती फिरणा-या त्याच्या विश्वात आठवडाभरापासून आई-बाबा आले होते. आता ते विश्व अधिक विस्तारत मणिपुरची जनताही त्यात सामवली जात होती.
अर्थात कोणत्याही आपत्तीचं आपल्या फायद्यासाठी रुपांतर करणारी जात जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळते. याची जाणीव कैवल्यला होतीच. मणिपुरची ही समस्या तर मानवनिर्मित होती. त्यामुळे या भागात काळाबाजार करणा-यांकडे येणा-या पैशांचा वेग हा गुवाहाटीत दिवसभर कोसळणा-या पावसापेक्षा जास्त होता.
मणिपूरला सुटणा-या गाड्यांच्या स्थानकावर सर्वत्र माणसांचा नुसता समुद्र पसरलेला असताना बसमध्येही माणसांनी खच्चून बसावं याचं कैवल्यला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याचा गणिती विचार करणाच्या त्याची वृत्ती आता मागे पडली होती. नेवांगला नेणारी हीच एकमेव बस आता आहे. त्यामुळे या बसमध्ये चढताना, बसमधली हवा, सीट, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे भाडं या पैकी कशाचीही घासाघीस करायची नाही हे त्याला उमजले होते.
बसमध्ये बसल्यानंतर आजूबाजूला सर्व एकाच चेह-याची माणसं आणि सर्वांच्या चेह-यावर एकच प्रकारची काळजी. गोरी, बुटकी, बारीक डोळ्याची बसक्या नाकांच्या मंडळींसोबत प्रवास करताना कैवल्यला वर्गातला मणिपूरचाच झोराम आठवला. स्वत:बद्दल कधीही काही न बोलणारा,मागेमागेच राहणारा, अबोल, बुजरा माणूसघाणा म्हणता येईल इतपत एकलकोंडा. तो आपल्या वर्गात चार वर्ष होता. पण त्याला कुणी समजून, सामावून घेतलाच नव्हता. अगदी टिपकील चीनी, नेपाळी असं म्हणून त्याची कुणी हेटाळणी केली नसेल. पण कॉलेज संपल्यानंतर झोराम कुठे गेला, त्याचं काय सुरु आहे याचं कुणालाच पडलेलं नव्हतं. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस एप सारख्या वेगवेगळ्या संपर्क माध्यमांनी वर्गातलं सगळं पब्लिक एकमेकांशी कनेक्ट असताना एकट्या झोरामची कनेक्टेव्हीटी कुठे आणि कधी तुटली ?
विचारांची ही तंद्री सुरु असतानाच त्यानं मणिपूरच्या प्रश्नाबाबत बोलण्यासाठी बाजूच्या काकांशी कधी सुरुवात केली हे कैवल्यलाही समजले नाही. आम्ही भारतीय आहोत, अगदी महाभारत कालापासून याचे दाखले आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेल्या आझाद हिंद सैन्यातही मणिपुरी जनतेनं आपलं ‘खून’ दिलं ते देशाच्या ‘आझादी’साठीच ना ? स्वातंत्र्यानंतरच्या तीन्ही युद्धात मणिपूरच्या युवक अन्य जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढलेत. आशियाई स्पर्धेत मणिपूरच्या खेळाडूनंनी पदकं जिंकलीत. राष्ट्रीय स्पर्धेत मणिपूर नेहमी अग्रेसर असंत. या स्पर्धांचं नेटकं आयोजनही आम्ही केलंय. इतकचं काय तर च महिला बॉक्सिंगचं विश्वविजेतेपद मेरी कोमनं पटकावलं ते मणिपूरसाठी नाही तर भारतासाठीच.
दिल्ली, मुंबईत होणा-या छोट्याश्या आंदोलनाचीही लगेच दखल घेतली जाते. त्यावर संसदेत चर्चा होते. पण मणिपूरमध्ये ब्लॉकेडमुळे लोकं उपाशी मरतायत, त्यांचा देशाशी संपर्क तुटतोय. पेट्रोल 150 च्या पुढे, कांदा 75 रुपये किलो. डाळीनं 80 चा टप्पा ओलंडलाय.अगदी एटीएममधून पैसा काढण्यासाठी चार-चार तास रांगा लावाव्या लागत असल्यानं पैसा ही इथं महाग झालाय. मागच्या आठड्यात वृत्तवाहिन्यांनी याची ‘ब्रेकींग न्यूज’ खाली दखल घेतली. इंग्रजी
वृत्तपत्रांनी शब्दमर्यादेचं आणि संपादनाचं काटेकोर कौशल्य वापरत 250 शब्दात या बाबतच्या बातम्या दाखवल्या. पण यामुळे मणिपूरचे प्रश्न सुटले का ? याचा फॉलो-अप किती जणांनी केला ?
मणिपुरी काकांच्या एक-एक प्रश्नानं कैवल्यनं स्वत:भोवती गुंफून घेतलेले कोष गळून जात होते. ज्या सामाजिक संस्कारात तो लहाणाचा मोठा झाला. ज्या सामाजिकतेचं भान वडिलांनी आयुष्यभर जपलं आणि निवृत्तीनंतरच आयुष्य घालवण्यासाठी विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून त्यांनी मणिपूरची निवड का केली हे त्याला समजू लागलं होतं. आपण काही करु शकतो ही भावनाच मरुन जावी इतकी विषण्णता या मणिपूरच्या हवेत साठून राहिल्याचं त्याला जाणवू लागलं.
हताशा, हतबलता, परकीय घुसखोरी, बेरोजगारी, व्यसनाधिनता, विघटनवाद, आणि नाकरलेपणाची भावना या सारख्या समस्यांनी ग्रासलेल्या या राज्यातल्या जनतेमध्ये सकारात्मकतेचा, एकात्मतेचा, समरसेतेचा आणि राष्ट्रीयत्वचा धागा जोडण्यासाठी आपले आई-बाबा काम करतायत हे समजताच त्याला त्यांचा प्रचंड अभिमान वाटला. आता या कामात त्यांना संपूर्णपणे मदत करायची हे त्यानं नेवांगमध्ये बस दाखल होण्यापूर्वीच पक्क केलं होतं. ज्या देशात आपण जन्मलो, ज्या समाजात आपण मोठे झालो त्याचं देणं आपल्याला चुकवावंच लागतं. आपले बाबा मागची चाळीस वर्ष हेच करतायत. आता आपणही तेच करायचं हे न्यूयॉर्क ते नेवांग हा प्रवास पूर्ण करेपर्यंत कैवल्यनं निश्चित केलं होतं. त्याच्या आयुष्याचं ‘लक्ष्य’ त्याला सापडलं होतं.
टीप - झी २४ तास डॉट कॉमच्या दिवाळी अंकात सर्वप्रथम प्रसिद्ध
6 comments:
कथा! कथेतला संदेश; कथेतून आलेली माहिती; कथेतून मिळणारी प्रेरणा, विषयातले बारकावे ह्या सर्व उत्तम गोष्टी आहेत. परंतु ही कथा कथा वाटलीच नाही. टेक्निकल/ रिपोर्टिंगप्रमाणे वाटली. पात्राचं वर्णन, प्रसंगाच्या नाट्यमयतेचं चित्रण, अनपेक्षित घटना, व्हिज्युअलायजेशन इ. इतकं जास्त उठून नाही दिसलं. वाचताना कुठेही भावनांचा संबंध आला नाही. बातमीसारखीच वाटली. (क्षमस्व; पण प्रतिक्रिया ही आली मनात). पहिल्या कथेवर थांबू नये ही विनंती!
CONGRATULATIONS OMKAR. YOUR FIRST STORY IS TRULY VERY GOOD. AAGE BADHO
We need to spread this subject every where. For that this is a good try.
All the best.
@ निरंजन,
मनमोकळ्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. ही गोष्ट लिहताना अनेक मर्यादा लक्षात आल्या त्या मर्यादा कमी करण्याचा नक्कीच पुढे प्रयत्न करेन.
@ प्रवीणकाका,
खूप खूप धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.
@ पोर्णिमा ताई,
पूर्वांचलाच्या विषयावर अनेक वर्षांपासून काम
करणा-या तुमच्या सारख्या ज्येष्ठ कार्यकर्तीची प्रतिक्रिया ही नक्कीच माझ्या लेखनाला नवं बळ देणारी आहे.
खूप खूप धन्यवाद आणि ब्लॉगवर मनापासून स्वागत.
Post a Comment