
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अगदी अपेक्षित असेच लागले आहेत.हे निकाल लागल्यावर मला यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेतची आठवण येतीय.. या स्पर्धेत कोलकता नाईट रायडर्सचा संघ हरणार यामध्ये अगदी सगळ्यांचे एकमत होते.या निवडणुकीत नाईट रायडर्सची जागा भाजप-शिवसेना युतीने घेतली होती. अगदी नाईट रायडर्स प्रमाणे युतीनेही अगदी विजयाच्या तोंडातून पराभव खेचून आणला. नाईट रायडर्सप्रमाणे युतीच्या टीममध्येही अनेक स्टारर्स होते.मात्र या स्टारर्समध्ये एकवाक्यता नव्हती. जॉन बुकाननची मल्टीपल कॅप्टनची थियरी त्यांनी अगदी निवडणूक प्रचारातच अमलात आणली होती.ऐन निवडणुक प्रचार रंगात असतानाचे युतीचे नेते आणि आयपीएलच्या दरम्यानचे नाईट रायडर्सचे खेळाडू यांचे चेहरे एकमेकांच्या बाजूला लावले तर हे दोन्ही चेहरे आणि चेह-यावरचे भाव अगदी सारखेच दिसतील.राजकारण आणि क्रिकेट या गोष्टी भारतीय समाजात किती बेमालुमपणे मिसळलेल्या आहेत याचे उदाहरण म्हणून हे पुरेसे असावे.
आघाडी सरकारचा नाकार्तेपणा त्यांना सत्तेपासून दूर खेचण्याकरता पुरेसा होता.परंतु या नाकर्त्या राजवटीला हटवण्यासाठी समर्थ पर्यायच युतीने उभा केला नाही. शिवसेनेचा सारा प्रचार राज ठाकरेंभोवतीच फिरत राहीला. तर भाजपची अवस्था जुने वैभव आठवत बसणा-या व्यक्तींसारखी झालीय.लोकसभेत झालेल्या पराभवातून हा पक्ष अजुनही बाहेर पडलाय असे वाटत नाही.या निवडणुकीत एक पक्ष म्हणून भाजप उतरलाय असे कधीच वाटले नाही. राज्य भाजपचे युनीट एकत्र बांधण्याची जी शक्ती प्रमोद महाजनांच्याकडे होती ती ताकत त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मिरवणा-या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे नाही.हे या निवडणुकीत सिद्ध झालंय.
पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवणा-या भाजपने यंदाच्या निवडणुकीत अन्य पक्षांप्रमाणे घराणेशाहीचा पॅटर्न राबवला.गोपीनाथ मुंडेंनी आपली मुलगी पंकजा, भाजी पूनम महाजन आणि जावाई मधुसूदन केंद्रे यांना भाजपचे तिकीट मिळवून दिले.यापैकी पंकजा वगळता अन्य वारस या निवडणुकीत पराभूत झाले.मात्र या पंकजा मुंडेंना निवडून आणण्याकरता मुंडेंची बरीच शक्ती घालवावी लागली. मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्ये भाजप -सेनेला 6 पैकी केवळ परळीची एकमेव जागा मिळवता आली.संपूर्ण मराठवाड्यात परळी आणि उदगीर ह्या दोनच जागा भाजपला जिंकता आल्या.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा बाळगणा-या मुंडेंनी या पराभवाने कठोर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
भाजपची ही अवस्था तर दुसरिकडे शिवसेनेमध्येही यंदा आश्चर्यकारक असा गोंधळ होता.राडे, धाक, मारामारी आणि परप्रांतीयांचा द्वेष ह्या सारख्या घटकांच्या मदतीने शिवसेना मुंबईत आणि राज्यभर वाढली.उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्षपदाची सुत्रे घेतल्यापासून शिवसेनेचा हा राडेबाज चेहरा कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि राज ठाकरे या सारख्या नेत्यांना उद्धव यांची ही नवी संस्कृती मानवण्याची शक्यताच नव्हती.त्यामुळे ते शिवसेनेपासून दूर झाले. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा एकखांबी तंबू होता. राज्याच्या राजकारणात आपले अस्तित्व गडद करण्याकरता स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याकरता त्यांनी गेले पाच वर्षे भरपूर प्रयत्न केले. मात्र ऐन निवडणुक काळात राज यांच्या भुलभुलैयाला बळी पडून उद्धव स्वत:चा मार्ग भरकटले. हा मार्ग भरकटल्याची शिक्षा मतदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिली आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झालेला उदय हे या निवडणुकीतील महत्वाचे वैशिष्ट मानावे लागेल. अवघ्या साडेतीन वर्षात स्वत:चे 13 आमदार निवडून आणण्याची कामगिरी राज ठाकरेंनी केलीय.राज ठाकरेंच्या राजकीय कौशल्याला नक्कीच सलाम करावा लागेल. परंतु मनसेने हा विजय कसा मिळवला आहे. या यशाकरता कोणता शॉर्टकट त्यांनी वापरला ह्याचाही विचार त्याच्या जोडीने करायला हवा.
राज यांच्या काठीने शिवसेना नावाचा साप मारला गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मंडळीना तसेच अनेक स्वयंभू सेक्यूलर विचारवंताना आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविक आहे. किंबहुना, युतीला रुळावरून उतरवण्यासाठी मनसेच्या इंजिनाला कोळसा आणि तेलपाणी कोणी पुरवले याचा विचारही व्हायला हवा. 'मराठी खतरे में' असा नारा देत मराठी माणसाचा एकमेव तारणहार असल्याचा दावा करत बाळासाहेब ठाकरेंनी पूर्वी राजकारण केले.आता बाळासाहेबांचा हा वारसा राज ठाकरे पुढे चालवत आहे. मराठी माणसांच्या नावाने दुकानदारी करणा-या या पक्षांना किती महत्व द्यायचे याचा विचार मराठी माणसांनीच करायला हवा.
राज्यातील जनतेच्या मनात आघाडी सरकारविषयी जो रोष होता, तोच मनसेच्या मतांमुळे विभागला गेला आहे. मनसेमुळे युतीच्या 40 जागा गेल्या. मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत हा जो प्रचार निवडणुकीपूर्वी युतीने केला आहे. ते या निकालाने सिद्ध झाले आहे. आघाडीला सत्तेवर आणण्याकरता राज ठाकरेंच्या या 'अशोकसेनेचा ' मोठा वाटा आहे..
शिवसेनेचा लढाऊ बाणा संपला, , मवाळ झाली, सर्वसमावेशक झाली, म्हणून तिचे पारंपरिक मतदार मनसेकडे वळले, असे मानले जाते. तसे असेल, तर ते मराठी माणसांसाठी किती घातक आहे. याचा विचार सर्व सुजाण मराठी माणसांनी करायला हवा. कोणत्याही मुद्द्यावर नाक्यानाक्यावर राडा करणारे, नोकरीच्या शोधात आलेल्या परप्रांतीयांना पिटाळून लावणारे, टॅक्सी फोडणारे मराठी नेते जर मसीहा म्हणून ओळखले जात असतील तर ही अत्यंत अस्वस्थ करणारी बाब आहे.
मराठी माणसांची ओळख भलेही कुणाला आक्रमक अस्मितेचा साक्षात्कार घडवणारी वाटो, ही ओळख ही न्यूनगंडामधून निर्माण झालेली आहे. मराठी समाज हा भावनिक भुललैय्यात अडकलेला आहे. या भुलभैलैय्यातून बाहेर काढणारे नेते सध्या महाराष्ट्राला हवे आहेत. ह्या समर्थ पर्यायाचा शोध मराठी मतदारांना लागेपर्यंत नाकर्त्या सरकारची राजवट राज्यातून जाणे अवघड आहे.