Tuesday, November 10, 2020

कमनशिबी!


 

ते वर्ष होते 1988. टीम होती मुंबईतील प्रसिद्ध शारादाश्रम शाळा. स्पर्धा होती मुंबईच्या शालेय क्रिकेटमधील मानाची समजली जाणारी हॅरिस शिल्ड. शारदाश्रम शाळेचा पहिला खेळाडू बाद झाला. त्यानंतर एका 13 वर्षांच्या मुलाने पॅड बांधले. दुसरा खेळाडू बाद झाला. तो 13 वर्षाचा मुलगा हातात ग्लोज घालून सज्ज झाला. आता एक जरी विकेट पडली तर त्याला मैदानात खेळायला जायचे होते. तो 13 वर्षाचा मुलगा हातात बॅट घेऊन मैदानात येण्यासाठी सज्ज होता. त्याने तब्बल दोन दिवस प्रतीक्षा केली. विकेट काही पडलीच नाही. अन्य दोघांनी शालेय क्रिकेटमध्ये 664 रन्सची विक्रमी पार्टनरशिप केली.

या पार्टरनरशिप केलेल्या जोडीतील एक फलंदाज होता सचिन तेंडुलकर. सचिनची पुढच्या वर्षीच भारतीय टीममध्ये निवड झाली. तो क्रिकेटमधला सर्वात महान फलंदाज बनला. दुसरा फलंदाज होता विनोद कांबळी. कांबळीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. हातात बॅट घेऊन दोन दिवस प्रतिक्षा करणाऱ्या तिसऱ्या खेळाडूचं नाव होतं अमोल मुझुमदार. अमोलने त्या मॅचमध्ये दोन दिवस प्रतिक्षा केली. त्याला मैदान गाजवण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतरच्या पुढच्या आयुष्यातही अमोलच्या वाटेला फक्त प्रतिक्षाच आली. राष्ट्रीय संघात त्याला शेवटपर्यंत संधी मिळालीच नाही.

सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आम्रे अशी भारतीय फलंदाजांची फळी घडवणाऱ्या रमाकांत आचरेकरांचाच अमोल शिष्य. अमोलने 1993 साली प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबईकडून पदार्पण करताना हरयाणाविरुद्ध 260 रन्सची ऐतिहासिक खेळी केली. पहिल्याच प्रथमश्रेणी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा 70 वर्षांहून जुना रेकॉर्ड अमोलने मोडला.

देशांतर्गत स्पर्धेत धावांची रास रचणाऱ्या अमोलची राष्ट्रीय टीममधील जागेसाठी कर्नाटकच्या राहुल द्रविडशी स्पर्धा होती. अमोल आणि राहुल दोघेही तंत्रात अव्वल. इंग्लंडचा अ संघ 1995 साली भारत दौऱ्यावर आला. त्यावेळी भारताच्या अ संघात अमोल आणि राहुल हे दोघेही होते. या संपूर्ण स्पर्धेत अमोल फेल गेला. राहुल द्रविडने उत्तम खेळ केला. निवड समितीला प्रभावित करण्याची अमोलची मोठी संधी हुकली.

त्यानंतर पुढच्या वर्षी 1996 साली दुलिप करंडक स्पर्धेत अमोलला पुन्हा एकदा संधी होती. भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार होती. त्या टीममध्ये फलंदाजांच्या दोन जागा शिल्लक होत्या. या दोन जागांसाठी राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सौरव गांगुली आणि अमोल मुझुमदार अशी चार फलंदांजांमध्ये स्पर्धा होती. त्यामध्ये राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीने बाजी मारली. इंग्लंड दौऱ्यातील ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीत द्रविड - गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतचा पुढचा सर्व इतिहास आहे. लक्ष्मणलाही राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 साली झालेल्या ऐतिहासिक कोलकाता टेस्टनंतर लक्ष्मणही भारतीय टेस्ट टीमचा अविभाज्य घटक बनला. अमोलची प्रतीक्षा संपलीच नाही.

चुकीच्या काळात क्रिकेट खेळल्याचा फटकाही अमोलला बसला. अमोल हा मधल्या फळीतील फलंदाज. अमोल भरात होता तेंव्हा राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण असे दिग्गज फलंदाज भारतीय टीममध्ये होते. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने सरस कामगिरी करुनही अमोल कायम वेटिंग मोडवरच राहिला.

अमोलच्या मुंबई टीममधील वासिम जाफर, निलेश कुलकर्णी, साईराज बहुतुले, रमेश पोवार, कुरुविला या सहकाऱ्यांना राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळाली. जाफर हा सलामीचा फलंदाज होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अमोलसारखाच सातत्याने खेळ केल्यानंतर जाफरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तर अन्य खेळाडू हे गोलंदाज असल्याने त्यांना संधी मिळाली.

अमोल तब्बल 20 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आसाम आणि आंध्र प्रदेश या टीमकडूनही तो खेळला. तिथेही त्याने आपले काम चोख केले. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो वासिम जाफरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 9 हजारांपेक्षा जास्त धावा काढूनही अमोलला शेवटपर्यंत राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळालीच नाही.

भारतीय क्रिकेटमधल्या 'सुपर फोर' ची कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर असताना अमोलचेही वय वाढले. त्यामुळे निवड समितीने साहजिकच तरुण खेळाडूंना टीममध्ये संधी मिळाली. अखेर अमोलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळताच निवृत्ती स्विकारली.

आता निवृत्तीनंतर अमोल विविध क्रीडा वाहिन्यांवर उत्तम समालोचन करतो. तो राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीमचा हंगामी फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम केलं. त्याची निवृत्तीनंतरची कारकीर्द उत्तम सुरु आहे. असं असलं तरी त्याला आजही टीव्हीवर पाहताना एका उत्तम फलंदाजाला राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही याचे मला वाईट वाटते.

अमोलचा लवकरच टीम इंडियाच्या कोचिंग टीममध्ये समावेश व्हावा अशी माझी इच्छा आहे. क्रिकेटमधल्या सर्वात कमनशिबी फलंदाजाला मिळालेला हा थोडा तरी न्याय असेल.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...